से पहिले गेल्यास, संगीतकाराच्या रचना, या विषयावर आणखी बरेच काही लिहिता येईल.अनेक मुद्दे, जे विवादास्पद आहेत, त्याचा देखील उहापोह करता येईल. त्याचा थोडक्यात उल्लेख करून, मी नंतर पुढील घटकाकडे वळेन. सुगम संगीत हे सुगम – समजण्यास सोपे, अशा स्वरूपाचे असल्याने, सगळेच सोपे करण्याचा बऱ्याचवेळा प्रयत्न होतो आणि सोपेपणाच्या नावाखाली काहीही आणि कसल्याही रचना आपल्या माथी मारल्या जातात. त्यातून, गेली काही वर्षे मार्केटिंगचे नावे तंत्र उदयाला आल्यापासून कुठलेही गाणे, हे लोकप्रिय करता येणे शक्य झाले आहे. याबद्दल एक सुंदर उदाहरण देतो. ए.आर.रेहमान याला काही वर्षांपूर्वी जगप्रसिध्द असे ऑस्कर पारितोषिक, “जय हो” या गाण्याबद्दल मिळाले. आता, हे पारितोषिक देताना काय निकष लावले, याची काहीच कल्पना नाही पण जर का,काही मुलभूत निकष लावायचे ठरले तर, हे गाणे इतक्या वरील स्तरावरील पारितोषिकासाठी योग्य आहे का? हा प्रश्न नक्कीच उभा राहतो. इथे मी हेच गाणे का घेतले तर केवळ ऑस्कर मिळालेले आहे म्हणून!!
प्रथम कविता यादृष्टीने बघितले गेल्यास, कवी गुलजार देखील मनापासून मान्य करणार नाहीत की, ही त्यांची सर्वोत्कृष्ट कविता आहे!! काव्य म्हणून त्यांची इतर कितीतरी गाणी अतिशय समृध्द आणि सखोल आहेत. उदाहरणार्थ, “इस मोड पे जाते हो”, ” हमने देखी हैं उन आंखो की महकती खुशबू”, किंवा “मेरा कुछ सामान पडा हैं” इत्यादी गाणी, कविता म्हणून देखील नि:संशयरीत्या अप्रतिम आहेत. या कवितेच्या समोर “जय हो” ही रचना कितपत टिकून राहते? तेंव्हा, गुलजार यांना ऑस्कर पारितोषिक मिळाले, याचा एक भारतीय म्हणून आनंद होणे योग्य(च) आहे पण ती कविता त्यांची सर्वोत्कृष्ट आहे, हे मानणे अवघड आहे. तोच प्रकार एक संगीतकार म्हणून, ए.आर.रेहमानबाबत म्हणता येईल. तसे पहिले गेल्यास, काय सुंदर आहे त्या गाण्यात? केवळ सहज गुणगुणता येणारी चाल!! ना त्यात काही वैविध्य, ना त्यात काही गळ्याची तयारी दिसते!! तसे पहिले गेल्यास,रेहमानचीच “रोजा”,”बॉम्बे” या चित्रपटातील गाणी अधिक उल्लेखनीय आहेत. बहुदा असे असावे की, त्या वर्षी एकूणच जी काही गाणी बनवली गेली, त्याचा दर्जा या गाण्यापेक्षा अधिक खालावलेला असावा!! उत्तम मार्केटिंगच्या सहाय्याने, आपले गाणे कसे लोकांच्या गळी उतरवले जाते, याचा उत्तम उदाहरण ठरावे. जसे, साध्या “कोलावेरी डी” या गाण्याबाबत झाले आहे!! Youth Anthem म्हणावे असे काहीच त्या गाण्यात आढळत नाही, एक, साधी सरळ चाल, ज्यात थोडा तालाचा वेगळा प्रयोग आहे, इतपतच त्या गाण्याचे वैशिष्ट्य!! रेहमानच्या संदर्भात आणखी एक मुद्दा मांडावासा वाटतो.
