Tuesday, 23 June 2020

ओ मेरे सनम

दोन तरुण व्यक्तींनी प्रेमात पडणे ही सार्वत्रिक भावना आहे आणि त्यात काही फारसे नवल नाही. अर्थात प्रेमात पडणे म्हणजे सर्वस्व द्यायचे का? हा प्रश्न जरी अति वैय्यक्तिक असला तरी या प्रश्नावर ठाम असे उत्तर नाही. प्रेमात पडणे आणि आपले आयुष्य एका कारकिर्दीच्या मागे लावणे,या दोन्ही विरुद्ध बाबी ठरू शकतात. त्यातून काही (समज) गैरसमज होणे इत्यादी घटना भोलागाव्याच लागतात. अशा वेळीची संत्रस्त अवस्था ही चिरंतन असते. खरतर या परिस्थितीचे योग्य विश्लेषण एक तर अवघड असते कारण त्यात अनेक मुद्दे गुंतलेले असतात आणि दुसरे म्हणजे मानसिक विचारांचा मागोवा घेणे अशक्य असते तरीही जगभर सतत वेगवेगळ्या पद्धतीने परामर्श घेतला जातो, नवनवीन विचार प्रसूत होतात, त्यातील अपूर्णता सिद्ध होते आणि त्याच अपूर्णतेतून पुन्हा वेगळ्या थियरीज मांडल्या जातात. हा खेळ कधी संपणारा नाही आणि या चकव्यातून सुटका नाही. प्रत्येक व्यक्ती कधी ना कधीतरी या चक्रव्यूहात गुंतला जातो, त्यात अडकतो,बाहेर पडण्याचा (विफल??) प्रयत्न करीत असतो. कधी काही वाटते, कधीतरी याच विफलतेतून सफल होणे जमू शकेल परंतु तोपर्यंत तरी मानसिक व्याकुळता हेच प्राक्तन  ठरते. आजच्या आपल्या गाण्याची हीच पार्श्वभूमी आहे. दोघांच्या मनात एकमेकांबद्दल भावव्याकुळ भावना आहेत पण तरीही कुठेतरी गैरसमजाला जागा मिळाल्याने दोघांत अंतर पडले आहे. स्त्री समजावण्याचा प्रयत्न करते पण पुरुष मात्र घट्टपणे आपल्याच समजाला धरून आहे. 
हे गाणे म्हणजे एका व्याकुळ स्त्रीचे आक्रंदन आहे. प्रेमाची याचना आहे. अर्थात आजच्या आधुनिक जगात अशा याचनेला फारसे स्थान नाही परंतु मागील शतकात मात्र असेच बहुतांशी घडत होते. आता ही पार्श्वभूमी लक्षात घेतल्यावर मग गाण्यातील कवितेचा आशय समजून घेणे अशक्य होत नाही. प्रसिद्ध गीतकार (कवी) शेलेंद्र यांची शब्दकळा आहे. शैलेंद्र यांनी नेहमीच आपल्या रोजच्या वापरातले शब्द वापरले परंतु खरी गंमत केली ती, त्या शब्दांच्या रचनाकौशल्यात. त्यामुळे नेहमीचे परिचित शब्द वेगळ्याच अनुभूतीने आपल्याला जाणवतात. आता इथेच बघा "दो जिस्म मगर एक जान है हम" या साध्या ओळीतून स्त्रीची भूमिका लक्षणीयरीत्या मांडली आहे आणि पुढे याच भावनेचा विस्तार केला आहे. ही कविता म्हणजे एका स्त्रीचा संत्रस्त मानसिकतेशी चाललेला संवाद आहे जो आपल्या प्रियकराच्या मानसिकतेशी जमवून घेण्याचा, त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. परिणामी कवितेत व्याकुळता हाच भाव पसरलेला आहे. "ये धरती है इन्सानों की, कुछ और नहीं इन्सान है हम" ही अशीच साधी ओळ परंतु किती सुंदर आशय व्यक्त झाला आहे. रसिकांना अशा प्रकारच्या कवितेमुळे, गाणे ऐकताना शब्द आणि शब्दार्थ जाणून घेण्यास काहीही परिश्रम पडत नाहीत. 
संगीतकार शंकर/जयकिशन यांनी स्वरसाज चढवला आहे. राग शिवरंजनी हा आधारभूत आहे. " रे ग प" किंवा "ध प ग रे" या स्वरसंहतीला प्रमुख स्थान देणारा राग आणि इथे हेच स्वर संपूर्ण गाण्यात तरळत आहेत. पहिला अवघड आलाप झाल्यावर, सतारीवर जी छोटी गत वाजते ती याच सुरांच्या मदतीने वाजली आहे. परंतु या जोडगोळीने कायम - आपण प्रथम चित्रपट गीत बांधत आहोत,हाच दृष्टिकोन कायम ठेवल्याने रागाचे काही स्वर हाताशी घेऊन "मुखडा" सजवायचा आणि पुढे स्वतंत्र विस्तार करायचा, हाच विचार कायम केला (अर्थात काही ठिकाणी केवळ रागस्वरूप समोर ठेवले पण त्याची कारणे वेगळी आहेत). या जोडीने चित्रपट गीत बांधताना मोठा वाद्यवृंद वापरणे, याला प्रतिष्ठा दिली. त्यांच्या पूर्वी मोठा वाद्यवृंद वापरणे सुरु होते परंतु जे मोठ्या वाद्यवृंदाने साधण्यासारखे असते,ते अतिशय सुबुद्धपणे साधले. हिंदी चित्रपटांच्या शैलीशी पूरक रचना करणे, यात ते निश्चित अग्रेसर होते. सुरावटी आणि लयबंध वापरून दृश्याचे आवाहन वाढविण्यास त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. या गाण्यात देखील वाद्यवृंद वापरताना सतारीच्या सुरांसोबत व्हायोलिनचे सूर घेताना त्यांनी जे "जडावाचे" काम केले आहे, ते खास ऐकण्यासारखे आहे. इथे गाण्यातील नाट्यात्मकता लक्षात घेता, या वाद्यवृंदाची केलेली रचना लक्षणीय आहे. त्यामुळे रचनाकार चित्रपटीय नजरेशी संवाद राखून एक सांगीत संवादही साधत आहेत. अर्थात हे सगळे सुलभ आहे, असे सुचविण्याची अजिबात इच्छा नाही तर संबंधित सांस्कृतिक-सामाजिक परिस्थिती आणि चित्रपटीय भवताल यांचे संदर्भ लक्षात घेता ती अपरिहार्य, उपयुक्त आणि संस्कृतीसंगीतशास्त्रीय परिप्रेक्ष्यातून पाहता बऱ्याच अर्थाने आविष्कारक्षम होती. गाण्याच्या चित्रणात शेवटाला नृत्यपदन्यास आहे आणि तिथे पखवाजासारखे वाद्य वापरून गाण्याकडे नव्याने लक्ष वेधून घेतले. 
गायन अर्थातच लताबाईंचे आणि एक अंतरा मुकेश यांच्या आवाजात आहे. गाण्याच्या सुरवातीलाच एक दीर्घ आणि गुंतागुंतीचा आलाप आहे. साथीला फक्त व्हायोलिनचे स्वर वाजतात आणि एकदम वरच्या स्वरांत आलाप सुरु होतो. ही लताबाईंच्या आवाजातील असामान्य क्षमता आहे. हा आलाप जरा बारकाईने ऐकलं तर समजेल की तो प्रत्येक क्षणात बदलते रूप घेतो आणि हे बदलते रूप त्याच ताकदीने गेल्यावर पेलणे ही असामान्य बाब म्हणायला हवी. खरेतर रसिकाचे लक्ष इथेच गाण्याकडे पूर्णांशाने वेधले जाते. आलाप संपतो आणि सतारीवर राग "शिवरंजनी" अवतरतो. गाणे मध्य लयीत सुरु होते परंतु फार अवघड स्वरावली ऐकायला मिळतात. गायन बहुतांशी तार सप्तकात, क्वचित अति तार सुरांत चालते. या गाण्याच्या वेळी लताबाईंच्या गळ्याच्या प्रतिभेची ओळख बहुतेक रचनाकारांना झालेली असल्याने,रचनाकार देखील मोठ्या विश्वासाने अवघड रचना करायला लागले होते. खरतर चाल तशी कठीण नाही, गोड आहे परंतु आपल्या गायनाने लताबाईंनी कठीण करून ठेवले आहे. शेवटच्या अंतऱ्यात, "जो सच है सामने आया है, जो बीत गया एक सपना था" या ओळीचा पूर्वार्ध थोड्या वरच्या सुरांत आहे पण उत्तरार्ध मात्र एकदम अति तार सुरांत जातो. इथे रचनाकार आणि गायिका, दोघांचेही कौतुक करायला हवे. नुसते सूचना देऊन एकदम वरचे सप्तक गाठायचे आणि ते गाठताना कुठेही शाब्दिक आशय पातळ करायचा नाही, अशा दोन्ही पातळ्यांवर हे गाणे यशस्वी होते.
दुसरा अंतरा मुकेश यांच्या आवाजात आहे. कवितेतील शब्द बघता, मुकेश यांच्या गळ्यातील नैसर्गिक सांत्वनात्मक भाव दृग्गोचर होणे ओघानेच येते. मुकेश यांच्या गळ्याला, गायक म्हणून मर्यादा होत्या परंतु त्या मर्यादा ओळखून त्यांनी आपली कारकीर्द सजवली असे म्हणता येईल. दुसरा अंतरा बारकाईने ऐकला तर तसा मध्य सप्तकात फिरतो, जिथे मुकेश आश्वस्त असतात.मोठा वाद्यवृंद वापरूनही गाण्याच्या सांगीतिक आशयात भरपूर वृद्धी होऊ शकते हे साप्रमाणं सिद्ध करणारी ही रचना. 


ओ मेरे सनम,ओ मेरे सनम
दो जिस्म मगर एक जान है हम 
इक दिल के दो अरमान है हम 
ओ मेरे सनम,ओ मेरे सनम

तन सौंप दिया,मन  सौंप दिया 
कुछ और तो मेरे पास नहीं 
जो तुम से है मेरे हमदम
भगवान से भी वो आस नहीं 
जिस दिन से हुए एक दुजे से 
इस दुनिया से अंजान है हम 
 इक दिल के दो अरमान है हम 
ओ मेरे सनम,ओ मेरे सनम

सुनते है प्यार की दुनिया में 
दो दिल मुश्किल से समाते है 
क्या गैर वहा अपनों तक के 
संग भी ना आने पाते है 
हमने आखिर क्या देख लिया 
क्या बात है क्यूँ हैरान है हम 
इक दिल के दो अरमान है हम 
ओ मेरे सनम,ओ मेरे सनम
मेरे अपने, अपना ये मिलन 
संगम है ये गंगा जमुना का 
जो सच है सामने आया है 
जो बीत गया इक सपना था 
ये धरती है इन्सानों की 
कुछ और नहीं इन्सान है हम 
इक दिल के दो अरमान है हम 
ओ मेरे सनम,ओ मेरे सनम

No comments:

Post a Comment