Wednesday, 4 December 2019

लक्ष्मीकांत - प्यारेलाल

ही जोडी हिंदी चित्रपट संगीतात प्रसिद्ध होण्यापूर्वी, या क्षेत्रात काही संगीतकार जोड्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता, प्रसंगी सर्जनशीलतेचे नवीन पायंडे पाडले होते. किंबहुना ही जोडी प्रकाशात येण्याआधी  शंकर-जयकिशन किंवा कल्याणजी-आनंदजी या जोडींनी आपली कारकीर्द गाजवायला सुरवात केली होती. लक्ष्मीकांत  पहिल्यापासून मेंडोलिन वाड्यावर प्रभुत्व मिळवून होते तर प्यारेलाल यांनी ट्रम्पेट (प्यारेलाल यांचे वडील रामप्रसाद देखील उत्कृष्ट वादक होते, हा योगायोग) वाड्याचा पायाभूत अभ्यास केला होता तसेच अशी माहिती मिळते, प्यारेलाल यांनी गव्याच्या अँथनी गोन्साल्वीस या संगीतकाराकडे काही काळ प्राथमिक धडे घेतले होते. कारकिर्दीच्या सुरवातीला त्यांनी कल्याणजी-आनंदजी  यांच्याकडे काही काळ शागिर्दी पत्करली होती. १९६३-६४ मध्ये त्यांचा "पारसमणी" हा चित्रपट आला आणि हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात आपल्या नावाची ग्वाही पसरवली. पुढे १९६४ मध्ये "दोस्ती" चित्रपटाची गाणी अफाट गाजली आणि त्यांचे स्थान प्रस्थापित झाले असे म्हणता येईल. सुमारे ३५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास ४०० चित्रपटांना संगीत दिले. याचा परिणाम, शंकर-जयकिशन यांच्यानंतर सिनेमाप्रेक्षक खेचणारी हीच रचनाकार जोडी ठरते. 
साधी, गुणगुणण्यासारखी गाणी  
संगीत रचनाकार म्हटलं की त्याचा एक पायाभूत गुण असतो आणि तो म्हणजे गुणगुणण्यासारखी चाल बांधता येणे. आणि हाच जर एक निकष मानला तर या जोडीने अशा गीतांच्या वर्गात मोडतील अशा भरपूर रचना केल्या. किंबहुना कारकिर्दीच्या पहिल्या पाऊलखुणा अशाच प्रकारच्या गाण्यांनी उमटवल्या. "हंसता हुवा नूरानी चेहरा" (पारसमणी - आशा भोसले/कमल बारोट) हे युगुलगीत प्रचंड गाजले. दोन आवाजांनी गायलेले हे द्रुतगती, तजेलदार, सौंदर्यसुक्त भैरवी या न संपणाऱ्या माधुर्यपूर्ण रागिणीच्या साव आणि चलनात लीतील गीत. थोडे विश्लेषणात्मक लिहायचे झाल्यास, पंचम स्वरावर पहिले दोन चरण केंद्रित होतात. पुढील ओळ एक सूर खाली उतरते आणि मग "दिलरुबा" शब्द द्विरुक्त होतो - परिणाम ऐकणाऱ्याच्या मनावर रेंगाळतो. परिचित रागचौकटीचा वापर आणि सहज ध्यानात राहील असा मुखडा या विशेषांचा आढळ "जीवन डोर तुम्हे संग बांधी" (लताबाई - सती सावित्री) यासारख्या गीतातही होतो. या गीताचा आरंभ यमन राग पायाभूत मानून होतो आणि पहिली ओळ "सा" या आधारस्वरावर थांबून गीताच्या आशयाशी शांत आणि ठामपणा प्रदान करते. "ज्योत से ज्योत जगाते चलो" (मुकेश - संत ज्ञानेश्वर) हे गीत भैरवीचा आधार घेऊन निघते आणि आपल्या भजनसमान साध्या बांधणीत श्रोत्यांना नकळत गुंगवून टाकते. 
श्रोत्यांच्या मनात-कानात गीत रुजवण्यासाठी वापरायचे या जोडीचे आणखी खास वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गीताचा पहिला चरण सप्तक मर्यादेतील मधल्या स्वरावर म्हणजे पंचमावर आणि दुसरी ओळ खाली आणून आधारस्वरावर म्हणजे षड्ज स्वरावर ठेवणे. अनेक वेगवेगळ्या कारणांनी सुरावट "सा" स्वरावर संपली म्हणजे एक प्रकारची पूर्णतेची आणि स्थैर्याची भावना मनात दृढ होते. 
"डफलीवाले" हे असेच प्रचंड गाजलेले गीत (लताबाई/रफी - सरगम) खूपच मोहवणारे युगुलगीत  आहे. मधुर चाल, उस्फुर्त आणि ऊर्जापूर्ण फेक, प्रवाही सुरावट आणि डफली या न-स्वरी लोक लयवाद्याचा आकर्षक आणि पुनरावृत्त वापर ही खास वैशिष्ट्ये होत. 
सांगीत जमवून घेणे आणि प्रयोगशीलता 
या संगीतकाराबाबत एक गोष्ट लक्षात येते, त्यांनी संगीत दिलेल्या अनेक चित्रपटाची शीर्षकगीते आकर्षक असून, त्या चित्रपटाचे नाव गाण्यात गुंफण्याची तरकिब छान करतात. वास्तविक पहाता हा मुद्दा संगीतबाह्य आहे परंतु संगीतबाह्य परिस्थीतीशी जमवून घेऊनही सांगीत पथ्ये पाळत होते, हे नि:संशयरीत्या मान्य करायला हवे. 
या मुद्द्यासाठी आपण एक उत्तम उदाहरण बघूया. "उत्सव" ( १९८४) या रुढीबाहेर पडणाऱ्या चित्रपटाचे त्यांचे संगीत एक भरीव उदाहरण ठरते. चित्रपटीय सौंदर्यशास्त्रानुसार जी अधिकार परंपरा अपरिहार्य असते तिची हुकूमत मान्य करून या रचनाकारांनी आपल्या कामगिरीवर स्वतःच मर्यादा घालण्याचा विरळा सुज्ञपणा दाखवला. प्रस्तुत संगीताचे थोडे विश्लेषण केल्यास काही बाबी समोर येतात. 
या चित्रपटातील एक रचना, "सांज ढले गगन तले" गीत असे होते. "मन क्यों बहेका रे" हे देखील या दिशेने जाऊ न शकणारी रचना आहे. सादरीकरणातले खंडितपण, चालींचे व सुरावटीचे धागेदोरे पक्केपणाने आपल्या दर्शित शेवटाकडे न जाणे अशा कारणांनी गीत होऊ शकत नाही. दुसरा बारकावा असा, या चित्रपटाच्या संपूर्ण संगीतलेखात हिंदुस्थानी कला संगीतात मारवा आणि बिभास या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या रागांच्या अवतीभवती फिरत राहणारे स्वर योजण्याची हेतू जाणवतो. या दोन्ही रागांच्या चौकटीचे वा बांधणीचे स्वरूप असे आहे, की त्यामुळे "सा" या आधारस्वराचे महत्व या ना त्या प्रकारे कमी होते.  परिणामतः सुरावटींच्या चलनातून उत्पन्न होणाऱ्या तणावांचे विसर्जन होत नाही. चित्रपटाचा आशय ध्यानात घेता जे प्रेम शिष्टसंमत मानले जात नाही, त्याचे चित्रण चित्रपटात आहे. तेंव्हा, सांगीत ताण विसर्जित  न होणे हा चित्रपटीय लाभ नव्हे का!
त्यांच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत, "उत्सव" मध्ये हे रचनाकार वाद्यवृंदाचा उपयोग जरा हात राखून करतात. एक महत्वाची बाब लक्षात घ्यायला हवी, १९६० च्या दशकापासून हळूहळू अधिक आक्रमकता, हिंसा यांनी भरलेल्या चित्रपटांची सद्दी आली. या कालखंडात संगीताची जागा हिंसेने घ्यायला सुरवात झाली. त्यादृष्टीने या ना त्या मार्गाने, ही जोडी दैनंदिन जीवनाच्या वा वास्तवाच्या आकृतिबंधाच्या जवळ संगीत नेण्याचा प्रयत्न करीत होती. "बॉबी" चित्रपटाचे संगीत अशी नवी परिमाणे दाखवतात.  
