मागील लेखात आपण, लताच्या ३ गाण्याच्या अनुषंगाने गायकीचे काही पैलू बघितले. १९६० पर्यंत असे सर्वसाधारण अनुमान काढता येईल, लता, नैसर्गिक गोडव्याच्या आधारे गात होती परंतु असे नव्हे की जिथे गायकीची परीक्षा होईल, अशा रचना देखील तितक्याच ताकदीने गायल्या नाहीत!! मागील लेखातील, सज्जादने संगीतबद्ध केलेले “वो तो चले ऐ दिल” हे गाणे या संदर्भात समर्पक ठरावे. परंतु, आवाजातील कोवळीक, मृदुपणा, हलक्या ताना हेच तिच्या गायकीचे प्रधान अंग होते,निदानपक्षी १९५५ पर्यंततरी हेच म्हणावे लागेल. अर्थात, जर का सुगम संगीताचा प्रवास थोडा जाणीवपूर्वक तपासाला तर हेच दिसेल, रचनांचे बंध,वाद्यमेळ आणि त्यानुसार आधारलेली गायकी, यात, दर १० ते १५ वर्षांनी बदल होत गेलेला आहे. मुळात, वाद्यमेळ हि संकल्पना भारतीय संगीतात, पाश्चात्य संगीतातून “आयात” केलेली आहे. आपल्याकडे पहिल्यापासून, कंठसंगीत हेच संगीताच्या अविष्काराचे प्रधान साधन मानले गेले असल्याने, वाद्यसंगीत म्हणजे गायनाला पूरक अशी साथ, ह्या विचाराचाच प्रभाव होता आणि तो चित्रपट गाण्याच्या सुरवातीच्या काळात अधिक दिसून येत होता, यात काहीच नवल वाटू नये!! अर्थात, थोडा विचार केला तर असे आढळून येईल, पाश्चात्य संगीतात देखील, जरी वाद्य संगीत आधारभूत असले तरी वाद्यमेळ आविष्कृत रचना, या आधुनिक काळातच तयार झालेल्या आहेत, उदाहरणार्थ बीथोवन, मोझार्ट, बाख यांच्या रचना काळजीपूर्वक ऐकल्यास,माझे म्हणणे पटावे. जसजसे, आपला संपर्क पाश्चात्य संगीताशी घनिष्ट व्हायला लागला, त्यानुसार आपल्याकडे सुगम संगीतात वाद्यमेळ हि कल्पना रुजायला लागली. याचाच आधुनिक अवतार, राहुल देव बर्मन याच्या रचनेतून स्पष्ट दिसून येतो.
असो, परत मूळ विषयाकडे वळायचे झाल्यास, लताच्या गायकीकडे थोडे विचक्षण नजरेतून पहिले तर असे सहज दिसून येईल, मागील शतकातील, साठोत्तरी गाण्यात, तिच्या आवाजात भरीवपणा अधिक आला, ताना अधिक साक्षेपी, मुरकी जर अवघड होत गेली. याचाच परिपाक, “सुनो सजना पपिहे रे” या गाण्यातून स्पष्ट होतो.
“सुनो सजना पपिहे रे” : या गाण्याची सुरवातच मुळी तार स्वरात होते!! ज्यांना, गाण्याचे आणि स्वरांचे थोडेफार ज्ञान आहे, त्यांना हा आलाप किती कठीण आहे,याची कल्पना येऊ शकते, अर्थात, नुसते ऐकले तरी, अवाक व्हावे, अशा रीतीने सुरवातीचा आलाप आहे. अर्थात, आलापाच्या आधी संपूर्ण तार सप्तकात व्हायोलीनची गत त्या रचनेचा अवघडपणा दृग्गोचर करतो. ध्रुवपदाच्या दुसऱ्या ओळीत “आये दिन बहार के” इथे “बहार” या शब्दावर जे स्वरांचे आवर्तन आहे, ते केवळ असामान्य आहे. इथे बहार शब्दातील “हा” हे अक्षर उच्चारताना, जी स्वरांची “लगट” आहे, ती ऐकण्यासारखी आहे. इथे लताची स्वरांवरील हुकुमत,लयीच्या अंगाने कशी विस्तारली आहे, हे लक्षात येते. पूर्वीच्या गाण्यात, शब्दोच्चार कसे असावेत, हे गायकीचे वैशिष्ट्य आपण बघितले होते, तेच वैशिष्ट्य इथे आणखी वेगळ्या अंगाने विस्तारल्याचे समजून येते. अर्थात, गाण्याची रचनाच अशी आहे की इथे गायकीला आव्हान मिळावे!! या गाण्यात, चालीची वळणे विलक्षण अवघड होतात पण अशाच