गिरगावातील गणेशोत्सव हा खास उत्सव आहे आणि त्याला शतकभराची परंपरा आहे. त्याच अनुरोधाने, हेमराजवाडीतील गणपती आज वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. अर्थात, काळानुरूप उत्सवात फरक पडत गेला. माझ्या आठवणीप्रमाणे, मी या उत्सवात जवळपास १५ ते २० वर्षे तरी भाग घेतला. वास्तविक मी करेलवाडीत बाजूच्या गल्लीत राहणारा पण माझे उत्सव साजरे झाले ते हेमराजवाडीत!! वाडीत साधारणपणे, दोनच प्रमुख जातीची माणसे अजूनही राहतात. वाडीचा तळमजला हा प्रामुख्याने सोनार लोकांनी व्यापलेला तर वरच्या मजल्यांवर प्रामुख्याने ब्राह्मण वस्ती आहे. अर्थात, हा काही लिखित नियम नव्हता. ज्याला जशी जागा मिळाली तसे ते स्थायिक झाले पण आजही बहुतेक सोनार लोक हे तळमजल्यावरच राहात आहेत. त्यामुळे उत्सवाला मराठीपण आपसूकच मिळाले. त्यावेळेस आणि आजही सगळ्यांची सांपत्तिक स्थिती काही फारशी उंचावलेली नाही. अर्थात, ज्यांनी वाडी सोडली, ते मात्र बाहेरच्या जगात आर्थिक दृष्ट्या खूपच चांगल्या तऱ्हेने स्थिरावले. पण, गमतीचा भाग असा की, ज्यांनी वाडी सोडली, त्यांची अजूनही “नाळ” वाडीशी जोडलेली आहे. तेंव्हा, जशी सांपत्तिक स्थिती, त्याच हिशेबात उत्सवाची वर्गणी जमत असे आणि गणेशोत्सव साजरा होत असे. साधारणपणे उत्सवाच्या आधी तीन,चार महिने वाडीला “जाग” येत असे आणि हळूहळू, वाडीत “वर्गणी” जमविण्याच्या कार्यक्रमाला सुरवात होत असे. सगळेच रहिवासी हे मध्यमवर्गीय असल्याने, वर्गणीदेखील नेहमीच यथातथा जमत असे. त्यानिमित्ताने वाडीतील काही वयस्कर व्यक्ती एकत्र येऊन उत्सवाचे स्वरूप ठरत असे. वाडीतील सोनार मंडळी तशी पैशाने सुव्यवस्थित होते. त्यातून, कुणी लोक, खास उत्सवासाठी अधिक पैसे देत असत.
याच वाडीत मी कितीतरी जुने हिंदी चित्रपट बघितले. मला, अजूनही, वाडीत, भगवानचा “अलबेला” पहिला, ते आठवत आहे. त्यावेळी मी फारच लहान होतो म्हणजे साधारणपणे १०,११ वर्षाचाच असेन. त्यावेळेस, सिनेमा बघणे, हेच मोठे अप्रूप होते. नंतर आयुष्यात बरेच चित्रपट पहिले पण अजूनही मनावर खुमारी आहे ती, या गणेशोत्सव उत्सवातील चित्रपटांची. ते १० दिवस, आमचा ग्रुप, केवळ हेमराजवाडीतीलच नव्हे तर इतर वाडीतील चित्रपट देखील त्याच उत्सुकतेने बघत असू, अगदी रात्रीचा दिवस करून!! मुळात, फुकटात का होईना पण चित्रपट बघायला मिळत आहे, याचेच अप्रूप अधिक होते. त्यावेळी, हेमराजवाडीत एके वर्षी, पुण्याचा एक ग्रुप आला होता आणि त्यांनी, कै.ग.दि.माडगुळकर यांच्या चित्रपट गीतांवर आधारित “मंतरलेली चैत्रवेल” हा कार्यक्रम झाला होता. त्यावेळेस, मी, सांताक्रूझ इथल्या एक कंपनीत नोकरी करत होतो. तिथे, माझी ओळख विकास भाटवडेकर याच्याशी झाली आणि त्याच अनुषंगाने आजचा प्रसिद्ध गायक, मुकुंद फणसळकर याची!! तो, त्यावेळेस या कार्यक्रमात भाग घेत असे. त्याला प्रत्यक्ष गाताना असे पहिल्यांदाच बघत होतो. असे त्या वाडीत दर वर्षी अनेक कार्यक्रम होत असत. एके वर्षी वाडीतील हौशी कलाकारांनी सादर केलेले असेच “काका किशाचा” हे मराठी नाटक आठवत आहे. त्यात अनंत दांडेकर आणि अशाच काही माझ्या मित्रांनी काम केल्याचे आठवत आहे. त्याचबरोबर, एकदा याच उत्सवात, जादुगार इंद्रजीत यांचे जादूचे प्रयोग झाले होते. त्यावेळी, त्यांच्या खेळाने आमचा सगळा ग्रुप “अवाक” झाल्याची आठवण ताजी आहे.
