मराठीत एक सर्वसाधारण आणि बहुदा खुळचटदेखील, असा प्रवाद आहे की स्त्रिया कधीच वैचारिक आणि त्याचबरोबर ललित लेखन करू शकत नाहीत!! वास्तविक कितीतरी पुरुष लेखक असे आहेत की त्यांचे लेखन, हे लेखनाच्या प्राथमिक रंजकतेच्या कसोटीवर देखील उतरत नाही. अशा पार्श्वभूमीवर इरावती कर्वे, यांचा “परिपूर्ती” हा लेख संग्रह खरोखरच असामान्य असा आहे. वास्तविक, आकाराने पुस्तक अतिशय छोटेखानी आहे पण त्यातील प्रत्येक लेख हा विचारांच्या कसोटीवर आणि वाचनानंद म्हणून अप्रतिम आहे. खरे तर, दुर्गाबाई भागवत आणि इरावती कर्वे, ही दोनच नावे, पुरुषी वर्चस्व म्हणून गणल्या जाणाऱ्या लेखन संस्कृतीत फार वरच्या पातळीवर घ्यावी लागतील. गंमत म्हणजे, त्यातील काही लेख सुरवातीला काळाच्या मर्यादेत अडकले आहेत, असे वाटते परंतु जेंव्हा तो लेख वाचून संपतो, तेंव्हा आपल्याला हेच जाणवते की, हा लेख कालची मर्यादा पार करून, आजही तितकाच टवटवीत आहे आणि हे मात्र त्या भाषेचे आणि विचारांचे कर्तृत्व!!
त्यांच्या बुद्धीवैभवाबद्दल, पु.ल.देशपांड्यांनी एका लेखात फार सुरेख विवेचन केले आहे. तेंव्हा, त्याबद्दल इथे काही लिहिणे अप्रस्तुत ठरेल आणि खरे तर, त्याचा, या लेखनाशी काहीही संबंध लावणे चूक ठरेल. प्रचंड बुद्धीमत्ता आणि ललित लेखन याचा कसलाच संबंध नसतो. विजय तेंडूलकर आणि व्यंकटेश माडगुळकर यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. परंतु, जर का बुद्धीमत्ता, तरलता आणि वैचारिक तौलनिकता असेल तर कुठलाही विषय किती खोलवर आणि अंतर्मुख होऊन मांडता येतो, याची साक्ष हे लेख वाचताना वारंवार येते. एकूण १८ लेख आहेत पण प्रत्येक लेख हा बुद्धीवादावर तर आहेच पण त्याचजोडीने संवेदनशीलता प्रत्येक ठिकाणी दिसून येते.
“प्रेमाची रीत” हा पहिला लेख आहे. परदेशातील प्रेम व्यक्त करायची पद्धत आणि आपली सोज्वळ संस्कृती याचा सुरेख सांधा साधलेला आहे. नवरा जर्मनी इथे नोकरीनिमित्ताने गेल्याने, तिथे गेल्यावर, तिथल्या प्रेम व्यक्त करायच्या पद्धतीने थोडेसे बावरून गेल्यावर आणि पुढे ही संस्कृती जाणून घेतल्यावर, मध्यंतरी जो वैचारिक गोंधळ उडतो, तो खरेतर आजही तितकाच आपल्या लोकांना अगम्य आहे!! जरी पूर्वी इतके आश्चर्य वाटत नसले तरी!! तिथला “मुका” संस्कृती आजही आपल्याकडे काही उच्चभ्रू वर्गातील लोक सोडल्यास तितकीशी पचनी पडलेली नाही!! त्यामुळे सुरवातीला गोंधळल्याची वृत्ती क्रमप्राप्तच होते. खरी गंमत पुढे आहे. अशा वातावरणात काही वर्षे काढल्यावर परत आल्यावर, कौटुंबिक गोतावळ्यात शिरताना, पटकन आईचा “मुका” घेतला आणि तशी आई देखील थोडीशी बावरून गेली!! त्या सगळ्या घटनांच्या निमित्ताने, दोन्ही संस्कृतीतील फरक, लेखिकेने फारच बहारीने दाखवून दिला आहे. वास्तविक सगळा लेख हा थोडा हलका-फुलका अशा स्वरूपाचा आहे पण तरीही साध्या वाक्यातूनदेखील मोठा आशय दर्शवायची लेखिकेची हातोटी लपून राहात नाही.
“स्त्री आणि संस्कृती”, “बीज-क्षेत्र” आणि “मारीकुट्टी” हे लेख तसे साधे आहेत पण तरीही फार वेगळ्या विचारातून लिहिलेले आहेत. लेखिका काही कामानिमित्त वाई इथे राहायला असताना, आलेला अनुभव, एकूणच स्त्री आणि तिची ओळख या दृष्टीने वाचण्यासारखा आहे. अजूनही आपल्याकडे बायकोला मारणे(किंवा बडवणे!!) अगदी शहरी भागातही चालूच असते. अशाच एक प्रसंगाला सामोरे जाताना, होणारी मनाची तगमग आणि त्यातून उठणारे विचार तरंग, याचे चित्रण “स्त्री आणि संस्कृती” या लेखात आहे. तसाच काहीसा प्रकार “बीज-क्षेत्र” या लेखात आहे. नवऱ्याशी न पटणे आणि त्यातून भांडण होणे, या गोष्टी कालातीत आहेत. त्यातून पदरी जर मूळ आणि तेही अति खोडकर असेल तर स्त्रीची कशी हालत होते, हे अगदी शाकुंतलातील उदाहरण देऊन मांडला आहे. “मारीकुट्टी” हा लेख जरा वेगळा आहे. कामानिमित्ताने अनेक ठिकाणी भटकंती होत असताना, मद्रासहून कोचीनकडे जाणाऱ्या गाडीत लेखिकेला ही मारीकुट्टी भेटते. नावाप्रमाणेच वर्ण, रूप आणि वागणे, त्यामुळे जरी प्रथमक्षणी जरी कुरुपतेचे चित्र उमटले तरी नंतर प्रवासात, तीच बाई, ज्या प्रसंगातून गेली, कसे तिचे हाल झाले आणि त्याही परिस्थितीत तिने पाळलेली काही कबुतरे व त्या पक्षांवर तिचे असलेले प्रेम, ह्याचे अतिशय सुरेख वर्णन वाचायला मिळते. खरी गंमत आहे ती त्यातील संवादांची!! त्या संवादातून, ते व्यक्तिमत्व हळूहळू उलगडत जाते आणि आपण त्या वाचनात रंगून जातो.
“गौराई” हे लेखिकेच्या मुलीचे हाक मारायचे नाव. आपल्याकडे अजूनही लहान मुलांच्या जगाला तितकेसे महत्व दिले जात नाही!! वास्तविक लहान मुलांसाठी लिहिणे जितके जिकीरीचे असते तितके इतर कुणाबद्दल नसावे आणि याचे मुख्य कारण म्हणजे, लहान मुलांचा अनाकलनीय स्वभाव किंवा आपण समजू न शकलेलो मानसशास्त्र!! अशाच लहान मुलांचा घरात चाललेला खेळ आणि त्यानिमित्ताने त्यांचे जे भावविश्व आपल्याला बघायला मिळते, ते विलोभनीय आहे. घरातच वाढत असलेली वेगवेगळ्या वयाची मुळे आणि त्यांच्या खेळाकडे लेखिकेची बघण्याची दृष्टी आणि त्या त्याच दृष्टीने सगळ्या महाराष्ट्रात घडत आणारे समाज मन, याचा सुरेख आलेख वाचायला मिळतो. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. जरी हे बहुतेक लेख साधे, सरळ आहेत असे वाटत असले तरी एकूणच संवाद भाषा आणि रचना कौशल्य इतके सुरेख आहे की, अखेरीस आपण, साधे असे काहीच वाचत नसून, आपल्या मनात वेगवेगळ्या विचारांचे तरंग उमटत असतात आणि हे तरंग, आपल्या नकळत येत असतात, हे फार महत्वाचे.
