Monday, 2 January 2023
प्रथम तुज पाहता
एक काळ, विशेषतः दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबई इथे *चाळ संस्कृतीचे* प्रचंड प्राबल्य होते आणि पर्यायाने एकत्र कुटुंब पद्धत रूढ झाली होती. २ खोल्यांत त्यावेळी ५,६ माणसे सहज रहात होती, अगदी जोडपी देखील. आता हळूहळू ही संस्कृती लयाला जायला लागली कारण टॉवर संस्कृती आणि *स्वातंत्र* याचा परिणाम. एकत्र कुटुंब पद्धतीत वैय्यक्तिक मातांना फारसा वाव नसायचा तसेच स्त्री तशी घरातच अडकलेली असायची. अर्थात या पद्धतीत फायदे तसेच तोटे नक्कीच होते आणि या पार्श्वभूमीवर मराठीत १९७१ साली प्रदर्शित झालेला *मुंबईचा जावई* चित्रपटातील एका सुमधुर गाण्याचा आस्वाद आज आपण घेणार आहोत.
फक्त २ खोल्यांचे घर, घरात सगळेजण *चाळसंस्कृतीत* मुरलेले. त्यामुळे जे काही करायचे ते फक्त २ खोल्यांच्या परिघात. आजच्यासारखी 2BHK सारखी चैन तेंव्हा नव्हती. बाहेरच्या खोली म्हणजे हॉल आणि रात्रीची झोपायची खोली. इतक्या छोट्या जागेत देखील माणसे मनोरंजन करून घेत असत. आज याचे नवल वाटण्यासारखी परिस्थिती आहे. घरात नाटकाची तालीम सुरु आहे, घरातील सर्वात वयस्कर माणसाचा *गृप* जमून पत्त्यांचा डाव टाकलेला आहे आणि तालमीनिमित्ताने गाणे सुरु आहे!! *प्रथम तुज पाहता* या गाण्याची ही अशी पार्श्वभूमी आहे. नेहमीप्रमाणे गाण्याकडे वळण्याआधी आपण गाण्यातील कवितेकडे वळूया.
मराठी चित्रपट संगीतात ग.दि.माडगूळकर नामक एक अलौकिक चमत्कार होऊन गेला. अस्सल मराठी संस्कृती पचवलेला आणि मराठी मातीशी अचूक नाते सांगणारा हा कवी होता. या माणसाने गाण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रसंग आपल्या शब्दाने अजरामर केले. मी असे चुकूनही म्हणणार नाही, माडगूळकरांची सगळी गाणी उत्तम होती. तशी कुणाचीच नसतात परंतु जिथे कविता *जमली* तिथे मात्र माडगूळकर *स्पर्श* नेहमी दिसून आला. कवितेसाठी त्यांनी संस्कृत साहित्य, महाराष्ट्रातील संत साहित्य, पंत साहित्य तसेच लोकगीतातून आढळणारी कविता, सगळे आत्मसात केले होते आणि प्रसंगोत्पात आपल्या कवितेत सढळ हाताने वापरले. तसे करताना, त्यांनी त्याच कल्पनांची *पुनर्रचना* केली आणि ती अशी बेमालूम केली की प्रत्यक्षात कुण्या संतांनी रचना केली असावी, असे सत्कृतदर्शनी वाटावे!! गेयता हा त्यांच्या कवितेचा मुख्य गाभा होता आणि त्यामुळे त्याच्या रचना संगीतकारांची आव्हानात्मक असायच्या.
आजचे गाणे, मी वर म्हटल्याप्रमाणे घरातील नाटकाच्या तालमीसाठी गायलेले गाणे आहे. प्रणय गीत आहे. आपल्या प्रेयसीला उद्देशून म्हटलेले गीत आहे. कवितेत काही अगम्य नसणे, ही माडगूळकरांची खासियत होती आणि तसे करताना, आशयाला नेहमीच समृद्धता प्रदान करण्याचे कौशल्य होते. प्रसंग पहिल्या वहिल्या भेटीचा आहे आणि तत्कालीन प्रणयी संस्कृती ध्यानात घेऊन,
*स्पर्श होता तुझा विसरलो भान मी,*
*धुंद श्वासातला प्राशिला गंध मी*
*नयन का देहही मिटुनी तू घेतला*
या ओळी वाचाव्या. इथे माडगूळकरांनी *प्राशिला* हे क्रियापद योजले आहे आणि ते किती चपखल बसले आहे. तसेच शेवटची ओळ वाचताना उत्कट प्रणयाची अभिव्यक्ती नजरेसमोर येते. *डोळ्यासमवेत देह मिटून घेणे* ही भावनाच किती काव्यमय आहे. माडगूळकरांनी सगळी मराठी संस्कृती समजून घेतल्याचे निदर्शक आहे. परिणामी चित्रपटातील प्रसंग अधिक परिणामकारक होतो.
मराठी चित्रपट संगीतातील एक अजरामर नाव म्हणजे सुधीर फडके. त्यांचीच स्वररचना या गीताला लाभली आहे. *कलावती* रागावर आधारित चाल आहे. कलावती राग मुळातला कर्नाटकी संगीतातला पण आता उत्तर भारतीय संगीतात चपखल सामावून गेला आहे. *रिषभ,मध्यम* वर्ज्य आणि *कोमल निषाद* व बाकी सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात.मागील आठवड्यात आपण *जनसंमोहिनी* रागाची ओळख करून घेताना जे स्वर बघितले , त्यातील फक्त *मध्यम* अधिक जास्तीचा स्वर वर्ज्य असतो अन्यथा रागाच्या चलनात बरेच साम्य आहे.अर्थात तांत्रिक भाग वगळला आणि गाण्याकडे वळले तर गाण्यात कलावती राग स्पष्ट दिसून येतो, अगदी पहिल्या आलापापासून.
