Saturday, 28 January 2023
साऊथ आफ्रिका - खाद्यसंस्कृती
१९९४ साली मी प्रथम साऊथ आफ्रिकेत पाऊल टाकले तेंव्हा इथे १६ वर्षे काढीन अशी सुतराम कल्पना नव्हती. साधारणपणे ४,५ वर्षे काढून पुन्हा भारतात परतायचे. इतपत अपेक्षा होती. परंतु डर्बन विमानतळाचे पहिलेच दर्शन (त्यावेळी भारतातून थेट डर्बन अशी विमान सेवा होती, पुढे जोहान्सबर्गला सेवा सुरु झाली) आश्चर्यचकित करणारे होते आणि ते चित्र बऱ्याचपैकी तसेच शेवटपर्यंत राहिले. पीटरमेरित्झबर्ग इथे सुरवातीला भारतीय वंशाच्या लोकांशी ओळखी झाल्या. अर्थात ऑफिसमध्ये देखील बव्हंशी भारतीय वंशाचेच लोक नोकरीसाठी होते. सुरवातीला अर्थातच भारतातून आलेल्या लोंकांशी ओळख होणे, वाढणे क्रमप्राप्तच होते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी फारशा बदलण्याची संधी नव्हती परंतु पुढे भारतीय वंशातील लोकांशी मैत्री झाली आणि त्यांच्या घरी जाण्याचे प्रसंग आले. वास्तविक, माझा देह तोपर्यंत भारतीय मसाल्यांवर पोसलेला होता आणि तिथल्या प्रत्येक पदार्थाची चव घेताना, भारतीय पदार्थाची चव कशी आहे, अशा तुलनेतच खाऊन बघितली.
अधून मधून बाहेर हॉटेलमध्ये जात असे आणि मुद्दामून गोऱ्या लोकांच्या हॉटेलमध्ये जात असे. तिथले फिश किंवा चिकन, सुरवातीला खाताना चवीचा प्रश्न यायचा परंतु अशा हॉटेलमध्ये जाताना, ऑफिसमधील मित्र सोबत असायचे आणि त्यामुळे त्यांच्यासमोर चवीबद्दल कसे बोलायचे? हा संकोच असायचा. गोऱ्या लोकांच्या हॉटेलात चिकन सारखे पदार्थ, बव्हंशी मीठ आणि काळी मिरपूड, इतपतच मसाले लावलेले असायचे. अर्थात प्रथम, प्रथम खाताना, ते चिकन पचवणे काहीसे जड गेले. मनात सारखा हाच विचार यायचा, मी यांच्या देशात आलो आहे, तेंव्हा यांच्या अन्नावर टीका कशी करायची? हाच प्रकार मासे खाण्याबाबत व्हायचा.
पुढे जसे भारतीय वंशाच्या लोकांच्या घरी जायचे प्रसंग आले तेंव्हा काहीशी मिळतीजुळती चव चाखयला मिळाली. तरीही मालवणी, कोकणी चवीचा प्रश्नच नव्हता. शाकाहारी पदार्थ याच चालीवर बनवलेले असायचे. चिकन उकळत्या पाण्यातून काढायचे, त्याला मीठ, मिरपूड लावायची आणि "चिकन करी" बनवताना, थोडे तिखट, हा;हळद आणि त्यांचा म्हणून खास बनवलेला मसाला घालून ते चिकन, तेलावर (तेल देखील अत्यंत माफक) शिजवायचे. मालवणी चवीला सोकावलेल्या अनिलला, हे चिकन बेचव वाटले तर काय नवल.
पुढे मीच स्वतंत्र राहायला लागलो आणि बाजारातून आपले भारतीय मसाले आणले (प्रत्येक शहरात आता इंडियन स्टोअर असते आणि तिथे अप्रतिम भारतीय मसाले, डाळी, तांदूळ,पोळ्यांचे पीठ आणि जवळपास सगळेच भारतीय पदार्थ मिळतात). आपली चव डोळ्यासमोर ठेऊन चिकन बनवले आणि तेंव्हा ३,४ वर्षे तृषावलेला जीव शांत झाला. एव्हाना, मला लोकल पदार्थांची सवय झाली होती. पुढे Standerton सारख्या गावात नोकरी करताना, माझ्या हाताखाली, बरेच गोरे कामाला होते तसेच आमच्या बृवरीचा जनरल मॅनेजर - डेव्हिस, गोरा होता, त्याच्याशी माझी नाळ जुळली. दुपारच्या जेवणाला आम्ही एकत्र जेवायला बसत होतो. अधून मधून तो मला एखादा पदार्थ देत असे. मी केलेली उसळ देखील त्याला पहिल्या घासात अवघड झाली, इतकी की पाणी पिताना सुद्धा त्याला ठसका लागला होता. आपला "गरम मसाला" त्याच्या घशाखाली काही उतरला नाही. त्यामुळे मीच त्याने दिलेले पदार्थ खात होतो. तोपर्यंत साऊथ आफ्रिकेत ९,१० वर्षे झाली होती तरीही मी पूर्णपणे "साऊथ आफ्रिकन" होऊ शकलो नाही आणि याचे मुख्य कारण, माझी दरवर्षी भारतात यायची सवय!! १६ वर्षे साऊथ आफ्रिकेत होतो परंतु प्रत्येक वर्षी मुंबईला यायचा परिपाठ मी ठेवला होता. यात आर्थिक प्रश्न होते परंतु घरच्यांची भेट त्यापेक्षा महत्वाची असायची.
डेव्हिस कडे मात्र मला गोऱ्या लोकांची खाद्यसंस्कृती व्यवस्थित समजली. पुढे त्याच्या घरी ख्रिसमस साठी गेलो असताना, त्याच्याकडे नकळत का होईना पण "बीफ" खाल्ले, इथेच त्याचवेळेस "टर्की"चा आस्वाद घेतला. इथे "तिखट" खायचे म्हणजे "पेरीपेरी" मसाला वापरायचा. अर्थात आपल्या भारताच्या तुलनेत हे तिखट अत्यंत मचूळ म्हणायला हवे. एक गंमत, मी जेंव्हा Standerton इथे नोकरीसाठी आलो तेंव्हा सुरवातीला कंपनीने मला एका गोऱ्या मुलीच्या खाणावळीत राहायची आणि जेवायची सोय केली होती. मीजवळपास ३ आठवडे तिथे राहिलो आणि अर्थातच तिच्याशी माझी चांगली ओळख झाली. तेंव्हा ती एका गोऱ्या पुरुषासोबत Live I Relation मध्ये रहात होती. पुढे मी घर घेतले आणि ती जागा सोडून दिली. आता इतकी चांगली ओळख आहे म्हणून एका रविवारी सकाळी, त्या दोघांना मी घरी जेवायला बोलावले. दोघेही गोरे म्हणून, मी बिर्याणी करताना, मसाला जरा जपूनच वापरला होता. त्यातून रविवार दुपारचे जेवण म्हणून घरात जास्तीच्या बियर बाटल्या आणून ठेवल्या होत्या. अर्थात जर का बिर्याणी झेपली नाही तर मासे तळायचे बाजूला ठेवले होते.
दोघेही घरी आले आणि मी बियर कॅन्स उघडले आणि चियर्स सुरु झाले. थोड्या वेळाने टेबलावर बिर्याणी आणून ठेवली आणि पहिल्याच घासाला, त्या मुलीचा जीव टांगणीला लागला!! डोळ्यांत पाणी आले. लगेच मी फिश तळायला घेतले आणि तिचे जीव भांड्यात पडला!! तेंव्हा पासून मी कानाला खडा लावला, घरी कुणाही गोऱ्या व्यक्तीला किंवा पुढे काळ्या लोकांशी ओळख झाली, तेंव्हा त्यांना देखील घरी बोलावले नाही. भेट बाहेर, एकतर त्यांच्या घरी किंवा हॉटेलमध्ये.
एकदा काळ्या मित्राच्या घरी जायचा प्रसंग आला. आमंत्रण नाकारणे अशक्य होते. साऊथ आफ्रिकेत, घरी आल्यावर चहा, कॉफी विचारण्याऐवजी ड्रिंक्स विचारले जाते, विशेषतः शनिवार किंवा रविवार असेल तर अधिकच आग्रह केला जातो. म्हटले तर तिथे चिकन केले होते पण त्यांचे मसाले इतके "उग्र" असतात की ताटात घ्यायच्या आधीच वासाने नाक दरवळून गेले!! केवळ मित्राचा मान राखायचा म्हणून मी ते चिकन थोडेसे खाल्ले पण त्यांनी कुठला मसाला वापरला, हे विचारायचे धाडस मात्र झाले नाही. पुन्हा म्हणून काळ्या मित्रांच्या घरी जायचा प्रसंग आला नाही, मी आणू दिला नाही.
आता या देशाची खाद्यसंस्कृती काय? असा जर प्रश्न उभा राहिला तर बहुतांशी अमेरिकन हॉटेलकडे बोट दाखवायला लागेल. शनिवार सकाळ, शनिवार तर, रविवार सकाळ, या वेळा बव्हंशी साऊथ आफ्रिकेने अशा हॉटेल्ससाठी राखून ठेवलेल्या असतात!! केवळ मॉलमधील हॉटेल्स नसून बाहेरील हॉटेल्स तुडुंब भरलेली असतात. ड्रिंक्स हा टेबल मॅनर्स म्हणून गणला जातो आणि मग त्यासोबत, फ्रेंच फ्राइज!! पुढे मग मेन कोर्स. हे सगळे करण्यात एकत्र दुपार होते किंवा रात्र पसरते. बीफ तर घासाघासाला लागते. बदल म्हणून कधी तरी पोर्क, हॅम्स किंवा फिश. गोरे काय किंवा काळे काय, यांच्या घरातील स्वयंपाक घरे चकाचक असतात, कारण घरी फारसे काही करायचे नसते. यांचे दुपारचे जेवण म्हणजे सॅन्डविच आणि ते देखील "कोल्ड मीट" आणि मेयोनीज बरोबर. इथले लोकं मेयोनीज प्रचंड प्रमाणात खातात. मग ते सॅन्डविचमध्ये असते किंवा सॅलडमध्ये असते. कधी कधी तर दोन पावाच्या मध्ये फक्त मेयोनीज घालून खातात.
यांच्या आयुष्यातून पाव वगळला, तर हे लोकं कसे जगातील? हा प्रश्नच आहे, इतका पाव हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. अर्थात इथे असंख्य प्रकारचे पाव मिळतात. पाव आणि पेस्ट्रीज, याच्यावर हा देश अवलंबून आहे. पुढे मी देखील पावाला चटावलो होतो. विशेषतः गार्लिक बटर सह पावाचा रोल खाणे, हा आनंद असायचा. मॉलमधील "पिक एन पे" सारख्या अवाढव्य दुकानात गेलो की कुठला पाव घ्यायचा? या प्रश्नावर मती गुंग व्हायची. मग, मागील आठवड्यात कुठला घेतला होता, हे आठवून मग यावेळच्या पावाची निवड व्हायची.
साऊथ आफ्रिकेत मी १६ वर्षे काढली खरी पण तिथल्या खाद्यसंस्कृतीपेक्षा मला तिथली मद्यसंस्कृती अधिक भावली!! विशेषतः "कॉकटेल्स" तर इतक्या विविध प्रकारची मिळतात की मन दि:ढमूढ व्हायचे!! केवळ कॉकटेल्स नव्हे तर निरनिराळ्या चवीच्या बियर्स तिथे मिळायच्या. आज भारतायेईन, १२ वर्षे व्हायला आली आणि ही संस्कृती मात्र मी फार "मिस" करतो.
Tuesday, 24 January 2023
डायलिसिस - एक अनुभव
आज नेहमीप्रमाणे बॉंबे हॉस्पिटलमध्ये पहाटे ५.३० वाजता डायलिसिस करायला गेलो. गेले काही महिने मी पहाटेच जातो.त्यात मोठा फायदा, दोन्ही वेळेस घरचे जेवण मिळायला लागले. दुसरा फायदा, सगळं दिवस तुम्ही सजगपणे घालवू शकता. तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे, डायलिसिसची सायकल (४ तासाची सायकल असते) संपली की तुम्हाला मशीनपासून वेगे केले जाते आणि हाताच्या शिरांवर घुसलेल्या (अर्थ शब्दाश: घ्यावा) सुया बाहेर काढून तिथे गॉज कॉटनचे बँडेज बांधले जाते. हे बँडेज अंगावर कमीतकमी ४ तास बाळगावे लागते. पूर्वी सुरवातीला मी दुपारच्या ३ वाजताच्या बॅचमध्ये जात होतो. आता दुपारी ३ वाजता सुरु होणार म्हणजे संपायला संध्याकाळचे ७ व्हायचे. त्यापुढे हातावर भलेमोठे बँडेज बाळगायचे!! परिणामी रात्रीची झोप कमी झाली आणि मानसिक त्रास व्हायचा तो वेगळाच. आता मी या सगळ्या उपचारांना सरावलो आहे.
मला सुरवातीचे दिवस आठवले कारण आज माझ्या हातात रक्ताची मोठी गुठळी झाली. डायलिसिस चालू असताना, असे काही होणे, भयंकर त्रासदायक असते. वास्तविक वेदना होत नाहीत पण हातातून रक्ताची धार लागली आहे, हे दृश्य काही सुखावह नव्हतेच. मी झोपलेला बेड रक्ताने भिजायला लागला आणि मी परिचारिकेला हाक मारली आणि रक्त गालात असल्याचे दाखवले. तिने लगोलग डॉक्टरला बोलावले आणि ४,५ मिनिटे मशीन बंद करून, तो क्लॉट काढून जागा स्वच्छ केली आणि पुनश्च डायलिसिस सुरु झाले. वास्तविक डायलिसिस उपचार घेणाऱ्या रुग्णाला अनुभवाला अधूनमधून सामोरे जावे लागत असते. फक माझी मानसिक तयारी नव्हती.
आज घरी आलो आणि गेले ९ महिने डोळ्यांसमोर आले. १ मे २०२२ रोजी माझी डायलिसिस ट्रीटमेंट सुरु झाली. सुरवातीला माझा समाज असा होता, फार तर ५,६ सायकल्स संपल्या की मी पूर्ववत आयुष्य जगायला सुरु करिन पण प्रत्यक्षात, आत आयुष्यभर करायला लागणार, ही वस्तुस्थिती लवकरच ध्यानात आली. म्हटले तर हा मानसिक धक्काच होता पण मीच मला समजावले. सुरवातीला माझे शरीर तितकेसे तयार नव्हते, हे आता लक्षात आले कारण सुरवातीच्या २,३ सायकल्स पूर्ण करून घरी आलॊ आणि जेवणानंतर थाळी धुवायला खुर्चीवरून उठलो आणि माझा तोल जाऊन, मी जमिनीवर बसकण मारली. हा अनुभव मलाच अवाक करणारा होता, हे असे होईल, अशी पहिल्या अनुभवापर्यंत तरी कल्पना केली नव्हती. पुढील २ महिन्यानंतरच्या सायकलच्या वेळी तर, मी पहाटेच्या बॅचला जायला लागलो. अशाच एका प्रसंगी, जेवण झाले आणि पुन्हा खुर्चीत बसायला पाऊल टाकले आणि माझा तोल गेला!!
नशिबाने घरात त्यावेळी धुणी,भांडी करणारा गडी काम करीत होता आणि त्याला मोठा आवाज ऐकायला मिळाला. त्याने, मी जमिनीवर पडल्याचे बघताच, मला आधार देऊन, पलंगावर झोपवले आणि अंगावर चादर टाकली. मी लगोलग झोपेच्या आधीन झालो. असे अनुभव फार नाही पण ४ वेळा आले पण पुढे मलाच कळले, अशा वेळेस स्वतःला कसे सावरून घ्यायचे. यात एक गोम अशी आहे, डायलिसिस पूर्ण होते तेंव्हा तुमचे कमीतकमी १.५० ते २ किलो वजन कमी होते आणि हे शरीराला झेपणे अवघड जाते. पुढे मनाची सवय करून घेतली. आज तर मी डायलिसिस करून आलो आहे आणि हा लेख लिहायला बसलो आहे!! गेल्या १० महिन्यात माझे ७४ किलो वजन, आज ६२ किलो इतके उतरले आहे. याचा परिणाम शरीरावर होणारच होता, फक्त मी अनभिज्ञ होतो, इतकेच.
आता हा सगळं खेळ माझ्या आकलनात आला आहे आणि आता यातून सुटका सहजासहजी होणार नाही, हे समजले आहे. एक तर डायलिसिस हा उपचार नसून,बिघडलेल्या किडनी फंक्शन्स सुरळीत केली जातात. किडनी बिघडली म्हणजे एकाच उपाय हाती असतो, शरीरात नवीन किडनी बसवणे. अर्थात खर्चाचा भाग बाजूला ठेवला तरी शरीरात नवीन किडनी बसवणे आणि आपल्या शरीराने मेनी करणे, ही प्रक्रिया अतोनात किचकट आहे आणि यश मिळेलच याचीखात्री कुणीही देत नाही, कारण आपल्या शरीरातील चलनवलन अचूकपणे आजही शास्त्राला यश मिळालेले नाही.
