Saturday, 31 December 2022
एक हसीं शाम को!!
कुठलाही संगीतकार कितीही प्रतिभावान असला तरी त्याची एक *स्वतंत्र* शैली असते. या शैलीतून कुणाही संगीतकाराची सुटका झालेली नाही. क्वचित एखादा संगीतकार, आपल्या रूढ शैलीतून *सुटका* करून घेण्याचा प्रयत्न करतो, फारच थोड्यावेळा ते शक्य होते परंतु पुन्हा तो आपल्या ठराविक शैलीत बंदिस्त होतो. आता *रूढ शैली* म्हणजे तरी काय? आणि फक्त संगीतकाराचीच रूढ शैली असते का? इतर क्षेत्रातील कलाकारांची देखील रूढ शैली नसते का? एकेका प्रश्नाकडे वळूया. संगीतकार जेंव्हा एखाद्या गाण्याची स्वररचना करतो तेंव्हा त्यात त्याचा *स्वभाव* अनाहूतपणे डोकावतो. हे केवळ जाणतेपणी घडत नसून, अजाणता देखील घडत असते. हा काही *दोष* नसतो तर त्या संगीतकाराची स्वतःची ओळख असते. परंतु कला निर्मितीत सातत्य राखण्याच्या प्रयत्नात, त्या संगीतकाराची ठराविक अशी शैली जन्माला येते आणि ती त्याची चाकोरी बनते. आता संगीतकाराचीच चाकोरी होते का? तर तसे नक्कीच नाही. कलेच्या कुठल्याही प्रांगणातील कलाकार घेतला तरी त्याच्याबाबत शैली ही चिकटलेली असते, मग तो लेखक असो, खेळाडू असो, चित्रकार असो किंवा अन्य क्षेत्रातील कलाकार असो.
आजच्या लेखात मी अशी सुरवात केली कारण आजचे गाणे जर का थोड्या बारकाईने ऐकल्यास, एका प्रसिद्ध संगीतकाराने, दुसऱ्या प्रसिद्ध संगीतकाराच्या शैलीत बांधलेली स्वररचना!! अर्थात दुसऱ्या संगीतकाराच्या शैलीत गाणे तयार केले असले तरी देखील संगीतकाराचा *मूळ स्वभाव* गाण्यात कुठेतरी डोकावतोच. * एक हसीं शाम को, दिल मेरा खो गया* हेच ते गाणे आहे. आता गाण्याबद्दल सविस्तर विवरण नंतर करूया. प्रथम गाण्यातील कवितेची ओळख करून घेऊ.
आजच्या गाण्यातील काव्य हे प्रसिद्ध उर्दू शायर राजा मेहंदी अली खान, यांनी लिहिलेले आहे. आता मुळातील उर्दू शायर म्हटल्यावर कवितेवर उर्दू भाषेचा प्रभाव पडणे साहजिक आहे. *मुद्दतो से आरजू थी* किंवा * शबनमी सी जिस की आँखे* या ओळीत या भाषेची ओळख होते. त्यातून मुळातले कवी म्हटल्यावर, शाब्दिक श्लेष नक्कीच अभिप्रेत असतात. *शबनमी* हा, मूळ *शबनम* शब्दाचा वेगळा अवतार!! मूळ शब्दाचे *विशेष नामात* परिवर्तन करून, सौंदर्याचे परिमाण अधिक विस्तृत केले. अर्थात हे चित्रपट गीत आहे आणि तिथे बरेचवेळा *तडजोड* ही करावीच लागते जसे पहिल्या कडव्यात *सुनी सुनी* हे शब्द पुनरुक्त केलेत.निखळ कविता म्हटली तर त्यात अशी पुनरावृत्ती खपत नाही परंतु चित्रपट गीताची शब्दरचना म्हटल्यावर, प्रत्येक गाण्याचे एक स्वतंत्र *मीटर* असते आणि त्यानुरूप शब्दरचना आकारास आणावी लागते. इथे तेच घडले आहे, २ वेळा *सुनी* शब्द लिहून आशयात कसलीच वृद्धी होत नाही. तसेच *मेरे दिल के कारवाँ को* असे काहीसे सरधोपट शब्द वाचायला मिळतात .असे असूनही, कविता म्हणून रचना सुंदर आहे, यात शंकाच नाही आणि याचे कारण रचनेत अनुस्यूत असलेली गेयता. वास्तविक रचनेतील शब्दसंख्या थोडी विषम स्वरूपाची आहे. हे विधान मी नेहमीच्या चित्रपट गीतांतील कवितेच्या आधाराने करत आहे.
