आपण आयुष्यात बऱ्याच कथा काही वाचत असतो पण, मनाला चरका लावणाऱ्या कथा फार थोड्या असतात, त्यापैकी, जी.ए.कुलकर्ण्यांची स्वामी ही कथा!! म्हटले तर कथानक दोन,चार ओळीत संपविता येईल.नियतीच्या प्राक्तनात अकल्पितपणे अडकल्याने, होणारा आयुष्याचा अनिवार्य आणि अटळ शेवट, असेच काहीसे या कथेबाबत म्हणता येईल. कथेच्या सुरवातीला, “टेकडी केसाळ काटेरी कातड्याच्या श्वापदाप्रमाणे अंग टाकून बसल्यासारखी दिसत होती” असे वाक्य वाचायला मिळते, पुढील सगळी कथा ही याच प्रतिमेच्या सावलीत वावरत असावी अशी वाढत जाते. लेखकाला प्रतिमेचा अनिवार सोस आहे, हे तर खरेच पण तरीही त्या प्रतिमा नेहमीचा कथाभाग अधिक विस्तीर्ण करतात. मराठीत प्रतिमांचा इतका सशक्त उपयोग फारच क्वचित आढळतो. कथेचे बाह्यस्वरूप एखाद्या रहस्यकथेप्रमाणे भासते आणि तसे थोडे आहे देखील. सुरवातीच्या वाचनातून, पुढे कथा कशी घडत जाईल, याचा अदमास घेता येत नाही.
गावात आलेला एक प्रवासी, परतीच्या बसची आतुरतेने वात बघत असताना, डोळ्यासमोरून ती बस निघून जाते आणि प्रवाशाच्या मनात खिन्नता पसरते. तिथेच एक “महंत” वाटावा, अशा वाटसरुशी गाठ पडते आणि त्याच्या आग्रहाने, प्रवासी त्याच्यापाठोपाठ त्या मठात येतो आणि पुढे त्या प्रवाशाच्या आयुष्याला संपूर्ण वेगळे असे अतर्क्य वळण मिळते, ते त्याच्या शेवटापर्यंत!! रहस्य आहे ते इथेच, सुरवातीला कथेचा असा शेवट होईल, याची अजिबात जाणीव न होता, लेखक आपल्याला त्या घटनेपर्यंत पोहोचवतो. तसे पहिले गेल्यास, ही कथा म्हणजे एक अद्भुत वास्तवाचे चित्रण आहे. कथेतील मठ, कुठे आढळेल असे नाही, तसेच सहज म्हणून भेटलेला रस्त्यावरील माणूस आणि त्याला “स्वामी” करण्याची त्या साधूची इच्छाशक्ती, या सगळ्या गोष्टीचा वास्तवात विचार करता, अशक्यप्राय घटना वाटतात. परंतु, अशा प्रकारच्या “अवास्तव” घटना एकदा सत्य म्हणून स्वीकारल्यावर, मग, त्या “अवास्तवाचे” “वास्तव” मान्य करणे, इतकेच आपल्या हाती राहते.
जी.ए.कुलकर्ण्याच्या बहुतेक सगळ्याच – विशेषत: नंतरच्या काळातील कथा या रूपक कथा म्हणून गणल्या जातात जिथे कथा विश्व हेच मुळी एक रूपक असते!! अशावेळेस, कथेतील विषय ही एक सत्य घटना मानून चालणे, इतकेच आपल्या हाती असते. त्यामुळे, एकदा विषय ध्यानात आल्यावर त्या विषयाची बांधणी, बांधणीच्या ओघात येणाऱ्या प्रतिमा, आणि त्याबरोबर येणारे भाषावैभव हेच खरे या लेखकाचे खरे सामर्थ्य!! कथेचा अत्यंत तपशीलवार मांडलेला आशय, त्या आशयातून दिसणारी लेखकाची जीवनदृष्टी, आणि जशी कथा पुढे सरकत जाते, तसा वाचक त्या कथेत पूर्णपणे गुरफटून जातो इतके सकस लेखन!! आता याच कथेच्या संदर्भात विचार करता, जसा प्रवासी, मठाच्या जवळ येतो, तशी त्या मठाचे स्थापत्य, रचना कौशल्य आणि त्यातील गहन जटिलता, याचे इतके यथार्थ वर्णन वाचायला मिळते की आपल्या डोळ्यासमोर तो सगळ मठ जिवंत उभा राहतो. गावाबाहेरील, वस्तीपासून संपूर्ण वेगळा असा मठ, त्यात राहणाऱ्या लोकांचे जीवन त्यांची जीवन शैली आणि पद्धत, त्या बांधणीत, अंतर्भूत असलेला निसर्गाचे अवलंब आणि अखेर अत्यंत अटळ अशा काळोखी खोल्या!! वाचताना, वाचक त्यात इतका गुंगत जातो की आपण आपले आजूबाजूचे जग पूर्णपणे विसरतो आणि त्या मठात जाऊन पोहोचतो!! हे लेखकाच्या भाषेचे खरे सामर्थ्य!! अद्भुत म्हणतात ते हेच असावे. जे प्रत्यक्षात दिसत नाही, अशा जगाचा नव्याने परिचय घडविण्याचा हा प्रयत्न. जी.ए.कुलकर्णी यांनी, “ओर्फियस “, “दूत”,”प्रवासी” अशा कथांमधून आपल्याला दिसते. लेखकाचे वैशिट्य असे की, अद्भुताची सफर घडवताना, त्यामागील जीवनाची जळजळीत जाणीव आपल्याला अतिशय प्रखरतेने दाखवतात, इतकी ही दृष्टी तीक्ष्ण आहे की, वाचताना, आपणच त्या कथेचा एक भाग होऊन जातो. नियतीच्या खेळाचा फार प्रचंड आवाका जाणवून देतात, इतके की वाचताना आपण दि:डमूढ होऊन जातो. त्यामुळेच त्यांच्या कथा वाचताना, वाचकाचे मन कधीही स्थिर राहात नाही.
सर्वात अधिक जटिल भाग आहे तो, रचनेतून दिसणारी नियतीची अगम्य क्रीडा!! एकाच विचारातून अनेक विचारांची आवर्ते अनुभवणे, केवळ अपूर्व आहे. इथे “तत्वज्ञान” हे “तत्वज्ञानाच्या” स्वरुपात न येता, कथेचा अविभाज्य भाग बनून येतो. इथे, याच कथेत प्रवासी मठात शिरत असताना, तो साधू आणि प्रवासी, यांचे संवाद खरोखरच वाचण्यासारखे आहेत. ते प्रश्न आणि त्याच्या अनुरोधाने येणारी उत्तरे, त्यातही मूळ मुद्द्याला बगल देऊन, विचारांच्या आवर्तात प्रवाश्याला गुंतवत ठेऊन, शेवटी त्या काळकोठडीत अडकवून ठेवण्याची क्रिया खरोखर अतिशय मनोज्ञ आहे. अखेर, आपल्याला फसवले गेले आहे आणि आता त्या कोठडीतून बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग उपलब्ध नाही, हे मनोमन जाणविल्यावर होणारी मनाची तगमग इतकी व्याकूळ करणारी आहे की, वाचताना आपणच त्या व्याकूळतेत सहभागी होतो. ही, लेखकाच्या भाषेची अपूर्व मिरासदारी!!
माणूस हा अखेरीस एकटाच असतो आणि त्यामुळे आपण सगळ्या जाणीवा ताब्यात ठेवणे जरुरीचे आहे, या विचाराचा पायाच जणू या कथेत उखडलेला आहे. जेंव्हा, प्रवासी त्या कोठडीत अडकला जातो, तेंव्हा त्याच्या मनाच्या व्याकूळतेचे वर्णन आपल्याला हेच दाखवून देते की, शेवटी माणूस कधीच एकटा नसतो, जरी काहीजण त्यादृष्टीने प्रयत्न करीत असले तरी!! अटळ शेवट ध्यानात आल्यावर, मग कुठेतरी मन गुंतविणे आवश्यक गरज होते. अत्यंत फालतू वाटणाऱ्या प्रसंगात देखील, तो आपले मन गुंतवायला बघतो. साधी गोष्ट, कोठडीतील एक फटीतून एके दिवशी, त्याला एक हिरवा कोंभ दिसतो आणि त्याच्या मनात विचारांचे तरंग उमटतात!! त्यातूनच मग पुढे येते ते, अप्रतिम मुक्त छंदातील स्वगत!! खरे तर, हे स्वगत म्हणजे, अप्रतिम कविताच आहे. तसे पाहायला गेले तर जी.ए.कुलकर्णी यांच्या बहुतेक कथा या काव्याशी फार जवळचे नाते दाखवतात. एखादे स्वगत, वैचारिक अनुभव किंवा अति तरल संवादातून गद्यात्मक मुक्त काव्याचा भास होत असतो.
नियतीचा फार विलक्षण खेळ हा लेखक दाखवतो. प्रत्येक माणूस हा अपूर्ण आहे आणि त्याची पावले, आयुष्यात कधीतरी वाकड्या वळणावर जातात आणि तिथे नियतीचा चकवा त्याला अनुभवावा लागतो आणि त्यातून कुणाचीच सुटका नाही. स्वामी कथेत याच गोष्टीचे पावलोपावली दर्शन होत असते. तो प्रवासी, नेमका त्याचा गावात का आला ? त्याच संध्याकाळी, तिथे त्याला तो साधू कसा काय भेटला ? मठाची अशुभ सूचना प्रवेशद्वाराशी मिळत असूनदेखील, प्रवाशाची पावले आत का खेचली जातात ? एकदा आत शिरल्यावर, मग पुढील घटना अटळ स्वरुपात त्याला भोगाव्या लागतात, हे जरी खरे असले तरी, पुढे काहीतरी अघटीत आहे, याची जाणीव त्याला होत असते ? तरीही मानवी लालसा इतकी प्रबळ असते का ? हे आणि असे कितीतरी प्रश्न वाचनाच्या अनुषंगाने मनात येत असतात पण, हे असेच घडणार असते, हेच त्या प्रवाशाच्या प्राक्तनात लिहिलेले असल्याने, त्यातून त्याची सुटका नाही, हाच नियतीचा लेख आपल्याला पाहावा लागतो आणि त्यामुळे वाचताना देखील आपण हताश होतो!! हेच का मानवी आयुष्य आणि अशीच त्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे? हे टाळणे इतके अवघड आहे की, अवघड आहे, याची पुसटशी कल्पना असूनदेखील, लोहचुम्बकाप्रमाणे त्या घटनांशी खेचला जातो ? “फरफट” हेच आयुष्यात सापडलेले एकमेव सत्य!! ही कथा वाचताना, कधीकधी त्या विचारांने मनाला ग्लानी येते तरीही त्या भाषेचा, घटनांचा मोह इतका होतो की, आपल्या मनाची अवस्था देखील फरफटल्यासारखी होते. शेवटचे स्वगत वाचताना तर, डोके सुन्न होऊन जाते!! एखाद्या घनदाट अरण्यात शिरल्यावर परतीची वाट अपरिचित व्हावी तरीही पुढील हिरवी घनगर्द झाडे खुणावत असल्याप्रमाणे आपले पाय खेचले जावेत, असेच “स्वामी” या कथेबाबत म्हणावेसे वाटते.
No comments:
Post a Comment