प्रचलित प्रवृत्ती आणि त्यांना साजेसे संगीत देण्याची त्यांची विनातक्रार तयारी यांची प्रतीती "मस्त बहारों का (रफी - फर्ज) किंवा "दुनिया पागल है" (रफी - शागीर्द) यांसारख्या गीतांतून येते. ही दोन्ही गीते "याहू" शैलीतील आहेत. या गाण्याचे जरा बारकाईने निरीक्षण केले तर असे आढ ळते, संगीतबाह्य आवाजाने ही गाणी सजवली आहेत आणि तसे करण्याने कुठेही गीततत्व ढळत नाही. वाद्यघोषातील वाद्ये ऐकणाऱ्यांच्या कानावर हल्ला करण्याचे कर्तव्य पार पाडतात! 
१९७० पासून आणि पुढे ही चर्चित रचनाकार जोडी प्रयोगशीलतेबाबत परंपरेत राहून किंवा तिच्या बाहेर पडूनही नव्या रचना करण्यात उत्साही होती. उदाहरणार्थ "सून जा आ ठंडी हवा" (किशोर/लताबाई - हाथी मेरे साथी) या गीतातील चरण आणि सुरावटीची ओळ यांच्या दरम्यान अधिक खेळ करण्याकडे कल होता. या रचनेत सुरावटीची ओळ छंदातल्या २ ओळी व्यापते. त्यामुळे सांगीत विधान अर्थातच अधिक अखंड आहे. दुसरे उदाहरण - "तेरे मेरे बीच में" (लताबाई/बालसुब्रमण्यम - एक दुजे के लिये) या रचनेत महत्वाकांक्षी, द्रुत आणि गुंतागुंतीचे वाक्यांश शब्दांच्या शेवटी गायकांसाठी आणि तितकीच कसोटी पाहणारी सुरावट तारस्वरीं बासरीवर योजली आहे. अर्थात इथे मुद्दा येतो, अशा प्रकारचा उच्च रव करणे, ही या जोडीची युक्ती होती का? कारण इतर रचनांत देखील हीच युक्ती अवलंबली असल्याचे दिसते. "ये वक्त ना खो जाये" (लताबाई/बालसुब्रमण्यम - ये रास्ते प्यार के) या रचनेत अशीच युक्ती वापरल्याचे ध्यानात येते. हे अनन्यसाधारण आहे, असे इथे नकीच सुचवायचे नाही पण अशा युक्त्या वापरून गाणे प्रसिद्ध करायचे, या कलेत ही जोडी वाकबगार झाली होती, हे नि:संशय. 
शैलींना एकत्र आणणे 
रूढ संगीतप्रकारांचे किंवा शैलीचे मिश्रण करणे, या संगीतकारांना पसंत होते. "कोई शहरी बाबू" (आशाबाई - लोफर) या गाण्यात खेड्यातील बँडवादनातील स्वरवाक्ये, भांगडा नृत्यगीत आणि पारंपरिक स्त्री गीत एकत्र केले आहे. याच प्रकारच्या परंतु फसलेल्या रचनेचे उदाहरण - "चल ओ माझी" (रफी - आय सावन झुमके) हे गाणे. हिंदी चित्रपटसंगीतात नाविकांचे गाणे (आदर्श नमुना - बंगाली भटियाली) हा लोकमान्य आणि रूढ गीतप्रकार आहे. मात्र प्रस्तुत रचना निव्वळ उपदेशपर गीताचे कार्य पार करण्यासाठी तद्दन शहरी, फिकट सांगीतिक रूप आहे. "दुनिया में मेला, मेलेंमे लडकी" (लताबाई - राजा जानी) ही रचना मात्र संस्कारित स्त्री गीत म्हणून पुढे येते. एकंदरीत भट्टी जमते. परंतु "तुने मुझे बुलाया" या गाण्यात भक्तिसंगीत आणि पंजाबी भांगडा मिसळण्याचा प्रयत्न तद्दन फिल्मी किंवा स्पष्टपणे फसतो. त्यामानाने "एक ऋतू आये" (किशोर कुमार - गौतम गोविंदा) हे गीत ऐकणे वेधक वाटते. 
विनोदी गीतांच्या बाबतीत हे रचनाकार फसले आहेत, असेच वाटते. "मेहेबुबा मेहेबुबा" (साधू और शैतान) या गीतातले विनोदी भाव म्हणजे शैलीबद्ध समूहगीत, भपकेदार पोशाख आणि शब्दांकडे तिरकस पाहणे, इतकेच घडते. विनोद कवितेतच शोधावा लागतो. 
शास्रोक्त पासून दूर सरकणे 
चित्रपटसृष्टीतील अनेक व्यावसायिक रचनाकारांप्रमाणे ही जोडी देखील भारतीय कलासंगीतातील राग, ताल आणि रूढ प्रकारांपासून दूर सरकण्याची कौशल्य दाखवणे तसेच दूर सरकणे कुणालाही जमू शकते. मुद्दा असा आहे, असे दूर सरकण्यातून गुणवत्तापूर्ण म्हणण्यासारखे यात काय काय साधले, याचे मूल्यमापन करणे होय. सुदैवाने या जोडगोळीला हे जमले आहे. "उत्सव" चित्रपटाबाबत आपण आधीच चार शब्द लिहिले आहेत. "मेरे सांसो को महेक आ रही है" (माताबाई/महेंद्र कपूर - बदलते रिश्ते) हे गीत ऐकण्यासारखे आहे. पुरिया धनाश्री या रंगाच्या काहीशा अंगभूत संदिग्धतेच्या वर्तुळात रचना वावरते. कलासंगीताचे साचे वापरले नाहीत, वाद्यवृंद काटकसरीने वापरला आहे. पूर्ण प्रयत्नांती कुठलीही गुणगुणण्यासारखी चलने मागे रेंगाळत नाहीत परंतु त्यापलीकडे काहीतरी सुचवू पाहणारी एक सांगीतिक गुंतागुंत अस्वस्थ करून जाते. हे या रचनाकाराचे यश नव्हे का? 
आणखी एक, दोन उदाहरणे देता येतील. "सुनो सजना" (लताबाई - आये दिन बहार के)  तसेच "तुम गगन के चंद्रमा" (लताबाई/मन्ना डे - सती सावित्री) ही दोन्ही गाणी चित्रपटसंगीतात वारंवार वापरलेल्या यमन रागाच्या आसपास वावरतात परंतु कुठेही राग सादर केल्याचा आव आणला जात नसून एक सुंदर चित्रपटगीत सादर होत आहे,असेच जाणवते. 
भाषण-संगीत पट 
"अच्छा तो हम चलतें हैं" (लताबाई/किशोर -आन मिलो सजना) ही रचना ऐकताना एक लक्षात येते, ही रचना पूर्णतः गीत नसल्याने आपल्यात आकर्षण निर्माण झाले आहे. भाषण-लयी आणि भाषण - खंड यांची पेरणी करीत हुशारीने गीतात्मतेचे सूचना करणारी रचना आहे. एक सांगीत आनंद आकाराला येतो आणि संयमित, प्रामाणिक आणि गुदगुल्या करणारी छेडछाड व्यक्त होते. 
आता असे म्हणता येईल, गीतामध्ये भाषण-गीत संकर म्हणजे सांगीत गुणवत्ता नव्हे, असे नाही. इच्छित सांगीत आवाहकता निराळ्या प्रकारची असते. आणखी प्रसिद्ध उदाहरण द्यायचे झाल्यास, "पवन करे शोर" (लताबाई/मुकेश - मिलन) या रचनेचे वेधकपण त्यातील बोलल्या जाणाऱ्या भागात का? हे निश्चितच तपासावे लागेल. आणि याच विचाराने पुढे विधान करायचे झाल्यास, "बॉबी" चित्रपटातील गाणी हा योगायोग नव्हे. 
निष्कर्ष असा, या जोडगोळीने आपल्या आरंभीच्या टप्प्यावर गीत दाबून अथवा दडवून न टाकणारा पण कां भरणारा वाद्यरंग वापरण्याचे धोरण पुढे चालवले. "जंगली" या चित्रपटाने दर्शित टप्प्याला ते यशस्वीपणे सामोरे गेले आणि सपाट, अनलंकृत थेटपणे गाण्याच्या शैलीही पचवल्या. एकूण दृष्टिकोन, दैनंदिन आकृतिबंधाशी जवळीक साधण्याचा, आधुनिक शहरी तरुणांच्या मनात शिरण्याचा, त्याकाळच्या चित्रपटात विधिकृत्यातील सामूहिकता आणि म्युझिक-व्हिडियो युगातल्या शृंगारिक, अनेक केन्द्रियसंवेदना यांना आवाहन करणारे संगीत येऊ घातले होते. 

No comments:

Post a Comment