काही गाणी का लोकप्रिय होतात याचे जसे "गणित" कळत नाही त्याचप्रमाणे, काही गाणी का विस्मृतीत जातात, त्याचे देखील आकलन होत नाही. बरेचवेळा, गाणी गाजवली जातात - मार्केटिंग तंत्राने खपवली जातात पण अशा गाण्यांचे "आयुष्य" देखील अल्प असते. गाण्याची चाल सुंदर असणे, गाण्यातील कविता गेयतापूर्ण आणि आशयबद्ध असणे आणि गायन, आपल्या जाणीवा समृद्ध करणारे असावे, असे भाग्य फार थोड्या गाण्यांना लाभते. त्यातून, चाल गायकी ढंगाची असणे, हे म्हणजे दुग्धशर्करा योग!! आपल्याकडे अजूनही, गाण्याची चाल "बाळबोध" असणे, भूषण मानले जाते आणि याचे मुख्य कारण, अजूनही सुगम संगीत हे प्रतिष्ठित झालेले नाही. याचा अर्थ असा नव्हे, "बाळबोध" चाल, सांगीतिक दृष्टीने कमअस्सल असते. सोपी चाल तयार करण्यासाठी देखील संगीताचा गाढा अभ्यास जरुरीचा असतो. पण, या विचाराचा इतका प्रभाव, आपल्या समाजावर पडलेला आहे की, जरा कठीण चाल आली की लगेच दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असते!! गाण्याची चाल, हे देखील सर्जनशील काम आहे, हेच लोकांना फारसे पटलेले नसते आणि हा दुर्दैवी भाग आहे. यामुळेच काही असमान्य ताकदीचे संगीतकार मागे पडले आणि विस्मृतीच्या गर्तेत नाहीसे झाले!! हातात आलेले शब्द आणि त्या शब्दांचा अन्वयार्थ लावून, शब्दांना नेमक्या सुरांत गुंफणे, हे अजिबात सोपे नाही. मुळात, शब्दांत दडलेला आशय जाणवून घेण्यासाठी, तुम्हाला शब्दांबद्दल प्रेम असणे आवश्यक असते. शब्द माध्यम हे नेहमीच अति अवघड माध्यम असते आणि अशा माध्यमाशी जवळीक साधून, मगच त्यात "दडलेली"चाल शोधून काढून, त्या कवितेला अर्पण करायची!! असा सगळा प्रवास असतो.
"सौख्ये जाति झराझरा झिरपुनी : त्यांचे चरे राहिले;
कांही खोल जिव्हाळीही उतरले; त्यांच्या कळा दु:सह;
दावू का विचकून ते ? सहत ना ती कल्पनाही मना;
जातें झोंबून आरपार हृदया : तें शक्य नाही मला."
सुप्रसिद्ध कवियत्री इंदिरा संत यांच्या "शेला" या काव्यसंग्रहातील या ओळी. इंदिरा संत यांच्या कविता या एका बाजूने आत्ममग्न तर दुसऱ्या बाजूने वैश्विक जाणीव प्रगट करणाऱ्या. इंदिराबाईंना निसर्ग जवळचा वाटतो, तो त्यातीलकालचक्राच्या गतीच्या जाणिवेने. ज्या वेळी त्या निसर्गाचे रूप प्रतिमा म्हणून वापरतात त्यावेळीही त्यांचा प्रयत्न त्या निसर्गरूपातून जाणवणाऱ्या कालचक्राच्या गतीचा एक क्षण पकडण्याचा असतो. या गतीची जाणीव त्या आपल्या प्रतिमांतून देतात; त्या गतीशी भाववृत्तीच्या लयाचे नातें जोडतात. तिथेच संवेदनाविश्व आणि भाववृत्ती एकात्म होतात आणि त्यांची खरी कविता साकार होतें. म्हणूनचत्यांच्या कवितेतील विश्व हे सतत गतिमान असते.
"साथी रे भूल ना जाना मेरा प्यार" ही रचना काव्य म्हणून वाचायला घेताना, वरील विवेचनाचा तंतोतंत प्रत्यय येतो!! संगीतकार रवींद्र जैन यांनी बहुतेकवेळा स्वतः:च लिहिलेली गाणी स्वरबद्ध केली. याचा परिणाम असा झाला, स्वररचना करताना "यतिभंग" होण्याचे फार प्रसंग आले आले नाहीत. पेळूतून सहज सूत निघावे त्याप्रमाणे सुरांतून शब्दांच्या आशय मोकळा होत गेला.
"साथी रे भूल ना जाना मेरा प्यार" हे "कोतवाल साब" या हिंदी चित्रपटातील गाणे, हे गाणे आज कुणाच्या खिजगणतीत तरी असेल का? मला शंका आहे. गाण्याच्या बाबतीत, असे बरेचवेळा होते, गाणे लक्षात राहते पण चित्रपटाचे नाव विसरले जाते!! शक्य आहे, इथे देखील असेच झाले असणार परंतु इतके विलोभनीय, गायकी ढंगाचे गाणे देखील, काळाच्या पडद्याआड जावे, ही खेदाची बाब आहे. आता सरळ गाण्याकडे वळतो.
