Thursday, 1 December 2022
कोई गाता मैं सो जाता
क्षितिज जसे दिसतें, तशी म्हणावी गाणी;
देहावरची त्वचा आंधळी,छिलून घ्यावी कोणी.
गाय जशी हंबरते, तसेच व्याकुळ व्हावे;
बुडता बुडता सांजप्रवाही, अलगद भरुनी यावे.
कवी ग्रेस यांच्या "संध्याकाळच्या कविता" या संग्रहातील ओळी. वाचतानाच कुठेतरी घशात काहीतरी अडकून, आवंढा घेता येणे देखील अवघड व्हावे, तशी प्रचिती या ओळी वाचताना येतात. ग्रेस यांची कविता अगम्य,दुर्बोध म्हणून अधिक प्रसिद्ध आहे तरीही या ओळी वाचताना त्याचा प्रत्यय जरादेखील येत नाही. प्रत्येक प्रतिमा इतकी नेमकी आणि अचूक आहे की तिथे कुठलाच प्रतिशब्द घेणे पाप ठरेल. सुंदर कवितेचे हे एक लक्षण मानले जाते. तिथे केवळ शब्दच नव्हे तर अक्षर देखील नेमके असते. आशयाशी घट्ट नाते जोडणारे असते. आजचे आपले गाणे असेच आहे. आयुष्य हरवल्याची भावना आहे, व्यक्त होणे अवघड झाले आहे आणि तरीही आयुष्य पुढे पसरलेले आहे. हताशता आणि व्याकुळ होण्याच्या क्रिया एकाच वेळी अनुभवायला लागत आहेत.
आजच्या गाण्याचे कवी आहेत, हरिवंश राय बच्चन. हिंदीमधील प्रतिथयश नाव. प्राय: कवी म्हणून अधिक प्रसिद्ध. चित्रपटासाठी त्यांनी फार तुरळक गाणी लिहिली आहेत. त्यांचे *मधुशाला* हे दीर्घ काव्य अतिशय प्रसिद्ध आणि मान्यताप्राप्त लेखन आहे. त्यांच्या रचना या प्रामुख्याने हिंदी भाषेतून केलेल्या आहेत. आजची कविता देखील या विधानाचे प्रमाण म्हणून मानता येईल. वरती मी लिहिल्याप्रमाणे, पूर्ण खंतावलेल्या मनःस्थितीचे वर्णन कवितेत केले आहे. पहिल्या अंतऱ्यातील ओळी - सुख दुख की लहरो पर उठ गिर, बहता जाता, मैं सो जाता, आपल्याला हेच दर्शवतात. पुढे याच भावनेचे विस्तारीकरण आहे. *कारा जल* किंवा *हालाहल* अशा शब्दांतून आपल्याला कवितेचा आशय स्पष्ट होतो. कवितेच्या शेवटी मात्र - कोई अपने सूर में मधुमय कर, बरसाता, मैं सो जाता, या ओळी मात्र वेगळ्या आहेत. *मधुमय* शब्द देखील किती देखणा आणि नेमका आशय वयात करणारा आहे. सगळी कविता व्याकुळ मनःस्थितीची असताना, शेवट मात्र *सूर में मधुमय* अशा आशावादी शब्दांनी केला आहे. कविता समजायला अगदी सोपी आहे.
संगीतकार जयदेव यांची स्वररचना आहे. १९७० च्या सुमारास हिंदी चित्रपट संगीताने कात टाकून पाश्चात्य संगीताची उघडपणे कास धरली. सगळीकडे पाश्चात्य संगीताचे सूर घुमत होते पण काही अपवाद संगीतकार, खैय्याम तसेच जयदेव यांनी मात्र भारतीय संगीताचीच पाठराखण केली. अर्थात आपल्या वाद्यमेळात जयदेव यांनी पाश्चात्य वाद्यांचा सढळ वापर केला परंतु मूळ ढाचा त्यांनी भारतीय(च) ठेवला. जयदेव यांच्या चाली कितीही सोप्या वाटल्या तरी आपल्या स्वररचनेत कुठेतरी बौद्धिक अंश असलाच पाहिजे, असा आग्रह दिसायचा. परिणामी सोपी वाटणारी चाल, एकदम गळ्याची परीक्षा बघणारी व्हायची. मग लयीचे अंग वेगळे असायचे किंवा तालाच्या मात्रांमध्ये फरक करायचा इत्यादी प्रयोग चालायचे. बरेचवेळा स्वरांच्या ठेवणीत फरक करायचा आणि ऐकणाऱ्याला चकित करून टाकायचे. वेगळ्या शब्दात समेची मात्रा तीच ठेवायची परंतु त्या मात्रेपर्यंत चालणार स्वरिक प्रवास वेगवेगळ्या वाटेने करायचा.
*बिहाग* रागावर आधारित चाल आहे. चित्रपटातील प्रसंग बघता, रागाची निवड अचूक वाटते. गाणे उघड,उघड गायकी अंगाचे आहे. परिणामी स्वरविस्ताराच्या अनेक जागा स्पष्टपणे दिसतात. मुखडा बारकाईने ऐकल्यावर, पहिल्या अंतऱ्याकडे वळताना, उठावण इतकी वेगळी आहे की प्रश्न पडतो, अंतऱ्यावरून मुखड्यावर कसे येणार? परंतु बारकाईने चालीतील स्वरांचा प्रवास बघितल्यावर आपण जयदेव यांच्या कुशाग्रतेला दाद देतो. तसेच शेवटचा अंतरा देखील असाच वेगळ्या सुरांवर सुरु होतो आणि समयोचितपणे अस्ताईवर पोहोचतो. गाण्यात बऱ्याच ठिकाणी छोट्या,छोट्या हरकती आहेत आणि त्याकडे लक्ष दिल्यावर ध्यानात येईल, जयदेव संगीतकार म्हणून किती वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
गायक येशुदास आहेत. कर्नाटकी संगीताचे पायाभूत शिक्षण घेतले असल्याने, गळ्यातून ताना, हरकती,उपज वगैरे अलंकार सहजपणे निघतात. दक्षिण भारतात येशुदास यांचे नाव प्रतिष्ठित आहे. सातत्याने कर्नाटकी संगीताचे जलसे करीत असतात. त्यामानाने हिंदी चित्रपटसृष्टीत ते फारसे स्थिरावले नाहीत. अर्थात याचे एक कारण असे दिसते, गळ्यावर चढलेला कर्नाटकी ढंग, हिंदी गाण्यांच्या बाबतीत अडसर ठरला असावा. विरोधाभासाने हरिहरन हे गायक म्हणून ऐकावेत. हिंदी गाणी गाताना, गळ्यावरील कर्नाटकी संगीताचा मागमूस देखील दिसत नाही. अस्खलित हिंदी शब्दोच्चार असतात. येशुदास यांच्या बाबतीत तीच एक अडचण ठरली असावी. या गाण्यात देखील, शब्दोच्चार तर दाक्षिणात्य थाटाचे आहेतच परंतु स्वरोच्चारावर देखील त्याचा असर दिसून येतो. शब्द अचूक उच्चारले आहेत पण शब्दांमागील भावना मात्र कर्नाटकी थाटाची आहे. एक विक्षेप म्हणून हे सांगत नाही कारण इतर अनेक दाक्षिणात्य गायक हिंदी चित्रपटांसाठी गाऊन गेले किंवा गात आहेत.
दुसरा मुद्दा असा येतो, येशुदास यांनी आपले कार्यक्षेत्र दाक्षिणात्य राज्यांपुरते मर्यादित ठेवलेआणि तिथेच आपली कारकीर्द घडवायचे नक्की केले. त्यातून कर्नाटकी शास्त्रीय संगीताचे गायक असा नाहक शिक्का बसला. एकदा का एखादा शिक्का बसला की त्यातून बाहेर पडणे निरतिशय कठीण. वास्तविक आवाज सुरेल आहे, तिन्ही सप्तकात लीलया फिरणारा गळा लाभलेला आणि संगीताचा पायाभूत अभ्यास असल्याने, कुठल्याही प्रकारचे गाणे गायला अडचण पडू नये. असेअसताना, त्यांनी जी काही हिंदी गाणी गायली, त्या गाण्यांवर भारतीय संगीताची छाप असेल अशीच गाणी त्यांना मिळाली. पाश्चात्य ढंगाची गाणी ते गाऊ शकले असते का? हिंदी चित्रपटासाठी गायन करायचे म्हटल्यावर इथे वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाता येणे गरजेचे असते.
असे असून देखील प्रस्तुत गीत त्यांनी अतिशय वेधक पद्धतीने गायले आहे. कवितेतील भाव जाणून घेऊन, स्वरांतून तोच भाव परिणामकारकपणे ऐकायला मिळतो.
अर्थात हा चित्रपट (आलाप चित्रपट) तिकीटबारीवर सपशेल आपटला आणि नियमानुसार हे गाणे आणि या चित्रपटातील इतर सर्वांगसुंदर गाणी मातीमोल झाली!! असे व्हायला नको होते.
कोई गाता मैं सो जाता
संस्त्रीती के विस्तृत सागर पर
सपनों की नौका के अंदर
सुख दुख की लहरो पर उठ गिर
बहता जाता, मैं सो जाता
आँखो में भर कर प्यार अमर
आशिश हथेली में भर कर
कोई मेरा सिर गोदी में रख
सहलाता, मैं सो जाता
मेरे जीवन का कारा जल
मेरे जीवन का हालाहल
कोई अपने सूर में मधुमय कर
बरसाता, मैं सो जाता
कोई गाता मैं सो जाता
Koi Gaata Main So Jaata - Alaap(1977).mp4 - YouTube
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment