"उरल्यासुरल्या प्रकाशकणिका
खिरल्या काळोखांतच देखा
दूर कुठेसा परंतु दिसतो लाल केशरी जाळ
ही उदास संध्याकाळ"
सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकरांच्या "ही उदास संध्याकाळ" या कवितेतील शेवटचे कडवे. ही कविता पाडगावकरांच्या सुरवातीच्या काळात प्रसिद्ध झालेल्या "जिप्सी" कविता संग्रहातील आहे. या संग्रहाने मराठीत पाडगावकरांची "कवी" ओळख प्रतिष्ठित झाली असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. या ओळींकडे जरा निरखून बघितले तर त्यात काही जगावेगळ्या प्रतिमा नाहीत, काही अगम्य प्रतीकं नाहीत पण तरीही या ओळी मनात कुठेतरी घर करून राहतात आणि याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे कवितेतील शब्दांची बांधलेली शब्दरचना होय. सगळं आसमंत काळोखलेला,उदास झाला आहे. कुठेही आशेची तिरीप दिसत नाही. अशी वेळ सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी तरी येतच असते आणि त्याच व्याकुळ करणाऱ्या उदासीन संध्याकाळचे प्रत्ययकारी चित्रण या सगळ्या कवितेतून आपल्याला वाचायला मिळते. वास्तविक उदास भाव दाखवणारी कविता परंतु तरीही वाचताना आपल्याला काहीतरी गवसल्याचा आनंद मिळतो आणि ती कविता आपल्या मनात जपली जाते. आशयबद्ध आणि गेयतापूर्ण कविता या आपल्याला अशाच प्रकारे कलात्मक वाचनानंद देत असतात. आजचे आपले गाणे "चांद मद्धम है आसमान चूप है" आपल्याला असाच वाचनानंद देत आहे.
सुप्रसिद्ध शायर साहीर लुधियान्वी यांची शब्दकळा आहे. एकेकाळचा "डाव्या" मतप्रणालीचा कवी पुढे हळूहळू खऱ्या अर्थाने पुरोगामी .
वरील कवितेत जसे पाडगावकरांनी काहीसे निरस, काळवंडलेले निसर्गचित्र उभे केले आहे त्याच धर्तीवर या कवितेत साहीर यांनी तसेच चित्र मांडले आहे. अर्थात प्रत्येक कलाकाराची अभिव्यक्ती ही नेहमीच वेगवेगळ्या प्रतवारीने सिद्ध होत असते. कवितेचा मुखडा (च) कवितेची ओळख करून देत आहे. शब्द सगळे परिचित आहेत परंतु वर म्हटल्याप्रमाणे परिचित अभिव्यक्तीतून अपरिचित आशय व्यक्त करणे, हे एक चांगल्या कवितेचे लक्षण मानायला हवे. "दुधिया बादल पर्वत से झुक के प्यार करना" किंवा "आज भी तारे सुबह की गर्द में" सारख्या प्रतिमा कवितेची वीण घट्ट करतात. वास्तविक साहीर मुळातला उर्दू भाषिक शायर परंतु चित्रपट माध्यमात वावरताना अशी ओळख कायम ठेवणे निव्वळ अशक्य. तरीही "नाकाम हसरतें" किंवा "बहारों के साये" सारखी शब्दचित्रे कवितेला अधिक घाटदार बनवतात. "साये" हा शब्दच असा आहे तिथे आणखी वेगळ्या विवेचनाची जरुरी नाही. असा शब्द नेमकेपणाने वेचून आपल्या कवितेत नेमका वापरणे हे बुद्धिकौशल्याचे काम आणि इथे हा शायर नेहमी वाचकांना वाचिक समाधान देतो.
