Saturday 21 January 2023

लग जा गले

जरा बारकाईने विचार केला तर प्रत्येक संगीतकाराची एक विशिष्ट शैली असते आणि त्याच्या बहुतेक स्वररचना त्या शैलीशी सुसंगत असतात, जखडून घेतलेल्या असतात. कुठलाच संगीतकार या मर्यादेपासून सुटका करून घेऊ शकला नाही. अर्थात काही संगीतकार, आपल्या आहे त्या शैलीशी सुसंगत पण थोड्या वेगळया धाटणीच्या रचना करतात आणि ललित संगीतात आपले नाव अजरामर करून जातात. अखेर शैली म्हणजे तरी काय? संगीतकाराच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास, त्याच्या बव्हंशी रचनेत, ठराविक स्वरिक वळणे, ठाशीव वाद्यमेळ तसेच ढाचा याबाबत एक कायमस्वरूपी रचना अनुस्यूत असते आणि तिथेच त्या संगीतकाराची "ओळख" तयार होते. अर्थात ठराविक स्वरिक वळणे, हा मुद्दा तर फार महत्वाचा ठरतो. आता ही वळणे, कुठल्या स्वरूपात आपल्या समोर येतील हे सांगणे कठीण. कधी एखादी हरकत असते, तर कधी संपूर्ण ओळच त्याच्या शैलीची ओळख दर्शवते. अशा वेळी, चालीतील निरनिराळे प्रयोग, वाद्यांची हाताळणी कितीही प्रत्ययकारी असली तरी काही खुणा, आपल्याला खुणावत राहतात. त्यावरूनच त्या संगीतकाराची ओळख पक्की होते. आपले आजचे गाणे - "लग जा गले" हे गाणे वरील विवेचनाला आधारभूत असे उदाहरण म्हणून मांडता येईल. आता ते कसे? याच प्रश्नाचा वेध घेत, या गाण्याचा आस्वाद घेणार आहोत. राजा मेहदी अली खान यांनी हे गाणे लिहिले आहे. मुळातील उर्दू रचनाकार पण हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक, ज्यांना "यादगार" असे म्हणता येईल. अशी गाणी लिहिली आहेत. विशेष करून संगीतकार मदन मोहन यांच्या सोबत त्यांची नाळ जुळली होती. चित्रपटात प्रसंगात एकसाचीपणा किंवा तोचतोचपणा येणे, क्रमप्राप्तच असते. हे अटळ वास्तव स्वीकारून, काही कवींनी अतिशय दर्जेदार कविता सादर केल्या, त्यात राजा मेहदी अली खान यांचे नाव अग्रक्रमाने येते. सांख्यिकी दृष्टीने, या कवीने भारंभार सिनेमात गाणी लिहिली नाहीत आणि म्हणून असे असू शकेल, त्यांच्या काव्यात शिळपटपणा फारसा आढळत नाही. मी नेहमी शक्यतो चित्रपट गीताचा विचार हा, केवळ "गीत" या आधारे करतो, तिथे मग पडद्यावर कसे सादर केले जाते, वगैरे बाबींचा फारसा विचार करत नाही. तेंव्हा एक गीत म्हणून बघायला गेल्यास, कवितेत फारशी आतषबाजी आढळत नाही. अर्थात आतषबाजी हेच कवितेचे बलस्थान, असे अजिबात सुचवायचे नाही परंतु बहुतेकवेळा उर्दू रचनांत आतषबाजी भरपूर वाचायला मिळते आणि त्या अनुराधाने, हे विधान केले आहे. तसे पाहिल्यास रचनेत, फारसे उर्दू शब्द देखील वाचायला मिळत नाहीत. "जार जार" हा काहीसा अनवट शब्द अखेरच्या कडव्यात वाचायला मिळतो. "जार" म्हणजे "किलकिले"!! या ओळीत या शब्दाची द्विरुक्ती ही केवळ आधीच्या ओळीतील "बार बार" या शब्दाशी यमक जुळवण्याची चलाखी आहे. अन्यथा द्विरुक्तीचे काही खास कारण संभवत नाही. एकूणच रचनेत, नायिकेच्या प्रणयी भावनेची पखरण व्यवस्थितपणे मांडली गेली आहे. "आँखों से फिर ये प्यार की बरसात हो ना हो" ही ओळ मात्र असंख्यवेळा, असंख्य विभ्रमातून व्यक्त झालेली आहे. संगीतकार मदन मोहन यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. या लेखाच्या सुरवातीला केलेले विवेचन आता विस्तारित स्वरूपात मांडता येईल. "पहाडी" या लोकप्रिय रागाधारित स्वररचना आहे. "पहाडी" राग हा लोकसंगीताच्या साहचर्याने शास्त्रीय