Sunday, 12 January 2020

रैना बीती जाये

मध्यरात्र कलत होती तरीही आजूबाजूच्या कोठ्यांमधून कुठे वाद्याची सुरावट तर कुठे घुंगरांचा आवाज झमझमत होता. अजूनही इथे रात्रीचा अंमल पसरला नव्हता. माणसांची लगबग चालू होती आणि त्याच लगबगीत, एक धनाढ्य आपल्या शरीराचा तोल सावरीत तिथून निघायच्या मार्गावर होता. पाय लडखडत होते तर डोळे काहीसे तांबारलेले होते. अचानक पाठीमागून, धुंद मोगऱ्याचा सुवास यावा त्याप्रमाणे सूर कानावर येतात आणि त्याक्षणी त्याचे कान टवकारतात!! बाजूच्याच कोठीवरून अवर्णनीय आलाप कानावर आला आणि तो, त्या सुरांकडे खेचला गेला. डोळ्यात काहीशी अविश्वसनीय चमक आली आणि वरच्या मजल्यावर असलेल्या कोठीकडे पावले वळली!! आपण राजस श्रीमंत आहोत याची चेहऱ्यावर काहीशी गुर्मी घेऊन, जिन्यावरून धडपडत त्या कोठीवर प्रवेश करतो आणि तिथली मैफिल क्षणभर भांबावते. अचानक ओळखी निघतात आणि तुटलेली तार परत जुळून गाणे पुढे सुरु होते. 
"त्या अधरफुलांचे ओले मृदू पराग--
हालले,साधला भावस्वरांचा योग, "
वास्तविक कोठीवरील गाणे म्हणजे ईश्वराशी केलेला संवाद नव्हे!! तिथे भावनिक गुंतवणूक न होता, इष्काचे रंग उडवले जातात आणि मर्दानगीच्या मखरात ऐय्याशीची झिलई झगमगत ठेवतात!! असे असून देखील, यावेळचे सूर काही वेगळेच रंग दाखवीत होते. एका बाजूने शृंगारिक आवाहन तर दुसऱ्या बाजूने विरहाची काजळी!! 

