पावसाळी हवेतील धुंद संध्याकाळ. प्रियकर सैन्यात सामील झाल्याने दूर गेलेला. मनात उठलेली हुरहूर आणि कालवाकालव. अशाच विक्लांत क्षणी सुरुच्या घनदाट बनात शिरल्यावर, अंगावर कोसळलेला अंधार. तिथल्या प्रत्येक खोडावर उमटलेले स्पर्श, पानांनी ऐकलेले हितगुज या सगळ्याचा झालेला "कोलाज". मनाची सगळी सैरभैर अवस्था आणि त्या अवस्थेतून बाहेर पडण्याची धडपड. नजरेसमोर जाणवत असलेला प्रियकर आणि त्याच्या बरोबर घालवलेले धुंद क्षण, गोकर्णाच्या दुमडलेल्या पाकळीप्रमाणे उमटलेले अस्फुट स्मित.
रॉय किणीकरांच्या शब्दात ,मांडायचे झाल्यास,
"लागली समाधी आभाळाला आज,
गौतमीस आली कृतार्थतेची नीज;
बघ तपोवनावर पडले इंद्रधनुष्य,
भगव्या मातीवर नाचे हिरवे हास्य".
"हकीकत" चित्रपटातील "जरा सी आहट होती है" हे गाणे ऐकताना आणि चित्रीकरण बघताना, मनासमोर असलेच अर्धुकलेले चित्र उभे राहते. यमन रागाचा आधार असलेले हे गीत, प्रणयाच्या अनोख्या रंगाचे अनोखे प्रणयरम्य चित्र.
हिंदी चित्रपटात एकूणच युद्धपट फारसे निघत नाहीत आणि त्यात देखील युद्धाचा खरा थरार आणि निर्माण झालेल्या झळा फारशा जाणवत नाहीत. १९६२ च्या चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर काढलेला चित्रपट. दिग्दर्शक चेतन आनंदने चित्रपटासाठी लडाखचा डोंगराळ प्रदेश निवडला असल्याने,चित्रपटाला वास्तवाची सुरेख डूब मिळालेली आहे.
आता या गाण्याच्या संदर्भात मांडायचे झाल्यास, चित्रपटाची नायिका प्रिया राजवंश आहे. दुर्दैवाने अभिनेत्री म्हणून तिच्या अभिनयाला बऱ्याच मर्यादा आहेत. पडद्यावर इतके नितांतरमणीय गाणे चालू आहे पण चेहऱ्यावर त्या भावनेचे अतिशय अस्पष्ट प्रतिबिंब पडावे, हे या गाण्याचे दुर्दैव म्हणायला लागेल. गाण्यातील शब्दकळा मात्र केवळ अप्रतिम, अर्थगर्भ आणि आशयसंपृक्त आहे.
कैफी आझमी हे नाव उर्दू साहित्यात, विशेषत: शायरीमध्ये फार गौरवाने घेतले जाते. चित्रपट गाण्यांना अजूनही फारसा साहित्यिक दर्जा दिला जात नाही ( दर्जा का दिला जात नाही, हे एक कोडेच आहे!! पण ते असुदे!!) परंतु ज्या कवींनी त्याबाबत अथक प्रयत्न केले त्यात, कैफी आझमी यांचे नाव निश्चित घ्यावे लागेल, जसे शकील, साहिर किंवा गुलजार या यादीत येतील. ( या यादीत आणखी नावे येतील!!) प्रस्तुत गाणे म्हणजे मुक्त छंदाच्या वळणाने गेलेली प्रणय कविता आहे, मुक्त छंदाने अशासाठी, कवितेत, यमकादि गोष्टी आढळत नाहीत, अर्थात मुक्त छंदाचे हेच व्यवच्छेदक लक्षण नव्हे. चित्रपटातील गाण्यात, शब्दांमध्ये आंतरिक लय असावीच लागते तसेच सांगीतिक क्रिया होण्यासाठी शब्द देखील तितकेच अर्थवाही आणि गेयतापूर्ण असावेच लागतात.
