Monday, 19 December 2022

बदली बदली दुनिया है मेरी

आपल्या संगीताच्या विश्वात असंख्य दंतकथा आहेत, अनेक परंपरा आहेत तसेच अनेक आख्यायिका देखील आहेत. यातील कशाचेच फारसे विश्लेषण होत नाही किंवा त्याबाबत फारशी विचक्षण दृष्टी दाखवली जात नाही. आपण या सगळ्या गोष्टीवर बिनदिक्कतपणे विश्वास ठेवतो किंवा फारसा विचार देखील करत नाही. *तानसेन* ही अशा काही व्यक्तींपैकी एक व्यक्ती. तानसेन या राजगायकाचा भारतीय संगीतावर प्रचंड पगडा आहे. खरंतर आजही *रागनिर्मिती* या विषयाबाबत फारशी माहिती हाती लागत नाही. जे *गुरुमुखी* आहे, तेच प्रमाण मानले जाते. परिणामी *पोपटपंची* देखील बोकाळली, हे सत्य आहे. तानसेन , शहेनशहा अकबर यांच्या दरबारी *राजगायक* म्हणून होते, असे सांगितले जाते. तद्नुषंगाने, त्यांनी काही रागांची निर्मिती केली, असे देखील सांगण्यात येते. दुसऱ्या बाजूने, तानसेन यांच्या गायनाच्या आख्यायिका किंवा दंतकथा म्हणून, या भरपूर पसरलेल्या आहेत, जसे *मल्हार* गायल्याने पाऊस पडणे किंवा *दीप* रागाने दिवे पेटणे, इत्यादी. या किश्श्यांमागील खरेखोटेपणा फारसा तपासला जात नाही. किंबहुना अशी गोष्टींवर विश्वास ठेवणारे बरेच भेटतात. अशा *दंतकथा* झालेल्या तानसेन, या व्यक्तीवर *संगीतसम्राट तानसेन* हा चित्रपट निघाला. अर्थात नावानुसार चित्रपटात गाणी आणि संगीताचा प्रादुर्भाव असणे, क्रमप्राप्तच ठरते. आजचे आपले गाणे याच चित्रपटातील आहे. वास्तविक अशा संगीतमय वातावरणातील चित्रपटात जरी गीतातील शब्दांना महत्व असले तरी एकूणच बऱ्याच मर्यादा पडतात कारण जे काही आहे ते संगीताच्या अनुषंगानेच लिहायचे. आता या पार्श्वभूमीवर आपण गीतातील कविता बघूया. या गाण्यातील काव्य सुप्रसिद्ध शायर शैलेंद्र याचे आहे. शैलेंद्र यांच्या काव्याची नाळ हिनेहमीच भारतीय मातीशी जोडलेली असते. भारतीय संस्कृतीचा नेमका गाभा बरेच वेळा अत्यंत साध्या, सोप्या शब्दातून मांडलेला वाचायला मिळतो. आयुष्यात आपल्यावर जीव जडवणारी प्रेयसी मिळाल्यानंतरच्या भावभावनांचे प्रकटीकरण आहे. *बदली बदली दुनिया है मेरी, जादू है ये क्या तेरे नैनं का* याला ओळीतून हाच आशय मिळतो. पुढील दोन्ही कडव्यांतून याचीच प्रचिती येते. शैलेंद्र आपल्या रचनेत, उर्दू आणि हिंदी शब्दांचा अचूक वापर करून, कविता अधिक सुंदर करतात. पहिल्याच कडव्याच्या पहिल्या ओलित याचे प्रत्यंतर येते. *कहती थी सदा दिल की धड़कन* इथे, *सदा* हा उर्दू शब्द आहे आणि एकूणच ओळीच्या आणि कडव्याच्या घडणीत चपखल बसला आहे. चित्रपटाच्या कवितेमध्ये अत्यावश्यक असते टी *गेयता* आणिइथे वाचन करताना लगोलग जाणीव होते. शाब्दिक लयीतून ही गेयता स्पष्ट होते. शब्द वाचतानाच त्यातील अंगभूत लय जाणवते आणि हेच कवितेचे खरे बलस्थान म्हणावे लागेल. संगीतकाराला सक्षम चाल बांधायला प्रवृत्त करणारी शब्दरचना. संगीतकार आहेत एस.एन.त्रिपाठी. एकूणच भारतीय संगीताचे कट्टर पाठीराखे म्हणून त्यांचा लौकिक आहे. परिणामी त्यांना बव्हंशी संगीतप्रधान चित्रपट अधिक मिळाले. *झिझोटी* रागात चाल बांधली आहे. *निषाद* वर्जित *शाड्व/संपूर्ण* अशी स्वरस्थाने असलेला हा राग. शास्त्रकारांनी या रागाचा समय रात्रीचा द्वितीय प्रहार असा दिला आहे आणि चित्रपटातील गाण्याचा प्रसंग असाच जुळलेला आहे. चाल तशी साधी आहे पण तरीही काही ठिकाणी वक्र गतीच्या हरकती आहेत. स्वरिक वळणे फार सुंदर आहेत. मुखड्यातील *जादू