संगीताच्या प्रत्येक आविष्कारात कुठेना कुठेतरी संस्काराला वाव असतो तसेच आहे त्या चित्रात आणखी बदल घडवून, मुळातली लज्जत, खुमारी वाढवता येऊ शकते. रागदारी संगीत याचे उत्तम उदाहरण ठरेल. यमन सारख्या रागाची इतकी विलोभनीय रूपे ऐकायला मिली आहेत की हा राग कधी संपेल असे वाटतच नाही. याच शब्दात पुढे जाऊन असे म्हणता येईल, सुगम संगीतात देखील तुम्हाला प्रत्येकवेळी काहीतरी नवीन करून दाखवता येऊ शकते, अनेक संगीतकार, गायकांनी याचा प्रत्यय आणून दिला आहे. सध्या जे “रिमिक्स” संगीत म्हणून प्रसिद्ध झाले आहे, हा आविष्कार याच विचाराची फलश्रुती म्हणता येईल.
कुठलेही संगीत हे नेहमीच परिवर्तित असणे गरजेचे असते अन्यथा त्यात “साचलेपण” होत राहते आणि हळूहळू त्यावर शेवाळ माजायला लागते!! याच उद्देशाने, “रिमिक्स” हा संगीत प्रकार उदयास आला. तत्वत: रिमिक्सची कल्पना निश्चित अप्रतिम आहे आणि आजही अनेक प्रतिभाशाली संगीतकार किंवा गायक, त्या दृष्टीने मूळ गाण्यात थोडे बदल करून, रसिकांना चकित करतात. तसेच तीन मिनिटांच्या रचनेत देखील विस्ताराच्या किती शक्यता असू शकतात, याची प्रचीती देतात.
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक हृदयनाथ मंगेशकरांचे गाणे, या दृष्टीने ऐकण्यासारखे आणि अभ्यासावे, अशा दर्जाचे नक्की आहे. हा गायक, आपलीच गाणी सादर करतो परंतु त्या गाण्यातील अनेक “छुप्या” जागा घेऊन, रसिकांना चकित करतो. अर्थात, या संगीतकाराची काही गाणी ही सरळ, सरळ शास्त्रीय रागदारी संगीतातील चीजेवर असल्याने, मंगेशकरांना याचा फायदा घेता येतो. उदाहरण घ्यायचे झाल्यास, “जिवलगा, राहिले दूर घर माझे” हे पुरिया धनाश्री/ श्री रागावरील गाणे, त्यांच्या वडिलांनी प्रसिद्ध केलेल्या “हुं जो गयी” या मारवाडी भाषेतील चीजेवर आधारित आहे आणि जर का मूळ चीज आणि ही चाल, याचा थोडा अभ्यास केला तर असे आढळेल, मूळ चालीत फारसे फेरफार न करता, अशी “रेडीमेड” चाल सुगम संगीतासाठी वापरली आहे (यात एक गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे, संगीतकाराने ही बाब कधीच दडवून ठेवलेली नाही!!) तेंव्हा गाण्याला शास्त्रीय संगीताचे पाठबळ असल्याने, चालीचा मूळ “आराखाडा” तसाच कायम ठेऊन, मंगेशकर, एक गायक म्हणून भरपूर स्वातंत्र्य घेऊ शकतात आणि तसे ते नेहमी जाहीर कार्यक्रमात सादर करताना घेतात!! यामुळे, एक फायदा होतो, मूळ चाल किती सक्षम आहे, त्यात किती वेगवेगळ्या तऱ्हेने प्रयोग करता येतात आणि त्यायोगे रसिकांचे सांगीतिक अनुबोधन सहज घडू शकते.
हे गाणे गाताना, गायक नेहमी, लयीचे वेगवेगळे बंध घेतो, कधी वेगवेगळ्या शब्दांवर आघात करून, शब्दांची नवी ओळख करून देतो तर कधी संपूर्ण निराळ्या अशा हरकती घेऊन, गायकीच बदलून टाकतो!! हे त्यांना शक्य होते कारण, गाण्याची चाल, त्यांची स्वत:ची असल्याने, तसे स्वातंत्र्य हृदयनाथ मंगेशकर घेऊ शकतात!! जेंव्हा रिमिक्स संगीत म्हणून, एक आविष्कार समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेंव्हा असे प्रयोग देखील त्यात अंतर्भूत असतात.