आता सार्वजनिक गणपती उत्सव म्हटला की, त्यात रुसवे-फुगवे, गैरसमज, भांडणे, पैसे खाण्याचे आरोप इत्यादी अनेक गोष्टी आल्याच आणि हेमराजवाडी त्याला अजिबात अपवाद नव्हती. गणपतीची सजावट, हा एक मोठा “प्रोजेक्ट” असायचा. अजूनही माझी आठवण पक्की आहे, मूर्ती यायच्या आदल्या रात्री, अरविंद पिटकर आणि प्रशांत मुळावकर, हे प्रामुख्याने या कामात आघाडीवर असायचे. नंतर, प्रशांत १९८३ च्या सुमारास दुबई आणि शारजा इथे नोकरीसाठी गेला आणि नंतर बरेच वर्षे हे काम,अरविंद उर्फ बाबू याचेच जणू काही ठरून गेल्यासारखे झाले होते. नेहमीप्रमाणे गणपतीची आरती हा त्या उत्सवातील प्रमुख आणि मोठा कार्यक्रम. आम्हा मित्रांना, मोठ्याने ओरडायची अशी परवानगी, वयस्क मोठ्यांच्या समोर अशी विरळाच मिळायची आणि आम्ही ती दोन्ही हाताने अक्षरश: वसूल करायचो. त्यावेळेस, आमचा उदय पोवळे, तबला शिकत होता त्यामुळे त्याच्या वादनाची साथ हे नेहमीचीच!! अर्थात, आमचा लयीचा संबंध आणि त्याचा ताल, याचा मेळ नेहमीच बेताल असायचा, तो भाग वेगळा. मी तर कितीतरी वर्षे, नियम असल्यासारखा या उत्सवाला जणू जखडलेला असायचो.
आमच्या वाडीत एक कार्यक्रम मात्र अजूनही नित्यनेमाने चालत आहे आणि तो म्हणजे, “सहस्रावर्तन”!! या सणातील रविवार पकडून, आम्ही, बरेचसे त्यावेळचे तरुण, यात प्रथम सुरेश सामील झाला होता. सकाळी साधारणपणे सातच्या सुमारास “गणपती अथर्वशीर्ष” सुरु व्हायचे ते साधारणपणे बारावाजेस्तोवर चालायचे. ह्या कार्यक्रमात अजूनही “ब्राह्मण”च सामील होतात. सुरेश जातो, हे बघितल्यावर, मी आणि नंदू पिटकर सामील झालो. त्यानंतर प्रदीप आला. त्यानिमित्ताने अंगावर अंतर्वस्त्र आणि त्यावर “सोवळे” नेसून पाटावर बसून म्हणायचा सगळा सोहळा असायचा. आमच्यात त्यावेळी प्रमुख कलाकार म्हणजे, तात्या पाध्ये, शेंडे आणि फणसटकर हे असायचे. तात्या पाध्ये तर इतके भराभर आणि स्पष्ट म्हणायचे की, आम्हाला तर त्याचेच कौतुक वाटायचे. आमचा भाग म्हणजे खरतर नाममात्रच असायचा. पण, त्यावेळेस तरी आम्ही काहीतरी “धर्मकार्य” करीत आहोत, याचेच अधिक समाधान असायचे. त्यावेळेस आमचा सगळ्यांचाच देवावर विश्वास होता. पुढे मी पक्का नास्तिक झालो हे खरे, पण ती वर्षे मात्र अशाच धुंदीत गेले, हे मात्र खरे. अगदी, त्यावेळेस, आम्ही (भाबडेपणे!!) आरती झाल्यावर,आमच्या मनोकामना पुऱ्या कर, असा मनातल्या मनात आशीर्वाद देखील मागितल्याचे आठवत आहे. सहस्रावर्तन झाले की, नंतर “महाआरती” चालायची. त्यावेळचा “प्रसाद” देखील खास असायचा, म्हणजे मसाल्याचे, वेलची घालून केलेलं आटीव दुध आणि एखादे केळ!! पण, या प्रसादावर देखील आम्ही प्रचंड खुश असायचो. त्यावेळच्या आमच्या आनंदाच्या कल्पना देखील अतिशय मर्यादित असायच्या. त्यावेळी, बाहेरच्या जगाची काहीच “ओळख” झालेली नसल्याने, आमच्यातच मश्गुल असणे, हेच आमचे व्यवच्छेदक लक्षण असायचे. त्यावेळेस, या उत्सवात हिंदी गाण्यांचा “ऑर्केस्ट्रा” आमच्यात अतिशय प्रसिद्ध असायचा. त्यावेळी, आमची गाण्यांची आवड ही प्रामुख्याने हिंदी चित्रपट गाणी (अजूनही यात फारसा बदल नाही!!) त्यामुळे ज्या वाडीत असा त्यावेळचा प्रसिद्ध नाव असलेला कार्यक्रम, तिथे आमची उपस्थिती आवश्यकच असायची. आमच्या हेमराजवाडीत सुद्धा असे बरेच कार्यक्रम असायचे. अशाच एके वर्षी, वाडीतील काही हौशी कलाकारांनी एकत्र जमून केलेला असाच “ऑर्केस्ट्रा” आठवत आहे, त्यावेळी, आमच्या ग्रुप मधील रमेश मोघे, याचे गाणे, अर्थातच आमच्या आवडीचा भाग होता.
तरीही, या उत्सवाची खरी धमाल म्हणजे मूर्तीचे विसर्जन!! विसर्जनाला कुणाची “कच्ची” वाजणार, यावर आमच्यात उत्सवभर बोलणे चालत असे. अंगात येणे म्हणजे काय, याचा कुणाला अनुभव घ्यायचा असेल तर त्याने विसर्जनाचा सोहळा बघावा. दुपारपासून, ज्या गाडीतून मूर्ती विसर्जनाला न्यायची, त्या गाडीला शृंगारण्याचे काम सुरु होते. जसजशी संध्याकाळ जवळ यायला लागायची तशी आजूबाजूच्या मूर्तींच्या मिरवणुका सुरु झालेल्या असायच्या आणि त्यांच्या अशाच “बेंजो” वादनाचा एकच आवाज आसमंतात भारून राहिलेला असायचा. सोबत, गुलाल, पिंजर, बुक्का वगैरे पावडरीचा रंग आणि सुगंध भरलेला असणे, आवश्यकच असायचे. काहीकाही वेळेस वाजत असलेला ढोल इतका मोठा सायाचा की, आपले बोलणे ऐकायला मिळणे कठीण व्हायचे. तरीही एक गोष्ट मान्यच करायला हवी आणि ती म्हणजे, त्या आवाजाची विलक्षण धुंदी मनावर चढलेली असायची. तो ताल, त्या तालासामावेत गुंग झालेली माणसे, याचे अद्भुत अद्वैत बघायला मिळायचे. अर्थात बरेच वेळा अनावस्था प्रसंग ओढवायचा,म्हणजे अर्वाच्य शिव्या आणि भांडणे आणि मनात साचलेली जुनी वैरे, या सगळ्या गोष्टी मनातून उफाळून बाहेर यायच्या.त्यामुळे, बऱ्याच वेळा रंगाचा बेरंग व्हायचा, मग कुणीतरी त्यांची समजूत काढणारे पुढे यायचे आणि ती विसर्जनाची मिरवणूक पुढे सरकायची. एक गोष्ट तर नक्कीच असायची, वाजवणारे आणि नाचणारे, बहुतेकवेळा दारूच्या नशेने बेधुंद असायचे. अर्थात, त्यांना तसा दोष देणे चुकीचे आहे. अर्थात परिस्थितीने गांजलेले आयुष्य, नेहमीच्या आयुष्यात कधीही विरंगुळा नावाची चीज कधीही अनुभवायला न मिळणे, याच गोष्टीचा सगळा परिपाक असायचा.
मी या बाबतीत बहुतेक वेळा,परीट घडीच्या समाजाकडून सतत या बद्दल टीका ऐकत आलो आहे पण ही टीका सगळी एकमार्गी आहे, हे समजावणे अवघड असायचे कारण त्या परीट घडीच्या लोकांना, या लोकांच्या विवंचनेची कधीच कल्पना येणे शक्य नाही. येणारा आजचा दिवस कसा घालवायचा, याच काळजीत सतत सगळे वर्ष काढल्यावर, असा एखादाच दिवस त्यांना मिळतो, जिथे मनाला घातलेले करकचून बंध मोकळे करायची संधी मिळते. प्रत्येक वेळेस, केवळ आत्मलक्षी भूमिकेत वावरणाऱ्या लोकांना समजावणे अतिशय कठीण आहे. नेहमीच पाश्चात्य लोकांचेच बरोबर, याच विचारातून अशी विचारसरणी निर्माण होते.
अशाच एके वर्षी, आजचा प्रथितयश ढोलक वादक, विजय चव्हाण याच्या ग्रुपने, आमच्या गणपती विसर्जनाला ढोल वाजवला होता, हे स्मरते. त्यावेळी, तो आजच्यासारखा प्रसिद्ध वगैरे नव्हता पण, त्यावेळी, त्याने सगळी वाडी आपल्या वादनाने दणाणून सोडलेली, स्पष्टपणे आठवीत आहे. त्यावेळी, विजय तितका प्रसिद्ध नव्हता पण त्याचे वादन तितकेच असामान्य होते, हे नक्की. मी तर, कितीतरी वर्षे माझे पाय मोकळे करून घेतलेले आहेत. माझी नाचण्याची “खाज” या निमित्ताने भागवून घेतली होती. त्यावेळी, तरुण होतो आणि मुळात संगीताची गोडी लागली होती. त्यातून, त्या “कच्ची” तालाची धुंदीच अफलातून असायची. तुम्हाला संगीतातले काय कळते नी किती समजते, याची कसलीही गरज नसायची. कोण बघतेय आणि तुम्ही कसे नाचत आहात, याचा विचार करण्याची मला कधीच गरज भासली नाही. अगदी मनमुरादपणे मी नाचून घेतले आहे. पुढे, साउथ आफ्रिकेत गेल्यावर, मी, पाश्चात्य संगीतावर माझी पावले थिरकवली आहेत पण तरीही मनातून कधीच ताल-वाद्यासह निघणारी मिरवणूक मावळली नाही. आमच्यात, तसे पहिले तर उदय खरा नाचण्यात वाकबगार आहे आणि होता. त्याची पावले नेमकी तालावर पडायची. त्याला नृत्याचे अंग नेमके आहे. सुरेश, त्याच्या स्वभावानुसार कधी नाचल्याचे आठवत नाही, म्हणजे तो शेवटपर्यंत मिरवणुकीत असायचा पण, कधीही पावले थिरकवली असे झालेच नाही. मी, प्रदीप, रमेश हे नित्याचेच असायचे. विसर्जनाचा सोहळा मध्यरात्र उलटली तरीही चालूच असायचा, तेंव्हा नाचून जीर्ण-शीर्ण झाल्यावर, दुसऱ्या दिवशी शाळेला “दांडी” मारणे क्रमप्राप्तच असायचे. असा हा हेमराजवाडीतला गणपती उत्सव. आता, या वर्षी त्या उत्सवाला ७५ वर्षे होत आहेत. अजूनही, ‘सहस्रावर्तन” चालू असते, असे मला सांगण्यात आले आहे, पण आता तिथे सुरेश नसतो, पाध्ये तर वाडीच सोडून गेले आणि मी तर कालपर्यंत परदेशीच राहायला गेलो. आता, या वर्षी हा उत्सव कसा साजरा होईल, याची अजूनतरी मला कल्पना नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे, आता या वाडीत माझे, उदय, प्रदीप आणि प्रशांत राहात नाहीत आणि सुरेश तर केवळ राहण्याचा पत्ता आहे, इतकाच त्याचा वाडीत वावर असतो. त्यामुळे, मी तर कित्येक दिवस त्या वाडीत जात देखील नाही. अर्थात, या वर्षी वाडीचे ७५ वर्ष नक्कीच साजरे होईल, पण ते कसे असेल याची मात्र मला काहीच कल्पना नाही. माझ्या वेळचे बरेचसे आता वाडीत राहात नाहीत, हे तर खरेच.पण, मुळात आता माझ्या मनात पूर्वीची इर्षा राहिली नाही, हेच खरे. तसे पहिले गेल्यास, आता पूर्वीचे उत्सवाचे स्वरूप काळानुरूप नक्कीच बदललेले असावे – मी तर कितीतरी वर्षात गणपतीत सलग भारतात आलोच नसल्याने, आज माझी अशी भावना आहे. “कालाय तस्मै नम:” म्हणून मनाची समजूत घालून घ्यायची की वाढलेले वय समजून घेऊन, उत्सवातील उत्सवी भागात लक्ष काढून घ्यायचे, हाच माझ्या पुढे खरा प्रश्न आहे.
No comments:
Post a Comment