गाण्यात, लताची गायकी ज्याला “खासियत” म्हणता येईल, अशी आपल्यासमोर येते. पहिल्या अंतऱ्यात चाल, द्रुत लयीत जाते तशी साथीचा तबला “गत” वाढवतो पण त्याच लयीत, लता आपली गायकी संयमित ठेऊन, परत समेवर “ठेहराव” कशी घेते,हे जरूर ऐकण्यासारखे आहे. जर बारकाईने ऐकले तर कळेल, लता गाताना कधीच एखादा “सुटा” किंवा “स्वतंत्र” स्वर घेत नसून, त्या सुराबरोबर बाजूचे सूर अलगद गळ्यातून काढते आणि समेवर येउन विसावते!! हे जे बाजूचे स्वर असतात,त्यालाच शास्त्रीय परिभाषेत “श्रुती” म्हणतात आणि ह्याच श्रुती लताच्या गायकीतून फार अप्रतिमरीत्या उमटतात!! गमतीचा भाग असा आहे, स्वरांची जी असामान्य “कामगत” आहे, ती इतक्या सहजपणे गळ्यातून बाहेर येते की ऐकताना थक्क व्हावे!! लताची खासियत अशी आहे, सर्व साधारण गायक, हरकत किंवा मुरकी बरेचवेळा ओळ संपल्यावर घेतात किंवा शब्द संपविताना घेतात परंतु लता, रचनेच्या अंगाने क्वचित शब्दाचे दोन भाग करते आणि तिथे एखादी हरकत घेते!! इथे, ह्या गाण्यात, दुसऱ्या कडव्याच्या शेवटी, “बेचैन कर ना देना” हि ओळ ऐकावी. इथे “देना” हा शब्द उच्चारताना “दे” या अक्षरानंतर वजनदार हरकत घेतली आहे (क्षणभराचीच आहे तरीही!!) आणि ती स्वरपुंज “ना” या शब्दावर स्थिरावला आहे!! फार अवघड गायकी आहे!! इथे लय कुठेच वेगळी होत नाही पण लय, रचनेच्या अंगाने अशी फिरवली जाते, खरच मती गुंग व्हावी!! अशा गायकीत थोडासा का होईना प्रतिभेचा “अंश” दिसतो. इथे मी “प्रतिभा” आणि ”अंश” हे शब्द जाणीवपूर्वक वापरले आहेत,कारण हल्ली हे शब्द इतक्या सवंगरीतीने वापरले जातात की त्यातला मूळ अर्थच निघून गेला आहे!!
एक बाब इथे स्पष्ट करतो, इथे मी गाण्याचे विश्लेषण करीत नसून लताच्या गायकीला आधार, म्हणून हि गाणी घेतली आहेत.
“बैय्या ना धरो” : सुगम संगीतात वास्तविक, रागदारीचा उल्लेख करू नये, असे मला मनापासून वाटते,कारण रागाचे नाव आले की लगेच त्या रागाच्या अनुषंगाने गाण्याची चिरफाड केली जाते!! सुगम संगीतात, राग हा आधार असतो, तो केवळ त्या सुरांच्या अनुषंगाने!! बाकी, रचनेचा विस्तार हा संगीतकार आणि गायक, त्यांच्या बुद्धीचा परिपाक असतो. प्रस्तुत गाणे जरी चारुकेशी या काहीशा अनवट रागावर आधारलेले असले तरी, रागविस्तार आणि रचना यात महदअंतर आहे!! अर्थात, हि संगीतकाराची मर्दुमकी!! गाण्याची चाल, संपूर्णपणे रागाची सावली असावी की केवळ आधाराला सूर घ्यावेत, हा वेगळ्या वादाचा विषय आहे. गाणे अतिशय संथ लयीत सुरु होते. सतार आणि तबला हीच प्रमुख वाद्ये, अर्थात पार्श्वभागी व्हायोलीन अत्यंत अस्पष्ट आहे. इथे मी जरा विस्ताराने सांगितले ते अशासाठी, साथीला मोजकी वाद्ये असली आणि चाल “गायकी” अंगाची असेल तर लताचा गळा कसा खुलतो, हे दर्शविण्यासाठी!! मघाशी मी “गायकी” अंग हा शब्द वापरला, त्याचा नेमका अर्थ विशद करतो. भारतीय संगीतात, गायन हेच नेहमी प्रधान अंग राहिले आहे. त्यामुळे ज्या गाण्यात (सुगम संगीतातील), चालीमध्ये “गायनाला” अवसर आहे, त्याला गायकी अंग म्हणतात. अर्थात परत, रागदारी गायन आणि सुगम संगीताचे गायन, हे दोन्ही भिन्न विषय आहेत.
