Friday, 30 December 2022
अलविदा अलविदा
खरंतर आजचा दिवस माझ्या लेखाचा नक्कीच नाही परंतु तरीही काहीशा आगंतुकपणे लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच शनिवार आणि रविवार हे सभासदांसाठी मोकळे ठेवलेले दिवस असल्याने, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. कालच्या लेखावर काही सभासदांनी माझे कौतुक केले, त्यात सौ.इंद्रायणी आंबेकर यांनी *अलविदा* शब्दांचा संदर्भ देऊन, या वर्षाचा शेवट करावा, असे सुचवले होते. कालपर्यंत तरी मी नक्कीच तसा विचार केला नव्हता पण आज सकाळी ती प्रतिक्रिया मेंदूत फिरायला लागली आणि वाटले, त्याच गाण्याच्या उत्तरार्धावर काही ४ शब्द लिहिता आले तर बघूया. अर्थात आज मी कसलीच पूर्वतयारी केलेली नाही तर जे *उस्फुर्तपणे* सुचेल, त्याला शब्दरूप देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेंव्हा हे *रसग्रहण* असेलच असे नाही पण गाण्याच्याच संदर्भात सगळे असेल.
*सलीम अनारकली* ही कथा, ज्या कथेला ऐतिहासिक आधार सापडत नाही तरीही आपल्या संस्कृतीत अजरामर झालेली कथा. एकप्रकारचे प्रणयी *मिथक* म्हणावे, इतकी अलोट लोकप्रियता लाभली आहे. अर्थात आपल्याकडे *हीर रांझा* जशी जोडगोळी अमाप लोकप्रिय झाली तशीच ही जोडी. त्याला *मुगल ए आझम* चित्रपटाने सोन्याचा वर्ख चढवला, हे खरेच आहे पण सांगीतिक दृष्टीने बघायला गेल्यास, नौशाद यांनी दिलेल्या गाण्यांपेक्षा सी.रामचंद्रांनी दिलेली गाणी निःसंशयरीत्या अधिक सुंदर आहेत आणि त्यातील हे *अलविदा* गीत तर कारुण्याचे एक प्रतीक बनून गेले आहे. विफल प्रेम हे आपल्या संस्कृतीला काही नवीन नाही. अगदी आपल्यासारख्या सामान्य आयुष्यात देखील आपल्या आजूबाजूला अशा घटना बघायला मिळतात. तरीही या कथेला अमरत्व प्राप्त झाले कारण त्याला मिळालेल्या संगीताची असामान्य जोड.
या कथेचे अपेशी शेवट होणे, हे तत्कालीन सामाजिक स्थितीला धरूनच होते. थोडा विचार केला तर सम्राट अकबरचे काहीही चुकले नव्हते. दरबारातील एक साधी नर्तकी, आणि तिला *सून* म्हणून कायमचे घरात आणायचे आणि स्वीकारायचे!! आज देखील याला फारशी मान्यता मिळत नाही तर त्यावेळच्या *कडव्या* प्रकृतीला पसंत पडणे अशक्यच होते. तेंव्हा या कथेचा शेवट दुःखांत होणे, हे अटळ प्राक्तन होते. त्यातून आपल्याकडे दुःखाला मान्यता देणे, अशी मानसिक वृत्ती असल्याने, या कथेला लोकप्रियता लाभली.
आता गाण्याकडे वळायचे झाल्यास, काळ आपण पहिल्या भागात प्रणयी थाटाचा आविष्कार बघितला तर आता याचा अटळ दुःखी भाग बघायचा आहे. गाण्याची सुरवातच मुलाची विरही स्वरांनी केलेली आहे आणि तिथेच गाण्याच्या बांधणीची कल्पना येते. दीर्घ *आकार* घेऊन गाणे सुरु होते. अनारकलीला भिंतीत चिणून मारायची शिक्षा मिळते आणि त्या शिक्षेची तजवीज सुरु असतानाचे हे *मूक आक्रन्दन* आहे. आपला अनिवार्य शेवट जवळ आला आहे आणि आपल्या सगळ्या स्वप्नांचा पालापाचोळा बघणे, हेच नशिबी आलेले आहे, या हताश व्यथेतून उमटलेले सांगीतिक *रुदन* आहे. अर्थात या क्षणी आपण काहीही करू शकत नाही, ही जाणीव आतून पोखरत असताना, असाच विरही आलाप, त्या प्रसंगाची विखारी जाणीव अधिक गडद करतो. गाण्याचा सगळा वाद्यमेळ याच भावनेला अनुलक्षून बांधलेला आहे. या गाण्याचे खरे मानकरी पुन्हा संगीतकार सी.रामचंद्र आणि गायक लताबाई, हेच ठरतात.
गाण्यातील तालाच्या मात्रा देखील *दबक्या* आवाजात ठेवलेल्या आहेत, जेणेकरून गाण्यातील *आर्तता* कुठेही *गढूळ* होऊ नये. *सुना रही हैं दास्ताँ* ही ओळ मुद्दामून ऐकण्यासारखी आहे. व्याकुळतेचा एक क्षण गोठला जावा, तसा तो स्वर आहे. हरल्याची भावना आहे पण त्यातही स्वत्व राखले आहे.जिवंत मरण स्वीकारायची धमक आहे आणि लाचारी तर कुठेच नाही. *फ़िज़ा में भी खिल रही, ये कली अनार की* या ओळीत *कली अनार की* या शब्दात किती सुंदर श्लेष साधला आहे. *इसे मज़ार मत कहो, ये महल हैं प्यार का* मघाशी मी जे म्हटले, मरण स्वीकारताना देखील मनाचा पीळ तुटलेला नाही आणि हेच या ओळीतून दृग्गोचर होते.
हे गाणे म्हणजे प्रणयाची आर्त विराणी आहे, एका शोकमग्न मनाचा आकांत आहे. संपूर्ण गाणे म्हणजे आक्रन्दन आहे, ज्या गोष्टीवर हक्क मिळायचा तिथे फक्त विफलताच भोगायला लागण्याची अतृप्त जाणीव आहे.
खरंतर हा दुसरा भाग देखील तितकाच अलौकिक आहे आणि त्याच्यावर सखोल विचार करून लिहायला हवे. परंतु आयत्यावेळेस जे मनात आले, तेच शब्दबद्ध केले.
अर्थात आज वर्षाचा शेवटचा दिवस आणि आपण सगळेच तो आनंदात साजरा करतो. तेंव्हा या गाण्याचा आस्वाद देखील आनंदात घेऊन सरणाऱ्या वर्षाला *अलविदा* करूया. यापेक्षा मी तरी वेगळे काय म्हणणार.
दो दिल यहाँ न मिल सके, मिलेंगे उस जहॉं में
खिलेंगे हसरतों के फूल, मौत के आसमान में
ये जिंदगी चली गयी जो प्यार में तो क्या हुआ
सुना रही हैं दास्ताँ, शमा मेरे मज़ार की
फ़िज़ा में भी खिल रही, ये कली अनार की
इसे मज़ार मत कहो, ये महल हैं प्यार का
ऐ जिंदगी की शाम आ,तुझे गले लगाऊं मैं
तुझी में डूब जाऊँ मैं
जहाँ को भूल जाऊँ मैं
बस एक नज़र मेरे सनम अलविदा........
(1) Yeh Zindagi Usi Ki Hai - Lata Mangeshkar, Anarkali Song - YouTube
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment