Monday, 30 June 2014

वसंतराव देशपांडे - एक झपाटलेले गाणे!!

माझ्या आयुष्यातली पहिली मैफिल, मी ऐकली ती या गायकाची आणि तेंव्हा जो या गायकीचा संस्कार माझ्यावर झाला, तो आजतगायत  कायम आहे. १९७२ साल  असावे. आईबरोबर, मी दादरच्या छबिलदास शाळेच्या सभागृहात वसंतरावांचे गाणे ऐकायला गेलो होतो. त्यादिवशी त्यांनी काय गायले, या स्मृती आता धुसर झाल्या आहेत पण, "हे गाणे काही वेगळेच आहे" इतके मात्र जाणवले. त्याआधी, मी तसे फारसे रागदारी संगीत  आणि या मैफिलीला देखील आईचा आग्रह, माझ्या आवडीपेक्षा अधिक होता!! आज या गोष्टीचे थोडे नवल वाटते. एकतर, तोपर्यंत, मी फारसा शास्त्रोक्त संगीताच्या वाटेला गेलो नव्हतो पण संगीताची आवड बहुदा आईच्या लक्षात आली होती आणि त्यामुळेच बहुदा आईने मला या मैफिलीला नेले असावे. 
त्यानंतरची आठवण मात्र,  अविस्मरणीय आहे. साल बहुदा, १९७३/७४ असावे. चर्चगेट इथल्या "इंडियन मर्चंट्स चेंबर"च्या सभागृहात, वसंतरावांची मैफिल होती - रविवार संध्याकाळी होती. साथीला आपले पु.ल. देशपांडे होते आणि हे आकर्षण वेगळेच होते. सभागृहात गर्दी खचाखच भरली होती आणि त्यावेळी या गायकाने, जसा राग मारवा गायला, तसा मारवा, अजूनपर्यंत मी प्रत्यक्ष मैफिलीत ऐकला नाही!! वास्तविक, पुढे रेकोर्डवर ऐकलेला उस्ताद अमीर खानसाहेबांचा हाच मारवा, केवळ अतुलनीय असक़ ऐकायला मिळाला आणि त्याला तर आजही तोड नाही पण, तरीही प्रत्यक्षातील स्वरांची अनुभूती काही वेगळीच अननभूत असते. त्या मिफिलीला, प्रत्यक्ष किशोरी आमोणकर आल्या होत्या. बाई, अगदी समोरच बसल्या होत्या आणि मी थोडा तिरप्या दिशेत बसला असल्याने, बाईंची "दाद" मला सहज दिसत होती. त्यावेळी देखील, किशोरी आमोणकर या "किशोरी आमोणकर"च होत्या!! 
पहिल्यांदा वसंतरावांनी कुठला राग गायला, ते आता स्मरत नाही पण, नंतर त्यांनी, मारवा गायला घेतला. जवळपास ५० मिनिटे हा राग गायला पण  ,द्रुत रचना केवळ ५,७ मिनिटांचीच!! आलापीच मुळी अर्धा तास सुरु होती. अगदी सुरवातीला त्यांनी, जो काही असामान्य "निषाद" लावला, तो आतला मृदू आणि हळुवार होता की त्याला कुठल्याही शब्दांची दाद द्यायची हिंमत झाली नाही!! किशोरी आमोणकरांच्या चेहऱ्यावर त्या स्वराची अलौकिक धुंदी पसरली होती. सहज डोळे मिटून, त्यांनी आपला उजवा हात थोडा वर घेतला आणि त्या हालचालीत, त्या "निषादाचे" सर्वस्व ओतले!! मैफिल तिथेच सिद्ध झाली. मला तर नेहमी असे वाटते, "भैरवी", "जोगिया' "मारवा" या रागातील चीजा गाताना, शक्यतो द्रुत लयीतील चीजा म्हणूच नयेत. ही राग आलापी मध्येच खरे खुलतात आणि त्याची धुंदी अवर्णनीय असते. 
अर्थात, असे काही असले तरी, तरी या गायकाची शैली ही नेहमीच अत्यंत आक्रमक अशीच राहिली. त्यांच्याबाबतीत एक आरोप नेहमी केला गेला - त्यांच्या गायकीवर दिनानाथ मंगेशकरांचा प्रभाव आहे!! पुढे, पुढे तर ते, दिनानाथरावांचीच गायकी सादर करतात, इथपर्यंत मजल गेली!! आपल्याकडे विचार किती चुकीच्या पद्धतीने  जातो, याचे हे एक उदाहरण!! जरा बारकाईने विचार केला तर असेच आढळेल, या दोन्ही गायकांचा "मिजाज" सारखा पण पुढे गायकी मात्र खूपच वेगळी आहे. या दोन्ही गायकांनी, पंजाबी शैली महाराष्ट्रात आणली आणि रुजवली पण, दिनानाथरावांची गायकी नाट्यगीतापुरती(च) बव्हंशी मर्यादित राहिली तर वसंतरावांनी ती गायकी रागदारी संगीतात आणून रुजवली!! 
एक मात्र नक्की म्हणावेसे वाटते, वसंतराव द्रुत लयीत फार रमायचे आणि तिथे त्यांच्या बुद्धीची कुशाग्रता दिसून यायची. वर मी ज्या मारवा रागातील आलापीचे उदाहरण दिले, तशी गायकी, मला देखील नंतरच्या काळात फारच कमीवेळा ऐकायला मिळाली. एकूणच गायकीचा सगळा आविर्भाव हा, " स्वर कसे माझ्या ताब्यात आहेत आणि माझ्या मर्जीनुसार ते माझ्या गळ्यातून बाहेर पडतात" अशा थाटाचा असायचा.पंजाबी शैलीचा हा वेगळा प्रभाव. अर्थात, गाण्यामध्ये बुद्धीगम्यता नेहमी दिसायची. संगीताचा अफाट व्यासंग आणि व्यासंगाचे गाण्यातून प्रत्यंतर देण्याची तितकीच अलौकिक कुवत, असे वर्णन करता येईल. गळा, पाच सप्तकात सहज फिरणारा आणि लयीचे विलक्षण बंध, स्वरांतून आविष्कृत करणारी गायकी. लयीचे तर या गायकाला "वरदान" होते, असे म्हणता येईल. गाताना, कधी कुठल्या स्वरावर "ठेहराव" घेतील आणि कधीकधी नसलेल्या स्वराचे देखील अस्तित्व दाखवून देतील, याचा नेम नसायचा. 
वास्तविक, मारवा रागात, "षडज" स्वराचे अस्तित्व जितके नाममात्र असेल तितके ठेवायचे आणि असे असून देखील, एका मैफिलीत, त्यांनी याच स्वरावर अचानक सम गाठून, याच रागाचे नवीन स्वरूप दाखवून दिल्याची अफलातून आठवण आहे. वास्तविक हा विचार त्यांना अचानक सुचला असणार पण तरीही सुचलेला विचार, चालू असलेल्या लयीत बसवून, तिथे रागाचेच वेगळे स्वरूप दाखवण्याची करामत, ते सहज करू शकत होते आणि हे केवळ याच रागापुरते नसायचे.तसे पाहिले तर आवाजाची जात "पांढरी तीन" किंवा तशाच पट्टीतील, तरीही अतिशय सहजपणे, "काळी तीन" किंवा "काळी चार" मध्ये देखील ते सहज गात असत. 
महाराष्ट्रात त्यांची गायक म्हणून प्रसिद्धी झाली ती नाट्यगीतांच्यामुळे. "कट्यार काळजात घुसली" हे त्यामानाने नंतरचे नाटक. त्याआधी, त्यांनी, "रवी मी","शत जन्म शोधिताना" ही आणि अशी गीते विलक्षण ताकदीने गाउन, आपली कारकीर्द स्थिर केली. अर्थात, आवाजाची जात, अत्यंत धारदार, विलक्षण द्रुत गतीच्या ताना घेण्याची क्षमता आणि गाताना, लयीचे बुद्धीगामी बंध निर्माण करण्याइतकी बुद्धीमत्ता, यामुळे त्यांचे गायन, रसिक लोकांच्यात लोकप्रिय होणे क्रमप्राप्तच होते. तिथेही मराठी रंगभूमीचा समग्र अभ्यास करून, त्यांनी आपली मते ठरवली होतो. पुढे त्यांनी दूरदर्शनवर "शाकुंतल ते मानापमान" असा असामान्य कार्यक्रम सादर करून, आपण काय ताकदीचा व्यासंग करू शकतो, याचे यथार्थ दर्शन घडवले. तिथेही, कार्यक्रम सादर करताना, कधीही "बाबा वाक्यं प्रमाणम" असला विचार न करता, त्याबाबत शोधक वृत्तीने अभ्यास करून, प्रत्येक नाट्यगीताची मुलस्थाने, त्यामागे, त्या संगीतकारांनी केलेला विचार , याबाबत संशोधन करून, तो कार्यक्रम सादर केला. त्यावेळी, त्यांनी मांडलेल्या ,मतांवरून बराच गदारोळ निर्माण झाला होता पण त्याने, ते अजिबात विचलित झाले नाहीत कारण, त्यामागे त्यांचे बौद्धिक अधिष्ठान होते. 
ठुमरी, कजरी, चैती, होरी या उत्तर भारतातील लोकसंगीतातून जन्मलेल्या उपशास्त्रीय संगीतातील नेमका फरक, काव्याच्या दृष्टीने, स्वररचनेच्या दृष्टीने तसेच गायकीच्या संदर्भात फरक, त्यांनी नेमक जाणला होता आणि तो फरक आपल्या गायकीतून सोदाहरण दाखवण्याची विलक्षण कुवत होती. 
अर्थात, इतका असामान्य गायक असला तरी त्यांच्या गायकीला काही मर्यादा या होत्याच. आयुष्यभर रागदारी संगीताची "कास" धरल्याने, आवाजाला थोडे "जडत्व" प्राप्त झाले होते आणि त्यामुळे, सुगम संगीत किंवा चित्रपट संगीत गाताना, या मर्यादा उघड्या पडल्या होत्या. आपल्याकडे, एक विचात्र सवय आहे, एखादी व्यक्ती एखाद्या कलेत पारंगत झाली किंवा लोकप्रिय झाली की मग, त्याचे सगळे कलात्मक आविष्कार हे असामान्य(च) असतात, असे धरून चालतात. काही उदाहरणे देतो. वसंतरावांचे "बगळ्यांची माळफुले" हे विलक्षण प्रसिद्ध झालेले गाणे. खळे साहेबांची "गायकी" अंगाची चाल आणि त्याला लाभलेला वसंतरावांचा तालेवार स्वर!! एक भावगीत म्हणून, हे गाणे डागाळलेले आहे!! हे गाणे जरा बारकाईने ऐकले तर असेच आढळेल, या गाण्यात, या गायकाची - स्वर ताब्यात ठेऊन, त्यावर स्वार होऊन गायची सवय स्पष्टपणे दिसते आणि ती भावगीताला मारक आहे. भावगीत, हे काही रागदारी संगीत किंवा उपशास्त्रीय संगीत नव्हे, की जिथे "गायकी" दाखवणे जरुरीचे असते. 
वास्तविक गाण्याची चाल अप्रतिम आहे, कविता देखील गेयतापूर्ण आहे पण सादरीकरण दोषपूर्ण आहे. गायन सुरीले आहे पण अनावश्यक ताना आणि सुरांची जातकुळी भावगीताला अजिबात शोभणारी नाही. पण, तसे बघितले तर हा दोष सगळ्या शास्त्रोक्त गायकांच्या बाबतीत अवश्यमेव दिसतो. कुमार गंधर्व (आज अचानक गाठ पदे), किशोरी आमोणकर (जाईन विचारीत रानफुला), जितेंद्र अभिषेकी (सर्वात्मका सर्वेश्वरा) रामदास कामात (सखी सांज) ही सगळी गाणी, भावगीत या संदर्भात ऐकावी. कुमार गंधर्वाचे सदोष उच्चार तसेच कुठलेही गाणे, रागदारी चीज म्हणायचा थाट. जितेंद्र अभिषेकीबुवांना शब्दांवर अकारण जोर देण्याची खोड होती, किशोरी आमोणकरांच्या गळ्यात उपजत धारदार स्वर आणि बंदिश गायची सवय तर रामदास कामतांना भावगीत, नाट्यगीताच्या अंगाने गायची सवय, असे काही ठळक दोष आढळतात. पण, पाल्याकडे काय होते, हे सगळे गायक अत्यंत लोकप्रिय, प्रथितयश असल्याने, त्यांनी काहीही गायले तरी त्यांच्या दोषांवर पांघरून टाकून, अनावश्यक कौतुक करायचे!! कुमार गंधर्वांनी सादर केलेले, "तांबे गीते,","गीत वर्षा", "मला उमजलेले बालगंधर्व" हे सगळे फसलेले प्रयोग आहेत पण आपण ते मान्य करायला तयार नसतो. 
नाट्यगीताच्या बाबतीत देखील असाच प्रकार दिसतो. एक उदाहरण देतो. "घेई छंद मकरंद" हे वसंतरावांचे अतिशय प्रसिध्द गाणे आहे आणि गायकीच्या दृष्टीने अप्रतिम आहे. मूळ चाल "धानी" रागात असून (ठाय लयीतील गाणे), आपले काहीतरी वैशिष्ट्य असावे म्हणून, या गायकाने "साळगवराळी" रागात, द्रुत लयीत हेच गाणे सादर केले. आता जरा विचार केला तर "धानी" आणि "साळगवराळी" या रागात सत्कृतदर्शनी फारसा फरक नाही, स्वर लावण्याच्या पद्धतीत फरक आहे परंतु वसंतरावांनी, आपल्या लोकप्रिय झालेल्या शैलीत गाणे गौण, अपरिमित लोकप्रियता प्राप्त केली. खरी गंमत पुढे आहे. याच नाटकातील "ललत पंचम" या रागातील, "तेजोनिधी लोहगोल" हे गाणे सर्वार्थाने असामान्य आहे. लयीला अति अवघड चाल, तालाला कठीण तरीही, वास्तव्क वसंतरावांनी फार अप्रतिम गायले आहे पण, "घेई छंद" च्या मानाने, या गाण्याला प्रसिद्धी कमी लाभली!! 
अर्थात, एक गवई म्हणून, हा गायक खरच असामान्य होता . कुशाग्र बुद्धीमत्ता, मनातील सांगीतिक विचार तात्काळ गळ्यातून काढण्याची विलक्षण हातोटी, अशी काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. आणि नेहमीप्रमाणे, व्यक्ती गेल्यावर आपल्याला त्याची "किंमत" अधिक कळते, या उक्तीनुसार, या गायकाला मृत्युनंतर अतोनात प्रसिद्धी मिळाली!! आज, या गायकाचा स्मृतिदिन म्हणून, इतके लिहायचा प्रपंच मांडला. 

Sunday, 29 June 2014

छा गये बादल नील गगन पर!!