संगीतात स्थिरावला आहे. "औडव/संपूर्ण" जातीचा राग आहे म्हणजेच आरोही सप्तकात, "मध्यम" आणि "निषाद" स्वरांना स्थान नाही. "सा ध प ध म ग प" अशा स्वरांना बांधून घेऊन, या रागाचे चलन सिद्ध होते. "रे नि धनि नि धनिनि नि प सा नि " या स्वरांनी "लग जा गले ये रात हो ना हो" या ओळीचे स्वरलेखन करता येते. आता इथे एक बाब उघड आहे, गाण्याची सुरवात "अवरोही" स्वरांनी केली आहे. परंतु या स्वरांच्या चलनातून "पहाडी" राग डोळ्यासमोर उभा राहतो. हे झाले थोडे तांत्रिक विवरण. गाण्यात तालवाद्य म्हणून "गिटार" आहे आणि त्यामुळेच लयीला गाणे काहीसे अवघड झाले आहे. एकूणच मदन मोहन या संगीतकाराची शैली बघता, हे गाणे त्याच्या नेहमीच्या पठडीतले अजिबात नाही. तरीही गाणे बांधताना, विशेषतः "हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से" या पहिल्या अंतऱ्याच्या ओळीतून आपल्याला चिरपरिचित मदन मोहन शैली ऐकायला मिळते. मी वर जे विधान केले त्याला पूरक म्हणून हे उदाहरण देता येईल. इथे "गझलकार" संगीतकार दिसत नसून, "गीत" बांधणारा संगीतकार, समोर येतो. संगीतकार म्हणून विचार करताना काही मुद्दे लगेच ध्यानात येतात. हा संगीतकार, "गीत" धर्म जाणणारा संगीतकार होता. आपण जे गाणे बनवत आहोत, ते "गीत" या शब्दासाठी बनवत आहोत, ही जाणीव त्यांच्या स्वररचनेतून नेहमी दृग्गोचर होते. परिणामी लयबंधापेक्षा गीताच्या सुरावटीकडे मदन मोहन यांचे लक्ष अधिक होते. इथे या गाण्यातून हेच वैशिष्ट्य समोर येते. जेंव्हा संगीतकार गीत उभे करतो तेंव्हा तिथे गीताच्या सांगीत विस्तारावर मर्यादा घालणे अपरिहार्य होते आणि हेच कारण मदन मोहन, गझलेकडे वळले असावेत, असे संभवते. आणि आता लताबाई.... काहीशी गूढ वाटणारी रचना गाताना, लताबाई नेहमीच सुंदर गायकी पेश करतात. "शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो" ही मुखड्यातील दुसरी ओळ गाताना, "मुलाकात हो ना हो" इथे अचानक स्वर वरच्या पट्टीत जातात. अशाप्रकारे गेल्यावर असे सूर पेलणे, ही लताबाईंची खासियत आहे आणि इथे गायिका म्हणून फार वेगळ्या होतात. असे अचानक वरच्या पट्टीत जाऊन, पुन्हा क्षणार्धात मुखड्याच्याच पहिल्या ओळीशी नाते जुळवणे,ही गळ्याची अनन्यसाधारण परीक्षा होय. "मुलाकात" शब्दावरील "रिषभ" स्वराची जोड खरोखरच जीवघेणी आहे. तसेच पहिला अंतरा सुरु करताना, पहिली २ अक्षरे साध्य पट्टीत घेतली आहेत तर लगोलग तिसऱ्या अक्षरापासून रचना वरच्या पट्टीत जाते. पुन्हा एकदा गळ्याची परीक्षा. असे स्वरांचे अवगाहन करण्यासाठी, कलाकाराच्या तयारीची ताकद ध्यानात येते. हे लिहायला फार सहज आणि सोपे आहे पण प्रत्यक्ष गेल्यावर पेलून दाखवणे, निरतिशय कठीण आहे. गायन विलक्षण गोड आहे परंतु गायला अतिशय अवघड आहे. असे असून देखील हे गाणे आजही अतिशय लोकप्रिय आहे. अर्थात मदन मोहन यांच्या सांगीतिक कारकिर्दीला किती हातभार लागला, हे प्रश्न उरतोच. लग जा गले के फिर ये हसीं रात हो ना हो शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से जी भर के देख लीजिये हमको करीब से फिर आप के नसीब में ये बात हो ना हो पास आइये के हम नहीं आयेंगे बार बार बाहें गले में डाल के हम रो ले जार जार आँखों से फिर ये प्यार की बरसात हो ना हो (3) Lag Jaa Gale - Sadhana, Lata Mangeshkar, Woh Kaun Thi Romantic Song - YouTube

No comments:

Post a Comment