Thursday 5 January 2023

चित्रपट गीतांतील रागसंगीत

आजपावेतो चित्रपट युग अवतरून शतकपूर्ती व्हायला आली असूनही तसेच चित्रपट संगीत हे भारतात तरी, जवळपास घराघरात पोहोचले असून देखील, त्या संगीताला मानमरातब मिळत नाही. आजही चित्रपट गीतांकडे काहीशा तुच्छतेने बघितले जाते. विशेषतः कलासंगीताचे रसिक तर चक्क कानाडोळा करण्यात भूषण मानतात. आपल्याकडे कवितासंग्रह छापले जातात पण त्याच बाबतीत चित्रगीतांचा संग्रह काढण्यात उदासिनता दाखवली जाते. इतकेच कशाला, चित्रपटात गाणी लिहिणाऱ्याला "गीतकार" म्हटले जाते आणि कवींच्या समोर खालची पायरी दाखवली जाते. या विषयावर खरं तर गंभीरपणे संशोधन व्हायला हवे. तसे मराठीत थोडेफार प्रयत्न झालेत परंतु त्यामुळे समाजात व्हावी तितकी जागृती झालेली दिसत नाही. खरंतर चित्रपट गीतांमुळे सामान्य रसिकांमध्ये रागसंगीताची रुची निर्माण झालेली आहे पण ही वस्तुस्थिती मान्य होत नाही. असो, या लेखाच्या निमित्ताने या विषयावर थोडाफार प्रकाश टाकता आला तर बघूया. लेखाचा उद्देश तोच राहणार आहे. "शुक्रतारा मंदवारा" हे भावगीत, आज ५० वर्षे उलटून गेली तरी लोकांच्या मनात ठाण मांडून आहे. खळेसाहेबांचे नाव या गीताशी कायमचे जोडले गेले आहे. आता, याच गाण्याचा जरा खोलवर विचार केला तर असे आढळते, या गीताची "सुरावट" ही "यमन" रागावर आधारित आहे!! आणि हे विधान शास्त्रसंमत आहे, उगीच बोलायचे म्हणून बोललेले विधान नव्हे. आता थोडे तांत्रिक प्रकाराने बघूया. "शुक्र ता रा मंद वारा, चांदणे पाण्यातूनी" या ओळीचे स्वरलेखन तपासायचे झाल्यास, "म रे#म म#रे#सा#सा रे#सा#रे#रे#सा" ही सुरावट "शुक्रतारा मंदवारा" या ओळीची आहे आणि ही सुरावट यमन रागाच्या चलनाशी जुळणारी आहे. इथे एक मुद्दा स्पष्ट करायला हवा. ललित संगीत आणि रागसंगीत हे वेगळे संगीत प्रकार आहेत. रागसंगीतात, प्रत्येक सुराला महत्व असते तर ललित संगीतात, शब्दांना प्राधान्य दिले जाते. परिणामी, रागाचे "मूळ" चलन, ललित संगीताशी जुळणारे असेलच, अशी ग्वाही देता येणार नाही परंतु याच यमन रागाचा थोडा बारकाईने अभ्यास केला तर शुक्र तारा मंद वारा या गाण्याची चाल, यमन रागात सापडते. आता अर्थातच सामान्य रसिक हे गाणे ऐकताना, यमन रागाची मनातल्या यानात उजळणी कधीच करत नाही परंतु विचक्षण रसिक मात्र त्या दृष्टीने अभ्यास नक्कीच करतो किंवा त्याने तास अभ्यास करावा. आता याच यमन रागावर आधारित असे एक हिंदी गाणे बघूया. इथे मी मुद्दामून अत्यंत वेगळ्या स्वरूपाचे गाणे घेत आहे. हिंदी चित्रपटातील अजरामर कव्वाली - "निगाहें मिलाने को जी चाहता हैं". ही कव्वाली जरी असली तरी या गाण्याची सुरावट पुन्हा यमन रागाशी जुळणारी आहे. कशी? ते आपण बघूया. या गाण्याच्या सुरवातीचा आलाप ऐकायला घेतल्यास, "गप#ध रे "#ग"नि" अशा सुरांत ऐकायला मिळतो. लगेच कानावर "राज की बात है, मेहफिल में कहिये ना कहे" ही ओळ ऐकायला मिळते. आता याचे स्वरलेखन करायचे झाल्यास, "गप#रे#प#रे# ग सा#ग#सा" या सुरावटीवरून पूढे विस्तारित होते. मी वर स्पष्ट केल्याप्रमाणे, ललित संगीत कधीही रागसंगीताचे सगळे नियम पाळणारे संगीत नव्हे कारण दोन्ही संगीताचे मूलभूत उद्देशच वेगळे आहेत. इथे मी यमन उदाहरणादाखल घेतला परंतु इतर असंख्य राग ललित संगीतात उपयोजिले गेलेआहेत आणि गंमत म्हणजे ऐकताना कुठल्या रागात? हा प्रश्न न पडत, आपण त्या गाण्याचा मन:पूत आस्वाद घेत असतो. अर्थात नकळत आपण रागसंगीताच्या जवळ जात असतो कारण उद्या हेच रागसंगीत ऐकताना, एखादी हरकत ऐकायला मिळाली की लगेच मनात त्या रागाशी समांतर असलेले गाणे उद्भवते आणि तोच राग मनाशी आपले नाते जोडून बसतो. आता आणखी एक अत्यंत प्रसिद्ध उदाहरण बघूया. "ये जिंदगी उसी की हैं" या लताबाईंच्या अत्यंत लोकप्रिय गाण्याबाबत हाच दृष्टिकोन ठेऊन बघूया. "भीमपलास" रागावर आधारित हे गाणे आहे असे तज्ज्ञ मंडळी सांगतात. आता याची सुरावट बघायला गेल्यास, आरोही चलनात "नि सा ग म प नि सा" असे स्वर आहेत आणि जेंव्हा आपण या गाण्याच्या संदर्भात बघताना, मुखड्याची ओळ - ये जिंदगी उसी की है, या ओळीचे स्वर ताडून बघताना - "ध ग म ग रे ग रे सा - रे ग" हे स्वर ऐकायला मिळतात. सहजपणे ध्यानात येईल के इथे *पंचम* स्वराला स्थान नाही पण *धैवत* स्वराला जागा दिली आहे!! तरीही रागाची सावली जरादेखील दूर होत नाही!! एक संगीतकार म्हणून सी.रामचंद्र यांना, या खेळाचे श्रेय द्यायलाच हवे. आता आपणच प्रामाणिकपणे कबूल करायचे झाल्यास, हे गाणे ऐकताना, भीमपलास रागाची जरा देखील आठवण येत नाही आणि तशी आठवण का यावी? गाण्याची चाल इतकी गोड आहे की त्या चालीच्या गोडव्यात ऐकणारा रममाण होतो. हीच गंमत आणि खासियत चित्रपट गीतांची आहे, इथे रागाच्या स्वरांना फारसे महत्व दिले जात नाही . ते केवळ "आधारभूत" म्हणून स्वीकारले जातात आणि संगीतकार, आपल्या चालीतून, त्यासाची पुनर्रचना करीत असतो आणि संगीतकाराची ताकद अशाच प्रयोगातून सिद्ध होते. "शिवरंजनी" राग फार व्यापक प्रमाणात ललित संगीतातून ऐकायला मुकतो आणि आता पण एक अत्यंत लोकप्रिय असे मराठी चित्रपटगीत, "सावळाच रंग तुझा" - या रागाच्या संदर्भात बघूया. या गाण्यात थोडा लपलेला राग शिवरंजनी आहे पण त्या रागाची गडद सावली या गाण्यावर पडलेली आहे, हे निश्चित. "सावळाच रंग तुझा" ही ओळ "पपधसासा/रेग(को)/रेसा" अशी ऐकायला मिळते. आता थोडा बारकाईने विचार केल्यास, पुढील ओळीत "आणि नजरेत तुझ्या* या ओळीत "सारेग(को)पपम(तीव्र)/धप" "तीव्र मध्यम स्वराचा उपयोग केला आहे. तीव्र मध्यम स्वराला शिवरंजनी रागात स्थान नाही पण संगीतकार सुधीर बांध्याचे भावंडे आहे फाडल्यांनी तो स्वर इथे आणून बसवला.आपण ऐकताना, कुठे काही खटकले का? अजिबात नाही. आपण माणिक वर्मांच्या लडिवाळ स्वरांत आपल्याला हरवून बसतो. वास्तविक पाहता, रागसंगीतात स्वर आणि त्यांचे उपयोजन याला कमालीचे महत्व असते. लाली संगीतात, संगीतकाराला त्याबाबत स्वातंत्र्य मिळते कारण एखाद्या नसलेल्या सुराने, त्या शब्दाचे महत्व अधोरेखित होते आणि ती कविता खुलते. असाच प्रकार अत्यंत लोकप्रिय असलेल्या रागाची आठवण झाली - "राग केदार". या रागाची खरी ओळख ही प्रार्थना किंवा भक्तिगीते अशा गाण्यांतून भावच्छटा स्पर्शून देणारा राग. असे असून देखील आपले भारतीय संगीत किती श्रीमंत आहे आणि त्याला एकचएक भावना चिकटवणे, योग्य नाही. एकाच रागात असंख्य विभ्रम ऐकायला मिळू शकतात. किंबहुना हेच अत्यंत महत्वाचे बलस्थान मानावे लागेल. "आप की आँखो में कुछ महके हुए राझ हैं" हे अप्रतिम प्रणयगीत याच केदार रागाच्या काही छटा घेऊन आपल्या समोर अवतरते. उत्तम कविता, संगीतकाराला तितकीच अनवट स्वररचना निर्माण करायला कशी प्रेरीत करते, या विधानाला, हे गीत उदाहरण म्हणून सांगता येईल. राहुल देव बर्मन हे शक्यतो रागाची प्रचलित स्वरचौकट मोडून रचना करणारे संगीतकार म्हणून ख्यातकीर्त आहेत. इथेही आपल्याला हेच ऐकायला मिळते. क्वचित *कोमल निषाद* स्वरांचा उपयोग केला जातो परंतु *दोन्ही मध्यम आणि इतर शुद्ध स्वर* हेच या रागाचे प्रमुख अंग मानले गेले आहे. आता या दृष्टीने स्वररचनेतील मुखडा आपण बघू. *आप /की /आंखो / में /कुछ* *रे ग सा/नि प /सा नि नि/नि /नि* इथे *नि कोमल* आहे. *महके /हुए /से /राज /हैं* *निरे सारे/सा ध /ध नि /(रे ग म ग)/मग रेग सा...* इथे स्वरलिपी लिहिण्यामागे एकच उद्देश आहे, चालीत *कोमल निषाद* कसा चपखलपणे बसवलेला आहे जो खरतर केदार रागाच्या चलनात बसत नाही. ललित संगीताचे खरे सौंदर्य बघायला गेल्यास, रागाचा आधार घ्यायचा परंतु त्याच्या आजूबाजूचे *वर्जित* स्वर देखील त्यात सामील करून घ्यायचे आणि स्वररचनेचे स्फटिकीकरण करून, आपल्या व्यासंगाचा परिचय करून द्यायचा. असाच प्रकार अगदी "अनवट"रागाच्या बाबतीत देखील घडून आलेला दिसतो. वास्तविक "गारा" राग हा काही प्रचलित राग मानला जात नाही पण तरीही उपशास्त्रीय