सर्वसाधारणपणे साहिरला, कवीमंडळीत उर्दू कवी म्हणून मान्यता आहे आणि ती मान्यता तशी सार्थच आहे. कवी म्हणून साहिर केवळ अजोड असा कवी होता. तसे पाहिले तर त्याच्या काळात, "कैफी आझमी","मजरुह", शकील", "जान निसार अख्तर" सारखे तितकेच असामान्य शायर चित्रपटाच्या प्रांगणात होते तरी कुणालाही साहिरप्रमाणे यश आणि Glamour मिळाले नाही, आणि ही वस्तुस्थिती आहे. कवितेचा दर्जा, प्रसिद्धी याबाबतीत त्याला चित्रपटसंगीतात तुलना आजही नाही. 
याच साहिरने, कारकीर्द बहरात असताना, "चित्रलेखा" चित्रपटात, केवळ चित्रपट हिंदू राज्यकर्त्यांचा आहे म्हणून, एकही उर्दू शब्द न वापरता, केवळ हिंदी भाषेत कवितेच्या रचना केल्या आहेत आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या चित्रपटातील गाणी, कविता म्हणून वाचताना, आशय, गेयता, वैचारिक समृद्धता याचीच साक्ष आपल्याला मिळते. 
रोशन आणि साहिर, यांचे "द्वैत" असे काही अप्रतिम जुळले होते की, हिंदी चित्रपट संगीतातील काही असामान्य जोड्यांच्यात या जोडीचा अवश्यमेव समावेश होतो. पुढे, अशीच जोडी, राहुल देव बर्मन - गुलजार यांची झाली होती. साहिर-रोशन जोडीने जी गाणी दिले आहेत, त्यावर जरा साधी नजर फिरवली तरी आशयसंपन्नतेची ओळख होईल. इथे काव्य आणि संगीत, याची अशी काही सांगड जुळली आहे की कशाला नेमकी दाद द्यायची, याचा संभ्रम पडावा. इथे मी याच जोडीचे असेच एका सुंदर गाण्याचा आस्वाद घेण्याच प्रयत्न करणार आहे. 
"चित्रलेखा" चित्रपटातील सगळीच गाणी अप्रतिम आहेत तरीही "छा गये बादल" सारखे रमणीय गीत, काही वेगळ्याच "चवीचे" आहे. युगुलगीत बांधताना, संगीतकारासमोर काही प्रश्न अवश्यमेव पडतात. गाण्यात गायक आणि गायिकेला किती प्राधान्य द्यायचे? गाणे, दोन आवाजात बांधायचे आहे, तेंव्हा दोन्ही आवाजांना सम प्रमाणात "वाटा" मिळणे आवश्यक ठरते परंतु कवितेचा आशय, घाट याचा सम्यक विचार करणे गरजेचे असते आणि त्यानुसार आवाजाला प्राधान्य देण्याचा निर्णय घ्यायचा असतो आणि तो निर्णय तसा सहज नसतो. 
प्रत्येक गाण्याचे यश हे, त्याचा "मुखडा आणि त्याआधीचे, त्याचे "सूचन" करणारे वाद्यसंगीत, यावर बरेचसे अवलंबून असते. तिथे जर का रसिकांचे लक्ष लक्ष वेधले गेले तर मग, पुढील रचना, अधिक जिज्ञासेने ऐकली जाते. इथे गाण्याची सुरवात, सतारीच्या सुरांनी आणि त्याच्या पार्श्वभागी स्वरमंडळ!! या सुरांनी "तिलक कामोद" रागाची ओळख होते!! अस्ताईमधील प नि सा रे या सुरांनी राग स्पष्ट होतो पण तरीही राग ओळख, अशी स्वरांची ठेवण नसून, केवळ "आधार" स्वर असल्याचे लक्षात येते. 
"छा गये बादल नील गगनपर, घुल गया कजरा सांज ढले" ओळीची सुरवातच कशी सुंदर आहे. प्रणयोत्सुक जोडप्याची प्रणयी भावना आहे. "छा" शब्द कसा आशाबाईंनी उच्चारला आहे. स्वरात अर्जाव तर नक्कीच आहे पण त्याचबरोबर ओळीतील पुढील आशयाचे नेमके सूचन आहे. मघाशी मी, "मुखडा" हा शब्द वापरला तो या संदर्भात. पुढे याच ओळीती "कजरा" शब्दावरील जीवघेणा हेलकावा, केवळ कानाच्या श्रुती मनोरम करणाऱ्या!! ओळीचा संपूर्ण अर्थ ध्यानात घेता, "कजरा" शब्दातील "रा" या शेवटच्या अक्षराचे महत्व आणि तिथला स्वरांचा नाजूक हेलकावा, एखाद्या प्रणयिनीच्या डोळ्यांच्या विभ्रमाप्रमाणे अवघड आहे. इथे लयीला जो ताल वापरला आहे, त्याची गती आणि मात्रेचे "वजन" ऐकण्यासारखे आहे. जसे स्वर "वळतात" त्याच हिशेबात, तालाच्या मात्रांचे वजन राखलेले आहे. संगीतकार म्हणून रोशनचे हे "खास" वैशिष्ट्य म्हणावे लागेल. गाणे बांधताना, आपण शब्दांसाठी सूर पुरवत आहोत, ही जाणीव फार थोड्या संगीतकारांच्या रचनेत दिसून येते आणि त्यात रोशनचे नाव नेहमीच अग्रभागी राहील. 
पहिली ओळ संपल्यावर, क्षणमात्र "व्हायोलीन" चे सूर ऐकायला येतात पण किती अल्प काळ!! हे वाद्य वरच्या पट्टीत जात असताना, तिथेच ते सूर "रोखले" आहेत आणि लगेच बासरी आणि सतारीच्या सुरांचे "नर्तन" सुरु होते. रोशनच्या रचनेत, वाद्यांचे असे क्षणमात्र "बंधन" आणि लगेच मूळ लयीत पुढील वाद्यमेळ, हा जो सांगीतिक विचार दिसतो, तो केवळ अतुलनीय आहे. केवळ याच गाण्यापुरते दिसत नसून, याच चित्रपटातील "मन रे तू काहे ना धीर धरे" या अत्यंत मनोरम गाण्यात देखील, असाच विचार दिसतो, म्हणजे लय वरच्या पट्टीत जाण्याचे अत्यंत अल्पकाळ सूचन करायचे आणि तिथेच ती लय "खंडित" करायची आणि पुढील संगीत वाक्यांश मूळ लयीशी आणून जोडायचा!! अशी रचना अजिबात सोपी नव्हे!! 
"देख के मेरा मन बेचैन, रैन से पहले हो गयी रैन; 
आज हृदय के स्वप्न फले, घुल गया कजरा सांज ढले" 
आशाबाईंना नेहमी "शब्दभोगी" गायिका असे म्हटले जाते आणि ते कसे सार्थ आहे, ते ह्या ओळीतून दिसून येते. या ओळीतील, "बेचैन" शब्द ऐका, त्या शब्दाचा नेमका अर्क, सुरांतून मांडला आहे. शब्दप्रधान गायकी म्हणजे काय, याचे ह्या ओळी हे समर्थ उदाहरण म्हणता येईल. लय तशी मध्यम आहे तरीही "देख" शब्दावर किंचित जोर देऊन, "बेचैन शब्दाची "ओळख पटवून, शेवटचा शब्द "रैन", इथे छोटासा "एकार" घेऊन संपविणे, बारकाईने ऐकण्यासारखे आहे. गंमतीचा भाग असा आहे, पुढील ओळ - "आज हृदय के स्वप्न फले" म्हणताना स्वर आणि लय किंचित वरच्या सुरांत घेताना, आशयाला कुठेही धक्का लागत नाही. "स्वप्न फले" मधील "अतृप्त" अशी "तृप्ती" दाखवली आहे!! केवळ आशाबाईच असला स्वरीक खेळ मांडू शकतात!! 
पुढील कडव्यात रफीचा आवाज अवतरतो, पण त्याचे "येणे" देखील किती सुंदर आहे. 
"रूप की संगत और एकांत, आज भटकता मन है शांत;
कह दो समय से थमके चले, घुल गया कजरा सांज ढले". 
ह्या ओळी येण्याआधी, मधल्या अंतरा आणि तिथले संगीत जरा बारकाईने ऐकावे, व्हायलीनचा "पीस" संपताना, छोटासा स्वरमंडळाचा स्वरांचा "पुंजका" आहे आणि ते स्वर, पुरुष गायकाचा निर्देश करतात. ही रोशनची करामत. असाच प्रकार त्याने, पुढे, "हम इंतजार करेंगे" या अशाच अजरामर युगुलगीतात केलेला आहे. या स्वरांच्या मागील विचार महत्वाचा आहे. या स्वरांनी, नायकाच्या आवाजाने, नायिकेच्या मनात जी गोड शिरशिरी उमटते, त्याचे सूचन आहे!! या ओळी आणि त्याला लावलेली चाल, हाच विचार आपल्यापुढे मांडतात. "कह दो समय से थम के चले" हे शब्दच किती सुंदर आहेत, आपली प्रेयसी आपल्याला भेटली आहे आणि तिच्या संगतीने आपले "ओढाळ" मन स्थिरावले आहे आणि अशी वेळ, कधीच संपू नये, अशी सार्वकालिक भावना, तितक्याच सुंदर शब्दात व्यक्त झालेली आहे आणि इथे पुरुषाचा(च) आवाज असायला हवा आणि तो देखील किती "मृदू" आणि "संयत" भावनेने व्यक्त झालेला आहे. रोशनकडे, रफीने गायलेली गाणी ही अशीच आहेत, कुठेही स्वरांची "आरास" मांडली आहे, असे कधीच नसते तर आवाजातील मूळ गोडवा अधिक गोड कसा सादर होईल, इकडे रोशन यांचे लक्ष असते. मुळातली असामान्य लयकारी आणि तिथे रफीचा शांत आवाज, हे द्वैत, केवळ अप्रतिम आहे. 
इथे आणखी एक मजा, आहे, रफीने उच्चारलेली "छा गये गये बादल" ही ओळ आणि आशाबाईंनी , गाण्याच्या सुरवातीला, उच्चारलेली ओळ, किती बारीक पण तरीही अर्थपूर्ण फरक आहे, प्रत्येक कलाकाराचा वेगवेगळा दृष्टीकोन प्रकट करणारी, ही उदाहरणे आहेत. 
"अन्धीयारो की चादर तान, एक होंगे दो व्याकूल प्राण;
आज ना कोई दीप जले, घुल गया कजरा सांज ढले". 
इथे परत आशाबाईंचे स्वर येतात. कवितेच्या ओळीच तशा आहेत. प्रणयी जोडप्याच्या हृदयाची "धडकन" कशी नेमक्या शब्दात वर्णन केली आहे!! "आज ना कोई दीप जले" मधील "जले" शब्दानंतरचा "एकार" देखील असाच अफलातून आहे. वरती, मी "रैन" शब्दानंतरचा असाच "एकार" लिहिला आहे, ते स्वर आणि या शब्दानंतरचे स्वर, जरा नीट लक्ष देऊन ऐकल्यास, त्यातील "फरक" ध्यानात येईल. आशाबाई गायिका म्हणून किती वरच्या दर्जाच्या आहेत, हे लगेच ध्यानात येईल. तीन मिनिटांच्या गाण्यात ही अशीच "छुपलेली" सौंदर्यस्थळे असतात आणि ती ऐकायला साधी, सरळ आणि सोपी वाटतात परंतु गायला घेताना, त्यातील खाचखळगे ध्यानात येउन, आपली अवस्था "दिड:मूढ" होते!! 
गाण्याची चाल गोड, नितळ तर आहेच पण तरीही "गायकी" अंगाची आहे. लय शब्दागणिक "हेलकावे" घेत असते आणि त्यातच या गाण्याचे खरे सौंदर्य दडलेले आहे. 

https://www.youtube.com/watch?v=rLA4Rnx11lc#!

Thursday, 19 June 2014

ये दिल और उनकी निगाहो के साये



काही गाणी ही सतत तुमच्याशी "संवाद" साधण्याचा प्रयत्न करीत असतात, आपणच, एकतर त्या संवादाची भाषा समजून घ्यायला तयार नसतो किंवा दुर्लक्ष करीत असतो. वास्तविक गाण्यातील शब्दांची भाषा काय किंवा सुरांची भाषा काय, माणसानेच निर्माण केलेली परंतु आपण बरेचवेळा तिकडे अक्षम्य दुर्लक्ष करतो. सुरांची भाषा ही अतिशय तरल आणि अमूर्त असते, त्यामुळे त्या भाषेशी संवाद साधायचा झाल्यास, आपल्यालाही तशीच मनोभूमी तयार करणे आवश्यक असते. "ये दिल और उनकी निगाहो के साये" हे गाणे अशाच प्रतीचे आहे, अप्रतिम कविता, तितकीच बेजोड चाल, त्यालाच साजेसा वाद्यमेळ आणि या सर्वांचा शर्कारावगुंठीत गायकी आविष्कार!!
चाल स्पष्टपणे "पहाडी" रागावर आहे पण तरीही वेगळी आहे!! कशी? सुरवातीलाच जे वाद्यमेळाचे संगीत आहे, त्यातून पहाडी रागाचे सूर प्रतीत होत असले तरी जो प्रचलित पहाडी राग आहे, त्यापासून थोडे वेगळे आहेत आणि ही संगीतकार म्हणून जयदेव यांची खासियत. चित्रपट किंवा एकूणच सुगम संगीतात, संगीतकाराचे जे महत्व अधोरेखित होते, त्यात वाद्यमेळाची रचना नेहमीच, महत्वाची गणली जाते. आपल्याकडे, या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. आणखी एक उदाहरण देतो. लताबाईंचे "रसिक बलमा' तुफान लोकप्रिय आहे पण या गाण्यात पहिल्या अंतऱ्यानंतर, सारंगीचे सूर ठाय लयीत वाजत आहेत आणि त्याच जोडीने सतारीची अतिशय द्रुत गत चाललेली आहे आणि एका विविक्षित क्षणी, दोन्ही वाद्यांचे सूर एकमेकांत मिसळतात, ते मिसळणे इतके अफलातून आहे की गाण्यापेक्षा त्या रचनेला दाद द्यावी!!
या गाण्याच्या सुरवातीला बासरी आणि संतूरच्या सुरांचा जो अद्भुत मेळ घातला आहे, तो खास ऐकण्यासारखा आहे. जवळपास दीड मिनिटांचा मेळ आहे पण प्रत्येक सूर आणि त्याची पुढील स्वराशी घातलेली सांगड आणि त्याला दिलेली तालाची जोड, इथेच गाण्याची "बैठक" पक्की होते. बासरी आणि संतूर, ही जयदेवची खास आवडीची वाद्ये!! बासरीचे सूर तर त्यांनी इतक्या गाण्यात ज्या खुमारीने वापरले आहेत, त्याला तोड नाही. वास्तविक, हिंदी चित्रपट संगीतात बासरी काही नवीन नाही पण, जयदेवच्या रचनेत, बासरीचे :वजन" नेहमीच वेगळे असते जशी मदन मोहनच्या संगीतात सतार!! पहाडी रागातील "गधार", "पंचम" आणि "धैवत" स्वरांची जी जोड आहे, त्याचाच आविष्कार या पहिल्या स्वररचनेत आविष्कृत होतो आणि तुम्ही या गाण्यात गुंगून जाता.
तसे बघितले तर पहाडी राग हा लोकसंगीताशी फार जवळचे नाते राखणारा राग, त्यामुळे इथे स्वराविष्काराला भरपूर वाव. काही कलाकार तर, "मध्यम" स्वराला "षडज" मानून रागाची बढत करतात!! गाण्याचे सुरवातीचे शब्द देखील, याच रागाशी साद्धर्म्य राखतात. "ये दिल और उनकी निगाहो के साये"
"मुझे घेर लेते है ये बाहो के साये"
या पहिल्याच चरणात, चालीचे "गायकी" अंग स्पष्ट होते. जयदेव यांची कुठलीच चाल कधीही सरळ आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पहिल्या ओळीतील "उनकी" या शब्दावरील मुरकी, कशी अवघड आहे!! "उन" ही अक्षरे चालू असलेल्या सुरावटीत येतात पण "की" शब्द मात्र क्षणात वरच्या पट्टीत जातो, इतका की ऐकताना चकित व्हावे आणि गाणे अवघड लयीत शिरावे!! बरे तिथे स्वराचा "ठेहराव" क्षणमात्र असून, पुढे "निगाहो" शब्दावर शब्दावर लय विसावते!! हा सांगीतिक प्रकार, फार,फार अवघड आहे!! सुरवातीला श्रवणीय वाटणारी चाल, एका क्षणात चालीचे स्वरूप पालटते आणि वेगळ्याच लयीचे दर्शन घडवते!! इथे जयदेवची कुशाग्रता आणि लताबाईंची गायकी दिसून येते.
पुढील ओळीत अशीच सांगीतिक गुंतागुंतीची रचना आहे. "मुझे घेर लेते है ये बाहो के साये"!! जरा बारकाईने बघितले असे दिसेल, पहिल्या ओळीतील अक्षर संख्या आणि दुसऱ्या ओळीतील अक्षर संख्या, यात तफावत आहे आणि लयीच्या दृष्टीने अशी तफावत योग्य असत नाही आणि इथेच जयदेवची खासियत दिसते. त्याने काय केले बघा, "मुझे" नंतर "घेर" शब्द सुरांत बांधताना, त्याला हलक्या अशा हरकतीची जोड दिली आहे आणि ते देखील आशय अधिक अर्थपूर्ण होईल, या दृष्टीने दिली आहे. म्हणजे बघा, शब्दसंख्या अनघड झाली तरी लय कुठेच अडखळत नाही!!
सगळ्या गाण्यात, वाद्ये फारशी नाहीतच आणि जयदेवने काही अपवाद गाणी वगळता, कधीच गाण्यात भरमसाट वाद्यांचा वापर केलाच नाही. 
मोजकी वाद्ये घ्यायची पण त्या वाद्यांचा गुणधर्म ओळखून, त्यातून वेचक सुरांची निर्मिती करून, आवश्यक तो परिणाम साधायचा!! खरेतर, लताबाईंचा आवाज, हा देखील त्या वाद्यमेळात असा काही जमून जातो की तिथे आणखी कुठलेही वाद्य उपरे वाटावे.
"पहाडो को चंचल किरण चुमती है,
हवा हर नदी का बदन चुमती है,
यहा से वहा तक, है चाहो के साये"
इथे प्रत्येक ओळीतील खटके ऐकण्यासारखे आहेत. गायिकेला शब्दांचे नेमकी जाण असेल तर प्रत्येक शब्द सुरांतून उच्चारताना, त्याचा आशय आणि वजन, याचा नेमका "तोल" साधून गायला गेला की तेच शब्द आणि तीच चाल, एका वेगळ्या झळाळीने झगमगते!! "हवा हर नदी का बदन चुमती है" मध्ये, "हर" या शब्दावर दिलेला "हलकासा" जोर आणि त्यामुळे हेलकावणारी लय, प्रणयी विभ्रम, सुरांतून कसे व्यक्त करावेत, याचा, ही गायकी म्हणजे उत्तम नमुना ठरावा!! किंवा, पहिल्याच ओळीचा शेवट करताना, जो "है" शब्द आहे, तो कसा येतो, "चुमती" मधील "ती" शब्द वरच्या पट्टीत जातो पण "है" मात्र मुलाच्या लयीत अवतरतो!! कमाल आहे, गायिकेची आणि संगीतकाराची!!
"लिपटते है पेडो के बादल घनेरॆ,
ये पल पल उजाले, ये पल पल अंधेरे,
बहोत ठंडे ठंडे, है राहो के साये"
इथे, पहिल्याच ओळीत चाल वरच्या पट्टीत गेली आहे आणि कशी गेली आहे, बघा!! "लिपटते" पासून लय हळूहळू वरच्या पट्टीत जाते आणि "घनेरे" इथे ती लय संपते. संपूर्ण ओळ वरच्या सप्तकात जाते पण लगेच " ये पल पल उजाले, ये पल पल अंधेरे" ही ओळ सुरवातीच्या लयीत अवतरते. अवघड लय आणि ती गळ्यावर कशी पेलायची, इथे लयीतील प्रत्येक "क्षण" टिपून घ्यावा!! वास्तविक इथे स्वर, शब्दांवर गारुड घालू शकले असते पण तरीही स्वरयोजना अशी आहे, की शब्द कुठेही स्वरांखाली गुदमरत नाहीत तर शब्दात दडलेला आशय अधिक मोकळा करते!!
"धडकते है दिल कितनी आजादीयो से,
बहोत मिलते जुलते है इन वादियो से,
मोहब्बत की रंगीन पनाहो के साये"
शब्द कसे निसर्गातील प्रतिमा घेऊनच अवतरले आहेत आणि त्याच निसर्गात दडलेली चाल, संगीतकाराने, कवितेला "अर्पिलेली" आहे. इथे आणखी बारकाईने ऐकले तर कळेल, प्रत्येक कडव्याची सुरवात वेगळ्या सुरांवर होते पण शेवट मात्र, पहिल्या ध्रुवपदाच्या सांगीतिक रचनेशी नाते जोडत असतो. संगीतातील अवघड तरीही मनात रुंजी घालणारी व्यामिश्रता, ही अशी!! इथे प्रत्येक सूर, त्याला जोडलेली मात्रा याचे नाते नेमकेपणी समजून घ्यावे. रचनेत कुठेच "रेंगाळलेपण" नाही, किंबहुना जी नायिकेची प्रणयी आतुरता आहे, त्या भावनेचे स्फटीकीकरण सुरांतून मांडलेले आहे. लयीचे इतके विभ्रम ऐकायला मिळतात की मनाला संभ्रमावस्था यावी आणि तशी येते!! रचनेतील कुठला स्वर न्याहाळावा, याचाच संभ्रम पडावा!! अतिशय स्वच्छ गायकी तरीही कुठेही अकारण स्पष्टता नाही!! ऐकताना, चाल, मनाला वेढून टाकते आणि आपण हे गाणे सहज गाऊ शकतो, असे आव्हान करते पण जेंव्हा गाणे गायला घेतले जाते तेंव्हा आपले आपल्याच कळून चुकते, इथे फक्त लताबाईंचाच गळा आवश्यक आहे आणि आपल्या हातात, जयदेव आणि लताबाई, यांच्यासमोर नतमस्तक होण्यापलीकडे काहीही रहात नाही!! 