इथेच बघा, "जरा सी आहट होती है तो दिल सोचता है" म्हणजे नायिका, प्रियकराची किती आतुरतेने वाट पहात आहे, हेच दृग्गोचर होते. "आहट" हा शब्दच असा आहे तिथे दुसरा कुठलाच शब्द योग्य नाही!! गाणे हे असे शब्दांकित असावे, तिथे आपण दुसऱ्या कुठल्याच शब्दाची कल्पना करणे अवघड. वास्तविक, चित्रपटात "प्रणय" भावना नेहमीच प्रमुख असते, त्यामुळे, ती भावना शब्दांकित करताना, रचनेत तोचतोचपणा बरेचवेळा जाणवतो परंतु "खानदानी" कवी, तीच भावना अशा असामान्य शब्दातून मांडतो. पुढे, "कहीं कहीं ये वो तो नहीं" हे वाक्य दोनदा लिहिण्यात औचित्य आहे, केवळ सांगीतिक रचनेसाठी केलेली तडजोड नव्हे.
पुढील कडवे देखील याच दृष्टीने बघणे संय्युक्तिक ठरेल. "छुप के सीने मे कोई जैसे सदा देता है, शाम से पहले दिया दिल को जला देता है; है उसीकी ये सदा, है उसीकी ये अदा" इथे "सदा" शब्द दोन वेळा लिहिला गेला आहे परंतु आशय मात्र वेगळा!! शब्दांशी असे मनोहारी खेळ खेळणे आणि त्याचबरोबर आशयाची अभिव्यक्ती अधिक अंतर्मुख करणे, इथेच कवी दिसतो.
आता गाण्याकडे वळूया. वास्तविक "हकीकत" हा युद्धपट तरीही अशा चित्रपटात असे प्रणयी गीत!! असो, हा मुद्दा वेगळा आहे. व्हायोलीनच्या सुरांनी रचनेला सुरवात आहे. त्यात देखील एक गंमत आहे, सुरवातीचा व्हायोलीनचा "पीस" १९,२० सेकंदाचा आहे पण त्या सुरांत मध्येच २ तुटक ध्वनी आहेत, ते जर बारकाईने ऐकले तर ध्यानात येतील आणि ते ध्वनी व्हायोलीनचेच आहेत म्हणजे लय साधली ती व्हायोलीनच्या स्वरांनी तरीही मध्येच असे ते २ ध्वनी वेगळे, ज्यांनी तो २० सेकंदाचा "पीस" एकदम वेगळाच होतो, हे मदन मोहनचे कौशल्य. नंतर लगेच लताबाईंचा सूर सुरु होतो. नायिका प्रणयोत्सुक आहे आणि ती भावना, स्वरांकित करताना, "कहीं ये वो तो नहीं" ही ओळ तीनदा गायली आहे पण प्रत्येक वेळेस, "वो" शब्द कसा स्वरांतून, ज्याला "वेळावून" म्हणता येईल असा गायला आहे. लताबाईंचे गाणे कसे शब्दांच्या पलीकडे जाते, ते असे!!
ह्या कडव्यानंतर व्हायोलीनचे सूर दुपदरी ऐकायला मिळतात!! म्हणजे असे, कडवे संपते आणि पहिल्या अंतऱ्याच्या आधीची सुरावट सुरु होते, ती संतूरच्या ३ स्वरांनी, ते स्वर म्हणजे पुढील व्हायोलीनच्या सुरांना वाट काढून देतात!! थोडक्यात, संतूरच्या सुरांनंतर जी व्हायोलीनची गत सुरु होते, त्या सुरांत दुसरी व्हायोलिन्स वेगळीच गत सुरु करतात आणि काही सेकंदातच परत समेवर येतात.
"छुप के सीने मे" हे उच्चारल्यावर, त्या क्षणी, एक "आकार" युक्त हरकत घेतली आहे, किती जीवघेणी आहे!! ओळ चालू आहे पण, मध्येच क्षणभर थांबून, त्या लयीतच तो आकार घ्यायचा!! खरच फार कठीण सांगीतिक वाक्यांश!! पुढे, "शाम से पहले दिया दिल को जला देता है" हे गाताना, "शाम" हा शब्द कसा उल्लेखनीय उच्चारला आहे आणि नुसते तेव्हडेच नसून, त्या स्वरांतून, पुढील शब्दांचा आशय देखील मूर्त केला आहे. "है उसी की ये सदा, है उसी की ये अदा"!! मघाशी मी जे कवितेचे विशेष सांगितले तोच विशेष नेमका स्वरांतून मांडणे, "सदा" आणि "अदा" ह्यामागील स्वरांची हलकी वेलांटी, किती तोच भाव अमूर्त करते!! छोटासा "आकार" आहे पण, तोच "आकार" त्या शब्दांचे "विभोर" किती प्रत्ययकारी ऐकायला मिळतात.