है ये क्या तेरे नैनं का* या ओळीत *जादू है ये क्या* शब्दानंतरचे *वळण* फार देखणे आहे. अंतऱ्याची बांधणी सामान ठेवली आहे. अर्थात चालीच्या गोडव्यात, तसे *भासत* नाही!! खरतर हे गाणे गायन कलाकारांचे आहे, असे म्हणायला हवे. हिंदी चित्रपटात *नौशाद* यांनी स्वररचनेचा, त्याकाळी नवीन असलेला असा नवा आकृतिबंध सुरु केला आणि तो म्हणजे रागदारीत चाल करताना, शक्यतो रागाचे मूळ स्वरूप तसेच ठेवायचे. वास्तविक याची फारशी गरज नाही कारण आपण इथे रागदारी संगीताचे स्वरूप दाखवत नसून, काव्याच्या अनुषंगाने, पडद्यावरील प्रसंगांचे विस्तारीकरण दाखवायचे असते. त्यामुळे राग स्वरूप *शुद्ध* राखलेच पाहिजे हा आग्रह काहीसा अनाठायी म्हणायला हवा. बहुतांशी रचनाकार हे रागाच्या मूळ आकृतीची बाह्याकृती मदतीला घेतात आणि त्याची पुनर्रचना करून, त्यात स्वतःच्या प्रतिभेची झलक दाखवतात. परंतु *एस.एन.त्रिपाठी* किंवा *नौशाद* सारख्या रचनाकारांचे मत काहीसे वेगळे होते, हे नक्की. अर्थात हे चुकीचे आहे, हे दर्शविण्याचा जराही उद्देश नाही परंतु *सर्जनशीलता* बघण्याच्या दृष्टीने, त्याला मर्यादा पडतात. परिणामी हा संगीतकार काळाच्या ओघात फारच मागे पडला कारण चित्रपटात अनेकविध प्रसंग असतात आणि त्यानुसार गाण्यांची मागणी बदलत असते. इथे *लवचिकता* दाखवणे, महत्वाचे असते. मी फक्त भारतीय संगीत(च) वापरीत, असा आग्रह धरून चालत नाही. वाद्यमेळ रचताना याच दृष्टीचे प्रत्यंतर ऐकायला मिळते. अर्थात *तानसेन* सारख्या विषयावरील चित्रपट असल्याने, वाद्यमेळात भारतीय वाद्ये असणे, क्रमप्राप्तच ठरते. लताबाई आणि महेंद्र कपूर यांनी हे गाणे गायले आहे. लताबाईंच्या दृष्टीने अशी गाणी म्हणजे *हातखंडा* म्हणायला पाहिजे. महेंद्र कपूर मात्र या गाण्यात सुंदर, हळुवार गायला आहे. वास्तविक महेंद्र कपूरच्या आवाजाला फार मर्यादा आहेत. गायनावर मोहमद रफींचा प्रभाव जाणवतो पण तुलना केल्यास लवचिकता दुर्मिळ आहे.आवाजात बरेचवेळा *ताठरता* जाणवते, *खळ* लावलेल्या कापडाप्रमाणे बरेचवेळा त्यात ताठरपणा येतो.परिणामी भावना कमीच दिसतात. इथे मात्र त्याला *सूर* सापडलेलाआहे. वरती स्वररचनेबद्दल लिहिताना, काही सौंदर्यस्थळांचा उल्लेख केल्याप्रमाणे,गाताना त्यांनी गळ्यात लवचिकता आणलीय. त्यामुळे एकुणच गाण्यात *मृदुता* आली आहे. पहिला अंतरा थोडा वरच्या पट्टीत सुरु करताना, लताबाई नेहमीप्रमाणे आपल्या गळ्यातला *प्रसादगुण* प्रकर्षाने दाखवतात. *कहती थी सदा दिल की धड़कन* ही ओळ वरच्या पट्टीत घेऊन, हळूहळू पायऱ्या खाली उतरत *सच्ची है अगर ये तेरी लगन* इथे मुखड्याशी येऊन मिळते. हा भाग केवळ ऐकूनच अनुभूती घेण्यासारखा आहे. शब्द थिटे पडतात. त्यामुळे गाणे एकदम *श्रवणीय* झाले आहे. अर्थात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही आणि नेहमीप्रमाणे हे गाणे विस्मृतीत गेले. बदली बदली दुनिया है मेरी जादू है ये क्या तेरे नैनं का बनके कजरा मेरे अँखियो में रहा एक सुन्दर सपना बचपन का कहती थी सदा दिल की धड़कन तू बैठ बिछाके अपने नयन सच्ची है अगर ये तेरी लगन लौट आएगा साथी मेरे जीवन का इस रात को चाँद तले ये मिलन चुप देख रहा है नील गगन दोहरायेगा ये मध् मस्त पवन संगीत हमारी धड़कन का बदली बदली दुनिया है मेरी जादू है ये क्या तेरे नैनं का (2) BADLI BADLI DUNIYA HAI MERI - SANGEET SAMRAT TANSEN 1962 - YouTube

No comments:

Post a Comment