मला तर नेहमी असेच वाटते, एखादे गाणे तयार होणे म्हणजे, प्रसूतीवेदनेतून नवे बाळ जन्माला येण्यासारखे असते. खरे तर हातात केवळ शब्दांचा "सांगाडा" असतो पण त्याला एकप्रकारची लय असते, ज्याला(च) गेयता म्हणतात. त्या लयीतून, चालीच्या निर्मितीची कहाणी सुरु होते. अर्थात, काहीवेळा, चालीचा आराखडा असतो आणि त्या लयीला समजून घेऊन, कविता मांडली जाते.प्रश्न त्याचा नाही तर प्रत्येकाच्या कुवतीचा आहे. इथे सुरवातीला, व्हायोलीन वाद्याचे सूर ऐकायला येतात आणि ते सूर क्षणात टिपेचा सूर गाठतात, हे जे "वर" जाण्याचे वळण आहे, तेच ध्यानात घ्यावे लागेल कारण, हे सूर(च) या गाण्याची कर्मभूमी आहे!!
किती वेगवेगळी वळणे घेऊन, एका "बिंदूवर" व्हायोलिन्स स्थिरावतात आणि त्याच क्षणी गिटारचे सूर आणि व्हायोलिन्स, यांचा मेळ सुरु होतो. खरे तर, गाण्याचा ताल देखील, इथेच सिद्ध होतो आणि जोडीने, गाण्याचा "मुखडा"!! उत्तम गाण्याच्या बाबतीत एक बाब अवश्यमेव मानावीच लागते. गाण्याचा मुखडा हा, अतिशय सुबक, रंजक असावा लागते, जेणेकरून, रसिकाचे लक्ष, गाण्याकडे "खेचले" जावे. गाण्याचे अर्धे यश हे, तुम्ही गाण्याचा मुखडा कसा बांधता, यावर अवलंबून असते. पुढेतर सगळे "बांधकाम" असते!! इथे देखील हाच प्रकार आढळतो.
हा वाद्यमेळ चालू असतो, तेंव्हा त्याच्या पाठीमागे हलक्या आवाजात, बोंगो या वाद्याच्या मात्रा चालू आहेत, पण त्याचे अस्तित्व फार नगण्य आहे. हा संगीतकाराचा विचार!! इथे, अति धीम्या आणि संथ सुरांत आशाबाईंच्या आवाजात, "साथी रे भूल ना जाना मेरा प्यार" ही ओळ ऐकायला येते. ही ओळ जर का अति बारकाईने ऐकली तर आपल्याला सहज कळेल, आधी जे वाद्यांचे सूर आहेत, त्याच्याशीच तादात्म्य राखणारी ही गायकी आहे. अतिशय "ठाय" लयीत आणि मंद्र सप्तकात गाणे सुरु होते.
या ओळीचे गायन देखी फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. शब्दांतील आशय ओळखून, तो आशय सुरांतून कसा खोलवर व्यक्त करायचा, याचे इथे अप्रतिम उदाहरण आपल्याला ऐकायला मिळते. "साथी रे, भूल ना जाना, मेरा प्यार" गाताना, "रे" अक्षरावरील "एकार" आणि नंतर परत ही ओळ गाताना, "साथी" मधील "थी" अक्षरावरील "इकार" खास ऐकण्यासारखा आहे. हाण्याची लय जर समजून घेतली तर, या लयीला, अशा "एकारा"तून किंवा "इकारा" मधून, जे वेगळे "वळण" मिळते आणि आशय वृद्धिंगत होतो, ही गायकी फार कमालीची अवघड आहे. "थी" अक्षर किंचित "उचलून" म्हटले आहे. फार, फार कठीण आहे.
"मेरी वफा का, ऐ मेरे हमदम; कर लेना ऐतबार, साथी रे भूल ना जाना मेरा प्यार" ही ओळ तर केवळ असामान्य आहे, "ऐतबार" वरील हरकत आणि परत "साथी" शब्दाचा उच्चार!! पहिल्यावेळी केलेला उच्चार आणि आताचा उच्चार, यात जमीन-अस्मानाचे अंतर आणि फरक आहे. इथे एक ध्यानात घेतले पाहिजे, गाण्याची लय तीच आहे पण, स्वर आणि त्याचे application, इथेच गाणे थोडे बुद्धीगम्य होते. केवळ काही सुरांचाच फरक आहे पण केवळ अर्थपूर्ण आहे. यालाच गायकीची "नजर" म्हणतात आणि इथे ही गायिका, आपला दर्जा दाखवून देते. हे ओळखणे सोपे नाही आणि ओळखून, तसेच आपल्या गळ्यातून तंतोतंतपणे प्रत्यंतर देणे तर त्याहून अवघड आहे.
या पुढे पहिला अंतरा येतो आणि परत व्हायोलिन्स सुरु होतात. वाद्यांचे जणू नर्तन चालावे त्याप्रमाणे, त्यातून सुरांची अतिशय गुंतागुंतीची रचना सूर होते, जी आशाबाईच्या गळ्यातून आलेल्या सुरांशी तादात्म्य राखते. वाद्यमेळ काहीसा "अरेबिक" स्वरावलींच्या धाटणीवर आहे.
"दूर कही कर लेजा मजबुरी, वो दुरी तो होगी नजर की दुरी;
तेरी दुआए गर साथ रही, आयेगी फिर से बार;
साथी रे भूल ना जाना मेरा प्यार …."
वास्तविक या ओळीत तशी सुरांची फार अकल्पित करामत नाही परंतु तरी देखील "मजबुरी" मधील "री" अक्षर तसेच "दुरी" मधील "री" हे अक्षर, इथल्या हरकती खास आहेत. अतिशय बारकाईने ऐकले तरच त्यातले सौंदर्य घ्यानात येईल आणि परत उच्चारलेला "साथी" हा शब्द!! पहिल्या, ध्रुवपदात घेतलेली "जागा" आणि इथे उचललेली "जागा" यात विलक्षण फरक आहे. तसेच, इथे "थी" अक्षरावर किंचित लांबवलेली हरकत, गायनाची परीक्षा किती अवघड आहे, हेच दर्शवून देते. खर तर अशी सौंदर्यनिर्मिती, हेच सुगम संगीताचे खरे "अलंकार" आहेत आणि या अलंकारानीच, गाणे सजवले जाते. हे अलंकार घेणे अजिबात सोपे नाहीत. इथे प्रत्येक क्षण आणि त्यापलीकडील "निमिष" महत्वाचे असते.याच सुरांचा नेमका "कण, गळ्यातून काढणे, यालाच गायकी म्हणतात.
संगीतकार म्हणून मूल्यमापन करताना थोडीशी अडचण संभवते. एकतर कारकीर्द म्हणून जरी लांब असली तरी चित्रपट फार (संख्येने) तपासायला मिळत नाहीत. सुरवातीला गुजराती लोकसंगीताचा प्रभाव जाणवतो पण पुढे "चित्तचोर" सारख्या चित्रपट गीतांनी त्यांची ओळख नव्याने करून घ्यायला लागते. सर्वसाधारणपणे बहुतेक रचना सहज, रसाळ आणि साध्या सुरावटींच्याघ्यायला वाव आहेत. मुखडे देखील फार लक्षात राहतील, असे नाहीत. कदाचित हाताशी त्यामानाने तोकड्या आवाजाच्या गायक/गायिका आल्याने, स्वररचना तयार करण्यावर मर्यादा पडल्या असाव्यात, अशी शंका घ्यायला वाव आहे, या गाण्याच्या संदर्भात विचार करताना, हाताशी आशा भोसल्यांसारखा दर्जेदार आवाज मिळाल्यावर, अतिशय महत्वाकांक्षी म्हणावी अशी रचना इथे सादर केली.
दुसरा अंतरा अवतरत असताना, परत व्हायोलिन्स वाद्यातून येणारी अवघड वळणे आणि त्याला मिळालेल्या बासरीच्या सुरांची साथ, हा सांगीतिक वाक्यांश, हे संगीतकाराच्या प्रतिभेचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. वास्तविक, सुगम संगीतात, वाद्यमेळाची रचना म्हणजे एका प्रकारे अप्रतिम Crafting असते, चालीच्या सुरांशी "गणित" मांडून, याची रचना तयार केली जात असते. पण, त्यात जरादेखील "कृत्रिमता" आणू न देता, सुरांचा खेळ खेळायचा असतो.
"काश कभी ये रैना ना बिते, प्रीत का ये पैमाना कभी ना रिते;
डर है कही आनेवाली सहर, ले लेना दिल का करार,
साथी रे भूल ना जाना मेरा प्यार…."
या ओळीत, "पैमाना कभी ना रिते" वरील गायकी बघावी. "पैमाना कभी" हे शब्द पार वरच्या सुरांत घेतले आहेत आणि लय तशीच कायम ठेऊन, "ना रिते" हे शब्द खर्जात घेतले आहेत!! शब्दातील अव्यक्त भाव कसा सुरांच्या सहाय्याने व्यक्त झाला आहे.
अर्थात इतकेच इथे संपलेले नाही. लाल गालिच्यावर पाणीदार मोती ओघळत, उतारावर यावेत त्याप्रमाणे, इथे सूर खाली आला आहे. ही सुरांची प्रक्रिया केवळ अनुभवण्यासाठीच "जन्माला" आली आहे. अशी गायकी ऐकताना, आपल्या हाती एकच उरते.हातातील पेन खाली ठेवावे आणि डोळे बंद करून सगळे सूर पापणीच्या आड साठवून ठेवावेत. मी तरी आणखी वेगळे काय केले!!
No comments:
Post a Comment