मराठी कवितांमध्ये, इंदिरा संतांच्या "कुब्जा" कवितेचे अनन्यसाधारण स्थान आहे. पुराण काळातील एखादे व्यक्तिमत्व घ्यायचे आणि कवितेत, त्याच्या रूढ प्रतिमेला बाजूला सारून, त्या प्रतिमेची, शब्दमाध्यमातून नव्याने जडण घडण करून, आशयाच्या अभिवृद्धीत भर टाकत, कवितेलाच अधिक श्रीमंत केली.
"अजून नाही जागी राधा,
अजून नाही जागें गोकुळ;
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे कां पावा मंजुळ.
मावळतीवर चंद्र केशरी;
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकून अपुले तनमन."
ही कविता वाचतानाच आपल्या डोळ्यांसमोर, ते रात्रीचे वाळवंट, नुकताच उगवलेला चंद्र आणि त्या थंडगार वातावरणात उभी असलेली राधा!! अगदी असेच वातावरण आणि त्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सादर झालेले गाणे - तू चंदा मैं चांदनी.
हिंदी चित्रपट गीतांत फारच कमी गाणी अशी सापडतात, जी खऱ्या अर्थी असामान्य असतात परंतु त्यांना लोकाश्रय लाभत नाही आणि हळूहळू विस्मरणात जातात. तसे बघितले तर ज्या गाण्यांना, लोकसंगीताचा आधार लाभला आहे, ती गीते देखील वर्षानुवर्षे लोकांच्या स्मरणात रहातात. थोडक्यात, असे अनुमान आपल्याला सहज काढता येईल, कुठल्याही गाण्याची "कुंडली" मांडणे, जवळपास अशक्य कोटीतली बाब आहे.
गाण्याची चाल, रसिकांच्या मनाची "नाळ" जोडणारी हवी, असा एक मतप्रवाह अनेक वर्षे प्रचलित आहे, विशेषत: गाण्याचा "मुखडा" जितका आकर्षक असेल तितके ते गाणे, रसिकांच्या पसंतीला उतरते. गाण्याचा "मुखडा" आकर्षक असणे, आवश्यक आहे पण त्याच बरोबर त्याच्या नंतरची "बांधणी" देखील तितकीच आकर्षक असणे, अत्यावश्यक असते अन्यथा, सुरवातीला मनावर घडलेला असर, हळूहळू पिछाडीला पडतो आणि गाणे निरस होण्याची शक्यता बळावते.
काही गाण्यांच्या बाबतीत असे घडते, गाण्याची चाल पहिल्या प्रयत्नात, लक्षात(च) येत नाही आणि ते गाणे आवडीच्या बाबतीत, मागे पडते. गाण्याची चाल "अनवट" असणे, हा विचार देखील बरेचवेळा पुढे येतो. "अनवट" म्हणजे काय? चाल अवघड असणे, म्हणजे अनवट, असा एक मतप्रवाह आढळतो, त्यात थोडेफार तथ्य आहे पण पूर्णांशाने सत्य नाही. या सगळ्या मतांतून, आपल्याला एक गोष्ट ठरवावीच लागेल. गाण्याची चाल कशी असावी, याबाबत कुठेही ठाम अशी "थियरी" नाही आणि गाण्याचे आयुष्य किती आहे, याचा अंदाज करणे तर केवळ अशक्यप्राय. प्रत्येक संगीतकार, आपापल्या कुवतीनुसार उत्तरे शोधीत असतो पण काही काळाने, त्या उत्तरातील वैय्यर्थ्य जाणवायला लागते.
"तू चंदा मै चांदनी" या गाण्याबाबत काही ठाम विषाने करताना, माझी थोड्याफार प्रमाणात द्विधावस्था होते. गाण्याची चाल सुंदर आहे, त्यात अनेक लयीचे बंध आहेत, इत्यादी सौंदर्यस्थळे शोधता येतात पण, या गाण्यात असे काय आहे, ज्यामुळे हे गाणे, माझ्या मनात ठाण मांडून आहे? या प्रश्नाचाच शोध, या निमित्ताने घेण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
आपण, या गाण्याचा आस्वाद घेताना, कवितेचा आस्वाद घेणे देखील, मला अत्यावश्यक वाटते कारण, गाण्यात शब्द आहेत म्हणून ते "गाणे" आहे!! तेंव्हा, गाण्याचा आस्वादाला सुरवात करण्याआधी, आपण, हे गाणे, "कविता" म्हणून काय दर्जाचे आहे? या प्रश्नाचा पडताळा घेऊया.
