फार पूर्वी, प्रसिद्ध गझल गायिका बेगम अख्तर यांना एक प्रश्न विचारला होता. "आयुष्यात खरे गाणे कधी गायलात?" या प्रश्नावर त्यांनी बरेच विस्तारपूर्वक उत्तर दिले होते पण त्याचा गोषवारा घ्यायचा झाल्यास, "मी खूप वर्षांनी प्रथमच लखनौ रेडियो स्टेशनवर गायला गेले असता, त्यावेळी खऱ्याअर्थी पोटभर गायले". त्यामागील पार्श्वभूमी अशी होती, लग्नानंतर बेगम साहिबांनी गायन बंद केले होते परंतु आतल्या आत सुरांची तडफड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
याच पार्श्वभूमीवर, "अनुराधा" चित्रपटातील "कैसे दिन बीते, कैसी बीती रतियां" या गाण्याचा विचार करता येईल. चित्रपटातील नायिका, मुळातली प्रतिभाशाली गायिका परंतु लग्नानंतर तिच्या पतीने, तिच्या या छंदाकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याने, स्वत:चे गाणे बंद करून टाकले आणि आतल्या आत झुरत राहिली. नवरा डॉक्टर असल्याने आणि संपूर्ण वेळ हाच व्यवसाय करीत राहिल्याने, पत्नीकडे दुर्लक्ष झाले आणि पत्नीने देखील हे वास्तव निमुटपणे स्वीकारले असल्याने, मनातल्या मनात गायन करणे, इतपतच सगळी संगीत साधना राहिली.
एके दिवशी, एक पेशंट यांच्या घरी येतो आणि नायिकेला बघून चमकतो. नायिकेच्या गायनाच्या जुन्या आठवणी निघतात आणि त्यातून, गायनाचा आग्रह होतो. मनात कोडून ठेवलेले आणि भळभळत असलेले सूर गळ्यातून येताना वेदनेचा अप्रतिम आकार घेऊन येतात आणि हे गाणे सादर होते.
अभिनेत्री लीला नायडू यांनी हिंदी चित्रपटात काही फार भूमिका केल्याचे आठवत नाही पण ही भूमिका मात्र केवळ अप्रतिमरीत्या वठवली आहे.वास्तविक, त्यांची भूमिका अतिशय वाखाणलेली गेली होती पण तरीही त्यांचा, हिंदी चित्रपट सृष्टीत जम बसला नाही, हे निखळ सत्य. बलराज सहानींचा तर प्रश्नच नाही. या माणसाने, आजमितीस "वाईट" अभिनय केला आहे, असे निदान माझ्या तरी पाहण्यात नाही. यालाच जोडून, आणखी म्हणता येईल, या चित्रपटाचे संगीतकार प्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर आहेत आणि त्यांनी देखील, ४,५ हिंदी चित्रपट वगळता, आणखी काही चित्रपटांना संगीत दिल्याचे आठवत नाही.
हे गाणे मी जेंव्हा ऐकतो तेंव्हा प्रत्येकवेळी माझ्या मनात कवी ग्रेस यांच्या "पाउस" कवितेची आठवण येते.
"पाउस कधीचा पडतो, वाऱ्याने हलती पाने:
हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सुरांने".
हे गाणे असेच आहे. मनाला झालेली जखम एखाद्या संतत चिघळत असलेल्या वेदनेप्रमाणे झुळझुळत असते. या वेदनेला "आक्रोश" नसतो तर केवळ चिरदाह सहन करावा लागतो. चित्रपटातील नायिकेची मनोवस्था नेमकी अशीच आहे आणि तो भाव नेमकेपणाने जाणून घेऊन, या गाण्याची रचना केली आहे.
गाण्याचे चित्रीकरण देखील तसेच आहे. घरातली घरगुती बाई जसे सहज, उस्फुर्त पण तरीही गायकी ढंगाचे गाणे गाईल, तसेच केले आहे. सगळे चित्रीकरण एका खोलीत केले आहे पण तसे करताना, प्रत्येक व्यक्तीरेखेचा "स्वभाव" नेमकेपणाने टिपलेला आहे.पंडित रविशंकर यांनी "माज खमाज" या काहीशा अनवट रागावर आधारित तर्ज बांधली आहे. गाण्याच्या सुरवातीलाच लताबाईंनी "हाये" शब्द जसा उच्चारला आहे, त्या स्वराला दुसरी तोड नाही. मी, वरती ग्रेस यांच्या कवितेच्या काही ओळी उधृत केल्या आहेत, त्यातील "दु:खाच्या मंद सुरांने" या शब्दांतील जाणीव नेमकी "हाये" शब्दाच्या सुरांत एकवटली आहे. मनातली सगळी वेदना त्या शब्दात, लताबाईंनी आणली आहे.चित्रपट गायकीची ही असामान्य करामत आहे.
