Friday, 23 December 2022
काहे तरसाये जियरा
फार पूर्वीच्याकाळी भारतात जेंव्हा नंद किंवा चालुक्यांचे तसेच मौर्यांचे राज्य होते, तेंव्हा पासून दरबारात *राजगायक*,*राजज्योतिषी* तसेच *नृत्यांगना* नोकरीवर ठेवायची पद्धत होती आणि ही पद्धत अगदी मागील २ शतकांपर्यंत अव्याहतपणे चालू होती. परिणामी, कलासंस्कृती निश्चितच बहरून आली. अशा राजदरबारी संस्कृतीचे चित्रण हिंदी चित्रपटात अधून मधून होत राहिले. अर्थात अशा चित्रपटांतून संगीताचे महत्व अधोरेखित केले गेले आणि रसिकांना बरीच सांगीतिक मेजवानी मिळाली. असाच एक चित्रपट १९६४ साली प्रदर्शित झाला. चित्रपटाचे आर्थिक यश बेतासबात होते. मात्र त्यातील गाणी आजही निरंतर ऐकायला मिळतात. किंबहुना संगीतकार रोशन यांच्या कारकिर्दीतील काही असामान्य चित्रपट आहेत, त्यातील हा एक महत्वाचा चित्रपट गणला जातो. चित्रपट मौर्य कालीन संस्कृतीवर आधारित असल्याने चित्रपटीय भाषा ही शुद्ध हिंदी आहे तसेच एकूण वातावरण त्याला अनुसरून असेच आहे.
आजच्या गीतातील कविता ही साहिर लुधियान्वी यांची आहे. महत्वाचा भाग म्हणजे चित्रपटातील वातावरण बघून साहिर यांनी सगळ्याच कवितांची भाषा फक्त हिंदी अशीच ठेवली आहे.अर्थात भाषिक महत्व अनुसरून त्यांनी निव्वळ अप्रतिम रचना केल्या आहेत. वास्तविक साहिर प्रामुख्याने उर्दू भाषिक रचना करणारे म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत तरीही एक आव्हान म्हणून स्वीकारले. अर्थात हे त्यांनी पुढे एका मुलाखतीत सांगितले होते. आता नृत्यगीत म्हटल्यावर कवितेचे बाह्यात्कारी रूप तरी बंदिश सदृश असावे, असा एक संकेत आहे. कवितेत *नीत* शब्द बऱ्याच वेळा उपयोगात आणला आहे. *नीत* म्हणजे *नीट* असा एक अर्थ मिळतो परंतु हाच शब्द पुनरावृत्त झालेला आढळतो आणि याचे निव्वळ एकच कारण संभवते, स्वरिक लयीची मागणी. हि अर्थात एक तडजोड म्हणायला हवी परिणामी इतर कवितांमध्ये साहिरचा एक स्पष्ट ठसा उमटलेला दिसतो, तसे इथे काहीही वाचायला मिळत नाही. अर्थात नृत्यगीत म्हटल्यावर शाब्दिक प्रतिभेला तसा फारसा वाव नसतो म्हणा. एकूणच असे म्हणता येईल, जरी कविता साहिरची असली तरी फार अपेक्षा बाळगणे ठीक नाही. याचा दुसरा भाग असा मांडता येईल कविता चित्रपट गीताची मागणी पूर्ण करते. मी याच चित्रपटातील *मन रे तू काहे ना धीर धरे* किंवा * संसार से भागे फिरते हो* यांच्याशी तुलना करून मत मांडले आहे.
वर मी उल्लेख केल्याप्रमाणे, प्रस्तुत चित्रपटातील गाणी हा रोशन यांच्या कारकिर्दीतील फार सृजनात्मक कौशल्याचा भाग आहे. रागाधारित गाणी द्यायची वेळ आली तेंव्हा रोशन यांनी आपले सर्जनशील कौशल्य अप्रतिमरीत्या योजलेले आढळून येते. मुळातले *तंतकार* असल्याने शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास झालेला होता. प्रस्तुत गाणे *कलावती* रागावर आधारित आहे. बघितले तर कलावती राग हा उत्तर भारतीय संगीताने, कर्नाटकी संगीतातून घेतलेला आहे पण तसे करताना, त्याचे मूळ स्वरूप कायम ठेऊन, धाटणी बदलली आहे. आता गाण्याच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास, गाण्यात बहुतांशी रागाचे स्वरूप जवळपास तसेच ठेवले आहे. थोडे तांत्रिक बघायचे झाल्यास,
सां सांसांसां नि(को) धप ध---- }
का हेss तss रss साs एsss }
गप पध ध सां
जिs यs राss
(इथे *सां* म्हणजे वरचा *सा* असे गृहीत धरले आहे)
आता आपण कलावती रागाचे चलन बघितले तर या स्वरावलीशी बरेच साम्य आढळते. *रिषभ* आणि *मध्यम* वर्ज्य असलेल्या रागात *कोमल निषाद* स्वराचे प्राबल्य आढळते. * प ध नि(को) ध* किंवा *ग प ध सा नि(को)* अशा प्रकारचे चलन ऐकायला मिळते. आता हे स्वर वरील गाण्याच्या संदर्भात ताडून बघितल्यावर साम्यस्थळे सापडतात.
