"मंद असावें जरा चांदणे कुंद असावी हवा जराशी
गर्द कुंतली तुझ्या खुलाव्या शुभ्र फुलांच्या धुंद मिराशी
सांगावे तूं दु:ख आगळें माझ्यासाठी गिळिलें कैसें
आणि आंधळ्या भलेपणीं मी तुला केधवां छळिलें कैसें"
कविवर्य बोरकरांच्या या श्रुतिमधुर ओळी एकाच वेळी आत्मवंचनेची गहिरी अनुभूती देतात आणि दुसऱ्या अंगाने प्रणयाच्या नखऱ्याचा शाश्वत अनुभव देतात. अर्थात, असा अनुभव आपल्या काव्यातून, आयुष्यभर हा कवी आपल्याला देत आलेला आहे. प्रेमातील आत्मवंचना हिंदी चित्रपटातील गाण्यांना कधीच नवीन नव्हती. चित्रपट बोलायला लागल्यापासून, आपल्याला याच भावनेची अनंत रूपे पहायला मिळाली आहेत.
हिंदी चित्रपट गीतांत बरीचशी गाणी खूप गाजतात, कालांतराने त्यात काही त्रुटी निदर्शनास येतात आणि मग एकूणच आवड बदलत जाते. अर्थात, कालानुरूप आवड बदलणे, हे साहजिकच असते. या बाबतीत आणखी एक खुळचट समज भरपूर पसरला आहे. गाणे लोकप्रिय असणे, दर्जाच्या दृष्टीने "कमअस्सल" ठरले जाणे. जितके गाणे "दुर्मिळ", तितकी त्या गाण्याची "किंमत" अधिक. आता हा गैरसमज कुणी, कसा पसरवला, याला कसलाच पुरावा देता येत नाही.दुर्मिळ गाणे उत्तम असते, हा देखील चुकीचा समज आहे म्हणा. ते असो, आजचे गाणे त्या काळी देखील लोकप्रिय होते, आजही आहे आणि कदाचित पुढे त्याच्या लोकप्रियतेत घट होईल, असे संभवत नाही. याचाच दुसरा अर्थ असा देखील काढता येतो, सुगम संगीतात अजूनही ठाम निकष असे तयार झाले नाहीत आणि प्रत्येकाची "आवड" याच कसोटीवर गाण्याचा दर्जा ठरवला जातो. खरतर चित्रपट गीतांचे अचूक असे शास्त्र देखील बनले नाही आणि मग त्यात, बरेचवेळा ज्याला निव्वळ बाष्कळ म्हणावे असे विचार प्रचलित होतात. यामागे, असे देखील म्हणता येईल, चित्रपट गीतांना अजूनही, संगीताच्या प्रांगणात सन्माननीय स्थान मिळालेले नाही.
"चोरी चोरी" चित्रपटातील "रसिक बलमा" हे गाणे आजही अनेक रसिकांच्या आवडीचे आणि म्हणून स्मृतीत ठाण मांडून बसलेले गीत.चित्रपटात हे गाणे, मुख्यत्वेकरून नर्गिसवर चित्रित झाले आहे. नर्गिस, अभिनेत्री या दृष्टीने अत्युत्तम म्हणून कधीच गणली गेली नाही तसेच भारतीय सौंदर्याच्या मापनातून रूपवती देखील मान्य पावली नाही. तरीही, काळाच्या दृष्टीने अत्याधुनिक विचारांची, अभिनयात धिटाई दाखवणारी आणि "ग्रेसफुल" अभिनेत्री म्हणून नक्कीच गणली जाते. बहुतेक चित्रपटात, चावून चोथा झालेला प्रसंग - नायक, नायिकेचा बेबनाव आणि त्यातून निर्माण होणारी मानसिक तडफड. या पार्श्वभूमीवर हे गाणे चित्रित झाले आहे.
संगीतकार शंकर/जयकिशन यांची, या गाण्याला चाल आहे. गाण्याची चाल शुद्ध कल्याण रागावर आधारित आहे. या जोडींचे खास वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, त्यांची गाण्याबाबत असलेली चित्रपटीय भाषा. वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास, आपण चित्रपटातील गाणे तयार करीत आहोत, ही जाणीव त्यांच्या सगळ्या रचनांमधून आपल्याला आढळेल आणि याच दृष्टीने पुढे मांडायचे झाल्यास, या गाण्यातील राग हा केवळ आधार स्वर इतपतच वापरलेला आहे. चाल बांधताना, राग-चौकटीपासून दूर सरकून त्यांनी इथे काहीतरी आवाहक आणि नवे निर्माण करण्याचा सुजाण प्रयत्न केला आहे आणि त्या दृष्टीने, इथे केलेल्या रागाचा वापर अधिक कलात्मक म्हणायला हवा.
शायर हसरत जयपुरी यांची शब्दकळा आहे आणि तशी रचना केवळ दोन कडव्यांचीच आहे पण तरीही कविता म्हणून, गाणे कुठेही घसरत नाही. आपण या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यायला हवी. चित्रपटातील प्रसंग हे बहुतांशी एकसाची असतात. असे असून देखील, प्रसंगानुरूप रचना करताना, कवीला प्रत्येकवेळा सृजनात्मक रचना करणे केवळ अशक्य असते, तरी देखील संख्येने बघता, रचनेतील गेयता आणि सृजनता वाखाणण्याइतपत कौतुकास्पद असते.
शायर म्हणून हसरत जयपुरी यांचा विचार करायला गेल्यास, त्यांच्या रचना बहुतांशी गेयबद्ध अंगाने केलेल्या दिसतात. अर्थात, जेंव्हा काव्याचे गाण्यात रूपांतरण होते तेंव्हा, स्वररचनेचा आकृतिबंध लक्षात घेऊनच शब्दरचना करणे हे बंधन अत्यावश्यक असते. ललित संगीतातील शब्दरचनेचा जेंव्हा विचार केला जातो तेंव्हा या बंधनाचा विचार पहिल्या पायरीवर करावाच लागतो. चित्रपट गीतांत प्रतिभेची भरारी दिसत नाही (अपवाद म्हणून काही कविता दाखवता येतील पण त्या अपवादात्मकच!!) असा गंभीर आरोप नेहमी केला जातो पण त्या आरोपामागे, ललित संगीताचा ढाचा समजून घेतला गेला नाही, हेच दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. गेयतेबरोबर आशयघनता मिसळण्याची अप्रतिम प्रतिभा या शायरकडे नक्कीच होती.
सारंगीच्या आर्त सुरांतून गाण्याची सुरवात होते आणि आपल्याला शुद्ध कल्याण रागाचे सूर ऐकायला मिळतात. सारंगीचे सूर संपतात, तिथे लता बाईंचा वरच्या सुरांत आवाज लागतो - "रसिक बलमा". गाण्याच्या सुरवातीलाच तार स्वरांत गळा न्यायाचा, ही कधीही सोपी गोष्ट नसते. एकतर या गाणे थोडे बारकाईने ऐकले तर समजेल, "बलमा" या शब्दावरील सुरांनी, पुढील सगळी रचना तोलून धरली आहे. प्रत्येक गाण्यात, अशी एखादी "खास" जागा असते, ती जागा म्हणजे त्या गाण्याची ओळख!! "रसिक बलमा' म्हणताना, स्वर कसा उंचावत जातो, ते न्याहाळणे खरच सुंदर अनुभव आहे.
त्यानंतरचा " हाये" शब्द देखील असाच अप्रतिम आहे. तडफडत्या ह्रुदयाची भावना, त्या "हाये" शब्दात गुंतलेली आहे. तसेच पुढे "दिल क्यो लगाया" इथे ओळ संपत असताना जीवघेणी हरकत आहे - "लगाया" मधील "या" अक्षरावर. ही खास लताबाईंची गायकी!! शाब्दिक आशय सुरांतून किती प्रत्ययकारी पद्धतीने मांडता येतो, हे सुरेख उदाहरण. पुढील ओळ - तोसे दिल क्यो लागाया, जैसे रोग लगाया. इथे परत रचना मंद्र सप्तकात घेतली आहे आणि गमतीचा भाग म्हणजे, ओळ ज्या स्वरांवर संपते तो स्वर परत, "रसिक" शब्दाच्या सुराशी नेमका जोडला गेलेला आहे. तीन मिनिटांच्या गाण्यात, तुम्हाला कुठेही "ठेहराव" घ्यायला फारशी फुरसत मिळत नसते.
पहिल्या अंतरा सुरु व्हायच्या आधीचा वाद्यमेळ खास लक्षवेधी आहे. सतारीचे स्वर मध्य लयीत सुरु आहेत पण पार्श्वभागी, सारंगीचे सूर मंद स्वरात त्या सांगीत वाक्यांशाला अप्रतिम स्वरिक आशय देत आहेत. संगीतकाराची व्यामिश्र कलाकुसर इथे ऐकायला मिळते. काही क्षणांचाच वाद्यमेळ आहे पण त्याने गाण्याची रचना किती भरीव केली आहे. नीट ऐकले तर कळेल, सतार आणि सारंगीच्या सुरांत, व्हायलीनचे सूर किती अप्रतिमरीत्या मिसळले आहेत आणि पहिला अंतरा सुरु व्हायची जणू पूर्वतयारी करीत आहेत.
जब याद आये तिहारी, सूरत वो प्यारी प्यारी
नेहा लगा के हारी, तडपू मैं गम की मारी.