पुढे लगेच गाण्याला सुरवात होते. "कैसे दिन बीते, कैसी बीती रतियां, पिया जाने ना" या ओळीतील "पिया" शब्द देखील किती सुरेख घेतला आहे. "दिन बीत गये, रांते भी उड गयी लेकिन "पिया" को कोई पता नाही" ही विखारी आणि व्याकूळ करणारी जाणीव "पिया" या शब्दात सामावली गेली आहे. कवितेतील कुठल्या शब्दाला किती महत्व द्यायचे, हे संगीतकाराचे काम आणि त्याचबरोबर त्या शब्दातून, कवितेचा आशय कसा वृद्धिंगत करायचा, हे गायकाचे काम. गाताना शब्दावर किती "आघात" द्यायचा जेणेकरून भावनांचे प्रकटीकरण रसिकांसमोर सादर होईल. पहिल्यांदा घेतलेला "हाये" आणि इथला "पिया" हे शब्दातून या गाण्याची संस्कृती आपल्या ध्यानात येते आणि गाणे कुठली वळणे घेऊन, विस्तार करणार आहे, याचा अदमास घेता येतो. गाण्याची अचूक बांधणी ही अशाच स्वररचनांमधून सिद्ध होत असते.
पुढे लगेच गाण्याला सुरवात होते. "कैसे दिन बीते, कैसी बीती रतियां, पिया जाने ना" या ओळीतील "पिया" शब्द देखील किती सुरेख घेतला आहे. "दिन बीत गये, रांते भी उड गयी लेकिन "पिया" को कोई पता नाही" ही विखारी आणि व्याकूळ करणारी जाणीव "पिया" या शब्दात सामावली गेली आहे. कवितेतील कुठल्या शब्दाला किती महत्व द्यायचे, हे संगीतकाराचे काम आणि त्याचबरोबर त्या शब्दातून, कवितेचा आशय कसा वृद्धिंगत करायचा, हे गायकाचे काम. गाताना शब्दावर किती "आघात" द्यायचा जेणेकरून भावनांचे प्रकटीकरण रसिकांसमोर सादर होईल. पहिल्यांदा घेतलेला "हाये" आणि इथला "पिया" हे शब्दातून या गाण्याची संस्कृती आपल्या ध्यानात येते आणि गाणे कुठली वळणे घेऊन, विस्तार करणार आहे, याचा अदमास घेता येतो. गाण्याची अचूक बांधणी ही अशाच स्वररचनांमधून सिद्ध होत असते.
गाण्यावर बंगाली ठसा जाड आहे पण बंगाली भाषेतील "गोलाई" येत नसून स्वरांना टोक येते. गाणे चालू असताना, नायिकेच्या चेहऱ्यावरील निराशा आणि नायकाची दुर्लक्षित वृत्ती देखील बघण्यासारखी आहे.
"नेहा लगा के मैं पछताई
सारी सारी रैना निंदिया ना आयी
जान के देखो, मेरे जी की बतियां
पिया जाने ना"
इथे रचना किंचित द्रुत लयीत जाते पण इतकीही नव्हे की रचनेचा तोल बिघडेल. "जान के देखो, मेरे जी की बतियां" या ओळीचे, रचनेच्या दृष्टीने दोन खंड पाडले आहेत."जान के देखो" ही ओळ पहिल्या ओळींच्या लयीतच घेतली आहे पण लगेच "मेरे जी की बतियां" इथे "उतरी" स्वर घेऊन, मूळ स्वररचनेला जोड दिली आहे. असामान्य स्वरिक कलाकुसर आहे. लय सगळी बदलते पण आशयाला कुठेही धक्का पोहोचत नाही. या ओळी पडद्यावर सादर होत असताना, नायकाचे वाचनात गर्क होणे आणि घरी आलेल्या पाहुण्याला त्याचे वैषम्य वाटणे, सगळे कसे गाण्यातील भावना भरीव करणारे आहे.
पुढील ओळी सादर होताना, एक सुंदर दिग्दर्शकीय नमुना दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जींनी पेश केला आहे. गाण्यातील वाद्यमेळाचे सूर चालू असताना, घरातील पाहुण्याचे लक्ष घरातील एका तसबिरीकडे जाते. तिथे नायिकेचा जुना फोटो आहे आणि त्याच बाजूला आताची नायिका गात आहे, असे त्याला भासायला लागते. क्षणभराची अनुभूती आहे पण यथार्थ आहे.
कडव्यांची बांधणी तशी समान आहे म्हणजे पहिल्या कडव्याची चाल आणि दुसरे कडवे, यात सत्कृत्दर्शनी काहीही फरक नाही आणि त्याच, पूर्वीच्या तालात आणि लयीत गाणे पुढे सरकते.
"रुत मतवाली आके चली जाए
मन में ही मेरे मन की रही जाए
खिलने को तरसे, नन्ही नन्ही कलियां
पिया जाने ना"
इथे देखील शब्दांची वाजवी जाणीव ठेवलेली आहे. "आके चली जाए" मधील "जाए" शब्दातून, कवी शैलेंद्र यांनी जी निराशा व्यक्त केली आहे त्याचे निराशेशी गाण्याची चाल तद्रूप होते. "जाए" मधील "जा" अक्षरानंतर किंचित स्वरांत हेलकावा दिला आहे आणि कसे सगळे विरून गेले, याचीच जाणीव करून दिली आहे. सगळे गाणे हे अत्यंत हताश आणि काहीतरी जवळचे पण महत्वाचे संपून गेल्याची आठवण करून देणारे आहे." खिलने को तरसे, नन्ही नन्ही कलियां" या ओळीतून आपल्याला हेच वाचायला मिळते. आयुष्यातील अतिशय छोटे आनंद देखील कसे करपून जातात आणि तरीही आयुष्य तसेच पुढे चालत असते!!