तांत्रिक भागाच्या व्यतिरिक्त गाण्याकडे बघायचे झाल्यास गाण्यात *तीनताल* आणि *केहरवा* ताल योजलेला आहे. संगीतकार रोशन यांच्या स्वररचना या नेहमीच *गायकी* अंगाकडे वळणाऱ्या असतात. परिणामी गायक किंवा गायिका, त्या चाली गाण्यासाठी *सक्षम* असणे महत्वाचे. रचनेत अनेक *कंगोरे* असतात जे गाताना स्पष्टपणे दाखवणे आवश्यक असते आणि तीच रचनेची सौंदर्यस्थळे असतात. या गाण्याची सुरवातच *वरचा सा* या स्वराने होते आणि तिथे तो स्वर ठळकपणे *दिसायला* हवा. शक्यतो ललित संगीतात असे फारसे घडत नाही. गाण्यात अनेक *खटके* आहेत आणि एकूणच नृत्यगीत असल्याने, या खटक्यांनी गाणे अधिक श्रवणीय बनते. संगीतकार मूळचा तंतकार असल्याने, गाण्यात वाद्यांचा *सुजाण* उपयोग ऐकायला मिळतो. याचा अर्थ असा नव्हे, जे संगीतकार तंतकार नाहीत, त्यांच्या गाण्यात हा विशेष बघायला मिळत नाही. परंतु *वादक* असल्याचा फायदा, वाद्यमेळ रचना तयार करताना बराच होतो. रोशन यांच्या गाण्यात एकूणच स्वररचना आणि वाद्यमेळ हे शक्यतो *मध्य सप्तक* किंवा *कोमल सप्तक* या पट्टीत असतात. *पखवाज* आणि *सतारीच्या* बोलांनी गाण्याला सुरवात होते आणि सतारीच्या सुरांतूनच कलावती राग स्पष्ट होतो. अर्थात कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी अधिकाधिक *तार सप्तक* वापरल्याचे आढळते पण त्याची खरंच गरज होती का? असो, गाण्यात अर्थातच बव्हंशी भारतीय वाद्ये आहेत, जरी व्हायोलिन परदेशी वाद्य असले तरी ते आता भारतीय संगीतात कायमचे स्थिरावले आहे. गाण्यातील हरकती अतिशय सुरेख आहेत. उदाहरण बघायचे झाल्यास, वरील स्वरावलीतून घेता येईल. *काहे तरसाये जियरा* ही ओळ घेताना *का* शब्द लांबवला आहे आणि तो आलाप खरंच फार कठीण आहे. रचना द्रुत लयीत असल्याने, लयीच्या ओघात बरेचवेळा काही ताना लक्षात येत नाहीत.
आशा भोसले आणि उषा मंगेशकर भगिनी द्वयीनीं एकत्रित गायलेली गणिताशी फार दुर्मिळ असावीत. तसे बघितले या गाण्यावर आशा भोसले यांच्या गायकीचा प्रभाव अधिक दिसतो. दोन्ही गायिंकांनीं एकत्रच गायनाला सुरवात केली आहे आणि जवळपास संपूर्ण गाणे दोघींनी एकत्रच गायले आहे. कुणीही *स्वतंत्रपणे* ओळ गायली आहे, असे घडत नाही. फक्त काही *जागा* स्वतंत्रपणे घेतल्या आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास, पहिल्या अंतऱ्याची ओळ *नीत नीत जागे ना, सोया सिंगार* ही ओळ पुनरावृत्त करताना *जागे ना* या शब्दांवर आशा भोसले यांच्या गायनाचे क्षणभर *अस्तित्व* ऐकायला मिळते पण ते इतके अल्प आहे की नीट कान देऊन ऐकायला हवे.
पहिल्या प्रथम तर दोन्ही आवाज अगदी *एकजीव* झाल्यासारखे भासतात परंतु बारकाईने ऐकल्यावर त्यातील *वेगळेपण* ध्यानात येते आणि ते साहजिकच आहे. मजेचा भाग म्हणजे रचनेतील बारकावे देखील एकत्रित गाताना *सहभाव* ऐकायला मिळतो.
असे ऐकल्यावर असेच मनात येते, या दोन्ही बहिणींनी आणखी एकत्रितपणे गायला हवे होते.
काहे तरसाये,जियरा
यौवन रुत सजन, जा के न आये
नीत नीत जागे ना, सोया सिंगार
झाँझर झन झनन, नीत ना बुलाये
काहे तरसाये,जियरा
नीत नीत आये ना, तन पे निखार
पवन मन कमल, नीत न खिलाये
काहे तरसाये,जियरा
नीत नीत बरसे ना,रस की पुहार
सपन जल गगन, नीत ना लुटाये
काहे तरसाये,जियरा
https://www.youtube.com/watch?v=5hZ2SVxgBho
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment