Wednesday, 18 June 2014

संगीताचे (विलक्षण) सौंदर्य + शास्त्र – भाग ६




वास्तविक, कै. अशोक रानडे हे मुलत: शास्त्रीय रागदारी संगीताचे गायक, अगदी शास्त्रशुध्द तालीम घेऊन, त्यावर प्रचंड रियाज करून, आवाज कमावलेले!! हे तसे फार थोड्या रसिकांना माहित असावे कारण त्यांनी तशा रूढ अर्थाने फारशा मैफिली केल्या नाहीत!! याचे मुख्य कारण, “संगीताचे  वाग्गेयकार” बनण्याची त्यांची इच्छा!! याचाच परिपाक, या ग्रंथात प्रत्येक पानापानातून आपल्याला दिसून येतो. “संगीताचे सौंदर्यशास्त्र” या ग्रंथामागील त्यांची भूमिका जरी संगीताच्या आस्वादकाची असली तरी त्या आस्वादाचे नेमके शास्त्र काय आहे आणि कसे विस्तारित गेले, याचीच छाननी या ग्रंथात विस्ताराने केलेली आहे.
आतापर्यंत,आपण “स्वर”,”स्वरसंहती”,”स्वरसप्तक”, “राग” आणि त्यातून निर्माण झालेली “लय” याचा लेखकाने जो शास्त्रीय दृष्टीकोन मांडला आहेत, त्याबद्दल विवेचन केले आहे. हाच विषय पुढे  आणताना,लेखकाने “ताल” हा विषय घेतलेला आहे. ताल, या संकल्पनेचे बाह्यरूप आहे,त्याचा विचार करूया.  
आधीच म्हटल्याप्रमाणे, आधी कालप्रवाहाचे विभाजन आणि नंतर त्याला आकृतिबंध करणे,ह्या क्रिया यात अनुस्यूत असतात. याचाच वेगळा अर्थ, हाताशी असलेला “काल” आणि त्याचे विभाजन ठराविक खंडात केले जाते. यातील  बिंदुपासून ते, त्या कालाच्या अवकाशाच्या शेवटच्या बिंदूपर्यंत पोहोचणे, याला “आवर्तन” म्हणतात. संगीतातील प्रत्येक ताल हा या “आवर्तन” संज्ञेशी कटीबद्ध असतो. या आवर्तनात जे “खंड” असतात, त्याला शास्त्रात “मात्रा” म्हणतात आणि त्यातील पहिल्या मात्राला “सम” म्हणतात.
आता इथे आपण, प्रसिद्ध ताल, “त्रिताल” घेऊया. सोळा मात्रांचा ताल घेतला तर, त्याचे दोन समभाग केले, तर प्रत्येकी आठ मात्रा हाताशी लागतात. नवव्या मात्रेवर द्विभाजन होते. या नवव्या मात्रेला, शास्त्रात “काल” किंवा “खाली” म्हणतात. इथे परत, हे दोन विभाग आणखी दोनदोनात विभागता येतात आणि त्याचे चार भाग होतात. या विभागांच्या सुरवातीस येणारी मात्रा टाळीने सिद्ध होते. अशा तऱ्हेने १,५,१३ या मात्रांवर टाळी असणारा (मघाशी लिहिल्याप्रमाणे नवव्या मात्रेवर खाली सिद्ध होतेच!!) “त्रिताल” सिद्ध होतो. अर्थात, याच मार्गाने, इतर ताल आपल्याला सिद्ध करता येतील. पण मग प्रश्न असा उद्भवतो, अशी विशिष्ट रूपे(च) तालांना का येतात? म्हणजे, ज्या सम, टाळी आणि खाली या ३ घटकांनी तालाचे बाह्यरूप सिद्ध होते, त्या घटकाचे “मूळ” स्वरूप काय? त्याचे नेमके प्रयोजन काय?