हे कडवे संपत असताना, नायक गाण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून, खोलीचा दरवाजा उघडून आतल्या खोलीत जायला निघतो. पडद्यावर नायकाची पात दिसते आणि ती पाठ बघून, नायिकेची विषण्णता अधिक गहिरी होते, हा अभिनय बघणे, खरोखरच मनोज्ञ आहे. आपल्या नवऱ्याने, इतकी वर्षे जे केले तेच आता देखील, गाणे चालू असताना केले, हे बघून, मनातली काजळी चेहऱ्यावर उमटली आहे. गाण्यातील वाद्यमेळ देखील त्याच वृत्तीचा आपल्यावर गडद परिणाम होईल, असाच योजलेला आहे.
"कजरा ना सोहे, गजरा ना सोहे
बरखा ना भाए, बदरा ना सोहे
क्या कहू जो पुछे, मोसे मेरी सखियां
पिया जाने ना"
कवी शैलेंद्र यांनी देखील ही भावना मांडताना, "सोहे" सारखे लोकसंगीतातील शब्द घेतले आहेत तसेच त्याचबरोबर वेदना अधिक मुखरित करण्यासाठी, "कजरा","बरखा" सारख्या शब्दांचा उपमेप्रमाणे उपयोग करून, आशय अधिक अंतर्मुख केला आहे. नवऱ्याने पाठ फिरवली असल्याने, असलेली जाणीव अधिक खोल झाल्याची भावना, या कडव्याची सुरवात करताना किंचित वरच्या सुरांनी व्यक्त केली आहे आणि हे देखील एकूण गाण्याच्या भावनेशी अत्यंत सुसंगत आहे. "बरखा" येउन देखील आपल्या मनावर त्याचा काहीही परिणाम होऊ शकला नाही आणि आयुष्य उजाड झाले.
कवी म्हणून या रचनेकडे बघितल्यास, एक बाब स्पष्ट होते, काव्यात वर्तमानाच्या उंबरठ्यावर तोललेला भूत आणि भविष्याचा कालभाग आणि या दोन टोंकात ताणलेली भाववृत्ती, हाच स्थायीभाव आहे. वर्तमानाच्या क्षणाच्या या दोन टोकांपासून बदलत असणाऱ्या अंतराने, व त्यामुळे बदलणाऱ्या ताणाने, या भाववृत्तीच्या छटा काव्यात आल्या आहेत. आणि अशा कितीतरी तरल छटा, स्थायीभावाची किती विविध रूपे, या कवितेंतून शब्दांकित केली आहेत. शब्दांत पकडणे केवळ अशक्य वाटावे, अशा कितीतरी भावच्छटांना शब्दाचे शरीर दिले आहे!! वर्तमानातील भकास क्षण भोगताना स्मृतींच्या मोहक क्षणांना गोंजारण्याची हळवी वृत्ती; या जाणिवेने तगमग आणि याच जाणिवेने आलेली बधिरता; कधी या दोहोंत तोल सावरून, काहीतरी होईल आणि आपण यातून मुक्त होऊ, या कल्पनेची लागलेली आस पण त्याचवेळी उरलेल्या जीवनाला अर्थ आहे तो केवळ याच स्मृतींमुळे आणि ती दु:खाची तार सुटली तर काहीतरी भयंकर होईल, याची विषण्ण जाणीव!! अशा अनेक आणि विविध भावच्छटा येथे काव्यरूप झाल्या आहेत. आणि म्हणूनच अशा वर्णनांतून काव्याच्या भावनाशयाची जरी कल्पना देता आली तरी खोलीची कल्पना देता येणे केवळ अशक्य!! आणि तसे करताना शब्द, शब्दसमूह, त्यांची गुंफण, प्रतिमा या त्यांच्या काव्यशरीराच्या घटकांकडे बघत, बघत हा प्रवास केला तरच त्यांचे स्वरूप स्पष्ट जाणवेल.
गाण्याचा शेवट पूर्णपणे वाद्यमेळ थांबवून, केवळ लताबाईंच्याच सुरात करणे, हे एका दृष्टीने अपरिहार्य होते, एकटेपणाची जळजळीत जाणीव परत आपल्या मनातच दाबून ठेवायची ही खूण!! एका दृष्टीने एका असामान्य कुवतीच्या कलाकाराची मानसिक परवड कशी होते, याचे अप्रतिम चित्रण केवळ चित्रिकरणातून नसून, सुरांच्या सहाय्याने गाण्यातून कसे व्यक्त करायचे, याचा हे गाणे गाणे म्हणजे समृद्ध अनुभव आहे.
No comments:
Post a Comment