Thursday, 19 June 2014

जी.ए.कुलकर्​णी



आतापर्यंत, मराठीतील एकूणच गद्य लेखकांचा आढावा घेतला तर, जी.ए.कुलकर्णी यांचा नि:संशयरित्या फार वरचा नंबर लागावा. कारणे अनेक आहेत, पण इथे आपण, त्यांच्या लेखनातील वैशिष्ट्यांचा, भाषेचा, रचना कौशल्याचा आणि त्यांनी “कथा” या लिखाणात केलेल्या विविध प्रयोगांचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करूया.
फार मागे एकदा, प्रख्यात अनु साक्षेपी संपादक यांनी, त्यांच्या प्रतिभेचे वर्णन करताना, “जी.ए.कुलकर्णी यांनी, दु”खाच्या गवाक्षातून कथा लेखन केले” असे म्हटले होते. एकूणच, आकारमानाने बघता, या लेखकाने, आयुष्यात, “सांजशकुन” पासून ते “काजळमाया” पर्यंत, जवळपास सात ते आठच कथासंग्रह लिहिले. यात मी,”माणसे-अरभाट आणि चिल्लर” या पुस्तकाचा समावेश करीत नाही, कारण ते पुस्तक, त्यांच्या मृत्युनंतर प्रसिद्ध झाले. या लेखकाने, जरी, “कथा” हाच सर्वश्रेष्ठ गद्य अविष्कार असे म्हटले नसले, तरी त्यांच्या साहित्यावर वरवर जरी नजर फिरवली, तरी या लेखकाने आयुष्यभर “कथा” याचाच आधार घेतलेला आहे. कथेशिवाय, इतर कुठलाही साहित्य प्रकार हाताळलेला दिसत नाही. त्यांच्या कथाबाबत, एक आक्षेप घेतला जातो, व तो म्हणजे, त्यांच्या काही दीर्घ कथा, या लघु कादंबऱ्याच आहेत. अगदी, या टीकेचा जरा खोलात जाऊन विचार केला तर, असे दिसेल की, साहित्याच्या शास्त्रात, कुठेही “लघु कादंबरी” आणि “कथा” याची नेमकी व्याख्या केलेली आढळत नाही. किंबहुना, “कादंबरी” “लघु कादंबरी” “दीर्घ कथा” वगैरे वर्गवारी हीं आपण, आपल्या सोयीनुसार केलेली आढळते. पु. शि. रेग्यांची, “सावित्री” हीं दीर्घ कथा म्हणता येईल, इतपतच व्याप्ती असताना, आजही मराठीतील एक सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून उल्लेख होतो. तेंव्हा पण या वर्गवारीत फार खोलात न शिरता, जी.ए.कुलकर्णी – एक कथालेखक, याच दृष्टीकोनातून विचार करूया.
जेंव्हा, त्यांच्या कथा आणि कथेतील व्यक्तिरेखा, असा विचार करता, एक गोष्ट सतत ध्यानात येते व ती म्हणजे, या माणसाने, सतत माणसाच्या आयुष्यातील दु”खाचेच अतिशय गडद चित्रण केले आहे. मला वाटत, त्यांच्यावर असलेला, दोस्तोवस्की अनिल युजीन ओनील, यांच्या लेखनाचा प्रभाव(त्यांच्या पत्रांचे जे खंड नंतर प्रसिद्ध झाले, त्यावरून मी हे अनुमान काढीत आहे) अधिक जाणवतो. साहित्यात आतापर्यंत, मानवी दु”खाचे चित्रण असंख्य वेळेला वाचायला मिळते. प्रत्येकजण, आपापल्या कुवतीनुसार निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांमधून, दु:खाच्या विविध छटा वाचायला मिळतात. तरी देखील, या लेखकाने जे सतत, दु”खाचे चित्रण केले आहे, ते खरोखर अपूर्व असेच आहे.
जी.ए.च्या कथा अति दु”खमय असतात, हे एक अर्धवट विधान झाले. तास पाहिलं गेल्यास, मराठीतील बहुतेक गद्य साहित्य हे असे नाही तसे, दु:खाच्या पदराला धरूनच लिहिले गेले आहे. प्रश्न आहे तो, जे अटल आहे, त्यामुळे आपण सतत फरफटत राहतो, त्याचे अत्यंत जिवंत आणि सूक्ष्म चित्रण, या लेखकाच्या साहित्यात वारंवार आढळते.
जी.ए, च्या कथेत कधीही पहाट फुलत नाही, वाचताना, वाचक सतत एका तणावाखाली वावरत असतो, नियतीचा अगम्य खेळ अवलोकित असतो. या लेखकाच्या कथा वाचताना, सतत, नियती म्हणून एक कुठलीतरी शक्ती आहे, आणि तीच सगळ्यांच्या हालचालीचा, विचारांचा ताबा घेत असते. अखेर, नियती म्हणजे काय? नियती आणि नशीब हे शब्द म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की काय? नियती नेहमी माणसाला हताश आणि फरफटवित असते का? नियतीपासून कुणीच सुटलेला नाही का? जगात काही व्यक्ती, आपण “नियती” घडवू अशा धाडसाने वावरीत होत्या आणि अजूनही आहेत पण अखेर आयुष्याच्या एका बिंदूवर, त्या व्यक्ती कोलमडून पडलेल्या दिसून येतात. म्हणजे, नियती सार्वभौम आहे की काय? हे आणि असे अनेक प्रश्न, या लेखकाच्या कथा वाचताना आपल्याला पडतात. वाचक कधीही, जी.ए.च्या कथा वाचताना, मोकळा श्वास घेऊ शकत नाहीत, नव्हे हा लेखक तसा वाव देखील देत नाही. सतत, वाचताना, आपण, एका दडपणाखाली वावरत असतो. वाचतानां त्यातील रहस्यमय गोष्टीनी, आपले मान गुंतत जात असते आणि नियतीचा अलौकिक खेळ बघून सुन्न होऊन जातो.
यांच्या कथेत सतत, करडा, राखाडी, काळा हेच रंग बघायला मिळतात. कुठे, रखरखीत माळ, तर कुठे भग्न देऊळ, तर कुठे गावाच्या बाहेर हिरव्या वेलींच्या गुंतवळ्यात अघोरी वाटणारे तळे, कळ्या पाण्याची गूढ अशी विहीर, अशीच कथेतील स्थळे असतात. त्यामुळे, कथा पहिल्यापासून सतत, अशाच वातावरणात पुढे सरकत असते. जी.ए.च्या कथेत, विनोद जवळपास नाहीच, नव्हे लेखक तशी नेमकी काळजी घेतो. कुठेतरी, विनोद आढळतो पण एखादी कवटी हातात घेतल्यावर अचानक तिने आपले दात विचकावेत त्याप्रमाणे अंगावर शहारा उठवीत!! एखाद्या चित्त्याने पावले दबकत आपल्या भक्ष्यावर झडप टाकावी त्याप्रमाणे, जी.ए. आपल्या कथेचा विस्तार करतात. इथे रहस्य तर ठायी ठायी आढळते. साधारणपणे, अशी रहस्यमय कथा एकदा वाचली, परत वाचताना, त्यातील रहस्य उमगल्यामुळे वाचनाचा आनंद कमी होतो, पण जी,ए,च्या कथा परत वाचताना, जरी शेवट माहिती असला तरी, कथेची घडण, भाषेचे अनुपमेय सौंदर्य, आणि वापरलेल्या प्रतिमा आपले लक्ष विचलित करीत नाहीत आणि या लेखकाचे प्रमुख यश म्हणावे लागेल.
प्रतिमांच्या बाबतीत तर, हा लेखक अतिशय “श्रीमंत” मनाला जावा. कधी कधी, काही कथेत त्याचा अतिरेक होतो आणि कथावस्तू बाजूला राहून, त्या प्रतिमाच मनात रेंगाळत राहतात. हा, लेखकाच्या हव्यासाचा परिणाम. परिणामी, त्या कथा डागाळतात. “नाग” हीं अशी एक कथा मला इथे आठवते. कथेत, नागाबद्दलच्या सगळ्या कल्पना, समज, गैरसमज अगदी तंतोतंत वाचायला मिळतात, वाचक, त्या प्रतिमेतच अडकला जातो पण, अखेर “आबाजी” चे वैफल्य आणि हताशता पूर्णपणे साकार होत नाही. इथे आणखी एक बाब विशेषत्वाने मांडली पाहिजे. जी.ए.च्या कथेत प्राणीजगत फार सूक्ष्मपणे वाचायला मिळते, किंबहुना इथले प्राणीजगत कथेच्या संदर्भात स्वतंत्र व्यक्तीमत्वाने झळकत असते. कुठे, निळा टचटचीत किडा असतो, तर कुठे खडकाखाली अचानक सापडणारे नागाचे वेटोळे असते, तर कुठे गायीचे अस्तित्व कथेभर पसरलेले असते. मराठी कथा साहित्यात, इतक्या सूक्ष्मपणे प्राणीजगत फारसे आढळत नाही. कथेतील नियतीच्या अतर्क्य खेळात, हे प्राणीजगत इतके सामावलेले असते की, आपले मन त्या रचनेतच गुंतून जाते.