आज बॉंबे हॉस्पिटलमध्ये १३ आणि १४वा मजला फक्त डायलिसिस साठी राखून ठेवलेला आहे. थोडक्यात सकाळी ७ वाजता पहिली बॅच सुरु होते, पुढील बॅच ११ वाजताची आणि शेवटची बॅच दुपारी ३ वाजता असते आणि कुठल्याही बॅचमध्ये एखादा पलंग रिकामा आहे, असे अजिबात घडत नाही!! त्यामुळे समजा तुम्ही, तुमची वेळ चुकवली तर हॉस्पिटल घरी फोन करतात आणि का आला नाहीत, याची चौकशी करतात आणि त्या रुग्णाला दुसऱ्या वेळी सामावून घेणे फार जिकिरीचे असते, एकदा मला हा अनुभव आला होता.
खरंतर इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एक बाब ठामपणे माहीत असते आणि ती म्हणजे हळूहळू आपण मृत्यूच्या दरवाजात जात आहोत!! हे लिहू/बोलू नये पण हे परखड वास्तव आहे. मला इथे २,३ रुग्ण भेटले होते आणि त्यांनी माझ्याशी बोलून दाखवले होते. इथे सगळे मनातल्या मनात झुरत असतात. अगदी मी देखील, जरी मी वरकरणी दाखवत नसलो तरी. जसे वय वाढत जाते, तशी डायलिसिसची उपयुक्तता कमी होते आणि अटळ परिणामांना सामोरे जावेच लागते. दुसरा तरुणोपाय नसतो. इथे काही रुग्णांच्या समवेत त्यांचे नातेवाईक येतात आणि त्यांचे चेहरे निरखणे, हा आणखी भोग असतो. वरकरणी सगळे हसत असतात आणि चेंडूला पाण्यात दाबून ठेवण्यासारखा असफल खेळ असतो. कुणीही काहीही बोलत नसते कारण प्रत्येकाला याचा शेवटकाय आहे, याची पूर्ण कल्पना असते.
इथेच मला काही रुग्ण गेली १८ वर्षे डायलिसिस घेत असल्याचे समजले. ऐकले आणि मी थक्क झालो. त्याचे वय माझ्याच आसपास आहे म्हणजे अर्धे आयुष्य हॉस्पिटलच्या बेडवर गेले. कुठली दुर्दम्य इच्छाशक्ती, त्यांनी आजमितीस धरून ठेवली आहे? प्रश्नच आहे. दुसरा मुद्दा म्हणजे येणाऱ्या रुग्णात बव्हंशी स्त्रिया आहेत!! खरंतर आपली किडनी कशी बिघडते, हा संशोधनाचाच विषय आहे. त्यामानाने मी सुदैवी नव्हे का? आयुष्याचे जरी सगळे उपभोग भोगले नसले तरी आयुष्याकडे त्रयस्थपणे बघण्याची संधी मला मिळाली. माझे डायलिसिस मागील वर्षी सुरु झाले म्हणजे साठी होऊन गेल्यावर. तोपर्यंतचे आयुष्य मला उपभोगायला मिळाले, हा नियतीने दिलेला प्रसाद म्हणायचं का?
डायलिसिस अटळ आहे, हे ठरल्यावर मी माझा दिनक्रम बदलला.त्यातून मला पहाटेची बॅच मिळाल्यावर, आपला दिवसाचा कार्यक्रम कसा आखायचा? हे ठरवून टाकले. अर्थात बाहेर पडायची सोय नाही. त्यामुळे घरातल्याघरात काय करता येईल, याचा विचार केला. मध्यंतरी वाचन फारच कमी झाले होते, विशेषतः कविता वाचन पूर्णपणे थंडावले होते. त्या पुस्तकांकडे नजर वळवली. शरीरात फारशी ताकद नाही त्यामुळे कवितासंग्रह हातात घेऊन वाचणे, सहज शक्य होते. ४ तास डायलिसिस म्हटल्यावर एक ठरवून टाकले. घरून निघताना, मोबाईल पूर्ण चार्ज करून घ्यायचा. एकदा ती उपाचार पद्धती सुरु झाली की तुम्ही पलंगाला जखडलेले असतात. जरा हालचाल करायला वाव नसतो. मग, मी मोबाईलवर गाणी लावायला सुरवात केली. सुदैवाने माझ्या फोनमध्ये, सर्व प्रकारचे संगीत आहे, अगदी पाश्चात्य कलाकार देखील!! परिणामी, सलग ४ तास संगीत ऐकायला सुरवात झाली आणि वेळ कधी संपायला लागला, हेच फारसे लक्षात येत नाही. किंबहुना, लताबाई, आशाबाई किंवा व्हिटने ह्यूस्टन तसेच सेलीन डियॉन, यांची गायकी मला अधिक चांगली समजायला लागली. आजूबाजूचे रुग्ण देखील खुश!! हॉस्पिटलमध्ये बहुदा गाणी लावणारा, मीच एकमेव रुग्ण असावा. अर्थात आवाजाची मर्यादा पाळणे गरजेचे असते. सगळेच रुग्ण काही तुमच्या प्रकृतीसारखे नसतात. अर्थात सगळेच काही व्यवस्थित झाले नाही. मध्यंतरी डायलिसिस चालू असताना, अचानक दोन्ही तळपायातून पेटगे यायला लागले. अनिल अत्यवस्थ!! कला तर अशा जोरदार यायच्या की डोळ्यांतून पाणी यायचे. साठी पार केली म्हणजे काही फार मोठे दिवे लावले नाहीत, हे दाखवून देणारे हे क्षण.
परिचारिकेला बोलावण्याइतकी ताकद नसायची. मग उजव्या हाताच्या बोटांच्या खुणा सुरु केल्या आणि त्यांना कसेबसे सांगितले. लगेच डॉक्टरला बोलावले आणि डायलिसिस चक्क थांबवले!! संपूर्ण विभाग एयर कंडिशन्ड होता तरी अंगातील टी शर्ट घामाने ओला झाला. शेवटी नेफ्रोलॉजिस्टची भेट घेतली आणि काही दिवस इंजेक्शन घ्यायला लागले. मनावर फारच दडपण यायला लागले होते. चार लोकांच्या समोर आपले दुखणे उघडे पडणे, यासारखी शरमेची गोष्ट नाही. एकदा तर युरीनची कळ लागली, बरे पलंगावरून उठणे अशक्य!! मग तिथल्या मामाला बोलावणे पाठवले आणि त्याने प्लास्टिकचे भांडे आणले आणि कळ कमी केली. तेंव्हा पासून एक काळजी घ्यायला लागलो, पहाटे घरातून बाहेर पडण्याआधी, सकाळचे सगळे विधी व्यवस्थित पार केल्यानंतरच घर सोडायचे. डायलिसिस करताना, रुग्णांना नाश्ता मिळतो (दुपारच्या रुग्णांना जेवण मिळते) परंतु नाश्ता झाल्यावर पाणी मिळत नाही. याची सवय करून घ्यायला थोडा त्रास पडतो कारण, डायलिसिस करताना, रक्त आणि पाणी वेगळे केले जाते आणि तसे चालू असताना, शरीरात पाणी भरणे, चुकीचे!!
मध्यंतरी माझ्या छातीत दुखायला लागले, इतके की रात्री झोप यायची बंद झाली. जरा पलंगावर आडवे झाली छातीत कळा सुरु, पहाटे कधीतरी ग्लानी यायची आणि आपसूक डोळे मिटायचे. याचा, ज्या दिवशी डायलिसिस असेल तेंव्हा फारच त्रास व्हायला लागले. शेवटी डॉक्टर गाठला. सगळ्या प्रकारच्या चाचण्या केल्या आणि छातीत २ ब्लॉक आहेत, हे निदान झाले. अँजिओप्लास्टी हाच उपाय असल्याचे निदान झाले. अर्थात पुण्याहून आदित्यआणि नेहा, तडक घरी आले. वास्तविक अँजिओप्लास्टी फार वेदनादायक नसते (या शरीराने आतापर्यंत इतक्या वेदना सहन केल्या आहेत की आता साधे इंजेक्शन घ्यायचे तर काहीच वाटत नाही) पण २ दिवस "आयसीयू" मध्ये राहावे लागते. आता आयसीयू म्हणजे बाहेरच्या जगाशी संपर्क शून्य!! तरीही ते सगळे पचवले.
वास्तविक मला उपचार सुरु करून फक्त ९(च) महिने झालेत, अजून बराच पल्ला गाठायचा आहे, इच्छा आज नेहमीप्रमाणे बॉंबे हॉस्पिटलमध्ये पहाटे ५.३० वाजता डायलिसिस करायला गेलो. गेले काही महिने मी पहाटेच जातो.त्यात मोठा फायदा, दोन्ही वेळेस घरचे जेवण मिळायला लागले. दुसरा फायदा, सगळं दिवस तुम्ही सजगपणे घालवू शकता. तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे, डायलिसिसची सायकल (४ तासाची सायकल असते) संपली की तुम्हाला मशीनपासून वेगे केले जाते आणि हाताच्या शिरांवर घुसलेल्या (अर्थ शब्दाश: घ्यावा) सुया बाहेर काढून तिथे गॉज कॉटनचे बँडेज बांधले जाते. हे बँडेज अंगावर कमीतकमी ४ तास बाळगावे लागते. पूर्वी सुरवातीला मी दुपारच्या ३ वाजताच्या बॅचमध्ये जात होतो. आता दुपारी ३ वाजता सुरु होणार म्हणजे संपायला संध्याकाळचे ७ व्हायचे. त्यापुढे हातावर भलेमोठे बँडेज बाळगायचे!! परिणामी रात्रीची झोप कमी झाली आणि मानसिक त्रास व्हायचा तो वेगळाच. आता मी या सगळ्या उपचारांना सरावलो आहे.
मला सुरवातीचे दिवस आठवले कारण आज माझ्या हातात रक्ताची मोठी गुठळी झाली. डायलिसिस चालू असताना, असे काही होणे, भयंकर त्रासदायक असते. वास्तविक वेदना होत नाहीत पण हातातून रक्ताची धार लागली आहे, हे दृश्य काही सुखावह नव्हतेच. मी झोपलेला बेड रक्ताने भिजायला लागला आणि मी परिचारिकेला हाक मारली आणि रक्त गालात असल्याचे दाखवले. तिने लगोलग डॉक्टरला बोलावले आणि ४,५ मिनिटे मशीन बंद करून, तो क्लॉट काढून जागा स्वच्छ केली आणि पुनश्च डायलिसिस सुरु झाले. वास्तविक डायलिसिस उपचार घेणाऱ्या रुग्णाला अनुभवाला अधूनमधून सामोरे जावे लागत असते. फक माझी मानसिक तयारी नव्हती.
आज घरी आलो आणि गेले ९ महिने डोळ्यांसमोर आले. १ मे २०२२ रोजी माझी डायलिसिस ट्रीटमेंट सुरु झाली. सुरवातीला माझा समाज असा होता, फार तर ५,६ सायकल्स संपल्या की मी पूर्ववत आयुष्य जगायला सुरु करिन पण प्रत्यक्षात, आत आयुष्यभर करायला लागणार, ही वस्तुस्थिती लवकरच ध्यानात आली. म्हटले तर हा मानसिक धक्काच होता पण मीच मला समजावले. सुरवातीला माझे शरीर तितकेसे तयार नव्हते, हे आता लक्षात आले कारण सुरवातीच्या २,३ सायकल्स पूर्ण करून घरी आलॊ आणि जेवणानंतर थाळी धुवायला खुर्चीवरून उठलो आणि माझा तोल जाऊन, मी जमिनीवर बसकण मारली. हा अनुभव मलाच अवाक करणारा होता, हे असे होईल, अशी पहिल्या अनुभवापर्यंत तरी कल्पना केली नव्हती. पुढील २ महिन्यानंतरच्या सायकलच्या वेळी तर, मी पहाटेच्या बॅचला जायला लागलो. अशाच एका प्रसंगी, जेवण झाले आणि पुन्हा खुर्चीत बसायला पाऊल टाकले आणि माझा तोल गेला!!
नशिबाने घरात त्यावेळी धुणी,भांडी करणारा गडी काम करीत होता आणि त्याला मोठा आवाज ऐकायला मिळाला. त्याने, मी जमिनीवर पडल्याचे बघताच, मला आधार देऊन, पलंगावर झोपवले आणि अंगावर चादर टाकली. मी लगोलग झोपेच्या आधीन झालो. असे अनुभव फार नाही पण ४ वेळा आले पण पुढे मलाच कळले, अशा वेळेस स्वतःला कसे सावरून घ्यायचे. यात एक गोम अशी आहे, डायलिसिस पूर्ण होते तेंव्हा तुमचे कमीतकमी १.५० ते २ किलो वजन कमी होते आणि हे शरीराला झेपणे अवघड जाते. पुढे मनाची सवय करून घेतली. आज तर मी डायलिसिस करून आलो आहे आणि हा लेख लिहायला बसलो आहे!! गेल्या १० महिन्यात माझे ७४ किलो वजन, आज ६२ किलो इतके उतरले आहे. याचा परिणाम शरीरावर होणारच होता, फक्त मी अनभिज्ञ होतो, इतकेच.
आता हा सगळं खेळ माझ्या आकलनात आला आहे आणि आता यातून सुटका सहजासहजी होणार नाही, हे समजले आहे. एक तर डायलिसिस हा उपचार नसून,बिघडलेल्या किडनी फंक्शन्स सुरळीत केली जातात. किडनी बिघडली म्हणजे एकाच उपाय हाती असतो, शरीरात नवीन किडनी बसवणे. अर्थात खर्चाचा भाग बाजूला ठेवला तरी शरीरात नवीन किडनी बसवणे आणि आपल्या शरीराने मेनी करणे, ही प्रक्रिया अतोनात किचकट आहे आणि यश मिळेलच याचीखात्री कुणीही देत नाही, कारण आपल्या शरीरातील चलनवलन अचूकपणे आजही शास्त्राला यश मिळालेले नाही.
आज बॉंबे हॉस्पिटलमध्ये १३ आणि १४वा मजला फक्त डायलिसिस साठी राखून ठेवलेला आहे. थोडक्यात सकाळी ७ वाजता पहिली बॅच सुरु होते, पुढील बॅच ११ वाजताची आणि शेवटची बॅच दुपारी ३ वाजता असते आणि कुठल्याही बॅचमध्ये एखादा पलंग रिकामा आहे, असे अजिबात घडत नाही!! त्यामुळे समजा तुम्ही, तुमची वेळ चुकवली तर हॉस्पिटल घरी फोन करतात आणि का आला नाहीत, याची चौकशी करतात आणि त्या रुग्णाला दुसऱ्या वेळी सामावून घेणे फार जिकिरीचे असते, एकदा मला हा अनुभव आला होता.
खरंतर इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एक बाब ठामपणे माहीत असते आणि ती म्हणजे हळूहळू आपण मृत्यूच्या दरवाजात जात आहोत!! हे लिहू/बोलू नये पण हे परखड वास्तव आहे. मला इथे २,३ रुग्ण भेटले होते आणि त्यांनी माझ्याशी बोलून दाखवले होते. इथे सगळे मनातल्या मनात झुरत असतात. अगदी मी देखील, जरी मी वरकरणी दाखवत नसलो तरी. जसे वय वाढत जाते, तशी डायलिसिसची उपयुक्तता कमी होते आणि अटळ परिणामांना सामोरे जावेच लागते. दुसरा तरुणोपाय नसतो. इथे काही रुग्णांच्या समवेत त्यांचे नातेवाईक येतात आणि त्यांचे चेहरे निरखणे, हा आणखी भोग असतो. वरकरणी सगळे हसत असतात आणि चेंडूला पाण्यात दाबून ठेवण्यासारखा असफल खेळ असतो. कुणीही काहीही बोलत नसते कारण प्रत्येकाला याचा शेवटकाय आहे, याची पूर्ण कल्पना असते.
इथेच मला काही रुग्ण गेली १८ वर्षे डायलिसिस घेत असल्याचे समजले. ऐकले आणि मी थक्क झालो. त्याचे वय माझ्याच आसपास आहे म्हणजे अर्धे आयुष्य हॉस्पिटलच्या बेडवर गेले. कुठली दुर्दम्य इच्छाशक्ती, त्यांनी आजमितीस धरून ठेवली आहे? प्रश्नच आहे. दुसरा मुद्दा म्हणजे येणाऱ्या रुग्णात बव्हंशी स्त्रिया आहेत!! खरंतर आपली किडनी कशी बिघडते, हा संशोधनाचाच विषय आहे. त्यामानाने मी सुदैवी नव्हे का? आयुष्याचे जरी सगळे उपभोग भोगले नसले तरी आयुष्याकडे त्रयस्थपणे बघण्याची संधी मला मिळाली. माझे डायलिसिस मागील वर्षी सुरु झाले म्हणजे साठी होऊन गेल्यावर. तोपर्यंतचे आयुष्य मला उपभोगायला मिळाले, हा नियतीने दिलेला प्रसाद म्हणायचं का?
डायलिसिस अटळ आहे, हे ठरल्यावर मी माझा दिनक्रम बदलला.त्यातून मला पहाटेची बॅच मिळाल्यावर, आपला दिवसाचा कार्यक्रम कसा आखायचा? हे ठरवून टाकले. अर्थात बाहेर पडायची सोय नाही. त्यामुळे घरातल्याघरात काय करता येईल, याचा विचार केला. मध्यंतरी वाचन फारच कमी झाले होते, विशेषतः कविता वाचन पूर्णपणे थंडावले होते. त्या पुस्तकांकडे नजर वळवली. शरीरात फारशी ताकद नाही त्यामुळे कवितासंग्रह हातात घेऊन वाचणे, सहज शक्य होते. ४ तास डायलिसिस म्हटल्यावर एक ठरवून टाकले. घरून निघताना, मोबाईल पूर्ण चार्ज करून घ्यायचा. एकदा ती उपाचार पद्धती सुरु झाली की तुम्ही पलंगाला जखडलेले असतात. जरा हालचाल करायला वाव नसतो. मग, मी मोबाईलवर गाणी लावायला सुरवात केली. सुदैवाने माझ्या फोनमध्ये, सर्व प्रकारचे संगीत आहे, अगदी पाश्चात्य कलाकार देखील!! परिणामी, सलग ४ तास संगीत ऐकायला सुरवात झाली आणि वेळ कधी संपायला लागला, हेच फारसे लक्षात येत नाही. किंबहुना, लताबाई, आशाबाई किंवा व्हिटने ह्यूस्टन तसेच सेलीन डियॉन, यांची गायकी मला अधिक चांगली समजायला लागली. आजूबाजूचे रुग्ण देखील खुश!! हॉस्पिटलमध्ये बहुदा गाणी लावणारा, मीच एकमेव रुग्ण असावा. अर्थात आवाजाची मर्यादा पाळणे गरजेचे असते. सगळेच रुग्ण काही तुमच्या प्रकृतीसारखे नसतात. अर्थात सगळेच काही व्यवस्थित झाले नाही. मध्यंतरी डायलिसिस चालू असताना, अचानक दोन्ही तळपायातून पेटगे यायला लागले. अनिल अत्यवस्थ!! कला तर अशा जोरदार यायच्या की डोळ्यांतून पाणी यायचे. साठी पार केली म्हणजे काही फार मोठे दिवे लावले नाहीत, हे दाखवून देणारे हे क्षण.
परिचारिकेला बोलावण्याइतकी ताकद नसायची. मग उजव्या हाताच्या बोटांच्या खुणा सुरु केल्या आणि त्यांना कसेबसे सांगितले. लगेच डॉक्टरला बोलावले आणि डायलिसिस चक्क थांबवले!! संपूर्ण विभाग एयर कंडिशन्ड होता तरी अंगातील टी शर्ट घामाने ओला झाला. शेवटी नेफ्रोलॉजिस्टची भेट घेतली आणि काही दिवस इंजेक्शन घ्यायला लागले. मनावर फारच दडपण यायला लागले होते. चार लोकांच्या समोर आपले दुखणे उघडे पडणे, यासारखी शरमेची गोष्ट नाही. एकदा तर युरीनची कळ लागली, बरे पलंगावरून उठणे अशक्य!! मग तिथल्या मामाला बोलावणे पाठवले आणि त्याने प्लास्टिकचे भांडे आणले आणि कळ कमी केली. तेंव्हा पासून एक काळजी घ्यायला लागलो, पहाटे घरातून बाहेर पडण्याआधी, सकाळचे सगळे विधी व्यवस्थित पार केल्यानंतरच घर सोडायचे. डायलिसिस करताना, रुग्णांना नाश्ता मिळतो (दुपारच्या रुग्णांना जेवण मिळते) परंतु नाश्ता झाल्यावर पाणी मिळत नाही. याची सवय करून घ्यायला थोडा त्रास पडतो कारण, डायलिसिस करताना, रक्त आणि पाणी वेगळे केले जाते आणि तसे चालू असताना, शरीरात पाणी भरणे, चुकीचे!!
मध्यंतरी माझ्या छातीत दुखायला लागले, इतके की रात्री झोप यायची बंद झाली. जरा पलंगावर आडवे झाली छातीत कळा सुरु, पहाटे कधीतरी ग्लानी यायची आणि आपसूक डोळे मिटायचे. याचा, ज्या दिवशी डायलिसिस असेल तेंव्हा फारच त्रास व्हायला लागले. शेवटी डॉक्टर गाठला. सगळ्या प्रकारच्या चाचण्या केल्या आणि छातीत २ ब्लॉक आहेत, हे निदान झाले. अँजिओप्लास्टी हाच उपाय असल्याचे निदान झाले. अर्थात पुण्याहून आदित्यआणि नेहा, तडक घरी आले. वास्तविक अँजिओप्लास्टी फार वेदनादायक नसते (या शरीराने आतापर्यंत इतक्या वेदना सहन केल्या आहेत की आता साधे इंजेक्शन घ्यायचे तर काहीच वाटत नाही) पण २ दिवस "आयसीयू" मध्ये राहावे लागते. आता आयसीयू म्हणजे बाहेरच्या जगाशी संपर्क शून्य!! तरीही ते सगळे पचवले.
वास्तविक मला उपचार सुरु करून फक्त ९(च) महिने झालेत, अजून बराच पल्ला गाठायचा आहे, इच्छा एकच आणखी काही बरेवाईट होऊ नये.
Saturday, 21 January 2023
लग जा गले
जरा बारकाईने विचार केला तर प्रत्येक संगीतकाराची एक विशिष्ट शैली असते आणि त्याच्या बहुतेक स्वररचना त्या शैलीशी सुसंगत असतात, जखडून घेतलेल्या असतात. कुठलाच संगीतकार या मर्यादेपासून सुटका करून घेऊ शकला नाही. अर्थात काही संगीतकार, आपल्या आहे त्या शैलीशी सुसंगत पण थोड्या वेगळया धाटणीच्या रचना करतात आणि ललित संगीतात आपले नाव अजरामर करून जातात. अखेर शैली म्हणजे तरी काय? संगीतकाराच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास, त्याच्या बव्हंशी रचनेत, ठराविक स्वरिक वळणे, ठाशीव वाद्यमेळ तसेच ढाचा याबाबत एक कायमस्वरूपी रचना अनुस्यूत असते आणि तिथेच त्या संगीतकाराची "ओळख" तयार होते. अर्थात ठराविक स्वरिक वळणे, हा मुद्दा तर फार महत्वाचा ठरतो. आता ही वळणे, कुठल्या स्वरूपात आपल्या समोर येतील हे सांगणे कठीण. कधी एखादी हरकत असते, तर कधी संपूर्ण ओळच त्याच्या शैलीची ओळख दर्शवते. अशा वेळी, चालीतील निरनिराळे प्रयोग, वाद्यांची हाताळणी कितीही प्रत्ययकारी असली तरी काही खुणा, आपल्याला खुणावत राहतात. त्यावरूनच त्या संगीतकाराची ओळख पक्की होते. आपले आजचे गाणे - "लग जा गले" हे गाणे वरील विवेचनाला आधारभूत असे उदाहरण म्हणून मांडता येईल. आता ते कसे? याच प्रश्नाचा वेध घेत, या गाण्याचा आस्वाद घेणार आहोत.
राजा मेहदी अली खान यांनी हे गाणे लिहिले आहे. मुळातील उर्दू रचनाकार पण हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक, ज्यांना "यादगार" असे म्हणता येईल. अशी गाणी लिहिली आहेत. विशेष करून संगीतकार मदन मोहन यांच्या सोबत त्यांची नाळ जुळली होती. चित्रपटात प्रसंगात एकसाचीपणा किंवा तोचतोचपणा येणे, क्रमप्राप्तच असते. हे अटळ वास्तव स्वीकारून, काही कवींनी अतिशय दर्जेदार कविता सादर केल्या, त्यात राजा मेहदी अली खान यांचे नाव अग्रक्रमाने येते. सांख्यिकी दृष्टीने, या कवीने भारंभार सिनेमात गाणी लिहिली नाहीत आणि म्हणून असे असू शकेल, त्यांच्या काव्यात शिळपटपणा फारसा आढळत नाही. मी नेहमी शक्यतो चित्रपट गीताचा विचार हा, केवळ "गीत" या आधारे करतो, तिथे मग पडद्यावर कसे सादर केले जाते, वगैरे बाबींचा फारसा विचार करत नाही. तेंव्हा एक गीत म्हणून बघायला गेल्यास, कवितेत फारशी आतषबाजी आढळत नाही. अर्थात आतषबाजी हेच कवितेचे बलस्थान, असे अजिबात सुचवायचे नाही परंतु बहुतेकवेळा उर्दू रचनांत आतषबाजी भरपूर वाचायला मिळते आणि त्या अनुराधाने, हे विधान केले आहे. तसे पाहिल्यास रचनेत, फारसे उर्दू शब्द देखील वाचायला मिळत नाहीत. "जार जार" हा काहीसा अनवट शब्द अखेरच्या कडव्यात वाचायला मिळतो. "जार" म्हणजे "किलकिले"!! या ओळीत या शब्दाची द्विरुक्ती ही केवळ आधीच्या ओळीतील "बार बार" या शब्दाशी यमक जुळवण्याची चलाखी आहे. अन्यथा द्विरुक्तीचे काही खास कारण संभवत नाही. एकूणच रचनेत, नायिकेच्या प्रणयी भावनेची पखरण व्यवस्थितपणे मांडली गेली आहे. "आँखों से फिर ये प्यार की बरसात हो ना हो" ही ओळ मात्र असंख्यवेळा, असंख्य विभ्रमातून व्यक्त झालेली आहे.
संगीतकार मदन मोहन यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. या लेखाच्या सुरवातीला केलेले विवेचन आता विस्तारित स्वरूपात मांडता येईल. "पहाडी" या लोकप्रिय रागाधारित स्वररचना आहे. "पहाडी" राग हा लोकसंगीताच्या साहचर्याने शास्त्रीय संगीतात स्थिरावला आहे. "औडव/संपूर्ण" जातीचा राग आहे म्हणजेच आरोही सप्तकात, "मध्यम" आणि "निषाद" स्वरांना स्थान नाही. "सा ध प ध म ग प" अशा स्वरांना बांधून घेऊन, या रागाचे चलन सिद्ध होते. "रे नि धनि नि धनिनि नि प सा नि " या स्वरांनी "लग जा गले ये रात हो ना हो" या ओळीचे स्वरलेखन करता येते. आता इथे एक बाब उघड आहे, गाण्याची सुरवात "अवरोही" स्वरांनी केली आहे. परंतु या स्वरांच्या चलनातून "पहाडी" राग डोळ्यासमोर उभा राहतो. हे झाले थोडे तांत्रिक विवरण.
गाण्यात तालवाद्य म्हणून "गिटार" आहे आणि त्यामुळेच लयीला गाणे काहीसे अवघड झाले आहे. एकूणच मदन मोहन या संगीतकाराची शैली बघता, हे गाणे त्याच्या नेहमीच्या पठडीतले अजिबात नाही. तरीही गाणे बांधताना, विशेषतः "हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से" या पहिल्या अंतऱ्याच्या ओळीतून आपल्याला चिरपरिचित मदन मोहन शैली ऐकायला मिळते. मी वर जे विधान केले त्याला पूरक म्हणून हे उदाहरण देता येईल. इथे "गझलकार" संगीतकार दिसत नसून, "गीत" बांधणारा संगीतकार, समोर येतो. संगीतकार म्हणून विचार करताना काही मुद्दे लगेच ध्यानात येतात. हा संगीतकार, "गीत" धर्म जाणणारा संगीतकार होता. आपण जे गाणे बनवत आहोत, ते "गीत" या शब्दासाठी बनवत आहोत, ही जाणीव त्यांच्या स्वररचनेतून नेहमी दृग्गोचर होते. परिणामी लयबंधापेक्षा गीताच्या सुरावटीकडे मदन मोहन यांचे लक्ष अधिक होते. इथे या गाण्यातून हेच वैशिष्ट्य समोर येते. जेंव्हा संगीतकार गीत उभे करतो तेंव्हा तिथे गीताच्या सांगीत विस्तारावर मर्यादा घालणे अपरिहार्य होते आणि हेच कारण मदन मोहन, गझलेकडे वळले असावेत, असे संभवते.
आणि आता लताबाई.... काहीशी गूढ वाटणारी रचना गाताना, लताबाई नेहमीच सुंदर गायकी पेश करतात. "शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो" ही मुखड्यातील दुसरी ओळ गाताना, "मुलाकात हो ना हो" इथे अचानक स्वर वरच्या पट्टीत जातात. अशाप्रकारे गेल्यावर असे सूर पेलणे, ही लताबाईंची खासियत आहे आणि इथे गायिका म्हणून फार वेगळ्या होतात. असे अचानक वरच्या पट्टीत जाऊन, पुन्हा क्षणार्धात मुखड्याच्याच पहिल्या ओळीशी नाते जुळवणे,ही गळ्याची अनन्यसाधारण परीक्षा होय. "मुलाकात" शब्दावरील "रिषभ" स्वराची जोड खरोखरच जीवघेणी आहे. तसेच पहिला अंतरा सुरु करताना, पहिली २ अक्षरे साध्य पट्टीत घेतली आहेत तर लगोलग तिसऱ्या अक्षरापासून रचना वरच्या पट्टीत जाते. पुन्हा एकदा गळ्याची परीक्षा. असे स्वरांचे अवगाहन करण्यासाठी, कलाकाराच्या तयारीची ताकद ध्यानात येते. हे लिहायला फार सहज आणि सोपे आहे पण प्रत्यक्ष गेल्यावर पेलून दाखवणे, निरतिशय कठीण आहे. गायन विलक्षण गोड आहे परंतु गायला अतिशय अवघड आहे.
असे असून देखील हे गाणे आजही अतिशय लोकप्रिय आहे. अर्थात मदन मोहन यांच्या सांगीतिक कारकिर्दीला किती हातभार लागला, हे प्रश्न उरतोच.
लग जा गले के फिर ये हसीं रात हो ना हो
शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो
हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से
जी भर के देख लीजिये हमको करीब से
फिर आप के नसीब में ये बात हो ना हो
पास आइये के हम नहीं आयेंगे बार बार
बाहें गले में डाल के हम रो ले जार जार
आँखों से फिर ये प्यार की बरसात हो ना हो
(3) Lag Jaa Gale - Sadhana, Lata Mangeshkar, Woh Kaun Thi Romantic Song - YouTube
जन पळभर म्हणतील हाय हाय!!
मराठी भाषा एका दृष्टीने भाग्यवान म्हणायला लागेल आणि त्यात कविता या माध्यमाचा फार मोठा वाटा आहे. अर्थातच तद्नुषंगाने बोलायचे झाल्यास, २० व्या शतकात अमाप लोकप्रिय झालेल्या "भावगीत" संगीतप्रकारात कवितेचे प्रतिबिंब पडणे सहजशक्य असेच झाले. सुदैवाने मराठी भावगीताला देखील सक्षम कवितांची नेहमीच साथ लाभली. किंबहुना असे म्हणता येईल, अनेक संगीतरचनाकारांनी अशा अनेक कविता शोधून काढल्या ज्यांना चाली लावणे, त्यांच्या पिंडाला भावले. उत्तम कविता अधिकाधिक लोकांसमोर आणण्यात, या संगीतकारांचा फार मोठा वाटा आहे, हे नि:शंकपणे कबुल करावेच लागेल. याचाच दुसरा भाग असा म्हणता येईल, निरनिराळ्या प्रकृतींच्या कवींनी आपल्या सृजनक्षम निर्मितीने मराठी भावगीत फार श्रीमंत केले. हाच मुद्दा आणखी पुढे मांडायचा झाल्यास, भावगीतांच्या कवितेत "भावकविता" अंतर्भूत करणे, हेच या कवींनी फार मोठ्या प्रमाणावर केले आणि तद्वतच रसिकांची अभिरुची वाढवण्याचे कार्य केले.
खरतर कविता, विशेषतः भावकविता कशी असावी? नेहमीच्या आयुष्यातील शब्दांतून आपल्याला त्याच शब्दांचा वेगळा अर्थ दर्शवून देणारी आणि तसा भाव व्यक्त होत असताना आपल्या जाणीवा अधिक अंतर्मुख आणि श्रीमंत करणारी. कवितेची हीच पहिली अट असावी. शब्दांतील आशय, त्याचा घाट, रचना कौशल्य वगैरे बाबी या नंतरच्या आणि बऱ्याच प्रमाणात आपण गृहीत धरलेल्या असतात. वास्तविक कुठलेही लेखन हे प्राथमिक स्तरावर केवळ अनुभवांची मांडणी, इतपत मर्यादित असते आणि आपल्याला आलेला अनुभव, आपण आपल्या स्मृतीत जतन करून ठेवतो, असंख्य अनुभव आपल्या पोतडीत जमा होत असतात परंतु एखादाच असा अनुभव असतो, तो आपल्याला लिहायला प्रवृत्त करतो. तसे बघितले तर प्रत्येक अनुभव हा केवळ "अनुभव" असतो, त्या क्षणाचे अनुभूतीत परावर्तन होत नाही तोपर्यंत त्याला शब्दांची झिलई प्राप्त होत नाही. आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या नेमक्या भावनेशी जितके एकरूप होता येईल, तितके तुमचे लेखन अधिक सशक्त होत जाईल, हा आपल्या सगळ्यांचा सर्वसाधारण अनुभव असतो.
अनुभवाच्या पातळीवर आलेला कालावकाश तसाच्या तसा जागृत करून त्यातून जीवनाची नवीन अनुभूती देण्याचा सतत प्रयत्न करणे, एका बाजूला गतकालातील जमा झालेल्या सार्थ स्मृती (जो आपल्याला भावलेला क्षण आहे) आणि दुसऱ्या बाजूला अटळपणे अनंताकडे जाणारे हेतुशून्य भविष्य, या दोहोंतील कालाच्या पोकळीला शब्दांकित करणे, हे कविता या माध्यमाचे खरे सशक्त रूप. थोडक्यात मांडायचे झाल्यास, भावकवितेतील केवळ शब्दच नव्हे तर अक्षर देखील असे असायला हवे जिथे प्रतिशब्द/प्रतिअक्षर याला कसलाच वाव मिळू नये आणि इथे मराठी भावगीताला भा.रा. तांब्यांची कविता सापडली.
कालानुरूप विचार केला तर आज, तांब्यांच्या कवितेत काही गुण तर काही दोष सापडतात परंतु जर का "गेयता" हा दृष्टिकोन ठेवला तर तिथे मराठीत अशी प्रासादात्मक कविता विरळाच आढळते. बोरकर, पाडगावकर अशी काही सन्माननीय नावे घेता येतील. इंदोरच्या सरंजामी वातावरणाचा तसेच संस्कृत भाषेचा विशेष प्रभाव पडलेला दिसतो. तरीदेखील कवितेच्या ओळींमधील लय आणि रचनाकौशल्य केवळ अप्रतिम असेच म्हणायला हवे.
"जन पळभर म्हणतील हाय, हाय;
मी जाता राहील काय,काय?"
सुरवातीलाच एक विषण्ण करणारा प्रश्न टाकून कवितेच्या आशयाची कल्पना दिली आहे. खरतर हे एक चिरंतन सत्य आहे पण तरीही फारसे कुणीही स्वीकारत नाही, असा विरोधाभास देखील आहे. पुढे "अशा जगास्तव काय कुढावे" या ओळीने तर एक चिरंतन सत्य मांडले आहे आणि कविता फार वेगळ्याच स्तरावर गेली.
संगीतरचनेबाबत मांडायचे झाल्यास, वसंत प्रभूंची चाल आहे. मराठी भावगीत जितके म्हणून श्रीमंत आणि सर्जनशील करता येईल, त्या सगळ्या शक्यता वसंत प्रभूंच्या रचनांमधून अनुभवता येतात. थोडा बारकाईने विचार केला तर गाण्याची स्वररचना "मल्हार" रागावर आहे आणि हे सहजपणे ध्यानात येत नाही. स्वररचनेकडे बारकाईने ऐकायला गेल्यावरच, "मल्हार" रागाचे काही "वळण" सापडते. थोडेसे चकितच होतो. या रागाचे आणि या कवितेच्या भावस्थितीचे नाते अशा प्रकारे सत्कृदर्शनी तरी भावणारे नाही तरीही चालीचे नोटेशन मांडले असतात,आपल्याला मल्हार रागाचे सूर मिळतात. संगीतकार प्रतिभाशाली असतो,तो असा. मला तरी असे वाटते, वसंत प्रभूंनी चाल लावली असणार आणि पुढे कधीतरी त्यांना मल्हार रागाशी साम्य जाणवले असणार. अन्यथा सत्कृतदर्शनी तरी गाण्याची चाल वेगळी वाटते. शब्दातील विखारी भावनेशी तद्रूप होऊन बांधलेली चाल, मुखड्यातच मनात शिरते. गाण्याचे शब्दच इतके प्रत्ययकारी आहेत की तिथे वाद्यमेळाच्या आधाराची फारशी गरज भासू नये आणि प्रभूंनी नेमके तेच केले आहे. म्हटले तर सरळसोट चाल आहे पण तरीही लताबाईंनी गाताना, अर्ध्या हरकतींनी गोडवा आणला आहे. वसंत प्रभूंनी चाल बांधताना, त्याचे कविता वाचन होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली आहे.
"मेघ वर्षतील, शेते पिकतील; गर्वाने या नद्या वाहतील" हा दुसरा अंतरा घेताना, चाल किंचित वरच्या पट्टीत घेतली आहे. अर्थात शब्दातील आशय ध्यानात घेता, मघाशी लिहिल्याप्रमाणे मल्हार रागाशी नाते सांगणारे सूर सापडतात. लताबाईंची गायकी, हा खरे तर वेगळ्या निबंधाचा विषय ठरावा. शब्दांतील आर्जव, व्याकुळता, आणि हताश तसेच विखारी भाव, सुरांतून कसा मांडता येऊ शकतो,यासाठी ही गायकी, हा एक मानदंड आहे.
"अशा जगास्तव काय कुढावे,
मोही कुणाच्या का गुंतावे"
या ओळी मुद्दामून अभ्यास कराव्या, अशा दर्जाची गायकी आहे. सध्याचे आघाडीचे संगीतकार श्री. अशोक पत्की यांनी वसंत प्रभूंचा गौरव करताना "मेलडीचा बादशहा" असे केले आहे आणि वसंत प्रभूंची कुठलीही चाल ऐकताना याचे प्रत्यंतर आपल्याला येऊ शकते. खरतर मेलडी हा भारतीय संगीताचा प्राण आणि तिथेच वसंत प्रभूंची खासियत म्हटल्यावर गाण्याच्या चालीत गोडवा येणे क्रमप्राप्तच ठरते.
लताबाईंची गायकी, मुद्दामून विस्ताराने लिहावी अशी आहे. इतकी अप्रतिम कविता हाती आल्यावर, जसे संगीतकार वसंत प्रभूंनी स्वररचनेत औचित्य सांभाळले आहे, तितकेच लताबाईंनी आपल्या गायनातून अधिक अधोरेखित केले आहे. इथे प्रत्येक शब्दावरील स्वरिक वजनाला अर्थ आहे, केवळ चालीचा भाग म्हणून वजन दिलेले नाही. मराठी भावगीत अशाच गाण्यांनी फार श्रीमंत झाले आहे. कविता एकूणच भावगीताच्या नेहमीच्या आकारमानाने मोठी आहे आणि तेच ध्यानात घेऊन, लताबाईंनी शब्दांना यथोचित न्याय दिला आहे.ओळींमधील शब्दसंख्या फार विषम आहे पण लताबाईंनी आपल्या गायकीने सगळे सामावून घेतले आहे. "सखे सोयरे डोळे पुसतिल" गाताना, स्वर किंचित हळवा आहे पण भावविवश नाही. परिणामी, भावना चिकट होत नाही. असेच आणखी एक उदाहरण बघायचे झाल्यास,"अशा जगास्तव काय कुढावे" ही ओळ मुद्दामून ऐकावी, गायिका प्रतिभाशाली असेल तर काहीशा "रोखठोक" वाटणाऱ्या ओळीतून, आशय किती संयतपणे मांडता येतो, हे ऐकावे आणि जमल्यास अभ्यास करावा.
काही वेळा ललित संगीतात, शब्द हे चालींपेक्षा वरचढ असतात परंतु जेंव्हा शब्द आणि स्वर यांचा सुयोग्य मेळ होतो, तिथेच "जन पळभर म्हणतील हाय, हाय" अशा अद्वितीय गाण्याचा जन्म होतो.
जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहील कार्य काय?
सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल
तारे अपुला क्रम आचरतील
असेच वारे पुढे वाहतील,
होईल काय का अंतराय?
मेघ वर्षतिल, शेते पिकतिल
गर्वाने या नद्या वाहतिल
कुणा काळजी की न उमटतिल
पुन्हा तटावर हेच पाय?
सखे सोयरे डोळे पुसतिल
पुन्हा आपुल्या कामीं लागतिल
उठतील,बसतील पुन्हा खिदळतिल
मी जाता त्यांचे काय जाय?
अशा जगास्तव काय कुढावे
मोही कुणाच्या का गुंतावे
हरिदूतां का विन्मुख व्हावे?
का जिरवू नये शांतीत काय?
(2) Jan Palbhar Mhanatil Haay Haay - YouTube
Friday, 20 January 2023
जिया ना लागे मोरा
हिंदी चित्रपट संगीत आपल्या आयुष्यात अनेक संदर्भात अवतरले आहे. एका मर्यादेत विधान करायचे झाल्यास, हिंदी चित्रपट संगीत भारतातील आधुनिक आविष्कारांचा नवा अवतार म्हणण्यास प्रत्यवाय होऊ नये. याचा कारणास्तव, हिंदी चित्रपट संगीत हे वाढत्या प्रमाणात अभ्यास विषय होणे गरजेचे ठरते. हिंदी चित्रपट संगीताचे आकलन होण्यासाठी,सर्वात प्रथम, ज्या "जनसंगीत" कोटींत या संगीताचा अंतर्भाव होतो तिचे आकलन होणे गरजेचे आहे. मुळात जी "जनसंस्कृती" म्हणून जे अस्तित्वात आहे, त्याचाच उपप्रकार म्हणजे जनकोटी संगीत असे ढोबळ मानाने म्हणता येईल.
या बाबत असे विधान करता येईल, जनकोटी संगीतात, ध्वनी या माध्यमातील अत्यंत महत्वाच्या परिमाणाची म्हणजे "स्वन" किंवा "ध्वनिवैशिष्ट्याची" विपुल आणि जाणीवपूर्वक वापरलेली विविधता!! हेच जनकोटी संगीताचे प्रमुख वैशिष्ट्य मानता येते. आणि यालाच अनुसरून पुढे हेच वैशिष्ट्य चित्रपट संगीतात सढळपणे वावरते. याच विधानाच्या संदर्भात आपण आजचे गाणे "जिया ना लागे मोरा" आस्वादायला घेऊया.
वास्तविक पाहता मजरुह सुलतानपुरी हे नाव केवळ उर्दू भाषेत नसून, अखंड हिंदी चित्रपटसृष्टीत अतिशय आदराने घेतले जाते आणि ते सर्वार्थाने सत्य आहे. गेयताप्रधान गीते लिहिताना, भाषेचा अनुपम डौल, त्यांच्या रचनेतून वाचायला मिळतो. कविता समजायला फारशी अवघड नसते तरीही कवितेत घीसेपीटेपण फारसे नसते. लिखाणात प्रचंड सातत्य असून देखील भाषिक दर्जा टिकवण्यात कमालीचे यश प्राप्त केले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील मोजक्या दर्जेदार कवींमध्ये त्यांची गणना होते.
आजचे गाणे हे बरेचसे "बंदीश" प्रधान गाणे आहे. अर्थात ज्याप्रमाणे रागदारी संगीतातील बंदिश रचनेला, काव्यदृष्ट्या फार महत्व नसते. अगदी तास प्रकार इथे घडविलेला नाही पण, एक घाटदार बंदिश असावी, त्याप्रमाणे एकूण रचनेचा घाट आहे. नायिकेचा नायकाला उद्देशून केलेला आत्मगत संवाद आहे. त्यामुळे एकूणच भाषा देखील काहीशी सांकेतिक आहे. "काहे पट खोला,तूने मेरे द्वार का; आया बरसों में कोई,झोंका प्यार का" सारख्या ओळीतून हे स्पष्ट वाचायला मिळते. "दो पल तो ठहर जा,मोहे इतना भी ना सता" या ओळीतून नायिकेला वाटणारा विश्वास प्रतीत होतो. असे जरी असले तरी एकूणच कविता म्हणून वाचताना, फार काही हाताला लागत नाही, हे खरे. अर्थात अशी अपेक्षा ठेवायचे कारण स्वतः मजरुह यांचे स्थान आहे. इतर कोणी कवींच्या बाबतीत अशी अपेक्षा ठेवणे, अपवाद स्वरूपात का होईना, जड जाते. इथे कवितेची खुमारी जाणवते ती, चालीच्या गुंतागुंतीतून, थोडक्यात चालीमध्ये जे "खटके" किंवा "हरकती" आहेत,, त्याला "सुयोग्य" अशी शब्दरचना आहे आणि तशी लिहिली गेली, हेच या कवितेचे मुख्य यश म्हणावे लागेल.
संगीतकार राहुल देव बर्मन यांनी बांधलेली "तर्ज" हेच या गाण्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणता येईल. स्वररचना सरळ,सरळ "खमाज" रागावर आधारित आहे. खमाज राग एकूणच ललित आणि उपशास्त्रीय रचनांसाठी खूप लोकप्रिय राग आहे. "रिषभ" वर्जित हा राग "शाड्व / संपूर्ण" या जातीचा आहे. तसा अगदी सरळसोट राग आहे. "ग म प ध नि(को) ध" ही सुरावट "ना जा रे, ना जा रे, ना जा" इथे ऐकायला मिळते आणि खमाज राग सिद्ध होतो. आता गाण्याकडे वळायचे झाल्यास, या संगीतकाराची जी ओळख निर्माण झाली आहे, त्याला छेद देणारी रचना आहे. बैठकीच्या गाण्याचा आराखडा आहे त्यामुळे फारसा वाद्यमेळ वापरलेला नाही. अत्यंत घरगुती वातावरणातील गाणे आहे. वाद्यमेळात सतार,बासरी ऐकायला मिळते परंतु सगळे गाणे तालाच्या मात्रांवर उचलून घेतले आहे. गाण्यात तालाचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग करण्याच्या कौशल्याला मात्र दाद द्यायला हवी. गाणे मध्यलयीत आहे पण अंतरा संपताना किंचित्काल द्रुत लयीत शिरते परंतु ते शिरणे, हा स्वररचनेचा आंगिक भाग आहे. आपल्या भारतीय संगीतात, समेच्या मात्राला अतिशय महत्व आहे आणि त्या मात्रेला रचना येताना, लय विसर्जित होते आई हे विसर्जित होणे, अतिशय डौलाने होणे, अपेक्षित असते. या विधानाचा थोडा बारकाईने विचार केल्यास, इथली द्रुत लय का निम्नस्तरावर आहे, याचा उलगडा होतो.
या गाण्यातील "विराम" अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत, "जिया ना" नंतर छोटासा विराम आहे, पण निव्वळ अप्रतिम आहे. तसेच पुढे "दो पल तो ठहर जा" इथे असाच जीवघेणा विराम आहे. शब्दांचे औचित्य राखून निर्माण केलेली "जागा" आहे. प्रेयसीची आळवणी "ठहर जा" या शब्दातून व्यक्त होते तेंव्हा तिथेच क्षणभर सगळेच थांबणे औचित्यपूर्ण ठरते. गाणे ऐकताना, या संगीतकाराच्या शैलीची सगळी वैशिष्ट्ये आपल्याला बघायला मिळतात, जसे की "खटके" घेण्याची पद्धत किंवा "हरकत" घेताना, काहीसा तुटकपणा घ्यायचा! अर्थात हे लताबाईंच्या गायकीचे कौशल्य देखील म्हणता येईल.
लताबाईंची गायकी अशा गाण्यातून खुलून येते. इथे प्रत्येक शब्दाचा उच्चार ऐकण्यासारखा आहे, जसे की अस्ताई मधील "जिया ना लागे मोरा" गाताना, स्वरांचे ताण तर सांभाळले आहेतच परंतु शब्दांमधील भाव देखील त्याच असोशीने दाखवला आहे. प्रियकराची ओढ इतक्या सौंदर्यपूर्णतेने ऐकवली आहे की तिथेच हे गाणे आपल्या मनाची पकड घेते. "ना जा रे, ना जा रे, ना जा" इथे अक्षरांचे पुनरावर्तन जरी असले तरी प्रत्येक अक्षराचे ठळक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य, लताबाईंनी आपल्या गळ्यातून दाखवले आहे. गाण्यातील प्रत्येक खटका, त्या शब्दांतील दडलेला आशय स्पष्ट करणारा आहे. "गायकी" दाखवण्याचा चुकूनही प्रयास नाही.मुळात चाल इतकी गोड आहे की मुद्दामून शब्दांवर सुरांचे वजन टाकण्याची गरज नाही. लताबाईंनी हेच गाऊन सिद्ध केले आहे. मुळात गाण्यातील "मेलडी" इतकी सुंदर आहे की त्याला बाह्य आवरणाची गरजच भासत नाही.
अतिशय शांत, निर्मळ आणि गोड गाणे आहे. रसिकांनी खरोखरच दाद द्यावी, असे हे गाणे आहे.
जिया ना लागे मोरा,
ना जा रे, ना जा रे, ना जा
काहे पट खोला,तूने मेरे द्वार का
आया बरसों में कोई,झोंका प्यार का
दो पल तो ठहर जा,मोहे इतना भी ना सता
सुन के मेरी बातें, पलक तेरी क्यूँ झुकी
अच्छा रे बेदर्दी, जा नहीं मैं रोकती
ये है तेरा रस्ता, कहीं जा सकता है तो जा
(2) Jiya Na Lage Mora - Navin Nischal - Archana - Buddha Mil Gaya - Om Prakash - Deven Verma - YouTube
Friday, 13 January 2023
पाहिले न पाहिले
जे मत्त फुलांच्या कोषातून पाझरले,
निळ्या लाघवी दंवात उलगडले,
जे मोरपिसांवर सावरले,
ते-त्याहूनही-आज कुठेसे
पुन्हा एकदा
तशाच एका लजवंतीच्या
डोळ्यांमध्ये-डोळ्यांपाशी -
झनन-झांजरे मी पहिले.....
पाहिले न पाहिले.....
ते प्राजक्ताच्या पाकळीवर उतरले,
मदिरेवरच्या निळ्या गुलाबी फेसावर महिरपले,
जे जललहरीवर थरथरले,
ते-त्याहून-आज कुठेसे
पुन्हा एकदा
तशाच एका लजवंतीच्या
ओठांवरती-ओठांपाशी-
ठिबक-ठाकडे मी पाहिले
पाहिले न पाहिले.
जे कलहंसाच्या पंखांवर भुरभुरले
सोनेरी निळसर मळ्या-मळ्यांतून शहारले,
जे पुनवेच्या चांदण्यात भिजले,भिजले.
ते-त्याहूनही-आज कुठेसे
पुन्हा एकदा
तशाच एका लजवंतीच्या
मानेखाली-किंचितवक्षी-
बहर-बावरे-मी पाहिले....
पाहिले न पाहिले
सर्वसाधारणपणे पु.शि. रेग्यांची कविता म्हटल्यावर मनात काही ठोकताळे तयार होतात. जरी प्रणयी कविता लिहिणारे, असा जरी समज असला तरी त्यातील विविध छटा, नेहमी थक्क करणाऱ्या असतात. स्त्री ही त्यांच्या बहुतांश कवितेचे मध्यवर्ती कल्पना असते आणि त्या कल्पनेभोवती, वेगवेगळ्या प्रतिमा खेळवत, कवितेला फुलवत मांडणी करायची, अशी त्यांची पद्धत.
चराचरांच्या,निसर्गाच्या रस-गंध-रंग-नाद-स्पर्शमयी रूपांतून रसरणारे स्त्रीचे दर्शन त्यांच्या कवीमनाला भुलवत असतेच परंतु रेग्यांना या सृजनशक्तीच्या मार्दवाचा आणि सौष्ठवाचा, गूढतेचा आणि ऐश्वर्याचा खरा अनुभव मिळतो तो स्त्रीच्या मृदू,मादक शरीरलावण्यात आणि मुग्ध भावविभोर छटांमध्ये. स्त्रीच्या सौंदर्यातील संवेदनशीलतेला तेच नेहमी बहुदा बोलावत असावेत. ही सृजनशक्ती, ही जीवनोत्सुकता म्हणजेच स्त्रीचे खरे रूप. ही जाणीव त्यांच्या कवितेतून सातत्याने अनुभवायला मिळते. या अनुभवण्याच्या प्रक्रियेतून मग शांत,संतृप्त,पूर्ण, आनंदमयी अशा छटा त्यांना दिसतात. मग ती स्त्री कुठल्याही स्वरूपातील असो, तिचे सौंदर्य, हा कवी पूर्णतेने उपभोगतो की काय? असा गोड प्रश्न पडतो.
मात्र स्त्री सौंदर्य उपभोगताना, त्यातील रसरशीतपणा, त्यांच्या प्रतिमांमधून अतिशय रेखीवपणे उमटतो.खरे म्हणजे सगळी कविता हाच एक अद्वितीय अनुबभव असतो, त्यात असोशी असते, शृंगार असतो, शारीरलावण्य असते. वास्तविक मराठी मनाला आजही स्त्रीच्या सौंदर्याच्या ठराविक, सांकेतिक प्रतिमांची ओढ आहे परंतु त्या पलीकडील सौंदर्य बघायला मराठी मन बुजते. जिथे मन असे बुजते, तिथे रेग्यांची कविता पुढे येते.
रेगे आपल्या कवितेत बऱ्याचवेळा शब्दांची मोडतोड करतात किंवा संपूर्णपणे नव्याने घडवतात. प्रसंगी निरर्थक शब्दांतून अतिशय रेखीव असा आशय व्यक्त करतात. प्रस्तुत कवितेतील "झनन-झांजरे" किंवा " ठिबक-ठाकडे" या शब्दांना तसा रूढार्थाने काही अर्थ नाही परंतु या शब्दांची जोड रेग्यांनी अशा प्रकारे केली आहे की त्या निरर्थक वाटणाऱ्या शब्दांतून अनेक अर्थाच्या छटा दर्शविल्या जातात. ही रेग्यांची खासियत. वास्तविक पहाता, ही कविता फक्त ३ कडव्यांची आहे पण प्रत्येक कडव्यातून त्यांनी स्त्री सौंदर्याचे निरनिराळे रूप व्यक्त केले आहे आणि तसे करताना, त्यांनी शारीर सौंदर्याकचा उपयोग केला आहे. कवितेची धाटणी थोडी संस्कृत साहित्याच्या वळणाची वाटते तरीही ती वेगळी आहे.
रेगे स्त्री सौंदर्य उपभोगताना, त्यातील अंत:प्रेरणांकडे आपले लक्ष वेधून घेतात. कुठल्याही कवितेत शब्दांची अपरिहार्यता जितकी जमते, तितकी ती कविता अधिक व्यापक होते. आता इथे सुरवातीलाच "जे मत्त फुलांच्या कोषातून पाझरले," या ओळीत "मत्त शब्द आहे, तो "उन्मत्त" लिहून जमला नसता. इथे हाच शब्द अत्यावश्यक. "जे कलहंसाच्या पंखांवर भुरभुरले" इथे "कलहंस" हाच पक्षी हवा आणि हाच शब्द शोभतो. कवितेची धाटणी लक्षात घेता, या शब्दाने जी पूर्णता येते ती कुठल्याच शब्दाने अशक्य वाटते. "भुरभुरले" या क्रियापदाने त्या ओळीला एक भरीवपणा आला आहे. वास्तविक असे शब्द एकेकट्याने अर्थशून्य वाटू शकतात परंतु कवीची खासियत अशी की त्याच शब्दांची घडण नव्याने करताना, त्यांना पूर्ण अर्थ प्राप्त व्हावा.
"जे मत्त फुलांच्या कोषातून पाझरले,
निळ्या लाघवी दंवात उलगडले,
जे मोरपिसांवर सावरले,"
पहिल्याच ओळींतून कवितेचे "घराणे" आणि "संस्कृती" स्पष्ट होते. स्त्री सौंदर्याची अशी घडण मराठी कवितेत फार तुरळकपणे वाचायला मिळते.
"डोळ्यांमध्ये-डोळ्यांपाशी -" इथे डोळे शब्द साधा आहे परंतु त्या शब्दांच्या मागे-पुढे जे वर्णन आहे, त्यामुळे या शब्दांना वेगळीच झिलई प्राप्त होते. "झनन-झांजरे" या मुळातल्या शब्दांना एक "नाद" मिळतो आणि सगळीच कविता नादमय होते. "लजवंती" हे रेग्यांनी घडवलेले विशेष नाम आहे. इथेच कविता इतरांपेक्षा वेगळी होते.
पुढे मग "प्राजक्त" अवतरतो पण तो पाकळीवर अवतरतो, पूर्ण फुल इथे अभिप्रेत नाही. पाकळीमध्ये जो नाजूकपणा आहे तो पूर्ण फुलामध्ये येईलच असे नाही. रेगे अशाच प्रतिमांनी कविता फुलवतात.
रेग्यांच्या कवितेत व्यक्त होणारा स्त्रीचा आदिबंध हा सांस्कृतिक भावविश्वातील आदिशक्तीशी नवे नाते जोडतो. त्यांचा प्रतिमाव्यापार हा नाविन्यपूर्ण तर आहेच पण जरीही सांकेतिक नाही. तिथे पारमार्थिक काहीही नसून जे आहे ते "मानवी" आहे, "मानसिक" आहे. एक प्रकारच्या ताज्या, रसरशीत जीवनाचा आणि सोनेरीशुभ्र पार्थिव सौंदर्याचा रसिकतेने आणि मनमोकळेपणाने घेतलेला अनुभव आणि आस्वाद, असे खरे स्वरूप आहे. अनुभव घेताना रतिक्रियेच्या पलीकडील अनुभव शब्दातीत करणे, हे त्यांच्या कवितेचे मुख्य अंग मानता येईल. त्याच अनुषंगाने मग विचार करायचा झाल्यास,
"जे कलहंसाच्या पंखांवर भुरभुरले
सोनेरी निळसर मळ्या-मळ्यांतून शहारले,
जे पुनवेच्या चांदण्यात भिजले,भिजले."
"मळ्या-मळ्यांतून शहारले" या शब्दांच्यापुढे वेगळी अभिव्यक्तीच संभवत नाही.सोनेरी निळसर मळे आणि त्याच्याआधी येणारे कलहंसाचे भुरभुरणे, हे सगळेच अतिशय काव्यात्म आहे आणि मुख्य म्हणजे या कवितेच्या संदर्भात अपरिहार्य आहे आणि हे तसे वाटणे,इथे भावकविता सिद्ध होते. मी वरती जो "मानसिक" शब्द वापरला तो याचा ओळींच्या संदर्भात.
खरं म्हणजे कविता हाच एक सर्वांगसुंदर अनुभव असतो. हा अनुभव शब्दस्वरूप परंतु कल्पकतापूर्ण असतो. कवितेत कवीची संवेदनशीलता अभिप्रेत विषयाचा अनुभव नेहमीच कल्पकतेने घेत असतो. इथे हाच अनुभव आपल्याला अशाच प्रकारे घेता येतो. इथे प्रत्येक शब्दाला महत्व आहे आणि प्रत्येक ओळीतून अप्रतिम अशी अनुभूती वाचकाला मिळते. This is par excellence of romantic ritual.
Wednesday, 11 January 2023
मीच बुडविलें
ऐकून घेणारा...... तूं,
समजून घेणारा.....तूं,
तुझ्याचपाशी म्हणून वागलें,
म्हणून बोललें....उगाच काहीं
खुळेभाबडें,
भानमोकळे....
अर्थशून्यही.
मुरडून थोडे नाक बुद्धीचे,
हासून थोडे उपहासाचे,
म्हणालास तू....
"सांगशील का मोजून मजला
या उथळपणाची खोली?"
गळ्यांत आला एक अवंढा
__डोहच काळा उथळपणाचा__
भिडले काळें पाणी येऊन
काजळावरी....
आणि तुला मी,
मीच बुडविलें त्या डोहामधीं
उंच तुझ्या त्या
हिमशिखरांसह.
"मृगजळ" या कवितासंग्रहातील ही छोटेखानी परंतु आशयगर्भ कविता, परंतु कवियत्री इंदिरा संत यांच्या शैलीची चुणूक दाखवणारी कविता. या कवितेत इंदिरा संतांच्या कवितेची सगळी वैशिष्ट्ये वाचायला मिळतात. ही कविता "भावकविता" म्हणून निश्चितच गणली जाते. आता त्या दृष्टीने विचार करता, कुठलीही कविता ही नेहमीच्या शब्दांतून आपल्याला वेगा आशय प्रतीत करून देणारी असावी. आपल्या नेहमीच्या जाणिवांना पाहिलं खोलवर दिशा दर्शवणारी असावी. बाकी गोष्टी या नंतर अवतरतात आणि त्या सगळ्या शब्दनिष्ठ असतात. आपण जगताना असंख्य अनुभव पदरात घेत असतो पण त्या अनुभवांना नेमक्या शब्दांची जोड मिळतेच असे नसते पण काही अनुभव हे कायम स्मृतीत टिकून राहतात आणि मग अवचितपणे त्या अनुभवांना शब्दरूप मिळते. अर्थात, भूतकाळातील अनुभवांना जेंव्हा वर्तमानात शब्दरूप देण्याची वेळ येते तेंव्हा त्यावेळच्या जाणिवा आणि आजच्या जाणिवा यात अंतर पडू शकते आणि आशयाची व्याप्ती बदलू शकते. अर्थात वर्तमानात जाणीव अधिक टोकदार आणि लखलखीत होऊ शकते आणि तो अनुभव पुन्हा नव्याने झळाळून उठतो. भूतकाळाच्या संवेदना त्याच जाणिवेने पुन्हा मांडणे, इथे इंदिरा संत यांची कविता यशस्वी होते. पूर्वीची झालेली जाणीव त्याच जाणिवेने प्रतीत करण्यात बाईंची कविता खरंच श्रेष्ठ ठरते.
आता या कवितेच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, कविता स्पष्टपणे आत्मगत स्वरूपाची आहे आणि हे तर बाईंच्या कवितेचे नेहमीचे गमक म्हणता येईल. इंदिरा संतांच्या बहुतेक कविता याच पातळीवर वावरत असतात. परंतु त्यात एकासाचीपणा न येत, जाणिवांच्या निरनिराळ्या दिशा आपल्याला बघायला मिळतात. वास्तविक कविता हा शाब्दिक खेळच असतो परंतु त्या खेळाची व्याप्ती, तुम्ही मगदुराप्रमाणे वाढवू शकता. निरनिराळ्या प्रतिमांना वेगवेगळ्या प्रकारे खेळवत, आशय अधिकाधिक विस्तारित न्यायचा, ही त्यांनी मांडलेल्या खेळाची दुसरी बाजू, सुरवातीलाच " ऐकून घेणारा...... तूं" या ओळीतून एक अवघडलेपण दिसते आणि ते कायम संपूर्ण कवितेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून आपल्याला वाचायला मिळते. हेच अवघडलेपण पुढे
"तुझ्याचपाशी म्हणून वागलें,
म्हणून बोललें....उगाच काहीं
खुळेभाबडें,"
या ओळींतून स्पष्ट दिसते. "बोललें...." नंतर जे चार ठिपके आहेत, ते काही चूष म्हणून मांडलेले नसून, पुढील "उगाच" या शब्दाचा अर्थ वाढवणारे आहेत. बोलायचे तर आहे पण कसे बोलायचे, हे अवघडलेपण मनात असल्याने, काहीशा तुटक, चाचरत भावनेतून उमटलेल्या संवेदना आहेत. म्हणूनच "खुळेभाबडे" सारखा शब्द वाचायला मिळतो. याच शब्दाने त्या ओळीचा शेवट होणे, हे अपरिहार्य असते. तिथे दुसरी अभिव्यक्ती असूच शकत नाही. नात्यातील ताणेबाणे हे असे दर्शवले आहेत. अत्यंत मोजक्या शब्दात भावना दुसऱ्याला पोहोचवायची ही इंदिराबाईंची खासियत फार वेगळी ठरते.एकमेकांच्या जवळ आहोत पण तरीही मनातले बोलायची धिटाई होत नाही.
"भानमोकळे....
अर्थशून्यही."
असे शब्द मोडून, दीर्घ लांबवून तीच भावना अधिक खोलपणे व्यक्त होते मन मोकळे करताना, काहीसा inferiority complex येऊन, मग " अर्थशून्य" असे वाटून, काहीशी अपराधी भावना मनात आली का? असा प्रश्न उभा राहतो. कारण समोरच्या व्यक्तीला आपली भावना नेमकेपणाने कळेल का? या प्रश्नातून आलेली ही भावना आहे. ठिपके मांडून ही भावना अधिक खोलपणे व्यक्त होते. इथेच मनातील चाचरणे दिसून येते.
एव्हाना जे सांगायचे ते सांगून झाल्यावर, प्रतिक्रिया म्हणून समोरच्या व्यक्तीचे काहीसे उपहासात्मक बोलणे ऐकायला मिळते. पुरूषच तो, तेंव्हा आपला ताठा दाखवणारच!! आपली बुद्धी तसेच पुरुष असल्याचा वृथा अभिमान डोकावत असताना,
"मुरडून थोडे नाक बुद्धीचे,
हासून थोडे उपहासाचे,
म्हणालास तू....
"सांगशील का मोजून मजला
या उथळपणाची खोली?"
या ओळींतून तेच तिच्या ध्यानात येते. आपल्याला हा पुरुष समजून घेईल का? आणि कानावर लगोलग "सांगशील का मोजून मजला,या उथळपणाची खोली?" असली पृच्छा येते. मनात जी अनामिक भीती दडलेली आहे, त्याचेच प्रत्यक्ष स्वरूप उभे राहते आणि एकदम मन बावचळते. कविता वाचता,वाचता एकदम वेगळे प्रतीत व्हावे असा हा अनुभव आहे. येणार अनुभव एकदम समोर उभा ठाकला की जी मनाची ओढगस्त अवस्था होते, तेच इथे वाचायला मिळते आणि संवेदन विश्व वेगळेच निर्माण होते. वास्तविक बाईंच्या कवितेत नेहमी निसर्ग असतो पण इथपर्यंत तरी त्याचा मागमूस दिसत नाही.
"गळ्यांत आला एक अवंढा
__डोहच काळा उथळपणाचा__
भिडले काळें पाणी येऊन
काजळावरी...."
इथे मात्र एक सुंदर प्रतिमा येते. "__डोहच काळा उथळपणाचा__" . नको असलेले समोर आल्यावर,आहे ते तसेच्या तसे स्वीकारण्याची तयारी नसते आणि स्वभावगत भावना डोळ्यांतून उमटते. इथे पहिल्याप्रमाणे ठिपके नसून डोहाच्या खोलीची व्याप्ती दर्शवली आहे. निसर्गप्रतिमा इथे ठसठशीतपणे पुढे येते.आता "डोह" म्हटल्यावर त्यातील "काळे पाणी" ही सहज प्रतिक्रिया होणे, स्वाभाविक होते. खरंतर सगळीच कविता ही एका स्वाभाविक मनोवस्थेची अलौकिक जाण आहे. काळे पाणी काजळावर येणे, ही या भाववृत्तीची अखेर म्हणता येईल. आता पर्यंत जे अनुभवविश्व साकारले आहे, त्याची ही अटळ अशी अखेर म्हणायची का? हा विदग्ध अनुभव खरंतर बहुतेकांच्या आयुष्यात अनेकवेळा, अनेक प्रकारे येत असतो परंतु त्याला असे शब्दरूप देणे कितीजणांना शक्य असते? काजळावर काळे पाणी साचणे, ही अभिव्यक्तीच फार मोठी आहे. संपूर्ण अनुभव वेगळ्याच स्तरावर जातो.
आणि तुला मी,
मीच बुडविलें त्या डोहामधीं
उंच तुझ्या त्या
हिमशिखरांसह.
आता कवितेच्या शेवटाकडे. आलेला अनुभव तसाच्या तास पचविणे अशक्य मग हाती काय राहते? एकदा "डोह" ही प्रतिमा स्थिर केल्यावर त्या शब्दाच्या अनुरोधाने पुढील अनुभव मांडणे, अपरिहार्य ठरते, पण तो अनुभव कशाप्रकारे "रिचवला" जातो, ते बघण्यासारखे आहे. त्या व्यक्तीला, त्याच्या विचारांना स्मृतीतून नाहीसे करणे, आवश्यक वाटते तेंव्हा जो डोह आपण निर्माण केला आहे, त्या डोहातच त्या स्मृतींना गाडून टाकणे, अधिक श्रेयस्कर. अर्थात तसे करताना, पुरुषी बाणा दर्शवून गाडले आहे - "हिमशिखरांसह"! तुझा ताठा, कर्मठपणा यातून जो "थंडगार" अनुभव जाणवतो, तोच या शब्दात मांडून त्याला त्या डोहात गाडणे, हेच अखेरचे प्राक्तन असू शकते.
अतिशय साधा, नेहमीच अनुभव परंतु त्याला वेगवेगळ्या प्रतिमांतून खेळवत आपल्यासमोर इंदिरा संतांनी मांडला आणि हेच त्यांच्या काव्याची खरी शैली म्हणता येईल.
Saturday, 7 January 2023
वो ना आएंगे पलटकर
आपाल्या भारतीय संगीत संस्कृतीत जरा उशिराने अवतरलेल्या *ठुमरी* संगीत प्रकाराने असंख्य नवीन वाटा निर्माण केल्या. थोडी शृंगारिक, थोडी विरही छटा दाखवणारी, असे विभ्रम आपल्याला ऐकायला/बघायला मिळतात. असे म्हणतात हिंदी शब्द *ठुमकना* वरून *ठुमरी* शब्द जन्माला आला. तसे असेल तर ठुमरीत शृंगारिक भाव आढळणे, साहजिकच ठरते. उत्तर प्रदेशाने भारतीय संगीताला दिलेली ही फार मोठी देणगी, असे म्हणता येईल. संयत शृंगारासह भावनिक प्रणयी थाटाची कविता, आणि नृत्याचे अंग अशी ठुमरीची एकूण बाह्यात्कारी लक्षणे मानता येतील.आता उत्तर प्रदेशातून आल्याने, ठुमरी ही *अवधी* आणि ब्रज* भाषेत वाढली. खयाल संगीताचे लावण्यपूर्ण रंग ठुमरीमध्ये बघायला मिळाले आणि ठुमरी गायन प्रचंड लोकप्रिय झाले.
अर्थातच केवळ शृंगारिक अंग हेच ठुमरीचे वैशिष्ट्य कधीच नव्हते आणि आजही नाही. अनेक प्रकारचे विभ्रम ठुमरी गायनातून ऐकायला मिळतात आणि त्या विभ्रमांचे लालित्य. त्यामुळेच बहुदा ठुमरीत *लखनवी बाज* कमालीचा लोकप्रिय झाला. जेंव्हा ठुमरी प्राथमिक अवस्थेत होती तेंव्हा ठुमरी गायनाला फारशी प्रतिष्ठा नव्हती, परिणामी ठुमरी ऐकायची म्हणजे लखनौच्या कोठ्यांवर जावे लागायचे. अर्थात तिथे आधी नृत्य आणि मग नृत्याच्या जोडीला ठुमरी गायन, असे मनोरंजनाचे खेळ चालत असत. *वाजिद अली खान* याच्या काळात जशी *कथ्थक* नृत्याला प्रतिष्ठा मिळाली तशी त्याच्याच जोडीने ठुमरी प्रतिष्ठित झाली.
आजचे आपले गाणे हे अशाच धर्तीवरच, कोठीवरील विरही भावनेचा परिपोष करणारे, ठुमरी अंगाने जाणारे चित्रपट गीत - वो ना आएंगे पलटकर, या गीताचा आस्वाद घेणार आहोत. शब्दांवरुनच आपल्याला कल्पना करता येते, विरही छटेची रचना आहे. एकूणच गाण्याचे चलन वलन ठुमरीच्याच अंगाने जाणारे आहे. अर्थात कोठीवरील गाणे असल्याने, गाण्यात *खटके*, *हरकती* भरपूर आहेत.
सुप्रसिद्ध शायर साहिर लुधियान्वी यांनी या गीताची शब्दरचना केली आहे. चित्रपटातील प्रसंगानुरूप नेमकी गीते लिहिण्याचे सामर्थ्य या कवीकडे कायम होते आणि तशा प्रकारे लिहिताना, आपल्या कवितेचा दर्जा राखण्याकडे कायम, त्यांचा कल असायचा. इथे तर कोठीवरील नृत्यांगनेचे गाणे आहे आणि मुख्य म्हणजे नायकामध्ये गुंतून गेलेल्या मनःस्थितीचे चित्रण आहे. त्याकाळी काव्यात उर्दू शब्द सर्रास वापरले जायचे. *हसरतों*,*बेरुख़ी* किंवा *जफ़ाये* सारखे शब्द जरी प्रथमक्षणी आकलनास कठीण वाटले तरी संपूर्ण ओळ वाचल्यावर त्यातील आशय समजून घेण्यास काहीही अडचण होत नाही. प्रसंग असा आहे, नायक निराशेने कोठी सोडून निघाला आहे आणि हे त्या नृत्यांगनेला जरा देखील रुचलेले नसते. त्यातून आलेल्या विफल भावनेचे शब्दरूप आहे. साहिर यांची शब्दरचना नेहमीच खास असते. * तेरी बेरुख़ी के सदक़े,मेरी जिंदगी के खुशियाँ* या वाक्यातून जरी मनात हताशता आली असली तरी स्वत्वाची जाणीव दिसते. * वो ना आएंगे पलटकर,उन्हें लाख हम बुलाये* या वाक्याची पूर्तताच नंतरच्या ओळीतून होते. दुसरी बाब म्हणजे शब्द लिहिताना, संगीतकाराला जिथे *खटका* हवा असतो, तिथे तसेच शब्द लिहायचे, जेणेकरून गाण्यातील गुणवत्ता अधिक वाढीस लागेल.
संगीतकार एस.डी.बर्मन यांचे स्थान केवळ अतुलनीय असेच म्हणायला हवे. जशी दिग्दर्शनाची शैली, त्याला अनुरूप गाणी तयार करणे, या बाबतीत फारच थोडे संगीतकार त्यांच्या जवळपास येऊ शकतील. *खमाज* रागाची साथ घेण्यात फार मोठे औचित्य साधलेले आहे. एकूणच कोठीवरील ठुमरीसदृश गाणी ऐकली तर सर्वसाधारणपणे *खमाज* किंवा *पिलू* रागातील सुरावटींची पखरण ऐकायला मिळते,जणूकाही अशा प्रकारच्या गीत प्रकारांना हे राग *आंदण* दिले आहेत!! आरोही सप्तकात *रिषभ* वर्ज्य असून *दोन्ही निषाद* सातत्याने वापरले जातात. अर्थात नेहमीप्रमाणे इथे खमाज राग निव्वळ काही सुरावटींपुरता आधाराला घेतला आहे. एकूण बांधणी ही, गाण्याच्या आशयाला समृद्ध करण्यासाठी इतर बाबी अंतर्भूत केल्या आहेत. जसे की हरकती घेताना, चक्क राग बाजूला सारलेला दिसून येतो. या संगीतकाराने काही वेळा, शास्त्रोक्त चीजेवर आधारित गाणी बांधली आहेत - *नज़र लागी राजा तोरे बंगले पर* हे एक उदाहरण म्हणून देता येईल परंतु बहुतांशवेळी रागातील एखादे *चलन* हाताशी घ्यायचे आणि त्याच्या भोवती चाल रचायची, असेच धोरण एकूण दिसते.
आजच्या आपल्या गाण्याच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, गाण्यातील जी ठुमरी अंगाची संस्कृती जपलेली आढळते आणि त्याचबरोबर आपण एक चित्रपट गीत तयार करीत आहोत, याचे नेमके भान दिसते. गाण्यातील हरकती किंवा तान किती घ्यायची जेणेकरून त्याचा चित्रपटीय आविष्कार कुठेही गढूळ किंवा बटबटीत होणार नाही, याची *नजर* ऐकायला मिळते. गाण्यात उत्तर भारतीय लोकसंगीताचा रंग आहे तसेच ठुमरीचा बाज आहे आणि हे सगळे फक्त ३ मिनिटांच्या आविष्कारात दाखवले आहे. ही कामगिरी अनन्यसाधारण अशीच म्हणायला हवी. या संगीतकाराने, हिंदी चित्रपट गीतांचा नवीन *साचा* तयार केला आणि तसे करताना लोकांच्या पचनी पाडले. रवींद्र संगीतापासून स्फूर्ती घेतली पण आंधळी स्वीकृती नाकारून, त्यात स्वतःच्या बुद्धीने त्यातील आंतर सौंदर्याची दृष्टी दिली आणि हे करताना त्यांनी सुसंस्कृत संयम दाखवला. गाण्यातील वाद्यमेळ हा बव्हंशी सारंगी वाड्याने सजवलेला आहे आणि एकूणच विरही गीताच्या दृष्टीने योग्यच आहे.
गायिका मुबारक बेगम यांनी हे गीत गायले आहे. एक गायिका म्हणून विचार करता, गळ्यावर संगीताचे *संस्कार* झाल्याचे जाणवत नाही. तसेच छोट्या ताना किंवा हरकती घेणे त्या गळ्याला झेपणारे होते. ललित संगीतात एक गायिका म्हणून सिद्ध करण्यासाठी, तुम्हाला व्यासंगी रचनाकार लाभणे, गरजेचे असते. मुबारक बेगम यांना तसा लाभ मिळाल्याचे दिसत नाही परिणामी गाण्यांची संख्या फारच तुरळक अशी राहिली. त्यातून त्यांच्या गळ्याला ठराविक प्रकारची गाणी - सर्वसाधारणपणे लोकसंगीतावर आधारित गाणी, गायला मिळाली. त्यांच्या आवाजाला एक सुंदर टोक होते, या गीताच्या संदर्भात हे विधान बघण्यासारखे आहे. वरच्या सुरांत हे गीत सुरु होते आणि द्रुत लयीत सुरु होते. गायिकेच्या गळ्याला हे जमून गेले पण प्रश्न येतो, या गायिकेला शांत, संयत गाणी कितपत जमली असती? तसेच हॉटेल मधील कॅबरे गीते जमली असती का? गळ्यात फारसा लवचिकपणा नसल्याने गीते मिळण्यावर मर्यादा आल्या.
गीतातील उर्दू शब्दोच्चार अचूक केले आहेत तसेच गाण्यातील वेग सुरेखरित्या राखला आहे. द्रुत लयीतील गाणे गाताना, कवितेचा आशय ध्यानात घेऊन गाणे गायचे असते आणि ते इथे जमले आहे.
आता प्रश्न पडतो, अशा गायिकेला संधी इतक्या कमी का मिळाल्या? या प्रश्नाचे उत्तर बाईंच्या गळ्याची एकूणच मर्यादित तयारी असेच म्हणावे लागेल. असे असून देखील हे गाणे अतिशय सुंदर झाले आहे आणि याचे कारण संगीतकाराने निर्माण केलेली स्वररचना, असेच म्हणावे लागेल. *देवदास* चित्रपट इतर गाणी इतकी सुश्राव्य आहेत की शंका एकाच येते की त्यामुळेच हे गाणे मागे कडाळे असावे अन्यथा इतके सुंदर गाणे, काळाच्या ओघात विस्मृतीत जाण्याचे काहीही कारण नव्हते.
वो ना आएंगे पलटकर,उन्हें लाख हम बुलाये,
मेरी हसरतों से केह दो की ये ख्वाब भूल जायें
अगर इस जहाँ का मालिक, कही मिल सके तो पूछे,
मिली कौनसी खता पर, हमें इस कदर सजाये
तेरी बेरुख़ी के सदक़े,मेरी जिंदगी के खुशियाँ
तू अगर इसी में खुश हैं, तो खुशीसे कर जफ़ाये
(3) Woh Na Aayenge Palat Kar - YouTube
Thursday, 5 January 2023
चित्रपट गीतांतील रागसंगीत
आजपावेतो चित्रपट युग अवतरून शतकपूर्ती व्हायला आली असूनही तसेच चित्रपट संगीत हे भारतात तरी, जवळपास घराघरात पोहोचले असून देखील, त्या संगीताला मानमरातब मिळत नाही. आजही चित्रपट गीतांकडे काहीशा तुच्छतेने बघितले जाते. विशेषतः कलासंगीताचे रसिक तर चक्क कानाडोळा करण्यात भूषण मानतात. आपल्याकडे कवितासंग्रह छापले जातात पण त्याच बाबतीत चित्रगीतांचा संग्रह काढण्यात उदासिनता दाखवली जाते. इतकेच कशाला, चित्रपटात गाणी लिहिणाऱ्याला "गीतकार" म्हटले जाते आणि कवींच्या समोर खालची पायरी दाखवली जाते. या विषयावर खरं तर गंभीरपणे संशोधन व्हायला हवे. तसे मराठीत थोडेफार प्रयत्न झालेत परंतु त्यामुळे समाजात व्हावी तितकी जागृती झालेली दिसत नाही. खरंतर चित्रपट गीतांमुळे सामान्य रसिकांमध्ये रागसंगीताची रुची निर्माण झालेली आहे पण ही वस्तुस्थिती मान्य होत नाही. असो, या लेखाच्या निमित्ताने या विषयावर थोडाफार प्रकाश टाकता आला तर बघूया. लेखाचा उद्देश तोच राहणार आहे.
"शुक्रतारा मंदवारा" हे भावगीत, आज ५० वर्षे उलटून गेली तरी लोकांच्या मनात ठाण मांडून आहे. खळेसाहेबांचे नाव या गीताशी कायमचे जोडले गेले आहे. आता, याच गाण्याचा जरा खोलवर विचार केला तर असे आढळते, या गीताची "सुरावट" ही "यमन" रागावर आधारित आहे!! आणि हे विधान शास्त्रसंमत आहे, उगीच बोलायचे म्हणून बोललेले विधान नव्हे. आता थोडे तांत्रिक प्रकाराने बघूया. "शुक्र ता रा मंद वारा, चांदणे पाण्यातूनी" या ओळीचे स्वरलेखन तपासायचे झाल्यास, "म रे#म म#रे#सा#सा रे#सा#रे#रे#सा" ही सुरावट "शुक्रतारा मंदवारा" या ओळीची आहे आणि ही सुरावट यमन रागाच्या चलनाशी जुळणारी आहे. इथे एक मुद्दा स्पष्ट करायला हवा. ललित संगीत आणि रागसंगीत हे वेगळे संगीत प्रकार आहेत. रागसंगीतात, प्रत्येक सुराला महत्व असते तर ललित संगीतात, शब्दांना प्राधान्य दिले जाते. परिणामी, रागाचे "मूळ" चलन, ललित संगीताशी जुळणारे असेलच, अशी ग्वाही देता येणार नाही परंतु याच यमन रागाचा थोडा बारकाईने अभ्यास केला तर शुक्र तारा मंद वारा या गाण्याची चाल, यमन रागात सापडते. आता अर्थातच सामान्य रसिक हे गाणे ऐकताना, यमन रागाची मनातल्या यानात उजळणी कधीच करत नाही परंतु विचक्षण रसिक मात्र त्या दृष्टीने अभ्यास नक्कीच करतो किंवा त्याने तास अभ्यास करावा.
आता याच यमन रागावर आधारित असे एक हिंदी गाणे बघूया. इथे मी मुद्दामून अत्यंत वेगळ्या स्वरूपाचे गाणे घेत आहे. हिंदी चित्रपटातील अजरामर कव्वाली - "निगाहें मिलाने को जी चाहता हैं". ही कव्वाली जरी असली तरी या गाण्याची सुरावट पुन्हा यमन रागाशी जुळणारी आहे. कशी? ते आपण बघूया. या गाण्याच्या सुरवातीचा आलाप ऐकायला घेतल्यास, "गप#ध रे "#ग"नि"
अशा सुरांत ऐकायला मिळतो. लगेच कानावर "राज की बात है, मेहफिल में कहिये ना कहे" ही ओळ ऐकायला मिळते. आता याचे स्वरलेखन करायचे झाल्यास, "गप#रे#प#रे# ग सा#ग#सा" या सुरावटीवरून पूढे विस्तारित होते. मी वर स्पष्ट केल्याप्रमाणे, ललित संगीत कधीही रागसंगीताचे सगळे नियम पाळणारे संगीत नव्हे कारण दोन्ही संगीताचे मूलभूत उद्देशच वेगळे आहेत.
इथे मी यमन उदाहरणादाखल घेतला परंतु इतर असंख्य राग ललित संगीतात उपयोजिले गेलेआहेत आणि गंमत म्हणजे ऐकताना कुठल्या रागात? हा प्रश्न न पडत, आपण त्या गाण्याचा मन:पूत आस्वाद घेत असतो. अर्थात नकळत आपण रागसंगीताच्या जवळ जात असतो कारण उद्या हेच रागसंगीत ऐकताना, एखादी हरकत ऐकायला मिळाली की लगेच मनात त्या रागाशी समांतर असलेले गाणे उद्भवते आणि तोच राग मनाशी आपले नाते जोडून बसतो.
आता आणखी एक अत्यंत प्रसिद्ध उदाहरण बघूया. "ये जिंदगी उसी की हैं" या लताबाईंच्या अत्यंत लोकप्रिय गाण्याबाबत हाच दृष्टिकोन ठेऊन बघूया. "भीमपलास" रागावर आधारित हे गाणे आहे असे तज्ज्ञ मंडळी सांगतात. आता याची सुरावट बघायला गेल्यास, आरोही चलनात "नि सा ग म प नि सा" असे स्वर आहेत आणि जेंव्हा आपण या गाण्याच्या संदर्भात बघताना, मुखड्याची ओळ - ये जिंदगी उसी की है, या ओळीचे स्वर ताडून बघताना - "ध ग म ग रे ग रे सा - रे ग" हे स्वर ऐकायला मिळतात. सहजपणे ध्यानात येईल के इथे *पंचम* स्वराला स्थान नाही पण *धैवत* स्वराला जागा दिली आहे!! तरीही रागाची सावली जरादेखील दूर होत नाही!! एक संगीतकार म्हणून सी.रामचंद्र यांना, या खेळाचे श्रेय द्यायलाच हवे. आता आपणच प्रामाणिकपणे कबूल करायचे झाल्यास, हे गाणे ऐकताना, भीमपलास रागाची जरा देखील आठवण येत नाही आणि तशी आठवण का यावी? गाण्याची चाल इतकी गोड आहे की त्या चालीच्या गोडव्यात ऐकणारा रममाण होतो. हीच गंमत आणि खासियत चित्रपट गीतांची आहे, इथे रागाच्या स्वरांना फारसे महत्व दिले जात नाही . ते केवळ "आधारभूत" म्हणून स्वीकारले जातात आणि संगीतकार, आपल्या चालीतून, त्यासाची पुनर्रचना करीत असतो आणि संगीतकाराची ताकद अशाच प्रयोगातून सिद्ध होते.
"शिवरंजनी" राग फार व्यापक प्रमाणात ललित संगीतातून ऐकायला मुकतो आणि आता पण एक अत्यंत लोकप्रिय असे मराठी चित्रपटगीत, "सावळाच रंग तुझा" - या रागाच्या संदर्भात बघूया. या गाण्यात थोडा लपलेला राग शिवरंजनी आहे पण त्या रागाची गडद सावली या गाण्यावर पडलेली आहे, हे निश्चित. "सावळाच रंग तुझा" ही ओळ "पपधसासा/रेग(को)/रेसा" अशी ऐकायला मिळते. आता थोडा बारकाईने विचार केल्यास, पुढील ओळीत "आणि नजरेत तुझ्या* या ओळीत "सारेग(को)पपम(तीव्र)/धप" "तीव्र मध्यम स्वराचा उपयोग केला आहे. तीव्र मध्यम स्वराला शिवरंजनी रागात स्थान नाही पण संगीतकार सुधीर बांध्याचे भावंडे आहे फाडल्यांनी तो स्वर इथे आणून बसवला.आपण ऐकताना, कुठे काही खटकले का? अजिबात नाही. आपण माणिक वर्मांच्या लडिवाळ स्वरांत आपल्याला हरवून बसतो. वास्तविक पाहता, रागसंगीतात स्वर आणि त्यांचे उपयोजन याला कमालीचे महत्व असते. लाली संगीतात, संगीतकाराला त्याबाबत स्वातंत्र्य मिळते कारण एखाद्या नसलेल्या सुराने, त्या शब्दाचे महत्व अधोरेखित होते आणि ती कविता खुलते.
असाच प्रकार अत्यंत लोकप्रिय असलेल्या रागाची आठवण झाली - "राग केदार". या रागाची खरी ओळख ही प्रार्थना किंवा भक्तिगीते अशा गाण्यांतून भावच्छटा स्पर्शून देणारा राग. असे असून देखील आपले भारतीय संगीत किती श्रीमंत आहे आणि त्याला एकचएक भावना चिकटवणे, योग्य नाही. एकाच रागात असंख्य विभ्रम ऐकायला मिळू शकतात. किंबहुना हेच अत्यंत महत्वाचे बलस्थान मानावे लागेल. "आप की आँखो में कुछ महके हुए राझ हैं" हे अप्रतिम प्रणयगीत याच केदार रागाच्या काही छटा घेऊन आपल्या समोर अवतरते. उत्तम कविता, संगीतकाराला तितकीच अनवट स्वररचना निर्माण करायला कशी प्रेरीत करते, या विधानाला, हे गीत उदाहरण म्हणून सांगता येईल. राहुल देव बर्मन हे शक्यतो रागाची प्रचलित स्वरचौकट मोडून रचना करणारे संगीतकार म्हणून ख्यातकीर्त आहेत. इथेही आपल्याला हेच ऐकायला मिळते. क्वचित *कोमल निषाद* स्वरांचा उपयोग केला जातो परंतु *दोन्ही मध्यम आणि इतर शुद्ध स्वर* हेच या रागाचे प्रमुख अंग मानले गेले आहे. आता या दृष्टीने स्वररचनेतील मुखडा आपण बघू.
*आप /की /आंखो / में /कुछ*
*रे ग सा/नि प /सा नि नि/नि /नि* इथे *नि कोमल* आहे.
*महके /हुए /से /राज /हैं*
*निरे सारे/सा ध /ध नि /(रे ग म ग)/मग रेग सा...*
इथे स्वरलिपी लिहिण्यामागे एकच उद्देश आहे, चालीत *कोमल निषाद* कसा चपखलपणे बसवलेला आहे जो खरतर केदार रागाच्या चलनात बसत नाही. ललित संगीताचे खरे सौंदर्य बघायला गेल्यास, रागाचा आधार घ्यायचा परंतु त्याच्या आजूबाजूचे *वर्जित* स्वर देखील त्यात सामील करून घ्यायचे आणि स्वररचनेचे स्फटिकीकरण करून, आपल्या व्यासंगाचा परिचय करून द्यायचा.
असाच प्रकार अगदी "अनवट"रागाच्या बाबतीत देखील घडून आलेला दिसतो. वास्तविक "गारा" राग हा काही प्रचलित राग मानला जात नाही पण तरीही उपशास्त्रीय संगीत आणि विशेष करून ललित संगीतात हा राग बराच आवडता असल्याचे दिसून येते. अर्थात "अनवट" म्हणजे काहीसे अप्रचलीत. "तेरे मेरे सपने अब एक रंग है" हे "गाईड" चित्रपटातील अतिशय लोकप्रिय गाणे उदाहरण म्हणून बघूया. गाण्याची चाल ही "राग गारा" या रागावर बांधलेली आहे.
"शाड्व/संपूर्ण" अशी स्वरांची बांधणी आहे. दोन्ही "निषाद" स्वरांचा उपयोग केलेला आढळतो. अर्थात शास्त्रकारांनी रागाचा समय हा "उत्तर सांध्यसमय" असा दिलेला आहे. कदाचित हेच या रागाचे वैशिष्ट्य ध्यानात घेऊन, बर्मनदादांनी या रागाच्या सावलीत स्वररचना केली असावी.आता या गाण्याचे "स्वरलेखन" बघूया.
"तेरे /मेरे /सपने / अब /एक / रंग /हैं"
"नि(को)सा/ सा रे /नि सा नि(को) ध/ध नि(को)/म - रे /ग(को)ग(को)/रे"
"हो /जहां/भी ले /जायें /राहें /हम /संग /हैं"
"ग(को)सारे गम/ग म/रे ग(को)/सा सा/नि(को)ध/म रे/ग(को) रे/सा"
वरील स्वरलेखनातून, मी सुरवातीला "निषाद(को)" या स्वराचे प्राबल्य दर्शवले होते, तेच नेमकेपणाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, कुठल्याही गाण्याचे स्वरलेखन हा फक्त "आराखडा" असतो, त्यात प्राण भरण्याचे काम हे गायक/गायिकेचे असते. ज्यांना संगीताची ही भाषा कळते, तेच राग गारा आणि हे गाणे, यातील "नाते" जाणू शकतील.
ललित संगीत हे रागदारी संगीताचे छोटे, अटकर चणीचे भावंडे आहे. ललित संगीतात,वर स्पष्ट केल्याप्रमाणे कवीची कविता मध्यवर्ती केंद्रित असते आणि त्या कवितेला अनुलक्षून संगीतरचना करायची असते. रागसंगीतात शब्दांना महत्व दिलेच पाहिजे, असे बंधन अजिबात नसते. त्यामुळे दोन्ही जरी संगीताचीच अंगे असली तरी भावस्वरूप वेगळे होते आणि उद्दिष्टात फरक पडतो.
एक मजेदार निरीक्षण नोंदवतो. आपल्या मराठीतील "भूपाळ्या" बहुतांशी "भूप" रागात आहेत. भूपाळी ही भल्या पहाटे गायची असते, हा मराठी संस्कृतीमधील एक प्रघात आहे आणि जर का शास्त्राचा विचार केल्यास, "भूप" रागाचा समय संध्याकाळचा, शास्त्रकारांनी दिलेला आहे. आता बघा, संध्याकाळचा राग तरी पहाटेची गाणी त्यात चपखलपणे बसली. कुणालाही त्यात कसलेच न्यून आढळले नाही.
तेंव्हा थोडक्यात बोलायचे झाल्यास, ललित संगीताने कधीही असा दावा केलेला नाही की ललित संगीत रागसंगीताचा प्रसार करते. ते अशक्यच आहे पण रागसंगीताबद्दल मनात रुची निर्माण करण्यात ललित संगीत नेहमी हातभार लावते, हे निश्चित आणि याच दृष्टिकोनातून ललित संगीताचा गंभीरपणे अभ्यास व्हावा हीच इअछा व्यक्त करून मी इथे थांबतो.
Wednesday, 4 January 2023
जाओ रे जोगी तुम जाओ रे
सांगीत आविष्कारांतील उच्चतम आविष्कारांपर्यंत म्हणजे गीतापर्यंत पोहोचणे दीर्घ प्रक्रिया असून त्यात अनेक प्रक्रिया अंतर्भूत असतात. या प्रत्येक क्रियेस आपापली अविष्कार क्षमता असते. या परिप्रेक्षात एकसूरीपणापासून दूर जाणे, हे संगीतनिर्मितीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होय. कंठसंगीत आणि वाद्यसंगीताच्या विशिष्ट अविष्कारांत पूर्णतः गुंतून राहणे म्हणजे एकसुरीपणा होय. दुसरा टप्पा म्हणजे गुणगुणणे. या क्रियेत सांगीत कल्पना आकारास आलेली असते पण तिचे प्रक्षेपण होत नाही. तिसरा टप्पा म्हणजे सस्वरपाठाचा. यशस्वीपणे प्रक्षेपित तारातांची सहेतुक रचना हा याचा खास विशेष आहे. यात निवडलेल्या संदर्भरेषेच्या वर-खाली या पातळ्यांच्या पलीकडे न बघण्याची एक भूमिका असते. चौथी पायरी म्हणजे पठण. इथे संगीतपरता महत्वाची ठरते. याच पातळीचा परमोच्च आविष्कार म्हणजे गीत होय. गीताने संगीतपरतेच संभवपट पूर्ण होतो. गीताचे खास लक्षण असे, आपल्या गुणवत्तापूर्ण प्रक्षेपणामुळे प्रस्तुत गीत ऐकणाऱ्याची अशी गुंतवणूक करते की तो जवळपास निर्मितीचा सहभागी घटक बनतो.
वरील विवेचनाचा अनुसरून, आजच्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे. * जाओ रे जोगी तुम जाओ रे* नेहमीप्रमाणे आधी गाण्यातील कविता बघूया. प्रसिद्ध कवी शैलेंद्र यांची शब्दरचना आहे. शैलेंद्र हे शक्यतो भारतीय संस्कृतीच्या नाळेशी जोडलेले होते आणि त्यांच्या इतर काव्यामधून हेच दृग्गोचर होते. अर्थात प्रसंगानुसार गीत रचणे, ही प्राथमिकता लक्षात घेता, आजच्या गीताची रचना ही अर्थातच हिंदी सरंजामशाहीच्या काळाला अनुसरून केली आहे. संपूर्णपणे हिंदी भाषिक शब्दांनी योजलेली रचना आहे. आता नृत्यगीत तर आहेच परंतु त्याचबरोबर चित्रपटातील नायकाला आवाहन करणारे आहे. नायकाला विरक्ती आल्याने, त्या विरक्तीच्या विरुद्ध लिहिलेले गाणे आहे. एक गंमत, चित्रपट *चित्रलेखा* मध्ये अशा धर्तीवर लिहिलेले गाणे आठवले - *संसार से भागे फिरते हो*!! अर्थात अआशयातील साम्य वगळता, बाकी सगळेच भिन्न आहे. तशी शब्दरचना साधी आणि सोपी आहे. परंतु चित्रपटासाठी योग्य अशी आहे. *ज्ञान की कैसी सीमा ज्ञानी,गागर में सागर का पानी* या ओळीतून कवीच्या कवित्वाचा स्पर्श दिसतो. अन्यथा, गेयता हे वैशिष्ट्य वगळता, फार काही सांगावेसे वाटत नाही.
