Saturday, 18 July 2020

दिल-ए-बेताब को सीने से लगाना होगा

"मी नखलत नाही शिरा कोवळ्या ओल्या 
    दुमडून कडांना दुखवत नाही देठ.... 
मी फक्त ठेवते उजेड हिरवा आत 
    अन प्रेमासाठी मिटून घेते ओठ.... "
सुप्रसिद्ध कवियत्री अरुण ढेरे यांच्या एका कवितेतील या ओळी आहेत. हल्लीच्या मुक्तछंदाच्या पार्श्वभूमीवर अशी छंदात्मक रचना वाचायला फार छान वाटते. आशय अगदी सरळ, सुस्पष्ट आहे. प्रणयी थाटाची कविता आहे आणि काहीशी दबकत व्यक्त केलेली प्रणयी भावना आहे. आधुनिक काळाच्या दृष्टीने हे देखील थोडे नवलाईचे!! नेहमीचा तरुण वयातला अनुभव आणि त्यावेळची ओलसर अभिव्यक्ती ही आपल्या आजच्या गाण्याच्या बरीच जवळपास जाणारी आहे. शायर शकील बदायुनी हे नाव उर्दू काव्यक्षेत्रात मानाने घेतले जाते. "ऐ मुहोब्बत, तेरे नाम पे रोना आया" सारखी अजरामर गझल, खासकरून बेगम अख्तर यांच्या आवाजात अतिशय लोकप्रिय आहे. आता उर्दू भाषिक कवी म्हटल्यावर कवितेत उर्दू शब्दांचा समावेश होणे साहजिकच ठरते. सुरवातच "दिल-ए-बेताब" या शब्दांनी करून पुढे कविता कशी जाणार आहे, याचे थोडे सूचन मिळते. ही कविता म्हणजे गझलेच्या वजनात लिहिलेली नज्म आहे. उर्दू भाषेच्या रचनेची एक खासियत सांगता येते आणि ती म्हणजे एखादी भावना मांडताना, त्याला काहीसे "धक्कान्तिक" स्वरूप द्यायचे जेणेकरून ऐकणारा स्तिमित होऊन जाईल. तसेच वर उल्लेखिल्याप्रमाणे "दिल-ए-बेताब" अशी शब्द तोडून शायरी लिहायची. यामुळे कवितेतील शब्दांना एक वेगळीच लय मिळते जी संगीतकाराला चाल बांधायला प्रवृत्त करते. ललित संगीतात असे एखादे अक्षर मदतीला आले की लगेच स्वररचनेच्या लयीला वेगळे परिमाण लाभते. एकूणच भारतीय चित्रपटात चावून चोथा झालेल्या प्रणयी भावनेवर नावीन्याने शब्दरचना करायची, हे तसे आव्हानात्मक म्हणायला हवे. "आज परदा हैं तो कल सामने आना होगा" ही ओळ तर मुस्लिम संस्कृतीचे प्रतीक म्हणायला लागेल. तसेच "दिल झुकाया है तो सर को भी झुकाना होगा" ही अभिव्यक्ती तर त्याच मुस्लिम संस्कृतीचे आजही असलेले व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. एकूण "पालकी"  चित्रपट संपूर्णपणे मुस्लिम संस्कृतीवर आधारित असल्याने शायरीत त्याचे प्रतिबिंब पडणे साहजिक ठरते. 
संगीतकार नौशाद यांनी या गाण्याला चाल लावली आहे. चाल "यमन कल्याण" रागावर आधारित आहे. (यमन आणि यमन कल्याण रागावर आधारित आजपावेतो इतक्या रचना झाल्या आहेत की असेच वाटते हे राग कधी संपणारच नाहीत!!) वास्तविक "शुद्ध मध्यम"आणि "तीव्र मध्यम" हाच खरा फरक आहे या दोन रागात. त्यातून ललित संगीतात प्रत्येकवेळेस रागाचे शुद्धत्व पाळलेच जाते असे फारसे घडत नाही आणि तशी फारशी आवश्यकता देखील नसते. परंतु नौशाद सारखे काही रचनाकार असे असतात, त्यांना ललित संगीतात रागाचे नियम पाळणे आवश्यक वाटते. अर्थात हा प्रत्येकाचा विचार आहे आणि ललित संगीताकडे बघण्याची दृष्टी आहे. गाणे सुरु होण्याआधीच्या सतारीच्या सुरांतून यमन कल्याण दिसायला लागतो. वाद्यवृंद प्रामुख्याने सतार,जलतरंग,व्हायोलिन या वाद्यांनी सजवलेला आहे. चाल बव्हंशी मध्य लयीत आहे. तसेच मुखडा आणि दोन्ही अंतरे हे एकाच चालीत बांधले आहेत. संगीतकार नौशाद हे आयुष्यभर भारतीय कलासंगीताची पाठराखण करीत आले (काही गाण्यांत त्यांनी पाश्चात्य वाद्यांचा वापर केला आहे आणि त्यात काही चूक नाही) आणि गाण्यात रागाचे मूळ स्वरूप राखण्याचा प्रयत्न करीत आले. इथेही हाच दृष्टिकोन सगळ्या रचनेत दिसून येतो. 
इथे एक मुद्दा मांडावासा वाटतो. इतर अनेक रचनाकारांप्रमाणे समोर आलेल्या चित्रपटीय गरजांप्रमाणे परिणामकारक चित्रपटसंगीत करण्यासाठी नौशाद यांनी भारतीय कलासंगीत परंपरेचा वापर केला. तसे पहाता त्यांनी जरी "आपण कलासंगीताचा यथायोग्य वापर करतो" असे स्पष्ट म्हटलेले असले तरी तो बऱ्याच प्रमाणात वरवर केलेला आढळतो आणि त्यासाठी त्यांनी योजलेले राग,ताल,संगीतप्रकार,शैली इत्यादींची पात्रता चित्रपटसंगीताच्या निकषांवर तपासून बघायला हवी आणि तसे केल्यास, यांसारख्या गीतांमुळे कलासंगीताचा प्रसार,रक्षण वगैरे विधाने फार गैरलागू ठरतात असे दिसून येते. असे असले तरी चित्रपट संगीताच्या आरंभीच्या काळात त्यांनी गीताचा स्वतंत्र असा साचा निर्माण केला, हे मान्यच करावे लागेल. सैगल काळात सुरवात केली परंतु लवकरच सैगल शैलीचा ठसा पुसून आपली शैली रूढ केली. आता या गाण्याच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, चाल तशी सरळ,साधी आणि सोपी आहे. यमन कल्याण रागाचा जो अंगभूत गोडवा आहे त्याचे प्रत्यंतर संपूर्ण गाण्यातून आपल्याला होते.  
कुणीही सर्वसाधारण प्रतीचा गळा,हे गाणे गाऊ शकेल आणि खरतर नौशाद यांची हीच इच्छा असायची (याला अपवाद म्हणून त्यांनी काही गाणी बांधली) नौशाद यांच्या प्रयत्नाने हिंदी चित्रपट गीतांचा आविष्कार जनताप्रिय म्हणून रुळावा यासाठी एक कार्यक्षम नमुना स्थिर करण्याच्या कार्यात मोठा वाटा आहे. सर्व प्रकारच्या विविधतेने भरलेल्या भारतासारख्या देशात नौशाद यांच्याच प्रयत्नांमुळे पुढच्या आणि पूढिलांचे कार्यासाठी एक व्यासपीठ तयार झाले.
या गाण्यात रफी आणि सुमन कल्याणपूर यांचे आवाज आहेत. रफी यांनी गाण्याचा एकूण भाव ओळखून आपली गायकी अनुसरली आहे. विशेषतः वरच्या स्वरांत गाऊन ऐकणाऱ्याला चकित करायचे, ही क्लुप्ती इथे पूर्णपणे टाळली आहे. अतिशय संयत गायन केले आहे आणि तोच प्रकार सुमन कल्याणपूर यांच्या गायकीबद्दल म्हणावे लागेल. अतिशय सुंदर गळा लाभलेल्या या गायिकेला हिंदी चित्रपटसृष्टीत म्हणाव्या इतक्या संधी मिळाल्या नाहीत त्यामुळे त्यांचे नाव दुर्दैवाने मराठी गाण्यांपुरते मर्यादित राहिले. अर्थातच हा तोटा हिंदी  भाषिक रसिकांचा झाला.या गाण्याची एकूणच "प्रकृती" अतिशय शांत आणि मुग्ध स्वभावाची असल्याने, गायन देखील त्याच मार्गाने झाले आहे. मुख्य म्हणजे जरा बारकाईने ऐकले तर गाताना कुठेही फारशी "शब्दफोड" झालेली नाही. काव्यात उर्दू भाषिक शब्द आहेत परंतु सुमन कल्याणपूर यांनी त्या शब्दांचे "वजन" अचूकपणे गाऊन दाखवले आहे. मुखडा एकत्र गायल्यानंतर पहिला अंतरा रफी आणि दुसरा अंतरा सुमन कल्याणपूर यांनी स्वतंत्र गायला आहे परंतु शेवटचा अंतरा पुन्हा एकत्र गायला आहे. प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो आणि त्यानुसार शब्दांचे तसेच अगदी अक्षरांचे उच्चार करणे ही ललित संगीताची प्राथमिक अट असते. रफी तर मुस्लिम तेंव्हा उर्दू भाषेची तालीम त्यांना जन्मापासून मिळाली होती परंतु मराठी गायक/गायिकांच्या बाबतीत काही वेळा प्रश्न उद्भवतो. इथे "झ" हे अक्षर त्या भाषेच्या वळणानेच गेले की ऐकायची खुमारी अधिक वाढते आणि इथेच सुमन कल्याणपूर यांचे उच्चार अचूक झाले आहेत. इथे "चुकीचे उच्चार केले तर काय बिघडते?" हा प्रश्न गैरलागू आहे कारण तुम्ही एका सक्षम कवितेचे गायन करत आहात तेंव्हा ती एक जबाबदारीच असते. 
इतके सुंदर गायन झाल्यावर सुद्धा हे गाणे आज तसे विस्मृतीत गेले आहे!! 

दिल-ए-बेताब को सीने से लगाना होगा
आज परदा हैं तो कल सामने आना होगा 
आपको प्यार का दस्तूर निभाना होगा 
दिल झुकाया हैं तो सर को भी झुकाना होगा 

अपनी सुरत को तू ऐ जाने वफा यूं ना छुपा 
गर्मी-ए-हुस्न से जल जाए न आंचल तेरा 
लग गयी आग तो मुझको ही बुझाना होगा 
 दिल झुकाया हैं तो सर को भी झुकाना होगा 

आज आलम हैं जो दिल का वो बताये ना बने 
पास आये न बने दूर भी जाए न बने 
मैं हूं मदहोश मुझे होश में लाना होगा 
आज परदा हैं तो कल सामने आना होगा 
आप ती इतने करीब आ गये अल्ला तौबा 
क्या करे आप से टकरा गये तौबा तौबा 
इष्क इन बाँतो से रुसवाई जमाना होगा 
दिल-ए-बेताब को सीने से लगाना होगा 

No comments:

Post a Comment