आपल्याकडे अजूनही खऱ्याअर्थाने हुकूमशाही, दमनशाही फारशी कुणीही अनुभवलेली नाही. अर्थात मी देखील अनुभवलेली नाही परंतु परदेशी राहताना, सलग २ वर्षे मला एक गुजराती शेजारी भेटला होता. सुरवातीला फारसा बोलायचं नाही - नाव मुद्दामून टाळत आहे. जवळपास घुम्याच होता. सकाळी ऑफिसला निघताना, नजरभेट व्हायची आणि काही दिवसांनी ओठांवर स्मित फुटायला लागले. वयाने माझ्याच इतका होता - बहुदा अजूनही तो साऊथ आफ्रिकेत राहात असावा. अंगाने शिडशिडीत, रंगाने उजळ, दिसायला टिपिकल गुजराती आणि अर्थात हिंदी, गुजराती भाषा अस्खलित बोलायचा. जवळपास महिनाभर आमची "नजरभेट" इतकाच संवाद - संवादाची पायरी पुढे सरकायचीच नाही.
एकदा, एका शुक्रवारी संध्याकाळी, मीच थोडा पुढाकार घेतला आणि त्याला घरी कॉफी घ्यायला बोलावले. लगेच तयार झाला. मला, सुरवातीला वाटले होते , हा भारतातूनच आला असणार आणि इथले टिपिकल युरोपियन वातावरण बघून काहीसा बुजला असणार!! परंतु पहिल्याच भेटीत त्याने, "मी युगांडातून निर्वासित म्हणून पळून आलो. तिथे मी १५ वर्षे बिझिनेस केला." इतपत सांगितले.
आता गुजराती आणि परदेशी इतकी वर्षे वास्तव्य, म्हटल्यावर इतपत सहजपणे गृहीत धरता येत होते. याचा प्रत्यक्ष अनुभव मी डर्बन इथे राहात असताना घेतलेला होता. स्थिरस्थावर झालेला गुजराती हा बव्हंशी बिझिनेस करायलाच नेहमी उद्युक्त होत असतो!! वास्तविक, माझा शेजारी,हा त्याच्या वडिलांच्या बिझिनेसमध्येच शिरला होता. त्याचे वडील १९७० मध्ये "कंपाला" या राजधानीच्या शहरात आले. आले त्यावेळी खिशात रोजच्या खर्चाला पुरतील इतकेच पैसे होते. आल्यावर तिथेच नोकरी पकडली, हळूहळू आपल्या कुटुंबाला कंपाला इथे आणले आणि स्थिरस्थावर व्हायला लागले. अर्थात, १९७५ मध्ये धंद्याच्या खाचाखोचा समजावून घेतल्या आणि स्वतंत्रपणे धंदा सुरु करायचे ठरविले. आत्तापर्यंतचा अनुभव हा कपड्यांच्या व्यवसायात घेतलेले असल्याने, त्यांनी त्याच व्यवसायात उडी घेतली.
इथे एक बाब समजून घेण्यासारखी आहे, पहिली नोकरी गुजराती माणसाकडे केली होती आणि जेंव्हा त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरु करायचे ठरवले तेंव्हा देखील आजूबाजूच्या गुजराती व्यावसायिकांनीच मदत केली!! सुदैवाने लगेच धंद्याला "बरकत" आली. अर्थात हे सगळे मला नंतरच्या भेटींत कळले. सुरवातीला "घुम्या" वाटणारा हा गुजराती, नंतर बराच मोकळा झाला, इतका की नंतर तो माझ्याबरोबर ड्रिंक्स घ्यायला लागला - जेवायला मात्र फक्त व्हेज!! असो,
पुढे ईडी अमीनची निर्दयी राजवट सुरु झाली. कुठेही कसलाच धरबंध नव्हता. त्यावेळी याचे वय होते २०!! नुकतीच वडिलांना धंद्यात मदत करायला सुरवात केली होती आणि व्यवसाय इतर देशांत फैलावत होता!! अशाच एका बैठकीत त्याने, अक्षरश: अंगावर शहारे आणणारे अनुभव सांगितले. अशीच एक दुर्दैवी सकाळ उगवली आणि घरात ईडी अमीनचे सैनिक घुसले!! कसली नोटीस नाही, कसले फर्मान नाही. दरवाजा ठोठावला आणि किंचित उघडलेल्या दारातून आता शिरले. हातात रायफल्स!! सकाळचे जवळपास ९ वाजले होते. त्यांना काय हवे आहे, हे विचारायच्या आधीच त्यांनी वडिलांना गोळ्या घातल्या!! तिथल्या तिथे वडील रक्ताच्या थारोळ्यात!! घरातले सगळेच गर्भगळीत. रडायची देखील सोया नाही. मुलाला, त्याच्या बेडरूममध्येच समजले, घरात सैनिक घुसले आहेत. मुलगा तसाच बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पडला. पाठोपाठ बाईच्या आवाजाची किंकाळी ऐकायला मिळाली आणि घर संपल्यातच जमा झाल्याचे त्याला समजले. तसाच रस्त्यावर धावत सुटला. काय करायचे, कुठे जायचे? काही समजत नव्हते. इथून सुखरूप बाहेर पडणे, आताच विचार!!
थोडा वेळ एका दुकानापाशी थरथरत उभा राहिला. तितक्यात एका उघड्या जीपमध्ये आई आणि बहीण, यांना पहिले!! आपलीच आईला, आपलीच धाकटी बहीण पण आपण काहीही करू शकत नाही, अशी असहाय जाणीव झाली. आजतागायत कुठे आहेत, याचा पत्ता नाही. एका बैठकीत त्याने अत्यंत थंड सुरांत सांगितले - आता जर माझ्या समोर दोघी उभ्या राहिल्या तर मी ओळखणार देखील नाही!! आई, बहिणीला उचलून नेल्याचे बघितल्यावर त्याच हताश अवस्थेत मी ओळखीच्या गुजराती माणसाच्या घराचा दरवाजा ठोठावला.
कुणीही दरवाजा उघडायला तयार नव्हता - बरोबर आहे, बाहेर कोण आहे? हाच प्रश्न!! अखेरीस मी जोरात हाक मारली तशी किंचित दरवाजा उघडला गेला आणि मी अक्षरश: घरात घुसलो. घरात एकमेव म्हातारी आजी होती. दोनच दिवसांपूर्वी, यांच्या घरातील प्रसंग त्या घरात घडला होता. त्या बिचाऱ्या म्हातारीला तर काय करावे हेच सुचत नव्हते. मी अधिकच गर्भगळीत. तसाच घराच्या बाहेर पडलो कारण आता फक्त अस्तित्व हेच महत्वाचे. रस्त्यावर नुसता गोंधळ उडाला होता आणि कुणीच कुणाला विचारीत नव्हते. अवघी गुजराती वस्ती संपूर्णपणे उजाड झाली होती. चार दिवस रस्त्यावर झोपून काढले आणि लपतछपत अखेर
सरळ बँक गाठली आणि जेमतेम ५०० डॉलर्स हातात घेतले आणि सरळ कंपाला बंदर गाठले. तिथून नायजेरिया - लागोस बंदर गाठले. बंदरावरच निर्वासित असल्याचा दाखला दाखवला आणि लागोस मध्ये प्रवेश केला!! १९८२ मध्ये नायजेरिया देश संपन्नावस्थेत होता. नोकरी धंद्यांच्या भरपूर सुविधा होत्या. लागोस मध्ये सुदैवाने, एका सिंधी माणसाची दुरून अशी ओळख निघाली. कंपालातील व्यावसायिक संबंध इथे उपयोगी पडले.
त्यावेळी नायजेरिया खूपच प्रगत देश होता. वातावरण जरी युगांडासारखे असले तरी तेंव्हा राज्यव्यवस्था बरीच स्थिर होती. तिथे सलग १६ वर्षे काढली. हळूहळू नायजेरिया देखील मरणपंथाला लागला होता - अर्थात हा अनुभव मीच घेतलेला होता. मी देखील त्याला माझे १९९२/९३ मधील अनुभव सांगितले. लागोसला देखील त्याला दडपशाहीचा विदारक अनुभव आला परंतु एव्हाना तो बराच अनुभवी झाला होता. शहाणपणाने त्याने आपले चंबूगबाळे आवरले आणि साऊथ आफ्रिकेचा रस्ता धरला.
या सगळ्या अस्थिरतेच्या धावपळीत त्याचे लग्न करायचे राहून गेले. त्याने लागोसचे विदारक अनुभव सांगितले पण मला त्यात काही नवल वाटले नाही कारण माझ्या २ वर्षांच्या कालावधीत मी देखील जवळपास असेच अनुभव घेतले होते. आता जरी साऊथ आफ्रिका त्याच मार्गाला लागला असला तरी (ही घटना २००७ मधील) त्याच्या मते आता दुसरा कुठलाच मार्ग उपलब्ध नाही!!
No comments:
Post a Comment