Sunday, 28 June 2020

सुंदर ते ध्यान

सांगीत आविष्कारातील उच्चतम आविष्कारापर्यंत म्हणजे गीतापर्यंत पोहोचणे ही एक दीर्घ प्रक्रिया असून त्यात इतर अनेक व दरम्यान होणाऱ्या प्रक्रिया अंतर्भूत असतात. या शिवाय प्रत्येक क्रियेस आपापली अविष्कारक क्षमता असते. कृती करणाऱ्याच्या निर्मितीक्षमतेवर आणि ग्रहण करणाऱ्याच्या ग्रहणक्षमतेवर या प्रत्येक क्रियेने महत्वाची भूमिका बजावली आहे. 
या परिप्रक्ष्येत एकसुरीपणापासून दूर जाणे, हे संगीतनिर्मितीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होय. कंठसंगीत आणि वाद्यसंगीताच्या विशिष्ट आविष्कारात पूर्णतः एकाच तारतेस चिकटून राहणे म्हणजे एकसुरीपणा असे म्हणता येईल. दुसरा टप्पा म्हणजे गुणगुणणे वा गुंजन. या क्रियेत सांगीत प्रक्रिया आकाराला आलेली असते पण तिचे प्रक्षेपण होत नाही. अर्थात काहीही असले तरी सांगीत कल्पनेचे अस्तित्व जाणवते, एक विशिष्ट घुमारा जाणवतो. या पुढे, सुनिश्चित, यशस्वीपणे प्रक्षेपित तारतांची सहेतुक रचना हा भाग येतो.सुनिश्चीतता व प्रमाणशीर पुनरावृत्ती या कारणांनी स्वरपाठ आकलनगम्य होतो. याच्या पुढे, संगीतपरता अधिक महत्वाकांक्षी होते आणि तिथे लय,वाद्ये आणि काव्य अंतर्भूत होतात. आपल्या भारतीय संगीतात ज्या ६ कोटी प्रमाणबद्धता केलेल्या आहेत त्यात धर्मसंगीत या कोटीशी वरील विवेचन फार जवळून लागू पडते.  
भक्तिसंगीत हा आविष्कार याच कोटीतील अत्यंत महत्वाचा आविष्कार आहे. भारतीय संगीत भक्तिपर आहे. अर्थातच हे विधान काहीसे एकांगी आहे. याचे कारण नं. १) भक्तिपर संगीताची स्वतंत्र अशी कोटी आहे, नं. २) प्रयुक्त होत असलेल्या एकंदर संगीतापैकी बरेचसे संगीत भक्तिपर आहे, असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. या बाबत असे म्हणता येईल, विशिष्ट संगीताविष्कार सादर करीत असताना संगीतकाराची मनोवस्था भक्तिपर आहे/होती म्हणून संगीत भक्तिपर ठरत नाही. सादरीकरणातील सांगीत आशय आणि साचे, बहुसंख्य आणि गुणबहुल संगीतरचनांच्या संचांशी निगडित होतात. भक्तिसंगीत या कोटीस हाच न्याय लागू होतो.
आजचे आपले गाणे हे याच पातळीवरून आस्वादायचे आहे. संत तुकारामांच्या रचना या, कविता या पातळीवर अजोड ठरतात आणि याचे कारण त्यातील स्पष्टवक्तेपणा, रचनेतील गेयता आणि अर्थपूर्ण आशय. वास्तविक पाहता,महाराष्ट्रात "विठ्ठल" या देवाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि बहुतेक संतकाव्य हे याच कल्पनेभोवती फिरत आहे. आता, भक्ती म्हटले म्हणजे त्यात प्रेम,आळवणी तसेच आर्त विरह इत्यादी सगळ्या भावभावना येतात. आजच्या कवितेत हाच भाव सर्वत्र आढळत आहे. खरतर संतकाव्य हे नेहमी कवितेच्या अंगाने आस्वादले गेले पाहिजे परंतु आपल्याकडे बरेचवेळा भावनिक अंगानेआस्वादण्याची क्रिया केली जाते आणि यात कवितेचा मूळ हेतू बाजूला राहतो आणि बाह्य आकर्षणाने कवित्व गाजले जाते. तुकारामांच्या कवितेत नेहमीच शब्दांतून लय सापडत जाते आणि तीअंतिमतः गीतत्वापर्यंत पोहोचते. एक तर ही अल्पाक्षरी कविता आहे, त्यामुळे इथे प्रत्येक शब्दाला बहुश्रुत अर्थ प्राप्त होऊ शकतो. विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन आणि त्या दर्शनाप्रतीची समर्पण भावना, इतपत या अभंगातील आशयाचा अर्थ काढता येऊ शकतो. आता हे एकदा नक्की झाल्यावर, पुढे "पितांबर","मकरकुंडले" अशी बाह्य आकर्षणे इथे अंतर्भूत होतात आणि ते, भक्तिभाव म्हटल्यावर साहजिकच होते. एकदा का काव्याची मध्यवर्ती संकल्पना लक्षात आल्यावर मग पुढे शब्दांचा, प्रतिमांचा अन्वयार्थ लावणे सुलभ जाते. 
