काही गाणी का लोकप्रिय होतात आणि काही गाणी विस्मृतीत का जातात, या बाबत तसे ठाम ठोकताळे नाहीत. बरेचवेळा "लोकप्रियता" हा घासून गुळगुळीत आलेला शब्द वापरला जातो पण तरीही ते काही समाधानकारक उत्तर नव्हे. एक तर नक्की, "आता मी सर्वोत्तम चाल बांधतो" असे सांगून कुणीही संगीतकार अप्रतिम चाल बांधू शकत नाही. चाल शब्दांतून उमटते किंवा सुरांशी खेळात असताना अचानक निर्माण होते. त्याचा सुयोग्य पद्धतीने धांडोळा घेणे अशक्य!! बरेचवेळा असे देखील निदान केले जाते, लोकप्रिय झालेली चाल तितकीशी चांगली नसते किंवा सुंदर चाली तितक्याशा प्रसिद्ध होत नाहीत. याबाबत अनेक शक्यता निघू शकतात.
आजचे प्रस्तुत गाणे वरील सगळ्या शक्यतांना छेद देणारे आहे. गाणे आजही लोकप्रिय आहे आणि गाण्याच्या सगळ्या अंगाने बघितल्यास, गाणे हे "गाण्याच्या" पातळीवर उतरते. थोडक्यात, गाण्यातील १) शब्द, २) चाल आणि ३) गायन, या तिन्ही मूलभूत घटकांवर गाणे लखलखीतपणे समोर येते. आता या तिन्ही घटकांच्या आधारे या गाण्याबद्दल विचार करायला घेऊया. शब्दरचना कवी सुधांशु यांची आहे. "हणमंत नरहर जोशी" हे मूळचे नाव परंतु कविता लेखनासाठी त्यांनी "सुधांशु" हे नाव स्वीकारले. वास्तविक आयुष्यभर श्री दत्ताची पूजा,पौराहित्य केले आणि आजही महाराष्ट्रात श्री दत्ताचे कवी म्हणूनच ख्यातकीर्त आहेत. कवी सुधांशु जरी दत्त भक्त होते तरीही त्यांनी "इथेच आणि या बांधावर" सारखी प्रणयरम्य शब्दरचना केली. याचाच वेगळा अर्थ, निर्मितीला कसलेही "लेबल" लावण्यात काहीही अर्थ नसतो. ही कविता लिहिली, तो काळ काहीसा स्वप्नाळू, धुंद असा काळ होता आणि त्यानुरुपच कवी सुधांशु यांनी ही कविता लिहिली आहे. कविता फार अर्थपूर्ण, गूढ वगैरे अजिबात नाही आणि ललित संगीताच्या आकृतिबंधाची तशी फार मागणी देखील नसते. कवितेत आलेली गेयता सहजस्फूर्त आणि काहीशी बाळबोध आहे.
इथेच आणि या बांधावर अशीच शामल वेळ,
सख्या रे किती रंगला खेळ
संगीतकार विठ्ठल शिंदे आहेत. विठ्ठल शिंदे वस्तूत: लोकगीतांचे संगीतकार म्हणून अधिक लोकप्रिय तरीही आपल्या पिंडाला बाजूला सारून त्यांनी अशी सुरेख स्वररचना सादर केली आहे. बासरीच्या हलक्या सुरांतून यमन सारख्या लोकप्रिय रागाचे सूचन करीत सुरवातीचा वाद्यमेळ बांधला आहे. जशी शब्दरचना तशीच स्वररचना आहे. संयत प्रणयाविष्कार आणि संध्याकाळची निवांत, शांत वेळ ध्यानात घेऊनच चाल बांधली आहे. चालीत कुठेही अवघड हरकत नाही की अवजड ताना नाहीत. तशा अलंकारांची गरजच नाही. अर्थात त्यावेळची सांगीत संस्कृती लक्षात घेता, भरमसाट वाद्यमेळ वगैरे चैनी मराठी ललित संगीताला परवडणाऱ्या नव्हत्या. त्यावेळची बहुतांश गाणी ऐकली तर एक ध्यानात येईल, गाणे बांधताना,गाण्याची चाल बांधणे, याकडे संगीतकार आपले लक्ष वेधून घेत असत. चाल सुबोध असणे, ही गरज होती. यमन रागाच्या लडिवाळ सुरांवर हिंदोळे घेत, गाण्याची सुरवात होते आणि रसिकांचे लक्ष तिथेच वेधले जाते. मुखड्याची चाल काहीशी गतिमान ठेवली आहे आणि दुसरी ओळ, पहिल्याच्या दुपटीने घेतली आहे. अर्थात असे करताना,कवितेतील आशय कुठेही दुर्लक्षिलेला नाही.
