मागील भागात आपण, “आधी चाल की शब्द” अशा काहीशा व्यर्थ अशा मुद्द्यावर थोडा विचार केला. आता, अशाच एका विषयाने आपण, या लेखाची सुरवात करूया. चालीच्या अनुषंगाने लिहायचे झाल्यास, शब्दांना चाल कशी लावावी, हा एक मुद्दा इथे जरा विस्ताराने मांडूया. चाल हीं शब्दानुरूप असावी हे तर अवश्यमेव आहेच. अन्यथा शब्दातील अर्थ अधिक गहिरा करणे, हीं जी संगीतकाराची मुलभूत गरज असते, तीच कल्पना नाहीशी होईल. पण, आपल्याकडे एक (वृथा!!) विषय अकारण चघळला जातो. चाल शब्द्वाही असावी हे मान्य करताना, तीच चाल सोपी असावी, गुणगुणण्यासारखी असावी असा एक विचार पूर्वीपासून प्रबळ दिसतो. तीन मिनिटांचे गाणे हे फक्त “सामान्य” रसिकांसाठी(च) असते, हाच विचार या मागे दिसून येतो. आणि त्यातूनच आजही, सुगम संगीताला वाजवी महत्व मिळत नाही. खर तर, तीन मिनिटांचे गाणे देखील सृजनात्मक आविष्कारासाठी एक आव्हान असू शकते आणि आहे, हेच मुळी बऱ्याच लोकांना मान्य नसते. तसा जरा खोलात विचार केला तर असेच आपल्याला दिसून येईल की, शास्त्रीय संगीत लोकप्रिय होण्यासाठी सुगम संगीताने फार मोठा हातभार लावला आहे. कित्येक रागांच्या ओळख पटविण्यासाठी याच लक्षण गीतांचा नेहमी उपयोग केला जातो. आता, आपण इथे उदाहरण बघूया. “यमन” सारख्या प्रचंड आवाक्याचा राग घेऊया. या रागावर आधारित काही गाणी बघूया. मेहदी हसनची प्रसिध्द गझल,”रंजिश हीं सही”, श्रीनिवास खळे यांचे, “शुक्र तारा मंद वारा”, “जिंदगी भर नाही भूलेगी वोह बरसात की रात” हे चित्रपट गाणे, “देवाघरचे ज्ञात कुणाल” हे नाट्यगीत बघूया. वरवर बघितले तर, यातील प्रत्येक गाण्याची चाल हीं संपूर्णपणे वेगळी आहे. पण, जर का थोडा खोलात विचार केला तर, असे लक्षात येईल की, ह्या सगळ्या गाण्यांचा मूल:स्त्रोत यमन रागात आहे. आता, जर का यमन राग ऐकायला घेतला तर, लगेच सामान्य रसिकाला त्याची तितकी गोडी वाटेलच असे नाही पण जर का अशा गाण्यांनी कुठे साद्धर्म्य ऐकायला आले की लगेच त्याला यमन रागाची वेगळी ओळख पटते आणि त्याला राग संगीताची आवड निर्माण होऊ शकते. राग संगीताची पहिल्या प्रथम आवड निर्माण होणे तसे अवघडच असते. त्याला अनेक करणे आहेत पण इथे बोलायचे झाल्यास, सुगम संगीतामुळे, शास्त्रीय संगीत लोकप्रिय व्हायला मदत होते, हे नक्की.