“एकेश्वरी पंथाचा विजय” हा लेख म्हणजे एकेकाळी आधारभूत असलेली पण आता लयाला गेलेली “नेमस्त” विचारसरणी, यावर आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि अति व्यावसायिकतेच्या वर्तुळात, या विचारसरणीला अजिबात जागा दिसत नाही. लेख अतिशय छोटा आहे पण विचार करायला लावणारा आहे आणि आपण सध्या अति हव्यासापायी भरकटत तर जात आहोत का? हा प्रश्न आपल्या मनात उभा करणारा आहे. विशेषत: आपल्या स्वातंत्र्य संग्रामात ज्या प्रकारे नेमस्त लोकांनी नैतिक अधिष्ठान पुरवले होते आणि त्यामुळे चळवळीला वैचारिक बळ आले होते, हे खरोखरच विचार करण्यासारखे आहे. या विवेचनांत पुढे लिहिताना, याच विचारसरणीचा कसा दूरगामी परिणाम होत असतो आणि त्यामुळे आपली मुल्ये कशी अधिक सत्वयुक्त होतात, हेच समजून येते. अर्थात, काळाच्या ओघात ही विचारसरणी मागे पडत गेली आणि आज तर आपण नेमके काय गमावून बसलो आहोत, इतपत देखील विचार कुणाच्या खिजगणतीत नाही, हे पाहावे लागत आहे!!कुठल्याही विचाराचा तौलनिक आणि दूरगामी विचार करावा, अशीच या विचाराची मुलभूत गरज आहे आणि नेमकी याच जाणिवेची सध्या कुठे जाणीव दिसत नाही!! कुठे आणि किती ताणावे आणि सुवर्णमध्य काढून, वेळोवेळी उत्पन्न झालेले संघर्ष मिटवता येतात, हेच या लेखाचे प्रमुख सूत्र आहे.
लेखिकेचा संस्कृत भाषेचा आणि साहित्याचा अतिशय जाणकार अभ्यास आहे आणि साध्या, साध्या विषयातून त्या साहित्याचे समृध्द संदर्भ वाचायला मिळतात. मुळात म्हणजे, आजच्या काळाशी सुसंगत अशी विचारसरणी ठेऊन, संस्कृत साहित्याचे उल्लेख, खरोखरच उल्लेखनीय आहेत. “जुळी मुले” या लेखाच्या संदर्भात माझे हे विवेचन बघावे. महाभारतातील एक कथा वाचण्याचे निमित्त होते आणि त्यावरून युरोपमधील काही जुने संदर्भ, रामायणातील काही प्रसंग याचा फार तौलनिक विचार केलेला आढळतो. सीतेवर उत्तर आयुष्यात गुदरलेले प्रसंग आणि त्यानिमित्ताने मांडलेले विचार आपल्यालाच विचारप्रवृत्त करतात.
आपण मराठी लोक हे नेहमीच धंदा करण्यास नालायक आहोत, असा पूर्वापार समाज आहे. तसे पहिले तर या वाक्यात थोडे तथ्य देखील आहे. अशाच एका प्रवासात लेखिकेला असाच प्रसंग बघायला मिळतो. अर्थात, लेखिकेने जरी मराठा लोकांच्यातील एकांतिक विचार मांडला असला तरी त्यामागील त्यांचे विचार जाणून घेतले आहेत. व्यावहारिक नजरेतून जरी मराठा लोक अधिक मणी, कणखर आणि गुर्मी दाखवणारे असले आणि त्यामुळे व्यवहारात यश प्राप्त करणे जमात नसले तरीही एका विविक्षित दृष्टीकोनातून, त्यांचे तेच अव्यवहारी वागणे, कसे मन लुभावून जाते, याचे हृद्य वर्णन वाचायला मिळते. अगदी साधी, साधी भांडणे आहेत पण त्यातून डोकावणारा मूळ स्वभाव आणि त्याच स्वभावाची दुसरी बाजू, नेमकेपणे टिपलेली आहे. हा लेख वाचताना, अर्थात मते-मतांतरे होणे सहज शक्य आहे. मला देखील काही ठिकाणी खटकले पण तरीही एक वेगळा विचार म्हणून समजून घेणे अवघड जात नाही.