 "नखें लाखिया दांत मोतिया वैदुर्यी नेत्र 
अवयव गमले चपल चिवट की मयवनिंचे वेत्र 
कात सोडिल्या नागिणीचे तें नवयौवन होतें 
विळख्याविळख्यातुनि आलापित ज्वालांची गीते 
प्रसिद्ध कवी बा.भ. बोरकरांच्या अजरामर "जपानी रमलाची रात्र" कवितेतील या ओळी!! कोठीवरील गायिका/गणिका यांचे नेमके वर्णन या ओळींतून आपल्याला मिळते. 
१९७२ साली आलेल्या "अमर प्रेम" चित्रपटातील "रैना बीती जाये" या असामान्य गाण्याची ही पार्श्वभूमी. संगीतकार राहुल देव बर्मन यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीत अनेक चित्रपट आपल्या गाण्यांच्या जोरावर गाजवले तरी देखील या चित्रपटातील गाण्यांनी, त्यांच्यावरील "पाश्चात्य संगीताचा" जबरदस्त ठसा संपूर्णपणे पुसून टाकला. 
आपल्याकडे कुठल्याही व्यक्तीला एखाद्या साच्यात बसविणे किंवा त्याच्यावर एखादे "लेबल" चिकटवणे, ही आवश्यक मानसिक गरज वाटते, जणू त्याशिवाय त्या व्यक्तीची पूर्तता होणे कठीण!! अर्थात, असला प्रकार काही प्रमाणात जागतिक स्तरावर देखील आढळतो आणि मग त्यातून एकमेकांची तुलना ही आत्यंतिक गरज होऊन बसते!! एकदा अशा साच्यात त्या व्यक्तीला बसविले म्हणजे म्हणजे ते व्यक्तित्व पूर्ण होते. याची खरी गरज असते का? असला प्रश्न कुणी विचारत नाही आणि काहीवेळाने, त्या व्यक्तीला देखील, याची गरज भासायला लागते आणि बहुदा तिथेच ते व्यक्तिमत्व खुरटायला लागते. बऱ्याच उमलणाऱ्या कळ्या अशाच उखडलेल्या दिसतात.
"रैना बीती जाये" हे गाणे प्रकाशात येईपर्यंत, या गाण्याचा संगीतकार, "आर.डी.बर्मन" अशाच सावलीत वावरत होता!! त्याच्यावर, पाश्चात्य चालीवरून रचना करणारा संगीतकार, हे लेबल चिकटले होते, जणू काही या संगीतकाराने वेगळ्या प्रकारची गाणी कधीच दिली नाहीत!! वास्तविक, "घर आजा 
" किंवा "शर्म आती है" सारख्या अनुपम रचना त्याने दिल्या होत्या, हा जणू "इतिहास" झाला होता. "तिसरी मंझील" या चित्रपटाची आणि अशाच प्रकारची गाणी देणारा संगीतकार, हीच ओळख झाली होती. त्यातून, वडील, प्रसिद्ध संगीतकार, एस. डी. बर्मन यांच्या सावलीत वावरल्याने, "स्वयंप्रकाशित्व" थोडे परकेच झाले होते. 
"रैना बीती जाये, शाम ना आये, निंदिया ना आये" या धृवपदाने गाण्याची सुरवात होते. सुरवातीला, सारंगीचे सूर जवळपास ७ सेकंद आहेत पण ते सूर पुढील असामान्य आलापीला जणू बोलावत आहेत, असे वाजलेले आहेत. हा जो सुरवातीचा आलाप आहे, हा इतका जीवघेणा आहे, मंद्र सूर लागतो आणि क्षणात (अर्थ शब्दश: घेणे) तो सूर वरच्या पट्टीत जातो आणि तसाच परत खाली उतरतो!! हा जो आलाप आहे, हीच रचनेच्या अवघडतेची "खूण" आहे, जी खूण, पुढील रचना किती अधिक गुंतागुंतीची होते, त्याचे निदर्शक आहे. आलाप चालू असताना, त्याच्या पार्श्वभागी संतूरचे सूर छेडलेले आहेत आणि आलाप संपल्यावर त्या सुरांची ओळख होते. सुगम संगीताची बंदिस्त वीण, ही अशीच थोड्या थोड्या स्वरांनी बनत जात असते. हा जो जवळपास ३० सेकंदाचा आलाप आहे, हा आलाप जणू लताबाईंच्या गायकीचे अन्वर्थक लक्षण म्हणावे इतका समृद्ध आहे. बाईंची  गायकी, कुठे श्रेष्ठ आहे, त्याचे, हा आलाप, हे निदर्शक आहे. आलाप खर्ज सुरांतून तीव्र सुरात जातो आणि त्याच लयीत खाली उतरतो, फार "मुश्किल" गायकी आहे!! 
गाण्याची सुरवात "गुजरी तोडी" रागाच्या सुरांनी होते. संगीतकार म्हणून या गाण्यात केलेला एक अफलातून प्रयोग आपण पुढे बघणार आहोत. रागाधारित स्वर घ्यायचे पण रागाला बाजूला सारायचे, असले अत्यंत प्रशंसनीय कौशल्य या गाण्यातून आपल्याला बघता येते. 
गाणे, गायकी ढंगाने सुरु होते, स्वरविस्ताराच्या शक्यता जाणवतात पण तरी स्वरांचा जो "ठेहराव" आहे, तो अतिशय सुंदर आहे. थोडे तांत्रिक भाषेत मांडतो. पहिलीच ओळ आपण इथे उदाहरण म्हणून बघूया. "रैना बीती जाये, शाम ना आये" आता, गाण्याच्या संदर्भात मांडायचे झाल्यास, आपल्याला खालीलप्रमाणे स्वरावली मांडता येते. रचनेत "मध्यम" स्वर किती प्रभाव टाकतो, हेच आपल्याला यातून जाणून घेता येईल. तसे बघायला गेलो तर, "गुजरी तोडी" रागात "शुद्ध मध्यम" स्वराला स्थान नाही पण तरीही "रैना" शब्द या स्वरांनी सुगंधित होऊन ऐकायला मिळतो.  हीच तर खरी खासियत संगीतकार म्हणून सांगता येते. वर्जित स्वर देखील रचनेत उपयोगात आणून रचनेची श्रीमंती वाढवता येते. 

