"जन्मभर अश्रूंस माझ्या शिकवले नानां बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!!
जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही,
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!"
कविवर्य सुरेश भटांची ही अजरामर गझल, मानसिक तुटलेपणाची तडफड व्यक्त करणारी. सुरेश भटांच्या कवितेला गझल शैली भावणारी होती आणि त्याच शैलीत त्यांनी आपल्या बहुतांशी रचना केल्या. प्रस्तुत गाण्याच्या संदर्भात वरील ओळी फार प्रत्ययकारी वाटतात. आता त्या कशा प्रत्ययकारी आहेत, याचाच ताळा आपण बघणार आहोत.
संध्याकाळची वेळ, रंगमंचावर नृत्य गीताचा अपूर्व कार्यक्रमाची आखणी झालेली असते. रंगमंचाच्या आतल्या बाजूला, काहीशा अंधाऱ्या प्रकाशात गायक आणि साजिंदे तयारीत असतात आणि अचानक रंगमंचावर प्रकाश उजळतो आणि तरुणी आपल्या नृत्याच्या वेषात, कार्यक्रम सुरु होण्याची वाट बघत असते. वेशभुषेवरून आणि एकूणच नृत्यांगनेच्या आविर्भावावरून कथ्थक नृत्याला सुरवात होणार, याची आपली खातरजमा होते.
सगळा प्रेक्षकगण काहीशा अधिरतेने कार्यक्रम कधी सुरु होणार याची वाट पहात असतात आणि रंगमंचाच्या आतल्या बाजूने, मर्दानी आवाजात भैरवी रागावर आधारित अशी दीर्घ आलापी येते आणि पाठोपाठ, तबल्याचे खणखणीत बोल ऐकायला येतात. तबल्याचे एक सुंदर वर्तुळ पूर्ण होते आणि पाठोपाठ संतूरचे मधुर सूर आणि तबल्याचे बोल, याची अप्रतिम रचना ऐकायला मिळते. रंगमंचावर पार्श्वभागी काहीशा अंधाऱ्या जागेत, नृत्यांगनेच्या अस्तित्वाची सावली, तबल्याच्या बोलांवर आधारित नृत्याचे तुकडे सादर करायचे निर्देश देत असते.
जसा रंगमंच प्रकाशाने उजळून निघतो तशी रंगमंचावर खऱ्याअर्थाने नृत्याला सुरवात होते. गाण्याची लय हळूहळू द्रुत लयीत येते, नृत्यांगनेची पावले तबल्याच्या बोलांवर थिरकत असतात आणि गायकाचा आवाज देखील त्याच्या तोडीस तोड ताना, हरकती घेत असतो. सगळेच वातावरण, मद्याच्या ग्लासात केशरी किरण पडून काच उजळून निघावी त्याप्रमाणे रंगमंच उजळलेला असतो. या सगळ्यात एक गंमत असते. ज्या रंगमंचावर गायकाच्या आवाजाची मोहिनी पडलेली असते, तो गायक मात्र आपले अस्तित्व अंधारात लपवून ठेवत असतो. अर्थात, यात रंगमंचावरील नृत्यांगनेला मात्र गायकाच्या अस्तित्वाची जाणीव असते.
गाण्याच्या शेवटाला, ती नृत्यांगना अचानक आतल्या बाजूचे दिवे लावते आणि सगळ्यांना त्या गायकाचे दर्शन घडते. तो गायक मात्र पूर्ण भांबावून जातो आणि कसेबसे गाणे पूर्ण करतो. आपल्याला दिसतो, तो गायकाच्या विद्रूप, किळसवाणा चेहरा आणि चकित होतो. हीच सगळी कहाणी आहे, "नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी" या सुप्रसिद्ध गाण्याची. अभिनेत्री आशा पारेख यांच्या आयुष्यातील सगळ्यात अप्रतिम भूमिका आणि मुख्य म्हणजे या गाण्यात, तिच्यातील नृत्यकौशल्याचा जितका सुरेख वापर करून घेतला आहे, तितका तिच्या पुढील विरळा किंवा जवळपास अजिबात करून घेतल्याचे आढळत नाही. तोच प्रकार, अशोक कुमार या अत्यंत देखण्या, रुबाबदार अभिनेत्याबाबत म्हणता येईल.
दिग्दर्शक "आर.के. राखन" यांच्या "मेरी सुरत तेरी आंखे" या चित्रपटातील एका अजरामर गाण्याला सुरवात होते. जन्मापासून विद्रूप म्हणून त्याच्या आई-वडिलांनी एका मुसलमानाला देऊन टाकलेला!! त्यामुळे आयुष्यभर मनात, "आपण जगाला नको आहोत" अशा नकारात्मक भावनेने पछाडलेला नायक, दत्तक बापाने दिलेल्या संगीताच्या शिकवणुकीच्या आधाराने, आयुष्यात उभारी घेण्याचा सतत प्रयत्न पण तरीही जगापासून आपले अस्तित्व लपविल्याने, मनात साचलेली खंत!! अशोक कुमार यांनी आयुष्यात बऱ्याच अजरामर भूमिका केल्या पण अशा प्रकारची भूमिका एकमेव!!
या गाण्याची चाल, "साडे नाल" या पंजाबी टप्प्यावर आधारित चाल बांधलेली आहे. संगीतकार एस.डी.बर्मन यांनी, या गाण्याच्या द्वारे, या मूळ चालीचे अक्षरश: सोने केले आहे. खरतर, "टप्पा" हा शास्त्रीय संगीतातील एक अनोखा आविष्कार आहे. सर्वसाधारणपणे "टप्पा" गायन हे मध्य लयीत सुरु होते आणि हळूहळू रचनेची बढत, द्रुत लयीत होते. हे गाणे देखील याच धर्तीवर बांधलेले आहे. अर्थात, गाण्याला नृत्याचे अंग असल्याने, गाण्यात तबला वादनाला अपरिमित महत्व आलेले आहे. पंडित किशन महाराज यांनी, या गाण्यात आपल्या वादनाची असामान्य चुणूक दाखवली आहे. हे सगळे झाले तरी, या गाण्याचा खरा नायक आहे - गायक मोहमद रफी. आवाजाचा पल्ला, भरीवपणा, समान ताकदीची फेक, मर्दानी जोमदारपणा, अत्यंत सुरेल आणि लहान स्वरांशाचे सफाईदार द्रुतगती गायन या गुणांचा त्यांच्या आवाजात नेहमी आढळ दिसतो.
गाण्याच्या सुरवातीला जो आलाप आहे, त्यातून गायकाच्या मर्दानी आवाजाची आपल्याला कल्पना येते आणि खरे म्हणजे त्यातूनच गाण्याच्या पुढील रचनेचे सूचन होते. कविता म्हणून या रचनेत काही फार विशेष हाताला लागत नाही परंतु बंदिशप्रचुर तेंव्हा उपमा, प्रतिमा या अलंकारांना इथे स्थान नाही जाण ठेऊन शैलेंद्र यांनी गीतरचना केली आहे, मुळात, शैलेंद्र यांच्या बहुतेक रचना या गीतसदृश असतत. तिथे गुढार्थ किंवा विचारांना फारसे स्थान नसते आणि जो विचार असतो, तो शक्यतो साध्या सोप्या शब्दातून मांडलेला दिसतो.नायकाची मानसिक तडफड आणि त्याचे गायनातून होणारे सादरीकरण, इतपत मर्यादित हेतूने गाण्याची शब्दकळा बांधली आहे पण तरीही, गाण्यात गेयता असणे तसेच चालीचे बंधन पाळून शब्दरचना करणे, यातूनच आराखडा तयार केलेला आहे.
"नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी
बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी
नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी.
या ओळींतच तबल्याचे बोल मिसळून, गाण्याचा विस्तार काय धर्तीवर असेल याचे सूचन मिळते. गाणे पहिल्यापासून द्रुत लयीतच चालते आणि त्याला नृत्याची अप्रतिम जोड आहे. काह्रेतर, गायन, तबला आणि नृत्य या त्रयीवर सगळे गाणे आधारलेले आहे. गाण्याच्या सुरवातीला केरवा ताल आहे. आठ मात्रांच्या या तालातील शेवटचे बोल, विशेषत: "धिन, ना" हे बोल डग्ग्यावर घेऊन गाण्यात खुमारी आणली आहे आणि त्या बोलांची जोड नृत्याच्या पदन्यासाशी जुळवून घेतल्याने, गाणे अधिक रंगतदार होते. आशा पारेख प्रशिक्षित नर्तिका आहे, हे तिच्या हाताच्या किंवा बोटांच्या हालचालीतून नेमकेपणी जाणवते.
गाणे पहिल्यापासून द्रुत गतीत आणि नृत्याच्या हालचालीने बांधलेले असल्याने, पडद्यावरील सादरीकरण देखील तितकेच विलोभनीय झालेले आहे. आशा पारेख यांची प्रत्येक हालचाल, ही तालाशी निगडीत आहे आणि त्यामुळे अर्थात तबल्याच्या बोलांना विलक्षण उठाव मिळतो. त्यामुळे, ध्रुवपदानंतरचा वाद्यमेळ हा पारंपारिक भारतीय वाद्यांवर आधारित आहे जसे पहिला अंतर सुरु व्हायच्या आधीचा जो स्वरिक वाक्यांश आहे, त्या वाद्यमेळात, प्रथम बासुरी आणि त्याला जोडून सतारीचे सूर घेतले आहेत पण या वाद्यांची "गत" बांधताना, विशेषत: सतारीच्या प्रत्येक सुराशी तबल्याच्या बोलाचे नाते जोडले आहे आणि त्याच्याच आविष्कार नृत्याच्या पदन्यासातून आपल्याला सुरेख अनुभवता येतो. हे जे सगळे "बोल" आहेत, तेच या गाण्याचे वेगळे सौंदर्य म्हणून सांगता येईल.