गाण्याची चाल थेट मराठी रंगभूमीवरील गाण्यांची आठवण करून देणारी आहे. एकूण बांधणी देखील त्याच धर्तीवर केलेली आहे. अर्थात नाट्यगीतात बरेच वेळा *गायकी* केली जाते तास प्रकार इथे न अवलंबता, अगदी छोटेखानी पद्धतीने रागाचे स्वरूप पण मांडले आहे आणि नाट्यगीतांची *झलक* प्रस्तुत केली आहे. गायकी अंग आहे पण पसरटपणा नाही. चित्रपट गीताची ३ मिनिटांची मर्यादा पाळून, सादरीकरण केलेले आहे. इथे एक संगीतबाह्य बाब मांडायची आहे. अरुण सरनाईक यांनी केलेला अभिनय हा गाण्याच्या संदर्भात इतका नेमका आहे की प्रथमक्षणी तेच गात आहेत, असा भास व्हावा. अर्थात अरुण सरनाईकांकडे संगीताचे अंग असल्याने, त्यांना ते जमू शकले. चित्रपटातील गाण्यांवर अभिनय करणे, एकूणच फारसे गंभीर घेतले जात नाही म्हणून थोडक्यात उल्लेख केला इतकेच. अर्थात संगीतकार सुधीर फडक्यांनी कारकिर्दीच्या सुरवातीला पाध्येबुवांकडे रागदारी संगीताचे पायाभूत शिक्षण घेतले असल्याने, त्यांना या गाण्याची बांधणी नेमकी करणे सहज शक्य झाले. ताना, हरकती थोडक्यात कशा प्रकारे गाण्यात मिसळायच्या असतात, यासाठी हे गाणे उदाहरण म्हणून बघावे. गायकी अंग असला तरी सुधीर फडक्यांनी शब्दांवर कुठेही अन्याय होऊ दिला नाही. शब्दोच्चार स्वतः अचूक करायचे आणि गायक/गायिकेकडून सुद्धा अचूक काढून घ्यायचे, याचा त्यांना अगदी *ध्यास* होता, असे म्हणता येईल. कुठेही शब्द *मोडलेला* नाही आणि सांगीतिक अलंकार बिनचूक मांडायचा, हे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. गाणे तीनतालात आहे आणि एकूणच लय द्रुत आहे.
गायक रामदास कामत मुळातले रंगभूमीवरील गायक. पंडित जितेंद्र अभिषेकीबुवांकडे तालीम घेतलेले गायक.अर्थात गळ्यावर गुरूंच्या गायकीचा ठसा उमटणे स्वाभाविक आहे परंतु टी शैली पुसून स्वतःची गायकी त्यांनी नाट्यगीत गायनात प्रस्थापित केली. नाट्यगीत थोडक्यात कसे गावे, याच अचूक अंदाज, माझ्या मते २ गायकांना आला होता. १) पंडित वसंतराव देशपांडे आणि २) रामदास कामत. इथे तर त्याच धर्तीवरील चाल हातात आलेली तेंव्हा रामदास कामत यांची गायकी खुलली तर काय नवल. गाण्यातील पहिल्या आलापात स्वरचनेची चुणूक दाखवणे आणि गाण्याची सगळी सौंदर्यस्थळे विशद करणे, त्यांना सहज जमले आहे. अतिशय मोकळा आवाज आणि शक्यतो मध्य सप्तकात(च) गायन करणे, त्यांना जमत असे. वरच्या सप्तकात गायले नाहीत असे नव्हे पण तो बहुश:गायनाचा विस्तार करण्यासाठी. संगीतकाराने दिलेल्या चालीला अचूक न्याय देणे, हे गायकाचे प्रथम कर्तव्य आणि तिथे रामदास कामत यशस्वी झाले आहेत. मुखडा गाऊन झाल्यावरील हरकत मुद्दाम ऐकावी. हरकतीचा दीर्घ विस्तार सहजशक्य होता परंतु त्यांनी अगदी थोडक्यात गाऊन परिणाम साधला आहे. तसेच * जाग धुंदीतुनी मजसी ये जेधवा* या ओळींवरील किंचित गायकी मुद्दामून ऐकावी. ३ मिनिटांच्या गाण्यात सांगीतिक अलंकार कसे वापरावे, याचे सुंदर उदाहरण म्हणून दाखवता येईल.
गाणे रागदारी संगीतावर आधारित आहे पण रागातील सौंदर्याचे अर्क या गाण्यातून दिसतो आणि हेच या गाण्याचे खरे यश मानावे लागेल.
प्रथम तुज पाहता, जीव वेडावला
उचलून घेतले निज रथी मी तुला
स्पर्श होता तुझा विसरलो भान मी
धुंद श्वासातला प्राशिला गंध मी
नयन का देहही मिटुनी तू घेतला
जाग धुंदीतुनी मजसी ये जेधवा
कवळुनी तुजसी मी चुंबिले तेधवा
धावता रथ पथी पळभरी थांबला
(2) Pratham Tuzh Pahata - Arun Sarnaik, Ramdas Kamat, Mumbaicha Jawai Song - YouTube
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment