Thursday, 26 December 2019

भारवाही लमाण

एखादे पुस्तक पहिल्याप्रथम वाचले की मनावर एखादी भावना उमटणे साहजिकच असते आणि त्यानुसार आपण त्या पुस्तकावर आवड/निवड ठरवत असतो. पुढे समजा तो लेखक/ती लेखिका निजधामास गेल्यावर काहीशा गहिऱ्या वातावरणात पुन्हा तेच पुस्तक वाचायला घेतल्यास, कदाचित वेगळा परिणाम घडू शकतो. कितीही तटस्थतेचा आव आणला तरी या प्रतिक्रियेची तर्कसंगत फोड करणे दुरापास्त होऊन बसते. डॉ. श्रीराम लागू लिखित "लमाण" पुस्तकाबाबत माझी बरीचशी विमनस्क प्रतिक्रिया झाली. 
वास्तविक ५ वर्षांपूर्वी मी हे पुस्तक वाचले होते आणि माझी प्रतिक्रिया तेंव्हाही निराशजनक अशीच होती आणि आता नुकतेच लागूनच निधन झाले म्हणून पुन्हा पुस्तक वाचून काढले तेंव्हा यावेळच्या प्रतिक्रियेत फारसा बदल घडला नाही. एखाद्या लोकप्रिय अभिनेत्याचे पुस्तक वाचायला घेताना आपल्यासमोर काही प्रमाणात पुस्तकाबाबत काही मते असतात (यात त्या अभिनेत्याच्या प्रतिमेचा भाग अधिक) आणि असे माझ्याबाबतीत आणखी एका पुस्तकाबाबत झाले आहे. विजया मेहता लिखित "झिम्मा" पुस्तकाने माझी अशीच निराशा केली आणि आजही त्या प्रतिक्रियेत सुतराम फरक पडलेला नाही. तसे बघितल्यास श्रीराम लागू आणि विजया मेहता यांचे कर्तृत्व निश्चितच उत्तुंग असे म्हणायला लागेल. मराठी रंगभूमीवर ज्या कलाकारांनी मन्वंतर घडवले त्यातील हे दोघे प्रमुख अभिनेते. आजही त्यांच्या शैलीविषयी गहिवरलेल्या आवाजात बोलले जाते (मला हे चुकीचे वाटते कारण कलाकाराबद्दल आत्मीयता असणे यात चूक नाही पण विश्लेषण करताना गहिवरलेपण कशासाठी?) आणि या दोन्ही कलाकारांच्या एकूण सम्यक योगदानाबद्दल त्यांना नेहमीच उजवे माप दिले जाते ( हे योग्य ) परंतु जेंव्हा कारकिर्दीचा अभ्यासक आढावा घ्यायची वेळ येते तेंव्हा वैय्यक्तिक भावना वगैरे बाजूला सारणे आवश्यकच असते. 
आता थेट पुस्तकाकडे वळतो. पुस्तकातील २ बाबी विशेष खटकल्या 
. पहिल्या बायकोचा आणि तसेच मुलाचा उल्लेख इतका त्रोटक आहे (जवळपास नगण्य स्वरूपात) आहे की थोडे आश्चर्य वाटते. आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात आणि त्यातील कुणा व्यक्तीचा किती उल्लेख करावा याबाबत खरतर लेखकाचा विचार अंतिम असे म्हणावे लागेल परंतु या पुस्तकात, पहिल्या बायकोचा फोटो आहे (फोटोंत दोघेही आहेत) आणि "माझे पहिले प्रेम" असे वर्णन केले आहे. याचाच अर्थ, आयुष्यावर काहीतरी परिणाम घडला असणार (मी असे ऐकले आहे, पहिल्या बायकोचा मृत्यू संशयास्पद रीतीने झाला. कदाचित त्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळू नये हा लेखकाचा विचार असावा) असे असताना, बायकोबद्दल इतका त्रोटक उल्लेख खटकतो. तसेच आपला मुलाचा उल्लेख. तसे बघितल्यास, मुलाचा मृत्यू ही घटना अतिशय व्याकुळ करणारी घटना होती आणि त्याबद्दल उल्लेख न करणे हा लेखकाच्या बुद्धीवादी स्वभावाचा खास विशेष म्हणायला लागेल. पण मग पुढे मुलाच्या नावाने पारितोषिक ठेवणे, ही घटना याच बुद्धीवादी विचाराशी कशी ताडून बघता येईल? पारितोषिक ठेवले म्हणजे मुलाबद्दल मनात कोवळीक तर असणारच तसेच मुलाची आठवण चिरंतन राहावी, हा विचार देखील असणारच आणि त्यात वस्तूत: काहीही चूक नाही. प्रश्न असा उद्भवतो जर का मुलाची स्मृती कायम राहावी असे वाटत असेल तर मग पुस्तकात मुलाचा ना फोटो ना कसला उल्लेख!! असे का केले असावे? हा प्रश्न मनात येतो. दुसऱ्या बायकोबद्दल बरेच उल्लेख आहेत ( याबाबत अशी मखलाशी करता येईल - दुसरी बायको नाट्यव्यवसायात असल्यामुळे उल्लेख झाले) 
सगळे आयुष्य नाट्यव्यवसायात काढले आणि ते काढताना, एक विशिष्ट विचारसरणी डोळ्यासमोर ठेऊन काढले. ही बाब सहज, सोपी नाही. आपला दृष्टिकोन कायमस्वरूपी बाळगताना मनात अनेक द्वंद्व उभी राहिली असणारच. प्रसंगी तडजोडी केल्या असणारच आणि त्यावेळी मनाची समजूत घालणे पराकोटीचे अवघड झाले असणार परंतु त्याबाबत फारसे काही वाचायला मिळत नाही. नाटकाचा व्यवसाय म्हणून स्वीकारल्यावर सदासर्वकाळ उत्तम भूमिका मिळणे कधीही शक्य नसते. तसे कुणालाही अशक्यच असते परंतु जेंव्हा मनाविरुद्ध एखादी भूमिका स्वीकारली जाते (ऐतिहासिक नाटकांतील भूमिकांबाबत त्यांनी भिन्न दृष्टिकोन ठेवला होता) तेंव्हा एकतर निव्वळ आर्थिक स्थैर्य हा मुद्दा प्रमुख असू शकतो किंवा सातत्याने रंगभूमीवर वावरणे, ही मानसिक गरज असू शकते. त्याबाबत फार खोलवर विचार केलेला आढळत नाही. किंबहुना "अभिनय कला" बाबत काही ठिकाणी काही परिच्छेद सुरेख लिहिले आहेत जे लेखकाच्या वैचारिक भूमिकेशी नाते सांगतात. 
परंतु विशेषतः "नटसम्राट" नाटक वाचायला घेतले त्यावेळची भारावलेली अवस्था त्यांनी छान मांडली आहे आणि एक माणूस म्हणून हे घडू शकते परंतु काही काळाने याच अभिनेत्याने "नटसम्राट" हे नाटक डागाळलेले नाटक आहे असे विधान केले होते. एखादी कलाकृती कालांतराने आवडेनाशी होणे, संययुक्तिक आहे पण मग त्यावेळच्या आपल्या प्रतिक्रियेबाबत आपली मते आणि विचारसरणी याबाबत काहीतरी विवेचन होणे अगत्याचे वाटते. नटसम्राट नाटकातील भूमिका आपल्याला कशी मिळाली या विषयावर भरपूर लिहिले आहे (नाटकाचे लेखक शिरवाडकरांशी वैय्यक्तिक स्नेह कसा झाला याचे देखील वर्णन आहे) पण एक बुद्धीवादी अभिनेता म्हणून त्या भूमिकेत नेमके काय भावले, आपण त्याची तयारी कशी केली याबाबत फारसे विश्लेषणात्मक काही वाचायला मिळत नाही. किंबहुना आपल्याला कालानुरूप कशा भूमिका मिळाल्या याची जंत्री वाचायला मिळते (विकिपीडियाच्या काळात ही माहिती कुणालाही कशीही मिळू शकते) "हिमालयाची सावली" ही लेखकाला मिळालेली आणखी एक गाजलेली भूमिका. महर्षी कर्व्यांच्या आयुष्यावर बेतलेली भूमिका. वास्तविक इतका प्रचंड आवाक्याचा माणूस साकारायला मिळणे, हे भाग्यच म्हणायला हवे परंतु या भूमिकेबाबत एक अभिनेता म्हणून विश्लेषक भूमिका घेतलेली नाही - हे सगळे मी लिहीत आहे कारण लागूंचा उल्लेख करताना त्यांच्या बुद्धीवादी दृष्टिकोनाचा नेहमी उल्लेख केला जातो आणि वस्तुनिष्ठ विचारसरणी आयुष्यभर कशी बाळगली, हे ऐकायला/वाचायला मिळते. जर हे उल्लेख अनिवार्य असतील तर मग आपल्याला मिळालेल्या भूमिकेबद्दल तितकाच खोलवर विचार वाचायला मिळणे, ही अपेक्षा चुकीची नाही आणि तिथे हे लेखन कमी पडते. 
पुढे मराठी सिनेमात प्रवेश केला. "पिंजरा","सामना", "सिंहासन" सारख्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. वास्तविक सिनेमा आणि नाटक, दोन्ही संपूर्ण वेगळी माध्यमे आणि दोन्हीकडे तुम्हाला वेगळी अभिनय शैली अंगीकारावी लागते. हा मुद्दा तर सर्वश्रुत आहे परंतु आजही आपल्याकडे या विषयावर फारसे "बौद्धिक" लिहिलेले वाचायला मिळत नाही. विशेषतः "पिंजरा" चित्रपटातील भूमिका फार वेगळी होती. वाचायला मिळतो तो शांताराम बापूंचा ताठरपणा आणि त्यांनी अभिनेत्यावर दाखवलेला विश्वास!! परंतु एक विचारी अभिनेता म्हणून या भूमिकेत नेमके काय भावले? त्यासाठी काही वेगळे प्रयत्न केले का? या प्रश्नांची कुठेच उत्तरे मिळत नाहीत. हिंदी किंवा मराठी चित्रपटात असंख्य सामान्य/अतिसामान्य अभिनेते बघायला मिळतात आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षाच नसते परंतु ज्या बुद्धिवादाची कास लागूंनी आयुष्यभर धरली त्यांच्याकडूनअशी  अपेक्षा बाळगणे निश्चितच चुकीचे नाही.  
आता आपण लागूंच्या अभिनयाबद्दल बोलूया. एकूणच सगळ्या भूमिकांचा साकल्याने विचार केल्यास काही गोष्टी ठामपणे जाणवतात. मराठी चित्रपटाचे नाव आठवत नाही पण एका प्रसंगात (प्रसंग चित्रपट गीताचा आहे) लागू ढोलकी वाजवताना दिसतात. किमान अपेक्षा अशी असते, तबला किंवा ढोलकी वादनाचे चित्रण चालू असेल तर निदान वादनाचा अचूक आभास पडद्यावर  दिसायला हवा परंतु पडद्यावर ढोलकी वादनाच्या वाजलेल्या मात्रा आणि लागूंच्या हात/बोटांच्या हालचाली याचा अजिबात  मेळ बसलेला नाही!! ढोलकी वादकाची भूमिका आणि मूलभूत तत्वे विसरली!! एक वेगळे उदाहरण - अर्थात तुलना नाही पण "कोहिनूर" या हिंदी चित्रपटातील "मधुबन में राधिका" या प्रसिद्ध गाण्यातील दिलीप कुमारने भासवलेले सतार वादन बघावे. तसेच अभिनयाबाबत एक बाब नेहमी सांगितली जाते, अभिनेत्याने भूमिकेत स्वत्व विसरून ती भूमिकाच वठवणे योग्य. पडद्यावर किंवा रंगभूमीवर अभिनेता न दिसता, ती भूमिकाच दिसली पाहिजे. आता या पार्श्वभूमीवर लागूंचा अभिनय कुठल्या पातळीवर येतो? पुस्तकात ठायीठायी हॉलिवूड तसेच ब्रिटिश दिग्गज अभिनेत्यांचा उल्लेख होतो आणि त्या अभिनेत्यांचा आपल्यावर पडलेला प्रभाव (त्यांच्या अभिनयशैलीबाबत काहीही वाचायला मिळत नाही तर  फक्त नामावळी  वाचायला मिळते)  याबाबत बरेच लिहिलेले वाचायला मिळते. मग प्रश्न असा  उभा राहतो. संस्कारक्षम वयात प्रभाव पडलेल्या अभिनेत्यांचे काय विशेष तुम्हाला जाणवले? आणि जे विशेष जाणवले त्याचा तुम्ही तुमच्या अभिनयासाठी काय उपयोग करून घेतला? लागूंचे वर्णन नेहमी बुद्धीप्रामाण्यवादी व्यक्ती म्हणून केले जाते मग ज्या कलेची व्यवसाय म्हणून जाणीवपूर्वक निवड केली, त्याबाबत सखोल विचार केलेला फारसा वाचायला मिळत नाही. किंबहुना काही भूमिका बघताना, आपण प्रथितयश अभिनेते डॉ. श्रीराम लागू (च) बघत आहोत असे वाटते. भूमिका वेगळी असली तरी संवादफेक, शारीर अभिनय आणि हालचाली यात काहीवेळा साचेबद्धता आढळते. एक विचारी अभिनेता म्हणून इकडे लक्ष गेले नाही की जाणूनबुजून दुर्लक्ष केले? 