आता, त्रीतालाच्या १६ मात्रा मोजून झाल्यावर आपण परत पहिल्या मात्राकडे वळतो, यातच तालाची वर्तुळात्मकता सुचित होते. त्यामुळे, रागाला जर “संदर्भचौकट” असे संबोधले तर तालाला “संदर्भवर्तुळ” म्हणण्यास फारसा प्रत्यवाय असू नये. इथे तालाचा सगळा प्रवास हा एका मात्रेकडून दुसऱ्या मात्रेकडे असाच चाललेला असतो आणि प्रत्येक आवर्तन ( पहिल्या मात्रापासून शेवटच्या मात्रेला शिवल्यानंतर परत पहिली मात्रा!!) हे अखेर समेच्या मात्रेला विसर्जित होते. या दृष्टीने “वर्तुळ” हे अनंतत्वाचे प्रतिक म्हणता येईल.
लयतत्वाचा कालावतार म्हणजे ताल आणि तालाची अस्तित्वसिद्धी!! त्यामुळे, कुठल्याही नादाकृतीला २ घटक महत्वाचे असतात. १] नाद, २] स्तब्धता. यातील, दुसऱ्याचे अस्तित्व सिद्ध होते, ते “खाली” या मात्रेने. कुठलाही ताल हाताने धरला असता, खालीचे हे स्तब्धताकार्य कधीच नजरेआड करणे अशक्य. काही तालांत एकाहून अधिक “खाली” असतात, याचे कारण, नादाकृती अधिक  व्यामिश्र, संपन्न करणे.
इथे एक प्रश्न मनात येऊ शकतो. ताल जेंव्हा हाताने दर्शविला जातो तेंव्हा खाली म्हणणे ठीक आहे. पण, जेंव्हा तोच ताल, तालवाद्यावर अवतरतो,तिथे ” अक्षरे” वाजवली जातात!! पण, जर बारकाईने ऐकले कुठल्याही तालात खालीची  अक्षरे २ प्रकारची असतात.
१] तबला किंवा डग्गा यापैकी एकावरच वाजवली जाणारी असतात.
२] दोघांवर वाजविण्याची जरी असली तरी ज्यात या वाद्यांचा आवाज आघातानंतर गुदमरविला       जातो, अशा वादनपद्धतीची ती असतात किंवा खालीच्या अक्षरानंतरची अक्षरे अशी असतात की     ज्यामुळे खालीच्या अक्षराची नादमयता कमी व्हावी.
नादाकृतीतील  नादमय घटकांचे अस्तित्व “टाळी” करते. यामुळे अनेक गोष्टी साधल्या जातात. एकतर, टाळीमुळे तालविभागाला वेगळेपण प्राप्त होते म्हणजे १२ इंचाच्या पट्टीवर १ इंचाची खूण रेखली की तिचे अस्तित्व मनात ठसते, शिवाय उरलेले ११ इंच देखील निश्चित होतात. तेंव्हा तालवाद्यांवर ताल वाजविण्यासाठी जे बोल, अक्षरयोजना केलेली असते, त्यांनी व्यापलेले कालबिंदू नादमय घटकांचे अस्तित्व दाखवतात.
ताल वर्तुळाकार असतो आणि एक नादपूर्ण नादाकृती असते. तालवाद्यांची विविधता असल्याने काय साधते, असा जर प्रश्न उद्भवला तर, त्यामुळे “स्वररंगात” भर पडते. वाद्यागणिक आवाजगुणांत फरक असतो आणि त्यामुळे संगीत विविधस्वरूपी होते.
जर का केवळ कालमापन हेच सध्या असते तर १६ मात्रांचे २ ताल काय करायचे? २ ताल अशासाठी की जरी त्यांच्या मात्रा सारख्या असल्या तरी प्रत्येकाची विभागणी आणि त्यामुळे होणारी आकृती वेगवेगळी असते. ही आकृती तालाच्या अक्षरांनीच साकार होते. म्हणजे, आपण परत नादाकृतीशी येउन पोहोचतो.
तसेच जसे, स्वर हे केवळ नाद्बिंदू नसून, कालबिंदू देखील असतात. तसेच, तालबिंदू हेही कालबिंदू नसून, स्वरबिंदू असतात. फक्त तालात, स्वरबिंदूंचे स्वरत्व एकाच स्वरापुरते मर्यादित असते. तालवाद्यांच्या स्वतंत्र सादरीकरणात तर ही बाब वेगळ्या स्वरुपात ठळकपणे दिसते.
स्वरस्तराप्रमाणे कालस्तरावर देखील लयीचा अवतार असंख्य रीतीने होऊ शकतो. परंतु या गुंतागुंतीच्या आविष्कारांना  पाल,हाच लयाविष्कारास पायाभूत असतो. वास्तविक, लयीचा पायाभूत आविष्कार रागात होतो, परंतु त्याच्या स्वरूपानुसार विस्तार करण्याचे सामर्थ्य असते तसाच प्रकार तळाच्या बाबतीत घडतो. प्रत्येक तालात, त्याच्या आधारे पुढे जाण्याच्या विस्ताराची बीजे असतात.
पहिले उदाहरण आपण, “तिहाई” किंवा “तिय्या” म्हणतात, त्याचे घेऊया. एखाद्या तालात समेपासुन किंवा इतरत्र कुठूनही सुरवात करून विशिष्ट बोलांची त्रिवार आवृत्ती करणे म्हणजे “तिहाई”. याने नेमके काय साधते?
१] यामुळे आविष्कार एकदम मुक्त झाल्यासारखे वाटते. कुठलाही ताल, विशिष्ट वेळात,विशिष्ट क्रमाने विशिष्ट मर्यादेपर्यंतच जाण्याचे स्वातंत्र्य देत असल्याने कधीकधी ते जोखड वाटू शकते. अशा तालाची चाल, त्याचीच चाकोरी संपूर्ण सोडून जाणारी “तिहाई” अधिक मोकळी वाटते. अर्थात, तिहाई देखील परत समेच्या मात्रेवरच विसर्जित होते.
२] दुसरे उदाहरण, लयाला “तुकडा” म्हणतात, त्याचे घेत येईल. तालाच्या अर्ध्यापासून किंवा थोडे अलीकडे निघून, अक्षरांची!! आकृती साधून समेवर येणे म्हणजे “तुकडा”. याचा तसा अल्पविस्तार असतो. पण, त्यामुळेच तालस्वरूप विस्तृत दिसते. तालाची लांबी तुकड्यामुळे नजरेत भरते. या संदर्भात दुसरी महत्वाची बाब म्हणजे, त्याचा आकस्मिकपणा!! संथ चाल कशी एकदम द्रुत गतीत चालू लागली म्हणजे लक्ष्यवेधी ठरते तेच कार्य तुकड्याचे.
तेंव्हा इथे या स्वरूपावर ३ निष्कर्ष काढता येतात.
१] पुनरुद्भव हे लयतत्वाचे प्रमुख अंग. त्यामुळे सर्व आविष्कारास निश्चित मर्यादा प्राप्त होतात आणि आविष्कार अत्यंत   बांधेसूद होतात.
२] पुनरुद्भवातील या हेतुपुर्णतेमुळे त्यात एकप्रकारची नियमितता अनाभूत असते. त्या दृष्टीने समतोलता साधने अनिवार्य असल्याने नियमितता अनिवार्य ठरते.
३] नियमित पुनरुद्भव होतो तो सर्जककेंद्राचा. सर्जककेंद्राची व्याख्या करणे अवघड आहे पण ज्यात अनेक निर्मितीची बीजे आढळतात ती सर्जककेंद्रे!!
ज्या पातळीवर कलाव्यापार चालू असेल, त्यानुसार त्याला अनुरूप अशी संबंधाची (रिलेशन्स) जोडणी करण्याकडे आणि नवीन जोडणी शक्य व्हावी, इथे सर्जककेंद्रे आवश्यक असतात.


No comments:

Post a Comment