Thursday, 4 June 2020

आजा रे परदेसी

सोडुनी वाट 
   तुडवीत जावे काटे 
मोडुनी रांग ती 
    पडावे बाहेर वाटे 
जायचे कुठे,
     जरी ठरले अजून नाही 
झोपेन जिथे, 
    उठवणार कोणी नाही 
आपल्या मराठी भाषेत कवी रॉय किणीकर हे अतिशय कलंदर व्यक्तिमत्व होऊन गेले. "रुबाया" छंदाच्या धर्तीवर त्यांनी कविता केल्या. मुळात कविता हा अत्यंत अल्पाक्षरी साहित्य प्रकार त्यातून रुबाया तर चार ओळींचा प्रपंच तरीही त्यातून आशयपूर्ण रचना करता येते. आज हि कविता आठवण्याचे कारण म्हणजे आजचे आपले गाणे होय. चित्रपटातील नायक असाच वाट तुडवीत हिंडत असतो आणि एका निवांत माळरानाच्या शिखरावर असताना त्याला काही सूर ऐकायला येतात. किंबहुना त्याआधी त्याचे चालणे हे निव्वळ निरुद्देश असते आणि त्या अद्भुत सुरावटीमुळे त्याचे भान हरपते. 
चित्रपट "मधुमती" म्हणजे चंदेरी पडद्यावरील तरल कविता आहे ज्या कवितेला दिग्दर्शक बिमल रॉय यांनी गूढत्व प्रदान करून हिंदी चित्रपटाची क्षेत्रे विस्तारित केली. वास्तविक याच मूलभूत कल्पनेवर पूर्वी "महल" चित्रपट आला होता परंतु बिमल रॉय यांनी त्याचा परीघ विस्तीर्ण केला, कक्षा वाढवल्या. तसे बघितले तर "मधुमती" हा नायिका प्रधान चित्रपट तरीही नायक ठळकपणे लक्षात राहतो. आपल्या चित्रपटातील कुठलेही पात्र उगीच घुसडल्यासारखे वाटू न देण्याची बिमल रॉय यांची हातोटी लक्षणीय होती.  
आजच्या आपल्या गाण्यातील कविता ही प्रसिद्ध कवी शैलेंद्र यांची आहे. भारतीय संस्कृतीमधील मूलतत्वांना त्यांनी अतिशय सोप्या शब्दात मांडून आपली कविता सामान्य माणसांच्या जवळ नेली आणि तसे करताना आशय कधीही गढूळ केला नाही, हे फार महत्वाचे. आजचे गाणे, कविता म्हणून वाचायला गेल्यास, कुठेही गूढ, अगम्य अशी शब्दरचना वाचायला मिळत नाही. किंबहुना "पंथ निहार" ,"मैं दिये की ऐसी बाती" किंवा "मैं नदीया फिर भी मैं प्यासी,भेद ये गहेरा बात जरासी" या शब्द तसेच ओळींतून सुरवातीच्या ओळींचा शाब्दिक विस्तार तर वाचायला मिळतोच परंतु आशय आकळायला कुठेही अडचण येत नाही. एक सुंदर चित्रपटीय कविता असे वर्णन करता येईल. कवितेत कुठेही ("क्यूँ " सारखे अक्षर वगळल्यास) "जोडाक्षर" नसल्याने गाताना अकारण खटका किंवा वजन देण्याची गरज भासत नाही. कवितेची जातकुळी उत्तर भारतीय लोकसंगीतात काव्याशी सांगणारी आहे. लोकसंगीतात कधीही अवजड प्रतिमा वाचायला मिळत नाहीत, जे वाचायला मिळते ते थेट असते. शैलेंद्र यांनी हेच धोरण कायम अनुसरले. 
चित्रपट "मधुमती" हे संगीतकार सलील चौधरी यांचे सर्वोत्तम संगीत म्हणावे इतक्या तोडीचे आहे. लोकसंगीत, कलासंगीत,आदिम संगीत अशा संगीत कोट्यांचे दर्शन आपल्याला होते. स्वररचना "बागेश्री" रागाशी नाते सांगणारी आहे. वास्तविक बागेश्री रागाची प्रकृती काहीशी करुण भावावस्थेशी जुळणारी आहे तरीही संगीतकार सलील चौधरींनी त्यातून अशी अप्रतिम धून साकारली. थोडे अधिक तांत्रिक लिहायचे झाल्यास "मुखडा"आणि "अंतरा" हे "पंचम" स्वरावर सुरु होतात आणि संपताना "कोमल निषाद" स्वरावर थांबतात. परिणाम स्वरूप गाण्यातील गूढत्व अधिक खोलवर व्यक्त होते. आणखी एक बाब विशेष मांडावीशी वाटते, वाद्यमेळ बांधताना व्हायोलिन वाद्यावर चक्क "पाश्चात्य हार्मनी" म्हणावी अशा स्वररचना ऐकायला मिळतात. संगीतकारावर "मोझार्ट","बीथोवन" या पाश्चात्य संगीतकाराचा प्रभाव कायम दिसत आला आहे परंतु खासियत अशी असते, पाश्चात्य संगीत आणि पौर्वात्य संगीत याची अप्रतिम सांगड घातली जाते. बौद्धिक कौशल्य हे असे दिसून येते. सांगड घालताना सरळ सरळ डल्ला मारला असे होत नाही तर गुंतागुंतीच्या सांगीतिक वाक्यांशाचे अनुपम सादरीकरण ऐकायला मिळते. अशा प्रकारे चाल भारतीय बनावटीची परंतु वाद्यमेळ पाश्चात्य संगीतावर आधारित, असे भारतीय संगीतात फार कमी वेळा ऐकायला मिळते. अशा प्रकारच्या संगीतरचनेमुळे चित्रपटातील गूढ वातावरण आणखी अगम्य होऊन जाते. तोपर्यंत तरी अशा तऱ्हेचे संगीत, हिंदी चित्रपट संगीतात निर्माण झाले नव्हते. त्यामुळे वाद्यवृंद कारागिरीपूर्ण आहे. परिणामस्वरूप शहरी आणि नागरी संस्कृतीच्या बाहेरील विश्वातले ध्वनी ऐकत आहोत असे सारखे वाटत राहते. 
लताबाईंनी अशा प्रकारच्या गायनाचा एक मानदंड तयार केला. या गायनात लताबाईंचा आवाज अधिक भरीव आहे. सदर प्रेमगीत म्हणजे अनोळखी प्रकारास आवाहन आहे, पण आवाहन असे आहे की जणू काही प्रकारची जन्मजन्मांतरीची ओळख असावी. अंतरीच्या अंतरात प्रेमाविषयी खात्री आहे आणि किंचित काळजी वावरते पण ती बाह्य वास्तवाच्या पातळीवर.गीताची लै द्रुत आहे परंतु आपल्याला बळजबरीने खेचून नेत आहे,असे अजिबात वाटत नाही.गाण्याची रचना काहीशी नांगर संस्कृतीशी नाते जोडणारी असली तरी गाता आवाज मात्र नि:संशय संस्कारित लगावाचा आहे. लताबाईंच्या सादरीकरणात नेहमी "लालित्य" हा शब्द वारंवार वापरला जातो. अर्थात याचे सखोल विवेचन करणे हा वेगळा विषय आहे परंतु सौंदर्य,आकर्षण,माधुर्य, रुबाबदारपणा इत्यादी अनेक शब्दांचे स्पष्टीकरण देताना त्याच जोडीने लालित्य शब्द वापरला जातो आणि हे अतिशय वेधक आहे. आजच्या या गाण्यात हे सगळे विशेष संपूर्णपणे आकाराला येतात. त्यामुळे हे गीत अनेक उत्कर्षबिंदूंची प्रतीती आणू देते पण याच बिंदूवर गाणे संपत नाही. ही कामगिरी निश्चितच संगीतकार सलील चौधरी आणि गायिका लताबाईंची, अशी जोडीने केली आहे. 

मैं तो कब से खडी इस पार,
ये अंखिया थक गयी पंथ निहार 
आजा रे परदेसी 

मैं दिये की ऐसी बाती,जल ना सकी जो बुझ ना पाती 
आ मिल मेरे जीवन साथी, ओह 
आजा रे, मैं तो कब से खडी इस पार

तुम संग जनम जनम के फेरे, भूल गये क्यूँ साजन मेरे 
तडपत हूं मैं सांज सवेरे,ओह 
आजा रे, मैं तो कब से खडी इस पार

मैं नदीया फिर भी मैं प्यासी,भेद ये गहेरा बात जरासी 
बिन तेरे हर बात उदासी, ओह 
आजा रे, मैं तो कब से खडी इस पार


No comments:

Post a Comment