Wednesday, 18 June 2014

विजय खरा पण बरा आहे का?




अखेर बीजेपीला अनुकूल असे मताधिक्य मिळाले आणि ते देखील ज्याला “घवघवीत” म्हणता येईल असे यश मिळाले. त्यामागील कारणमीमांसा सहज करणे शक्य आहे. एकतर, देशात काँग्रेसनेच प्रगतीच्या नावाने खड्डा खणून ठेवला होता, दुसरे मोदी आणि एकूणच बीजेपीने जी रणनीती आखली होती, तिला भारतीय राजकारणात तरी तुलना नाही. अत्यंत सुनियोजित प्रचारतंत्र, जाहिरातीचा भडीमार इत्यादी मुद्दे यात येतील. मोदींनी, काँग्रेसचे कच्चे दुवे नेमके हेरून, त्यावर केलेला हल्ला आणि त्याला काँग्रेसकडून झालेला लेचापेचा प्रतिवाद, मिडीयाचा इतका अप्रतिम वापर भारतीय राजकारणात यापूर्वी कुणीही केला नव्हता आणि त्यानिमित्ताने असेच म्हणता येईल, या निवडणूक प्रचारातून, बीजेपीने, यापुढील निवडणुका कशा पद्धतीने खेळाव्यात, याचा नवीन पायंडा घालून दिला.
अर्थात, निवडणुकीचे कवित्व अजून काही दिवस तरी नक्कीच चालू राहणार आणि त्यानिमित्ताने दोषारोपांचे राजकारण आणि यशाचे गमक कशात आहे, याची जाहीर चर्चा होत राहणार!! असेच यश १९८४ च्या निवडणुकीत राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला मिळाला होता. यानिमित्ताने काही प्रश्न इथे उपस्थित होतात. भारतीय जनता पक्षाचा हा विजय आणि १९८४ साली राजीव गांधींचा विजय, यात एक ठळक साम्य दिसते आणि ते म्हणजे विरोधी पक्षांचे झालेले निर्दालन!! लोकशाहीत सत्तास्थापनेबरोबर विरोधी सूर देखील तितकाच महत्वाचा असतो आणि दुर्दैवाने भारतात, हा विचार कधीच “रुजला” नाही. विरोधक म्हणजे देशबुडवे हाच समज अधिकाधिक घट्ट केला गेला!!
वास्तविक, एकाच विचाराला अनेक दिशा असू शकतात/असतात, ही विचारसरणी भारतीय राजकारणात कधीच मूळ धरू शकली नाही – दुर्दैव भारतीय राजकारणाचे!! इथे एक उदाहरण आठवले!! पंडित नेहरू याबाबत अगदी आदर्श वाटावेत, या विचारसरणीचे होते. “नाथ पै” “वाजपेयी” हे विरोधी पक्षाचे नेते तरीही नेहरूंचे त्यांच्याशी असलेले संबंध अतिशय सौहार्दाचे होते, त्यांना, यांच्या मतांची नेहमीच बूज राखावी, असे वाटत होते. दुर्दैवाने, पुढे भारतीय राजकारणाने इतके अतर्क्य आणि घृणास्पद वळण घेतले की विरोध म्हटला की त्याची मुस्कटदाबी करायची, हाच एकमेव मार्ग, सत्ताधीशांनी ठेवला!! त्याची विषारी फळे आता, खुद्द काँग्रेसला भोगावी लागत आहेत!! १९७७ साली, सुदैवाने नवीन सरकार आले होते आणि ते जर ५ वर्षे टिकले असते तर कदाचित भारतीय राजकारणाला वेगळे वळण मिळू शकले असते पण, जनता पक्षाच्या नेत्यांना अति महत्वाकांक्षा नडली, वैय्यक्तिक मातांना नको तितके महत्व दिले गेले आणि तिथून निर्घृण राजकारणाला सुरवात झाली.
वास्तविक, जागतिक राजकारणात असे प्रयोग यशस्वी झाले आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, चर्चिल यांनी, मजूर पक्षाचे नेते, Attaley यांना उपपंतप्रधान देऊन, त्यांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान दिले होते। वास्तविक, मजूर पक्षाची धोरणे, चर्चिल यांच्या विचारसरणीत अजिबात बसत नव्हती, असे असताना त्यांनी हे पाऊल उचलले होते. पुढे, खुद्द Attaley यांनीच मोकळेपणी एक मत व्यक्त केले होते, ” चर्चिल यांचा माझ्यावर जितका विश्वास होता, तितका त्यांचा स्वपक्षीयांवर देखील नव्हता”. राजकारण किती प्रगल्भ वृत्तीने करता येऊ शकते, याचे हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. पुढे, केनडींनी याच मताचा पुनरुच्चार करून, निवडणूक जिंकल्यावर, केवळ “ज्ञान” आणि “हुशारी” याच गुणांचा विचार करून, आपल्या मंत्रिमंडळात अनेक विरोधी नेत्यांचा समावेश करून घेतला!!
भारतीय समाज आणि समाजमन बघत, ही विचारसरणी इथे अंमलात येणे, अवघड आहे कारण आपल्याकडील राजकारणाची पद्धत!! सतत विद्वेषाचे राजकारण, हाच स्थायीभाव राहिल्याने,इथे चांगले पायंडे कधीच मूळ धरू शकले नाहीत आणि यापुढे कधी अस्तित्वात येतील, असे वाटत नाही!!
या निकालाच्या निमित्ताने, काही गोष्टी, विशेषपणे ध्यानात याव्या!! १९८४ साली जो विजय मिळाला होता, त्यात, अनेक विरोधी नेत्यांचे मानहानीकारक पराभव झाले होते, जसे वाजपेयी, हे ठळक उदाहरण तसेच जरी मधु दंडवत्यांचा विजय झाला होता, तरी मतांचे प्रमाण इतके अल्प होते की, विजयाबाबत शंका यावी!! सामान्य लोकांनी विरोधकांना इतके झोडपून काढायची गरज नव्हती!! यामुळे, राजकारणात, विरोध करणे म्हणजे नेस्तनाबूत करून घेणे, ही प्रवृत्ती बळावत गेली. कालच्या निकालांत देखील असेच काही धक्कादायक निकाल लागले. वास्तविक निलेकणी किंवा मेधा पाटकर सारखी व्यक्ती पराभूत होणे, हे निरोगी लोकशाहीचे लक्षण नक्कीच नव्हे!!
नुकताच निकाल लागला आहे तेंव्हा विजयाचे/पराभवाचे विश्लेषण लगेच तर्कशुद्ध पद्धतीने होणे अवघड आहे पण तरीही ज्याकाही प्रतिक्रिया ऐकायला/वाचायला मिळाल्या, त्यात फारसा सुज्ञपणा दिसत नाही. “जनता मूर्ख आहे” किंवा, “बहुसंख्यांचे ध्रुवीकरण झाले” या प्रतिक्रिया विचारी मनाचे द्योतक नक्कीच नाहीत!! “जनता मूर्ख आहे” म्हणजे समजा काँग्रेस विजयी झाली असती तर हीच जनता “विचारी” ठरली असती!! आणि दुसरे असे, याच जनतेने, इतकी वर्षे काँग्रेसला सत्ता दिली ती जनता, एका रात्रीत “मूर्ख” कशी ठरली? “अल्पसंख्य” आणि “बहुसंख्य” हा वाद भारतीय राजकारणातील कधीही “शिळा” न होणारा विषय आहे!! आज, जरा निकालांकडे बघितले तर असे दिसेल, “मुंबई”, “दिल्ली” इथे काँग्रेसचा पूर्ण पराभव झाला!! म्हणजे, वेगळ्या शब्दात मुस्लिम मतांनी काँग्रेसचा घात केला!! म्हणजे अल्पसंख्य देखील बीजेपीला येउन मिळाले, असे म्हणायचे का? असाच प्रकार गुजरातेत झाला!! याला विश्लेषक वृत्ती म्हणता येणार नाही.
मला मोदींची भलामण करण्याचे काहीच कारण नाही परंतु या निकालाचे जरा थंड डोक्याने विश्लेषण अपेक्षित आहे, मतदारांवर खापर फोडून, काहीही साध्य होणार नाही ,केवळ खुळचट अहंगड मात्र पोसला जाईल. एक मात्र नक्की, आता खरी परीक्षा सुरु झाली आहे. निवडणुकीत यश मिळवणे (काहीच्या मते, मतदारांच्या डोळ्यात धूळफेक करून!!) एकवेळ शक्य आहे परंतु आंतरराष्ट्रीय प्रश्नात ही वृत्ती अजिबात उपयोगी पडणारी नाही तसेच सध्या देशात अंतर्गत अनेक प्रश्न उग्र झाले आहेत, त्याचा गंभीरपणे विचार होणे अपेक्षित आहे. आव्हाने प्रचंड आहेत आणि उत्तरे मिळणे, फार अवघड आहे आणि हेच नव्या सरकारपुढील खरी आव्हाने आहेत!!


No comments:

Post a Comment