असो, आपल्या मूळ मुद्द्याकडे वळताना, चाल सोपी असावी, ह्या मुद्द्याकडे वळताना, “सोपेपणा” हा मुद्दा फार ठामपणे मांडला जातो. गाणे सहज गुणगुणता आले पाहिजे, हे योग्य आहे आणि मला वाटत, ती एकमेव अट नसावी. प्रत्येक संगीतकाराची जातकुळी वेगळी असते आणि त्यानुरुपच तो आपली संगीतरचना करीत असतो, याच सोपेपणाचा अति हव्यास धरल्याने, कितीतरी वेळा, अत्यंत फोफशा, बेचव चाली निर्माण झाल्या आहेत. असा एखादा संगीतकार निघतो, की ज्याला पारंपारिक रीतीरीवाजानुरूप चाली देता येणे शक्य नसते किंवा तसा याचा पिंड नसतो. असे काही(च) संगीतकार झाले आहेत की, त्यांनी मळलेली वाट ण धरता, स्वत:चा नवीन मार्ग चोखाळला. अशा प्रयत्नात, ते संगीतकार फारसे(लौकिक दृष्ट्या!!) यशस्वी झाले नसतील, पण काळाच्या ओघात त्यांचे वेगळेपण निश्चितपणे अधिरेखीत झाले आहे. आता उदाहरणच द्यायचे झाल्यास, हिंदीत जयदेव असा फार मोठ्या ताकदीचा संगीतकार होऊन गेला, तसेच मराठीत श्रीनिवास खळे आहेत. यांना, भौतिकदृष्ट्या कधीही यश मिळाले नाही पण, काळाच्या ओघात त्यांची गाणी आजही जिवंत वाटतात. तसेच, मदन मोहन, हृदयनाथ मंगेशकर यांची नावे घ्यावी लागतील. तशी हीं यादी आणखी वाढवता येईल. प्रश्न यादीत कोण आहे आणि कोण नाही, हा नसून उपरोल्लेखित संगीतकारांनी, त्यांच्या पिंडाला मानवतील अशाच प्रकारची गाणी दिली, मग भले आर्थिक दृष्ट्या ते संगीतकार अपयशी म्हणून गणले असतील!!
माझ्या मते, चाल हीं नेहमीच गायला आव्हानात्मक असावी. गायकाला गाताना, स्वत”चे खास कौशल्य दाखविता आले पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की, जी गाणी गुणगुणण्यासारखी असतात, ती गाणी दर्जा म्हणून कमअस्सल असतात. सोपी चाल तयार करणे देखील अति अवघड असते, त्यासाठी संगीताचा तितकाच गाढ व्यासंग असणे अत्यंत जरुरीचे असते. अशी बरीच उदाहरणे दाखवता येतील की ज्या गाण्यांचो चाल गुणगुणता येते आणि तरीही गायला फार अवघड असते. अशा गाण्यात छुप्या पद्धतीने अवघड वळणाच्या हरकती गुंतलेल्या असतात,ज्या गातानाच लक्षात येतात. या पद्धतीत, अनिल बिश्वास, सी.रामचंद्र, रोशन, एस,डी. आणि आर,डी बर्मन, तर मराठीत वसंत प्रभू, वसंत देसाई, वसंत पवार, सुधार फडके इत्यादी अनेक नावे घेता येतील.
इथे आणखी एक वादग्रस्त मुद्दा काढता येईल व तो म्हणजे, संगीतकाराला शास्त्रीय संगीताचा कितपत अभ्यास असावा आणि याच मुद्द्याला छेद देणारे काही संगीतकार अस्तित्वात आल्याने, कधी कधी, शास्त्रीय संगीताचा अभ्यास करण्याची काहीही गरज नाही, असला एक अति खुळचट विचार ऐकायला/वाचायला मिळतो. विशेषत: आपल्या पठडीतील गाणी करताना देखील हाच विचार केलेला आढळतो.वास्तविक पाहता,(इथे मी केवळ भारतीय भाषेतील गाण्यांचाच विचार करीत आहे!!) कुठलेही गाणे जर का जरा खोलात जाऊन, विचारपूर्वक ऐकले तर त्याची
मुळे हीं कुठल्या ना कुठल्या तरी रागावर आधारित असतात आणि हे शास्त्रसंमत आहे. असे असताना, शास्त्रीय संगीताचा अजिबात अभ्यास करण्याची गरज नाही, असे म्हणणे गैरलागू ठरते. शास्त्रीय संगीताचा जरी अति खोलवर अभ्यास केला नाही तरी देखील त्याच्या संपर्कात राहिल्याने, अनेक गोष्टींची जाण आपोआप होते, उदाहरणार्थ, लयीची जाण, तालाची समज, आणि एकाच रागातून संपूर्ण वेगळ्या स्तरावर स्वयंभू चाली तयार करणे, इत्यादी गोष्टी जमू शकतात. आता तर, आपल्या लोकसंगीतातदेखील शास्त्रीय संगीताची पाळेमुळे सापडतात, याची नव्याने ओळख झाल्याने, केवळ लोकसंगीताची जाण सुद्धा पुरेशी आहे, असला एक खुळचट विचार प्रसिध्द झाला आहे. लोकसंगीताचा उगम जरी अगम्य असला तरी, ते देखील शास्त्र संमत आहे, हीं बाब सर्वांनी मान्य केलेली आहे.
No comments:
Post a Comment