https://www.youtube.com/watch?v=aavwzVGlJrsgajootayde@gmail.com

साउथ आफ्रिका-भाग ४



एकूणच इथला भारतीय समाज, हा गतानुगतिकतेत अडकलेला आहे. प्रचंड अंधानुकरण आणि “बाबा वाक्यं प्रमाणम!!: हे इथल्या जीवनाचे प्रमुख सूत्र मांडता येईल. ज्या प्रमाणे मुली नको तितक्या पुढारलेल्या आहेत, त्याच प्रमाणे मुले देखील, अमेरिकन संस्कृतीचे तसेच अनुकरण करीत आहेत,  न्यूयॉर्क मधली fashion हा इथल्या जीवनाचा मूलमंत्र आहे. केसांचे वळण(जीवनाला कसलेच “वळण” नाही!!), कपडे त्याच प्रमाणे घालायचे इत्यादी.  एक गंमत सांगतो, इथे, युरोप प्रमाणे, संध्याकाळी “अंघोळ” करायची पद्धत आहे आणि या पद्धतीतून, कुणीही सुटलेले नाही! सकाळी, फक्त तोंड धुवायचे आणि मेकअप करून, ऑफिसला धावायचे, हा दैनंदिन आचार आहे. युरोपमध्ये ठीक आहे, तिथे वर्षातील आठ महिने, थंडी असते, पण तसा इथे प्रकार नाही पण, तिथे तशी पद्धत आहे ना, मग आपण ती इथे तशीच उचलायची!! यांचे दुपारचे जेवण म्हणजे, बहुतांशी एखादे sandwith इतपतच असते. सगळा जोर, संध्याकाळवर!! त्यामुळे, इथे संध्याकाळी, सातच्या सुमारास जेवण घेण्याची पद्धत आहे, अगदी युरोप, अमेरिकेप्रमाणे!! जेवण झाले की, मग “अंघोळ” करायची!! समजा, शुक्रवार, शनिवार असला तर मग बहुदा बाहेरच जेवण करायचे!! नंतर, मग नाईट क्लब आहेतच!! नाईट क्लब संस्कृतीतून कुठलाही वयोगट सुटलेला नाही. मुलगा/मुलगी वय वर्षे दहा ते अकरा झाले की त्यांना बाहेर उंडारायला परवानगी मिळते. त्यातून,अनोळखी जोडप्यांची  शय्यासोबत, कधीतरी मजा म्हणून, जोडप्यात अदलाबदल!! इथे, सेक्स याला कसलाही प्रतिबंध नाही. वयाची साठी उलटली तरी देखील विवाहबाह्य संबंध उत्साहात चालू असतात. एक, माझ्याच ओळखीचे उदाहरण देतो. मी, महिन्द्रमध्ये असताना, माझ्या घरी एक भारतीय वंशाचा, साठी गाठायला आलेला माझा मित्र राहायला होता. तो, मुळचा डर्बनचा पण, सेन्चुरियन येथे त्याला नोकरी मिळाल्याने आणि मी तिथेच राहत असल्याने, त्याने माझी परवानगी घेऊन, रीतसर मुक्काम, जवळपास सहा महिने तरी होता. पूर्वी, आम्ही, UB group मध्ये एकाच कंपनीत असल्याने, आमची चांगली ओळख होती. मला पण, एक चांगली कंपनी मिळाली होती. त्यामुळे, त्याच्या घरात माझे नाव चांगलेच परिचित होते, अगदी, मुलगा/मुलगी पर्यंत. नंतर, तो परत डर्बनला परतला आणि, काही महिन्यांनी, मला डर्बनला नोकरी मिळाल्याने, मी देखील त्याच शहरात परतलो. एकदा, त्याच्या मुलाचा मला फोन आला की, येत्या रविवारी, आम्ही, आमच्या बाबांचा साठावा वाढदिवस साजरा करणार आहोत. आम्ही एक हॉल बुक केलेला आहे आणि तिथे रीतसर पार्टी आणि समारंभ आहे पण आम्ही बाबांच्या पासून हा समारंभ लपविलेला आहे वगैरे, वगैरे!!” मी, रविवार त्याप्रमाणे, त्या समारंभाला गेलो. सुरवातीला, अनेक लोकांची भाषणे झाली. इथला हा अत्यंत कंटाळवाण प्रकार. कुणाचा वाढदिवस असेल किंवा लग्न असेल किंवा काही पार्टी असली तर, इथे जवळच्या लोकांच्यात व्हाशाने करण्याची जणू चढाओढ लागलेली असते आणि मग, असलेली आणि नसलेली भरमसाट विशेषणे लावून, कौतुक केले जाते. तशी भाषणे झाली, केक कापला, आणि लगेच शाम्पेन वाटली. नंतर मग, भात वस्तू देण्याचा कार्यक्रम सुरु झाला आणि तो आणि त्याची बायको, यांना भेटायला गेलो. मी जसा दोघांना भेटलो, तशी त्याच्या बायकोने, ” माझी जोहानसबर्गची मीटिंग कशी झाली आणि विमान उशिरा आल्याने, कंटाळा तर आला नाही ना?” असे दोन प्रश्न विचारले. वस्तुत: मी डर्बन इथेच होतो पण, या, माझ्या मित्राचे असेच एका सुंदर युवतीशी लैंगिक संबंध होते आणि त्या कामानिमित्त त्याने, माझे नाव पुढे करून, घरातून सुटका करून घेतली आणि मजा करून आला!! इथे, मी अंधारातच!! सुदैवाने, क्षणात, मी स्वत:ला सावरले आणि, गुळमुळीत उत्तर देऊन, सुटका करून घेतली!! नंतर, तो मित्र माझ्या पायाच पडायचा बाकी होता!! पण, हे एक मला माहित असलेले एकमेव उदाहरण नव्हे. मी इथे हे सांगितले कारण यात माझे नाव गुंतले होते इतकेच. जोहानसबर्गसारख्या अति प्रचंड शहरात, रात्री कंपनीचे काम आहे, या सबबीखाली, हॉटेलमध्ये प्रेयसीबरोबर रंगढंग करायची नेहमीच पद्धत आहे!!
अशी अफेयर्स सगळ्या समाजात(भारतीय, गोरा, काळा आणि कलर्ड!!) मुसलमान मुली एरव्ही, पडदानशीन असतात पण, गंमत म्हणजे अशा बाबतीत, त्या फार पुढारलेल्या आहेत!! अगदी, नाईट क्लब पासून ते दुसऱ्याच्या घरात लाज सोडून, बंधने न पाळता, शरीराचे सगळे भोग घेण्यात, फारच पुढे आहेत.
फक्त, सगळा कारभार, छुपेपणाने!! इथे, व्हाईट समाज आणि भारतीय समाज, यात फरक आहे. गोरी मुलगी बिनदिक्कतपणे, शरीर संबंध ठेवते, त्यात तिला काही गैर वाटत नाही. किंबहुना, मी जेव्हा रस्टनबर्ग इथे नोकरी करत होतो, तिथे माझ्याच Department मध्ये दोन व्हाईट मुली काम करीत होत्या, आता त्यांनी देखील नोकरी सोडली. पण, त्यानिमित्ताने, मी व्हाईट लोकांचे समाज जीवन फार जवळून बघितले. व्हाईट मुली, बिनधास्तपणे कबूल करतात, “मी गर्भनिरोधक गोळ्या खाते!!” एव्हढेच कशाला, तिची आई देखील त्याबाबत तिला बिनदिक्कतपणे सल्ला देते. shake hand वगैरे सोपस्कार तर अगदी, common असतात पण, व्हाईट मुली, त्याच्याही पुढली मजल गाठतात, म्हणजे, मिठी मारणे, गालाचे/ओठांचे चुंबन घेणे आणि हे सगळे विधी, कुठेही बिनदिक्कतपणे चालू असतात. ना त्यांना कुणाची भीती ना, त्या मुली कुणाची क्षिती बाळगतात!! लग्नाआधी मुल होणे, हे आता, स्त्री/पुरुष यांच्या खूपच common झाले आहे. विशेषत: काळ्या समाजात तर, अशा गोष्टी सर्रास चालतात. इथे डेटिंग म्हणजे जवळपास शरीर संबंध हेच समीकरण झाले आहे. त्यामुळेच, या देशात, एड्स चे प्रमाण जवळपास चाळीस टक्के इतके आहे!!
पण, भारतीय लोक आणि व्हाईट लोक, यांच्यात एका गोष्टीचा फार महत्वाचा फरक आढळतो. आपले भारतीय लोक, आपल्या भारताची परंपरा, ऑफिसचे काम करताना व्यवस्थित पाळतात तर, गोरे लोक, अजूनतरी, फार सचोटीने आणि मन लावून काम करतात. हा फरक, विशेषत: शुक्रवार संध्याकाळ आणि सोमवार सकाळी ठळकपणे दिसतो. शुक्रवार दुपार झाली की, आपले भारतीय लोक, काम-धाम बंद करून, weekend चे कार्यक्रम ठरविण्यात मश्गुल होतात आणि सोमवारी सकाळी, weekend कसा celebrate केला, याच्या गप्पामारण्यात, वेळ घालवतात. गोरे लोक, मात्र, ऑफिसच्या वेळात, सपाटून काम आणि एकदा का, ऑफिसची वेळ संपली की मात्र, फक्त enjoyment. हा महत्त्वाचा फरक आहे. मी, काही व्हाईट लोकांच्या घरी, खूप वेळा गेलो आहे. अगदी, ख्रिसमस नसून इतर वेळी देखील हे लोक, किती धमालपणे आपले आयुष्य एन्जॉय करतात, हे अनुभवण्यासारखे आहे. शरीर संबंध वगैरे लैंगिक गोष्टी जरा बाजूला ठेवल्या तरी, त्यांची राहण्याची पद्धत, पार्ट्या एन्जॉय करायची पद्धत, स्मार्ट कसे राहावे याचे आपण धडे घेऊ शकतो. मी तर आतापर्यंत खूप व्हाईट लोकांच्या पार्ट्या अटेंड केलेल्या आहेत. साधारणपणे, व्हाईट लोक, बीफ, पोर्क, Ham वगैरे खातात. मी देखील पूर्वी नेहमी हेच खात असे आता मी सोडून दिले आहे. विशेषत:, BRAAI पार्टी तर व्हाईट लोकांचीच बघावी. अर्थात, अवगुणदेखील बऱ्याच प्रमाणात आढळतात. तो भाग, मी पुढील लेखामध्ये लिहीन.


