मागील लेखात आपण, पुरुष गायकांविषयी थोडे विश्लेषण आणि गायन या संदर्भात त्यांचे असलेले महत्व विचारात घेतले. आता आपण या लेखात स्त्री गायिकांची या संदर्भात माहिती घेऊया.निसर्गत: विचार केला तर, पुरुष गायकांचा आवाज जरा जड असतो नी त्यानुसार, आवाजाला खर्ज प्राप्त होणे क्रमप्राप्त ठरते तर स्त्री गायकांचा आवाज थोडा पातळ असल्याने, स्त्री गायिकांचा आवाज, टिपेच्या सुरात सहज लागतो. अर्थात, हे जसे गुण आहेत त्याच दृष्टीने कमतरता देखील दिसून येते. याचा अर्थ असा नव्हे की, पुरुष गायक तार स्वरात आणि स्त्री गायिका मुर्घ्नी स्वरात कमी पडतात. इथे मी फक्त, शास्त्रानुसार ज्या अंगभूत मर्यादा पडतात, त्याचाच उल्लेख केला आहे. हा फरक जे शास्त्रीय संगीतात निपुण आहेत, त्यांच्या आवाजातून देखील दिसून येतो. आपल्याकडे स्त्रियांनी गायची पद्धत निर्माण झाली ती त्यामानाने अलीकडेच. पूर्वी, स्त्रियांनी गाणे, हा प्रकार निषिद्ध होता. हिराबाई बडोदेकर, केसरबाई केरकर, अंजनीबाई मालपेकर इत्यादी गायिकांनी, मैफिलीत गाण्याची सुरवात केली, असे आपला सांगितिक इतिहास सांगतो. सुगम संगीताच्या संदर्भात विचार करायचा झाला तर, पहिले नाव घ्यावे लागेल ते नूरजहानचे. या गायिकेच्या पूर्वी कुणी गात नव्हते असे नव्हे पण नूरजहान आली आणि तिने सुगम संगीत/चित्रपट संगीताला दर्जा प्राप्त करून दिला जसे पुरुष गायकात सैगलचे नाव घ्यावे लागेल.
नूरजहानच्या आवाजात खुलेपणा आणि तारता अधिक होती. वरच्या सुरात, ती सहजपणे गाऊ शकत होती.”बैठी हुं तेरी याद का सहारा लेके” सारख्या गाण्यातून तिच्या आवाजाचा पल्ला दिसून येतो पण तरीही तिच्या गळ्यावर शास्त्रीय संगीताची छाया स्पष्ट दिसत होती.त्यामुळे काही स्वररचना घेताना, तिच्या आवाजाच्या मर्यादा स्पष्ट व्हायच्या. गाताना, शब्दांचा आशय ध्यानात घेऊन गावयाचे, हा दृष्टीकोन, पुढे लताच्या उपयोगी पडला!! पंजाबी धाटणीवर गळ्याची ठेवण असल्याने, गझलसदृश गाणी, तिच्या आवाजात सुंदर वाटायची आणि तिथे तिचा गळा खुलून यायचा. आपल्याकडे, गाणी ऐकण्याच्या काही चुकीच्या प्रवृत्तींमुळे, काही गाणी खास वैशिष्ट्य नसताना देखील प्रसिद्ध होतात. त्याचाच परिपाक म्हणजे, विशेषत: नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायली गेलाली गाणी ऐकून बघावीत, म्हणजे माझे म्हणजे पटावे. परंतु, “दिया जलाकर आप बुझाये” सारखी गाणी, जिथे स्वरांची करामत अधिक आहे आणि त्यामुळे अशी गाणी गायला कठीण जातात, ती गाणी दर्जाच्या दृष्टीने असामान्य असूनदेखील, विस्मृतीच्या गर्तेत नाहीशी होतात!!
नूरजहानच्या आवाजात खुलेपणा आणि तारता अधिक होती. वरच्या सुरात, ती सहजपणे गाऊ शकत होती.”बैठी हुं तेरी याद का सहारा लेके” सारख्या गाण्यातून तिच्या आवाजाचा पल्ला दिसून येतो पण तरीही तिच्या गळ्यावर शास्त्रीय संगीताची छाया स्पष्ट दिसत होती.त्यामुळे काही स्वररचना घेताना, तिच्या आवाजाच्या मर्यादा स्पष्ट व्हायच्या. गाताना, शब्दांचा आशय ध्यानात घेऊन गावयाचे, हा दृष्टीकोन, पुढे लताच्या उपयोगी पडला!! पंजाबी धाटणीवर गळ्याची ठेवण असल्याने, गझलसदृश गाणी, तिच्या आवाजात सुंदर वाटायची आणि तिथे तिचा गळा खुलून यायचा. आपल्याकडे, गाणी ऐकण्याच्या काही चुकीच्या प्रवृत्तींमुळे, काही गाणी खास वैशिष्ट्य नसताना देखील प्रसिद्ध होतात. त्याचाच परिपाक म्हणजे, विशेषत: नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायली गेलाली गाणी ऐकून बघावीत, म्हणजे माझे म्हणजे पटावे. परंतु, “दिया जलाकर आप बुझाये” सारखी गाणी, जिथे स्वरांची करामत अधिक आहे आणि त्यामुळे अशी गाणी गायला कठीण जातात, ती गाणी दर्जाच्या दृष्टीने असामान्य असूनदेखील, विस्मृतीच्या गर्तेत नाहीशी होतात!!
गीता दत्त – आधुनिक गायकीच्या पार्श्वभूमीवर बघितले तर, हिची गायकी खूपच अप्रतिम होती. तरीही, गळ्यावर बंगाली लोकसंगीताची छाप स्पष्टपणे दिसून येते, त्यामुळे खूपवेळा अकारण स्वरांना गोलाई देण्याची सवय काहीवेळा खटकते. “आज साजन मोहे अंग” किंवा” आन मिलो, आन मिलो” सारख्या बंगाली लोकसंगीतावर आधारित रचनांमध्ये तिचा आवाज खुलून येतो. त्याच बाजात “जोगन” या चित्रपटातील भजने अप्रतिम रंगतात. गीता दत्तचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, आवाजात लोकसंगीताची छाप असून देखील तिने हॉटेलमधील नृत्यगीते फारच बहारीची गायली आहेत आणि गंमत म्हणजे, त्या गाण्यात, तिचा गळा फार वेगळ्याप्रकारे लागतो. “मेरा नाम चिनचिन चू” सारखे उडत्या आणि जलद लयीतील गाणे, माझ्या म्हणण्याला साक्ष देईल. तिच्या पूर्वी, एकतर अशा प्रकारची गाणी फारशी बनत नसत, त्यामुळे आधीच्या गायीकांबाबत असे ठाम मत व्यक्त कारणे अवघड जाते. तसेच अति व्याकूळ करणारी गाणी देखील तिने त्याच तन्मयतेने गायलेली आहेत, उदाहरणार्थ,”वक्त ने किया” सारखे संस्मरणीय गाणे. पुढे आशा भोसले यांनी जो, सर्वसमावेशकतेचा वसा समर्थपणे चालवला, त्याची पूर्वतयारी गीता दत्तने केली, असे आपण नक्कीच म्हणू शकतो.