याउलट दुसरे उदाहरण इथे घेतो. काही वर्षांपूर्वी, मी, एका कार्यक्रमात “ज्वेलथीफ” चित्रपटातील “होटो ऐसी बात” हे गाणे ऐकले होते. टीमही देखील हे गाणे नक्कीच ऐकले असणार. मुल गाण्याची चाल, नेपाळी लोकसंगीतावर आधारित आहे आणि त्या संगीताचा गोडवा, या गाण्यात उतरलेला आहे. मी जे गाणे ऐकले, ते “रिमिक्स” म्हणून ऐकले होते. सुगम संगीताची ही खासियत म्हणू किंवा सहज प्रतिक्रिया म्हणू, पण कुठल्याही गाण्यात, कुठे ना कुठेतरी सांगीतिक विस्ताराच्या शक्यता नेहमीच आढळतात. कुशाग्र संगीतकार, या जागा, नेमकेपणी ओळखतो आणि नव्याने दाखवून देतो. लोकसंगीताबाबत एक बाब अवश्य ध्यानात ठेवावी लागते आणि ती म्हणजे त्यामागील परंपरेची!! लोकसंगीत हे नेहमीचा त्या प्रदेशाची “खूण” असते, त्याच्यावर त्या प्रदेशाची संस्कृती, आचार-विचार यांचा पगडा असतो. दुसऱ्या शब्दात मांडायचे झाल्यास, त्या प्रदेशाच्या मातीचा “गंध” त्या संगीतात मिसळलेला असतो.
तेंव्हा अशा संगीतात, विस्तार शक्यता जाणवून घेताना, त्या चालीचा “मूळ” गाभा लक्षात ठेवणे अत्यावश्यक असते. वरील गाण्यात, हाच विचार कुठेही दिसत नाही. प्रस्तुत गाण्यात, गाण्याचा ताल, लय आणि हरकती, यांचा वापर करताना, संगीतकाराचा “मूळ” लोकसंगीताचा अभ्यास जाणवतो आणि त्या दृष्टीने फार फेरफार न करता, संपूर्ण संगीताकृती आपल्यासमोर येते. या गाण्याचे रिमिक्स करताना, नेमके हेच विसरलेले दिसून येते. वास्तविक हे चित्रपटातील गाणे, तेंव्हा त्या प्रसंगाला “उठाव” मिळेल, या धर्तीने गाण्याची चाल बांधली आहे. रिमिक्स करताना, हीच बाब नजरेआड केलेली आहे!! एकतर लोकसंगीतात वापरलेला ताल, हा नेहमीच त्या प्रदेशचे प्रतिनिधित्व करीत असतो आणि इथे काहीतरी नवीन करायचे, याच उद्देशाने, मूळ तालवाद्ये बाजूला सारून तिथे ड्रम्स -, Oktopad अशी आधुनिक वाद्ये वापरली!! अगदी असे धरून चालू, संगीतकाराचे स्वातंत्र्य, म्हणून मान्य करता येईल (वास्तविक, याला काहीही अर्थ नाही) परंतु तालाचा वापर करताना, अंगावर वळ उठावेत, अशापद्धतीने तालवाद्ये वापरली आहेत!! हा बदल अनाकलनीय आहे!!
पुढे, पहिला अंतरा येतो, तेंव्हा तिथे चक्क आफ्रिकन संगीताचा – ज्याला Rap music म्हणता येईल, असे तुकडे टाकले आहेत!! संगीतात सृजनशक्तीला फार महत्व आहे पण त्याचबरोबर त्याला मर्यादा देखील आहेत. मूळ चाल काय आहे, त्यातील शब्द काय आहेत, याचा कसलाही विचार न करता, मनात आले म्हणून आणि काहीतरी नाविन्य दाखवायचे, या हव्यासापोटी, गाण्याचा “मूळ” आराखाडा बदलून टाकला आहे. लोकसंगीतात, जी एक “झिंग” असते, त्याचे लवमात्र आविष्कार दिसत नाही!! बरे, हे जे आफ्रिकन संगीताचे तुकडे वापरले आहेत, त्यात, स्वत:चे काहीतरी आहे का? तर तसेही काहीही नाही, तिथून ते संगीताचे तुकडे उचलले आणि या गाण्याच्या दोन्ही अंतऱ्यात जोडले!! म्हणजे केवळ “जोडकाम” याचे श्रेय!! पण, हे जोडकाम कितीपत योग्य आहे, यामागे काय विचार आहे, या प्रश्नांना कसलेच उत्तर मिळत नाही.
