Tuesday, 14 July 2020

ओ सजना बरखा बहार आयी

"त्या व्याकुळ संध्यासमयी, शब्दांचा जीव वितळतो;
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे.... मी अपुले हात उजळतो. 
तू आठवणींतून माझ्या, कधी रंगीत वाट पसरशी 
अंधार-व्रताची समई, कधी असते माझ्यापाशीं......"
सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांच्या "संध्याकाळच्या कविता" या कविता संग्रहातील एका कवितेच्या या ओळी. वास्तविक कवी ग्रेस हे नेहमीच दुर्घट कवी म्हणून ओळखले गेले, कवितेचा अर्थ अति अगम्य होतो परंतु अशाही त्यांनी काही कविता लिहिल्या आहेत जिथे आशय सुस्पष्टपणे समोर येतो. आजच्या आपल्या गाण्याच्या बाबतीत, गाण्याच्या आशयाच्या दृष्टिकोनातून विचार केला तेंव्हा या ओळी मला एकदम आठवल्या. पुढे थोडा विचार केल्यावर "अंधार-व्रताची समई" हे शब्द आजच्या गाण्याला तितकेसे योग्य नाहीत असे जाणवले कारण आजच्या गाण्यातील मुग्ध प्रणयी भावनेला ही ओळ आपले नाते जुळवू शकत नाही तरीही "त्या व्याकुळ संध्यासमयी" किंवा "डोळ्यात कुणाच्या क्षितिजे" या ओळी मात्र चपखल बसतात आणि हाच मुद्दा पुढे ओढून आपण आजच्या गाण्याचा आस्वाद घ्यायला सुरवात करूया.