अर्थात, ह्या गोष्टी झाल्या, त्यांच्या कथा साहित्याच्या जमेच्या बाजू. दु:ख जरी अटळ असले तरी माणूस काही सदासर्व काळ, त्याच्या सावलीत वावरत नसतो. प्रियकर/प्रेयसीचे केवळ नजरेतून साधले जाणारे अबोध आणि नि:शब्द संवाद, लहान मुलाशी साधला जाणारा तितकाच असामान्य बोलका अविष्कार, ह्या गोष्टी देखील आपल्या आयुष्यात तितक्याच महत्वाच्या असतात. पण अशा बाबींना, जी.ए.च्या कथेत अजिबात स्थान दिसत नाही. तसेच, विशेषत: त्यांनी रंगविलेल्या स्त्रिया या, एकतर, सतत सोशीत राहणाऱ्या, हताश, नियतीशरण भावाच्या आहेत किंवा अत्यंत उठवळ, छचोर आहेत. हे दोनच रंग त्यांच्या कथेत प्रामुख्याने आढळतात. त्या पलीकडे देखील स्त्री अस्तित्वात असते, हे जणू जी.ए. अजिबात ध्यानात घेत नाहीत. त्यांच्या कथेतील स्त्री कधीहीं बंड करून उठत नाही की स्वत:ची ठाम मते फारशी मांडताना दिसत नाही. जी काही मते मांडतात, ती त्या हताशतेतून उद्भवणाऱ्या भावनेतूनच बोलतात.
असे असले तरी, त्यांनी जो मार्ग स्वीकारला, त्या मार्गावरील व्यक्तिरेखा कधीही भावविवश होताना दिसत नाहीत, जो प्रकार आपल्या मराठी साहित्यात खूप वेळा आढळतो. अगदी चिकट गोन्दाप्रमाणे, इतर कथांमध्ये भावनांचे ओक्साबोक्शी चित्रण बरेच आढळते. जी.ए. व्यक्तिरेखा निर्माण करताना, भले ती व्यक्ती मोडून पडणारी असेल, आपण कधीही आक्रस्ताळी होत नाही. आलेली परिस्थिती स्वीकारून, त्यातून मार्ग काढण्याचा असफल प्रयत्न करीत राहते. मार्ग काढताना, बरेचदा भोवऱ्यात पाय सापडून, त्या भोवऱ्यातच गटांगळ्या खात असते. आणि शेवटी अटळ अशा मरणाला सामोरी देखील जाते. इथे मला, आरतीप्रभूंची एका कवितेतील काही ओळी आठवल्या.
“घुमावयाचे गगन खोलवर,
तिथे चिमुटभर घुमते गाणे,
तुटते चिंधी जखमेवरची,
आणिक उरते संथ चिघळणे!!”
अगदी अशीच अवस्था जी.ए.कथेतील व्यक्तिरेखा वागत असतात, सतत, होणारे दु:ख आणि त्यातून चिघळणारी वेदना,हेच त्यांच्या आयुष्याचे एकमेव सूत्र आढळते. तरी, देखील ज्या दु:खाची इतकी खोलवर प्रतवारी आपल्याला दिसते, ती मात्र खरोखरच अपूर्व अशी आहे. मराठी माणसाला अशा अंधारी जगाचे इतके विलोभनीय दर्शन या पूर्वी फार अभावानेच वाचायला मिळाले. नियतीचा अगम्य खेळ आणि शरणता, याचा अप्रतिम संगम जी.ए.च्या कथेत वारंवार वाचायला मिळतो.
नंतरच्या काळात, ह्या लेखकाने अद्भुततेचा जो आसरा घेतला आणि ज्या प्रकारे कथेने एक वेगळे वळण घेतले, त्याला मराठी कथा साहित्यात तोड नाही. ते जगावेगळे प्रदेश, तिथली जगावेगळी माणसे, एका अलौकिक शोधापायी आयुष्य होरपळून घेणाऱ्या व्यक्ती, सगळे काही मराठीत मला वाटत, प्रथमच अवतरले. भाषेची सघनता, जटिल रचना कौशल्य, प्रतिमांचा असामान्य वापर आणि त्यातून जाणवणारी लेखकाची आयुष्याबद्दलची एक विशिष्ट जाणीव, या दृष्टीने, “प्रवासी” आणि “विदुषक” ह्या दोन कथा केवळ अपूर्व आहेत. इतर कुण्या लेखकाने जरी या तोडीच्या दोनच कथा लिहिल्या असत्या, तर तो लेखक आयुष्यभर प्रसिद्ध पावेल. “विदुषक” सारखी कथा तर, मराठीत तर जाऊ द्या, पण इतर भाषेत तरी वाचायला मिळेल का, याबद्दल मला बरीच शंका आहे.
नंतरच्या आयुष्यात, त्यांनी ज्या कथा लिहिल्या, उदाहरणार्थ, “ओर्फीयस” , “स्वामी” यासारखी कथा तर, कवितेशी अतिशय जवळीक दाखविणाऱ्या आहेत. विशेषत: “ओर्फीयस” कथेच्या शेवटचे स्वगत तर, मुक्तछंदातील कविताच आहे. अशा काही कथांमधून, या लेखकाने, कथा हा अविष्कार, कवितेच्या फार जवळ आणून सोडला. मराठी कथा या लेखकाने फार वरच्या उंचीवर नेऊन ठेवली.

No comments:

Post a Comment