Friday 13 January 2023

पाहिले न पाहिले

जे मत्त फुलांच्या कोषातून पाझरले, निळ्या लाघवी दंवात उलगडले, जे मोरपिसांवर सावरले, ते-त्याहूनही-आज कुठेसे पुन्हा एकदा तशाच एका लजवंतीच्या डोळ्यांमध्ये-डोळ्यांपाशी - झनन-झांजरे मी पहिले..... पाहिले न पाहिले..... ते प्राजक्ताच्या पाकळीवर उतरले, मदिरेवरच्या निळ्या गुलाबी फेसावर महिरपले, जे जललहरीवर थरथरले, ते-त्याहून-आज कुठेसे पुन्हा एकदा तशाच एका लजवंतीच्या ओठांवरती-ओठांपाशी- ठिबक-ठाकडे मी पाहिले पाहिले न पाहिले. जे कलहंसाच्या पंखांवर भुरभुरले सोनेरी निळसर मळ्या-मळ्यांतून शहारले, जे पुनवेच्या चांदण्यात भिजले,भिजले. ते-त्याहूनही-आज कुठेसे पुन्हा एकदा तशाच एका लजवंतीच्या मानेखाली-किंचितवक्षी- बहर-बावरे-मी पाहिले.... पाहिले न पाहिले सर्वसाधारणपणे पु.शि. रेग्यांची कविता म्हटल्यावर मनात काही ठोकताळे तयार होतात. जरी प्रणयी कविता लिहिणारे, असा जरी समज असला तरी त्यातील विविध छटा, नेहमी थक्क करणाऱ्या असतात. स्त्री ही त्यांच्या बहुतांश कवितेचे मध्यवर्ती कल्पना असते आणि त्या कल्पनेभोवती, वेगवेगळ्या प्रतिमा खेळवत, कवितेला फुलवत मांडणी करायची, अशी त्यांची पद्धत. चराचरांच्या,निसर्गाच्या रस-गंध-रंग-नाद-स्पर्शमयी रूपांतून रसरणारे स्त्रीचे दर्शन त्यांच्या कवीमनाला भुलवत असतेच परंतु रेग्यांना या सृजनशक्तीच्या मार्दवाचा आणि सौष्ठवाचा, गूढतेचा आणि ऐश्वर्याचा खरा अनुभव मिळतो तो स्त्रीच्या मृदू,मादक शरीरलावण्यात आणि मुग्ध भावविभोर छटांमध्ये. स्त्रीच्या सौंदर्यातील संवेदनशीलतेला तेच नेहमी बहुदा बोलावत असावेत. ही सृजनशक्ती, ही जीवनोत्सुकता म्हणजेच स्त्रीचे खरे रूप. ही जाणीव त्यांच्या कवितेतून सातत्याने अनुभवायला मिळते. या अनुभवण्याच्या प्रक्रियेतून मग शांत,संतृप्त,पूर्ण, आनंदमयी अशा छटा त्यांना दिसतात. मग ती स्त्री कुठल्याही स्वरूपातील असो, तिचे सौंदर्य, हा कवी पूर्णतेने उपभोगतो की काय? असा गोड प्रश्न पडतो. मात्र स्त्री सौंदर्य उपभोगताना, त्यातील रसरशीतपणा, त्यांच्या प्रतिमांमधून अतिशय रेखीवपणे उमटतो.खरे म्हणजे सगळी कविता हाच एक अद्वितीय अनुबभव असतो, त्यात असोशी असते, शृंगार असतो, शारीरलावण्य असते. वास्तविक मराठी मनाला आजही स्त्रीच्या सौंदर्याच्या ठराविक, सांकेतिक प्रतिमांची ओढ आहे परंतु त्या पलीकडील सौंदर्य बघायला मराठी मन बुजते. जिथे मन असे बुजते, तिथे रेग्यांची कविता पुढे येते. रेगे आपल्या कवितेत बऱ्याचवेळा शब्दांची मोडतोड करतात किंवा संपूर्णपणे नव्याने घडवतात. प्रसंगी निरर्थक शब्दांतून अतिशय रेखीव असा आशय व्यक्त करतात. प्रस्तुत कवितेतील "झनन-झांजरे" किंवा " ठिबक-ठाकडे" या शब्दांना तसा रूढार्थाने काही अर्थ नाही परंतु या शब्दांची जोड रेग्यांनी अशा प्रकारे केली आहे की त्या निरर्थक वाटणाऱ्या शब्दांतून अनेक अर्थाच्या छटा दर्शविल्या जातात. ही रेग्यांची खासियत. वास्तविक पहाता, ही कविता फक्त ३ कडव्यांची आहे पण प्रत्येक कडव्यातून त्यांनी स्त्री सौंदर्याचे निरनिराळे रूप व्यक्त केले आहे आणि तसे करताना, त्यांनी शारीर सौंदर्याकचा उपयोग केला आहे. कवितेची धाटणी थोडी संस्कृत साहित्याच्या वळणाची वाटते तरीही ती वेगळी आहे. रेगे