अजूनही आपल्या समाजात जातिधर्म पाळले जातात, त्यावरून कडाक्याचे वाद आणि भांडणे होतात. लेखिकेला महाराष्ट्रात भ्रमंती करताना, महार वस्तीचे जे वास्तव जाणवले, त्यांचा चौकसपणा, हजरजबाबीपणा व मुळात असलेली चंचल आणि लवचिक बुद्धी, याचे दर्शन घडते. मुळातली हलाखीची परिस्थिती, त्यामुळे करत असलेले नानाप्रकारचे उद्योग, वंशपरंपरागत बळावलेले गुण आणि नवी परिस्थिती यात अडकलेले विचार, या सगळ्याचे विस्ताराने वाचायला मिळते. अजूनही, आपण “महार” म्हटला की मनात का होईना थोडा आपपरभाव ठेवत असतोच- हे आपल्यात आलेले वंशपरंपरागत विचार!!लेखात अशी अनेक उदाहरणे वाचायला मिळतात, ज्यायोगे “महार” देखील विचारप्रवण असतात, याची खात्री पटते. कामानिमित्ताने, लेखिका अक्षरश: महार लोकांत मिसळत होती आणि त्यातून आलेली निरीक्षणे, त्यामुळेच लेख अधिक वास्तववादी वाटतो.
“दिक्काल” हा मला आवडलेला सर्वात अधिक लेख. या लेखात, इरावती बाईंची तल्लख विचारसरणी आणि तौलनिक वृत्ती दिसून येते. लेखाची सुरवात जरी घरगुती प्रसंगाने होत असली तरी लगेच लेख फार वरच्या वैचारिक पातळीवर जातो, तो अखेरपर्यंत. वास्तविक, दिक्काल म्हणजे काळाचे मापन करण्याची पूर्वापार पद्धत!! लहान मुलांचे काळाचे ज्ञान आणि त्यातील लवचिकता, यातून, कालमापन पद्धत आणि पूर्वापार चालत असलेल्या मापनपद्धती, याचा उहापोह होतो. आपण, साध्या जी पद्धत वापरत आहोत, म्हणजे घड्याळाची पद्धत ही जरी उपयुक्त असली तरी शास्त्रानुसार तितकी अचूक आहे, असे म्हणवत नाही, असे सांगून कुठे ही पद्धत अपुरी होते,याचे नेमके विवेचन वाचायला मिळते. अवकाशाचे अत्यल्प प्रमाण बिंदू हे आहे पण याला लांबी-रुंदी नसते!! त्याचप्रमाणे काळाचे अत्यल्प परिमाणही बिंदुमात्र आहे, असे लिहून आपल्याला अवकाशाची वा कालची जी संवेदना होते ती मात्र कधीही बिंदुमात्र नसते!! हे वाचल्यावर, मी तर एक क्षण विचारात पडलो!! थोडक्यात, सध्याची पद्धत जरी उपयुक्त असली तरी संपूर्ण निर्दोष आहे, असे म्हणवत नाही, हे लेखिकेचे म्हणणे आपल्याला जरी बुचकळ्यात टाकत असले तरी विचार करायला प्रवृत्त करते, हे नक्की.
जगन्नाथाचे मंदिर आणि तिथला उत्सव, हे भारतीय मानाचे अत्यंत भाविक ठिकाण. तिथे असलेल्या मूर्तींचा भावनाविष्कार हेच, “नव-कलेश्वर” या लेखाचे प्रमुख सूत्र. तिथे असलेल्या जगन्नाथ आणि सुभद्रा, या दोन मूर्त्यांचा विचार खरोखरच अतिशय मनोज्ञ आहे. त्यानिमित्ताने, आपल्याकडे देऊळ, पूजा-अर्चा आणि उत्सवाच्या निमित्ताने होत असलेले पारंपारिक विधी, यावर फारच सुरेख प्रकाश टाकला आहे. मला वाटते, आस्तिक लोकांना हा लेख तसा पचनी पडणे अवघड आहे. आपण उत्सव देखील किती विधींमध्ये गुदमरवून टाकतो, याचे स्वच्छ दर्शन वाचायला मिळते. बकालपणा तर, आपल्या मंदिरांचे व्यवच्छेदक लक्षण मानावे लागत आहे, तसेच उत्सवातून येणारा कळकटपणा आणि त्यामागोमाग येणारी घृणा, याचे सुंदर दर्शन वाचायला मिळते. मी वरती जी तौलनिक आणि समतोल वृत्ती असे जे म्हटले होते, त्याचा आविष्कार या लेखात बघायला मिळतो.
“एक प्रयोग” हा असाच वैचारिक श्रीमंती दाखवणारा लेख आहे. जन्तुशास्त्राची प्रयोगशाळा आणि त्या निमित्ताने चालत असलेले प्रयोग,एका जन्तुपासून प्रचंड प्रमाणावर होत असलेली प्रजननावस्था आणि त्याचा परिणाम, हे मुळातून वाचावे असेच आहे. आज भारतात जो लोकसंख्येचा प्रश्न, आपला प्रचंड जबडा आ वासून उभा आहे, त्याचेच या प्रयोगाच्या निमित्ताने संपूर्ण दिग्दर्शन केलेले आहे. त्या प्रयोगशाळेत जसे, एक जंतू दुसऱ्याला खात, आपला जीव तगवत असतो तीच वृत्ती भारतात, हिंडताना लेखिकेला जागोजाग दिसते. खरतर, आपण सगळेच “जीवो जीवस्य जीवनम” याच न्यायाने जगात असतो, आणि हाच विचार फार ठाशीवपणे मांडलेला आहे.
शेवटचा लेख आहे “परिपूर्ती”!! अगदी छोटेखानी लेख पण अतिशय प्रत्ययकारी लेख आहे. लेखिकेचा एकेठिकाणी सत्कार झालेला असतो आणि त्यानिमित्ताने त्यांची ओळख आणि ओळख करून देताना, त्यांच्या बुद्धीमत्तेचे वर्णन वगैरे तपशील ऐकायला मिळतो. समारंभ संपतो आणि घरी परत येताना मनात कुटुंबातील सगळ्या मान्यवर व्यक्तींची उजळणी चालत असताना, रस्त्यातच एका घोळक्यातून,” अरे शु: शु: पाहिलीस का? ती बाई जाते आहे ना, आपल्या वर्गातील कर्व्याची आई बार का —” हे ऐकल्यावर, इरावती बाईंना आपली ओळख पूर्ण झाली, असे वाटले!! म्हटले तर पारंपारिक चालीची कथा वाटेल की जिला चूल आणि मूल, या पलीकडे काहीच जग नाही!! आपण प्रत्यक्षात तसे नाही, हे सगळा लेख वाचताना कळून येते. अर्थात, अजूनही, या शेवटातून, त्यांना नक्की काय सुचवायचे आहे, याचा मला पूर्ण थांग लागत नाही!! तरीही, हा लेख फारच भावपूर्ण आहे.
आपले विचार नेमके आणि तल्लख असतील तर आपण शब्दांतून कशाप्रकारची रचना करू शकतो, याचे उदाहरण म्हणजे हा लेख संग्रह, हे मात्र नक्की.
No comments:
Post a Comment