हल्ली, त्याचे वर्णन करताना नेहमी “भारतीय मोझार्ट” असा उल्लेख करतात. हा खास, भारतीय अकलेचा उत्तम नमुना. आपल्याकडे कुणाचेही वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, लगेच त्यासंदर्भातील पाश्चात्य लोकांचा हवाला देऊन तुलना केली जाते. कशासाठी हे अकलेचे दिवाळे काढायचे? एकतर, कुठल्याही कलेच्या प्रांतात अशी तुलना नेहमीच गैरलागू असते. मागे, आर.डी.बर्मन या संगीतकाराबद्दल मोझार्टचा उल्लेख होत असे तर आता रेहमान. खरे सांगायचे झाल्यास, मोझार्टसारखे संगीतकार कधीतरीच जन्माला येत असतात!! पण, भारतात मात्र प्रत्येक पिढीत मोझार्टसारखे कलाकार जन्माला येत असतात. याची ना कुणाला खंत ना कसले वैषम्य!! खरतर यात आपणच आपले “बौद्धिक आजारीपण” दाखवून देतो, याचे कुणालाच काहीही वाटत नाही!! यात दुसरा भाग असा आहे की, वास्तविक पहाता, पाश्चात्य संगीत आणि भारतीय संगीत हे दोन्ही वेगळे प्रवाह आहेत, जरी दोन्ही संगीतात सात(च) सूर आहेत. त्यामुळे अशी तुलना ही नेहमीच गैरलागू ठरते.
आता रेहमानचा विषयच निघाला आहे तर त्या बाबत एक,दोन मुद्दे मांडून हा विषय इथेच संपवितो. जर का रेहमानचे संगीत अगदी ढोबळपणे पहिले तर, त्यावर सरळ सरळ पाश्चात्य संगीताचा प्रभाव दिसून येतो. त्यात काही चूक नाही,आता फ्युजन सारखा नवा संगीत प्रकार इथे चांगल्यापैकी स्थिरावला आहे. त्याच धर्तीवर रेहमान याची निर्मिती बहुश: असते. यात दुसरा भाग असा की, आपण असा विचार करू, याच धर्तीवर आपण, “pavarotti”,”whitney Houston” यांच्या सारखे गायक, कधीतरी आपल्या भारतीय संगीताच्या धर्तीवर एखादा तरी प्रयत्न करतील का? ह्यात, कुणीही अतिरेकी देशाभिमान सारखा अविचार करू नये!! इथे देशाभिमान वगैरे विचार गुंतविण्याचे काहीच कारण नाही. म्हणजे, पाश्चात्य गायक नेहमीच त्यांच्या संस्कृतीत जे संगीत जन्माला आले आहे त्याच्याशी नेहमीच कृतज्ञ असतात. ए.आर.रेहमान याच्या संगीताच्या संदर्भात विचार करता, त्यांनी पाश्चात्य संगीतावर आधारित जरूर संगीत द्यावे पण त्याचबरोबर आपल्या संगीताचे वैशिष्ट्य जे “मेलडी” म्हणून आहे, तशी किती गाणी दिली आहेत? ज्या संगीतकाराचा शिष्य, स्वत:ला म्हणवून घेतो, त्या इलायाराजाने आतापर्यंत कितीतरी भारतीय बनावटीच्या रचना केल्या आहेत आणि नंतर त्यांनी, पाश्चात्य संगीताचा अत्यंत डोळस स्वीकार केला आहे, तो इतका डोळस आहे की, आज त्यांनी निर्मिलेली “सिम्फनी” तिथे पाश्चात्य संगीतकारांनी मान्य केली आहे आणि अशी निर्मिती करणारे, आतापर्यंततरी एकमेव भारतीय संगीतकार आहेत. स्वतंत्र निर्मिती ही नेहमीच दुर्लभ असते पण म्हणून त्या दृष्टीने प्रयत्नच करू नये आणि मिळते त्या यशावर संतुष्ट राहावे, याला कुणी जर असामान्य म्हणत असतील तर भागच वेगळा!! याच दृष्टीकोनातून असे म्हणावेसे वाटते की रेहमान हा अतिशय सुंदर “Kraftman” आहे, आणि आजही त्याच्या रचनेत एकतर इलायाराजा तरी दिसून येतो किंवा आर.डी.बर्मन याचा प्रभाव दिसून येतो.