कवी बालकवी बैरागी यांची शब्दरचना आहे. इथे हे ध्यानात ठेवावे लागेल, हा कवी, कधीही चित्रपटासाठी गाणी लिहिणारा कवी नव्हता आणि ही रचना देखील, कविता म्हणून प्रसिद्ध झाली होती.
" तू चंदा मै चांदनी, तू तरुवर मै शाख रे,
तू बादल मै बिजुरी, तू पंछी मै पात रे.
ना सरवर ना बावडी, ना कोई ठंडी छांव,
ना कोयल ना पपीहरा, ऐसा मेरा गांव रे,
कहा बुझे तन की तपन, ओ सैय्या सिरमोर,
चंद्रकिरण तो छोड कर, जाये कहा चकोर,
जाग उठी है सांवरे, मेरी कुंवारी प्यास रे,
अंगारे भी लगने लगे पिया अंगारे भी लगने लगे,
आज मुझे मधुमास रे
तुझे आंचल मे रखुंगी ओ सावरे
काळी अलको से बांधुंगी ये पांव रे
गल बैय्या वो डालू की छुटे नही
मेरा सपना सजन अब टुटे नही
मेहंदी रची हथेलिया, मेरे काजलवारे नैन रे,
पल पल तुझे पुकारते पिया पल पल तुझे पुकारते
हो हो कर बेचैन रे
ओ मेरे सावन सजन, ओ मेरे सिंदूर,
साजन संग सजनी बनी मौसम संग मयुर,
चार पहर की चांदनी मोहे लाल चुनर ओढा,
केसरिया धरती लगे, अंबर लालम-लाल रे,
अंग लगाकर सायबा अंग लगाकर सायबा,
कर दे मुझे निहाल रे"
ही कविता म्हणून वाचताना आपल्या सहज ध्यानात येऊ शकते, राजस्थानच्या वाळवंटाच्या पार्श्वभूमीवरील प्रणयकथा आहे. "बिजुरी","बावडी","केसरि या" हे खास राजस्थानच्या संस्कृतीतले शब्द. खरे तर या कवितेचा घाट बघितला तर, चित्रपट गीताच्या पारंपारिक रचनेत अजिबात बसणारा नाही. किंबहुना, गाण्याचा "मीटर" ठरवण्याच्या प्रक्रियेत तर ही शब्दकळा फार अवघड आहे. असे असून देखील संगीतकार जयदेव, यांनी गाणे करताना, ज्या कुशलतेने, रचनेला वेगवेगळी वळणे दिली आहेत, तोच खरा अभ्यासाचा भाग आहे.
मी सुरवातीला जे म्हटले त्याप्रमाणे विचार करता, गाण्याचा "मुखडा" हा काही इतका आकर्षक नाही. किंबहुना, गाण्याच्या आधी, जवळपास, १ मिनिट फक्त वाद्यमेळ आहे. संतूरच्या सुरांनी या गाण्याची पार्श्वभूमी तयार होते आणि ते सूर जिथे थांबतात, तिथे लताबाईंचा टिपेचा सूर लागतो - तू चंदा मै चांदनी, तू तरुवर मै शाख रे!! गाण्याच्या सुरवातीला तार स्वर लावणे आणि त्याच सुरांत गाण्याचा विस्तार करायला घेणे, हीच खरे म्हणजे गळ्याची असामान्य परीक्षा आहे. गाण्याची चाल "मांड" रागावर आहे पण हा "मांड" राग, तसाच्या तसा वापरलेला नसून, त्यात, राजस्थानी लोकसंगीताची फोडणी दिलेली आहे. वास्तविक पहाता पारंपारिक मांड रागात, सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात पण, तसे इथे घडत नाही. इथे "कोमल गंधार" आणि "कोमल धैवत" तसेच "तीव्र मध्यम" स्वरांचा उपयोग केलेला आहे आणि हे लोकसंगीताचे contribution!! अर्थात, असे म्हटले जाते, मांड रागाची उपपत्ती ही राजस्थानी लोकसंगीतातून झालेली आहे आणि एकूणच सगळी स्वरावली बघता, या म्हणण्यात बरेच तथ्य आढळते.
पुढे "तू बादल मै बिजुरी" हे शब्द कसे घेतले आहेत, ते खास ऐकण्यासारखे आहे. "बिजुरी" शब्दावरील जी हरकत आहे, ती इतके अवघड आहे की, केवळ लताबाई(च) अशी हरकत घेऊ शकतात!! जयदेव, गाण्याच्या पार्श्वभागी जो वाद्यमेळ वापरतात, तिथे अत्यंत मोजकी वाद्ये पण प्रत्येक वाद्याचा "कस" लागेल, अशी योजना करतात. मग, वापरताना,५ ६ वाद्येच असली तरी, त्यांचे काम भागते, किंबहुना त्यामुळे इतर वाद्यांची गरजच भासत नाही. इथे बघा, संतूर, स्वरमंडळ, बासुरी, सारंगी, तार सनई अशीच मोजकी वाद्ये संपूर्ण गाण्यात आहेत पण, प्रत्येक वाद्याचे "जिवंत" अस्तित्व आहे. राजस्थानच्या वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर, ज्याप्रकारे सारंगी वाजली आहे, ती फार बारकाईने ऐकायला हवी. सगळे वाळवंट आपल्या समोर उभे रहाते. संगीतकार म्हणून जयदेव, इथे इतरांपेक्षा वेगळा ठरतो. गाणे ऐकताना, पार्श्वसंगीत आणि गाण्यातील शब्द, याचे बांधलेले नाते देखील वेगळेपणी ऐकावे लागेल.
ना सरवर ना बावडी, ना कोई ठंडी छांव,
ना कोयल ना पपीहरा, ऐसा मेरा गांव रे,
कहा बुझे तन की तपन, ओ सैय्या सिरमोर,
या ओळी ऐकताना, आपल्याला "गायकी"चा आनंद तर मिळतोच पण त्याच बरोबर शब्दातून उभे केलेले वातावरण देखील अनुभवता येते. ओळीची सुरवात, मंद्र सप्तकात होते पण क्षणात वरच्या सुरांत चाल जाते आणि लय अवघड होते. हा सांगीत वाक्यांश अति गुंतागुंतीचा तर नक्कीच आहे पण त्याच बरोबर, कवितेच्या आशयाचा आनंद देखील, घेणे जरुरीचे भासते.
लताबाईंच्या गायनातील आणखी वैशिष्ट्य इथे आपल्याला जाणवते आणि ते म्हणजे, गाण्याची चाल, राजस्थानी मांड रागावर आहे तेंव्हा शब्दोच्चार देखील त्याच धर्तीवर केले आहेत. हा आणखी कठीण भाग. गाण्यात हरकत घेताना, शब्दातील दडलेला आशय तर स्वरांनी अधिक अंतर्मुख करायचा पण, कुठेही शब्दांना दुखवायचे नाही!! ही कसरत, संगीतकार म्हणून जयदेव आणि गायिका म्हणून लताबाई ज्या प्रकारे करता, ते केवळ अतुलनीय आहे. गाण्यात, हिंदी चित्रपट गाण्यात वारंवार वापरलेला "दादरा" ताल आहे पण, तालाच्या प्रत्येक मात्रेचे "वजन" ध्यानात घेऊन, तिथे केवळ शब्द(च) नव्हे तर अक्षराचा शेवट करण्याइतकी तल्लख बुद्धीमत्ता, जयदेव यांनी, या गाण्यात दाखवली आहे. आपण, एका सक्षम कवितेला चाल लावत आहोत, याचे भान, जयदेव यांनी, या रचनेत कायम राखले आहे.
गाण्यात तीन अंतरे आहेत आणि प्रत्येक अंतरा सुरु करताना, पार्श्वसंगीत जवळपास अजिबात नाही, म्हणजे संपूर्ण स्तब्धता राखून, केवळ लताबाईंच्या सुरात अंतरा सुरु करायचा आणि मग त्या सुरांचा मागोवा घेत, वाद्यांनी आपली मार्गक्रमणा करायची, अशी या गाण्याची बांधणी आहे.
ओ मेरे सावन सजन, ओ मेरे सिंदूर,
साजन संग सजनी बनी मौसम संग मयुर,
चार पहर की चांदनी मोहे लाल चुनर ओढा,
केसरिया धरती लगे, अंबर लालम-लाल रे,
या ओळी गाताना, "चार पहर की चांदनी" इथे "चार" शब्द उच्चारताना, स्वरांत जो काही "हेलकावा" दिला आहे, त्यातून वाळवंटातील रात्रीच्या थंडीचा "शहारा" जणू व्यक्त केला आहे!! अशी सांगीतिक सौंदर्यस्थळे, या गाण्यात भरपूर आढळतात. तसेच पुढे "केसरिया" म्हणताना, "टिपिकल" राजस्थानी ढंग, स्वरांत आणला आहे. जयदेव काय ताकदीचे संगीतकार होते, याचे हे उत्तम उदाहरण ठरेल.
गाणी सगळेच संगीतकार बांधत असतात पण, अशा प्रकारे लोकसंगीताची डूब देऊन, गाण्यात अनेक लयींना अवघड पद्धतीने खेळवत गाण्याची रचना बांधायची,हे तल्लख आणि व्यासंगी बुद्धीमत्तेचे(च) काम आहे. जवळपास ९ मिनिटांची रचना आहे पण गाण्यातील प्रत्येक सेकंद, हा अतिशय अर्थपूर्ण रीतीने भरून काढला आहे.
संगीतकार म्हणून जयदेव यांना, अतिशय चांगल्या अर्थाने असामान्य "कारागीर" म्हणायला हवे. गीताला रागाधार हवा पण स्वररचना रागाशी फटकून ठेवायची, या पंथाचे जयदेव हे संगीतकार आहेत. याचा परिणाम असा होतो,गाण्याची चाल "गायकी" अंगाने विस्तारात जाते. याचाच वेगळा अर्थ असा होतो, गाण्याच्या स्वररचनेत स्वरविस्ताराच्या अनेक शक्यता निर्माण होतात.
जयदेवची स्वत:ची अशी शैली होती .आयुष्यभर बहुश: त्यांनी भारतीय वाद्ये आणि ती देखील अत्यंत आवश्य क असतील तितकीच, त्यांनीआपल्या रचनेत वापरली. उगाच ५० ते १०० वा दन्काचा ताफा पदरीबाळगण्याचा अवि चारी हव्यास कधीही ठेवला नाही. एखादी बासरीचीलकेर, संतूरचा ना जूक तुकडा, यातूनच त्यांच्या रच नेचे स्वरूप स्पष्टहोई. त्यांचा हाच विचार असायचा कि, जर का ४, ५ व्हायोलीन वादकपुरेसे असतील त र, उगाचच ५० वादकांचा ताफा वा परण्याची काहीचगरज नाही आणि त् यामार्गे, फुटकळ लोकप्रियता मि ळविण्याची गरजनाही. असला, अव् यवहारी विचारांचा संगीतकार होता .
जयदेवचे कुठलेही गाणे घ्या, शब् द हा घटक त्यात आवर्जूनपणेठळकरि त्या जाणवतो. अर्थात, जयदेवने ब हुतेकवेळा साहिरची साथघेतली हो ती आणि साहीर तर मुळातला सक्षम कवी, नंतर गीतकार!! खरतर, हा दे खील एक अत्यंत निष्फळ वाद आहे, कि गीतकार हा कवीअसतो कि नाही? जेंव्हा आपण, साहीर, शकील यांच् यासारखे, किंवामराठीतील, ग.दी. माडगुळकर घेतले तर, हेच आपल्या लक्षात येईलकि, हे "गीतकार" मु ळात प्रतिभावंत कवी आहेत कि ज् यांच्या कवितामुलत: अतिशय गे यबद्ध आहेत. शब्दच जर गेयतापूर् ण असतील तरसंगीतकाराला एक वेगळा च हुरूप येतो, हे एक निखालस सत्य आहे. जयदेव यांच्या रचनेत, या वि चाराचे नेहमीच भान असल्याचे दि सून येते. अर्थात, या संदर्भात, खूप काही लिहिता येईल पण खर तर हा एकावेगळ्या निबंधाचा विषय आ हे.
जयदेव, यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक असामान्य गाणी दिली आहेत तरी, या गाण्यासारखी रचना, खुद्द त्यांना देखील अपवादानेच करता आली. This is the creation of par excellence.
No comments:
Post a Comment