या ओळी सुरु व्हायचा आधी, सतारीचे सूर त्या ओळींची गत मांडून ठेवतात आणि त्याच सुरात, "जब याद आये तिहारी, सूरत वो प्यारी प्यारी" ही ओळ ऐकायला मिळते. गाण्यात, कुठली ओळ किती वेळा आळवायची, याचे देखील "गणित"असते आणि ते संगीतकाराने नेमकेपणाने ठरवायचे असते. हीच ओळ परत घेताना, सूर बदलतात आणि रचना परत तार सप्तकात जाणार, याचे सूचन करतात. "नेहा लगा के हारी, तडपू मैं गम की मारी." ही ओळ ऐकताना, आपल्याला एक बाब निश्चित समजते, ही ओळ परत "रसिक" शब्दाच्या ओळीशी नाते जोडणार. गाण्यचे शब्द देखील किती सुंदर आहेत - नेहा लगा के हारी, तडपू मै गम की मारी. सगळी तडफड, प्रसंगी वांझोटी वाटणारी हैराणी मनात साचली आहे पण, निरुपायाने सहन करण्यावाचून कुठलाच पर्याय शिल्लक नाही. इथे तार स्वरच ती भावना दर्शवू शकतात. गाण्यातील शब्दांचे महत्व जाणून, रचना तयार करणे किती अवघड असते, हेच दाखवण्याचा हा एक प्रयत्न.
इथे आणखी एक बाब मांडण्यासारखी आहे. पडद्यावर हे गाणे नर्गिसवर चित्रित केले आहे. गाणे विरही आहे, यात वादच नाही पण ती वेदना दाखवताना, बरेचवेळा हिंदी चित्रपटात ओक्साबोक्शी रडणे, हातातील बांगड्या फोडणे आणि हात रक्ताळून घेणे इत्यादी बटबटीत अभिनय केला जातो पण नर्गिस पडद्यावर असले काहीही करत नाही. डोळ्यातील अश्रू बघताना, आपल्याला सगळी वेदना वाचता येते.
दुसरा अंतरा यायच्या आधीचा वाद्यमेळ जवळपास तसाच ठेवलेला आहे. अर्थात याचा दोन्ही प्रकारे अर्थ लावता येतो. एकतर, आधीचा वाद्यमेळ तसाच ठेऊन, संगीतकाराने झालेला परिणाम अधिक गडद करण्याची संधी साधून घेतली. अर्थात टीकाच करायची झाली तर, इथे नवीन प्रकारे रचना करायची संधी गमावली!! अखेर संगीतकाराचा अधिकार शेवटचा आणि महत्वाचा, इतकेच आपण इथे बोलू शकतो.
ढूढे ये पागल नैना, पाये ना एक पैल चैना
डसती है उजली रैना, का से कहू मैं बैना.
हा गाण्यातील शेवटचा चरण. "ढूढे ये पागल नैना, पाये ना एक पैल चैना' ही देखील आधीच्याच कडव्यातील पहिल्या ओळीची चालीची पुनरावृत्ती आहे. पण पुढे फार वेगळी गंमत आहे. डसती है उजली रैना - "रैना" शब्दानंतर लताबाईंनी आकारात्मक जो आलाप घेतला आहे, तो केवळ अवर्णनीय आहे लयीची गती बघा आणि त्या आलापीचे सौंदर्य अनुभवा. ओळी वरच्या सुरांत आहे आणि तोच स्वर कायम ठेऊन, आलाप थोडा दीर्घ घेतला आहे आणि घेताना तो आलाप किंचित कंपायमान केला आहे. केवळ अफाट गायकी. लिहायला फार सोपे आहे पण गळ्यावर ते मांडणे निरतिशय कठीण आहे.स्वर तसाच पुढे चालत आहे आणि " का से कहू मैं बैना" म्हणताना, पायरी पायरीने स्वर उतरता होतो. काही क्षणांचा(च) हा आविष्कार आहे. गाणे केवढ्या उंचीवर जाउन पोहोचते. ही शेवटची ओळ परत तशीच त्याच स्वरांवर येते, जिथे पहिल्यांदा "रसिक बलमा" घेतले होते. गाणे संपताना, पुन्हा "रसिक बलमा" याच शब्दांवर संपते पण संपताना देखील लताबाईंच्या गायकीची कमाल ऐकायला मिळते. "बलमा" झाल्यावर, तोच सूर किंचित आणखी वरच्या पातळीवर नेला आणि गाणे आलापास्थित अवस्थेत संपते. ऐकणारा दि:डमूढ होतो.
संगीतकार म्हणून शंकर/जयकिशन यांनी चित्रपटीय स्वररचनेचा नवीन घाट शोधला,आपला वाद्यमेळ अधिकाधिक सर्वसमावेशक केला. ते करण्यासाठी त्यांनी प्रसंगी ४०, ५० व्हायोलिन वादकांना आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आणि वाद्यमेळाची व्याप्ती आणि मर्यादा वाढवल्या. त्यादृष्टीने बघायला गेल्यास, त्यांची दृष्टी सतत जागतिक संगीताच्या पटलावर असायची आणि त्यातील अनेक सांगीतिक संदर्भ आपल्या स्वररचनेत समाविष्ट करून, चित्रपट संगीताला रंगतदार केले. ही बाब निश्चितच स्पृहणीय होती.
No comments:
Post a Comment