Thursday, 9 July 2020

कटते है दुख में ये दिन

"तुटली उल्का, काजळले नभ, डुचमळलें मन;
क्षीणतेज अन दीपस्तंभी घुसमटला तम. 
पानोपानी कडू शहारा किर्र इषारा;
आसूआंसू पिंजुन पडला सळसळ वारा"
सुप्रसिद्ध कवी आरतीप्रभूंच्या "जोगवा" कवितासंग्रहात या काही ओळी. नीट वाचले तर ही कविता म्हणजे सुंदर भावकविता आहे. मनाच्या संत्रस्थ अवस्थेचे चित्रण आहे. भावकवितेचे एक लक्षण म्हणून असे सांगता येईल, कवितेत मांडलेला विचार आणि त्याची अभिव्यक्ती, यासाठी कविताच असणे अपरिहार्य व्हावे. तिला दुसरे कुठलेही स्वरूप अशक्यच आहे, असाच प्रत्यय येतो.आरतीप्रभूंची कविता वाचताना, मनावर नेहमी परिणाम होतो तो अत्यंत अनुरूप अशा शब्दांचा, शब्दांच्या योजनेचा, अभिव्यक्तीत घडणीचा, बांधणीचा, कविता नेहमी शब्दांच्याच आधाराने वाढते, किंबहुना तेच कवितेचे अस्तित्व असते. चांगल्या अभिव्यक्तीचा एक गुण नेहमी सांगितला जातो - तिचं स्वतंत्र अस्तित्व भासू नये, तेणे आशयांत पूर्ण विलीन व्हावे. ही कविता वाचताना, याचा प्रत्येक ओळीत आपल्याला असा अनुभव येतो. आजचे आपले गाणे याच स्वरूपाचे आहे. 
शायरी ही सुप्रसिद्ध शायर नूर लखनवी यांची आहे. हा शायर चित्रपटासाठी लिहिणारा म्हणून फारसा प्रसिद्ध नव्हता. फार तुरळक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. प्राय: उर्दू भाषेतून अभिव्यक्ती सादर करणारा कवी म्हणून त्यांची ख्याती आहे. असे असूनही चित्रपट माध्यम ध्यानात ठेऊन त्यांनी प्रस्तुत शब्दकळा लिहिली आहे. बहुसंख्य सगाब्द सहज समजण्यासारखे आहेत, अर्थात पहिला अंतऱ्यातील पहिल्या ओळीचा शेवट करताना "दर्द-ऐ-दिल" अशा पारंपरिक रचनेने केला आहे परंतु आशय कळणे दुरापास्त होत  नाही. गझल वृत्तात लिहिलेली "नज्म" आहे. अर्थात गझल वृत्तात जसे "धक्कातंत्र" वापरले जाते आणि आशयाची नाविन्यपूर्ण पद्धतीने मांडणी केली जाते तसे इथे झालेले नाही. चित्रपटगीतात गेयता असणे अवश्यमेव मानले जाते कारण त्यानुरुपच स्वरबंध सुचणे सहज होऊन जाते आणि मुख्य म्हणजे चित्रपटगीत हे सामान्य जनांपर्यंत पोहोचत असल्याने, त्यादृष्टीने कवितेचा घाट ठेवणे जरुरीचे असते. या दृष्टीने या कवितेकडे बघितल्यास, एक सुंदर चित्रपटीय आविष्कार, इतपत मागणी ही कविता पूर्ण करते आणि तशी मागणी पूर्ण करताना कुठेही सपक शब्दरचना वाचत आहोत असे होत नाही. ही तारेवरची कसरत खरी परंतु इथेच कवी किती सक्षम आहे, हे जोखता येते. मुखड्यातील विरहिणीची भावना, पुढील सगळ्या कडव्यांतून सार्थपणे आपल्यासमोर उभी राहते. कुठेही, कविता म्हणून अगम्य होत नाही. 
संगीतकार सी.रामचंद्र यांची स्वररचना आहे आणि स्वररचना बांधताना त्यांनी "जौनपुरी" रागाचा आधार घेतला आहे. "गंधार, धैवत आणि निषाद" या कोमल स्वरांनी गाण्याची सुरवात होते. हा संगीतकार बहुतेकवेळा गाण्याची चाल बांधताना, रागाचे स्वर आधाराला घेतो पण त्याची चित्रपटीय भाषेत पुनर्रचना करतो, परिणामी रागाची सर्वसाधारण ओळख लोकांसमोर येत नाही. चित्रपटातील प्रसंग तसा अजिबात नवीन नाही परंतु स्वररचनेचे कौशल्य असे की गाणे कायमस्वरूपी चिरस्थायी होते. अतिशय संथ, हळुवार स्वरांत गाणे सुरु होते. पार्श्वभागी वाजत असलेली सतार किंवा व्हायोलिन देखील काहीसे अस्पष्ट असे अस्तित्व दर्शवत आहे. गाण्याची सुरवात स्त्री गायिकेच्या स्वराने होते - हे उद्मेखून लिहायचे कारण बहुतांश गाणी सुरु व्हायच्या आधी वाद्यमेळाच्या रचनांचे सहाय्य घेतात. मुखडा ऐकताना हे ठळकपणे जाणवते. हा संगीतकार आपल्या बहुतेक गाण्यांचे अंतरे नेहमी वेगळ्या चालीत बांधतो परिणामी पुन्हा मुखड्याच्या चालीशी परतताना लय आणि स्वरांचा प्रवास अवलोकणे नेहमीच बुद्धिगम्य ठरते. अंतरे वेगवेगळ्या चालीत बांधणे हे उत्तम सर्जनशीलतेचे अंग म्हणून मान्य होते. अशाच वेळेस "स्वरांची उठावण" सारखे गुळगुळीत झालेले शब्द नव्याने झळाळी प्राप्त करतात. शेवटचा अंतरा या दृष्टीने ऐकण्यासारखा आहे. "उल्फत की ठोकरों से आखिर न बच सका दिल" ही ओळ एकदम वरच्या सुरांत सुरु होते आणि जर का मुखड्याशी साद्ध्यर्म्य शोधायला गेल्यास, उठावण अगदी वेगळी आहे परंतु लगेच "जितने कदम उठाए हमने संभल संभल के" ही ओळ उतरी स्वरांत ऐकायला मिळते. परिणामी मुखड्याशी सांधा सहजपणे जुळला जातो. यात आणखी दुसरा भाग म्हणजे "उल्फत की ठोकर" म्हणजे वेदनेचा कल्लोळ आलाच परंतु वेदना कितीही वेदनादायी असली तरी आक्रोशी वेदना नाही, त्या वेदनेला संयत स्वरूप आहे. किंबहुना सगळ्या गाण्याचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून "संयत" हेच विशेषण लावावे लागेल. सी. 
रामचंद्र यांनी चाल बांधताना नेहमीच कवीच्या शब्दांना अग्रक्रम दिला परिणामी ते "आधी शब्द मग चाल" या पंथाचे आग्रही संगीतकार ठरले. इथे देखील कवितेच्या अंगाने गाणे ऐकायला घेतल्यावर आपल्याला वरील विधानाची प्रचिती घेता येईल. पहिल्या अंतऱ्याच्या ओळी याचेच प्रत्यंतर देतात. "तडपाएगा कहां तक ऐ दर्द-ए-दिल बता दे" यातील "तडपाएगा" शब्द उघडपणे आक्रोशी भावना दर्शवते परंतु जरी वेगळी स्वरिक उठावण असली तरी स्वरूप संयत राहते. संगीतकार शब्दप्रधान गायकी या संस्कृतीला प्राधान्य देणारा आहे, हेच सूचित होते.
 