या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे लयीची वेगवेगळी अंगे, जी रचनेत अनुस्यूत आहेत, ती लताने ज्या प्रकारे गळ्यातून, दाखवली आहेत, त्याचा आस्वाद घेणे. थोड्याशा खर्ज स्वराने सुरवात करून, मध्य सप्तकात प्रवेश केला आहे. आता इथे गंमत मांडायची आहे. निसर्गत: खर्ज स्वर पुरुषी गळ्याला तर तार स्वर स्त्री गळ्याला सहज खुलतात!! त्यातून लताच्या स्वराची जात पातळ,त्यामुळे तार स्वरांची पट्टी गाठणे सहज शक्य. गाणे हे १९७० च्या दशकातील आहे, यावेळेस लताचा आवाज अधिक परिपक्व झालेला, तानांवरील पकड अधिक घोटीव झालेली दिसून येते. त्यामुळे, गाण्याच्या सुरवातीचा खर्ज अधिक “लाघवी” झालेला दिसतो. तसे गाणे पूर्णपणे मध्यलयीतच चालते परंतु, शब्दोच्चार आणि त्यासोबत सुरांचे “कण”, यातून सांगीतिक सौंदर्यनिर्मिती, हा लताच्या गायकीचा नवा अवतार इथे दिसतो. चालीतील संयत प्रेम भावना, शब्दांचे औचित्य कुठेही न ढळता, गळ्यातून ज्या प्रकारे मार्दव दाखवले आहे, ते खरतर शब्दातून मांडणे फार अवघड आहे. गाणे ऐकणे, हा एक अनिर्वचनीय अनुभव आहे. चाळीत, एक,दोन ठिकाणी, स्वर वरच्या सप्तकात जातो पण तिथेही स्वर “ताणला” असे घडत नाही. स्वरांची ही जी कठिणावस्था आहे, तिचे गळ्यातून प्रकटीकरण सहजप्रवृत्तीने दर्शवायचे, हे सोपे काम नाही. मघाशी मी “गायकी” हा शब्द वापरला, तो या संदर्भातदेखील योजता येईल.
“रैना बीती जाये : काही गाणीच अशी असतात, त्याच्या पहिल्याच सुरात गाण्याचे चलन आणि वळण समजते!! गाणे साध्या गळ्याला अजिबात पेलणारे नाही, याची खुणगाठ मनाशी बाधावी लागते. या गाण्याचा सुरवातीचा आलाप इतका गोड आणि अवघड आहे की त्या स्वरपुंजापुढे नतमस्तक व्हावे!! गुजरी तोडी सारख्या अनवट रागातली चाल!! सारंगीच्या अप्रतिम सुरात लताचा टिपेचा सूर मिसळला गेल्यावर जे स्वरसौंदर्य ऐकायला मिळते त्याला दुसरी तुलना नाही. मागील लेखात, एक वैशिष्ट्य सांगताना, श्वासावरील असामान्य नियंत्रण, याचा उल्लेख केला होता. गाण्यात जेंव्हा मोजकीच वाद्ये असतात तिथे श्वासावरील नियंत्रण, या बाबीला फार महत्व येते. “शाम ना आये” या ओळीवरील कामगत ऐका. वास्तविक लयीच्या बंधात शब्दरचना थोडी तोकडी पडते परंतु “आये” मधील “आ” नंतर जी हरकत आहे, काही सेकंद (च) आहे पण जीवघेणी आहे!! गळा लयीशी परिपक्व झाला आहे, याची इथे साक्ष आहे. लताची गायकी तुकड्यातुकड्यातून खुलत जाते. इथे पूर्ण सप्तकी तान फारशी आढळत नाही, त्याची तशी गरज नसते परंतु स्वरांचा अर्धस्पर्श, त्या शब्दातील मुग्ध भाव नेमकेपणी दाखवतात.
स्वर असा घ्यायचा, तो स्वर गळ्यातून निघत असताना, लयीत विसर्जित करायचा!! हेच कुणाला फारसे जमत नाही!! शब्दावर जोर तर द्यायचा पण त्यातील अनावश्यक “जोर” वगळून, “खटक्याच्या” सहाय्याने आशय वृद्धिंगत करायचा आणि लयीचा वेगळा बंध दर्शवायचा!! बरे असे नव्हे, लय एकमार्गी सरळ रेषेत चाललेली आहे, ओळीच्या मध्येच, क्वचित शब्दांच्या मध्ये लय बदलते आणि चाल कठीण होऊन बसते. हे “काठीण्य” स्वरांतून मृदू करून दाखविण्याची असामान्य करामत लता या गाण्यात दाखवते. त्यामुळेच हि गायकी ऐकायला सोपी वाटते पण प्रत्यक्ष गायला घेतली की त्यातले “खाचखळगे” दिसायला लागतात!! ह्या गाण्यात बरेच ठिकाणी असे अनुभव अनुभवायला मिळतात. अशा वेळेस, कुणाला दाद द्यायची आणि किती दाद द्यायची, अशी मनाची कुतरओढ होते.
अर्थात, इथे मी केवळ ६ गाण्यांचाच प्रपंच मांडला आहे. मी असा अजिबात दावा करणार नाही, यातून लताच्या गायकीचे नेमके सार मांडू शकलो आहे. माझा मुद्दा इतकाच आहे, हे वाचून इतरेजनांना इतर, इथे दुर्लक्षित झालेले पैलू मांडावेत. लताची गायकी, केवळ याच ६ गाण्यापुरती सीमित आहे, यासारखा दुसरा खूळचटपणा दुसरा नसावा!!
पुढील प्रकरणात, लताच्या गायकीत नेमके काय असामान्य आहे आणि कुठे कमतरता आहे (शास्त्रानुरूप कुणीही कलाकार कधीच पूर्णत्वास पोहोचत नाही!!) याची छाननी करण्याचा प्रयत्न करून, समारोप करणार आहे.
No comments:
Post a Comment