Thursday, 11 June 2020

फिर कहीं कोई फुल खिला

हिंदी चित्रपटात प्रणय हा विषय फार पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि त्याचा बऱ्याच चित्रपटात चोथा झाल्याचे बघायला मिळाले आहे. किंबहुना असे विधान करता येईल, हिंदी चित्रपटाने प्रणयी भावनेबद्दलच्या संकल्पना नकारार्थी पद्धतीने समाजात रुजवल्या. हे नकारात्मक विधान नक्कीच आहे पण वस्तुस्थिती काही फार वेगळी नाही. तेच प्रसंग, तोच आशय, तशाच बोथट अभिव्यक्ती यामुळे प्रणयाबद्दलची रुची बदलली. मागील शतकातील सत्तरीच्या दशकात हळूहळू ही प्रतिमा बदलायला लागली, अधिकाधिक वास्तववादी व्हायला लागली. आजचे गाणे ज्या चित्रपटातील आहे - "अनुभव" हा चित्रपट, त्याकाळी "वास्तववादी सिनेमा" हा शब्द प्रचलित व्हायच्या आधीच्या काळातील चित्रपट होता. लग्न होऊन काही वर्षे झाल्यावर,नवरा - बायको नात्यात काहीसा शिळपटपणा येणे, यात फारसे नवीन नाही कारण बहुतेक नात्यात हा अनुभव येतच असतो. अशा वेळी मानसिकदृष्ट्या प्रगल्भ असणे महत्वाचे ठरते. सुप्रसिद्ध निर्माते - दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांनी त्यावेळी या विषयावर नितांतसुंदर अशी Trilogy "अनुभव","आविष्कार" आणि "गृहप्रवेश" निर्माण केली होती आणि मानवी नात्यांचे गुंतागुंतीचे नाते पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आधुनिक काळातील धडपड आणि त्यातून उद्भवलेली मानसिक तडफड याचे अप्रतिम चित्रण या चित्रपटातून दिसते. केवळ भौतिक सुख म्हणजे आयुष्य नव्हे परंतु मानसिक आणि शारीरिक समाधान हे मुद्दे देखील संसाराच्या सामंजस्यासाठी तितकेच आवश्यक असतात.खरतर चित्रपटाच्या पडद्यावर मानसिक भावनांचे चलनवलन सार्थपणे दाखवणे अति अवघड असते तरीही अनेक दिग्दर्शकांनी यशस्वीपणे सिद्ध केले आहे. "अनुभव"हा चित्रपट म्हणजे मानवी नात्याची सुंदर तरल कविता आहे. 
या गाण्यातील कविता म्हणून वाचन करायला गेल्यास, काहीशी वक्रोक्ती शैली आहे. पहिल्या दोन ओळीतून जो विचार मांडला आहे त्याला काहीसा धक्का देणारा विचार, तो अंतरा समाप्त  होताना वाचायला मिळतो. पहिल्या कडव्यात समुद्राची प्रतिमा घेतली आहे आणि शेवट करताना समुद्राच्या लाटांना वादळ म्हणून नये, असे म्हटले आहे. तसेच शेवटच्या कडव्यात स्वप्नांच्या प्रवासातील सजणे आणि शेवटी स्वप्नपूर्ती विफल होत असताना, शांती म्हणू नये, हे वाचायला मिळते. सगळ्या चित्रपटात, ज्या जोडप्याची मानसिक तडफड दाखवली आहे, त्याला साजेसेच शब्द आहेत. याबाबतीत कवी गुलजार यांचे कौतुक करायलाच लागेल. गुलजार बहुतेकवेळा नेहमीच्या वापरातील शब्द वापरतात परंतु रचनाकौशल्य असे असते की त्या जुनाट शब्दांवरील धूळ पुसली जाते आणि तेच शब्द आपल्या वेगळी अनुभुती देतात. अगदी स्पष्ट मांडायचे झाल्यास, गुलजार यांच्या "कविता" प्रामुख्याने "भावकविता" असतात नेहमीच्या आयुष्यातील शब्दांतून आपल्याला त्याच शब्दांचा वेगळा अर्थ दर्शवून देणारी आणि तसा भाव व्यक्त होत असताना आपल्या जाणीवा  अधिक अंतर्मुख आणि श्रीमंत करणारी. कवितेची हीच पहिली अट असावी आणि ही अट या कवितेतून पूर्ण होते. 