या गाण्याची स्वररचना सुप्रसिद्ध संगीतकार मदन मोहन यांनी बांधलेली आहे. चालीचा *तोंडवळा* ऐकल्यावर, शैली संगीतकार ओ.पी.नैयर यांच्याशी तंतोतंतपणे जुळणारी वाटते आणि तशी आहे देखील. नैयर यांच्या चालीत सर्वसाधारणपणे आढळणारे *खटके* किंवा *हरकती*, इथे ऐकायला मिळतात. गाण्याची चाल बरीचशी *जनसंमोहनी* या अनवट रागाशी जुळणारी आहे. *कोमल निषाद* व्यतिरिक्त सगळे स्वर शुद्ध लागणाऱ्या या रागात *मध्यम* स्वराला मात्र स्थान नाही. *ग प ध नि(को) धss प* ही स्वरांची संहती नेहमी ऐकायला मिळते. मुळातला *कर्नाटकी* संगीतातील राग, इतर अनेक रागांप्रमाणे उत्तर भारतीय संगीतात आणला गेला आणि स्थिरावला. आता या गाण्याच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास, गाण्याची सुरवात *गप पध सांसां गग* ही सुरावट *एक हसीं शाम को* या शब्दांची आहे तर *साग रेसानि सा रेग पमग* या स्वरांनी *दिल मेरा खो गया* ही ओळ सजलेली आहे. जनसंमोहनी रागाचे चलन ऐकल्यावर एकदम या चाळीशी असणारे साम्य नजरेस पडते.
आता वर मी म्हटले तसे नैयर यांच्या शैलीशी जुळणारी स्वररचना आहे, या विधानाला पुरावा म्हणून गाण्यातील तालवाद्य, नैयर यांच्या गाण्यातून बरेचवेळा ऐकायला मिळणारे *चायनीज ब्लॉक* हे वाद्य इथे ऐकायला मिळते आणि माझ्या विधानाला पुष्टी मिळते. आता मुखड्यापासून जी शैली ऐकायला मिळते, त्यालाच अनुलक्षून गाण्याचा वाद्यमेळ रचणे, क्रमप्राप्तच ठरते. विशेषतः बासरी आणि व्हायोलिनची स्वररचना अगदी त्याच शैलीबर बांधलेली आहे. अंतरे बांधताना, धाटणी मुखड्याला सुसंगत अशीच ठेवली आहे. असे असले तरी गाण्यावर मदन मोहन यांची छाप दिसून येते आणि ती छाप गाण्यातील वेगवेगळ्या हरकतींमधून दिसून येते.
मोहम्मद रफींनी या गीताचे गायन केले आहे. मुळातला मोकळा आवाज आणि त्याला सजून दिसणारी चाल मिळाल्यावर, रफींचे गायन अप्रतिम होणार, हे नक्की. अर्थात काही ठिकाणी आवाज काहीसा नाट्यात्म लावला आहे जसे, *मुद्दतो से आरजू थी, जिंदगी में कोई आये* ही ओळ गाताना काही ठिकाणी अनावश्यक *वजन* वापरले असे वाटते. अर्थात एक गायक म्हणून गाण्याच्या सुरवातीला जी *हमिंग* सुरावट आहे ती निव्वळ अप्रतिम. नुसत्या हमिंग मधून गाण्याची चुणूक दाखवायची, हे अजिबात सोपे नाही.
गाण्याची चाल मुळात मध्य सप्तकात आहे, अधून मधून वरच्या सप्तकात जाते पण एकूणच गाणे काहीसे द्रुत लयीत असूनही आवाज अतिशय शांत, हलका असा लावलेला आहे. त्यामुळे प्रणय गीताला फार पोषक झाले आहे.
चाल सोपी आहे म्हणूनच कदाचित लोकांच्या पसंतीस पडली असावी.
एक हसीं शाम को, दिल मेरा खो गया
पहले अपना हुआ करता था, अब किसी का हो गया
मुद्दतो से आरजू थी, जिंदगी में कोई आये,
सुनी सुनी जिंदगी में, कोई शमा झिलमिलाये,
वो जो आये तो रोशन ज़माना हो गया
मेरे दिल के कारवाँ को, ले चला है आज कोई,
शबनमी सी जिस की आँखे,थोड़ी जाएगी,थोड़ी सोई,
उनको देखा तो मौसम सुहाना हो गया.
(2) एक हसीं शाम को दिल मेरा खो गया_Dulhan Ek Raat Ki1966_Nutan& Dharmendra _Rafi_Raja MA khan_M M_a tri - YouTube
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment