Saturday 21 January 2023

जन पळभर म्हणतील हाय हाय!!

मराठी भाषा एका दृष्टीने भाग्यवान म्हणायला लागेल आणि त्यात कविता या माध्यमाचा फार मोठा वाटा आहे. अर्थातच तद्नुषंगाने बोलायचे झाल्यास, २० व्या शतकात अमाप लोकप्रिय झालेल्या "भावगीत" संगीतप्रकारात कवितेचे प्रतिबिंब पडणे सहजशक्य असेच झाले. सुदैवाने मराठी भावगीताला देखील सक्षम कवितांची नेहमीच साथ लाभली. किंबहुना असे म्हणता येईल, अनेक संगीतरचनाकारांनी अशा अनेक कविता शोधून काढल्या ज्यांना चाली लावणे, त्यांच्या पिंडाला भावले. उत्तम कविता अधिकाधिक लोकांसमोर आणण्यात, या संगीतकारांचा फार मोठा वाटा आहे, हे नि:शंकपणे कबुल करावेच लागेल. याचाच दुसरा भाग असा म्हणता येईल, निरनिराळ्या प्रकृतींच्या कवींनी आपल्या सृजनक्षम निर्मितीने मराठी भावगीत फार श्रीमंत केले. हाच मुद्दा आणखी पुढे मांडायचा झाल्यास, भावगीतांच्या कवितेत "भावकविता" अंतर्भूत करणे, हेच या कवींनी फार मोठ्या प्रमाणावर केले आणि तद्वतच रसिकांची अभिरुची वाढवण्याचे कार्य केले. खरतर कविता, विशेषतः भावकविता कशी असावी? नेहमीच्या आयुष्यातील शब्दांतून आपल्याला त्याच शब्दांचा वेगळा अर्थ दर्शवून देणारी आणि तसा भाव व्यक्त होत असताना आपल्या जाणीवा अधिक अंतर्मुख आणि श्रीमंत करणारी. कवितेची हीच पहिली अट असावी. शब्दांतील आशय, त्याचा घाट, रचना कौशल्य वगैरे बाबी या नंतरच्या आणि बऱ्याच प्रमाणात आपण गृहीत धरलेल्या असतात. वास्तविक कुठलेही लेखन हे प्राथमिक स्तरावर केवळ अनुभवांची मांडणी, इतपत मर्यादित असते आणि आपल्याला आलेला अनुभव, आपण आपल्या स्मृतीत जतन करून ठेवतो, असंख्य अनुभव आपल्या पोतडीत जमा होत असतात परंतु एखादाच असा अनुभव असतो, तो आपल्याला लिहायला प्रवृत्त करतो. तसे बघितले तर प्रत्येक अनुभव हा केवळ "अनुभव" असतो, त्या क्षणाचे अनुभूतीत परावर्तन होत नाही तोपर्यंत त्याला शब्दांची झिलई प्राप्त होत नाही. आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या नेमक्या भावनेशी जितके एकरूप होता येईल, तितके तुमचे लेखन अधिक सशक्त होत जाईल, हा आपल्या सगळ्यांचा सर्वसाधारण अनुभव असतो. अनुभवाच्या पातळीवर आलेला कालावकाश तसाच्या तसा जागृत करून त्यातून जीवनाची नवीन अनुभूती देण्याचा सतत प्रयत्न करणे, एका बाजूला गतकालातील जमा झालेल्या सार्थ स्मृती (जो आपल्याला भावलेला क्षण आहे) आणि दुसऱ्या बाजूला अटळपणे अनंताकडे जाणारे हेतुशून्य भविष्य, या दोहोंतील कालाच्या पोकळीला शब्दांकित करणे, हे कविता या माध्यमाचे खरे सशक्त रूप. थोडक्यात मांडायचे झाल्यास, भावकवितेतील केवळ शब्दच नव्हे तर अक्षर देखील असे असायला हवे जिथे प्रतिशब्द/प्रतिअक्षर याला कसलाच वाव मिळू नये आणि इथे मराठी भावगीताला भा.रा. तांब्यांची कविता सापडली. कालानुरूप विचार केला तर आज, तांब्यांच्या कवितेत काही गुण तर काही दोष सापडतात परंतु जर का "गेयता" हा दृष्टिकोन ठेवला तर तिथे मराठीत अशी प्रासादात्मक कविता विरळाच आढळते. बोरकर, पाडगावकर अशी काही सन्माननीय नावे घेता येतील. इंदोरच्या सरंजामी वातावरणाचा तसेच संस्कृत भाषेचा विशेष प्रभाव पडलेला दिसतो. तरीदेखील कवितेच्या ओळींमधील लय आणि रचनाकौशल्य केवळ अप्रतिम असेच म्हणायला हवे. "जन पळभर म्हणतील हाय, हाय; मी जाता राहील काय,काय?" सुरवातीलाच एक विषण्ण करणारा प्रश्न टाकून कवितेच्या आशयाची कल्पना दिली आहे. खरतर हे एक चिरंतन सत्य आहे पण तरीही फारसे कुणीही स्वीकारत नाही, असा विरोधाभास देखील आहे. पुढे "अशा जगास्तव काय कुढावे" या ओळीने तर एक चिरंतन सत्य मांडले आहे आणि कविता फार वेगळ्याच स्तरावर गेली. संगीतरचनेबाबत मांडायचे झाल्यास, वसंत प्रभूंची चाल आहे. मराठी भावगीत जितके म्हणून श्रीमंत आणि सर्जनशील करता येईल, त्या सगळ्या शक्यता वसंत प्रभूंच्या रचनांमधून अनुभवता येतात. थोडा बारकाईने विचार केला तर गाण्याची स्वररचना "मल्हार" रागावर आहे आणि हे सहजपणे ध्यानात येत नाही. स्वररचनेकडे बारकाईने ऐकायला गेल्यावरच, "मल्हार" रागाचे काही "वळण" सापडते. थोडेसे चकितच होतो. या रागाचे आणि या कवितेच्या भावस्थितीचे नाते अशा प्रकारे सत्कृदर्शनी तरी भावणारे नाही तरीही चालीचे नोटेशन मांडले असतात,आपल्याला मल्हार रागाचे सूर मिळतात. संगीतकार प्रतिभाशाली असतो,तो असा. मला तरी असे वाटते, वसंत प्रभूंनी चाल लावली असणार आणि पुढे कधीतरी त्यांना मल्हार रागाशी साम्य जाणवले असणार. अन्यथा सत्कृतदर्शनी तरी गाण्याची चाल वेगळी वाटते. शब्दातील विखारी भावनेशी तद्रूप होऊन बांधलेली चाल, मुखड्यातच मनात शिरते. गाण्याचे शब्दच इतके प्रत्ययकारी आहेत की तिथे वाद्यमेळाच्या आधाराची फारशी गरज भासू नये आणि प्रभूंनी नेमके तेच केले आहे. म्हटले तर सरळसोट चाल आहे पण तरीही लताबाईंनी गाताना, अर्ध्या हरकतींनी गोडवा आणला आहे. वसंत प्रभूंनी चाल बांधताना, त्याचे कविता वाचन होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली आहे. "मेघ वर्षतील, शेते पिकतील; गर्वाने या नद्या वाहतील" हा दुसरा अंतरा घेताना, चाल किंचित वरच्या पट्टीत घेतली आहे. अर्थात शब्दातील आशय ध्यानात घेता, मघाशी लिहिल्याप्रमाणे मल्हार रागाशी नाते सांगणारे सूर सापडतात. लताबाईंची गायकी, हा खरे तर वेगळ्या निबंधाचा विषय ठरावा. शब्दांतील आर्जव, व्याकुळता, आणि हताश तसेच विखारी भाव, सुरांतून कसा मांडता येऊ शकतो,यासाठी ही गायकी, हा एक मानदंड आहे. "अशा जगास्तव काय कुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे" या ओळी मुद्दामून अभ्यास कराव्या, अशा दर्जाची गायकी आहे. सध्याचे आघाडीचे संगीतकार श्री. अशोक पत्की यांनी वसंत प्रभूंचा गौरव करताना "मेलडीचा बादशहा" असे केले आहे आणि वसंत प्रभूंची कुठलीही चाल ऐकताना याचे प्रत्यंतर आपल्याला येऊ शकते. खरतर मेलडी हा भारतीय संगीताचा प्राण आणि तिथेच वसंत प्रभूंची खासियत म्हटल्यावर गाण्याच्या चालीत गोडवा येणे क्रमप्राप्तच ठरते. लताबाईंची गायकी, मुद्दामून विस्ताराने लिहावी अशी आहे. इतकी अप्रतिम कविता हाती आल्यावर, जसे संगीतकार वसंत प्रभूंनी स्वररचनेत औचित्य सांभाळले आहे, तितकेच लताबाईंनी आपल्या गायनातून अधिक अधोरेखित केले आहे. इथे प्रत्येक शब्दावरील स्वरिक वजनाला अर्थ आहे, केवळ चालीचा भाग म्हणून वजन दिलेले नाही. मराठी भावगीत अशाच गाण्यांनी फार श्रीमंत झाले आहे. कविता एकूणच भावगीताच्या नेहमीच्या आकारमानाने मोठी आहे आणि तेच ध्यानात घेऊन, लताबाईंनी शब्दांना यथोचित न्याय दिला आहे.ओळींमधील शब्दसंख्या फार विषम आहे पण लताबाईंनी आपल्या गायकीने सगळे सामावून घेतले आहे. "सखे सोयरे डोळे पुसतिल" गाताना, स्वर किंचित हळवा आहे पण भावविवश नाही. परिणामी, भावना चिकट होत नाही. असेच आणखी एक उदाहरण बघायचे झाल्यास,"अशा जगास्तव काय कुढावे" ही ओळ मुद्दामून ऐकावी, गायिका प्रतिभाशाली असेल तर काहीशा "रोखठोक" वाटणाऱ्या ओळीतून, आशय किती संयतपणे मांडता येतो, हे ऐकावे आणि जमल्यास अभ्यास करावा. काही वेळा ललित संगीतात, शब्द हे चालींपेक्षा वरचढ असतात परंतु जेंव्हा शब्द आणि स्वर यांचा सुयोग्य मेळ होतो, तिथेच "जन पळभर म्हणतील हाय, हाय" अशा अद्वितीय गाण्याचा जन्म होतो. जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय? सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल तारे अपुला क्रम आचरतील असेच वारे पुढे वाहतील, होईल काय का अंतराय? मेघ वर्षतिल, शेते पिकतिल गर्वाने या नद्या वाहतिल कुणा काळजी की न उमटतिल पुन्हा तटावर हेच पाय? सखे सोयरे डोळे पुसतिल पुन्हा आपुल्या कामीं लागतिल उठतील,बसतील पुन्हा खिदळतिल मी जाता त्यांचे काय जाय? अशा जगास्तव काय कुढावे मोही कुणाच्या का गुंतावे हरिदूतां का विन्मुख व्हावे? का जिरवू नये शांतीत काय? (2) Jan Palbhar Mhanatil Haay Haay - YouTube

No comments:

Post a Comment