Thursday 31 May 2018

खैय्याम

काही संगीतकारांच्या मनात काही राग हे कायमचे वस्तीला आलेले असतात आणि त्यांचे प्रारूप, त्यांच्या स्वररचनांमधून आपल्याला सारखे जाणवत असते. खैय्याम यांच्याबाबत हे विधान काहीसे ठामपणे करता येईल. "पहाडी" सारखा लोकसंगीतातून स्थिरावलेला राग, त्यांच्या गाण्यांतून बरेचवेळा डोकावत असतो, अर्थात चालींचे  वेगळेपण राखून. काहीवेळा त्यांच्यावर टीका देखील झाली परंतु एखाद्या रागावर अनन्वित श्रद्धा असेल तर त्याच रागातून किती छटा दाखवता येतात आणि आपले बुद्धिकौशल्य मांडता येते, याचे सुंदर उदाहरण  म्हणून खैय्याम यांचे नाव घ्यावेच लागेल. 
संस्कारक्षम काळात पंडित अमरनाथ यांच्याकडे शागिर्दी केली आणि आपला कलासंगीताचा पाया घोटवून घेतला. याचे फायदा पुढे जेंव्हा चित्रपटसृष्टीत यायचे ठरविले तेंव्हा तिथे आधीच कार्यरत असलेले पंडित अमरनाथ आणि त्यांचे बंधू - हुस्नलाल/भगतराम यांना साथ करणे क्रमप्राप्तच ठरते. त्याचबरोबरीने विख्यात कवी फैझ-अहमद-फैझ यांच्या संगतीने काव्याचा अभ्यास करून घेतला. याचा पुढे हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत होताना, निश्चित फायदा झाला असणार . अर्थात एकूण कारकिर्दीकडे नजर टाकल्यास, एकूण ५० एक चित्रपटांना संगीत रचना करणे, हे काही प्रचंड कार्य नव्हे परंतु जे चित्रपट केले, त्याच्यावर स्वतः:ची नाममुद्रा उमटवली, हे विशेष म्हणायला लागेल.
"शामे गम की कसम' सारखे गाणे कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात देऊन, त्यांनी स्वतः:ची ओळख जगाला करून दिली. त्यांनीच एकेठिकाणी म्हटल्याप्रमाणे, गाण्यात कुठलेही पारंपरिक तालवाद्य वापरले नसून, "डबल बेस" आणि "स्पॅनिश गिटार" सारख्या स्वरिक वाद्यांकडून ताल पुरवला गेला. या रचनेने, खैय्याम विशेष प्रसिद्धीस आले. असे म्हणता येईल.
काही मूल्यमापन करायचे झाल्यास, १) मोठा वाद्यवृंद वापरानेवा वाद्यांचा हात राखून उपयोग करणे. वरील गाणे - शामे गम की कसम", "कहीं एक मासूम लडकी" किंवा " आज बिछडे है" ही गाणी ऐकताना आपल्याला प्रत्यय येईल. यांत वाद्य गदारोळ नाही, संगीत आणि शब्द दोन्ही आपल्या मनात झिरपत जातात आणि त्याचबरोबर एक शांत भाव. कदाचित याच सांगीत काटकसरीमुळे असेल पण तलतचा नाजूक स्वरकंप किंवा भूपिंदर सिंगचा मृदू गणोच्चार मनात ठसतो. २) याच संदर्भात एक आणखी बारकावा विचारात घ्यावासा वाटतो. काही अपवाद वगळता त्यांनी छेडण्याची तंतुवाद्ये आणि पियानो यांच्या माध्यमातून दीर्घ सुरावटीचे आकृतिबंध विणण्यावर भर दिला. उदाहरणार्थ "जीत लेंगे बाझी हम तुम" या रचनेत महत्वाचा गीतारंभ फक्त पियानोवर सोपवला आहे. तसेच पहाडी रागावरील "बहारो मेरा जीवन भी संवारो" या गाण्यात सतार इत्यादी वाद्ये दीर्घ आणि आवाहक स्वरबंध निर्माण करतात.
एक आश्चर्याची बाब - समान स्वरबंध त्यांनी काही गाण्यात सहजपणे वापरले आहेत. "कभी कभी मेरे दिल में" आणि " सिमटी हुई ये घडिया" किंवा "परबतो के पेडो पर" आणि "बहारो मेरा जीवन भी संवारो" तसेच "फार छिढी रात" आणि "आयी झंजीर" ही गाणी आलटून, पालटून स्वरसाम्यासाठी तपासावीत. खैय्याम यांना सुरावटीच्या नाविन्याची अप्रूप नाही, असे नाही. कारण सुरांची समानता ज्या गीतांत जाणवते त्या गीतांत देखील ते सूक्ष्म बदल करीतच असतात. परंतु कदाचित आशय-सुरावट यांच्या दरम्यान एक अतूट नाते असते, यावर त्यांचा गाढा विश्वास असावा.
खैय्याम यांना खरी अमाप लोकप्रियता मिळाली ती "उमराव जान" चित्रपटाच्या संगीताने. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च अढळ असे स्थान. त्यामुळे गझल हे त्यांचे मर्मस्थान होय, असे विधान करता येऊ शकते. एक प्रकारची तीव्र अकर्मण्यता किंवा अक्रियाशीलता, काहीतरी मूल्यवान हरपले आहे याचे दाट दु:ख आणि संयमित शृंगार या आणि अशा भावतरंगाना त्यांचा अंगभूत प्रतिसाद असतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे, या चित्रपटातील गाण्यांत छेडण्याच्या वा गजाने ध्वनित होणाऱ्या वाद्यांचा आवाहक वापर आहे. त्यामुळे मुजरा नृत्ये असूनही त्यात एक आदबशीर शृंगार अवतरलेला आहे. "दिल चीझ क्या" या गीतांत बिहाग रागातील भावस्पर्शी सुरावट आढळते. "इन आँखो की मस्ती" या गाण्यात तर भूप रागाचा तिरोभाव अतिशय मनोरमपणे सादर केला आहे. असाच प्रयत्न त्यांनी "जिंदगी जब भी" या गीतात गौडसारंग रागापासून दूर सरकत साधला आहे. सांगीतदृष्ट्या प्रदर्शन न करता, आमच्या कर्तृत्वाकडे पहा असे गर्जून न सांगता ही गीते आपला भाव-परिणाम सिद्ध करतात. मानसिक किंवा भावनिक आशयाबरोबर हातात हात घालून चालू शकेल असा सांगीत अवकाश निर्माण करा, अशी गझलची मागणी असते. त्याचा नेमका प्रत्यय या स्वररचनेतून अनुभवायला मिळतो.
मोजका वाद्यमेळ आणि संयत गायन, याच्या साहाय्याने रचनासंबद्ध निश्चितता सादर करण्याची कामगिरी सर्वांनाच जमत नाही. खैय्याम यांना ते जमले आहे याचा सहज प्रत्यय येतो आणि हेच खैय्याम यांचे खरे यश.

Tuesday 15 May 2018

कविता - मी माझ्या कवितेकडे………

तसे बघायला गेल्यास, प्रत्येक कवी हा आत्मकेंद्रित, स्वभावात: आत्ममग्न असतो अन्यथा त्याशिवाय कवितेची प्रक्रिया पुरी होणे अवघड आहे. भावकवितेच्या संदर्भात विचार करता, हे फारच निकटतेने अनुभवायला मिळते. याच दृष्टीने आपण, भावकवितेचे स्वरूप बघण्याचा प्रयत्न करुया.
जीवनात अनेक अनुभव येत असतात, त्यांतील काही संवेदनाद्वारे स्वत:ला आलेले, काही कल्पनेने जाणलेले तर काही वैचारिक स्वरूपाचे असतात. परंतु यांपैकी एकाच्या किंवा सर्वांच्या मधून मिळालेल्या अनुभवांचा एकात्म आणि अर्कभूत परिणाम म्हणून जी भाववृत्ती निर्माण होते, तिच्याशीच केवळ भावकवितेला कर्तव्य असते. ही भाववृत्ती एक मानसिक स्पंदन म्हणून आपणांस जाणवते आणि हे स्पंदन वर उल्लेखिलेल्या साऱ्या अनुभवात्मक घटकांच्या विशिष्ट गती, दिशा, वजने आणि लय, यांमुळे निर्माण होणारे जे अंतर्गत ताण असतात, त्यांतून जाणवत असते.
एखादा अनुभव हा कोणत्या तऱ्हेने घेतला गेला त्यावर त्याची सारी गुणवत्ता अवलंबून असते, आणि त्यामुळे या भाववृत्तीचे अनुभवाच्या क्षणाशी एक अभेद्य असे नाते असते. या सर्व ताण, अनुभवाचा क्षणासहित जर रसिकाच्या मनात जागृत झाला तर त्या क्षणाच्या जाणीवेतून मग कवीला जाणवलेल्या भाववृत्तीचा अनुभव रसिकाला देऊ शकतो. म्हणूनच, एखाद्या विशिष्ट भाववृत्तीने भरलेल्या क्षणांच्या स्पंदनाचा "आभास" निर्माण करणे, हे भावकवितेचे खरे कार्य!! आणि हा जो आभास आहे, जी कविता जीतल्या चांगल्या रीतीने निर्माण करू शकेल तितक्या प्रमाणात तिची गुणवत्ता, असे म्हणता येईल.
आरतीप्रभूंची कविता, वरील विवेचनाशी फार जवळचे नाते सांगते.
सुरवातीला मी जे म्हटले होते, त्याप्रमाणे ही कविता, एका आत्ममग्न क्षणाचे आणि त्याचबरोबर आशय अभिवृद्ध करणाऱ्या अनुभूतीची सुंदर बंदिश आहे, कविता, मुक्तछंदात आहे, हे एका दृष्टीने योग्यच आहे. छंदोबद्ध कवितेत सगळे ताण अनुभवता येत नाहीत, असे म्हणायचे नाही परंतु ज्या कवितेची प्रकृती अति आत्ममग्न आहे, त्या वृत्तीला मुक्तछंदात आवश्यक तितके स्वातंत्र्य मिळते. त्यातच संवेदनाविश्व आणि भाववृत्ती यांच्या एकात्मतेचे सूत्र सापडते. शब्द, शब्दांची विशिष्ट प्रकारे केलेली गुंफण, यांच्यातून आणेल लय त्यांनी सादर केले आहेत.
"या माझ्या अजाण कवितेचा अपमान
कां करतां बाबांनो - कां?
प्रेम हवय का या कवितेचं?
मग ते मागून मिळणार आहे का तुम्हाला?
खूप काही द्यावं लागेल त्यासाठी. "
इथे मी आपल्या सोयीसाठी खंड पाडून विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे. एका बाजूने अभंग असा आत्मविश्वास तसेच दुसऱ्या बाजूने थोडीशी दटावणी, अशा संवादी पातळीवर ही कविता सुरु होते.
एखादा संवेदनानुभव निकटतेने प्रतीत करायचा, त्यात रंग भरायचे आणि तो स्थित होत आहे, असे वाटत असताना(च) त्याला किंचित धक्का देऊन, ही स्थिरता भाववृत्तीवर तोललेली आहे, असे दाखवायचे, हेच सूत्र इथे दिसते.
"काय काय द्याल?
आत्म्याची बाग फुलवता येईल तुम्हाला?
पण त्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मा
तुमच्याच तळहातावर
एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल,
पण त्यासाठी तुमचे हात तुम्हांला
चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील.
कराल?"
हा रसिकांशी साधलेला संवाद खरा पण, त्याचबरोबर ती कविता समजून घेण्यासाठी, जो आत्मविश्वास आणि त्याच्या जोडीने आलेला थोडा मग्रूरपणा, याचे सादरीकरण आहे. परंतु त्याचबरोबर "स्वातीच्या थेंबाची" तरल कल्पना देखील उपयोगात आणली आहे. आरतीप्रभूंच्या कवितेचे हे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल, एका बाजूने कवितेची प्रकृती "अळुमाळू" ठेवायची पण दुसऱ्या बाजूने ती कविता स्वीकारण्यासाठीची मोजावी लागणारी किंमत देखील दाखवावी लागते. विशेषत: "नक्षत्रांचे देणे" या काव्यसंग्रहातील कविता वाचताना, ही जाणीव मनातून बाजूला सारणे सर्वथैव अशक्य!!
एखादी अगदी मंद लयीतील प्रतिमा निर्माण करायची आणि त्याचबरोबर, तिच्यावर जाणीव हेलकावयाला लागली की, तिच्यात अनपेक्षित द्रुत लय मिसळायची आणि या धक्क्यातून परिणाम साधायचा. भावकवितेचे हे देखील आगळे वैशिष्ट्य मानता येईल.