संगीत आणि विशेष करून ललित संगीतात हा राग बराच आवडता असल्याचे दिसून येते. अर्थात "अनवट" म्हणजे काहीसे अप्रचलीत. "तेरे मेरे सपने अब एक रंग है" हे "गाईड" चित्रपटातील अतिशय लोकप्रिय गाणे उदाहरण म्हणून बघूया. गाण्याची चाल ही "राग गारा" या रागावर बांधलेली आहे. "शाड्व/संपूर्ण" अशी स्वरांची बांधणी आहे. दोन्ही "निषाद" स्वरांचा उपयोग केलेला आढळतो. अर्थात शास्त्रकारांनी रागाचा समय हा "उत्तर सांध्यसमय" असा दिलेला आहे. कदाचित हेच या रागाचे वैशिष्ट्य ध्यानात घेऊन, बर्मनदादांनी या रागाच्या सावलीत स्वररचना केली असावी.आता या गाण्याचे "स्वरलेखन" बघूया. "तेरे /मेरे /सपने / अब /एक / रंग /हैं" "नि(को)सा/ सा रे /नि सा नि(को) ध/ध नि(को)/म - रे /ग(को)ग(को)/रे" "हो /जहां/भी ले /जायें /राहें /हम /संग /हैं" "ग(को)सारे गम/ग म/रे ग(को)/सा सा/नि(को)ध/म रे/ग(को) रे/सा" वरील स्वरलेखनातून, मी सुरवातीला "निषाद(को)" या स्वराचे प्राबल्य दर्शवले होते, तेच नेमकेपणाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, कुठल्याही गाण्याचे स्वरलेखन हा फक्त "आराखडा" असतो, त्यात प्राण भरण्याचे काम हे गायक/गायिकेचे असते. ज्यांना संगीताची ही भाषा कळते, तेच राग गारा आणि हे गाणे, यातील "नाते" जाणू शकतील. ललित संगीत हे रागदारी संगीताचे छोटे, अटकर चणीचे भावंडे आहे. ललित संगीतात,वर स्पष्ट केल्याप्रमाणे कवीची कविता मध्यवर्ती केंद्रित असते आणि त्या कवितेला अनुलक्षून संगीतरचना करायची असते. रागसंगीतात शब्दांना महत्व दिलेच पाहिजे, असे बंधन अजिबात नसते. त्यामुळे दोन्ही जरी संगीताचीच अंगे असली तरी भावस्वरूप वेगळे होते आणि उद्दिष्टात फरक पडतो. एक मजेदार निरीक्षण नोंदवतो. आपल्या मराठीतील "भूपाळ्या" बहुतांशी "भूप" रागात आहेत. भूपाळी ही भल्या पहाटे गायची असते, हा मराठी संस्कृतीमधील एक प्रघात आहे आणि जर का शास्त्राचा विचार केल्यास, "भूप" रागाचा समय संध्याकाळचा, शास्त्रकारांनी दिलेला आहे. आता बघा, संध्याकाळचा राग तरी पहाटेची गाणी त्यात चपखलपणे बसली. कुणालाही त्यात कसलेच न्यून आढळले नाही. तेंव्हा थोडक्यात बोलायचे झाल्यास, ललित संगीताने कधीही असा दावा केलेला नाही की ललित संगीत रागसंगीताचा प्रसार करते. ते अशक्यच आहे पण रागसंगीताबद्दल मनात रुची निर्माण करण्यात ललित संगीत नेहमी हातभार लावते, हे निश्चित आणि याच दृष्टिकोनातून ललित संगीताचा गंभीरपणे अभ्यास व्हावा हीच इअछा व्यक्त करून मी इथे थांबतो.

1 comment:

  1. आपले सर्व लेख खूप छान आहेत व असतात.
    धन्यवाद🌹 शुभेच्छा

    ReplyDelete