कवी शैलेंद्र यांना बऱ्याचवेळा "लोककवी" असे संबोधले जाते आणि याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी आपल्या मातीशी, संस्कृतीशी राखलेले अतूट असे नाते. अर्थात त्यामुळे त्यांच्या काव्यात बरेचवेळा लोकगीतांचा गंध असतो तर कधी बोली भाषेतील शब्द आढळतात. परिणामी त्यांच्या कविता या सामान्य माणसांना देखील आकळायला अवघड जात नाहीत. चित्रपट माध्यम जे नेहमी सगळ्या समाजाला आपल्या कवेत घेते आणि गरजेनुसार आपली सांस्कृतिक जडणघडण करते. अशा माध्यमात नेहमी "भावकविता" असणे गरजेचे नसते. बरेचवेळा रोजच्या वापरातले शब्द पडद्यावरील पात्रांच्या भावना सहजपणे व्यक्त करून जातात. आता खालील कविता वाचायला घेतल्यास, कुठेही आशय समजून घ्यायला अडचण येत नाही. चित्रपटातील नायिका नुकतीच प्रेमात पडलेली आहे आणि मागील शतकाच्या मध्यावधी काळातील प्रेम लक्षात घेता त्यात मुग्धपणा असणे सहज होते. पावसाळी संतत धार चालू आहे आणि नायिका काहीशी भावनावश होऊन आपल्या भावना व्यक्त करीत आहे. पडद्यावर हाच प्रसंग आहे आणि त्यानुरुपच कवी शैलेंद्र यांनी आपली शब्दकळा मांडली आहे. पावसाचे तर वर्णन आहेच परंतु त्याचबरोबर पावसातील निसर्गाच्या लीला ध्यानात घेऊन, प्रतीकात्मक रूपके वापरली आहेत. "रस की फुहार","सांवली सलोनी घटा" सारख्या प्रतिमा किंवा "मिठी मिठी अगनी में,जले मोरा जियरा" सारखी ओळ वाचताना आपल्याला अर्थ समजून घ्याल काहीही अवघड होत नाही.  
संगीतकार सलील चौधरी आजही प्रामुख्याने लक्षात आहेत ते, अतिशय प्रायोगिक पद्धतीचे संगीतकार म्हणून. केवळ चालीतच नव्हे तर वाद्यमेळात त्यांनी भरपूर प्रयोग केले. मुळात त्यांच्या संगीतात "ध्वनी" या घटकांबद्दल विशेष जाणीव दिसते मग तो ध्वनी वाद्याचा असेल किंवा गायकीमधील लय बांधतानाचा असेल. विशेषतः पाश्चात्य सिम्फनी संगीताबाबत (मोझार्ट आणि बीथोवन ही नावे प्रामुख्याने पुढे येतात) बाबत त्यांचा व्यासंग वाखाणण्यासारखा होता. आपल्या वाद्यमेळात त्यांनी पाश्चात्य सिंफनी संगीताचा जाणीवपूर्वक वापर केला. अर्थात इथे या गाण्यात मात्र त्यांनी संपूर्णपणे भारतीय संगीताचा वापर केला आहे. चाल सत्कृतदर्शनी "खमाज" रागावर आधारित असल्याचे दिसते. सुरवातीच्या सतारीवरील "ग म प ध" या सुरावटीने हा राग समोर येतो. त्यातही एक बारकावा असा आहे, मुखडा "कोमल निषाद" स्वरावर येऊन थांबतो. परंतु गीताला गीत म्हणून स्वरूप देताना राग बाजूला सरतो. वास्तविक हे गाणे, याच संगीतकाराने बंगाली भाषेत केलेल्या आपल्या रचनेचे हिंदी प्रारूप आहे. ( अशा प्रकारे सलील चौधरींनी आपली बरीच बंगाली गाणी हिंदी चित्रपटात आणली - उदाहरणार्थ " जा रे जारे उड जारे पंछी" किंवा "जिया लागे ना") हे गाणे ऐकताना गायकीबरोबर सतारीचे स्वर देखील मनात रुंजी घालतात इतके ठळक वैशिष्ट्याने सतार वाजली आहे. पहिला अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ या दृष्टीने ऐकण्यासारखा आहे. व्हायोलिनचे स्वर ऐकायला येत असताना त्याचबरोबर सतारीचे सूर ऐकावेत. व्हायोलिन काहीसे पाश्चात्य अंगाने वाजत आहे तर सतार भारतीय संगीताच्या अंगाने वाजत आहे पण याची "जोड" विलोभनीय पद्धतीने बांधली आहे. प्रत्येक अंतरा वेगळ्या सुरावटीने बांधला आहे. गाणे एका मुग्ध प्रेमाच्या सावलीत गायले जात आहे, मुखडा विलक्षण गोड आहे तेंव्हा मुखड्याचीच सुरावट, थोड्याफार फरकाने अंतऱ्यासाठी योजणे, हा सोपा मार्ग होता परंतु सलील चौधरींनी इथेच आपली बुद्धिमत्ता दर्शवली आहे. तसेच अंतरा संपताना गाण्याची लय दुगणित म्हणजे द्रुत केली आहे परंतु तसे करताना गाण्यातील मुग्धता कुठेही रेसभर देखील ढळत नाही. एक संगीतकार म्हणून अशा प्रकारे स्वररचना करणे हे कौतुकास्पद ठरते. 
गायिका म्हणून लताबाईंनी कमाल केली आहे. मुळातला टोकदार,पातळ आवाज परंतु इथे त्यांनी गाताना आवाज कमालीचा हळुवार ठेवला आहे जेणेकरून शब्द आणि स्वररचनेतील मार्दव दर्शविण्यात कुठेही कमतरता भासू नये. गाणे संथ लयीत सुरु होते, सुरवातीला लावलेला "ओ" कार देखील पुढे येणाऱ्या "सजना" शब्दाला जरूर तेव्हडा उठाव देणारा आहे. गाण्यातील अंतऱ्यांची "उठावण" वेगळ्या सुरांत होताना आणि पुढे लय बदलताना, आपल्या गळ्यातून सुरवातीला दाखवलेली "ऋजुता" कायम राखलेली आहे, परिणामी गायनाचा मनावर गाढा संस्कार होतो. एक उदाहरण - "मिठी मिठी अगनी में,जले मोरा जियरा" ही ओळ वाचल्यावर होणार संस्कार आणि लताबाईंनी गायल्यावर जाणवणारा परिणाम ध्यानात घेणे जरुरीचे ठरेल. संगीतकाराने दिलेल्या चालीतील "लपलेली" सौंदर्यस्थळे कशी दाखवावीत? या प्रश्नाचे, हे गायन एक समर्पक उत्तर ठरते. "प्यासे प्यासे मेरे नयन तेरे ही ख्वाबो में खो गये" या ओळीतील स्वप्नावस्था अशीच मूर्तपणे दर्शवली आहे. त्यामुळे हे सगळेच गाणे हा असामान्य स्वरिक अनुभव होऊन बसतो. 

ओ सजना, बरखा बहार आयी
रस की फुहार लायी, अखियों में प्यार लायी  

तुमको पुकारे मेरे मन का पपीहरा 
मिठी मिठी अगनी में, जले मोरा जियरा 

ऐसे रिमझिम में ओ सजन 
प्यासे प्यासे मेरे नयन तेरे ही ख्वाबो में खो गये 

सांवली सलोनी घटा जब जब छायी 
अखियों में रैना गयी, निंदिया ना आयी 
 


No comments:

Post a Comment