Wednesday, 24 June 2020

मदन मोहन

आपला जन्म कुठं व्हावा तसेच आपले प्राक्तन काय आहे? याचा गुणसूत्रानुसार ताळा मांडणे अशक्य. मदन मोहन यांच्याबाबतीत हे विधान फार खरे आहे. वास्तविक रायबहादूर चुनीलाल सारख्या व्यक्तीच्या घरात जन्म झालेला म्हणजे घरात चित्रपट संस्कृती पाणी भरत होती तरीही सैन्यात भरती झाले. सलग २ वर्षे तिथे काम केले. परंतु काही कारणास्तव हकालपट्टी झाली आणि १९४३ मध्ये लखनौ इथल्या "ऑल इंडिया रेडिओ" केंद्रात नोकरी पत्करली!! इथेच त्यांच्या सांगीतिक प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. इथे प्रख्यात गायिका बेगम अख्तर यांच्या संपर्क झाला, ओळख वाढली आणि संस्कार झाला. 
मदन मोहन यांनी जेंव्हा आपली कारकीर्द सुरु केली तेंव्हा चित्रपट संगीताच्या प्रांगणात नौशाद, सी.रामचंद्र, शंकर-जयकिशन इत्यादी नामवंत भरात होते. असे असून देखील त्यांनी लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधले. वास्तविक २५ वर्षांची कारकीर्द आणि जवळपास ९० चित्रपट म्हणजे फार प्रचंड काम म्हणता येणार नाही. बहुदा त्यामुळेच असू शकेल त्यांना आपला दर्जा सांभाळता आला असावा. एक निरीक्षण, मदन मोहन पोषाखाच्या बाबतीत संपूर्ण पाश्चात्य ढंगावर गेले होते तरी संगीतात ते पूर्णपणे भारतीय वळणावर राहिले. विशेषतः उत्तर भारतीय संगीतात ते मन:पूर्वक रमले. थोडी वेगळी माहिती शोधल्यास त्यांनी संगीतकार रफिक गझनवी यांच्याकडे संगीत शिक्षण घेतल्याचे समजते पण तरीही ते नेहमी अवधानयुक्त श्रवणार्थी होते. विशेषतः बेगम अख्तर आणि बरकत अली खान यांचे ते असीम चाहते होते. वेगळ्या अर्थाने त्यांचे घराणे "लखनौ" होते असे म्हणता येईल. आणखी बारकाईने विशेष धुंडाळला तर असे हाताशी लागते - मदन मोहन यांना खरे आकर्षण हिंदुस्थानी उपशास्त्रीय म्हटल्या जाणाऱ्या रागरागिण्यांचे आणि त्यांना संलग्न असलेल्या काव्यात्मकतेतून भावनेला आवाहन करू पाहणाऱ्या प्रकारांचे होते असे म्हणता येईल. अर्थात त्यांना इतर राग अप्रिय होते असे अजिबात सुचवायचे नाही. "मैंने रंग ली आज"(पिलू), "बैंय्या ना धरो"(चारुकेशी) किंवा "जारे बदरा" आणि "जिया ले गयो जी (यमन) या रचनांचे रूप निश्चितपणे आकर्षक आहे. पण त्यांचा यासारख्या रागांकडे पाहण्याचा पाहण्याचा दृष्टिकोन मुलत: आवाहक सुरावटींच्या शोधात असणाऱ्या रचनाकाराचा होता. रागाचा विस्तार वा त्याची मांडणी करण्यात त्यांना अजिबात रस नव्हता.एकेकाळी त्यांच्यावर अनिल बिस्वास आणि सी.रामचंद्र यांचा पगडा नसला तरी प्रभाव होता असे म्हणता येईल.
या साऱ्या पार्श्वभूमीवर मदन मोहन यांची सांगीत प्रतिभा कशी प्रतीत होते याचा आढावा घ्यायचा आहे. 
१) मदन मोहन यांची प्रतिभा "गीतधर्मी" होती. थोडक्यात सांगायचे झाल्यास, अर्थाव्यतिरिक्त पण त्याच्या आधारे आशयाचे तरंग निर्माण करण्याची ज्यामध्ये अंगभूत ताकद असते अशा काव्याला प्रतिसाद म्हणून रचनाकार जेंव्हा एखादी भावपूर्ण सुरावट उभी करतो तेंव्हा तिथे गीत संभवते. मात्र आपल्या बांधणीमुळे सांगीत विस्तार अपरिहार्य वाटणार वा ठरणार नाही याची गीतरचनाकारास काळजी घ्यावी लागते. मदन मोहन तुमरीकडे न वळता गझलकडे का वळले हे यावरून स्पष्ट होऊ शकते. 
२) गीतधर्मी रचनाकार लयबंधापेक्षा सुरावटींकडे आणि प्रवाही चलनांकडे झुकतात. लयबंधाच्या वा तालाच्या, ठळक वा ढोबळ आणि मुख्यतः कालिक अक्षावरील वापरातून जी गतिमानता प्रत्ययास येते तिच्यापेक्षा स्वनरंगातले सूक्ष्म भेद दाखवून अनुभवास येणारी गतिमानता ते पसंत करतात. 
३) प्रस्तुत चर्चेच्या संदर्भात गीत आणि गझल यात फरक केला पाहिजे. अर्थात गझल हा गीतप्रकार आहे हे मान्यच करायला हवे. एक हमखास जाणवणारा धूसर हळवेपणा प्रकट करण्यावर गझलचे लक्ष अपरिहार्यपणे केंद्रित असते. सैलपणे किंवा काहीशा विरोधसंबंधदर्शक अशा दोन, दोन चरणांची मांडणी करत कविता उभी करण्याचे तंत्र. त्यामुळे आशयाची अनेक केंद्रे निर्माण करणे गझलला जमते. 
उदाहरणार्थ "नैना बरसे" (वो कौन थी) हे गीत ध्यानात घेतले तर काही विशेष मांडता येतील. (१) गझलची बांधणी न वापरणे, (२) मुखडा समोर ठेवत असल्याचा अनुभव न देता एकदम सुरावटीत बुडी मारणारे चलन, (३) एकामागोमाग येणाऱ्या कडव्यांचे पट्टी बदलून गायन आणि नकळत पुन्हा मूळ पट्टीकडे येऊन तणाव-विसर्जन करून गीत समाप्ती करणे. 
४) मदन मोहन यांच्या रचनांचे काही मुख्य सांगीत विशेष गझलच्या घटकांशी वा बांधणीशी थेट संवादी असावेत हे नवल नाही. उदाहरणार्थ (अ) त्यांच्या रचनांचे मुखडे गुणगुणत राहावे असे असतात.(ब) मुखड्यानंतर येणारी कडवी अशी असतात की ज्यांचा उद्भव साखळीतील दुव्यांप्रमाणे कार्यरत असलेल्या वाद्यवृंदाच्या आगमनाशिवाय सहज, नैसर्गिकपणे शक्य असतो. 
५) चालीस आधारभूत म्हणून व्याकरणसिद्ध वा विरळा स्वरचौकटींची योजना करण्याचा सोस नसल्याने यमन, भैरवी यांसारखे आम राग वा धनुराग म्हणून ओळखले जाणारे इतर राग यांच्या योजनांवर मदन मोहन संतुष्ट असतात. सैलसर,गतिविविध व इतरांचे स्वागत करणारी बांधणी हे या प्रकारच्या स्वर-चौकटीचे विशेष होय. काही गाणी आपण नजरेखालुन घालूया. (अ) हमसे आय ना गया (बागेश्री), (ब) बैरन नींद ना आये (बागेश्री कानडा), (क) रस्मे उल्फत को निभाये (मधुवंती), (ड) उनको यह शिकायत  है (मालगुंजी), (इ) तू जहाँ जहाँ चलेगा (नंद) 
६) मदन मोहन यांच्या संगीताला वेदनेचे प्रचंड आकर्षण आहे. त्यांच्या संगीतरचना कधीही चैतन्यमय चलनांतून उसळणाऱ्या वाटत नाहीत. द्रुतगती लयबंध किंवा उत्साही राग इत्यादींकडे त्यांचे फारसे लक्ष नसते. त्यांच्या रचनेत नाईट क्लब गीते फारशी नाहीत याचे हे एक महत्वाचे कारण आहे. जेंव्हा त्यांनी अशा प्रकारची गीते रचली तेंव्हा त्यात ओढीपेक्षा त्यांची कर्तव्यभावना अधिक जागृत झाली असे वाटत राहते. "तुमसे नजर मिली (गीता दत्त - जागीर) किंवा "थोडी देर के लिये (आशाबाई - अकेली मत जैयो) या रचना ऐकल्यावर वरील विधानाचा प्रत्यय मिळून जातो. 
७) लयबंध वा सुरावट या दोन्ही बाबतीत त्यांच्या रचना मुद्दाम केलेल्या बांधण्या आहेत असे वाटत नाही परंतु सुरावटींबाबत ते जितके तत्पर होते तितके लयबंधांच्या शक्यता धुंडाळण्यात उत्साही नाहीत. 
८) मदन मोहन यांना नव्या स्वनरंगांचे फारसे आकर्षण आहे, नवीन वाद्ये वापरून तो आयात करावा, असे वाटत नव्हते. काहीतरी गमावल्या विषयीची धूसर हळहळ या भावस्थितीच्या वेगवेगळ्या छटा शोधीत राहणे आपल्या सांगीत कार्याचे ध्येय म्हणल्याप्रमाणे तसे झाले असावे. याच कारणामुळे त्यांच्या रचनांत वाद्यवृंदास तसेच त्यांच्या नादविश्वात फारसे स्थान नाही. कंठसंगीताचे थेटपण आणि लताबाईंच्या आवाजासारखे भावविश्वाशी सहजसंवादी वाहन मदन मोहन यांना आपल्या दिमाखदार वाटचालीस पुरेसे होते. 
एकंदरीने असे म्हणता येईल, चित्रपट संगीतातील गीतांत, मुरक्या मारत पुढे येऊ पाहणाऱ्या संगमी किंवा संयोगी गीताचा प्रभाव मदन मोहन यांच्या तीव्र तसेच अविरत गीतशोधास मानवणारा नव्हता. ऐकणाऱ्याला दिपवणे किंवा ध्वनीकल्लोळात बुडवून टाकणे त्यांना अभिप्रेत नाही. सैलसर बांधणीने भावनिक तरंगाच्या लीलेस अनुकूल स्वररचना उभारणे हे त्यांच्या संगीताचे खरे रूप होय. शवाय आपल्याला जे सांगायचे आहे त्यासाठी सांगीत व साहित्तिक स्पंद एकमेकांत गुंतलेल्या वेलींसारखे यायला हवेत याचा त्यांना ध्यास होता. कारण त्यांचे संगीत जरी चित्रपटात आले तरी ते चित्रपटांशी जखडलेले नसायचे.

No comments:

Post a Comment