संगीतकार शंकर/जयकिशन यांची स्वररचना आहे. या जोडीने चित्रपट सृष्टीवर एक काळ संपूर्णपणे राज्य केले होते.अनेक प्रवृत्तीच्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना, त्यांच्या शैलीला आत्मसात करून, त्याप्रमाणे चाली निर्माण करण्याचे त्यांचे कौशल्य निश्चितच असामान्य होते. प्रस्तुत *आम्रपाली* चित्रपट भारतीय संगीतावर आधारित आहे आणि ते ध्यानात घेऊनच त्यांनी चाली निर्माण केल्या. *कामोद* रागावरआधारित स्वररचना आहे. २ आठवड्यांपूर्वी आपण याचा रागावर आधारित *तुमको देखा तो खायला आया* या गाण्याचे रसग्रहण करताना, या रागाचा अल्पसा असा परिचय करून घेतला होता आणि आज याच रागाचे वेगळे, स्वतंत्र असे स्वरूप बघत आहोत. दोन्ही मध्यम अंगिकारलेल्या या रागाचे स्वरूप *संपूर्ण/संपूर्ण* असे आहे, म्हणजेच कुठलाच स्वर *वर्ज्य* नाही. आता या पार्श्वभूमीवर या गाण्यातील सूर बघायचे झाल्यास, मुखडा *जाओ रे जोगी तुम जाओ रे* ही ओळ, *ग प धनिसा ध धप पम म ग गरे गरे प........* अशा स्वरांत ऐकायला मिळते. इथे *प* स्वरानंतर मींडयुक्त तान ऐकायला मिळते. हा झाला तांत्रिक भाग जो आपण झलक स्वरूपात घेतला आहे.
खरी खासियत आहे ती अशाच अप्रतिम हरकतींनी सजलेल्या गाण्याची. गाण्यात प्रत्येक ओळ, काही ठिकाणी तर शब्दागणिक हरकती आहेत आणि त्या सगळ्या *गायकी* अंगाच्या आहेत. परिणामी हे गीत ऐकायला कितीही वेधक वाटले तरी गायला मात्र *तयारी* असणे जरुरीचे ठरते. गाण्यात साधा *तीनताल* आहे जो बहुशः नृत्यगीतात अंतर्भूत असतो. गाणे द्रुत लयीत सुरु होते आणि त्याचा वळणाने संपते. अंतरे सारख्याच बांधणीचे आहेत परंतु गाण्यातील द्रुत लय आपल्याला सतत गाण्यासोबत राहायला लावते. मुखड्याच्या स्वरांना समांतर अशीच अंतर्यांची चाल आहे. गाण्याची रचना ही जवळपास *तार सप्तकात* आहे, अर्थात समेवर येताना एक,दोन ठिकाणी *मध्य सप्तकात* क्षणमात्र येते पण एकूणच सगळे गाणे वरच्या सुरांत चाललेले आहे. त्यामुळे नवागतांच्या गळ्यावर ताण पडण्याचा संभव अधिक. गाण्यातील वाद्यमेळ बव्हंशी सतार वाद्यानेच व्यापला आहे.
लताबाईंचे गायन हा या गाण्याचा खरा USP आहे!! रागदारी संगीतावर आधारित गाणे मिळाले की बाईंचा गळा किती समृद्ध गायकी दाखवतो, याचे हे एक समृद्ध उदाहरण म्हणता येईल. द्रुत लयीत देखील स्पष्ट शब्दोच्चार तसेच लखलखीत स्वर, हे मुद्दाम सांगण्यासारखे वैशिष्ट्य आहे. गाणे सुरु होण्याआधी बाईंच्या गळ्यातून *उपहासपूर्ण हास्य* ऐकायला मिळते. मुद्दामून ऐकण्यासारखे आहे. हसण्याचे देखील किती विलोभनीय प्रकार असतात, हे कळून घेता येते आणि इथूनच बाई आपल्या गायकीला सुरवात करतात. *जाओ रे* इथे *रे* अक्षरावरील *एकार* ऐकताना, पुढील गायनाची चुणूक मिळते. पुढे *ये हैं प्रेमियों की नगरी* हे गाताना *ये* अक्षरावर किंचित वजन देऊन गायले आहे. "ये प्रेमियो की नगरी है" हे बजावणारे *वजन* आहे. ललित संगीतात खरे सौंदर्य हे अशाच बारीक,बारीक गोष्टींतुन बघायचे असते. स्पष्ट आणि दीर्घ तान हे चकित करतेच परंतु अशा अस्पष्ट गोष्टी त्या गायनाला नेहमी *भरीव* करतात. पुढे *यहाँ प्रेम ही हैं पूजा* गाताना *पु जा* गाताना दोन्ही अक्षरांतून फार बारीक, बारीक हरकती घेतल्या आहेत आणि हे खरेच अवघड आहे कारण जरी शब्द फोडला असला तरी त्या शब्दाचे वजन कुठेही भरकटत नाही आणि बाईंचे गायनी अंग कळते. *पूजा* गाताना पहिल्या अक्षरावर *उकारयुक्त* हरकत तर दुसऱ्या अक्षरावर *आकारयुक्त* हरकत आणि यातील काल,*क्षण* देखील मोठा वाटावा, इतका लवमात्र!!
पहिला अंतरा दुसऱ्यांदा घेताना, वरच्या सुरात केलेली सुरवात, क्षणात बदलू मुखड्याला समांतररीत्या जुळवून घेतली आहे. हा बाईंच्या गळ्यावरील अधिकार. आपण म्हणू त्याप्रमाणे गळा *वळवून* घेऊ शकतो. हे फार अवघड आणि असामान्य आहे. याच अंतऱ्यातील *प्रेम बिना ये जीवन दुःख हैं* या ओळीतील *दुःख* शब्द घेताना लावलेली *पम* स्वराची संगती किती परिणामकारक असू शकते, हे ऐकण्यासारखे आहे. हाच शब्द पुन्हा घेताना *गरे रेसा* या वेगळ्याच सुरांत घेतले आहे. अर्थात, हे गाणे जेंव्हा ऐकायला घ्याल, तेंव्हा या आणि अशा अनेक जागा, लताबाईंनी सुश्राव्य करून टाकलेल्या आहेत आणि म्हणूनच हे गाणे निव्वळ अप्रतिम गोडव्याचे झाले आहे.
जाओ रे जोगी तुम जाओ रे
ये हैं प्रेमियों की नगरी,यहाँ प्रेम ही हैं पूजा
प्रेम की पीड़ा सच्चा सुख हैं,
प्रेम बिना ये जीवन दुःख हैं. जाओ रे.....
जीवनसे कैसा छुटकारा
है नदिया के साथ किनारा, जाओ रे......
ज्ञान की कैसी सीमा ज्ञानी
गागर में सागर का पानी, जाओ रे......
(3) 66 38 Jao Re Jogi Tum Jao Film Amrapali - YouTube
Monday, 2 January 2023
प्रथम तुज पाहता
एक काळ, विशेषतः दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबई इथे *चाळ संस्कृतीचे* प्रचंड प्राबल्य होते आणि पर्यायाने एकत्र कुटुंब पद्धत रूढ झाली होती. २ खोल्यांत त्यावेळी ५,६ माणसे सहज रहात होती, अगदी जोडपी देखील. आता हळूहळू ही संस्कृती लयाला जायला लागली कारण टॉवर संस्कृती आणि *स्वातंत्र* याचा परिणाम. एकत्र कुटुंब पद्धतीत वैय्यक्तिक मातांना फारसा वाव नसायचा तसेच स्त्री तशी घरातच अडकलेली असायची. अर्थात या पद्धतीत फायदे तसेच तोटे नक्कीच होते आणि या पार्श्वभूमीवर मराठीत १९७१ साली प्रदर्शित झालेला *मुंबईचा जावई* चित्रपटातील एका सुमधुर गाण्याचा आस्वाद आज आपण घेणार आहोत.
फक्त २ खोल्यांचे घर, घरात सगळेजण *चाळसंस्कृतीत* मुरलेले. त्यामुळे जे काही करायचे ते फक्त २ खोल्यांच्या परिघात. आजच्यासारखी 2BHK सारखी चैन तेंव्हा नव्हती. बाहेरच्या खोली म्हणजे हॉल आणि रात्रीची झोपायची खोली. इतक्या छोट्या जागेत देखील माणसे मनोरंजन करून घेत असत. आज याचे नवल वाटण्यासारखी परिस्थिती आहे. घरात नाटकाची तालीम सुरु आहे, घरातील सर्वात वयस्कर माणसाचा *गृप* जमून पत्त्यांचा डाव टाकलेला आहे आणि तालमीनिमित्ताने गाणे सुरु आहे!! *प्रथम तुज पाहता* या गाण्याची ही अशी पार्श्वभूमी आहे. नेहमीप्रमाणे गाण्याकडे वळण्याआधी आपण गाण्यातील कवितेकडे वळूया.
मराठी चित्रपट संगीतात ग.दि.माडगूळकर नामक एक अलौकिक चमत्कार होऊन गेला. अस्सल मराठी संस्कृती पचवलेला आणि मराठी मातीशी अचूक नाते सांगणारा हा कवी होता. या माणसाने गाण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रसंग आपल्या शब्दाने अजरामर केले. मी असे चुकूनही म्हणणार नाही, माडगूळकरांची सगळी गाणी उत्तम होती. तशी कुणाचीच नसतात परंतु जिथे कविता *जमली* तिथे मात्र माडगूळकर *स्पर्श* नेहमी दिसून आला. कवितेसाठी त्यांनी संस्कृत साहित्य, महाराष्ट्रातील संत साहित्य, पंत साहित्य तसेच लोकगीतातून आढळणारी कविता, सगळे आत्मसात केले होते आणि प्रसंगोत्पात आपल्या कवितेत सढळ हाताने वापरले. तसे करताना, त्यांनी त्याच कल्पनांची *पुनर्रचना* केली आणि ती अशी बेमालूम केली की प्रत्यक्षात कुण्या संतांनी रचना केली असावी, असे सत्कृतदर्शनी वाटावे!! गेयता हा त्यांच्या कवितेचा मुख्य गाभा होता आणि त्यामुळे त्याच्या रचना संगीतकारांची आव्हानात्मक असायच्या.
आजचे गाणे, मी वर म्हटल्याप्रमाणे घरातील नाटकाच्या तालमीसाठी गायलेले गाणे आहे. प्रणय गीत आहे. आपल्या प्रेयसीला उद्देशून म्हटलेले गीत आहे. कवितेत काही अगम्य नसणे, ही माडगूळकरांची खासियत होती आणि तसे करताना, आशयाला नेहमीच समृद्धता प्रदान करण्याचे कौशल्य होते. प्रसंग पहिल्या वहिल्या भेटीचा आहे आणि तत्कालीन प्रणयी संस्कृती ध्यानात घेऊन,
*स्पर्श होता तुझा विसरलो भान मी,*
*धुंद श्वासातला प्राशिला गंध मी*
*नयन का देहही मिटुनी तू घेतला*
या ओळी वाचाव्या. इथे माडगूळकरांनी *प्राशिला* हे क्रियापद योजले आहे आणि ते किती चपखल बसले आहे. तसेच शेवटची ओळ वाचताना उत्कट प्रणयाची अभिव्यक्ती नजरेसमोर येते. *डोळ्यासमवेत देह मिटून घेणे* ही भावनाच किती काव्यमय आहे. माडगूळकरांनी सगळी मराठी संस्कृती समजून घेतल्याचे निदर्शक आहे. परिणामी चित्रपटातील प्रसंग अधिक परिणामकारक होतो.
मराठी चित्रपट संगीतातील एक अजरामर नाव म्हणजे सुधीर फडके. त्यांचीच स्वररचना या गीताला लाभली आहे. *कलावती* रागावर आधारित चाल आहे. कलावती राग मुळातला कर्नाटकी संगीतातला पण आता उत्तर भारतीय संगीतात चपखल सामावून गेला आहे. *रिषभ,मध्यम* वर्ज्य आणि *कोमल निषाद* व बाकी सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात.मागील आठवड्यात आपण *जनसंमोहिनी* रागाची ओळख करून घेताना जे स्वर बघितले , त्यातील फक्त *मध्यम* अधिक जास्तीचा स्वर वर्ज्य असतो अन्यथा रागाच्या चलनात बरेच साम्य आहे.अर्थात तांत्रिक भाग वगळला आणि गाण्याकडे वळले तर गाण्यात कलावती राग स्पष्ट दिसून येतो, अगदी पहिल्या आलापापासून.
गाण्याची चाल थेट मराठी रंगभूमीवरील गाण्यांची आठवण करून देणारी आहे. एकूण बांधणी देखील त्याच धर्तीवर केलेली आहे. अर्थात नाट्यगीतात बरेच वेळा *गायकी* केली जाते तास प्रकार इथे न अवलंबता, अगदी छोटेखानी पद्धतीने रागाचे स्वरूप पण मांडले आहे आणि नाट्यगीतांची *झलक* प्रस्तुत केली आहे. गायकी अंग आहे पण पसरटपणा नाही. चित्रपट गीताची ३ मिनिटांची मर्यादा पाळून, सादरीकरण केलेले आहे. इथे एक संगीतबाह्य बाब मांडायची आहे. अरुण सरनाईक यांनी केलेला अभिनय हा गाण्याच्या संदर्भात इतका नेमका आहे की प्रथमक्षणी तेच गात आहेत, असा भास व्हावा. अर्थात अरुण सरनाईकांकडे संगीताचे अंग असल्याने, त्यांना ते जमू शकले. चित्रपटातील गाण्यांवर अभिनय करणे, एकूणच फारसे गंभीर घेतले जात नाही म्हणून थोडक्यात उल्लेख केला इतकेच. अर्थात संगीतकार सुधीर फडक्यांनी कारकिर्दीच्या सुरवातीला पाध्येबुवांकडे रागदारी संगीताचे पायाभूत शिक्षण घेतले असल्याने, त्यांना या गाण्याची बांधणी नेमकी करणे सहज शक्य झाले. ताना, हरकती थोडक्यात कशा प्रकारे गाण्यात मिसळायच्या असतात, यासाठी हे गाणे उदाहरण म्हणून बघावे. गायकी अंग असला तरी सुधीर फडक्यांनी शब्दांवर कुठेही अन्याय होऊ दिला नाही. शब्दोच्चार स्वतः अचूक करायचे आणि गायक/गायिकेकडून सुद्धा अचूक काढून घ्यायचे, याचा त्यांना अगदी *ध्यास* होता, असे म्हणता येईल. कुठेही शब्द *मोडलेला* नाही आणि सांगीतिक अलंकार बिनचूक मांडायचा, हे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. गाणे तीनतालात आहे आणि एकूणच लय द्रुत आहे.
गायक रामदास कामत मुळातले रंगभूमीवरील गायक. पंडित जितेंद्र अभिषेकीबुवांकडे तालीम घेतलेले गायक.अर्थात गळ्यावर गुरूंच्या गायकीचा ठसा उमटणे स्वाभाविक आहे परंतु टी शैली पुसून स्वतःची गायकी त्यांनी नाट्यगीत गायनात प्रस्थापित केली. नाट्यगीत थोडक्यात कसे गावे, याच अचूक अंदाज, माझ्या मते २ गायकांना आला होता. १) पंडित वसंतराव देशपांडे आणि २) रामदास कामत. इथे तर त्याच धर्तीवरील चाल हातात आलेली तेंव्हा रामदास कामत यांची गायकी खुलली तर काय नवल. गाण्यातील पहिल्या आलापात स्वरचनेची चुणूक दाखवणे आणि गाण्याची सगळी सौंदर्यस्थळे विशद करणे, त्यांना सहज जमले आहे. अतिशय मोकळा आवाज आणि शक्यतो मध्य सप्तकात(च) गायन करणे, त्यांना जमत असे. वरच्या सप्तकात गायले नाहीत असे नव्हे पण तो बहुश:गायनाचा विस्तार करण्यासाठी. संगीतकाराने दिलेल्या चालीला अचूक न्याय देणे, हे गायकाचे प्रथम कर्तव्य आणि तिथे रामदास कामत यशस्वी झाले आहेत. मुखडा गाऊन झाल्यावरील हरकत मुद्दाम ऐकावी. हरकतीचा दीर्घ विस्तार सहजशक्य होता परंतु त्यांनी अगदी थोडक्यात गाऊन परिणाम साधला आहे. तसेच * जाग धुंदीतुनी मजसी ये जेधवा* या ओळींवरील किंचित गायकी मुद्दामून ऐकावी. ३ मिनिटांच्या गाण्यात सांगीतिक अलंकार कसे वापरावे, याचे सुंदर उदाहरण म्हणून दाखवता येईल.
गाणे रागदारी संगीतावर आधारित आहे पण रागातील सौंदर्याचे अर्क या गाण्यातून दिसतो आणि हेच या गाण्याचे खरे यश मानावे लागेल.
प्रथम तुज पाहता, जीव वेडावला
उचलून घेतले निज रथी मी तुला
स्पर्श होता तुझा विसरलो भान मी
धुंद श्वासातला प्राशिला गंध मी
नयन का देहही मिटुनी तू घेतला
जाग धुंदीतुनी मजसी ये जेधवा
कवळुनी तुजसी मी चुंबिले तेधवा
धावता रथ पथी पळभरी थांबला
(2) Pratham Tuzh Pahata - Arun Sarnaik, Ramdas Kamat, Mumbaicha Jawai Song - YouTube
Subscribe to:
Posts (Atom)