"माझ्या कवितेपासून मीही, तिच्याजवळ असून,
दूर असतो
भीत भीत स्पर्श करतो तेंव्हा तिचे डोळे
पाणावल्या सारखे चमकतात.
डहळून जातात त्यांतले रानचिमणे विभ्रम.
ती एका पोक्त कलेने प्रौढ होते.
या कवितेच्या मुलायम केसांवरून
सरकून जातात श्यामघनांतले मंद संधिप्रकाश.
वाटत की ती आताच उभीच्या उभी
निसटून जाणार आहे
दोन आर्त स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गात.
स्पर्श करतांना अजूनही मी तेवढा शुद्ध नाही
एखाद्या बुद्धाच्या जिवणीवरील उदासीन हास्यासारखा."
इथे देखील प्रतिमा कशा आशयाशी नाते सांगत आहेत. मनातील भावस्पंदने ही नेहमीच तात्कालिक असतात परंतु त्या तात्कालीकतेत देखील किती अर्थपूर्ण आशय मांडता येतो, हे आपल्याला किती अप्रतिमपणे बघायला मिळते. प्रतिमांची एकदम उलटापालट करायची, एका प्रतिमेचा परिणाम दुसरीने पुसुन टाकायचा. दोघींच्या अशा मिश्रणातून, तिसरीच प्रतिमा निर्माण करायची आणि या बदलत्या घटनांतून, भाववृत्तीचा क्षण साकार करायचा!!
अशा विविध आणि संपन्न तऱ्हांनी घडविलेल्या सौंदर्यात्मक बंदिशीतून आरतीप्रभू संवेदनाविश्व आणि भाववृत्ती यांचा अनोखा संयोग साधतात.
" या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका
कारण ती ज्या वाटा चालते आहे
त्या आहेत तिच्या स्वत:च्या नागमोडी स्वभावांतून स्फुरलेल्या.
मोडून पडाल!!
तिच्या नावाचा जप करायचा असेल तर
त्यासाठी तुम्हांला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे
रुद्राक्षमणी ओवून
जपमाळ करावी लागेल
आणि श्वासनि:श्वासांचा करावा लागेल कमंडलू;
पसरावे लागेल संज्ञेचे व्याघ्रचर्म.
आहे तयारी?"
भाववृत्तीतील अनुभवाचे घटक जेंव्हा एकमेकांशी संबद्ध होतात, तेंव्हा त्यांना आत्मकेंद्रित करणारे जे एक सूत्र असते, ते त्या भाववृत्तीचे स्पंदन, या स्पंदनाचा लय म्हणजे त्या भाववृत्तीचा लय. हा लयच भावकवितेला भावकविता बनवतो. वरील ओळी जर थांबून, विश्रांती घेत वाचल्या तर आपल्या ध्यानात येईल, इथे अनेक प्रतिमा एकत्रित आल्या आहेत परंतु त्यामागे, एक सूत्र आहे - माझ्या कवितेची किंमत!! मग, त्यासाठी प्रतिमा म्हणून अर्वाचीन काळातील संदर्भ आणून, त्या शब्दांचा केलेला वापर आणि त्यातून साधलेला आशय आणि आशयाच्या घडणीसाठी निर्माण केलेली शब्दांचीच घट्ट वीण. कवितेच्या ओळी वाचताना, वाचकाचे लक्ष सतत केंद्रीभूत करण्याची फार मोठी गरज असते आणि त्यासाठी मग, प्रतिमांचा वापर करून, आशयाची अभिव्यक्ती अधिक संपन्न करायची, हा खेळ आरतीप्रभू फारच बहारीने करतात.
"जा आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने;
तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा,
मगच पहा तिच्याकडे डोकें वर उचलून.
ती भोगतेय जें जें कांही त्यांतल्या तिळमात्र वेदना
तुम्हांला सोसायच्या नाहीत."
कवितेची भाषा स्पष्ट, सरळ आणि समजायला सोपी आहे. मुळात भावकाव्य हे स्वभावत:च वैय्यक्तिक अनुभवांची विशिष्टता शोधत जाणारे काव्य असते. असे असले तरी आरतीप्रभूंची कविता वाचकाला, वैय्यक्तिक अनुभवाची अत्यंत निकाताची अशी प्रचीती देऊ शकते. इथे तशी वाच्यार्थाने आढळणारी दुर्बोधता चुकुनही आढळत नाही. एखादा अनुभव काव्यरूप घेतो, तेंव्हा तो कवीच्या जाणीवेपासून मुक्त झाल्याखेरीज स्वत:चे रूप घेऊन, स्वत्वाने उभा राहू शकत नाही. वैय्यक्तिक जीवनाशी असलेली नाळ तोडणे गरजेचे असते आणि इथे त्याचाच अनुभव सतत येत आहे.
"मी स्वत: पाहातोय स्वत:च्याच कवितेला
एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेऊन."
कुठल्याही कलाकृतीचा शेवट हा नेहमीच थोडा अनपेक्षित असला तर वाचकाला देखील विस्मय वाटून, त्या कलाकृतीबद्दल मनात आकर्षण निर्माण होते. सगळी कविता, कवितेच्याच अंगाने वाचत असताना, शेवट मात्र एकदम अंगावर येतो आणि वाचक स्तिमित होतो - खानोलकरांच्या अगोचर प्रतीमासृष्टीप्रमाणे!!

Monday 7 May 2018

अरुण दाते

अरुण दाते यांचे नुकतेच निधन झाले असल्याकारणाने त्यांच्याबद्दल तटस्थपणे लिहिणे थोडेसे अवघड होणार आहे पण तरीही त्रयस्थपणे लिहिण्याचा प्रयत्न राहील. या लेखात गायक म्हणून अरुण दात्यांचे वैशिष्ट्य आणि मर्यादा देखील , याचे विवेचन करणार आहे. एक तर बाब स्पष्ट आहे, कुठलाही कलाकार/ गायक घेतला तरी तो एका विशिष्ट परिप्रेक्षातच लक्षणीय असतो. त्याच्या कलेला मर्यादांचा परीघ नेहमीच असतो. बरेचवेळा याच गोष्टीचे भान विसरले जाते आणि कौतुक करण्याच्या प्रयत्नात वाहवले जातात. अरुण दात्यांचा आवाज कसा होता, हे आपण मूल्यमापनाच्या संदर्भात लक्षात घेतले म्हणजे मग त्यांनी गायलेल्या गाण्याचे यथायोग्य विश्लेषण करता येऊ शकेल. आवाज काहीसा रुंद पण ढाला म्हणता येणार नाही. त्यात एक सूक्ष्म ध्वनिकंप आहे. त्यामुळे सादरीकरणात खास भावपूर्णतेचा स्पर्श निर्माण करणे चांगले जमले. आवाजातील कंपामुळे काही वेळा स्वर लागावं थरथरता वाटलं तरी गायन सुरेल नक्कीच म्हणता येईल. स्वरकेंद्रापासून ढळणे हे काही वेळा फायद्याचे ठरले. छोट्या स्वरसमूहांची द्रुत फेक त्यांचा आवाज सक्षमतेने करतो. बरेचवेळा आवाजाच्या गतीचे वर्णन भारदस्तपणे संथ असे करता येईल. काही गीतांच्या संदर्भात ज्याला "अप्पर रजिस्टर" म्हणता तो लागावं वापरून गती साधली आहे परंतु ते रजिस्टर नीट विकसित झाले आहे, असे म्हणवत नाही. गायकास स्वरेलपणाची योद्धा आहे आणि पुष्कळ रचना सादर करताना, त्या सादरीकरणात भरीव फेक जमली असे सार्थपणे म्हणता येते.
आणखी एक वैशिष्ट्य निश्चितपणे मांडता येईल. आवाज कोमलमधुर, अंत:स्पर्शी, अंतर्मुख, काहीसे उदास आणि अनाक्रमक असे गायन आहे. बालपण इंदोर सारख्या सरंजामी वातावरणात गेल्याने तसेच बालपणी कुमार गंधर्वांसारख्या अनोख्या गायकाखाली मार्गदर्शन मिळाल्याने, गायनात भारदस्तपणा येणे, हा योगायोग निश्चित म्हणता येणार नाही. एक बाब निश्चितपणे मांडता येईल. अरुण दात्यांनी आपला गळा ओळखला होता आणि त्या जातकुळीला ओळखूनच त्यांनी आयुष्यभर गायन केले. आवाजाला निश्चित मर्यादा होत्या. मघाशी मी म्हटल्याप्रमाणे मूल्यमापन करताना आपल्याला दोन परिप्रेक्षा ध्यानात घ्यायला हव्या. १) सामाजिक-सांस्कृतिक, आणि २) सौंदर्यशास्त्रीय. आता सांस्कृतिक नजरेतून बघायचे झाल्यास, वर निर्देशित केल्याप्रमाणे आवाजाला मर्यादा होत्या त्यामुळे गाण्यांमध्ये विस्तृत अशी विविधता नव्हती. तशी विविधता दाखवणे हा त्यांच्या गळ्याचा धर्मच नव्हता. त्यामुळे जनसंगीतात अवतरणाऱ्या धर्मसंगीत किंवा लोकसंगीत, या कोटींतील गायन जवळपास अशक्य असे होते.
ललित संगीतात असा तर-तम भाव ठेवणे आणि राखणे, ही एक मर्यादा असते. अरुण दात्यांनी ही मर्यादा कायम पाळली. अर्थात आणखी वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास, आपण कशा प्रकारची गीते गाऊ शकतो , याचा नेमका अंदाज अरुण दात्यांना होता आणि त्याच्याशी त्यांनी अपवादस्वरूप रचना वगळता फारशी प्रतारणा केल्याचे आढळत नाही.
आता सौंदर्यशास्त्राच्या नजरेतून बघितल्यास, आवाजातील तारता पल्ला फार विस्तृत असा नव्हता, संपूर्ण सप्तक आवाक्यात घेता येईल अशी जातकुळी नव्हती. त्यामुळे गळ्याला सर्व दिशांनी चपलगती चलन अशक्य!! याचाच परिणाम असा झाला, गायन करताना, छोट्या हरकती, काही खटके इतपतच सांगीतिक अलंकार गायनात विशेषत्वाने आढळतात. आणखी एक मर्यादा अशी सांगता येईल, शास्त्रोक्त रागांवरील रचना गाताना, काहीसे अडखळणे क्रमप्राप्तच होते. परंतु गायन करताना, काव्यातील आशय नेमका ओळखून तो आशय अधिक अंतर्मुख करण्याची हातोटी समृद्ध होती. वर निर्देशित केल्याप्रमाणे आवाजातील सूक्ष्म कंप, भावगर्भ कवितेतील आशयवृध्दीसाठी नेहमीच उपकारक ठरला.
आता या पार्श्वभूमीवर ५०, ६० वर्षांपूर्वी गायलेले आणि आजही लोकप्रिय असलेले "शुक्रतारा मंदवारा" हे गाणे विचारात घेता येईल. यमन रागाशी नाते जोडणारी स्वररचना, त्यामुळे चालीत सहजपणे अंतर्भूत असलेला गोडवा!! मुळात खळेकाकांच्या चाली या नेहमीच "गायकी" अंगाकडे वळणाऱ्या असतात त्यामुळे सत्कृतदर्शनी सहज, सोपी वाटणारी चाल, प्रत्यक्षात फार अवघड असते. गायकाला त्याबाबतीत फार दक्ष राहावेच लागते. केवळ प्रत्येक ओळ नव्हे तर प्रत्येक शब्द, अक्षर हे फार गुंतागुंतीच्या स्वरचनेने भारलेले असते. अशी स्वररचना गाताना, गायकाची परीक्षाच असते. मंगेश पाडगांवकरांची गेयताबद्ध समृद्ध शब्दकळा!! "लाजऱ्या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जीवा" सारखी अति तरल ओळ गाताना, ठाय लय तर सांभाळावीच लागते पण त्यापलीकडे जाऊन, "लाजऱ्या" शब्दातील "लाजरेपण" ठळकपणे दर्शवावे लागते. प्रणयाची काहीशी धीट पण त्याकाळानुसार असलेली संयत भावना हेच या गाण्याचे संपूर्ण असे वैशिष्ट्य आहे आणि तेच वैशिष्ट्य गाताना अरुण दात्यांनी औचित्यपूर्णपणे सांभाळले आहे.
कवितेतील नेमका भाव हेरून, त्याची स्वरिक आशयवृद्धी करणे, हेच अरुण दात्यांच्या गायकीचे व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. "डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी" या मारवा राग सदृश स्वररचनेत गायन करताना, अरुण दात्यांनी हेच भान दाखवले आहे. कवितेतील व्याकुळ भावना व्यक्त करताना, अनाक्रोशी संयत गायकीचा मानदंड निर्माण केला. एकेकाळी अरुण दात्यांवर "मराठीतील तलत मेहमूद" असा काहीसा हेटाळणीचा आरोप केला गेला होता. अर्थात सुरवातीला त्यांची शैली याच गायकाची आठवण करून देणारी होती, यात संशय नाही "सखी शेजारिणी" सारख्या गाण्यांत हा प्रभाव स्पष्ट दिसतो. परंतु लवकरच त्या प्रभावातून स्वतः:ला मुक्त करण्याची किमया दाखवली आणि मराठी भावगीतांत आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवली. दुसरा विशेष सांगता येतो आणि तो म्हणजे गायनातील प्रसन्न असा "प्रसाद गुण". केवळ व्याकुळ करणारीच गाणी नव्हेत तर "पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची" सारख्या लयीला अवघड असणाऱ्या स्वररचनेत ही बाब विशेषत्वाने ध्यानात येते. प्रणयी थाटाचे गाणे तर कुठेही उथळ, उठवळपणा नाही. अर्थात हे खळे काकांच्या संगीतरचनेचे देखील खास लक्षण मानता येईल आणि हेच लक्षण अरुण दात्यांच्या जातकुळीला शोभले. ज्या आवाजात प्रसादगुण असतो त्यामुळे त्यातून किंवा त्याद्वारे सादर होणारे संगीत श्रोत्यांना थेट, लगेच (कालविलंब न होता) आणि मूळ संगीतातील सर्व वा प्रमुख गुणांचा अजिबात अपभ्रंश न होता - किंवा तो कमी प्रमाणात होऊन - पोहोचते. ही कामगिरी निश्चितच सहज जमणारी नव्हे.
ललित संगीतातील गायक असे म्हणताना, ज्या मर्यादा त्यांच्या गळ्याला होत्या, त्याचा उल्लेख वर केला आहेच पण तरी आणखी एक विधान नक्कीच करता येईल. जरी संख्येने त्यांची गीते कमी भरली तरी बहुतेक सर्व गाणी उच्च दर्जाची आहेत!! हे प्रमाण इतर गायकांच्या बाबतीत लक्षात घेता विलक्षण आहे. इंदोरी सरंजामी व्यवस्थेचा परिणाम असेल किंवा घरातील उच्च अभिरुचीचा परिणाम असेल पण, आपण जी गीते गायची त्यांच्या संहितेबाबत अरुण दाते फार चोखंदळ होते. दुसऱ्या शब्दात, आपण जी गीत म्हणून गाणार आहोत, त्याचा कविता म्हून काही विशेष दर्जा असायलाच हवा, असा जवळपास आग्रह होता की काय? असा संशय घेता येतो. अर्थात याचा परिणाम असा झाला, गायलेल्या गीतांतील कवितेचा दर्जा समृद्ध असायचा. स्वररचना वगळून, कागदावर शब्द मांडले तर त्या कवितेचा स्वतंत्रपणे अभ्यास करता येईल, अशीच शब्दकळा असावी, हाच उच्च अभिरुचीचा प्रभाव म्हणता येईल. इथेच अरुण दात्यांचे व्यक्तित्व फार वेगळे ठरते.
गेली काही वर्षे त्यांनी गायन जवळपास सोडलेच होते. त्यांच्या बहराच्या काळानंतर ज्या प्रकारचे संगीत अवतरले, त्या शैलीत सुरावट, संथ गती आणि नाजूक प्रक्षेपण यांना जागा नव्हती. असेही म्हणता येईल, काहीसे पाश्चात्य, उडत्या स्वभावाचे संगीत आणि लयबंध अरुण दात्यांना मानवले नसावेत. अर्थात काळाच्या या बदलाची अचूक जाण ठेऊन त्यांनी गाणी गायचे थांबवले, हे देखील त्यांच्या सुसंस्कृत, संयत स्वभावाला साजेसेच होते. उच्च अभिरुची सगळ्यांनाच मानवते किंवा परवडते असे नाही त्यामुळे तशी कला निर्मिती ही नेहमीच दुर्मिळ असते. आपण काय आणि कसे गाणार आहोत, याची अचूक जाण असलेल्या काही मोजक्याच गायकांपैकी एक असे अरुण दाते होते आणि हेच त्यांच्या गायकीचे खरे वैशिष्ट्य मानायला हवे.