लताबाईंचे गाणे हे असेच छोट्या स्वरांनी अलंकारित असते, जे पहिल्या प्रथम ध्यानात येत नाहीत पण गायला घेतले की त्या "जागा" गळ्यातून घेणे किती अवघड आहे, हे लक्षात येते. एकाच लयीत गाताना, मध्येच त्या लयीत वेगळा सूर लावून, तरीही ती लय कुठेही बेलय होऊ न देता, संगीत वाक्यांश पूर्ण करते, सगळेच अद्भुत!!
"शक्ल फिरती है" हे गायल्याक्षणी तिथे परत आकार आहे पण पहिल्या अंतऱ्याप्रमाणे नसून थोडासा "सपाट" आहे, म्हणजे गाण्याची लय, चाल तशीच आहे पण तरीही असे आलाप वेगवेगळ्या प्रकारे आलेत!! भारतीय संगीताचे हे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. शब्द देखील किती अप्रतिम आहेत!! "शक्ल फिरती है निगाहो मे वोही प्यारी सी, मेरी नसनस मे मचलने लगी चिंगारी सी;छु गयी जिस्म मेरा, किसके दामन की हवा"!! व्वा, गाण्याला दाद द्यावी, तशी शब्दांना द्यावीशी वाटली.
संगीतकार म्हणून मदन मोहन यांचे मूल्यमापन झाल्यास, त्यांची प्रतिभा गीतधर्मी होती. वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, अर्थाव्यतिरिक्त पण त्याच्याच आधारे आशयाचे तरंग निर्माण करण्याची ज्या काव्यात अंगभूत अशी ताकद असते अशा काव्याला प्रतिसाद म्हणून रचनाकार जेंव्हा एखादी भावपूर्ण सुरावट उभी करतो तेंव्हा गीत संभवते आणि या विधानाला नेमका पुरावा म्हणून प्रस्तुत गीत सादर करता येईल. एकदा का आपण मदन मोहन यांना गीतधर्मी असे मान्य केले म्हणजे मग अशा प्रकारचे रचनाकार लयबंधापेक्षा सुरावटींकडे आणि प्रवाही चलनांकडे वळतात. लयबंधांच्या वा तालांच्या, ठळक किंवा ढोबळ वापरातून जी गतिमानता प्रत्ययास येते, तिच्यापेक्षा स्वनरंगातले सूक्ष्म भेद दाखवून अनुभवास येणारी गतिमानता ते पसंत करतात. याचाच वेगळा परिणाम, स्वररचनेत काहीतरी गमावल्याची धूसर हळहळ याच भावस्थितीच्याच निरनिराळ्या छटा आढळतात. याचा वेगळा द्रिश्य परिणाम असा झाला,वाद्यमेळाचा मर्यादित स्तरावरील वापर आणि शक्यतो कंठसंगीतावर अधिक भर राखणे क्रमप्राप्तच ठरले. याच विधानाचा दुसरा भाग असा म्हणता येईल, मदन मोहन याना पाश्चात्य धर्तीवरील नृत्यसंगीत किंवा उडत्या चालीची गाणी बनविणे, त्यांच्या स्वभावधर्माच्या विरुद्ध होत गेले. चित्रपट संगीतात वावरायचे तर अशा प्रकारच्या रचना करणे अत्यावश्यक ठरते आणि अशा रचना ऐकताना, मदन मोहन यांचे मन रमले नाही, हे स्पष्ट जाणवते.
वास्तविक गाणे केवळ दोनच कडव्यांचे आहे पण गाण्यातील प्रत्येक सूर आणि त्याबरोबरची लय, इतकी अप्रतिम आहे की वेगळे काही बोलायची सोयच उरलेली नाही. आणखी एक मुद्दा!! सतार आणि मदन मोहन यांचे नाते "अद्वैत" असे नेहमी म्हटले जाते पण या गाण्यात सतारीचा एकही सूर नाही!! गाण्यातील काव्य आणि संगीत रचना, ह्या नेहमी हातात हात घालून सादर व्हावे, अशी अपेक्षा बहुतांशी असते पण फारच थोड्या गाण्याच्या बाबतीत असा भाग्ययोग जुळून येतो. मदन मोहन आणि लताबाई, यांनी कितीतरी अजरामर गाणी दिली आहेत, त्यामुळे हेच गाणे मी का निवडले, याला कसलेच संय्युक्तिक उत्तर नाही, कदाचित या गाण्यात सतारीचा अजिबात वापर नाही, हे कारण देखील असू शकते!! अर्थात हे संगीतबाह्य कारण आहे. गाण्याची चाल अद्भुत आहे, हेच खरे महत्वाचे.
No comments:
Post a Comment