संगीतकार श्रीनिवास खळ्यांनी स्वररचना करताना नेहमी कवितेचा आधार हेच प्रमाण मानले. वास्तविक पहाता संत रचना संगीतबद्ध करणे फार पूर्वीपासून चालू आहे आणि प्रत्येक संगीतकार आपापल्या मगदुराप्रमाणे चालींची निर्मिती करीत होता आणि अशा परिस्थितीत पुन्हा त्याच शब्दकळांना नव्याने चाल देणे म्हणजे एकंदरीत पुनर्रचना करणे होय. खळेकाकांनी हे आव्हान अप्रतिमरीत्या पेलले. यमन रागावर आधारित स्वररचना आहे. खळे काकांनी  चालीसाठी नेहमीच पारंपरिक रागांचा आधार घेतल्याचे दिसते. उदाहरणार्थ आजच्या गाण्यासाठी वापरलेला यमन राग किंवा इतर ठिकाणी त्यांनी तोडी, पुरिया धनाश्री सारखे प्रचलित राग वापरल्याचे दिसून येते. झांजेच्या आवाजाने रचना सुरु होते आणि पुढे स्वरमंडळाच्या सुरांत डौलदार ठेका सुरु होतो. खळेकाकांच्या रचना या लयीच्या अंगाने अवघड असतात असे सहज विधान केले जाते पण याचा नेमका अर्थ काय? तालाच्या मात्रेतून एक लय निर्माण होत असते आणि ती लय, स्वरिक पातळीवर जोडून घ्यायला लागते आणि तिथेच खळेकाका गंमत करतात. या गाण्याचा मुखडा ऐकायला घेतल्यावर, या विधानाची प्रचिती घेता येते. मध्य लयीत ठेका सुरु होतो मुखड्याची दुसरी ओळ घेताना शेवटचा शब्द "ठेवोनिया" गाताना किंचित लांबवला आहे आणि हे जे किंचित लांबवणे आहे तिथे समेची मात्रा गाठली जाते. पहिला अंतरा ऐकताना, एकतर वेगळ्याच सुरावर "उठावण" आहे आणि ती "बिकट उठावण" घेताना लयीतील स्वर प्रत्येक ठिकाणी किंचित लांबवला आहे. हे लयीत सांभाळणे कौशल्याचे असते आणि इथे खळेकाकांची गाणी अवघड होऊन बसतात. अन्यथा चालीतील गोडवा तर लगेच रसिकांच्या मनावर गारुड घालतो. प्रत्येक अंतरा वेगळ्या सुरांवर बंधने हे निश्चितच असामान्य सर्जनशीलतेचे द्योतक मानायला हवे. अशा ठिकाणी "अर्धी हरकत" किंवा "अर्ध तान" या सांगीतिक सौंदर्याचा आढळ दिसतो. आणखी गंमत म्हणजे प्रत्येक अंतरा सुरु होताना मुखड्याच्या लयीशी समांतर आहे परंतु पुनरावृत्त करताना लय दुगणी करून स्वररचना पारंपरिक सांगीतिक सौंदर्याशी आणून सोडली आहे. 
अशी बुद्धीगामी स्वररचना गायला लताबाईंचा गळा मिळावा यासारखा सुंदर योग नाही. लताबाईंच्या गायन कौशल्याचा पुरेपूर वापर या गाण्यात झालेला दिसतो. क्षणात वरच्या सुरांत तर लगोलग खालच्या सुरांत वावरणे हे मुळात अतिशय कठीण असते आणि इथे तर तुकारामाची रचना आणि खळेकाकांची चाल म्हटल्यावर शब्दांचे औचित्य आणि चालीचा बिकट प्रवास सांभाळणे, या दोन्ही बाबींवर वावरणे कठीणच असते. साधारणपणे भक्तिसंगीतात समर्पणाचा भाव अधिक दृग्गोचर होत असतो आणि इथे तर काव्यात हाच भाव प्रामुख्याने दिसत आहे. अशा वेळेस गायकीतून तोच भाव नेमकेपणाने लताबाईंनी दर्शविलेला आहे. आज हे गाणे प्रसिद्ध होऊन जवळपास अर्ध शतक उलटून गेले तरीही या गाण्याची लोकप्रियता आणि गोडवा रतिभर देखील कमी झाला नाही. यावरून एक विधान नक्की करता येते. जे काही लोकप्रिय असते त्यात सवंगता असते किंवा मार्केटिंगचा भाग अधिक असतो, असे सरसकट मत मांडण्यात येते आणि या मताला पूर्णपणे डावलून टाकण्यात या गाण्याने यश मिळवले आहे. 



सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 
कर कटावरी ठेवोनियां 

तुळसी हार गळा कासे पितांबर 
आवडे निरंतर तेंचि रूप 

मकरकुंडले तळपती श्रवणी 
कंठी कौस्तुभमणि विराजित 

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख 
पाहीन श्रीमुख आवडीने 


No comments:

Post a Comment