एकूणच आफ्रिका खंड म्हटले की लगेच Wild Safari सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते, विशेषतः केनयामधील नैरोबी शहराजवळील "मसाई मारा" तर जगप्रसिद्ध आहे. दुर्दैवाने मला काही तिकडे जाता आले नाही परंतु साऊथ आफ्रिकेच्या उत्तर सीमेला लागून असलेले नॅशनल क्रुगर पार्क मात्र बघता आले. एकूण १,२०० Sq.Km. इतका प्रचंड परिसर आहे. अर्थात या परिसरातील ७०० कि.मी. परिसर बोट्स्वाना देशात येतो तर उरलेला ५०० कि.मी. साऊथ आफ्रिकेत येतो. तुमच्याकडे जर का साऊथ आफ्रिकेचा अधिकृत व्हिसा असेल तर बोट्स्वाना इथे जाता येते. आता इतका विस्तीर्ण परिसर बघायला म्हणजे जवळपास कमीत कमी ७ दिवस/रात्र तर हवेतच, त्यातून सगळी जनावरे रात्री/मध्यरात्री बाहेर पडतात. हा सगळा परिसर स्वतःच्या जीवावर करायचा असतो. उद्या कुणी हिंस्र जनावराने हल्ला केल्यास, सरकार जबाबदार नसते. तुम्ही उघडी जीप नेऊ शकता किंवा तुमच्या नेहमीच्या वापरातली गाडी नेऊ शकता. तिथे भाड्याने गाड्या मिळण्याची सुविधा आहे पण त्यासाठी पैसे मोजायला लागतात. बहुतेकजण जंगलाच्या आधी एखाद्या जवळच्या हॉटेलमध्ये जागा आरक्षित करतात. अर्थात ६,७ दिवस इथे राहायला यायचे म्हणजे तितकी सुटी घ्यायला हवी आणि अशी सुटी फक्त ख्रिसमस मध्येच मिळू शकते.
मी २००५ मध्ये रस्टनबर्ग(इथेच जगप्रसिद्ध सन सिटी आहे!!) इथे नोकरीसाठी आलो असताना प्रथम संधी साधली. एकतर या शहरापासून क्रुगर पार्क साधारणपणे १,००० कि.मी. दूर आहे. जोहान्सबर्ग इथून १५० कि.मी. कमी पडतात पण तेंव्हा जोहान्सबर्ग माझ्या दृष्टीक्षेपात नव्हते. इथे मी नोकरी करीत असताना काही भारतीय मित्र ओळखीचे झाले आणि आम्ही सामायिक गाडी काढून क्रुगर पार्कचा बेत आखला. डिसेंबरमध्ये हॉटेल मिळवायचे झाल्यास, कमीत कमी ३ महिने आधी जागा आरक्षित करावीच लागते. आयत्या वेळी जायचे ठरवल्यास, कुण्या कुटुंबात आसरा घेणे आवश्यक ठरते पण मग तुमच्या थोडी बंधने पडतात. इथे तर आम्ही तिघे मित्र सडाफटिंग म्हणजे मीच एकटा लग्न झालेला, बाकीचे तेंव्हा विशीच्या आसपास होते. हातात गाडी आहे तेंव्हा सामान कुठे,कसे ठेवायचे हा प्रश्नच नसतो. २४ डिसेम्बरला सकाळीच निघालो. मध्ये पीटर्सबर्ग शहर लागले आणि तिथे जेवण घेतले. डिसेंबर महिना म्हणजे कडाक्याचा उन्हाळा त्यामुळे अंगावर शॉर्ट आणि टी शर्ट घातले होते. साऊथ आफ्रिकेत एक पद्धत चांगली आहे. तुम्ही जर का क्लबमध्ये किंवा भपकेबाज समारंभात जात नसाल तर कुठेही शॉर्ट घातलेली चालते मग पंचतारांकित मॉल असले तरी काही फरक पडत नाही. मी तर सन सिटीसारख्या अतिशय महागड्या हॉटेलमध्ये सर्रास शॉर्ट घालून हिंडत असे. आता अशा कडाक्याच्या उन्हाळ्यात बियर पिणे हा अत्यावश्यक सोहळा असतो तरीही प्रमाणातच घ्यावी लागते अन्यथा पोलिसांनी, गाडी चालवताना पकडले तर सरळ तुरुंगात रवानगी!! साऊथ आफ्रिकेत Drunk n Drive अपघाताचे प्रमाण प्रचंड आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील एकही दिवस असा जात नाही ज्या दिवशी भीषण अपघात झाला नाही!! एकतर रस्ते अतिशय गुळगुळीत, त्यामुळे गाडी वेगाने चालवायचा मोह होतो त्यातून गाडी चालवणाऱ्याची अवस्था "आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला" अशा प्रकारची!!
असो, पिटर्सबर्ग वरून आम्ही थेट क्रुगर पार्क इथे पोहोचलो. पोहोचायला संध्याकाळ झाली होती. आम्ही हॉटेलमध्ये जागा आरक्षित केल्या असल्याने, सरळ जागेचा ताबा घेतला आणि श्रम विहार सुरु केला. हॉटेलच्या रिसेप्शनिस्टनेच आम्हाला कुठे आणि कसे जायचे याची संपूर्ण माहिती दिली. रात्र झाली तशी गाडी काढली. आता आम्ही माणसाच्या जगातून जनावरांच्या जगात शिरत होतो. सगळीकडे मिट्ट काळोख होतो आणि आम्हाला महत्वाची सूचना मिळाली होती, गाडीचे हेड लाईट्स शक्यतो झगझगीत ठेवू नयेत कारण समजा दिव्यांचा प्रकाश जनावरांच्या डोळ्यात शिरला तर जनावरे बिथरू शकतात. सुरवातीलाच आफ्रिकन झेब्रे घोळक्याने दिसले. चांगलेच दणकट वाटले. त्यांच्याकडे बघून असे मनात आले, या जनावरांना आता माणसांच्या काही सवयीची सवय झाली असावी कारण गाडीचा लाईट कितीही कमी ठेवला तरी अंधारात त्याचा प्रकाश चमकणारच. तसे बघायला गेल्यास झेब्रा हा प्राणी निरुपद्रवी त्यातून रात्रीची वेळ म्हणजे त्यांची, बाहेर फिरायला जायची वेळ!! जवळपास १०, १२ तरी असावीत. अर्थात आम्ही काही झेब्रे बघायला इथे आलो नसल्याने थोडा वेळ गाडी थांबवून पुढे निघालो.गाडी पुढे जात असताना अचानक लक्षात आले, तिथे एक पाणथळ होता आणि त्या पाणथळाकाठी झेब्र्यांचा घोळका पाणी प्यायला आला होता.
पुढे जवळपास १० मिनिटे गाडी चालवली पण नावाला एक जनावर दृष्टीस पडले नाही!! इथे गाडीच्या वेगावर निश्चित मर्यादा होती त्यामुळे आजूबाजूचा परिसर व्यवस्थित न्याहाळता येत होता. अचानक जरा दूर अंतरावर हत्तींचा कळप दिसला. हत्ती शक्यतो घोळक्याने वावरतात असे वाचले होते, त्याचे प्रत्यंतर बघायला मिळाले. भारतातील हत्तींपेक्षा इथले हत्ती चांगलेच धिप्पाड, मजबूत दिसले. अर्थात गाडी तशी सुरक्षित अंतरावर ठेवली होती. घोळक्यात अनेक आकाराचे हत्ती होते आणि चाल अत्यंत संथ होती. काही हत्ती ठार काळे होते तर काही करडे असावेत असे वाटले कारण एव्हाना काळोख दाट पसरला होता. आमची गाडी जरी लांब असली तरी एकूण अवाढव्य आकारमान, काळजात धडकी भरवणारे होते.
इथे एक नियम पाळायचा असतो, गाडी कुठंही प्रमाणाबाहेर थांबवायची नसते. जनावरांना तितका इशारा पुरेसा ठरू शकतो. या जंगलात जागोजागी एकतर पाणथळ आहेत किंवा तलाव केले आहेत जेणेकरून जनावरांना पाणी पिणे सोयीचे होऊ शकते. आता आम्ही मोबाईलचे Flash Light सुरु केले होते. बराच वेळ गाडी फिरवली पण निराशा पदरी पडत होती. आम्हाला असेही सांगण्यात आले होते, तुम्हाला मनाचा बांध घालायलाच हवा, वाट बघायलाच हवी कारण हिंस्र जनावरे ही मध्यरात्रीनंतर बाहेर पडतात!! अर्थात तरीही बघायला मिळतीलच असे नाही. आम्हाला चित्ता शेवटपर्यंत बघायला मिळाला नाही. अगदी ४ रात्री आम्ही तिथे घालवून देखील. पुढे हरणांचा घोळका दिसला. लांबून प्रकाश दिसल्यावर उधळायला लागला. अर्थात उड्या मारणारे हरीण बघायला भलतेच देखणे असते. तशी ५,६ हरणे असतील. असे ऐकले आहे की हरणांच्यात देखील पोटजाती असतात पण त्यासाठी वर्षानुवर्षे घालवावी लागतात. इथे मी फक्त ६ दिवस आलेला तेंव्हा आणखी किती बारकाईने बघणार!! पुढे बराच वेळा गाडी चालवल्यावर अच्चनक एका मोठ्या तळ्यापाशी आलो आणि पाण्यात काहीतरी हालचाल दिसली. सुदैवाने तिथे आमच्यासह आणखी ३ गाड्या होत्या. जरावेळाने जनावराचे डोके आणि शिंग बाहेर आले आणि क्षणात पाणी उसळून महाकाय "हिप्पो" पाण्यातून बाहेर आला. मनाशी कल्पनाच नव्हती असले जनावर बघायला मिळेल. एव्हाना पहाट व्हायला लागली होती म्हणून आम्ही परत हॉटेलवर परतलो.
No comments:
Post a Comment