 या गाण्याच्या वेळेस लताबाईंनी आपली गायकी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात ठामपणे रुजवली होती. गाण्याचा कुलधर्म ओळखून गायकी कशी ठेवावी याचा असामान्य मानदंड त्यांनी निर्माण केला. वास्तविक या गाण्यात कितीतरी "चढ - उतार" आहेत तरीही गाताना कुठेही "ताण" जाणवत नाही. वेदनेची अपूर्व अशी संतत धार गायकीतून प्रगट होते. वेदनेला सौंदर्य दाखवणारी गायकी या गाण्यातून दिसते. गाण्याचा आणि चालीचा हळवा स्वभाव लक्षात ठेवून गायन सिद्ध केले आहे. चाल हळवी आहे पण चुकूनही भावविवश होत नाही आणि याचे श्रेय सी. रामचंद्र आणि लताबाईंचे. अनक्रोशी गायन झाले आहे. गाणे कधी वरच्या सुरांत जाते परंतु तिथेही स्वरांचा ताठरपणा ऐकायला येत नसून स्वरांतील मृदुत्व ऐकायला मिळते. त्यामुळे वेदना मनात चिरस्थायी होते आणि भगभगीतपणा टाळला जातो. गायन करताना अनेक "जागा" गायकी सिद्ध करणाऱ्या सापडतात, उदाहरणार्थ "ये खाक पर जो चमके" ही ओळ खालच्या सुरांत आहे, मुखड्याच्या स्वरांशी फारकत घेणारी आहे पण म्हणून गाताना कुणीही "खर्ज" लावायचा आणि चकित करायचे, अशा "गिमिक्स" घ्यायची शक्यता आहे परंतु लताबाईंनी कुठेही "स्वरिक सौंदर्य" दाखवण्याचा अट्टाहास केलेला नाही. जिथे शब्द संपवायला हवा तिथेच किंचित काही श्रुतींचा आधार घेऊन संपवला आहे.  "फेंका गया है दिल" या ओळीतील "फेंका" शब्दातील "फें" हे अक्षर जरा आधाती पद्धतीने उच्चारावे लागते परिणामी स्वरांत "जडत्व" येऊ शकते परंतु लताबाईंनी केलेला उच्चार मार्दवपूर्ण आहे - गाण्याच्या कुळधर्माला जागणारा आहे. 
इतकी आणि आणखी अनेक सौंदर्यस्थळे या गाण्यात आहेत आणि म्हणूनच हे गाणे असामान्य झाले आहे. 


कटते है दुख में ये दिन 
पहलु बदल बदल के 
रहते हैं दिल के दिल में 
अरमां मचल मचल के 

तडपाएगा कहां तक ऐ दर्द-ए-दिल बता दे 
रुसवा कहीं न कर दे आंसू निकल निकल के 

ये खाक पर जो चमकें जर्रे इधर ना समझो 
फेंका गया हैं दिल का शिशा कुचल कुचल के 

उल्फत की ठोकरों से आखिर न बच सका दिल 
जितने कदम उठाए हमने संभल संभल के 




No comments:

Post a Comment