Saturday, 7 December 2019

सुबह का इंतजार कौन करें

"कळ्या फुलतात येथे,पानें गर्द वाजतात,
फुलें घळतात येथे तरी पानें वाजतात,
पानें झडतात येथे तरी वारे वाजतात,
वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात."

आरतीप्रभूंच्या या ओळी एका एकांतिक, मनस्वी मानसिकतेची अस्वस्थता दर्शवतात. आरतीप्रभूंच्या कवितेची बांधणी मनोज्ञ असते. बरेचवेळा  मला असेच  वाटते,इतकी रेखीव, बांधेसूद कविता माझ्या वाचनात नाही. काही नादाकृतींच्या, शब्दांच्या, शब्दसमूहांच्या विशिष्ट रचनेच्या द्वारे, बाह्यतः:घट्ट अशी वीण करता करतानाच तिच्यात थोडे फरक करीत तीच वीण किंचित सैल,गतिशील करून कवितेचा असामान्य पोत घडवला जातो. काही ओळी, काही शब्दसमूह, काही शब्द अंतराअंतरावर घट्ट बांधलेले असतात, त्याच आधाराने इतर शब्दांतून आशयाचे प्रसरण होत असतानाच संबंध राचनाच त्या आशयाला अंत:केंद्रित करीत असते, या दोहोंतून जो सचेतन-तोल मिळतो, त्यातूनच टी कविता स-रूप होते.
आरतीप्रभूंच्या कवितेबद्दल मी इथे चार शब्द लिहिले  कारण,एकच. प्रस्तुत रचना ही एखाद्या भावगीतासाठी रचलेली रचना नसून, कवीने स्वान्तसुखाय मनःस्थितीत लिहिलेली आहे (कदाचित तसे नसेल देखील!! म्हणजे लिहिताना अशीच भावस्थिती असेल असे म्हणवत नाही) परंतु मुद्दा असा आहे, जेंव्हा चित्रपटासाठी गाणी लिहिली जातात तेंव्हा त्याच्याकडे काहीशा नकारात्मक नजरेने पाहिले जाते आणि "गीतकार" अशा काहीशा तुच्छतापूर्ण शब्दात संभावना केली जाते.
चित्रपट गीत म्हणजे फावल्या वेळेचा लिहिण्याचा उद्योग असेच बरेचवेळा मानले जाते आणि या मताला चांगलीच सामाजिक प्रतिष्ठा मिळाली आहे!! त्यामुळे काही गुणवंत कवींवर अन्याय झालेला आढळतो, यातील प्रमुख नाव "साहिर लुधियान्वी"!! डाव्या विचारसरणीचा कडवा प्रचारक असून देखील, प्रसंगी विचारसरणीला संपूर्णपणे बाजूला सारून, या कवीने अतिशय सक्षम ,अंतर्मुख आणि घाटदार कविता केल्या परंतु केवळ चित्रपटात वापरल्या गेल्यामुळे, त्यातील "कवित्वें"वर काहीसा अन्याय झाला!! चित्रपटात प्रसंगानुरूप शब्दकळा बांधावी लागते, हे जरी निखालस सत्य असले तरी ओशट वाटणाऱ्या प्रसंगाला देखील अप्रतिम शब्दकळा लिहिणाऱ्या कवींबद्दल निश्चित वेगळा विचार आवश्यक वाटतो.

"ले भी लो हम को अपनी बाहों में,
रुह बेचैन है निगाहो में,
हाये इल्तेजा बार बार कौन करें
सुबह का इंतजार कौन करें"

साहिरच्या कवितेचे एक वैशिष्ट्य नक्की सांगता येते. मुखडा किंवा पुढील कडव्याची पहिली ओळ अगदी सहज समजेल अशा भाषेत लिहितो परंतु पुढील ओळीत मात्र नेहमीच भाषेची श्रीमंती दर्शवेल, अशी शब्दकळा वापरतो, जेणेकरून त्याच्यातील "कवी" लोकांच्या समोर येईल. वरील ओळीत याचे नेमके प्रत्यंतर येईल. संगीतकार जयदेव यांनी साहिरच्या या "कवित्वाचा"" असामान्य गुण ओळखला होता आणि आपली कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात, त्यांनी साहिरच्या शब्दकळेचा आधार घेतला आणि काही असामान्य स्वररचना तयार केल्या.

काही गाणी पटकन एकाच बैठकीत मोहित करत नाहीत, किंबहुना परकीच  वाटतात!! त्याची चाल लगेच मनाची पकड घेत नाही!! एखादी हरकत चकित करते किंवा मधलाच एखादा संगीताचा वाक्यांश लक्षात येतो. मुळात, जर का त्या संगीतकाराचे नाव झालेले नसेल तर ऐकतानाच मनात नाखुशी असल्याने गाण्याकडे थोडेसे दुर्लक्ष होते. हिंदी चित्रपट गीतांच्या बाबतीत "नाममहात्म" फारच महत्वाचे ठरते. लताबाईंच्या अनेक गाण्याविषयी असे  म्हणता येईल. १] प्यार की ये तलखिया, २] तारे वोही है, ३] सपना बन साजन आये, ही सहज सुचलेली गाणी उदाहरण म्हणून दाखवता येतील. या गाण्यांचे संगीतकार आता फारशा कुणाच्या लक्षात नाहीत,ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचबरोबर या गाण्यांच्या बाबतीत लोकप्रियतेची झुळूक देखील वाटेला आली नाही!! प्रस्तुत  गाणे,याच पठडीतले म्हणता येईल. जयदेव, हल्ली किती लोकांच्या स्मरणात आहे,मला शंका आहे (फार तर "अल्ला तेरो नाम" किंवा "अभी ना जाओ छोडकर" ही गाणी लक्षात असतील!!) तसा हा संगीतकार कधीच लोकप्रिय नव्हता किंवा त्याने लोकांच्या पुढे येण्यासाठी कधीही क्लुप्त्या लढविल्या नाहीत!! सत्तरीच्या दशकात जेंव्हा पाश्चात्य वाद्यमेळ भरात होता, तेंव्हा देखील अस्सल भारतीय पठडीत रचना करण्याचा अट्टाहास, जयदेव यांना चित्रपट सृष्टीच्या बाहेर ठेवत होता!! यात, नुकसान आपल्यासारख्या रसिकांचेच झाले!! 
साहिर लुधीयान्वी कवी म्हणून नेहमीच असामान्य होता. इथेच बघा, "सुरमई रात" हे शब्दच किती अप्रतिम आहेत, तिथे दुसरे कुठलेच शब्द योजता येणार नाही, रात्र ही "सुरमई" असण्यात जी लज्जत किंवा विखारी जाणीव आहे, त्याला तोड नाही. अशीच गंमत "महक" आणि "गेसू" या दोन शब्दात आहे. उर्दू भाषेचे असे खास वैशिष्ट्यपूर्ण शब्द!! या गाण्याची सुरवात फक्त लताबाईंच्या आवाजाने होते, "सुरमई रात है, सितारे है; आज दोनो जहां, हमारे है", इथे "रात" शब्द सुरांतून काढताना, स्वराला जी "वेलांटी" दिली आहे ( अर्थात लताबाई) ती अतिशय अनुपम आहे, त्या वेलांटीत मृदू आर्जव आहे. हल्ली अशी भाषा नेहमी ऐकायला येते, "गाताना, शब्दांना expression देणे आवश्यक आहे आणि ते आम्ही करतो" याचा अर्थ, पूर्वी कुणी लक्ष देत नव्हते का? त्यानंतरच्या वाक्यावर "सुबह का इंतजार कौन करे" गाण्याचा ठेका सुरु होतो. म्हणजे, पहिल्या दोन ओळींतून रचनेचे सूचन आणि नंतर त्याचे वजन आपल्याला ऐकायला मिळते. "सुबह का इंतजार कौन करे" ही ओळ दोनदा गायली गेली आहे, याचे मुख्य कारण, तोच त्या कवितेच्या आशयाचा प्रमुख विशेष आहे. कवितेत ही ओळ एकदाच लिहिली गेली आहे!! 

गाणे, प्रेम विरहाचे आहे, हे तर लगेच ध्यानात येते. प्रेमी जीवांची ताटातूट आणि तडफड, हे हिंदी चित्रपट गाण्यांचा खास आवडीचा विषय तरीही त्यात वेगळ्या प्रतिमा मांडून आशय अधिक पक्व करण्यात ज्या थोड्या कवींचा सहभाग आहे, त्यात साहिर अग्रभागी!! "सुबह का इंतजार कौन करे" अशी विफलता जाणवण्यासाठी "सुरमई रात" हे शब्द योग्य!! मेंडोलीन, व्हायोलीन याच वाद्यांचा प्रमुख उपयोग करून, पहिला अंतरा सजवला आहे. जयदेव यांची ही नेहमीच खासियत राहिली आहे, कमीत कमी वाद्ये वापरून गाणे सजविणे, जेणेकरून कवीच्या शब्दांना कुठेही धक्का बसणे शक्यच नाही!! वास्तविक, ५०,५० व्हायोलीन वादकांचा ताफा बाळगणे तेंव्हापासून भूषणास्पद ठरत होते ( काही अपवादात्मक गाणी वगळता इतका प्रचंड ताफा बाळगणे गरजेचे होते/आहे का? पण हा प्रश्न कधीच कुणी विचारात नाही!!) 
पुढील ओळीत शेवटाला "वक्त का ऐतबार, कौन करे" यातील, "कौन" शब्द जरा बारकाईने ऐकावा. ""कौ' आणि "न" यातील, "कौ" नंतर स्वरांत बारीकशी थरथर आहे, सहज ऐकताना, ध्यानात येणार नाही अशी हरकत आहे पण ती केवळ लाजवाब आहे. वास्तविक, कडव्याची सुरवात वरच्या सप्तकात सुरु होते, अगदी ध्रुवपदाच्या चालीपासून पूर्ण फारकत घेणारी स्वररचना सुरु होते, (जयदेव यांच्या बहुतेक गाण्यांत हे वैशिष्ट्य आढळते ) आणि हळूहळू स्वर मंद्र सप्तकात येतात, जणू शांतपणे झऱ्याचे पाणी, डोंगरउतारावरून खाली यावे!!  उच्चाराचेच आणखी एक उदाहरण. या कडव्यात, दुसरी ओळ " आरजू का चमन खिले ना खिले" ही आहे आणि यातील "खिले"हा शब्द असाच उद्मेखून ऐकावा असा आहे. उर्दू भाषेतील "ख" हा मराठी भाषेतील "ख" सारखा "खणखणीत" उच्चारत नसून, "क" अक्षराला "ह"चा निसटता स्पर्श दिला जातो. लताबाई गायिका म्हणून कुठे श्रेष्ठ ठरतात, ते इथे दिसते. बरे, असा अस्पष्ट "खिले" स्वरातून काढताना, लयीचा बिकट बोजा, कुठेही विसविशीत होत नाही, किंबहुना, समेच्या मात्रेशी होणारी जोड, ही जोड न वाटता, एकाच भागाची दोन दर्शने वाटतात. जयदेव आणि लताबाई यांचे हे कर्तृत्व!! 
चित्रपट गीतात तुम्हाला प्रयोग करायला तशा फारच थोड्या संधी प्राप्त असतात परंतु जाणकार संगीतकार, त्या नेमकेपणाने हुडकून काढतो आणि तिथे स्वरविस्ताराला जागा निर्माण करतो. पुढील कडव्यात हेच आपल्याला दिसून येते. शब्दोच्चार आणि त्याबरोबर पार्श्वभागी वाजणारी वाद्ये, याचा एकत्रित संकर  घडविणे,ही संगीतकाराची खरी मर्दुमकी!! बासरीचे सूर (बासरीचे सूर किती वेगळ्या पद्धतीने वाजविले आहेत, ते खास ऐकण्यासारखे आहे) जिथे संपतात, तिथे परत मेंडोलीन सुरु होते ( वास्तविक हे शब्द अधिक मोठे होतील, इतकेच ४ सूर आहेत) आणि तो सांगीतिक वाक्यांश भरीव होतो. दुसऱ्या कडव्याच्या शेवटच्या ओळीत , साहीरने "इल्तेजा बारबार कौन करे" असे लिहिले आहे. वास्तविक "इंतजार" आणि "इल्तेजा" एका दृष्टीने सारख्याच अर्थाचे शब्द आहेत पण तरीही "इल्तेजा" हा शब्द फारसा इतर गाण्यांत वापरलेला दिसत नाही आणि पर्यायाने फारसा कुणाच्या लक्षात येत नाही. खरा कवी दिसतो. तो इथे. माझ्या  अंदाजाने, "इल्तेजा" शब्द मुळचा फारसी!! प्रश्न कुठल्या भाषेतला नसून, जुना शब्द परंतु अमूर्त आशयासाठी योजणे, ही साहीरची खासियत. 
या गाण्यात, "सुबह का इंतजार कौन करे" ही  ओळ बरेचवेळा येते आणि याचे मुख्य कारण असे दिसते, कवितेचा मूळ आशय याच वाक्याभोवती आहे, "सकाळची वाट बघण्याची काहीही गरज नाही, कारण आता सगळी नाती तुटलेली आहेत!!" जयदेव यांची दृष्टी इथे दिसते, हे वाक्य जरी प्रत्येक कडव्याच्या शेवटी येते तरी ज्या सुरांवर हि ओळ फिरते, ती सुरवात मात्र वेगळी असते आणि तरीही भारतीय संगीताच्या नियमानुसार "समेचा' सूर मात्र नेमका पकडून ठेवते. वास्तविक, या गाण्यात, "अल्ला तेरो नाम" प्रमाणे चालीत वरखाली होण्याइतकी स्पष्टता नाही किंवा, "ये दिल और उनकी निगाहो के साये" प्रमाणे अवर्णनीय संतूरचे सूर आणि वरच्या सप्तकातील चाल, असे कान दिपवणारे काहीही नाही. ऐकताना, एका सरळ रेषेत गाणे चालले आहे, असेच वाटते पण प्रत्यक्षात तसे अजिबात नाही. अतिशय फसवी चाल आहे परंतु प्रथमदर्शनी काहीच दिपवणारे नसल्याने, गाणे थोडे विस्मृतीत गेले आणि पर्यायाने जयदेव देखील तसाच विस्मृतीत गेला!! वास्तविक ही कविता आणखी दोन कडव्यांची आहे पण बहुदा चित्रपट गीताची लांबी वाढली असती, म्हणून बहुदा रचनेत घेतली गेली नसावी.  


No comments:

Post a Comment