साउथ आफ्रिका-भाग 3




मागील भागात, मी इथल्या भारतीय वंशाच्या समाजातील पुरुषाबद्दल थोडे लिहिले. खर तर, इथल्या भारतीय लोकांच्यात “न्यूनगंड” प्रचंड प्रमाणात आहे. तो त्याच्याशी बोलताना सतत जाणवत असतो. कुठल्याही विषयात, आपल्याला प्रचंड माहित अथवा ज्ञान आहे, असा ते फार चलाखीने भास निर्माण करू शकतात. प्रत्यक्षात, ते चक्क खोटे बोलत असतात. त्यांना त्यात काय आनंद मिळतो, याचा मला अजूनही पत्ता लागलेला नाही. कारण, त्यांचे खोटे बोलणे, मी इतरांशी बोलताना उघडकीस आणलेले आहे पण, तरीदेखील वृत्तीत काही फरक नाही. स्वत;चा प्रचंड बडेजाव मारायचा, असे त्याच्या स्वभावाचे व्यवच्छेदक लक्षण सांगता येईल आणि आपण बोलताना किती वाहवत जात आहोत, याची तमा न बाळगता, इथले भारतीय बोलत असतात. आतापर्यंत, मी कितीतरी भारतीयांच्या घरी पार्ट्यांना गेलेलो आहे. ड्रिंक्स अर्थात, हा पार्टीचा प्रमुख कार्यक्रम. खर तर, ड्रिंक्स शिवाय, इथे कसलाच समारंभ साजरा होत नाही!! त्यात, जर का पार्टी असेल तर, तो कार्यक्रम प्रथम, मग वाढदिवस, बारसे, लग्न समारंभ इत्यादी गोष्टीना प्राधान्य!! अशा वेळी, अनेक अगदी वयस्कर माणसे जरी घेतली तरी, त्यांचे बोलणे याच वळणावर जाते. मी, कितीतरी वयस्कर माणसाना चक्क “थापा” मारताना ऐकलेले आहे. मलाच, मुंबई कशी कळलेली नाही, हे समजावून सांगतात. आता, काय बोलणार!! आणि, हे सगळे अतिशय गंभीरपणे, बोलणे चाललेले असते. अरे, प्रत्यक्ष “कोलाबा” परिसर कसा आहे, हेच मी आतापर्यंत कमीतकमी चाळीस वेळा तरी ऐकलेले असेन!! प्रत्यक्षात, हीं माणसे, त्या परिसरात केवळ पाच, सहा दिवसच राहिलेली असतात!! तुम्हाला एक गंम्मत सांगतो. १९९७ च्या सुमारास, मी अशाच एका पार्टीला गेलो होतो. अर्थात, भारतीय लोकांचीच पार्टी होती. तिथे मला काही मुले/मुली भ्तल्या आणि त्यांना, मी भारतातून आलो आहे, असे समजले. त्यातील एका मुलीने, भारतीय चित्रपट संगीताचा विषय काढला. मी खुश!! तिने, अर्थात, त्यावेळची गाजत असलेली गाणी, मला आवडल्याचे सांगितले. मी तसा गप्पच होतो. थोड्यावेळाने, मी तिला, “लताची कुठली गाणी आवडतात?” हा प्रश्न केला. यावर, तिचा प्रश्न “कोण लता!!”. आता सांग, मी काय बोलणार!! पण, अशा अर्धवट माहितीवरच, तिथे फुशारकी मारली जाते आणि स्वत;ची पाठ थोपटून घेतली जाते.
मागे, मी "निखारयावरून चालणे” यावर लिहिले होते. अशाच एका, पार्टीत एक भारतीय मला भेटला होता आणि तो मला अभिमानाने सांगत होता.”मी निखाऱ्यावरून अनवाणी आणि अत्यंत संथपणे चालतो!! बाकीच्यांना माझ्यासारखे अजिबात चालता येत नाही!!” प्रत्यक्षात, ती व्यक्ती, गेले दोन वर्षे नोकरी नाही(वय वर्षे ३०-हीं गोष्ट १९९८ मधली!!) आणि भावाच्या घरी अक्षरश: चरत होता आणि घमेंड कसली बाळगतो तर, निखारयावरून संथ चालण्याची!! नंतरही, तो पुढील ४ वर्षे तरी भावाकडेच राहत होता. आता, तो कुठे आहे, काहीच कल्पना नाही. पण, असा भारतीय लोकांचा स्वभाव!! माझा असा अंदाज आहे, की १९८८ पर्यंत, सतत व्हाईट लोकांच्या जोखडाखाली वावरल्याने, मनाची प्रचंड कुचंबणा  झाली असाणार आणि स्वातंत्र्य मिळाले पण,.आता इथे Black Empowerment कायदा लागू झाला आणि भारतीय समाजाची कोंडी तशी कायमच राहिली!! त्या मानसिक कोंडीतून, हताशता आणि विफलता, याचे मिश्रण त्याच्या मनात झालेले आहे. त्यातूनच असा वैफल्यग्रस्त अहंगंड निर्माण झाला असणार. त्यातून, इथे शिक्षण प्रचंड महाग असल्याने आणि आर्थिक परिस्थती तशी सामान्य असल्याने, त्या कुचंबणेत  सतत भर पडत राहिली. शिक्षण म्हणजे, Matric हेच बहुतांशी भारतीयांच्या नशिबात लिहिलेले आहे. आता, त्या पदवीनुसारच त्यांना नोकऱ्या मिळणार आणि मग अशा अवस्थेत त्यांचा आर्थिक स्तर उंचावायचा कसा? कोणी तसे फारसे बोलून दाखवत नाही, पण एखाद्या बेसावध क्षणी आपल्याला असे कळून जाते. इथे, Appartheid काळात, किती अत्याचार झाले, याबद्दल तसे अजूनही फारसे बोलले जात नाही. अर्थात, तुम्ही जसे जवळकीचे संबंध जोडाल, तशी ती माहिती आपल्याला कळू शकते. मी इथे १९९४ साली आलो, म्हणजे वंश-भेद संपून नुकतीच दोनच वर्षे झाली होती. तरीदेखील मला याची स्पष्टपणे जाणीव झाली होती. व्हाईट लोकांच्या हॉटेलमध्ये जर का तुम्ही गेलात, तर तुम्हाला कुणी आधी विचारात नाही आणि तुमची ऑर्डर घ्यायला कुणी गोरी मुलगी आली, तर चेहऱ्यावर तुसडा भाव स्पष्टपणे दिसायचा. तुमची ऑर्डर वेळेवर आणली जात नसे आणि हीं गोष्ट १९९४ च्या अखेरची!! आजही, इथे व्हाईट लोकांच्या वस्तीत तुम्हाला लगेच घर मिळत नाही, मिळाले तर, व्हाईट लोक तुमच्याशी संबंध ठेवायला संपूर्णपणे नाखुशच असतात. मी, २००७ साली इथे महिंद्र कंपनीत नोकरी स्वीकारली होती, बहुतेक भाग हा आजही व्हाईट लोकांनी व्यापलेला, तेंव्हा मला घर देखील त्यांच्याच परिसरात घ्यावे लागले. तुम्हाला सांगतो, पहिले दोन महिने, माझ्या शेजारी एक व्हाईट कुटुंब राहत होते पण कधीही “hi” किंवा “Hello” देखील झाले नाही!! अर्थात, नंतर जेंव्हा, माझ्या घरात ऑफिसमधील व्हाईट लोक यायला लागल्याचे बघितल्यावर, त्यांनी माझ्याशी आपणहून बोलायला सुरवात केली!! हीं परिस्थिती २००७ मधील तर मग जेंव्हा प्रत्यक्ष वंश-भेद अगदी भर वस्तीत स्थिरावला होता, तेंव्हा काय हाल झाले असतील याची कल्पना करता येते.
सुदैवाने, माझे आता काही भारतीय कुटुंबात चांगले संबंध निर्माण झाले आहेत आणि ती माणसे मात्र माझ्याशी खूप जवळकीने वागतात. अगदी, जर का दोन,तीन दिवसात फोन झाला नाही तर, स्वता:हून ते माझी विचारपूस करतात. पण, एकूणच भारतीय समाज हा मी वर म्हटल्याप्रमाणे दुभंगलेला आहे. भारताबद्दल खूप आस्था दाखवतात, पण त्यात दिखावूपणा फार दिसून येतो.आपण भारतीय संस्कृतीशी किती जवळीक राखून आहोत, याचे अत्यंत केविलवाणे प्रदर्शन करीत असतात. प्रत्यक्षात, त्यांना भारताची काडीमात्र माहिती नसते, अर्थात, अपवाद म्हणून काही भारतीयांचा निर्देश करता येईल पण, माझे मत, हे एक प्रातिनिधिक मत म्हणून मानायला काहीच हरकत नाही.
एकीकडे, भारतीयत्वाचा प्रंचंड अभिमान बाळगायचा आणि दुसरीकडे, व्हाईट लोकांच्या चाली-रिती आंधळ्या वृत्तीने स्वीकारायच्या, अशा अवस्थेत भारतीय समाज अडकलेला आहे. आतापर्यंत, मी इथला समाज भारतीय ऐकीव माहितीवर कसे अंधानुकरण करीत आहे, हे थोडक्यात सांगितले. आता, याचा दुसरा भाग!!
इथली लग्नसंस्था जवळपास, मोडकळीस आलेली आहे, असे म्हटले तर आश्चर्य वाटायला नको. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत जर का मुलाला मैत्रीण किंवा मुलीला मित्र मिळाला नाही तर, त्या मुलीत/मुळात काहीतरी विकार आहे की काय, असला विचित्र समंज इथे पसरलेला आहे. प्रत्यक्ष आई किंवा वडीलच त्या चितेत पडतात, म्हणजे बघ!! त्यातूनच, लग्नाशिवाय एकत्र राहायचे(त्याला काही बंधन नाही!! माझी एक मैत्रीण गेले ८ वर्षे तिच्या मित्राबरोबर राहत आहे पण लग्नाचा अजून पत्ता नाही!!), शरीराचे सगळे भोग घ्यायचे, आणि जर का त्यानंतरही पटले तर लग्न करायचे, असा इथल्या सगळ्या( भारतीय, व्हाईट, काळा समंज) समजत पायंडा पडलेल्वा आहे. आपल्या भारतात, हल्लीच “live and let relation” पद्धतीबद्दल बरेच काही वाद चालू आहेत पण इथे हीं पद्धत कितीतरी वर्षे आधीपासून चालत आहे. अर्थात, इतकी वर्षे एकत्र राहूनदेखील, प्रत्यक्ष लग्न होईलच याची शाश्वती शून्य!! मी तर, कितीतरी, अशा भारतीय मुली पाहिलेल्या आहेत की, ७,८ वर्षे आपल्या प्रियकरासमवेत राहिल्यानंतर, त्यांना हा प्रियकर आपल्या मनासारखा नाही अशी “उपरती” होते!! तोपर्यंत, तिला एखादे मुल देखील झालेले असते आणि मग त्या मुलाचे घोंगडे ती स्वीकारून, आपले आयुष्य भरकटवीत असते, त्याबरोबर त्या मुलाचे देखील!! अगदी, माझ्या जवळच्या मित्राच्या कुटुंबात देखील अशा घटना घडलेल्या आहेत!! काही मुली, तर त्याहून पुढारलेल्या असतात, स्मोकिंग आणि ड्रिंक्स तर इतक्या प्रमाणात करतात, की पुरुष देखील चकित व्हावेत!! आणि, ह्या मुली काही श्रीमंत घरातील नसतात तर आपल्या सारख्याच मध्यम वर्गीय घरातील असतात. माझी एक मैत्रीण तर फारच पुढारलेली होती. आता मी होती असे म्हणतो कारण आता ती लग्न होऊन स्थिरावलेली आहे. ती तर, एकाच वेळी ४ प्रियकरासमवेत प्रणयाचे रंग उधळत होती आणि पाचव्याबरोबर एंगेजमेंट झाली असताना. त्याचे तिला काहीच वाटत नव्हते. मी तर, तिच्या आई/वडिलांना प्रत्यक्ष ओळखत होतो आणि हीं माझ्याच कंपनीत कामाला होती!! एकदा, मी तिला याबाबत विचारले असता, तिचे उत्तर, “I just want to enjoy my life before marriage!!” आता, या उत्तरावर मी काय बोलणार!! अर्थात, पुढील भागात, आणखी रंगतदार गोष्टी लिहीन.

साउथ आफ्रिका – भाग २



साधारणपणे महिन्या दोन महिन्यात मी बराचसा रुळलो, असे म्हणायला हरकत नाही. पीटरमेरीत्झबर्ग गाव हे तसे एकदम टुमदार असे गाव आहे. जवळपास, सात, आठ टेकड्यांवर वसलेले आहे आणि समुद्र सपाटीपासून बरेच उंच असल्याने, हवा थंडगार असते, अर्थात, डिसेंबर, जानेवारी हे महिने वगळता. मी, मुंबईचा आल्हाददायक उन्हाळा अनुभवून या शहरात आलो असल्याने, इथला उन्हाळा देखील मला चांगलाच भावला. शहरात तशी औद्योगिक वसाहत अशी फार मोठी नाही(आज देखील तेच प्रमाण आहे- फारसे नवे प्रचंड उद्योग-धंदे फारसे या शहरात नाहीत!!) अर्थात, खाद्य तेलाच्या प्रचंड रीफायनरिज इथे खूप आहेत आणि मी सुद्धा त्यातील एका कंपनीत होतो. इथे, सगळ्या प्रकारच्या वस्त्या आहेत, भारतीय, काळे, गोरे तसेच कलर्ड!! अर्थात, प्रत्येक समाज हा बहुतांशी स्वत:च्या वेगळ्या वस्तीत राहतो. हा वंशभेदाचा अनिवार्य परिणाम. पूर्वी, व्हाईट लोकांनी, प्रत्येक समाजाला एक ठराविक एरिया वाटून दिला होता आणि त्याप्रमाणे, तो समाज तिथे स्थिरावला. व्हाईट लोकांची वस्ती अर्थात, अधिक देखणी, सुरक्षित, हवेशीर आणि प्रशस्त!! असा प्रकार, अजूनही, साउथ आफ्रिकेतील प्रत्येक शहरात दिसून येतो. एकूणच हवा हीं थंड असल्याने, गोल्फ क्लब, पब्स, देखणी हॉटेल्स, या गोष्टीनी हे शहर वेढलेले आहे. आता, भारतीय वंशाचे लोक या शहरात आणि डर्बन येथे प्रचंड प्रमाणात राहतात आणि त्यामुळे, माझा या लोकांशी अधिक संबंध आला आणि हा समाज मला अधिक जवळून अनुभवता आला. मागे मी जे म्हणालो की, इथला भारतीय वंशाचा समाज हा अजूनही बराचसा मानसिकदृष्ट्या दुभंगलेला आहे, याचे तंतोतंत प्रत्यंतर मला हर घडी आणि हर क्षणी घेता आले.
मी ज्या कंपनीत होतो, त्या कंपनीत, हिंदू( इथे एक विचित्र प्रथा आहे. इथला हिंदू समाज दोन गोष्टीत विभागाला गेला आहे.१- हिंदू आणि २- तमिळ!!) पुरुष/ मुली होत्या तसेच, मुसलमान, व्हाईट, कलर्ड असे एकूण वेगवेगळ्या समाजातील एक संमेलनच होते. आणि त्यावेळची माझी झालेली मते, आजही तितकीच ठाम आहेत. विशेषत: तरुणांबद्दलची मते!! इथाल्स भारतीय समाज हा एक बाजूने पाश्चात्य संस्कृतीने आकर्षित झालेला आहे तर दुसऱ्या बाजूने प्रचंड प्रमाणात बुवाबाजीत अडकलेला आहे. सत्य साईबाबा हे इथले परम आदराचे स्थान!! एकूणच भारतातील स्वामी, गुरु याबद्दल इथे आजही प्रचंड आकर्षण आहे. इथे, हिंदूंचे सण वेगळे आणि तमिळ लोकांचे सण वेगळे, देवळे वेगळी, रिती रिवाज देखील वेगळे. पण, एकूण मानसिक घडण बघितली तर काही फारसा फरक आढळत नाही. तसेच व्हाईट लोकांचे अंधानुकरण(वाईट अर्थाने!!) आणि भारतातील बुरसटलेल्या चालींचे उदात्तीकरण, असा थोडक्यात सारांश सांगता येईल. एक उदाहरण देतो. GOOD Friday हा मुळातला ख्रिश्चन लोकांचा उत्सव आहे पण इथे भारतीय समाज अत्यंत भाविकतेने हा सण साजरा करतात. त्या दिवशी, काही लोकांच्या “अंगात” येते, दिवसभर असे अंगात आलेले लोक, एका धुंद अवस्थेत वावरत असतात. संध्याकाळी, मग हे लोक, जिभेत तारेचा आकडा अडकवतात, पाठीवर तार खोचून त्यात मग फळे, फुले गुंफतात, अगदी डोळ्याच्या पापण्यात देखील तार खुपसून त्यात फळे अडकवतात आणि अशा पुरुष/स्त्रिया यांची संध्याकाळी मिरवणूक निघते ती जवळपास, संपूर्ण भारतीय लोकांच्या वस्तीभर!! वाटेत, काही भाविक(काही नव्हे- बरेच भाविक!!) या माणसांच्या पाया पडतात!! इथल्या भाविक लोकांच्या मते, असे अंगात आलेले लोक, हीं देवाचीच मानवी रूपे आहेत!! त्यांच्या पाया पडल्यावर, मग हीं देवाची रूपे, त्या भाविकांच्या कपाळावर, उदी/भस्म लावतात आणि त्याने कृपाप्रसादाने, भाविक लोक गहिवरून जातात. नंतर, मिरवणूक संपली की, हिंदू मंदिरात खरा पुढचा समारंभ असतो.
मिरवणूक देवळात येईपर्यंत देवळाच्या प्रसादात, कोळसे/ लाकडे पेटवलेली असतात. ती पुरेशी पेटली(अगदी ज्वलंत निखारे!!) की मग हीं देवाची रूपे आणि इतर काही भाविक लोक त्यावरून अनवाणी पायाने हळूहळू किंवा भराभर(ज्याच्या-त्याच्या कुवतीप्रमाणे!!) चालतात. मला, पाहिल्यावर एक वयस्कर गृहस्थाने,’ आम्ही(म्हणजे भारतीय लोक!!) किती आस्थेवाइकपणे भारतीय परंपरांचे पालन करीत आहोत” असे ऐकवले!! त्यावेळी, मी न राहवून त्याला विरोध दर्शविला पण माझे बोलणे त्याला अजिबात आवडले नसल्याचे, मला जाणवले. नंतर, हा विषय मी माझ्या ऑफिस मधील भारतीय लोकांशी काढला, तेंव्हा तरं त्यांनी मला वेड्यातच काढले!! इथले भारतीय लोक कमालीचे भारतीय परंपरांचे अंधानुकरण करण्यात पुढे आहेत, त्यात काही वैचारिक भाग नाही की साधे तत्व देखील आढळत नाही. त्यांची या सर्व कर्म कान्डावर कमालीची श्रद्धा आहे. आज भारतात देखील कितपत, अशा मागासलेल्या परंपरांचे जतन केले जाते, मला शंका आहे, इथे मी शहरी भागाबद्दल बोलत आहे. जगन्नाथाचा रथ प्रसंगी, भारतातील गावात असे प्रकार चालतात, याची कल्पना आहे पण तो समाजच गतानुगतिकतेच्या गाळात रुतलेला आहे. इथला भारतीय समाज, स्वत:ला उच्च शिक्षित(म्हणजे काय!! हा एक वेगळा प्रश्नच आहे!! पण, त्याचे उल्लेख पुढे होईलच!!) समजतो, आधुनिक जगाच्या बरोबरीने वावरतो, असे मानतात आणि अशा ठिकाणी, अशा अंध श्रद्धा कमालीच्या भाविकतेने पाळल्या जातात!!
भारतातील स्वामीबद्दल तरं, काही बोलायचीच सोय नाही!! त्याच्या चरणी, आपली अक्कल किती गहाण टाकायची, याची जणू स्पर्धाच लागलेली असते!! इथे आपल्यासारखी उपासाची पद्धत आहे, म्हणजे आपण जसे, उपासाचे खास वेगळे पदार्थ करतो, तसा काही प्रकार नसून, या महिन्यात( साधारणपणे दिवाळीपूर्वी महिनाभर हा महिना येतो) या दिवसात फक्त नॉन-वेज पदार्थ करायचे नाहीत की खायचे नाहीत. ड्रिंक्स मात्र चालतात!! ड्रिंक्स पिण्यात मात्र हे भारतीय, कमालीचे तरबेज आहेत. अगदी, स्पर्धाच लागल्यासारखी, ड्रिंक्स ढोसत असतात आणि त्याचा अभिमान बाळगत असतात!! मग, काकुळतपणे आडवे होणे, नशेत बरळत राहणे इत्यादी अश्लाघ्य प्रकार होतच राहतात.  हे एक प्रातिनिधिक दृश्य म्हणून मानायला हरकत नाही.

