आमचे दिवस हे असेच खेळण्यात आणि वादावादीत जात होते. एकदा, असाच एक अफलातून प्रसंग घडला. एका रविवारी, आम्ही सगळेजण चौथ्या मजल्यावर जमलो होतो. रविवारची दुपारची वेळ होती. आमच्या गप्पा कशावर चालल्या होत्या, ते आता आठवत नाही,पण नेहमीप्रमाणे, गप्पांचा सूर जरा वरचाच लागला होता. त्यावरून, हसणे-खिदळणे चालले असताना, एकदम, टिल्लूच्या घरातून, मन्या तरातरा बाहेर आला आणि वसकन आम्हा सगळ्यांच्या अंगावर ओरडला, कारण आम्ही त्याची दुपारची झोपमोड केली होती. आधीच त्याचा उग्र चेहरा आणि त्यात डोळ्यात, झोपमोड झाल्याने पसरलेला अंगार!! मुळातच, आम्ही त्याच्याशी कधी फारसे बोलत नव्हतो, त्यात असा रागाचा अवतार बघितल्यावर, आम्ही सगळेच चिडीचीप!! अर्थात, आणखी वेगळे काय करणार होतो म्हणा!! तसे पहिले तर, आज जाणवते की, आमची ती चूकच होती. गप्पांचा आवाज जरा खालच्या पट्टीतच ठेवायला हवा होता. रविवार दुपार, हीं कुणाही वयस्कर माणसांची झोपायाचीच वेळ असते. पण, इतका तारतम्य विचार केला असता तर, पुढचे रामायण घडलेच नसते!! ते वयच आमचे असे होते की, जे काही करायचे ते जगावेगळे आणि फक्त आमचाच विचार करून!! नंतर, नेमकी कुणाच्या डोक्यात असली कल्पना आली, ते आता आठवत नाही, पण प्रदीपने, घरातून, एक ताजे लिंबू आणले आणि त्यावर मग आम्ही सर्वांनी, नीळ किंवा त्यावेळी टिनोपाल नावाची कपडे धुण्याची पावडर मिळत असे, निळ्याच रंगाची, ती त्या कापलेल्या लिंबावर अगदी ठासून चेपली. आता, असे ठरले की, ते लिंबू, टिल्लूच्या घरात, कुणाला दिसणार नाही असे ठेवायचे. शेवटी, चौथ्या मजल्यावर, जो एक सामायिक संडास होता, त्याच्या भिंतीच्या लगतच, मन्याच्या घराची भिंत चिकटत होती आणि तिथे एक छोटेसे भोक होते. नंतर, एका लांब काठीने, ते लिंबू, आम्ही त्यांच्या घरात ढकलले आणि आमची नि:श्वास सोडला!! ताज्या लिंबावर, कपडे धुण्याची पावडर टाकली, की थोड्यावेळाने अति उग्र आणि घाणेरडा वास यायला लागतो, इतका की, जवळ उभे राहणे देखील अवघड व्हावे!! आणि नेमके तसेच झाले. साधारणपणे, अर्ध्या तासाने, टिल्लू वहिनी, घरातून अति त्रासदायक चेहरा घेऊन बाहेर आल्या. आम्ही, असे कुणीतरी येईल, याची वाटच बघत होतो. त्या तेंव्हा काही बोलल्या नाहीत, तरी त्याचा चेहरा बघून, आम्हाला, आमच्या प्रयोगाच्या यशस्वीतेची खात्री पटली आणि मनातल्या मनात, आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
खरा आनंद झाला तो, संध्याकाळी, जेंव्हा मन्याची आई, सुरेशच्या आईकडे तक्रार करायला आली तेंव्हा. त्यावेळी, सुरेशच्या घरात, मी, नंदू आणि सुरेश बसलो होतो, आणि त्यावेळेस, मन्याच्या आईने,”घरात बहुदा उंदीर मेला की काय कळत नाही, पण भयानक घाणीचा वास सुटला आहे!!” तिथे, आम्हाला खरा आनंद झाला. हीं खर तर, एक विकृतीच म्हणायला हवी. आज, जर का माझ्यावर असा कुणी प्रयोग केला तर, माझी देखील मन्याप्रमाणेच प्रतिक्रिया होईल. पण, आम्हाला, मन्याची खोड मोडणे, हेच जणू काय जीवितकार्य असल्याप्रमाणे, आम्ही असले उद्योग करीत होतो. अगदी, या यशस्वी प्रयोगानंतरदेखील, आम्ही दोन, तीनदा असला लिंबाचा प्रयोग त्यांच्या घरात केला होता, आणि, गमतीचा भाग म्हणजे, त्यांना शेवटपर्यंत, त्यातली गोम कळली नाही. यात, एक मेख अशी होती, की, लिंबावर पावडर चेपल्यानंतर, साधारणपणे, तासाभरात, तो वास कायमचा उडून जायचा!! त्यामुळे, जरी निळे लिंबू मिळाले, तरी, ते लिंबू वासाच्या दृष्टीने अगदी नाकामयाब असायचे आणि हीच गोष्ट आमच्या पथ्यावर पडली असावी.
आता मनात येते, उगीच त्या कुटुंबाला आम्ही असे सतावले. तशी, टिल्लू मंडळी, फारच वागायला चांगली होती. विशेषत: टिल्लू वहिनी वागायला खरच निर्मळ आणि हसतमुख होत्या, त्यांचा मुलगा, देवेंद्र तर, कितीतरी वेळा आमच्यात खेळायला यायचा. पण, अशा चांगल्या कुटुंबात, असला “दुर्वास मुनी” कुठून आला, हेच आम्हाला कोडे होते!! पण, हा प्रयोग यशस्वी झाल्याची पावती मिळाल्यावर, खरी धमाल शाळेत आली. अर्थात, कुठल्याही शाळेत काही आवडीचे आणि काही नावडीचे शिक्षक नेहमीच असतात. दुसऱ्या दिवशी, मी हीं गोष्ट माझ्या वर्गातील मित्रांना सांगितली. आधी त्याचा विश्वास बसला नाही, तेंव्हा मीच पुढाकार घेऊन, असला प्रयोग वर्गात केला!! तेंव्हा वर्गात, शिक्षकांसाठी, एक लाकडी रुंद पसरलेला Platform असे. त्यावर, मग, त्यांचे टेबल आणि खुर्ची असे आणि त्या पाठीमागे काळा फळा!! त्या Platform ला चारी बाजूनी फक्त सहा छोट्या लाकडी पायांचा भक्कम आधार असे, पण त्यामुळे, Platform चा खालचा भाग हा मोकळा असे. मी, लगेच दोन लिंबे आणली, कारण वर्गाचा विस्तार मोठा!! आणि लगेच त्यावर निळी पावडर चेपली, आणि आमचे खडूस मास्तर यायच्या आधी माझ्या काही मित्रांव्यतिरिक्त कुणाला कळायच्या आधीच Platform खाली ढकलून दिली!! झाले, पाचच मिनिटात, लिंबाने आपला प्रताप दाखवायला सुरवात केली आणि वर्गात त्या शिक्षकाला शिकवणे अवघड झाले!! इथे, आमचा ३,४ मुलांचा ग्रुप मात्र एकदम खुशीत!! असले प्रयोग, नंतर, काही काळ आम्ही चालू ठेवले होते पण एकदा, एका शिपायाला ती लिंबे, वर्ग झाडताना सापडली!! माझी तर, जरा तंतरलीच होती पण, सुदैवाने, कुणालाच माझे नाव कळले नाही आणि मी श्वास सोडला.