शांत धरित्री शांत सरोवर
पवन झुळझुळे शीतल सुंदर
अबोल अस्फुट दोन जीवांचा अवचित जमला मेळ
पहिला अंतरा शब्दार्थाने बघितला तर मी वरती जे साधे, सुबोध शब्द वापरले, त्याचीच प्रचिती देणारा आहे. गाण्यातील तिन्ही अंतरे एकाच चालीत बांधले आहेत. तसेच "उठावण" घेताना सुद्धा कुठेही "जोर" लावलेला नाही. "शांत धरित्री, शांत सरोवर" या शब्दांतून मांडलेली शांतता, संपूर्ण चालीतून दृग्गोचर होते.
रातराणीचा गंध दरवळे
धुंद काहीसे आतून उसळे
चंद्र हासला, लवली खाली नक्षत्रांची वेल
गायिका म्हणून माणिक वर्मांचे विश्लेषण करायचे झाल्यास, या गायिकेने उत्तर भारतीय संगीताचा ढंग सफाईने मराठी ललित संगीतात आणला. त्यांच्या अनेक कृष्णगीतांत याचे प्रत्यंतर येते. पंजाब अंगाची फिरत पण मादकपणाशिवाय. गायनात नखरा आहे पण अगदी लखनवी घराण्याचा नाही. बनारसी ठुमरीच्या ढंगाजवळ जाणाऱ्या प्रसरणशील चालींची भावगीते, हा त्यांचा खास आविष्कार म्हणावा लागेल. मुखडा किंवा अंतरा, खालच्या अंगाचा असला तरी (जसा इथे आहे) पहिली लकेर सफाईने खालून वर जाणार. इथे पहिल्या अंतऱ्यातील " पवन झुळझुळे शीतल सुंदर " नंतर " अबोल अस्फुट दोन जीवांचा अवचित जमला मेळ" ही ओळ घेताना, वरील विधानाचे प्रत्यंतर येते. तसेच " अवचित जमला मेळ " किंवा " नक्षत्रांची वेल " याची द्विरुक्ती करताना छोटासा आलाप घेतलेला आहे, तो बनारसी ढंगाची आठवण करून देतो.
पहाटच्या त्या दवांत भिजुनी
विरली हळूहळू सुंदर रजनी
स्वप्नांसुमांवर अजुनी तरंगे, ती सोन्याची वेळ
आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास संदिग्ध आणि घरंदाज गोडवा!! माणिक वर्मांच्या गालातच तशी नैसर्गिक देणगी असल्याप्रमाणे, गळ्यातून गोडवा बाहेर पडतो. या गायिकेचे कुठलेही गाणे ऐकायला घेतले तरी कुठेही छचोरपणा, नटवेपणा नसतो. घरगुतीपणाचा सोज्वळ गंध कायम आवाजात राहिला आणि त्यामुळेच बहुदा माणिक वर्मांना भावगीत गायिका म्हणून अमाप लोकप्रियता मिळाली. गायन करताना कुठेही अकारण नाट्यमयता आणण्याचा प्रयास नसतो. किंबहुना सर्वसमावेशकता हाच गुण प्रामुख्याने ऐकायला मिळतो. त्यामुळे गायकीचा "असर" दिसला नाही तरी वृत्तीचा परिणाम दिसतो. याच गुणांचा आढळ या गाण्यातून सर्वत्र पसरलेला दिसतो. म्हणूनच बहुदा आजही या गाण्याची लोकप्रियता तितकीच आहे जितकी अर्धशतकापूर्वी होती.
No comments:
Post a Comment