साउथ आफ्रिका – भाग १



खरतर, साउथ आफ्रिकेसंबंधी लिहायचे म्हणजे थोडक्यात माझेच वर्णन करायचे, असा थोडाफार प्रकार होण्याची शक्यता आहे. अर्थात, मी थोडीफार तठस्थ वृत्ती ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे पण, काही ठिकाणी, माझा आणि माझ्या मतांचा उल्लेख अनिवार्य ठरावा. तेंव्हा, तेव्हढी सवलत,तुमच्याकडून  अपेक्षित आहे.
१९९४ च्या मध्यापर्यंततरी, माझा या देशात जाण्याचा संबंधच नव्हता कारण, मी नुकताच नायजेरिया मधून परत आलो होतो आणि दुसरीकडे नोकरीचे प्रयत्न चालूच होते. साउथ आफ्रिकेची संधी तशी मला फार अचानकच मिळाली. तेंव्हा, एक संधी, इतपतच या गोष्टीकडे महत्व होते पण, एकदम, मुलाखतीचे बोलावणे आले आणि मी चक्क निवडला गेलो!! मग, visa, तिकीट,सामानाची बांधाबांध वगैरेची नेहमीची धावपळ सुरु झाली आणि अक्षरश: धडपड करीतच विमानात बसलो-एयर इंडिया पकडून, डर्बनला निघालो. साउथ आफ्रिका पोहोचेपर्यंत, हा देश कसा आहे, याची अंधुकशी देखील कल्पना नव्हती!! फक्त, माझ्या मित्राचा भाऊ, मकरंद फडके, याचा फोन नंबर जवळ होता आणि तो जोहानसबर्ग येथे राहतो, एव्हढीच माहिती, माझ्याकडे होती. किंबहुना, मी ज्या शहरात राहणार आहे-पीटरमेरीत्झबर्ग या शहराचे नाव  मी प्रथमच ऐकत होतो. जोहानसबर्ग, डर्बन, केप टाऊन आणि पोर्ट एलिझाबेथ या शहरांची नावे वगळता, काही माहिती नव्हती. डर्बन विमानतळावर उतरल्यावर, देशाची थोडी फार कल्पना यायला लागली. डर्बनपासून जवळपास ९० किलोमीटर अंतरावर, पीटरमेरीत्झबर्ग शहर आहे आणि हरूनच्या (माझा बॉस!!) गाडीतून या शहरात येताना, जे अप्रतिम दर्शन या देशाचे झाले, ते आजतागायत कायम आहे. प्रचंड हमरस्ते, हवा थंडगार, सगळीकडे स्वच्छता आणि अति शांतता. सबंध प्रवासात, कुठे हॉर्नचा आवाज नाही की माणसांची वर्दळ नाही!! आजही, माझ्या मनात, या देशाचे हेच चित्र ठसलेले आहे. वास्तविक, सरत्या थंडीचे दिवस होते, तरीही हवा चांगल्यापैकी थंड होती.
पीटरमेरीत्झबर्ग शहर हे टेकड्यांवर वसलेले आहे. आपल्या पुण्यासारखेच शहर आहे-निवृत्त लोकांसाठी अप्रतिम!! एकूणच सुरवातीचे दिवस जरा अवघडच गेले कारण, लोकांचे इंग्लिश!! मी, नायजेरियात राहून आलेलो, तिथले इंग्लिश तर, खुद्द शेक्सपियरने नव्याने शिकावे!! तर, इथले इंग्लिश सगळे तोंडातल्या तोंडात पुटपुटणारे!! त्यामुळे, सुरवातीचे दिवस फारच अवघड गेले. काय बोलताहेत, याचे नेमका अर्थच लागायचा नाही. मग, मी एक शक्कल लढवली, तेंव्हा मी स्मोकिंग करायचो, व त्याचा आधार घेऊन, मग बोलणाऱ्याला, परत बोलायला लावायचे आणि अर्थ मनाशी जुळवायचा!! विशेषत; गोरे लोक बोलायला लागले तर माझी भंबेरी उडवायचे! अर्थात, महिन्या-दोन महिन्यात सगळा अंदाज यायला लागला. आता तर, मी त्यांचे “पाणी” व्यवस्थित जोखलेले आहे आणि आता प्रत्येकाला व्यवस्थित हाताळतो!!
ऑफिसमध्ये बऱ्याच मुली होत्या. काही, लोकल भारतीय(यात, मुसलमान, हिंदू, तामिळ, गुजराती असे सगळे येतात!!), एक कलर्ड आणि दोन व्हाईट तर, बरेचसे, पुरुष हे भारतीय वंशाचे होते. त्यामुळे, पहिल्या नोकरीतच इथल्या समाजाची फार जवळून ओळख झाली. आता, इथे मी लिहिताना, प्रथम सामाजिक परीस्थितीवर प्रथम लिहीन. आज जवळपास, पंधराहून अधिक वर्षे, या देशात मी काढली, तरीही माझ्या सुरवातीच्या मतांमध्ये फारसा फरक पडला नाही.
तेंव्हा, अर्थात, प्रथम, भारतीय वंशाचे लोक!! अगदी, स्पष्टपणे मत मांडायचे झाल्यास, इथले भारतीय वंशाच्या लोकांची मानसिक स्थिती पूर्णपणे दुभंगलेली आहे. ना धड भारतीय ना धड पाश्चात्य!! अशा त्रिशंकू मनोवस्थेत इथले भारतीय वंशाचे लोक राहत आहेत. पुढे मी अशी बरीच उदाहरणे देईन की ती माझ्या या मताला बळकटी मिळेल. तेंव्हा, पहिला भाग मी इथेच संपवितो.

साउथ आफ्रिका – भाग ६




जसे मी मागील लेखामध्ये  व्हाईट समाजाविषयी चांगल आणि वाईट, अशा दोन्ही गोष्टी मांडायचा प्रयत्न केला. तसाच प्रकार भारतीय वंशीय लोकांच्या बाबतीत लिहिला. अर्थात असे नव्हे की, या सामाजात अनेक वाईट गोष्टी आहेत. त्याचे थोडक्यात असे आहे की, इथला भारतीय समाज सतत वर्षानुवर्षे एका प्रचंड मानसिक कुचंबणेखाली वावरत असल्याने, त्यांची अशी अत्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया घडत असते. मी जसा या लोकांच्या सान्निध्यात अधिक गेलो तशी त्यांची ती मानसिक प्रक्रिया अधिक डोळसपणे पाहता आली. अर्थात, हीं प्रक्रिया कुणाही माणसांच्या बाबतीत घडू शकते. आजही, इथल्या भारतीय समाजाला त्यांचे हक्काचे असे स्थान मिळू शकलेले नाही. इथले लोक, स्वत:ला साउथ आफ्रिकन मानतात आणि ते योग्य देखील आहे पण त्याच बरोबर, त्या राष्ट्रीयत्वाच्या अनुषंगाने येणाऱ्या अधिकारापासून मात्र हा समाज जरा वंचितच झालेला आहे. गोरे लोक, मागे मी म्हणालो त्याप्रमाणे, स्वत:च्या गोऱ्या कातडीची किंमत व्यवस्थितपणे वसूल करतात. आजही, जरा का फोनवर किंवा प्रत्यक्षात देखील, जर का गोरा मानून बोलायला लागला की, लगेच इथले बाकीचे लोक, आपला बोलण्याचा स्वर जरा खालचाच लावतात. गोऱ्या लोकांना प्रतिष्ठेच्या, भरपूर पगाराच्या नोकऱ्या सहज मिळतात. जर का त्यांना, आजच्या या स्वतंत्र समाजातदेखील तशीच उच्च वर्णीय वर्गाप्रमाणे सवलत आपणहून मिळत असेल तर कोण शहाणा ते नाकारील!! आजही, या समाजाची मानसिक प्रतिक्रिया आणि चलनवलन हे व्हाईट लोकांना सांभाळून, त्यांना महत्व देऊनच चाललेले असते. असे नव्हे की. गोरे लोक नेहमीच अत्यंत हुशार, कामात वाकबगार असतात, पण एकूणच त्यांची मानसिक ठेवणच अशी झालेली आहे की, त्यांना दुसऱ्यावर सतत हुकमत गाजविण्याची सवय जडलेली आहे. सुरवातीच्या काळात, मला देखील या सवयीशी जुळवून घ्यायला लागले.
पण, नंतर जसा मी इथे स्थिरावायला लागलो, तशी या गोऱ्या लोकांचे पाणी जोखायला सुरवात केली. आजही, जर का आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपन्या आणि त्यांचे Directors बघितले तरी याची कल्पना येऊ शकते. इथे देखील, मी गोरा माणूस भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेला पाहिलेला आहे. अर्थात, शेवटी “पैसा” हीं गोष्टच अशी आहे की ती कधीही कातडीचा रंग बघत नाही!!
काळे लोक तर भ्रष्टाचारात खूपच गुंतलेले आहेत. काळा समाज तर, वर्षानुवर्षे गुलामगिरीतच अडकलेला होता. एकतर, शिक्षणाच्या नावाने सगळीच वानवा. आजही, बहुसंख्य काळे लोक हे शिक्षण म्हटले की पाठ फिरवतात. इथे शिक्षण फार महाग आहे, हे कबूल पण मग, इतर समाजातील लोक शिकत आहेतच की. ते कसे आपले शिक्षण पुरे करतात? पण, बहुसंख्य काळ्याना “पैसा” हा हवा असतो पण त्या साठी आवश्यक ते कष्ट, मेहनत करायची इच्छा नसते. त्यामुळेच मग, इथली बरीचशी गुन्हेगारी हीं काळे लोकच करीत असतात. विशेषत: ड्रग्स, दरोडे, मारहाण, खून वगैरे गुन्ह्यात काळे लोक सापडतात. इथली कायदा आणि सुव्यस्था, जर का कुणी धोक्यात आणली असेल तर, ती प्रामुख्याने काळ्या लोकांनी. आज, जोहानसबर्ग सारख्या महाकाय शहरात, संध्याकाळी रस्त्यावरून पायी फिरायची सोय राहिलेली नाही. कोण, कधी आपला पाठलाग करील, आणि पैसे मागेल, याची अजिबात शाश्वती नाही. आणि जर का पैसे मिळाले नाहीत तर मग त्याच खून करायला देखील मागे-पुढे पाहत नाहीत!! शहराचा मध्यवर्ती भाग तर अति धोकादायक झालेला आहे. हीच परिस्थिती, केप टाऊन, डर्बन, प्रिटोरिया या शहरांची आहे. एकतर, मध्यवर्ती शहरात, बहुसंख्य काळ्या लोकांचीच वस्ती आहे किंवा कलर्ड लोकांची वस्ती आहे. कलर्ड समाज तर त्याही पुढे गेलेला आहे. कलर्ड समाजात तर, नितीमत्ता म्हणून काही शिल्लक आहे का, असा ठाम प्रश्न उभा राहतो!! मी बघितले बहुसंख्या कलर्ड समाजातील लोक, हे प्रचंड स्मोकर्स तरी आहेत किंवा ड्रगच्या अधीन झालेले आहेत!! ड्रिंक्सचा तर प्रश्नच उद्भवत नाही कारण ती तर इथली आचार संहिता आहे!! जोहानसबर्ग शहरातील, काही पंचतारांकित हॉटेल्स, लोकाश्रयाविना बंद पडली आहेत कारण संध्याकाळी शहरात जाणार कोण!! इथे, जवळपास रोज, पेपरमध्ये एक तरी बातमी अशी असते की जी, एकतर लैंगिक शोषणाला बळी पडलेली असते, किंवा अमानुष खून झालेला असतो किंवा प्रचंड भ्रष्टाचाराचे प्रकरण नुकतेच उघडकीस आलेले असते!! जोहानसबर्ग शहरात, मध्यवर्ती भागात, कितीतरी खास भेट देण्यासारख्या जागा आहेत पण मनाचा धीरच होत नाही. आपल्या पाठीमागून, कधी, कोण काळा, कलर्ड किंवा गोरा देखील आपल्या पाठीला रिव्होल्वर लावील, काही सांगता येत नाही. बरे नुसते पैसे मागितले तरी हरकत नाही, पण जर का त्याच्या मनाइतकी रक्कम मिळाली नाही तर, प्रचंड मारहाण किवा प्रत्यक्ष खुनदेखील अस्तित्वात येतो!! मध्यंतरी अशीच एक घटना, माझ्या माहितीत घडली. माझ्या एका मित्राने(इथे मी कुणाचेही नाव लिहित नाही, कारण उगाच जखमेवरची खपली उघडी पडायला नको!!) त्याच्या व्यवसायाच्या कामानिमित्त एका भारतीय माणसाला भारतातून बोलाविले होते. केवळ काही दिवसासाठीच!! त्याचे काम संपले त्या दिवशी संध्याकाळी, तो सहज फिरायला म्हणून बाहेर पडला आणि चार दिवसांनी, त्याचे मृत प्रेत, रस्त्यावर बेवारस पडलेले सापडले!! अजूनही, माझा मित्र, त्या कोर्ट-कचेरी यांच्या त्रांगड्यात अडकलेला आहे. हीं गोष्ट, मागील वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील. पण, इथे असेच आहे. शहरात अति पैसा आहे, सगळ्या प्रकारच्या सुविधा  आहेत, भारतात काय आयुष्य जगू, अशा प्रकारचे विलासी जीवन जगण्याच्या भरपूर संधी आहेत पण, सगळे कसे कोंडवाड्यात अडकलेले!!
मी, आजही, जेंव्हा रात्री जेवण झाल्यावर, माझ्याच घराच्या कॉम्प्लेक्समध्ये फेऱ्या मारीत हिंडतो, तर कितीतरी लोकांना याचे नवलच वाटते!! इथे, अशी जेवणानंतर फेऱ्या मारायची पद्धतच नाही. अर्थात, इथल्या सामाजिक जीवनाविषयी आणखी बरेच लिहिता येईल, पण ते मी पुढील लेखासाठी राखून ठेवतो.

साउथ आफ्रिका – भाग ७



इथले समाज जीवन, हे प्रामुख्याने, मॉल आणि मॉल संकृतीशी जखडलेले आहे. अर्थात, हे मॉल्स मात्र असतात अतिशय सुंदर, प्रशस्त नि विविध गोष्टीनी सामावलेले!! अशा मॉल्स मध्ये, माणसाला लागणाऱ्या सगळ्या गरजा, पुरवणारे दुकानदार असतात. इथे, नुसते जोहानसबर्ग जरी लक्ष्यात घेतले तरी, या शहरातील प्रत्येक उपनगरात, फार प्रशस्त मॉल्स आहेत. अगदी, नावेच घ्यायची झाल्यास, Sandton, Fourways, Bedfordview, Eastgate, Midrand इत्यादी. प्रत्येक मॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची हॉटेल्स, शॉप्स यांची नुसती रेलचेल असते. काही अति सुंदर पुस्तकालये असतात, उदाहरणार्थ, Exclusive Books. मी तर, कितीतरी वेळा या पुस्तकालयात जाऊन, एखादे पुस्तक हाताळायला घेऊन, अनेक तास वाचीत बसलेलो आहे. त्याच लायब्ररीत एक छोटेसे कॉफी शॉप असते. तीत्थे फार अप्रतिम कॉफी मिळते. एक ग्लास भरून कॉफी घ्यायची आणि शांतपणे पुस्तक वाचीत बसायचे, या सारखा दुसरा विरंगुळा नाही. मला तर, अशाच ठिकाणी काही अप्रतिम पुस्तके मिळाली आहेत की जी आज माझ्या भारतातील संग्रहात जमा झाली आहेत. Exclusive Books हे माझे मंदिर!! इथला एक सर्वात चांगला गुण, आपण भारतीयांनी जरूर आत्मसात केला पाहिजे, व तो म्हणजे “शांतता” राखण्याचा. वास्तविक मॉल्समध्ये हजारोनी लोक जमलेले असतात पण कुठेही गडबड-गोंधळ नाही. जोहानसबर्गमध्ये, Monte Casino आणि Emperor’s Palace सारखे अवाढव्य कॅसिनोस आहेत, तिथे तर, देवाला सतत फुले वाहावीत त्याप्रमाणे मशीनसमोर बसून, शेकड्यांनी लोक पैशांचा आहेर देत असतात. अशा ठिकाणी देखील, कधीही आरडा-ओरडा होत नाही की गडबड, गोंधळ माजत नाही. सगळे कसे अति शिस्तवार!! नुसता पायी फिरायचे म्हटले तरी तुमचे तास-दोन तास सहज निघून जातात. मी तर, Monte Casino मध्ये कितीतरी वेळा गेलो आहे, बहुतेक वेळा, आपले हिंदी चित्रपट पाहण्यासाठी. इथे, भारतासारखी चित्रपटासाठी प्रचंड रांग लावावी लागत नाही. तुम्ही, Compu Ticket वरून, आपली तिकिटे आधीच आरक्षित करू शकता. मी तर, काही चित्रपट अगदी, First Day show, असे पहिले आहेत. अशा कॅसिनो जागी देखील, Exclusive Books सारखे अप्रतिम पुस्तकालय असते आणि तुम्ही तिथे आपला वेळ सत्कारणी लावू शकता. मला वाटत, आता मुंबईत देखील अशा प्रकारची शॉप्स निघाली आहेत. उदाहरणार्थ, Oxford Book इत्यादी. इथे मराठी पुस्तके मात्र मिळत नाहीत!! तस पहिला गेल्यास, इथे भारतातील बातम्यांपैकी, राजकीय आणि चित्रपट विषयक बातम्यांना प्रचंड आकर्षण आहे. विशेषत: हिंदी चित्रपट आणि अभिनेते यांना इथे फार मागणी आहे. सध्या शाहरुख हा इथल्या भारतीयांचा “देव” आहे. मागे, काही वर्षापूर्वी, इथे शाहरुख, सैफ, रानी मुखर्जी, आणि प्रीती झिंटा इथे आले होते. त्यांनी, जोहानसबर्ग, सन सिटी आणि डर्बन इथे कार्यक्रम केले होते. मी, अर्थातच सन सिटी इथल्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्यावेळी, जेंव्हा शाहरुख रंगमंचावर आला, त्यावेळचा टाळ्यांचा कडकडाट अजूनही लक्ष्यात राहिलेला आहे.
सन सिटी, हा इथल्या विलासाचे सर्वोच्च ठिकाण!! विशेषत: Palace Hotel!! इथे ऐषारामाची परमावधी गाठलेली आहे. अर्थात, कॅसिनो आहेतच. पण, तरीही मानव निर्मित अनेक अनुभवण्यासारख्या गोष्टी आहेत. जोहानसबर्ग काय किंवा सन सिटी काय, इथे निसर्ग निर्मित सौंदर्य फारसे नाही पण, इथल्या लोकांनी त्याची कसर, अशा अप्रतिम मॉल्स, शॉप्स, कॅसिनो अशा गोष्टीनी भरून काढली आहे. निसर्ग सौंदर्य पाहायचे असेल तर, मात्र केप टाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही. डर्बन सुंदर आहे, अप्रतिम समुद्र किनारे आहेत पण, तरी देखील केप टाऊनची गोष्टच वेगळी. तिथले समुद्र किनारे, जगप्रसिद्ध Table Mountain, Cape of Good Hope, Robin Island हीं सगळी ठिकाणे खरोखरच फार सुंदर आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, समुद्र किनारे अति विशाल आणि पसरलेले जरी असले तरी घाणीचा जराही मागमूस नसलेले!! जरा आपल्या इथले किनारे(काही अपवाद वगळता!!) नजरेसमोर आणल्यास, इथल्या किनाऱ्यांची स्वच्छता खरोखरच वाखाणण्यासारखीच आहे. अर्थात, आता काही ठिकाणी थोडी अस्वच्छता दिसते आणि ती प्रामुख्याने, काळे आणि भारतीय लोकांनी फेकलेल्या शीतपेय व बियरच्या डब्यांमुळे!! त्याबाबतीत आजही, गोरा माणूस, स्वच्छतेचा अति आग्रही माणूस आहे. मला तर, याचा अनुभव कितीतरी वेळा आलेला आहे.
सुरवातीला, मीदेखील, भारतीय सवयीप्रमाणे, हातातील सिगारेटचे थोटूक(पूर्वी मी स्मोकिंग करायचो!!) रस्त्यावर टाकायचे, कोक संपला की तो पत्र्याचा टिन तसाच फेकून द्यायचा, KFC, SPAR अशा दुकानातून घेतले खाद्य पदार्थ संपले की, तो कागदाचा टिन, तसाच रस्त्यावर टाकायचा, अगदी बाजूला Dust Bin असले तरीदेखील!! पण, नंतर जेंव्हा या गोऱ्या लोकांचे वागणे लक्षात येऊ लागले तशी मी, माझ्या सवयींना मोडता घातला. एवढेच कशाला, अगदी इथली मंदिरे,(यात चर्च, मशीद व आपली देवळे, सगळी आली!!) देखील अशीच झाडून पुसून ठेवल्यासारखी स्वच्छ आणि सुंदर असतात. कितीही गर्दी झाली तरी घाण म्हणून काही होत नाही. मला वाटत, हा मुळातल्या संस्काराचा भाग झाला. आपल्या लोकांवर असे संस्कार फारसे झालेच नाहीत. इथली हवा थंड असते, भारतासारखा लोकसंख्येचा बुजबुजाट नाही, असेही आणखी मुद्दे असतील तरीही जर का घाणच करायची असेल तर, ती कशीही आणि कधीही करता येते. सुदैवाने, अजूनतरी इथली स्वच्छता खरोखरच वाखाणण्यासारखीच आहे. अर्थात, अपवाद म्हणून, गलिच्छ बोळ, वस्त्या आहेतच.
डर्बनला Chatsworth येथे ESKON या संस्थेचे फार मोठे मंदिर आहे, तसेच इतर ठिकाणीही, लहान, मोठी बरीच मंदिरे आहेत. पण, प्रत्येक ठिकाणी, स्वच्छता हा पहिला भाग आणि नंतर शिस्त हीं नेहमीच अनुभवायला मिळाली आहे. हे आपले मंदिर आहे आणि हे आपणच स्वच्छ ठेवले पाहिजे, हीं जाणीव या लोकांच्यात मुरलेली आहे. याच पार्श्वभूमीवर, आपल्या इथली मंदिरे डोळ्यासमोर आणावीत.
वास्तविक, मी पक्का “नास्तिक” आहे, म्हणजे अगदी कर्मठ नास्तिक नव्हे, प्रसंगपरत्वे, मी देखील देवळात जाऊन मूर्तीला नमस्कार करतो. पण, मुळात देवळात जावे आणि शांतपणे चार क्षण घालवावेत, अशी इथली मंदिरे, आपली मनोकामना नेमकेपणाने पूर्ण करतात.
इथे गलिच्छ वस्त्या तर जरूर आहेत. अशा वस्त्यांना इथे Location असे म्हणतात. अशा वस्त्या, साधारणपणे, शहराबाहेर, आडरस्त्यावर असतात. बहुतांशी काळ्या लोकांच्याच अशा वस्त्या असतात. एखाद्या सडलेल्या अवयवाप्रमाणे या वस्त्या शहराचे रूप, कुरूप आणि दुर्गंधी करतात. असो, त्याबद्दल मी पुढील लेखात जरा विस्ताराने लिहीन.

साउथ आफ्रिका – भाग ८



साउथ आफ्रिका हा देश, तसे पहिले गेल्यास, आफ्रिका खंडातील युरोप!! हवा बरीचशी युरोपप्रमाणे थंडगार असते. अगदी, उन्हाळी दिवस(सध्या इथे उन्हाळा सुरु आहे!!) आले तरी देखील, मुंबईप्रमाणे, घामाने अंग उकडून गेले आहे, असा प्रकार फारसा किंवा अजिबात होत नाही. इथली हवामानाची एक फार सुंदर मजा आहे. समजा, सतत २ ते ३ दिवस कडक(इथल्या मानाने!!) उन पडले की साधारणपणे, चौथ्या दिवशी हमखास पाऊस हा पडतोच. पाऊस जरा जरी शिंपडला तरी सगळे हवामान लगेच बदलून जाते. पण, इथे मुंबईसारखा सतत ३,४ दिवस पाऊस कोसळत आहे, असे घडत नाही. अगदी, एखादे दिवशी दणकून पाऊस पडला, तरी त्याचा जोर फार तर दिवसभर किंवा थोडा जास्त!! त्यामुळे, एकूणच धूळ आणि धुळीचा त्रास, जवळपास नसतोच. एकतर, इथे धुळीचे प्रमाण तसे कमीच असते. अगदी, साधे रस्ते जरी बघितले तरी, रस्त्याच्या बाजूने, सिमेंटने बांधलेले पदपाथ असतात, त्यामुळे, धुळीचा संसर्ग होण्याची शक्यताच मावळते. Highways तर केवळ अप्रतिम!! अर्थात, हीं सगळी development गोऱ्या लोकांनी केलेली. मुळात, इथले हवामान, युरोप सदृश असल्याने, युरोपमधून गोरे लोक इथे काही शतकांपूर्वी स्थाईक व्हायला आले. सोन्याच्या खाणींचा शोध हा नंतरचा!! त्यांनीच हा देश अक्षरश: घडवलेला आहे. शहरे वसवलेली आहेत. विशेषत: जर्मनी, ब्रिटीश आणि डच लोक इथे फार भेटतात. आता, तसा त्यांचा मूळ  देशाशी फारसा संपर्क राहिलेला नाही, पण अजूनही त्यांनी स्वत:ची भाषा मात्र टिकवून ठेवलेली आहे. इथली म्हणून, आफ्रिकान्स नावाची राष्ट्रीय भाषा आहे पण तिच्यावर, डच भाषेचा जबरदस्त प्रभाव आहे. साधारणपणे, तुम्हाला जर इंग्रजी चांगल्यापैकी बोलता येत असेल तर, या देशात तुमचे काही अडू नये. आफ्रिकान्स भाषा देखील सर्वत्र बोलली जात नाही. भारतीय वंशाचे लोक, आजही इंग्रजी भाषाच बोलणे पसंत करतात. आफ्रिकान्स भाषा हीं साधारणपणे, गोरे आणि काळे लोक, यांच्यात प्रसिद्ध आहे. त्यातून, डर्बन आणि आजूबाजूच्या परिसरात ZULU भाषेचा प्रभाव आहे. ती मात्र शिकणे फार अवघड आहे. मला थोडे फार, आफ्रिकान्स शब्द आता बोलता येतात.
समजा इथे स्थायिक व्हायचे असेल तर मात्र या भाषा शिकणे, जास्त सोयीस्कर पडते. इथे अजूनही, “स्थायिक होणे” हीं गोष्ट जमण्यासारखी आहे. मी, स्वत: इथला “Permanant Resident” आहे आणि माझ्याकडे, इथले तसे परमिट आहे. त्यामुळे, या देशात, आता मी मनात येईल तितके दिवस राहू शकतो, कधीही भारतात परतू शकतो आणि परत या देशात येऊ शकतो. मला व्हिसाची गरज नाही. त्याचे असे झाले, मी जेंव्हा इथे १९९९ साली पाच वर्षे पूर्ण केली, तेंव्हा मला Home Affairs कडून पत्र आले की, जर का या देशात राहायचे असेल तर, ID (Identity Document) साठी apply कर, अन्यथा देश सोडावा लागेल. मग, काय लगेच निर्णय घेतला आणि इथली Permanant Residency मिळवली. इथले ID म्हणजे, अमेरिकेच्या भाषेतील Green Card!!
आता मात्र, मला या देशाची चांगलीच सवय लागलेली आहे. इथे जर का तुम्ही, तुमच्या आयुष्याचा सूर जरा खालच्या पट्टीत ठेऊन राहिलात, तर मात्र फारसा त्रास होत नाही. या देशात, भारताच्या मानाने राहण्याच्या सुविधा खरोखरच अप्रतिम आहेत. इथे, कार घेणे जरी अत्यावश्यक असले तरी सहज जमू शकते. अगदी, ज्या गाड्या भारतात, Luxury म्हणून गणल्या जातात, त्या गाड्या इथला सर्व सामान्य माणूस सहज वापरतो. इथे Volks Wagon, BMW किंवा Mercedes सारख्या भारतात महाग म्हणून गणल्या जाणाऱ्या गाड्या, इथला मध्यमवर्गीय माणूस वापरत असतो!! घरे देखील अति प्रशस्त असतात. एकूणच, इथे भारताप्रमाणे गगनचुंबी इमारती, ऑफिसेसच्या वगळता फारच तुरळक आढळतात. बहुतेकजण इथल्या भाषेत, House मध्ये राहत असतात. आपल्या सारखी Flat व्यवस्था इथे फार थोड्याप्रमाणात आढळते. बहुतेकजण, आपले स्वतंत्र घर घेऊनच राहत असतो. अर्थात, प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे, घर असते, तो भाग वेगळा. पण, साधारणपणे, मध्यमवर्गीय माणूस, २ ते ३ बेडरूम अशा घरात राहत असतो. मुळात, भारताच्या मानाने लोकसंख्या फारच कमी आणि त्यामानाने प्रचंड जागा उपलब्ध असल्याने, घराच्या किमती, भारताच्या मानाने फारच नगण्य असतात. त्यातून, इथे लोन सिस्टीम फारच सोपी आणि सहज आहे. त्यामुळे, तुम्हाला एकदा का नोकरीचे हमीपत्र मिळाले की, लगेच बहुतेकजण, गाडी आणि घर, याची सोय आधी करतात आणि आयुष्यात स्थिरावायला सुरवात करतात. सध्या तर इथे, Real Estate Business फारच घसरला असल्याने, घराच्या किमती अगदी वाजवी दरात उपलब्ध आहेत. पेट्रोलदेखील भारताच्या मानाने स्वस्त असल्याने, कुठेही जायचे झाल्यास, गाडीने जाणे सहज परवडते. त्यातून रस्ते अप्रतीम्म असल्याने, गाड्यांची झीज देखील फार होत नाही आणि गाड्या १०० ते १२० या स्पीडने धावू शकतात. मी तर कितीतरी वेळा, जोहानसबर्ग ते डर्बन हे ६०० कि.मी अंतर फक्त ६ तासात संपविलेले आहे.
इथे, इंडियन स्टोर्स प्रत्येक शहरात आहेत आणि तिथे, तुम्ही म्हणाल ते भारतीय जिन्नस हवे तेवढे उपलब्ध असतात. आता, अतिशयोक्ती करायची नाही, असे ठरविले तरी देखील, मी जो बासमती तांदूळ घेतो, तो मी भारतात बघितलेला देखील नाही. तसेच, खाण्याचे इतके पदार्थ मार्केटमध्ये मिळत असतात कि, कुठला घेऊ नि कुठला टाळू, असा संभ्रम मला आजही पडतो!! विशेषत: ब्रेड, बटर आणि चीज यांचे अगणित प्रकार मिळतात. तोच प्रकार दुध आणि तत्सम जिन्नस. तसेच, इथली अप्रतिम हॉटेल्स आणि पब्स!! माझा इथला एक ग्रुप, आम्ही, अगदी महिन्यातून एकदा तरी एकत्र जमतो आणि ती संध्याकाळ एखाद्या हॉटेलमध्ये किंवा पबमध्ये घालवतो. मग ते हॉटेल रस्त्याच्या कडेला देखील असते किंवा एखाद्या मॉलमध्ये!! इथल्या पबला गुत्ता म्हणणे अशासारखा दुसरा अपमान नसावा!! अतिशय शांत आणि अत्यंत व्यवस्थित जागा असते. नुसता बियरचा एक ग्लास घेऊन जरी बसलो तरी वेळ कसा निघून जातो, ते लक्षात देखील येत नाही. गप्पा मारायला अतिशय योग्य जागा!! इथे KEG या नावाने, पबची एक चेन आहे आणि त्याचा दर्जा खरोखरच अनुभवण्यासारखं असतो. साधारणपणे, चित्रपटात(इंग्लिश!!) ज्याप्रमाणे Irish पब दाखवला जातो, त्याच धर्तीवर हे पब्स असतात. मी, सेंच्युरीयन इथे राहत असताना, माझ्या कॉम्प्लेक्स समोरच KEG चा एक पब होता(तो पब अजूनही आहे!!) आणि, मी कितीतरी संध्याकाळ त्या पबमध्ये अविस्मरणीय अशा घालवल्या आहेत.
साउथ आफ्रिकेत आयुष्य कसे जगावे, हे चांगल्याप्रकारे शिकता येते, अर्थात, जर का युरोपियन किंवा अमेरिकन पद्धतीने आयुष्य काढायचे असेल तर. पण, जर का चाळसंस्कृती प्रमाणेच आयुष्य काढायचे असेल तर, साउथ आफ्रिका हीं जागा नव्हे!! इथे भौतिक सुखाच्या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत, फक्त मानसिक शांती मात्र फार तुरळकरित्या लाभते. सतत, पैसा आणि पैसा, याच्याच मागे लागावे लागते. सतत, घड्याळाप्रमाणे आयुष्य बांधावे लागते, एकदा का त्या गतीशी जुळवून घेतले, कि मग काही फारसा त्रास होत नाही, अन्यथा तुमची फरफट होणारच!! गतीच्या आयुष्याचा अधिक अनुभव हा जोहानसबर्ग इथे जास्त जाणवतो. डर्बन, केप टाऊन आणि इतर शहरे इतकी वेगवान नाहीत पण, जोहानसबर्ग मात्र खूपच वेगवान आहे.

साउथ आफ्रिका-शहर जोहानसबर्ग




आतापर्यंत, आपण साउथ आफ्रिकेतील सामाजिक परिस्थितीबद्दल थोडक्यात माहिती घेतली. वास्तविक, काळ्या लोकांचा समाज आणि कलर्ड लोकांचा समाज, या विषयावर फारसे काही लिहिले नाही. याचे मुख्य कारण, या समाजात मला तितकेसे मिसळता आले नाही. मुळात: काळे लोक, हे इतरांपासून जरा फटकून आणि वेगळेच राहतात. त्यातून त्यांची वागण्याची पद्धत, जरा गुर्मीत राहणारी असते. असे नव्हे की, सगळेच काळे एकाच साच्यात बसवता येतील, पण बहुतेक काळे लोक हे स्वत:पुरते बघणारे आणि स्वत:च्याच कोशात वावरणारे असतात. त्यातून, मी देखील कधी फारसा इंटरेस्ट दाखवला नाही. कामाच्या संदर्भात, जेव्हढा संबंध आला, तितकाच आणि तेव्हढाच संबंध माझ्याकडून राखला गेला. तोच प्रकार, कलर्ड समाजाबद्दल. खर तर, हा समाज, मुळातच गैर लैंगिक संबंधातून अधिकतर जन्माला आला!! कलर्ड याचा अर्थच मुळी, एकतर बाप गोरा आणि आई काळी, किंवा आई गोरी आणि बाप काळा!! शक्यतोवर भारतीय वंशाचे लोक, या वाटेला फारसे गेलेले आढळत नाहीत. अगदीच सापडत नाहीत, असे देखील नाही पण एकूण प्रमाण नगण्यच म्हणावे लागेल. कारण,इथे पूर्वीपासून गुलाम म्हणूनच वागवले गेल्याने आणि गोऱ्या लोकांची अनन्वित अत्याचार करण्याची प्रवृत्तीलालसा यातून, प्रामुख्याने हा समाज उदयाला आला. त्यामुळे, जिथे जन्मच मुळी, अनैतिक संबंधातून आलेला असल्याने, एकूणच मानसिक जडण घडण हीं अतिरेकी आणि स्वैर विचारांचीच होत गेली. आजही, त्यात फारसा बदल नाही. त्यामुळे असेल, कदाचित पण माझा या समाजाशी फारसा जवळचा संबंध आला नाही. त्यातून, बरेचसे काळे,जरा उग्र स्वभावाचेच भेटले. त्यामुळे, मी आपसूकच दूरस्थ अंतर राखूनच संबंध ठेवले. काही वर्षांपूर्वी, मी जेंव्हा UB group मध्ये काम करत असताना, मला साउथ आफ्रिकेतील अंतर्भागात बरेच फिरावे लागले. आमचे सेल्स डेपोज हे फार अंतर्भागात होते, आणि माझ्या कामाचा एक भाग म्हणून, त्या डेपोजना भेट देणे आवश्यक असायचे. त्यावेळी, मला जे साउथ आफ्रिकेचे दर्शन घडले, ते सहजी विसरण्यासारखे नाही.
आपल्या भारतात, ज्याला दारूचे गुत्ते म्हणतात, त्याची प्रतिकृती इथले बियर हॉल आहेत. एकतर, देशाच्या अंतर्भागात राहण्याची इतकी वाईट अवस्था आहे की आपण कल्पना देखील करू शकणार नाही. इतकी वर्षे, मी शहरात घालवल्यानंतर, हे जुनाट दर्शन, मला जरा धक्का देणारेच ठरले. घरात साधा रॉकेलचा दिवा नाही, सतत अंधारी वातावरण, घरात नेहमीच दारूचा भपकारा येत असतो. बियर हॉलमध्ये तर, नेहमी मिणमिणणारे दिवे आणि, बरेचसे झिंगलेले दारुडे, असेच वातावरण असते. कुठेतरी शिळ्या बियरचा वास कोंदटलेला असतो , कुणीतरी अर्धवट नशेत अर्वाच्य शिव्या हासडित असतो, असे अतिशय बकाल वातावरण असते. आसपासची घरे देखील, फक्त मातीची किंवा शेणाने सारवलेली असतात. आजूबाजूला, घाणीचा नुसता बुजबुजाट माजलेला असतो. मला तर, कधी एकदा stock report बनवून, निघतो, असे प्रत्येक वेळी वाटायचे.
असो, यावरून, जोहानसबर्ग शहराची कल्पना करू नये. जोहानसबर्ग शहर म्हणजे साउथ आफ्रिकेच्या ऐश्वर्याचा चांद!! विशेषत: इथली उपनगरे म्हणजे या शहराची शान आहे. Sandton, Midrand, Bendfordview, Randburg, East Gate, Benoni इत्यादी उपनगरे खरोखरच अप्रतिम आहेत. नुसते इथले मॉल्स जरी हिंडत बसलो तरी आठवडा सहज निघून जाईल(काहीही खरेदी न करता!!) इथले रस्ते, इथले हवामान, एकूणच infrastructure हे जागतिक दर्जाचे आहे. जसे भारतात, मुंबईचे स्थान तसे इथे जोहानसबर्गचे स्थान. देशातील बहुतेक सगळ्या आर्थिक घडामोडीचे केंद्रबिंदू. देशातील सर्वात जास्त उद्योगधंदे, करमणुकीची साधने, उंची हॉटेल्स, अप्रतिम मॉल्स, सगळे काही इथे उपलब्ध आहे. इथले Lion Park देखील सुंदर आहे. इथे, तुम्ही सिंहाच्या छाव्यांशी खेळू शकता, फोटो काढू शकता. जोहानसबर्ग हे समुद्रसपाटीपासून खूपच उंचावर असल्याने, हवा बहुतेकवेळा थंडच असते. इथल्या घरात जर डोकावून पहिले तर असे लक्षात येईल की, या घरात पंखे अडकवायची सोयच नाही. असे नव्हे, की कुठेच सिलिंग पंखे दिसत नाहीत पण शक्यतो बहुतेक घरात table fan असतात. घरात, हीटर मात्र आवश्यक कारण अगदी उन्हाळ्याच्या दिवसात देखील जरा जोराचा पाऊस पडला तरी हवा बोचरी थंड होते. थंडीच्या दिवसात तर, हीटरशिवाय गत्यंतरच नाही!! इथले रस्ते देखील पाहण्यासारखे आहेत, अगदी सरळसोट रस्ते, फक्त वर खाली फार आहेत, कारण शहरच मुळात वेगवेगळ्या टेकड्यांवर वसलेले आहे. इथेच देशाचे प्रमुख शेयर मार्केट आहे. त्यामुळे, सगळ्या आर्थिक घडामोडी इथूनच हलवल्या जातात. तसा विचार केला तर, या शहरात खास काय बघण्यासारखे आहे, तर थोडा प्रश्नच आहे. मॉल्स वगैरे इमारती सोडून दिल्या तर, मात्र बघण्यासारखे खास काहीही नाही. इथेच जगप्रसिद्ध क्रिकेटचे Wanderors हे स्टेडियम आहे. खरेदी करायला, जोहानसबर्गसारखे दुसरे शहर नाही. या शहरात काय मिळत नाही, हाच खरा प्रश्न आहे. जगातील सगळ्या उत्तमोत्तम गोष्टी इथे सहज उपलब्ध आहेत. अर्थात, जगातील इतर शहराप्रमाणे, या शहरातही गलिच्छ वस्ती आहे. Sandton सारख्या अति श्रीमंत उपनगराच्या बाजूलाच, Hillbrow सारखे अत्यंत बकाल आणि गुन्हेगारीने बुजबुजलेले उपनगर आहे. तिथे तर, मी रात्री तर सोडूनच द्या, दिवसा देखील एखाद, दुसरा प्रसंग वगळला तर गेलेलो नाही. अर्थात, या भागात, गोरे लोक राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
आर्थिक केंद्र असल्याने, आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण देखील या शहरातच अधिक!! रात्री शहराच्या सेन्ट्रल विभागातून पायी हिंडण्याचे धाडसच होत नाही. खरतर, साउथ आफ्रिकेत, रात्रीचे पायी हिंडणे एकूणच फार धोकादायक आहे. इथेच मला मुंबईची फार आठवण येते. मुंबईत, दिवसा तर सोडूनच द्या, रात्रीदेखील, तुम्ही आरामात रस्त्यावरून हिंडू शकता. मुळात, जोहान्सबर्ग शहर हे अति प्रचंड आणि पसरलेले आहे. जवळपास, मुंबईच्या तिप्पट तरी पसरलेले शहर आहे. सगळे शहर, highway ला जोडलेले आहे. जवळपास २५ off-ram आहेत, म्हणजे उपनगरे!! त्यामुळे, गाडी चालवताना, जरा सावधानगीरीच बाकागावी लागते, कारण जर का तुम्ही तुमचा off-ram चुकलात, तर तुम्हाला कमीत कमी ३ ते ४ की.मी,चा उलटा प्रवास करणे आवश्यक ठरते.

