Tuesday, 21 January 2020

स्टीफन डेवीस

रस्टनबर्ग इथे नोकरी करताना, अचानक U.B.group (विजय मल्ल्या पुरस्कृत) मध्ये नोकरी मिळण्याची संधी मिळाली. इतका मोठा ग्रुप म्हटल्यावर नाही म्हणायचे काहीच कारण नव्हते, फक्त बृवरीमध्ये नोकरी होती आणि बृवरी होती, Standerton या गावात. जोहान्सबर्ग पासून पश्चिमेला २०० किलोमीटर आत. अर्थात, साउथ आफ्रिकेत गावे देखील तशी सुस्थितीत असतात, त्यामुळे तसे टेन्शन नव्हते. एका शनिवारी, रस्टनबर्ग मधील मित्राने तिथे सोडण्याचे कबूल केले असल्याने, कसे जायचे, हा प्रश्न नव्हता. कंपनीने, माझ्या घराची सोय होईपर्यंत तिथल्या एका खासगी हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली होती. तिथे, "राम नायडू" वगळता, कुणाही माणसाशी फोनवर देखील बोललो नव्हतो (राम बरोबर देखील फोनवर बोलणे) तेंव्हा ओळखीचे कुणी असण्याचा प्रश्नच नव्हता.
रामची दुसऱ्या बृवरीत बदली झाल्याने, त्याच्या जागेवर माझी नेमणूक झाली होती. सोमवारी, तिथल्या ऑफिसमध्ये गेलो आणि सगळ्यांशी ओळख-पाळख करून घेण्यात गेला आणि इथेच मला स्टीफन भेटला. तो बृवरीचा General Manager तर मी, Finance G.M. अशी व्यवस्था होती. गाव अगदी छोटेखानी आहे, ना तिथे कुठला भव्य दिव्य मॉल की कुठला क्लब!! गावात ४,५ पब्स, गोल्फ क्लब आणि एक छोटेसे शॉपिंग सेंटर इतपतच पसारा आहे.
पहिल्या दिवशी स्टीफनशी अत्यंत जुजबी आणि औपचारिक ओळख झाली. इथे मला खऱ्याअर्थी गोऱ्या माणसाबरोबर काम करावे लागले. इतकी वर्षे बरीच गोरी माणसे संपर्कात आली पण ती सगळी तात्पुरत्या कामानिमित्ताने. त्यामुळे, या माणसांशी "नाळ" जुळली नव्हती. एकतर, गोरी माणसे, काम वगळता, फारसे संबंध तुमच्याशी ठेवत नाहीत आणि इथे देखील आपल्याला असाच अनुभव येणार, अशी मनाशी खुणगाठ बांधून कामाला सुरवात केली. वास्तविक, माझ्या हाताखाली देखील ४ गोरी(च) माणसे होती पण कितीही झाले तरी मी त्यांचा "बॉस" असल्याने, तसे जवळकीचे नाते निर्माण होणे, तसे अवघडच होते. (अर्थात पुढे सगळे व्यवस्थित झाले, तो वेगळा भाग!!)
वास्तविक माझे आणि स्टीफनच्या कामाचे स्वरूप भिन्न होते तरी देखील, काही नवीन खरेदी, काही रिपेरिंगची कामे आणि सर्वात महत्वाचे "रेव्हेन्यू कलेक्शन" याबाबत आमच्या भेटीगाठी सारख्या होत राहिल्या. आत्तापर्यंत, साउथ आफ्रिकेत नोकरी करताना, कंपनीने मला गाडी दिली असल्याने, मला गाडी विकत घेण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता परंतु इथे तशी पद्धत नव्हती आणि अर्थात माझे तसे "contract" असल्याने, गाडी विकत घेण्याचा प्रश्न उभा राहिला. गावात तर मी नवखा, त्यामुळे लगेच स्टीफनशी विषय काढला. त्याने लगेच, त्याच्या जावयाला फोन लावला - जावई जगप्रसिद्ध AVIS कंपनीत फार मोठ्या पदावर होता. आता, सासऱ्याकडून मागणी आल्याने, त्याने मला गाडी मिळवून देण्यासाठी बरीच मदत केली आणि या निमित्ताने, माझे स्टीफनशी ओळख आणखी घट्ट झाली. त्याला तसे नवल वाटायचे, मी इथे "एकटा" कसा राहतो? अर्थात, त्यालाच कशाला, इतकी वर्षे तिथे राहून, इतरांना देखील हाच प्रश्न पडायचा.