आणखी एक मुद्दा विशेषत्वाने मांडावासा वाटतो. फार पूर्वी, मी देखील दुर्मिळ गाणी गोळा करण्याचा छंद बाळगला होतो, अगदी पराकोटीचा म्हणावा इतपत. वास्तविक त्याचा या विषयाशी फारसा संबंध नाही तरी एक गंमत म्हणून खुलासा करीत आहे. विशेषत: लताची हिंदी गाणी गोळा करण्यात बरीच वणवण केली होती. त्या गटात काही दिवस काढले होते आणि कुठून अशी दुर्मिळ गाणी मिळवता येतात याचा अंदाज घेतला. त्यातील काही गाणी, अगदी भरपूर पैसे देऊन मिळवली देखील होती.जेंव्हा ती गाणी मिळाली, तेंव्हा झालेला आनंद आजही तितकाच ताजा आहे. पण, नंतर मला असेच जाणवायला लागले की, जी गाणी मिळवली होती, त्यातील काही(च) गाणी, मला वाटतात तितकी अप्रतिम नव्हती!! हा जरा विरोधाभास होता. त्यावेळी, जी गाणी मला नंतर फारशी भावली नाहीत, ती गाणी कितीतरी वेळा परत परत ऐकली पण अखेर तो परिणाम फारसा बदलला गेला नाही!! मग, जसजसा त्या लोकांच्यात मिसळायला लागलो, तशी मला असे जाणवायला लागले की, एखादे गाणे दुर्मिळ आहे,हेच त्या गाण्याचे वैशिष्ट्य मानणारे लोक होते. नंतर मी परदेशी गेलो आणि त्या लोकांपासून माझा संबंध तुटत गेला. नंतर माझी गाण्याकडे बघायची दृष्टी बदलत गेली आणि अधिक खोलवर झाली आणि नंतर या गाण्यातील वैय्यर्थ जाणवायला लागले. अर्थात, बरीचशी दुर्मिळ गाणी मात्र खरोखरच असामान्य आहेत, अगदी काही उदाहरणे इथे देतो. शामसुंदर या संगीतकाराचे, “साजन की गलीया”, विनोदचे “तारे वोही हैं”, सज्जाद हुसेनचे “जाते होतो जाओ”,जगमोहनचे “प्यार की ये तलखीया”, अनिल बिस्वासचे “रूठ के तुम तो चल गये” आणि अशी कितीतरी गाणी आता विस्मरणात गेली आहेत, माझी खात्री आहे, आजही ही आणि अशी कितीतरी गाणी लोकांना अतिशय आवडतील पण अजूनही बाजारात उपलब्ध नाहीत!! आणि जर का शोध घ्यायला गेलो तर अव्वाच्या सव्या किंमत मागितली जाते!! खरेतर, अशा गाण्यांचे मार्केटिंग आवश्यक आहे आणि त्या योगे लोकांची अभिरुची “घडविणे” आवश्यक आहे. सुधीर फडके हिंदीत केवळ “ज्योती कलश छलके” याच गाण्याने परिचित आहेत पण, त्यांचे “बांधी प्रीती फुलडोर” सारखे अफलातून गाणे कुठेही ऐकायलाच मिळत नाही, तसाच प्रकार शंकर जयकिशन बाबत म्हणता येईल. त्यांचे, राजकपूर यांच्या चित्रपटातील गाण्यांचे प्रचंड ढोल वाजवले जातात, पण “आंखो आंखो में” सारखे असामान्य गाणे कुठेच ऐकायला मिळत नाही, कारण ते गाणे राजकपूरच्या चित्रपटातील नव्हते!! असे, बहुतेक संगीतकारांच्या बाबतीत घडले आहे. अगदी, सी.रामचंद्र, रोशन, जयदेव, मदन मोहन, एस,डी.बर्मन, सलील चौधरी या सगळ्या संगितकारांबाबत म्हणता येईल. मदन मोहनचे “हमारे बाद अब मेहफिल में ये अफसाने” सारखे अफलातून गाणे किती जणांनी ऐकले असेल, मला शंका आहे!! आजही ही गाणी ऐकली तर माझी खात्री आहे, कुणीही असे म्हणणार नाही की ही गाणी जुनी आहेत आणि म्हणून टाकाऊ आहेत!! आता मात्र आपण, पुढी घटकाकडे पुढील लेखापासून सुरवात करूया आणि तो म्हणजे “गायकी”. कवी आणि संगीतकार याची संयोगाने जो संगीत प्रकार उदयाला येतो, ती कृती आपल्या रसिकासमोर मांडण्यासाठी “गायक/गायिका” हेच अखेरचे माध्यम उपलब्ध असते आणि तो घटक जरा विस्ताराने मांडूया.
No comments:
Post a Comment