सामाजिक कृतज्ञता निधी ही मराठी रंगभूमीवरील फार महत्वाची घटना आणि त्याबद्दल विस्ताराने सुरेख लिहिले आहे. "लमाण" पुस्तक ही आठवणींची जंत्री आहे, असे खुद्द लेखकानेच म्हटले आहे आणि विधानाला पुष्ट्यर्थ हे लेखन आहे. या अनुरोधाने आणखी एक मुद्दा मनात येतो."लग्नाची बेडी" नाटक करायचे ठरल्यावर जे अभिनेते/ अभिनेत्री नक्की केले जातात. त्याबाबत नक्की काय निकष ठेवले होते? याबाबत काहीही वाचायला मिळत नाही. 
पुस्तकांत, आपल्यावर खास प्रभाव पाडणाऱ्या कलाकारांची नावे लिहिली आहेत. १) बर्ट्रांड रसेल, २) मर्ढेकर आणि ३) कुमार गंधर्व. आता यांचे नेमके काय भावले?  प्रश्न अनुत्तरीतच राहतो. मर्ढेकरांच्या कवितांची अवतरणे वाचायला मिळतात, त्यावरून समृद्ध वाचनाची खात्री पटते परंतु आपल्याला का आवडले? हाच प्रकार रसेलच्या लिखाणाबत घडतो. संगीतात आपल्याला फारसे कळत नाही असे सुरवातीलाच सांगितले. अर्थात संगीत न कळता (शास्त्र न जाणता) आस्वादता येते. परंतु हे लेखनाबाबत असे म्हणता येणार नाही. अभिनेत्याचे आत्मचरित्र आहे तेंव्हा लेखनाची सखोल चर्चा अपेक्षित नाही परंतु आपली आवड, याबाबत थोडक्यात तर्कसुसंगत भूमिका मांडणे, ही अपेक्षा चुकीची ठरत नाही. त्यातून आयुष्याच्या उत्तर काळात लागूंनी कविता वाचनाचे जाहीर कार्यक्रम केले होते म्हणजे मराठी कवितेबाबतची साक्षेपी नजर स्पष्ट केली होती. 
वास्तविक आत्मचरित्रात्मक लेखन म्हणजे आपल्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहण्याची एक दुर्लभ संधी असते. त्यानिमित्ताने आपल्या पूर्वायुष्याकडे त्रयस्थ नजरेतून बघून त्याचा ताळा मांडणे शक्य असते. भावनांना संपूर्णपणे बाजूला सारून, त्यावेळच्या प्रतिक्रिया कितपत योग्य होत्या, किती चुकीच्या होत्या, इत्यादी गोष्टी संगतवार तपासता येतात, निदान त्या दृष्टीने प्रयत्न असावा आणि तिथेच "लमाण" पुस्तक अपुरे ठरते. कधीतरी असे मनात येते, बुद्धीप्रामाण्यवाद हा लेखकाने आपल्यावर लादून घेतला की काय? तसे असेल तर हे सगळेच लेखन ही आत्मवंचना ठरेल. 

No comments:

Post a Comment