खरतर स्टीफननेच, मला घर शोधायला मदत केली. गाव तसे लहान - अगदी आकारमानाने देखील. जवळपास १५ ते २० हजार इतकीच लोकवस्ती आणि बव्हंशी सगळे गोरे. थंडीच्या दिवसात अत्यंत कडाक्याची थंडी, म्हणजे -४,-५ इतके तापमान जाणार!! त्यामुळे गावात फारसे उद्योगधंदे नाहीत. आमची बृवरी आणि जगप्रसिद्ध नेसले कंपनीचा कारखाना. इतक्याच मोठ्या कंपन्या.
एकदा, त्याची बायको - जेनी ऑफिसमध्ये आली आणि स्टीफनने माझी ओळख करून दिली. त्याला साजेशी अशीच बायको आहे. स्टीफन, मुळचा लष्करातील. त्यामुळे हाडपेर मजबूत. गोरा वर्ण, साधारण साडे पाच फुट उंची, निळे डोळे, डोळ्यांवर चंदेरी काडीचा चष्मा, अंगकाठी अत्यंत काटक आणि झपझप चालण्याची लकब आणि हसतमुख चेहरा, त्यामुळे समोरच्यावर लगेच छाप पडायची. सर्वात महत्वाचे म्हणजे, निर्णय लगोलग घेऊन, कामाचा फडशा पडायची वृत्ती. आम्ही, दोन वर्षे एकत्र होतो पण, ऑफिसवेळेत, त्याने माझ्याशी कधीही वायफळ गप्पा मारल्या नाहीत. ऑफिसमध्ये फक्त कामासंबंधी बोलणे आणि नंतर मात्र मित्रासारखे वागणे. हाच अनुभव मला पुढेदेखील वारंवार, गोऱ्या माणसांबाबत आला.
कामानिमित्ताने, आमच्या ऑफिसमध्ये अनेकवेळा हेड ऑफिसमधून काही वरिष्ठ अधिकारी यायचे, कधी ऑडीटर यायचे आणि त्यानिमित्ताने, आम्हाला त्यांना बाहेर जेवायला न्यायला लागत असे. अशा कार्यक्रमात, स्टीफन खुलत असे. गोरा माणूस तरी देखील इतके नर्म विनोद, प्रसंगी स्वत:ची चेष्टा करणार, कधी तरी त्याचे लष्करातील अनुभव सागणार. त्यांमुळे अशा पार्ट्या फार रंगतदार व्हायच्या. २००५ च्या ख्रिसमसला त्याने मला घरी बोलावले होते. व्हाईट लोकांच्या घरी त्यापूर्वी अगदी तुरळक गेल्याच्या आठवणी होत्या. इथे मात्र, हा समाज ख्रिसमस कसा साजरा करतात, याचा मन:पूत आनंद घेतला. इथे केवळ, ड्रिंक्स किंवा खाणे इतपतच मर्यादित समारंभ नसतो. घरात, अनेक खेळ खेळले जातात, नृत्ये केली जातात, विनोदी बोलणे तर अखंड चालू असते. केवळ नातेवाईकच जमतात असे नसून, इतर मित्र मंडळी एकत्र जमतात आणि एकूणच उत्सवी पद्धतीने ख्रिसमस साजरा केला जातो. त्या रात्री, स्टीफनने मला त्याच्या घरीच राहायचा आग्रह केला आणि मी तो मानला. तसे, या गावात सुरक्षिततेचा इतका गंभीर प्रश्न नव्हता, जितका मोठ्या शहरांत आहे. पण, तरीही अनिल एकट्याने इतक्या रात्री गाडी कशी चालवणार, म्हणून त्याने राहण्याचा आग्रह केला.
पुढे, त्याने मला, त्याच आग्रहापोटी, तिथल्या गोल्फ क्लबचे सभासदत्व घ्यायला लावले. गावात मनोरंजनाची तशी वानवा होती. आणि हा क्लब तर सगळ्या व्हाईट लोकांनी भरलेला. आलिशान क्लब संस्कृती म्हणजे काय, याचा साक्षात अनुभव घेता आला. कितीतरी रविवार सकाळ, मी इथे खेळण्यात घालवल्या. सुरवातीला, मला गोल्फ खेळातील ओ की ठो माहित नव्हते पण तिथे देखील स्टीफनने त्याची ओळख वापरून, माझ्याकडून, प्राथमिक धडे अक्षरश: घोटवून घेतले. इथेच, "बॉल डान्स" प्रकार अतिशय जवळून अनुभवता आला आणि आपल्याला वाटते तितके सहज हे नृत्य नसून, त्याचे देखील सुसंगत शास्त्र आहे, हे समजून घेता आले.
दुपारचे जेवण, आम्ही बहुतेकवेळा एकत्रच घेत असू. मला, आपल्या रीतीरिवाजानुसार संपूर्ण जेवणाची सवय तर हा माणूस, केवळ एखाद, दुसरे sandwich!! तरी देखील, हा माणूस काहीवेळा माझा डबा "शेयर" करीत असे, अगदी हक्काने!! पुढे, मला, कंपनीच्या अनेक डेपोज भेटी करण्याची जरुरी असायची आणि हे डेपोज, अत्यंत अंतर्गत भागात आणि अधिक करून, काळ्या लोकांच्या वस्तीत होते. सुरवातीला, आम्ही दोघे एकत्र जात असू. अशा भेटीतून, खरेतर मला साउथ आफ्रिकेचे अंतरंग समजून घेता आले.
दिवसेंदिवस कंपनीचा खर्च आणि उत्पन्न, यातील दरी वाढत असल्याने, आम्हा दोघांच्या ध्यानात, या बृवरीचे भवितव्य कळत होते. त्यानिमित्ताने, ऑफिस वेळ संपल्यावर, आम्ही दोघेच ऑफिसमध्ये बसून विचार करीत बसायला लागलो आणि उशीर झाला की मला बळजबरीने गाडीत बसवून, त्याच्या घरी जेवायला घेऊन जात असे. मला तर फार नवल वाटायचे कारण, इतर व्हाईट माणसे आणि हा, यात, बराच फरक होता. गोरे लोकं कितीही जवळचे झाले तरी, त्यांच्या घरात शक्यतो प्रवेश द्यायला नाखूष असतात. त्याबाबतीत स्टीफन अपवाद. २००७ मध्ये, बृवरी बंद पडणार, हे जवळपास नक्की झाले. मी पुढे प्रिटोरिया इथे महिंद्र कंपनीत नोकरी शोधली तर, स्टीफन त्यावेळेस, टांझानिया इथे नोकरीला गेला. अर्थात, ज्याला साउथ आफ्रिकेची सवय लागली आहे, त्याला इतर आफ्रिकन देशात स्वास्थ्य मिळणे, तसे दुरापास्त!! तसेच झाले, त्याने, परत याच कंपनीत प्रवेश मिळवला पण, डर्बन इथल्या बृवरी मध्ये. पुढे, मी, माझी गाडी विकली आणि दुसरी घेतली पण तिथे देखील स्टीफन मदतीला आला, परत त्याच्या जावयाला या कामी जुंपले.
तो डर्बन इथे आणि मी प्रिटोरिया इथे, त्यामुळे गाठीभेटी दुर्मिळ. फोनवरून संभाषण, इतपतच संपर्क. आता तर मी कायमचा भारतात आलो पण, तरीही अजून जे थोडे गोरे लोकं माझ्या संपर्कात आहेत, त्यात स्टीफन अग्रभागी!!

No comments:

Post a Comment