Wednesday, 18 June 2014

संगीताचे (विलक्षण) सौंदर्य + शास्त्र – भाग ५



लयीचा तत्व म्हणून विचार करता, रानड्यांनी दोन्ही सिद्धांत चुकीचे ठरविले आहेत. म्हणजेच “उत्कंठा – विसर्जन” हे पाध्येसाहेबांचे तत्व आणि “आरंभ, हेतूपुर्वकता व पूर्ती” हा Langer बाईंची व्याख्या. पाध्यांच्या मते, लयतत्वाचे साहित्यादी कलेत, उदाहरण म्हणून रूपकालंकाराचे विवेचन केले आहे. पण तरीही स्थिती-बदलाच्या स्पष्टीकरणास अनुसरून बोलायचे झाल्यास, एकाचे कलाकृती नसणे आणि दुसऱ्याचे कलापदवीस पोहोचणे, याची नेमकी काय करणे आहेत, याचा नेमका उलगडा होत नाही. १] पर्वताचा पाय, २ आयुष्याच्या दिवसाची वृद्धत्व ही संध्याकाळ. ही दोन्ही रूपके असल्याने, इथे स्थिती-बदलाचा सिद्धांत कसा लागू होतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे तरी देखील, पहिल्यापेक्षा दुसरा अधिक समृध्द का, हा प्रश्न राहतोच!! याला, पाध्यांनी उत्तर दिले आहे, पहिले रुपक बाह्यात्कारी लयदारपणाचे आहे तर दुसरे अधिक गाढ लयदारपणाचे आहे. पण याचाच अर्थ,  स्थिती व बदल, या अवस्थांची उपस्थिती आणि लयदारपणा यांचा अनिवार्य संबंध नाही!! हा तात्विक गोंधळ झाला!! “पर्वताचा पाय” आणि “मेघदूत” या दोघांतील गुणवत्तेचा जबरदस्त फरक लक्षात घेता, त्यांना एकाच कोटीत घालणे योग्य नव्हे!! लयदारपणात पुनरावृत्तीचा समावेश होतो परंतु काही पुनरावर्तने अशी असतात, त्यात अर्थवलयांचे सर्जन करण्याची शक्ती असते.
काही पुनरावर्तने भिन्नातला अभेद दर्शविण्याच्या पार पलीकडे जाऊन पोहोचतात. त्याचा आवाकाच मोठा असतो. याबाबतीत काही गोष्टींची जाणीव पक्की ठेवली पाहिजे.
१] पुनरावर्तन व यांत्रिक नियमितता हे लयतत्वाचे दोन घटक अनेक ठिकाणी अनुभवास येतात व ते याचेच घटक असल्याने,लयतत्वाचाच साक्षात्कार, असा भास अगदी स्वाभाविक आहे. याचाच वेगळा अर्थ, लयतत्वाची व्याख्या पुनरावर्तन आणि यांत्रिक नियमितता, या दोन अंगांचा समावेश करून घेण्याइतकी समावेशक हवी.
२] लयतत्व हे सौंदर्यशास्त्रीय तत्व अहे. ते सगळ्या कलांना लागू आहे. तेंव्हा होणारी व्याख्या, ही सगळ्या कलाविष्कारांना लागू व्हावी, इतकी अमूर्त हवी.
३] याच बरोबर हेही लक्षात ठेवायला हवे, मूर्त आणि अमूर्त अशा दोन्ही पातळ्यांवर संगीत-नृत्यादी गतीगुण प्रत्यक्ष वावरत असल्याने लयतत्व हे कलांशी अधिक जवळचे नाते राखील, जरी सर्व कलाक्षेत्रांना ओढाताण न करता लागत असले तरी कलाक्षेत्रांतर्गत विविध पातळ्यांवरील मुक्त संचार सर्व कलांबाबत शक्य नसतो. त्यादृष्टीने संगीत-नृत्यादी कला अधिक जवळच्या!!
४] ओघाने येणारा उपसिद्धांत म्हणजे एका कलेच्या क्षेत्रातही विविध पातळ्यांवर जेंव्हा लयतत्व वावरते तेंव्हा व्याप्तीत आणि स्वरुपात बदल नेहमीच अपेक्षित असतो.
इतका उहापोह झाल्यावर, पुढचा भाग म्हणजे, संगीतातील त्याचा अवतार तपासणे!!  इथे लेखकाने फक्त उत्तर भारतीय संगीताचाच विचार केला आहे. त्यादृष्टीने विचार करता, संगीतात लयतत्व दोन स्तरांवर अविष्कार पावते. अ] स्वरस्तर, आ] कालस्तर.
स्वरस्तरावरील लयविचार जवळजवळ दुर्लक्षिला जातो. कालस्तरावरील लयाचा अवतार त्या मानाने विपुल आहे. तसे पहिले तर, स्वरस्तरावरील लयीचा अवतार हा कालस्तरावरचाही असतो, कारण कुठलाही स्वर हा केवळ नादबिंदू नसून कालबिंदूही असतो!! फक्त आविष्काराच्या प्रत्येक क्षणी स्वरक्षेत्रातील कोणतातरी एक बिंदूच अभिप्रेत असतो. थोडक्यात, स्वरस्तरावर लयीचा अविष्कार होणे याचा अर्थ, कालस्तर पुसला जाणे, असा नसून, कालस्तराचे नियंत्रण स्वरस्तराकडून होणे, इतकाच आहे.
आता स्वरस्तरावरील लयीचा अवतार कसा होतो? असा अविष्कार असंख्य प्रकाराने होऊ शकतो. पहिला प्रकार, सप्तकातरांचा, म्हणजे एकच स्वर किंवा अनेक स्वरांचा समूह जेंव्हा मंद्र,मध्य,तार अशा तिन्ही  सप्तकांत वापरला जातो, तेंव्हा,
सा सा सां
मंप मंप मंपं
१] एक स्वर, किंवा अधिक स्वरांचा समूह, तिन्ही सप्तकांत अवतरला की स्वरसंहतीचे कार्यक्षेत्र विस्तृत होते. कुठल्याही संगीताविष्कारात कलावंत एक ते दीड सप्तकात मुख्यत्वेकरून वावरत असतो. त्यामुळे इतर सप्तकाचा जरी विसर पडला नाही तरी ती सावली असते!! तेंव्हा, मुख्य विस्तार जिथे होतो, तिथे आविष्काराची क्षेत्रे रुंदावतात. सर्जनाच्या शक्यता वाढतात, हे ओघानेच आले.
२] सप्तकांतरात आणखी एक गोष्ट घडते. इथे पुनरुद्भव होणारा स्वर किंवा स्वरसमूह व्यवस्थित प्रस्थापित होतो.
स्वरस्तरावर लयीचा अवतार होण्याचा दुसरा प्रकार म्हणजे समांतर स्वरावलींचे उपयोजन!! समांतर स्वरावलीचा पुनरावतार होतो, पण तिचे घटक मात्र बदलतात. उदाहरणार्थ, सागप आणि मधसां हे स्वर बघूया. आकृती तीच पण घटक मात्र वेगळे!!
याचा परिणाम, वेगवेगळ्या भासणाऱ्या या समूहात काहितरी सारखेपणा आहे, याची जाणीव होते. आकृतीमयता आणि आकृत्यांची शक्यता यांची जाणीव होणे, हा सांगीतिक विस्तारासाठी आवश्यक असा घटक आहे.
दुसरा परिणाम असा, साम्य-भेद संबंधामुळे दोन्ही “तिळी” मनात अधिक ठसतात. सांगीतिक संवेदनशीलता जितकी सूक्ष्म आणि ग्रहणक्षम असेल तितका तो अविष्कार कलापदवीस पोचणे अवलंबून आहे.
स्वरस्तरावरील तिसरा प्रकार – नियमित अनियमितता असे आहे. प्रत्येक रागात काही स्वर घ्यायचे असतात आणि काही सोडायचे असतात. पण, कधी कधी, काही कलाकार वेगळे स्वातंत्र्य घेतात. त्यामुळे सारा आविष्कार उजळून गेल्यासारखा होतो. अर्थात, हे एखाद्या सुरावटीच्या विस्तारात देखील घडू शकते.
या संदर्भात दोन गोष्टी लक्षात येतात.
१] वर्ज्य स्वरांचा उपयोग हा नेहमी त्याचे भविष्य वर्तविता येईल, इतका नियमित नसतो.
२] विशिष्ट रागाने वा सुरावटीने निर्माण केलेल्या वातावरणात खुपून परकी वाटावा इतका तो अनियमितही नसतो.
आता कालस्तरावरील लय, हा भाग बघूया. कालप्रवाह हा अनादी-अनंत असल्याने त्याच्या स्वाभाविक स्वरुपात आकलन होणे अशक्य!! त्यामुळे कालप्रवाहाचे भाग पाडणे किंवा ते भाग आकृतीबद्ध करून ठेवणे, इतकेच आपण करू शकतो. संगीतातही विभाजन आणि आकृतीबद्ध करणे, हीच प्रक्रिया कालप्रवाहाच्या बाबतीत घडत असते. त्यादृष्टीने कालस्तरावरील लयीचा अवतार म्हणजे ताल!!

No comments:

Post a Comment