आता, माझ्या संगीताच्या अध्यायाकडे वळूया. मी बहुदा, आठवी किंवा नववीत असणार, त्यावेळेस मला संगीताचा छंद लागला. म्हणजे, जुनी गाणी ऐकायची, ती गोळा करायची वगैरे, वगैरे. झाले, प्रदीपला एक नवा मसाला मिळाला!! खरतर, मीदेखील अपरिपक्व आणि प्रदीपदेखील!! सुरवातीला, या मित्रांनी, काही छेड काढली नाही, पण जसा माझा छंद वाढायला लागला, म्हणजे, आमच्या बोलण्यात, माझ्या आवडीच्या गाण्यांचा विषय जरा अधिक यायला लागला, नेहमी प्रदीप माझी सणकून खेचायचा!! त्याला, नंतर सुरेश, नंदू आणि रमेश यांची पण साथ मिळायला लागली आणि मी(अकारण!!) भडकायला लागलो. खर तर, कुठला सी. रामचंद्र आणि कुठले वसंत देसाई. मी तर, त्यांना दुरान्वयेदेखील ओळखत नव्हतो पण जशी माझी मते, हे मित्र खोडून काढायला लागले, तशी माझा पारा चढत असे. मला असेच वाटायचे, ‘ काय हे मित्र आहेत, यांना चांगली गाणीच आवडत नाहीत!!” मुख्य म्हणजे, माझा (फालतू!!) अहंकार दुखावला गेला. मी कुठलेही एखादे दुर्मिळ गाणे सांगितले, की लगेच त्याविरुद्ध यांची टोकाची मते, मला त्यावेळी फारच झोम्बायाची!!त्यात नंतर उदय सामील झाल्यावर तर, त्यांना उधाणच आले. प्रदीप, उदय तर मला, खालूनच “मंगेश देसाई” असली हाक मारायचे आणि मी, खाली येईस्तोवर, माझा राग, अगदी नाकाच्या शेंडयावर आलेला असायचा. त्यांना काय, तेच हवे असायचे. तरीदेखील, मी त्यांना माझ्या कडील गाणी ऐकवायला बोलावत असे आणि या प्रयत्नात, माझा राग आणखी वाढवून घेत असे.
आज, मला या गोष्टीचा खरच फारच विस्मय वाटतो. आता, कधी मी भारतात आलो की, प्रदीप किंवा सुरेश मला, काही जुनी गाणी ऐकवतात. पण, आता, माझ्या मनातच अशी एक घट्ट गाठ बसली आहे की, पुढे काही बोलायला, माझी जीभच धजावत नाही. प्रत्येक वेळेस असेच मनात येते, की नको, ते विषय परत उघडायला आणि परत भांडाभांडीला सुरवात!! अर्थात, त्या वेळेस, मी नुकतेच, Barbara Streisand, Frank Sinatra असले गायक माझ्या मावस भावाकडे ऐकले होते आणि त्यांच्या आवाजाची मोहिनी मनावर पडली होती, आणि त्यातच एकदा मी या गायकांचा विषय, या मित्रांसमोर, मागील अनुभव विसरून, परत एकदा काढला!! पुनरावृत्तीचा एक अनोखा प्रयोग, परत एकदा सादर झाला. नंतर, जेंव्हा, मी कॉलेजमध्ये जायला लागलो, तेंव्हा मग, माझे संगीताचे विश्व बरेच विस्तारत गेले, इतके की आता, माझा मलाच विस्मय वाटतो. कॉलेज आणि नंतरच्या काळात, माझ्या या क्षेत्रात थोड्याफार ओळखी झाल्या, विशेषत: अरुण पुराणिकबरोबर, माझी चांगली मैत्री झाली होती, आणि त्याच्याकडील गाण्यांचा प्रचंड संग्रह ऐकण्यासाठी, साधारपणे, १९८५/८६ मध्ये तर, कित्येक संपूर्ण रात्री, त्याच्या घरी घालविल्या होत्या. १९७९/८० च्या सुमारास, मी सी. रामचंद्र, सुधीर फडके, यशवंत देव आणि जयदेव, यांच्याशी गप्पा मारण्याचे देखील धाडस केले होते. अर्थात, या गप्पामधूनच माझी मते पक्की होत गेली. पुढेतर, अशोक रानडे यांच्यासारख्या अलौकिक संगीत साधकाशी काही भेटी झाल्यावर तर, माझी दृष्टी अधिक विस्तारित झाली. असो, तो भाग नंतरचा.
No comments:
Post a Comment