स्त्री सौंदर्य उपभोगताना, त्यातील अंत:प्रेरणांकडे आपले लक्ष वेधून घेतात. कुठल्याही कवितेत शब्दांची अपरिहार्यता जितकी जमते, तितकी ती कविता अधिक व्यापक होते. आता इथे सुरवातीलाच "जे मत्त फुलांच्या कोषातून पाझरले," या ओळीत "मत्त शब्द आहे, तो "उन्मत्त" लिहून जमला नसता. इथे हाच शब्द अत्यावश्यक. "जे कलहंसाच्या पंखांवर भुरभुरले" इथे "कलहंस" हाच पक्षी हवा आणि हाच शब्द शोभतो. कवितेची धाटणी लक्षात घेता, या शब्दाने जी पूर्णता येते ती कुठल्याच शब्दाने अशक्य वाटते. "भुरभुरले" या क्रियापदाने त्या ओळीला एक भरीवपणा आला आहे. वास्तविक असे शब्द एकेकट्याने अर्थशून्य वाटू शकतात परंतु कवीची खासियत अशी की त्याच शब्दांची घडण नव्याने करताना, त्यांना पूर्ण अर्थ प्राप्त व्हावा. "जे मत्त फुलांच्या कोषातून पाझरले, निळ्या लाघवी दंवात उलगडले, जे मोरपिसांवर सावरले," पहिल्याच ओळींतून कवितेचे "घराणे" आणि "संस्कृती" स्पष्ट होते. स्त्री सौंदर्याची अशी घडण मराठी कवितेत फार तुरळकपणे वाचायला मिळते. "डोळ्यांमध्ये-डोळ्यांपाशी -" इथे डोळे शब्द साधा आहे परंतु त्या शब्दांच्या मागे-पुढे जे वर्णन आहे, त्यामुळे या शब्दांना वेगळीच झिलई प्राप्त होते. "झनन-झांजरे" या मुळातल्या शब्दांना एक "नाद" मिळतो आणि सगळीच कविता नादमय होते. "लजवंती" हे रेग्यांनी घडवलेले विशेष नाम आहे. इथेच कविता इतरांपेक्षा वेगळी होते. पुढे मग "प्राजक्त" अवतरतो पण तो पाकळीवर अवतरतो, पूर्ण फुल इथे अभिप्रेत नाही. पाकळीमध्ये जो नाजूकपणा आहे तो पूर्ण फुलामध्ये येईलच असे नाही. रेगे अशाच प्रतिमांनी कविता फुलवतात. रेग्यांच्या कवितेत व्यक्त होणारा स्त्रीचा आदिबंध हा सांस्कृतिक भावविश्वातील आदिशक्तीशी नवे नाते जोडतो. त्यांचा प्रतिमाव्यापार हा नाविन्यपूर्ण तर आहेच पण जरीही सांकेतिक नाही. तिथे पारमार्थिक काहीही नसून जे आहे ते "मानवी" आहे, "मानसिक" आहे. एक प्रकारच्या ताज्या, रसरशीत जीवनाचा आणि सोनेरीशुभ्र पार्थिव सौंदर्याचा रसिकतेने आणि मनमोकळेपणाने घेतलेला अनुभव आणि आस्वाद, असे खरे स्वरूप आहे. अनुभव घेताना रतिक्रियेच्या पलीकडील अनुभव शब्दातीत करणे, हे त्यांच्या कवितेचे मुख्य अंग मानता येईल. त्याच अनुषंगाने मग विचार करायचा झाल्यास, "जे कलहंसाच्या पंखांवर भुरभुरले सोनेरी निळसर मळ्या-मळ्यांतून शहारले, जे पुनवेच्या चांदण्यात भिजले,भिजले." "मळ्या-मळ्यांतून शहारले" या शब्दांच्यापुढे वेगळी अभिव्यक्तीच संभवत नाही.सोनेरी निळसर मळे आणि त्याच्याआधी येणारे कलहंसाचे भुरभुरणे, हे सगळेच अतिशय काव्यात्म आहे आणि मुख्य म्हणजे या कवितेच्या संदर्भात अपरिहार्य आहे आणि हे तसे वाटणे,इथे भावकविता सिद्ध होते. मी वरती जो "मानसिक" शब्द वापरला तो याचा ओळींच्या संदर्भात. खरं म्हणजे कविता हाच एक सर्वांगसुंदर अनुभव असतो. हा अनुभव शब्दस्वरूप परंतु कल्पकतापूर्ण असतो. कवितेत कवीची संवेदनशीलता अभिप्रेत विषयाचा अनुभव नेहमीच कल्पकतेने घेत असतो. इथे हाच अनुभव आपल्याला अशाच प्रकारे घेता येतो. इथे प्रत्येक शब्दाला महत्व आहे आणि प्रत्येक ओळीतून अप्रतिम अशी अनुभूती वाचकाला मिळते. This is par excellence of romantic ritual.

No comments:

Post a Comment