साउथ आफ्रिका – जोहानसबर्ग २



जेंव्हा मी या शहराचा विचार करतो तेंव्हा, काही गोष्टी लगेच ठळकपणे ध्यानात येतात. पहिला विचार – या शहराचा विस्तार!! मुंबई जेंव्हा डोळ्यासमोर येते तेंव्हा त्याच्या समोर, हे शहर प्रचंड मोठे आणि विस्तारलेले आहे. दुसरे म्हणजे, मुंबईची लोकसंख्या आणि त्यामुळे झालेली परवड. तसा प्रकार या शहरात झालेला नाही. शहर अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने वाढलेले आणि वाढवलेले आहे. इथे, वाहतुकीचा खोळंबा होतो पण तो बहुतेकवेळा सकाळी ऑफिसच्या वेळी किंवा संध्याकाळी ऑफीस सुटताना!! अन्यथा इथे वाहतूक आत्यानी सुरळीत चाललेली असते. वाहतुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात, हे इथल्या लोकांच्या मनावर ठामपणे बिम्बलेले आहे. कुठे वाहतूक अडकली असेल तर, लगेच Road Petrol Guards तिथे पोहोचून, अडकलेली वाहने आणि रहदारी मार्गी लावून देतात. इथली लोकसंख्या लाखांच्या घरात आहे आणि गाड्या देखील त्याचप्रमाणात रस्त्यावर धावत असतात पण, कुठेही(अपवाद वगळता!!) गडबड, गोंधळ नसतो. गाडीचा हॉर्न कितीतरी वेळा वाजवण्याची गरजच भासत नाही. गाड्या सिग्नलपाशी थांबतात, सिग्नल सुरु झाला की आपापल्या मार्गाने निघून जातात. हॉर्न वाजवायचा कशासाठी?? इथे गाड्यांचे अपघात होतात, याचे प्रमुख कारण म्हणजे बेपर्वाई!! आणि दुसरे कारण, अति ड्रिंक्स घेऊन गाडी चालविणे!! अर्थात, बेपर्वाईने गाडी चालविणाऱ्यात काळे ड्रायवर प्रमुख!! इथे, सर्वात धास्ती कशाची वाटत असेल तर, Taxi चालविणारे!! हे अधिकतर काळेच असतात आणि ते मात्र वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून गाड्या हाकीत असतात. अति ड्रिंक्स घेऊन गाडी चालविणारे मात्र अति धीकादायक!! इथे अशा अपघातांची संख्या जास्त आहे, विशेषत: ख्रिस्तमसच्या वेळी तर, प्रकार अधिक घडतात. इथल्या पोलिसांनी, एक उपकरण शोधले आहे आणि त्याद्वारे, ते, तुम्हाला श्वास घ्यायला लावून, तुम्ही किती ड्रिंक्स घेतले आहे, याची तपासणी करू शकतात. तरी देखील अपघात होतातच. या वर्षी, इथे फक्त जोहानसबर्ग शहरातच जवळपास १२०० लोक ड्रिंक्स पिऊन गाडी चालविल्याने प्राणास मुकले!! अन्यथा, इथे अपघात होण्याचे काहीच कारण नाही. गाड्या अतिशय दणकट आणि सुंदर व रस्ते त्यालाच सोयीस्कर असल्याने, इथे ड्रायविंग कारणे, हा एक आनंदाचा भाग असतो.
आर्थिक व्यवहाराचे केंद्रबिंदू असलेले हे शहर, एकूणच अति व्यावहारिक आहे. इथे रस्त्यात गाडी बिघडली तर, तुम्हाला, इंश्युरंस कंपनीला फोन करावा लागतो. कुणी तरी आपली गाडी थांबवून आपल्याला मदत करील, हीं आशा, इथे फोल आहे. अर्थात, यात लोकांना दोष देणे चुकीचे आहे. समजा, मी गाडी थांबवून मदतीचा हात पुढे केला, आणि जर का तो गुन्हेगार निघाला तर, आपले प्राण संकटात!! असे प्रकार इथे बरेच वेळा घडले असल्याने, कुणी तसे धाडस करीत नाही. इथे अर्थातच “पैसा” भरपूर आहे आणि याचे कारण, इथे जगातील बहुसंख्य मोठ्या कंपन्यांची ऑफिसेस आहेत. इतर शहराच्या मानाने, इथे महागाई आहे, घरे देखील महाग आहेत, गाड्या देखील त्याच मार्गावर आहेत. तरीदेखील, इथे नोकरीसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. “पैसा” भरपूर असल्याने, त्या पाठोपाठ गुन्हेगारी आलीच!! इथे, लोकल काळे तर सोडूनच द्या, पण नायाजेरीयावरून आलेल्या काळ्यांनी आपले बस्तान गुन्हेगारी जगात ठामपणे बसविले आहे. अगदी, ड्रग्स, स्मगलिंग आणि वेश्या व्यवसाय, यात नायजेरियन लोकांचा हात बराच आहे. पण, थोडा विचार केला तर, हे धंदे कुठल्या शहरात नाहीत!! फक्त, इथे सुरक्षा हा मात्र अधिक चिंतेचा विषय आहे.अर्थात, फक्त काळ्यांना का दोष द्यावा, कधीतरी भारतीय वंशाचे लोक, गोरे लोक आणि कलर्ड लोक देखील या गुन्हेगारी जगात आढळतात.
इथे वेश्या व्यवसाय मात्र बराच आहे. प्रत्येक उपनगरात त्यांची वस्ती आढळते. इथे, अगदी रोजच्या वर्तमानपत्रात देखील त्यांच्या जाहिराती येतात!! इथे सेक्स हा एक मूलमंत्र आहे, असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. याचा प्रत्यय, कितीतरी हॉटेल्समध्ये येतो. इथे बरेच ठिकाणी, अगदी NUDE Clubs देखील आहेत!! एव्हढे कमी आहे की काय, म्हणून, मागील वर्षापर्यंत, चक्क E Net(इथे SABC 1,2,3 आणि E Net हीं Channels आपल्या दूरदर्शनप्रमाणे सर्वत्र उपलब्ध असतात!!) या channel वर, दर शनिवारी रात्री बारानंतर, पुढील चार तास, सतत Porn Movies दाखवीत असत!! फक्त, असे चित्रपट दाखवायच्या आधी एक ठळक सूचना येत असे, बस!! आताच, काही महिन्यांपासून असे चित्रपट बंद झाले. आता, याला काय म्हणायचे!! अशा परिस्थितीत इथे एड्सचा प्रादुर्भाव होणार नाही तर काय!! त्यामुळे, इथे नेहमीच्या जाहिराती, विक्री अशा दैनंदिन गोष्टींवर, याच सेक्सचा परिणाम झाल्याचे दिसून येते. काळ बदलाल असे आपण नेहमी म्हणतो, पण हा काळ कुणी बदलला, याचे उत्तर मात्र शोधायच्या भानगडीत पडत नाही. आणि प्रत्येक वेळेस, “आमच्या वेळी हे असे नव्हते” असले रडगाणे लावायचे. प्रत्येक पिढी हीं पुढील पिढीला नावे ठेवीत असते आणि हे युगानुयुगे चालू आहे, पण जी नवीन पिढी बिघडलेली आहे, तिला बिघडवण्याचे काम मात्र मागील पिढीच करीत असते, हे सोयीस्कररित्या विसरले जाते. हल्ली, मुलींचा मोकळेपणा अधिक वाढलेला आहे, असा एक सर्रास आरोप केला जातो, पण यात काही तथ्य नाही. अगदी, उदाहरणच द्यायचे झाल्यास, कालिदासाच्या काळात, राजा दुष्यंताने शकुंतलेच्या बाबतीत काय वेगळे केले? अगदी, रामाच्या काळातदेखील सगळ्या स्त्रिया काही सीता नव्हत्या. मुली आणि त्यांना फसविणे आणि त्याचा बाजार अस्तित्वात असणे, या गोष्टी फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. तेंव्हा, आताच काळ बिघडलेला आहे, अशी हाकाटी मारण्यात काही अर्थ नाही. काळानुरूप, बिघडण्याचे स्वरूप बदलत जाते, इतकेच. तेंव्हा, जोहानसबर्ग शहरात, शीलाचा व्यापार बराच अस्तित्वात आहे, म्हणून नावे ठेवण्यात काहीच अर्थ नाही. असो, आता पुढील भागात, आपण डर्बन शहराबद्दल वाचूया.

साउथ आफ्रिका – डर्बन!!




माझा गेल्या पंधरा वर्षातील काळ ध्यानात घेतला तर, त्यातील बरीचशी वर्षे हीं पिटरमेरित्झबर्ग आणि डर्बन याच परिसरात गेली. त्यामुळे, आपसूकच डर्बन शहराबद्दल माझ्या मनात ममत्वाच्याच भावना आहेत. एकतर, या शहरात भारतीय वंशाची लोकसंख्या बरीच आहे. त्यामुळे, कितीही नाही म्हटले तरी, अशा लोकांशी तुमच्या ओळखी लगेच होतात आणि तश्या माझ्या झाल्यादेखील. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी, इतिहास हेच सांगतो की, या शहरात ब्रिटीश लोकांनी इथे भारतीयांना उसाच्या लागवडीसाठी प्रथम आणले. गेल्या वर्षी, त्यानिमित्ताने इथे बरेच समारंभ आयोजित केले होते. त्यावेळचे आणलेले भारतीय. हे प्रामुख्याने “गुलाम” म्हणूनच आणले गेले. हळूहळू, त्या भारतीयांनी, इथे स्थिरावायला सुरवात केली. अर्थात, त्यावेळचे भारतीय हे, मुलत: निरक्षरच होते. नंतर, इथे त्यांनी स्वत:चे आयुष्य मांडायला सुरवात केली. मग, त्यावेळच्या चालीरीती(ज्या आजही अत्यंत आंधळेपणाने पाळल्या जातात!!), त्यावेळची संस्कृती, सण वगैरे गोष्टी इथे रुजवायला सुरवात झाली. वंश-भेद सिस्टीम हीं नंतरच्या काळातली. आजही, त्यावेळच्या संस्कृतीच्या काही खुणा इथे आढळतात. महात्मा गांधी वगैरे सुशिक्षित माणसे हीं नंतरच्या काळात आली. आज, त्यावेळचे काही फोटो बघताना, एकूणच मजा वाटते. आता तर, इथे भारतीय वंश चांगलाच स्थिरावला आहे. खरतर, गुजराती समाज वगळता, इथल्या भारतीय लोकांचा, भारताशी संबंधच मधल्या काळात तुटला होता आणि आलाही, इथे काही लोकांना, त्यांच्या “मूळ” गावाविषयी काही विचारले तर, धडपणे सांगता येत नाही!! गुजराती लोकांचे मात्र खरच कौतुक वाटते. त्यांनी, आपले सण, रीतीरिवाज, भाषा, वेशभूषा, वगैरे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे जपून ठेवल्या आहेत, इतके की, तुम्ही त्यांच्याशी अगदी अस्खलितपणे गुजराती भाषेत बोलू शकता. तुम्हाला पत्ता लागणार नाही, की तुमच्याशी बोलणारी माणसे, हीं इथली चौथी, पाचवी पिढी आहे!! मात्र, तसे इतर लोकांच्या बाबतीत दिसत नाही. मुळचे तमिळ, तेलगु, बिहारी व राजस्थानी लोक, त्यांची भाषा तर सोडूनच द्या, पण इतर खास गोष्टी देखील पार विसरलेले आहेत. साधे धड हिंदीदेखील फारसे बोलता येत नाही, थोडेफार येते, ते हिंदी चित्रपट बघून!! मला याचे नेहमीच नवल वाटत आले आहे, जी गोष्ट गुजराती लोकांना जमली, ती, या इतर भाषिकांना का जमली नाही?
जेंव्हा इथे Apparthied System शिगेला पोहोचली होती, तेंव्हा या देशाचा सगळ्या जगाशी संबंध तुटला होता आणि हेच कारण, इतर भारतीय नेहमी पुढे करतात, पण मग त्यात गुजराती लोकदेखील होतेच की, तेंव्हा त्यांनादेखील तितकाच जाच झाला जितका या लोकांना झाला. पण, त्यांनी अगदी अहमहमिकेप्रमाणे आपली भाषा संवर्धित केली. यावर मात्र, हे लोक गप्प बसतात.
असो, डर्बन हे शहर, अरेबियन समुद्रकिनारी वसलेले आहे. एकूणच इथले हवामान, आपल्या भारतीयांना सहज भावण्यासारखे आहे, म्हणजे, इथे कधीही कडाक्याची थंडी पडत नाही. मला तर इथे कधीही Jacket घालावेसे वाटले नाही. इथे भारतीय लोकसंख्या बरीच असल्याने, इथे वावरायला देखील खूप चांगले वाटते. जोहानसबर्गप्रमाणे, इथे देखील, नोकरीच्या बऱ्याच संधी उपलब्ध असतात पण एकूणच शहर तसे काही फार पसरलेले नाही. आताच गेल्या काही वर्षात, या शहराची वाढ पसरायला लागलेली आहे. आजूबाजूची गावे आता शहरात अंतर्भूत व्हायला लागली आहेत. त्यातून आता, नवीन विमानतळ एका नव्या गावात झाल्यापासून तर, शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात सुरु झाले. इथली हवा, आपल्या सारख्या भारतीय माणसाना मानवणारी असल्याने म्हणा, मला डर्बन फार आवडले. जोहानसबर्ग शहराचा विस्तार फार प्रचंड असल्याने, ते शहर तसे अंगावरच येते तसे, डर्बन बाबतीत घडत नाही. इथे अत्यंत सुंदर समुद्र किनारे आहेत. व्हाईट लोकांनी, त्या किनार्यांचे सौंदर्य अधिक कसे वाढेल, अशा रीतीने जपणूक केली आहे. इथे वर्षाचे बाराही महिने, समुद्राच्या लाटांवरील खेळ चालू असतात, उदाहरणार्थ, skeing, water boating इत्यादी. इथे काही समुद्र किनारे असे देखील आहेत की, एखाद्या संध्याकाळी निरवपणे ध्यानस्थ बसता येते. इथे किनारे बरेच असल्याने, अर्थातच मासे आणि त्यांचे Aquarium, Dolphin Show इत्यादी गोष्टी खरच बघण्यासारख्या आहेत. त्यातून, निरनिराळे Water Sports तर वेगळीच धुंदी आणतात.
केप टाऊन, पोर्ट एलिझाबेथ आणि डर्बन हीं, या देशातील अशी शहरे आहेत की, केवळ समुद्र किनारे आणि त्यांचे सौंदर्य उपभोगणे, यासाठी इथे वारंवार यावे!! केप टाऊन तर, फारच बहारीचे आहे. इथे सर्व प्रकारच्या हॉटेल्सची सोय आहे. Hilton, Holiday Inn सारख्या पंच तारांकित हॉटेल्स पासून ते, Road Lodge, City Lodge सारख्या सामान्य माणसाना परवडणाऱ्या हॉटेल्सची इथे भाऊगर्दी आहे. या शहरात जितकी भारतीय हॉटेल्स सापडतात, तितकी, अगदी केप टाऊन मध्ये देखील नाहीत. मी जेंव्हा या शहरात राहत होतो, तेंव्हा महिन्यातून एकदा तरी, लांबवरच्या समुद्रकिनारी भेट देऊन यायचे, हा माझा नित्याचा कार्यक्रम होता. शहरातील किनाऱ्यांवर फार गर्दी असते, विशेषत: शनिवार-रविवार हे दिवस तर, अशा ठिकाणी फारच गर्दीचे असतात. अगदी गाडी कुठे पार्क करायची, इथून प्रश्न सुरु होतात. त्यामानाने, दूरवरचे किनारे तसे अति शांत आणि मोकळे असतात. त्यानिमित्ताने, गाडीदेखील जोरदारपणे घुमवता येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, मिळणाऱ्या शांततेने मनाला मोठा विरंगुळा लाभतो.
इथेच, Chatsworth या उपनगरात ESKON चे कृष्ण मंदिर आहे. मंदिर खरोखरच फार भव्य आहे. अति सुंदर आणि तितकेच अति स्वच्छ!! मी राहायचो त्यापासून हे ठिकाण तसे लांब होते, पण कधीतरी जायला फार मजा यायची. तशी शहरात इतर हिंदूंची बरीच मंदिरे आहेत. इथे तसे म्युझियम वगैरे आहे पण ते काही खास बघण्यासारखे नाही. इतर शहरांप्रमाणेच इथेदेखील अप्रतिम मॉल्स आहेत. बऱ्याच वेळा तिथे हिंदी चित्रपट लागतात. हल्ली तर, इथे बऱ्याच हिंदी चित्रपटांचे शुटींगदेखील होते. एकतर, युरोपप्रमाणे अप्रतिम लोकेशन्स सापडतात आणि एकूणच खर्चदेखील त्यामानाने बराच कमी येतो. इथे एकूणच राहण्याचा खर्च तसा कमी आहे, कारण घराच्या किमती आणि गाड्यांच्या किमती!! इथेदेखील अजूनही, तुम्हाला, भारतीय, काळे, कलर्ड आणि गोरे अशा वेगवेगळ्या वसाहती आढळतील आणि अर्थातच त्यानुरूप त्यांचे राहणीमान!! माझ्यासारखे जे हल्लीच भारतातून आलेले आहेत, ते शक्यतोवर, गोऱ्या लोकांच्या वस्तीतच रहातात. इथेदेखील आता हळूहळू गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललेले आहे तरीही, निदान दिवसा ढवळ्या तरी, तुम्ही इथे रस्त्यावरून हिंडू शकता. जोहानसबर्ग आणि डर्बन, या शहरातील एक फरक प्रकर्षाने जाणवतो व तो म्हणजे डर्बनमधील दाट झाडी!! खरे तर, जोहानसबर्गमध्ये देखील झाडी भरपूर आहे, शहराच्या मध्यभागी Emerentia सारखे अति विस्तीर्ण उद्यान आहे, की जिथे आत शिरल्यावर, बाहेरील जगाशी संबंधच तुटल्यासारखा होतो, तरीदेखील डर्बन आणि एकूणच नाताळ राज्यातील हिरवेगारपणा काही और आहे. एकही रस्ता असा सापडत नाही की तिथे झाडांची गर्दी नाही!! त्यामुळे, अगदी कडक उन्हाळा जरी झाला तरी एकूणच सगळे वातावरण शांत असते. इथल्या लोकांना शिकवण आहे की नाही, मला कल्पना नाही, पण आपल्यासारखी इथे वृक्षतोड वगैरे प्रकार घडत नाही. वृक्ष तोडले जातात, ते केवळ वादळाने आडवे झाले म्हणू किंवा एकूणच रहदारीला त्रासदायक झाले म्हणून. खरतर, हिरवी झाडी, हीं डोळ्यांना किती विश्रांती देते, हे जणू आपल्याला भारतात, कुणी समजावून सांगितलेच नाही!! डर्बन टुमदार आहे, बरीच भारतीय माणसे सहज आणि वारंवार भेटतात, दिसतात, म्हणून असेल पण या शहराने माझ्या मनात “घर” केले, हे मात्र नक्की.

George Benson-JAZ​Z Supreme!!




आपल्याकडे अजूनही, पाश्चात्य संगीत म्हटले नाकं मुरडणारी बरीच सापडतात. किंबहुना, पाश्चात्य संगीत म्हणजे थिल्लरपणा, असा देखील एक समज पसरलेला आहे. याचे मुख्य कारणे, १] टीव्हीवर जे उत्तान संगीत दाखविले जाते, त्यामुळे असा समज लगेच दृढ होतो. २] अकारण, आपल्या संगीताचा अतिरेकी अभिमान बाळगायचा.आपले संगीत म्हणजे “देवाची पूजा” असा एक पक्का समज पसरलेला आहे. अर्थात, त्या समजात थोडे तथ्य देखील आहे पण, केवळ देवपूजा म्हणजेच आपले संगीत, हा विलक्षण कोत्या मनोवृत्तीचा परिपाक आहे. त्या पलीकडे आपले संगीत फार विशाल आहे. पण, जर का मोकळ्या मानाने, पाश्चात्य संगीताचा आस्वाद घेतला तर, ते संगीत देखील विलक्षण समृद्ध आहे, असे समजून येते. आपल्या प्रमाणे. पाश्चात्य संगीतात देखील वर्गीकरण आहे. म्हणजे, आपल्याकडे, १] राग संगीत, २] ठुमरी, गझल, होरी, चैती, बैठकीची लावणी असे उपशास्त्रीय संगीत प्रकार, आणि नंतर भावगीत, चित्रपट संगीत आणि असेच कितीतरी भावाविष्कार प्रचलित आहेत त्याप्रमाणे, पाश्चात्य संगीतात, १] सिम्फोनी, २] ऑपेरा संगीत, ३] जाझ संगीत, ४] रॉक संगीत इत्यादी. प्रत्येक वेळेस, या वर्गीकरणाच्या दृष्टीकोनातून, मग, आपले राग संगीत म्हणजे पाश्चात्यांचे सिम्फोनी संगीत असा जूळवाजुळवीचा प्रकार सुरु होतो. खरे पहिले तर, यात तसे थोडे सत्य असले तरी फरक फारच दृष्टीस पडतो.
असाच प्रकार, जाझ संगीताबाबत घडतो आणि तो प्रकार, आपल्या उपशास्त्रीय संगीताशी जुळवला जातो. वास्तविक जरा बारकाईने ऐकले तर, असेच लक्ष्यात येईल की, साम्यापेक्षा भिन्नताच अधिक आहे. फक्त, साम्य इथे दिसते की, आपले उपशास्त्रीय संगीत हे संथ लयीत सुरु होते आणि अखेर द्रुत लयीत त्याची सांगता होते, तसाच प्रकार, जाझ संगीतात बरेच वेळा घडतो आणि अखेर हा एका विलक्षण द्रुत ताल आणि लय, या संयोगाशी संपतो. अन्यथा, स्वर रचना आणि सादरीकरण यात बराच फरक पडतो. स्वर तेच असतात, म्हणजे सातच सूर दोन्हीकडे असतात पण, सूर कसे लावायचे या दृष्टीकोनात फरक पडतो. जसे व्हायोलीन वाद्याबाबत म्हणता येते. केवळ हातात धरण्याच्या पद्धतीत फरक पडल्याने, त्याच वाद्यातून निघणारे स्वर वेगळे होतात. आणि, मला वाटते, इथेच भारतीय लोकांचा मतभेद सुरु होतो.
आता, George Benson!! हा काळा गायक/वादक खरोखरच जाझ संगीतातील(चमत्कार वगैरे मी म्हणणार नाही!! कारण चमत्कार हे काळातून फक्त एखाद दोनदाच होतात!!) एक अलौकिक कलाकार होता. मुळात, काळ्या वर्णाच्या गायकांना, निसर्गत: खर्ज स्वराची देणगीच असते. त्या देणगीला, हा कलाकार अजिबात अपवाद नव्हता. त्याचे गाणे, इथे मी सुचवतो. Summertime हे जे त्याचे गाणे आहे, ते खर तर श्रवणेद्रीयाना अप्रतिम मेजवानी आहे. भावगीताप्रमाणेच अगदी हलक्या सुरात गाण्याची सुरवात होते, ड्रमचा तालदेखील अति संथ लयीत सुरु होते. पहिल्या अंतरयानंतर खरी कमाल आहे. या अंतऱ्यानंतर, गिटारचे सूर मध्य लयीत सुरु होतात आणि एका क्षणी, गिटार वाजतेय की याचा गळा गातोय, असा चक्क संभ्रम पडावा, असे सूर ऐकायला येतात आणि लगेच लय द्रुत मध्ये शिरते, ड्रमचा ताल देखील विलक्षण गतीत आवर्तने घेत राहतो आणि शेवटी, अति तार स्वरात गाणे संपायला येते पण संपत नाही!! गाणे संपते ते परत सुरवातीच्या संथ लयीत!! आता, जर विचार केला तार, आपल्या असेच लक्ष्यात येईल की, आपल्या गझल गायकीत असाच प्रकार चालतो की. पहिल्या किंवा दुसऱ्या अंतऱ्यात गायक, तालाच्या गतीत स्वरमाला सादर करीत असतो.
मला तर हे गाणे फार आवडते. गळ्याची तयारी दर्शविणारी एक अफलातून रचना असेच मी या गाण्याकडे बघतो. नंतर, असेच एक दुसरे गाणे मला इथे आठवले. I am coming नावाचे. आपल्या भैरवीच्या अंगाने हे गाणे सुरु होते आणि लयीचा खेळ इतका अवघड आहे की तो नेमक्या शब्दात मांडणे फार त्रासाचे आणि अशक्य आहे. संगीत हीं कलाच अशी आहे की, इथे शब्द नावाची वस्तूच कधीकधी फार अपुरी वाटते. म्हणूनच मला वाटते, Plato ने Mathematics आणि Music याला सर्व कलांमध्ये सर्वोच्च स्थान दिलेले आहे. आता, गणितात, माझी गती, मलाच अगतिक करणारी असल्याने, त्याबद्दल मी फार न बोलणेच श्रेयस्कर पण, संगीताबाबत, चार शब्द ठामपणे बोलू शकतो. राग संगीतात याचा अनुभव विलक्षणरित्या अनुभवायला मिळतो. स्वरांचे विविध रंग, आकार, भावना यांचे अप्रतिम दर्शन राग संगीतात होतात. इथे शब्दांची बऱ्याचवेळा जरुरीच नसते. तोच प्रकार, पाश्चात्य संगीतात, सिम्फोनी या माध्यमात येतो. खरतर, सिम्फोनी संगीत हे वाद्य संगीतातच वाजवले जाते. याच गाण्यात, एके ठिकाणी, George असामान्य ताकदीने अति खर्ज लावतो आणि आपण ऐकताना केवळ स्तिमित होतो.
खर्ज स्वर हा संगीतातील अति अवघड ध्वनी आहे. आपल्याला सामान्यपणे वाटते की, अति तार स्वर हा अति अवघड ध्वनी आहे, पण वस्तुत: खालच्या अंगाने येणारा स्वर हा अति कठीण मानला जातो आणि याला ध्वनिशास्त्र दुजोरा देते. मी, आजपर्यंततरी काळ्या गायकांचा जो खर्ज ऐकला आहे, त्याला फार थोडी तुलना सापडते. विशेषत: Paul Rabson या नावाचा जो गायक होऊन गेला, त्याच्या इतका अप्रतिम खर्ज, मी आतापर्यंततरी ऐकलेला नाही. त्याच्या खर्जाची प्रतवारी वेगळीच आहे. एखाद्या प्रचंड नगारयावर, टिपरीला कापसाचा बोळा लावून, देवळातील प्रचंड पसरलेल्या गाभाऱ्यात, हळूच त्या टिपरीने नगारयावर आघात केल्यावर जशास घुमारेदार ध्वनी ऐकायला येईल तशा प्रतीची जाणीव, Paul Robson चा खर्ज ऐकल्यावर होते. असामान्यच आवाजाची प्रत. तसा खर्ज, मी एकदा, पंडित जसराज यांच्या गळ्यातून ऐकला होता. एका मैफिलीत, त्यांच्या बरोबर, पंडित हरिप्रसाद चौरासिया होते. मोठ्या तब्येतीत राग जोग चालला होता. मध्यलयीत बंदिश शिरल्यावर, एकेठिकाणी, जसराजनी, इतक्या विलक्षण ताकदीने, खर्जातील “सा” लावला की तिथे बासरी स्तब्ध झाली!! असे फार थोडेच क्षण माझ्या संगीत श्रवणाच्या प्रवासात मला लाभले आहेत., की तिथे काय भावना व्यक्त करायची आणि दाद कशी द्यायची असाच प्रश्न पडतो. कधीतरी, मग डोळ्यांना नकळत वाचा फुटते आणि आस्वादाच्या दिशा मोकळ्या होतात. मग तिथे, लताची अति अवघड लय असते, वसंतराव देशपांड्यांची अति वक्र तान असते, अमिरखान खान साहेबांची अति ठाय लय असते, तर कधी त्यावर Paul Robson याचा हक्क पोहोचतो.
आपल्याकडे, जाझ संगीत हे साधारणपणे, सत्तरीच्या दशकात लोकप्रिय झाले. तेंव्हा मुंबईत जाझयात्रा नावाचा एक ग्रुप मुंबईत आला होता आणि त्या ग्रुपने, मुंबईत बरीच प्रसिद्धी मिळवली होती. त्यावेळी मी फारच लहान असल्याने, मला त्याचे काहीच वाटले नाही. नंतर, १९८३ मध्ये, मी मुंबईच्या IIT च्या Mood Indigo, या सांस्कृतिक महोत्सवात, मी खऱ्या अर्थाने जाझ ऐकला. त्यावेळी, स्वीडनहून Stevenson नावाचा Gitarist आला होता, तर आपल्याकडून ड्रमवर रणजीत बारोट आणि की बोर्डवर लुई बँक्स होता. आजही, मला तो कार्यक्रम व्यवस्थित आठवतोय. रात्री जवळपास चारच्या सुमारास तो कार्यक्रम संपला. अक्षरश: नुसती धमाल मेजवानी होती. गिटारवर असेदेखील स्वर काढता येऊ शकतात, याचा नवा अनुभव मला मिळाला तर, की बोर्डवर लुई बँक्स काय कमालीच्या तरबेजपणे बोटे फिरवतो, हे ऐकल्यावर तर मी थक्कच झालो. आजही, माझे हेच मत आहे की, भारतात, की बोर्डवर लुई बँक्स इतका असामान्य वादक झाला नाही. लोक, अदनान सामीचे कौतुक करतात. तो देखील चांगला आहे पण, लुई बँक्सचा दर्जाच काही वेगळा आहे. इथे मला, जाझची आवड निर्माण झाली. नंतर, साउथ आफ्रिकेत आल्यावर, मी प्रथम George Benson याला सीडी मध्ये भेटलो आणि मग त्याच्या खूपच सीडी विकत घेतल्या आणि अजूनतरी त्याने मला निराश केलेले नाही. जाझमधला, हा कलाकार “राजा” आहे. ज्या अफलातून तर्हेने याचा गळा फिरतो त्याच लयीत, हा गिटार वाजवतो. गाणीच सांगायची झाली तर कितीतरी सांगता येतील, संगीत हीं कला मुळात ऐकण्याची आहे, केवळ माहितीची जंत्री मांडून काहीच फारसे निष्पन्न होत नाही. फक्त, Computer प्रमाणे, माहिती सांगणे, यात केवळ तुमची दिखावू विद्वत्ताच दिसून येते. मला आजही ठामपणे वाटते की, संगीत हीं कला फक्त तुम्ही आणि ती कला इतक्याच प्रमाणात ऐकायची. खरतर, मैफिलीत, गाणे केवळ ऐकता येते, पण त्याचा खरा आनंद तुम्ही आणि तो कलाकार, याचे जेंव्हा द्वैत जमते, तेंव्हाच येतो. हा तुम्ही आणि तो कलाकार, यातला एक करार असतो. जसे, पुस्तक हे एकांतातच वाचायसे असते. तिथे ती कथा आणि तुम्ही यांचे एक नाते तयार होते, तसाच प्रकार संगीताबाबत घडतो. म्हणूनच, इथे साउथ आफ्रिकेत जेंव्हा गाणी ऐकतो, तेंव्हा तिथे केवळ मी एकटाच असतो आणि तेंव्हाच मला खऱ्या अर्थाने, George Benson भेटतो, मेहदी हसन साद घालतो, लताचा आवाज व्याकूळ करतो. आणखी काय आणि किती लिहिणार.