या कवितेला स्वरबद्ध केले आहे संगीतकार मदन मोहन यांनी. या संगीतकाराने आपल्या कारकिर्दीत नेहमीच गाण्यात "कविता" असावी याचा आग्रह धरला असावा अशी शंका येते!! एकूणच त्यांच्या कारकिर्दीचा सूक्ष्म आढावा घेतल्यास हे वैशिष्ट्य ध्यानात येते. परिणामी गाण्याच्या चालींचे स्वरूप दीर्घायुषी होण्यात परिवर्तित होते. चाल लावायला सक्षम कविता असावी हे तर रचनाकारांचे नेहमीचे मागणे असते परंतु प्रत्येकवेळी ही इच्छा फलद्रुप होतेच असे नाही. इथे चाल बांधताना "भीमपलास" रागाच्या स्वरांचा आधार घेतला आहे. परंतु कुठेही रागविस्तार होणार नाही याची काळजी संगीतकाराने घेतली आहे तसेच रागाचे स्वर फक्त आधारासाठी घेतले आहेत. बहुतेक व्यासंगी रचनाकार हे राग किंवा रागाचे काही स्वर हे मुखडा बांधायला उपयोगात आणतात आणि पुढे त्या रागाच्या चलनाची पुनर्रचना करतात. मदन मोहन याच पंथातील महत्वाचे संगीतकार. या गाण्याचा वाद्यमेळ रचताना संगीतकाराने एकूणच वाद्ये कमीत कमी असावीत, असा दिसतो. संध्याकाळची व्याकुळ वेळ आहे तेंव्हा वाद्यमेळ भारंभार कशाला हवा? चाल अतिशय अनवट आहे आणि एकूणच मदन मोहन शैलीशी काहीशी फटकून आहे. कवितेचा आकृतिबंध प्रत्येकी ३ ओळींच्या अंतराचा आहे आणि हे ध्यानात घेऊनच चालीची रचना केलेली आहे. कुठेही चाल रेंगाळणार नाही तसेच हरकती देखील ठाशीव पद्धतीच्या नसून काहीसे गहिरे वातावरण निर्माण करणाऱ्या आहेत. एकूणच वाद्यमेळ खालच्या सुरांत ठेवलेला असल्याने कवितेतील शाब्दिक खुमारी, स्वरांच्या जोडीने अनुभवता येते. वर मी एक विधान केले, स्वररचनेची शैली मदन मोहन यांच्या नेहमीच्या पठडीतली वाटत नाही तरी देखील कवितेची रचना बरीचशी गझल सदृश आहे आणि हा मुद्दा लक्षात ठेवल्यास अनेक साम्यस्थळे आढळतात. मुखडा ऐकायला घेतल्यास, स्वरिक चलन गझलेच्या अंगाने गेल्याचे आढळेल परंतु फसगत इथे होते, गाण्याच्या पार्श्वभूमी जो वाद्यमेळ आहे तो पारंपरिक गझल तत्वांना अनुसरून नसून त्यात "गीततत्व" राखले आहे. मदन मोहन यांच्या बऱ्याचशा रचना, रसिकांची अशीच फसगत करतात. चाल गायकी अंगाने जाऊ शकते परंतु एक संगीतकार म्हणून मदन मोहन यांनी आपली "गीतधर्मी" ओळख कायम ठेवली आहे आणि ही बाब निश्चितच स्पृहणीय म्हणायला हवी.
लताबाई नेहमीच चालीचे अंतरंग ओळखून आपली गायकी ठेवतात. इथे हा मुद्दा विशेषत्वाने दिसतो. ललित संगीतात नेहमीच त्याची स्वतःची म्हणून "लय" असते जिथे शास्त्रीय संगीताचे नियम बाजूला सारले जातात. इथे शब्द आणि त्याचा भाव यालाच महत्व असते. लताबाई इथेच इतरांपेक्षा वेगळ्या होतात कारण जरी लताबाईंनी रागदारी संगीताचा अभ्यास केला असला तरी आपण ललित संगीत गात आहोत याची स्वच्छ जाणीव त्यांच्या गायनातून प्रगट होते. यांचा परिणाम, त्याच्या "अर्धाताना"किंवा "हरकती" या त्यांच्या स्वतःच्या असतात आणि त्यांच्या विचाराची नाममुद्रा उमटवणाऱ्या असतात. कुठल्या शब्दांना गहिरेपण द्यायचे, कुठले शब्द किंवा अक्षर देखील देखील किती प्रमाणात लांबवायचे, याबाबत त्यांची खास दक्षता असते. इथे मुखडा गाताना सुरवातीचाच शब्द "चांद" कसा उच्चारला गेला आहे, हे खास ऐकण्यासारखे आहे. इथूनच पुढे त्यांचे गायन अधिक ठळक होते. मुखडा कसा समोर आणायचा, याबाबत त्यांनी एक आदिनमुना निर्माण केला. एकदा मुखडा गायनातून प्रस्थापित झाला म्हणजे मग पुढील बांधकाम तसे सहज होते. या गाण्यात, प्रत्येक अंतऱ्यातील तिसरी ओळ ही वरच्या सुरांत गायली गेली आहे परंतु असे "वळण" बदलताना, अंतरा संपवणाऱ्या शेवटच्या ओळीवर जो "ठेहराव" घेतला आहे, तो फार विलक्षण आहे. अशी अनेक सौंदर्यस्थळे या गाण्यात दिसतात आणि त्यामुळे हे गाणे कायमचे चिरस्मरणीय होते.
चांद मद्धम है आसमान चूप हैं
नींद की गोद में जहाँ चूप हैं
दुर वादी में दुधिया बादल
झुक के पर्वत को प्यार करते हैं
दिल में नाकाम हसरतें लेकर
हम तेरा इंतजार करते हैं
इन बहारों के साये में आ जा
फिर मुहोब्बत जवां रहें ना रहें
जिंदगी तेरे नामुरादों पर
कल तलक मेहरबां रहें ना रहें
रोज की तरह आज भी तारे
सुबह की गर्द में ना खो जाएं
आ तेरे गम में जागती आँखे
कम से कम एक रात सो जाएं
चांद मद्धम है आसमान चूप हैं
नींद की गोद में जहाँ चूप हैं
No comments:
Post a Comment