रैना बीती जा__ये         शाम ना आ ये 
मम  रेरे   ग __मम     म    धमे  म 

रैना  बीती जा__ये 
गमम रेरे   गममेध 

खरतर सुरवातीची जी दीर्घ आलापी आहे तिथे आपल्याला "गुजरी तोडी"रागाची ओळख पटते. "कोमल नि,ध,रे" असा प्रवास करीत "तीव्र मध्यम" स्वरावर जेंव्हा आलाप किंचित विश्रांती घेतो तिथे हा राग सिद्ध होतो. हा प्रकार जरा तांत्रिक आहे आहे पण सूर आणि त्याचे चलन समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. अगदी स्पष्ट मांडायचे झाल्यास स्वरावली केवळ रचनेचे अंतर्गत रूप दाखवते परंतु त्याचा नेमका अविष्कार हा नेहमीच प्रत्यक्ष सादरीकरणातून आपल्या समोर येतो हेच खरे. 
गाण्याचे शब्द जरा बारकाईने वाचले तर सहज ध्यानात येईल, रचनेवर मीराबाईच्या शब्दकळेचा प्रभाव आहे तसेच शब्दकळा समजायला अजिबात अवघड नाही. अर्थात मीराबाईच्या रचनेत जो समर्पण भाव ओतप्रोत भरलेला असतो, त्याची काहीशी वानवा दिसते. तसे बघायला गेले तर कोठीवरील गाण्यातील शब्दकळा ही बरेचवेळा ठुमरी अंगाने शृंगारिक असते आणि स्वररचना देखील त्याच धाटणीची असते. संगीतकार म्हणून राहुल देव बर्मन यांनी, या प्रघाताला पूर्णपणे फाटा दिला आहे. गायकी वळणाची चाल आहे पण त्याला अतिशय बंदिस्त स्वरूप बहाल केले आहे. 
आणखी एक बाब इथे मुख्यत्वेकरून मांडायला हवी गाण्यातील तालाचे स्थान आणि चलन. हिंदी चित्रपट गीतांत, तालाच्या बाबतीत आमुलाग्र बदल जर कुणी घडवून आणला असेल तर तो याच संगीतकाराने. परंपरेपासून दूर जायचे पण तरीही एका विविक्षित क्षणी परंपरेकडे वळून बघायचे!! या गाण्यात ही जाणीव प्रकर्षाने आढळते. 
तालाच्या मात्रांमध्ये बदल अशक्य परंतु त्या मात्रा वापरताना, बरेचवेळा न स्वरी वाद्यांतून तालाच्या मात्रांना भरीवपणा प्रदान करायची खासियत या संगीतकाराचे खास वैशिष्ट्य मानावेच लागेल. इथे sound ही कल्पना ध्यानात घ्यावी लागेल. विशेषत: एकेकाळी स्वरवाद्य म्हणून प्रचलित असलेल्या गिटार वाद्याला तालवाद्य म्हणून प्रमुख स्थान देऊन, या वाद्याची नव्याने ओळख करून द्यायची!! 
गाण्यात बहुतेकवेळा ऐकायला मिळणारा "केरवा" ताल आहे पण ताल बारकाईने ऐकायला गेल्यास, ८ मात्रांच्या या तालाची शेवटची मात्रा या गाण्यात कशी घेतली आहे, हे ऐकणे म्हणजे समृद्ध अनुभव आहे. किंबहुना सगळ्या मात्रांचे सादरीकरण, हाच अभ्यासाचा भाग आहे. 

"शाम को भूला, श्याम का वादा 
संग दिये के जागे राधा"

गाण्याची सुरवात जरी "गुजरी तोडी" रागाच्या आधाराने केली असली तरी पहिला अंतरा घेताना, संगीतकाराने "खमाज" रागाचे स्वर घेतले आहेत!! कमाल झाली. गाणे मध्यरात्र कलत असतानाच्या प्रहरी सादर होत असताना, सुरवात गुजरी तोडी रागाने करायची तर अंतरा खमाज रागाच्या आधाराने करायची!! इथेच संगीतकाराचे बौद्धिक कौशल्य तर दिसतेच परंतु त्याचबरोबर अंतरा वेगळ्या रागात सादर करताना, गाण्याचे स्वरूप कुठेही डागाळत नाही, याची योग्य ती काळजी घेण्याची खासियत दिसते. किंबहुना, इथे खमाज राग आहे, हेच प्रथमक्षणी अजिबात ध्यानात येत नाही. अशा प्रकारे स्वररचना "वळवून" घेण्याची किमया खास या संगीतकाराची असेच म्हणायला लागेल.  

बिरहा की मारी प्रेमदिवानी 
तन मन प्यासा, अन्खियो में पानी"

या ओळीत "बिरहा", "प्रेमदिवानी" सारखे शब्द वापरून, मीरेच्या रचनेची आठवण करून दिली आहे. या ओळीत लताबाईंची खास गायकी दिसते. शब्दांची पारख असली म्हणजे गायन किती प्रभावी होते, याचे सुंदर उदाहरण इथे ऐकायला मिळते. शब्दातील आशय किती गहिरा करता येतो हे समजण्यासाठी, "तन मन प्यासा, अन्खियो में पानी" या ओळीचे सादरीकरण ऐकावे. ओळ किंचित वरच्या पट्टीत घेत असताना, कुठेही अक्षर तोडलेले नाही तसेच शब्दातील भावनांचा परिपोष योग्य प्रकारे मांडलेला आहे. मघाशी मी "खमाज" रागाच्या सुरांची आठवण करून दिली, त्या सुरांची या ओळीच्या संदर्भात नव्याने ओळख करून घेता येईल आणि "अन्खियो में पानी" गाताना परत मूळ चालीशी कसे जोडून घेतले आहे, हे समजून घेणे, हा बौद्धिक आयाम आहे. 
गाण्यात वाद्यमेळ म्हणावा तर संतूर,बासरी, बेस गिटार इतपतच वाद्ये आहेत पण प्रत्येक वाद्यातून रचना अधिकाधिक भरीव होत गेली आहे. राहुल देव बर्मन यांनी केवळ तालाच्या बाबतीत प्रयोग केले,हे म्हणणे तसे अर्धवट ठरेल. पारंपारिक वाद्यातून देखील असामान्य रसाचा परिपोष निर्माण करून त्यांनी आपला परंपरेचा अभ्यास किती खोल आहे, हे देखील या गाण्याद्वारे दाखवून दिले आहे आणि असे करताना पुन्हा वाद्यमेळाचे पारंपारिक साचे बाजूला सारून, रचनेची नव्याने ओळख करून दिली आहे. 
राहुल देव बर्मन यांच्या विषयी थोडे सारांशाने. तत्काल म्हणजे महत्वाचे वा अर्थपूर्ण सांगीत विधान करण्याआधी परिणाम साधणे, ही या संगीतकाराचे आद्य ध्येय म्हणता येईल. म्हणूनच तारतेच्या ध्वनीपरिणामावर लक्ष केंद्रित करून संगीत रचना मार्ग थोडा सोपा करून घेतला. विशिष्ट रागचौकटीपासून दूर जाउन देखील रागाचे एकसंधपण आपल्या चालीस देण्याची प्रशंसनीय क्षमता या संगीतकाराकडे होती आणि या गाण्यात आपल्याला हेच वैशिष्ट्य बघायला मिळते. त्यांनी संगीत आकारले ते चित्रपटीय सादरीकरणासाठी. परस्परविरोध, विरोधाभास आणि विसर्जित न केलेले सांगीत तणाव यांचे आकर्षण म्हणजे आधुनिक सांगीत संवेदनशीलता. यामुळेच हे गाणे आपल्याला आज इतकी वर्षे झाली तरी टवटवीत वाटते.

https://www.youtube.com/watch?v=RRk9pG5Upe4


No comments:

Post a Comment