सुमन कल्याणपूर – आवाजाची जात पातळ पण तरीही भरीव स्वररचना गाऊ शकणारी प्रगल्भ गायकी. अवघड स्वररचना सहज पेलू शकणारा आवाज. अगदी स्पष्ट बोलायचे झाल्यास, लताच्या गळ्याच्या जवळपास जाऊ शकणारा हाच एकमेव गळा, असे सार्थ वर्णन करता येईल. पण, हेच बहुदा या गायिकेचे दुर्दैव ठरले असावे!! लताच्या आवाजातील मोहकता तितकी प्रत्ययाला येत नसल्याने, आणि विशेषत: हिंदी चित्रपटात लता उपलब्ध असल्याने, हिच्या वाटेला लायकीपेक्षा फार कमी गाणी आली. त्याची कसर बहुदा मराठी भावसंगीतात भरून काढली. मराठी भावसंगीतात मात्र, सुमन कल्याणपूरने असामान्य कामगिरी केल्याचे दृष्टीला येते.”रिमझिम झरती श्रावणधारा” सारखे सुश्राव्य गाणे असो की “केतकीच्या बनामध्ये” सारखे संयत गाणे असो, या गायिकेने आपली छाप पुरेपूर निर्माण केली. कुठलीही अवघड लय, हिच्या गळ्याला पेलता येत होती. मग ते “जिथे सागरा धरणी मिळते” सारखे गाणे असो!! अतिशय नितळ आवाज आणि स्वररचना गाताना, कुठेही लयीला धरूनच गायची वृत्ती लगेच दिसून येते. पण तरीही गीता दत्त किंवा आशा भोसले, यांच्याप्रमाणे आवाजात वैविध्य नसल्याने बहुदा, हिंदी चित्रपट गीतात ही गायिका फारशी पुढे येऊ शकली नसावी.
आशा भोसले – समृद्ध गायकीचा अत्यंत मनोरम अविष्कार!! आशा भोसलेच्या गळ्याला कुठेही अटकाव नाही असा भ्रम व्हावा, इतका भरीव आवाज. कुठल्याही पद्धतीचे गाणे, त्याच पद्धतीने गाण्यात, हिचा हात कुणी धरू शकेल असे वाटत नाही. हॉटेलमधील नृत्यगीत असो, लडिवाळ प्रणय गीत असो की मनाला व्याकूळ करणारी रचना असो, आशाच्या गळ्यात सगळी गाणी चपखल बसतात. “पिया तू अब तो आजा” सारखे उठवळ गाणे, किंवा “चैन से हमको कभी” सारखे हुरहूर लावणारे गाणे अथवा “काली घटा छाये” सारखे मत्त मनोविष्काराचे गाणे असो, आशा भोसलेचा गळा तितकाच समर्थपणे गातो. शास्त्रीय संगीतावर आधारित रचनादेखील त्याच वळणाने गाऊ शकते तर गझल, कव्वाली सारखी गायकीला आव्हान देणारी गाणी गाण्यात, तिचा गळा तरबेज आहे. या निरनिराळ्या गाण्याच्या उल्लेखाने तिचे असामान्यत्व दृग्गोचर व्हावे. मराठी, हिंदी तसेच इतर अनेक भाषेत गाणी गाऊन, तिने आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले आहे. मागे मी म्हटले त्याप्रमाणे, जसे पुरुष गायकात किशोर कुमारचे नाव घ्यावे लागेल, त्याच सुरात सूर मिसळून, आशा भोसले हिचे नाव घ्यावे लागेल. कवितेतील शब्द गाताना, आशयाची अभिव्यक्ती भोगून व्यक्त करण्यात, तिचा हात धरणारा आवाज, अजूनतरी निर्माण झालेला नाही. गाण्याची लय अवघड असली की, जणू या गायिकेला स्फुरण येते की काय, अशा जोशात आशा गाते. “तरुण आहे रात्र अजुनी” किंवा “सहज सख्या एकदाच” ही गाणी या दृष्टीने ऐकावीत. विशेषत: हिंदीत जेंव्हा लताचे अधिराज्य चालू होते, तिथे स्वत:ची हक्काची जागा निर्माण कारणे, हे केंव्हाही असामान्यच म्हणायला हवे.
लता मंगेशकर – सुगम संगीताचा आदिनमुना!! गळ्याची जात पातळ पण अत्यंत भरीव गोलाई आणि तिन्ही सप्तकात लीलया संचार करणारा आवाज, असे लताचे थोडक्यात वर्णन करता येईल. सुरवातीला वडिलांच्या हाताखाली शास्त्रोक्त संगीताचा पद्धतशीर रियाझ केल्याने, स्वरज्ञान परिपूर्ण. लताच्या बाबतीत एक सुदैव नक्कीच म्हणता एल. ती पार्श्वगीताच्या क्षेत्रात येण्याच्या वेळेस, विशेषत: हिंदी चित्रपटात नूरजहानचे सार्वभौम राज्य चालू होते आणि असे म्हण्यात येते की, त्याचसुमारास भारतात फाळणी झाली आणि त्याचवेळेस, नुरजहान पाकिस्तानांत गेली आणि लताचा प्रवेश तसा सहज झाला. वास्तविक हा वादग्रस्त विषय आहे आणि त्यावर बरेच काही लिहिता येईल. अर्थात, नंतर लताने असे काही बोलण्याची कुणालाच संधी दिली नाही, हा तिच्या श्रेष्ठत्वाचा भाग झाला. लताच्या गळ्याचे सर्वोत्तम वैशिष्ट्य जे बहुतेक सगळ्याच कलाकारांनी मान्य केले आहे ते म्हणजे, लयीवरील तिची नजर आणि पकड!! सुगम संगीताचा आवाका हा जास्तीजास्त ४ ते ५ मिनिटांचा, इतकाच असतो. त्यामुळे, या रचनेत येणारा प्रत्येक क्षण हा अतिशय महत्वाचा असतो आणि या विचाराची जाणीव, लताच्या गायकीत जितकी दिसते तितकी इतरांच्या गायकीत दिसत नाही!! हा मुद्दा वादग्रस्त ठरू शकतो पण, जर का लयबंधाचा शास्त्रीयदृष्टीने मागोवा घेतला तर हे म्हणणे पटू शकते. लताने सुगम संगीत कसे गायचे याचा जणू नवीन पायंडा पडला. गायकीत अनेक वेगवेगळे प्रयोग केले. गाताना, ओळीच्या सुरवातीचा स्वर आणि ओळ संपविताना लागलेला स्वर, हे बारकाईने ऐकावेत. प्रत्येक स्वर हा केवळ शब्दांचे सौष्ठव वाढवतो असे नसून स्वरांच्या निरनिराळ्या जाती निर्माण करतो. हा विचार पूर्वी फारसा प्रचलित नव्हता. पांढरी पाच पट्टीपासून ते काळी पाच पट्टी पर्यंत, त्याच ताकदीचा स्वर लावणे, हे साधेसुधे काम नाही. गळ्याचा प्रचंड आवाका लागतो. दुसरा नवीन विचार प्रचलित केला, तो म्हणजे, विशेषत: व्याकूळ करणारी किंवा प्रणयी गीते गाताना, घेतली जाणारी तान, ही संपूर्ण न घेता, केवळ दोन ते तीन स्वरांची आणि तीही अर्धवट स्वरुपाची तान घेऊन, कवीने जो आशय मांडला आहे, त्या आशयाचा परीघ विस्तीर्ण करायचा!! अर्थात, त्यासाठी काव्याची समज देखील तितकीच खोलवर असणे गरजेचे असते आणि ती मागणी, लताने पूर्णपणे अमलात आणली. उर्दू भाषा तर, तिची गाणी ऐकून प्राथमिक स्तरावर शिकता येईल, इतके तिने त्या भाषेवर मिळवले, ही कामगिरी खरोखरच स्पृहणीय ठरावी. आवाजाचा पल्ला समजून घेण्यासाठी, “आनंद्कंदी प्रभात झाली” ही भूपाळी ऐकावी.”झाली” या नंतरचा “ई” कार केवळ अवर्णनीय आहे. अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
सध्याच्या काळात, कविता कृष्णमुर्ती हे नाव आवर्जूनपणे घ्यायला लागेल. आवाजात तारता आणि गमक, ही सौदर्यस्थळे प्रामुख्याने दिसून येतात. मी, मागील लेखात म्हटल्याप्रमाणे, इथे पुरुष आणि स्त्री गायक आणि त्यांची गायकी, या संदर्भात त्यांचे योगदान, इतकाच विचार केलेला आहे. पुढील लेख हा ह्या मालिकेतील शेवटचा लेख आहे आणि तो थोडासा वैय्यक्तिक स्वरूपावर असणार आहे.
No comments:
Post a Comment