संगीतकार म्हणून कनू रॉय हे कधीही हिंदी चित्रपटसंगीताच्या इतिहासात आघाडीचे संगीतकार म्हणून कधीही नाव घेतले जाणार नाही. १९४३ पासून कार्यरत असलेला हा संगीतकार परंतु केवळ ७ हिंदी चित्रपटांना संगीत दिले!! हे काही सृजनात्मक सर्जनशीलतेचे उदाहरण होऊ शकत नाही तरीही या चित्रपटांवर त्यांनी आपला ठसा उमटवला असे म्हणता येईल. कदाचित याचा परिणाम असावा पण त्यांनी कधीही मोठा वाद्यमेळ वापरण्याचा हव्यास धरला नाही. बहुतांशी गीते बंगाली लोकसंगीताशी किंवा रवींद्र संगीताशी नाते जोडणाऱ्या आहेत. आजचे गाणे देखील जरी "देस" रागाधारित असले तरी चालीवर बंगाली ठसा जाड आहे. कवितेत एका व्याकुळ क्षणाचे चित्रण असल्याने, वाद्यमेळ प्रामुख्याने सतार,सारंगी आणि अस्पष्ट अशी बासरी अशाच वाद्यांवर आधारलेला आहे. चाल ठाय लयीत असल्याने, ताल वाद्य देखील त्याच अंगाने वाजत आहे आणि बहुतेकवेळा ललित संगीतात वावरणारा "केरवा" ताल आहे. थोडे तांत्रिक लिहायचे झाल्यास "रिषभ - पंचम" अंगाने चालीची सुरवात आहे आणि तिथेच देस रागाची स्पष्ट ओळख पटते. खरतर थोडे बारकाईने ऐकले तर गाण्यात बरेचवेळा, स्वररचनेने देस रागाची कास सोडलेली आहे आणि याचे कारण, आपल्याला चित्रपट गीत सादर करायचे आहे आणि राग नव्हे, या पंथाचे हे संगीतकार असल्याने,आधारभूत स्वर घ्यायचे आणि पुढे आपल्या मनानुसार मांडणी करायची. त्यामुळेच चाल कधीही शब्दांवर कुरघोडी करताना आढळत नाही. इथे शब्द वावरतो तो भाषिक तसेच सांगीत ध्वनींचा समूह म्हणून. अर्थानुसार गरज भासल्यास, तालाच्या आवर्तनास ओलांडूनही चरण वावरताना दिसतो. आपल्या रचनेत कुठेतरी बौद्धिक अंश असावा अशी इच्छा दिसते आणि याचाच परिणाम म्हणून चित्रपटसृष्टीत भारंभार संधी मिळण्याचा अभाव. 
गायक म्हणून मन्ना """"डे यांनी आपले गायन कौशल्य इथे जवळपास पूर्णांशाने सिद्ध केले आहे. देस रागावर आधारित चाल आहे म्हणून "गायकी" दाखवायची असे काहीही घडलेले नाही. एका भावनिक स्पंदनांचे भावपूर्ण चित्रण आहे आणि चाल देखील अतिशय संथ, शांत स्वभावाची आहे, हे लक्षात ठेऊन गायन हृद्यपणे केले आहे. मुळातला मोकळा आणि स्थिर आवाज इथे काहीसा कंपायमान ठेवला आहे पण त्यात कुठेही "नाट्यात्म" भाव येत नाही. पहिल्याच ओळीत "फिर कहीं कोई फुल खिला" "फ" हे अक्षर दोन वेळा येते . आता हे अक्षर उच्चारताना, आपण श्वास बाहेर फेकतो. परिणामी हे अक्षर हुंकारात्मक तरी होते किंवा अधिक वजनदार होते. गायक म्हणून मन्ना डे यांनी सर्वतोपरी काळजी घेतली आहे आणि पहिल्याच ओळीत चालीतील व्याकुळता अप्रतिमरीत्या सादर केली आहे. "शास्त्रोक्त संगीतावर आधारित गाण्यांचा गायक" हे लेबल किती चुकीच्या पद्धतीने लावले आहे,याची प्रचिती हे गायन ऐकताना येते. 

फिर कहीं कोई फुल खिला 
चाहत ना कहो उसको 
फिर कहीं कोई दीप जला 
मंझिल ना कहो उसको 

मन का समंदर प्यासा हुआ 
क्यों किसीसे मांगे दुआ 
लहरों का लगा जो मेला 
तुफ़ा ना कहो उसको 

देखे क्यों सब वो सपने  
खुद ही सजाये जो हमने 
दिल उनसे बहल जाए तो 
राहत ना कहो उसको 



No comments:

Post a Comment