रिमिक्सला दोष मिळतो, तो अशा रचनांमुळे आणि मुळातली सुंदर कल्पना, पण तिचे असे वाभाडे काढले जातात!! अर्थात, अशा रचना अतिशय प्रसिद्ध होतात, आयचे प्रमुख कारण – मार्केटिंग!! अप्रतिम वितरण व्यवस्था आणि मार्केटिंग डोक्यावर आदळायचे!! एखादे गाणे, दोन वेळा ऐकले की लगेच त्यातील कमतरता ध्यानात येऊ शकते पण तेच गाणे सतत तुमच्या कानांवर आदळले की आपसूकच तुम्ही ते गाणे गुणगुणायला लागता आणि हळूहळू त्याच्या आहारी जाता!! हेच तत्व इथे पाळले जाते!!
हल्ली, त्या दृष्टीने बघता, हरिहरन, शंकर महादेवन किंवा सुरेश वाडकर, आपल्या जाहीर कार्यक्रमात, वरती उल्लेख केला त्या हृदयनाथ मंगेशकर यांच्या “गायकी” प्रमाणे गाताना, विविध प्रयोग करतात. वसंतराव देशपांड्यांनी प्रसिद्ध केले, “बगळ्यांची माळफुले” हे गाणे शंकर महादेवन किती वेगळ्या प्रकारे सादर करतो, ते ऐकण्यासारखे आहे. चाल तशीच ठेवली जाते, सम त्याच मात्रेवर घेतली जाते!! पण, हे सगळे रचनेचे बाह्यात्कारी स्वरूप!! तुम्ही, सम गाठताना, कशाप्रकारे सांगीतिक वाक्यांश घेऊन उतरता, हे बघण्यासारखे असते. हरिहरन, बरेचवेळा मेहदी हसन यांच्या गझला सादर करतो किंवा जगजीत सिंगने त्या पुढील पायरी गाठली आहे. मूळ गझल घेऊन, तिला संपूर्ण नवीन चाल लावली आणि ती देखील अतिशय अर्थपूर्ण आणि अनेक नवीन सांगीतिक वाक्यांश सादर करून. संगीत किती व्यामिश्र असते, याचे अप्रतिम उदाहरण. लताबाईंनी गालिबच्या गझला गाऊन अजरामर केल्या – “हर एक बात पे” किंवा “हजारो ख्वाइशे ऐसी” या रचना घेतल्या आणि त्यापाठोपाठ जगजीत सिंगने याच गझलांना लावलेल्या चाली ऐकल्या, तर माझ्या म्हणण्याचे प्रत्यंतर येईल.
अर्थात, एकेठिकाणी अशा गायकीचा अति हव्यास देखील मी ऐकला आहे. मागे, इंग्लंडमधील एका शहरात, शंकर आणि हरिहरन यांच्या एकत्रित गाण्याचा कार्यक्रम होता. त्यात, त्यांनी दोघांनी मिळून “तू ही रे” हे प्रसिद्ध गाणे म्हणायला घेतले आणि विपर्यास असा, हे गाणे त्यांनी जवळपास २० मिनिटे आळवले!! सुगम संगीत गात आहेत की बंदिश आळवत आहेत? हा रिमिक्सच्या संकल्पनेचा अपलाप म्हणता येईल. सतत, एकामागून एक अशी जबरदस्त सरगम घेतलेली ऐकायला मिळते!! सुगम सानितात, सरगम घ्यावी पण त्याला देखील मर्यादा आहे आणि मुळात सरगम घेतली जाते, ती सामान्यत: पुढील आलापी कशी असेल, ते दर्शविण्यासाठी!! परंतु इथे तर सरगमची बरसात चालू!!
थोडक्यात, मुळात अप्रतिम संकल्पना असलेले रिमिक्स, जर विचारपूर्वक अंगिकारले नाही तर अत्यंत उठवळ, ढोबळ आणि प्रसंगी शिसारी आणणाऱ्या रचना ऐकायला मिळू शकतात. मराठीत देखील अशा काही डागाळलेल्या रचना ऐकायला मिळतात आणि रिमिक्स या सुंदर कल्पनेबद्दल शंका घ्यावी, अशी परिस्थिती उद्भवते!!

No comments:
Post a Comment