कुहु के कोयलिया, कुहु के कोयलिया कही दूर पपीहा बुलाये
टुटे ना ये सपना, टुटे ना ये सपना, कोई अब मुझे ना जगाये
घिर आये, बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी
नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी.
वास्तविक, कडव्याच्या चालीत तसे फार फेरफार नाहीत,शक्यतो स्वररचना तशीच ठेवलेली आहे पण गाताना, रफीने ज्या प्रकारे स्वरांची "उठावण" घेतलेली आहे, त्यावरून गायकाच्या अभ्यासाचा अंदाज घेता येतो. इथे घिर आये, बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी" ही ओळ घेताना लय "दुगणीत" जाते आणि गाणे विलक्षण वेगात सुरु होते. खरेतर हे सगळे रागदारी संगीतात अनुभवता येते परंतु संगीतकाराचे चातुर्य असे की, हे सगळे अलंकार त्याने मोठ्या खुबीने या गाण्यात घेतले आहेत. हे गाणे ऐकताना, तुम्ही क्षणभर देखील उसंत घेऊ शकत नाही!!
यही रुक जाये, यही रुक जाये, ये शाम आज ढलने ना पाए
टुटे ना ये सपना, टुटे ना ये सपना, कोई अब मुझे ना जगाए
घिर आये, बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी
नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी.
हे कडवे सुरु होण्याआधीचा वाद्यमेळ आणि आधीच्या कडव्यातील वाद्यमेळ ऐकण्यासारखा आहे. अशा प्रकारच्या रचनेत,शक्यतो वाद्यमेळ संगीतात फारसे बदल अपेक्षित नसतात कारण तीन मिनिटांच्या गाण्यात तितका अवकाश प्राप्त नसतो. असे असून देखील या गाण्यातील दुसरा अंतरा सुरु होण्याआधीचा वाद्यमेळाची स्वररचना संपूर्ण भिन्न आहे आणि तरीही परत लयीच्या त्याच अंगाने, गाणे समेवर येते.
छुप छुप ऐसे मे, छुप छुप ऐसे में, कोई मधुए गीत गाए
गीतो के बहाने, गीतो के बहाने,छुपी बात होटो पे आए
घिर आये, बदरा घिर आये, रुत है भिगी भिगी
नाचे मन मोरा मगन तिक-धा-धीगी धीगी.
इथे परत एकदा संगीतकार एस.डी.बर्मन यांनी अशीच एक मजेशीर रचना बांधली आहे.कडव्याच्या चालीत तोच आकृतिबंध कायम ठेऊन, वाद्यमेळाची रचना काहीशी संथ ठेवली आहे पण लय मात्र तशीच वेगवान आहे. थोड्या वेगळ्या उदाहरणाने हे अधिक स्पष्ट व्हावे. उस्ताद विलायत खांसाहेब, नेहमीच गत द्रुत लयीत चालू असताना, तबल्याच्या एखाद्या मात्रेवर स्वररचना मंद्र सप्तकात ठेवतात आणि रागाचे अपूर्व स्वरूप आपल्याला घडवतात. हा प्रकार निरतिशय कठीण आहे आणि या गाण्यात, त्याच प्रकारची स्वररचना, वाद्यमेळातून ऐकायला मिळते. संगीतकार "दिसतो" तो अशा ठिकाणी.
गाण्याचा शेवट मात्र नक्कीच अविस्मरणीय होणे क्रमप्राप्तच ठरते. गाण्याची कडवी संपतात आणि गाण्याचा ताल बदलतो. रचना त्रितालात सुरु होते आणि गाण्याची लय विलक्षण द्रुत होत जाते. रफीची आलापी देखील दीर्घ आणि वरच्या स्वरात होते. तबला विलक्षण अवघड लयीत सुरु होतो आणि त्याचबरोबर नृत्याची गती देखील. ही तर अप्रतिम जुगलबंदी आहे आणि पण तरीदेखील त्यात विलक्षण लालित्य आहे, लडिवाळ स्वरावली आहे. केवळ मात्रांचा आणि नृत्याचा गणिती हिशेब नसून त्याला सुरेख भावनिक जोड दिलेली आहे. गाणे चित्रपटातील आहे, याची वाजवी जाणीव संगीतकाराकडे असल्याचे हे लक्षण आणि म्हणूनच, गाणे कुठेही क्षणभर देखील रेंगाळत तर नाहीच पण आपली उत्सुकता ताणली जाते. चित्रपट गीताचे आणखी वेगळे कुठले वैशिष्ट्य सांगायचे?
No comments:
Post a Comment