मागील शतकात, आपल्या आयुष्यात दूरदर्शनचा प्रवेश होण्यापूर्वी रेडियोचे, मनोरंजन म्हणून स्थान बरेच वर्षे अबाधित होते - आजही बरेचजण सतत रेडिओ ऐकत असतात पण एकूण प्रमाण कमीच झाले आहे. माझा तेंव्हा देखील ऐकण्याचा भर म्हणजे मराठी गाणी. अशावेळी कधीतरी अचानक, "भावसरगम" कार्यक्रम ऐकला आणि तो कार्यक्रम ऐकायची सवयच लागली. "भावसरगम" कार्यक्रमाने मराठी ललित संगीतात प्रचंड भर टाकली. एक संपूर्ण पिढी घडवली, असे म्हणायला प्रत्यवाय नसावा, इतका प्रभाव रसिकांवर पडला होता. कितीतरी नवे संगीतकार, नव्या दमाचे कवी, गायक/गायिका यांना अतिशय विपुल प्रमाणात संधी मिळाली. याच पंक्तीत मानाचे स्थान मिळवणारे संगीतकार - दशरथ पुजारी!! संगीतकार म्हणून त्यांचे मूल्यमापन आपण नंतर करू पण त्याआधी गाण्याकडे वळूया.
गाण्याची चाल स्पष्टपणे यमन कल्याण रागावर आधारित आहे. गाण्याच्या सुरवातीलाच सतारीच्या सुरांमधून या रागाचे सूचना मिळते. अर्थात, ललित संगीताच्या शिरस्त्याप्रमाणे चाल, रंगापासून काहीशी दूर जाते पण ते तर ललित संगीताचे प्रधान वैशिष्ट्य आहे. सतारीचे सूर किंचित्काळ ऐकायला मिळतात आणि लगोलग, गायक म्हणून खुद्द दशरथ पुजारी अवतरतात. गाण्याची चाल सुबोध आहे पण कविता म्हणून वाचायला गेल्यास, शब्दरचना देखील तशीच साधी,सरळ आहे. संयत प्रणयाचाच काळ होता आणि त्यानुरुपच गाण्यातील प्रणयाची जी काही धिटाई असायची ती , निसर्गाच्या प्रतिमांतूनच आपल्या समोर यायची. पहिल्याच ओळीत, "सदाफुली" सारख्या सध्या फुलाचे प्रतीक घेतले असल्याने, पुढे त्याच प्रतिकाला धरूनच शब्दरचना येणार, याचा अंदाज घेता येतो. कवितेतील फुले म्हणून जी निवडली आहेत, ती बघितली तर वरील विधानाचा अर्थ समजून घेता येईल. "सदाफुली","शेवंती", "मोगरा" ही फुले तशी सामान्य जनांच्या जिव्हाळ्याची फुले आहेत आणि सहजपणे कुठेही दृष्टोत्पत्तीस पडतात, परिणामी सगळीच रचना ही सुबोध झाली आहे. कुठेही फार प्रयोग केलेले आढळत नाहीत म्हणजे नवीन वाद्ये, लयीचे वेगळे बंध किंवा लयच अति अवघड बांधणे इत्यादी. गाण्यात चालीच्या कुलशीलाला योग्य अशीच शब्दकळा आहे. चाल सहजपणे गुणगुणता येण्यासारखी असल्याने रसिकांच्या मनात बसली. इथे एक बाब स्पष्ट करावीशी वाटते,साधी चाल बांधणे हे कधीच साधे, सहजशक्य नसते. त्यासाठी संगीताचा व्यासंग तितकाच भरीव असावाच लागतो.
अजून त्या झुडुपांच्या मागे
सदाफुली दोघांना हसते
अजून आपुल्या आठवणींनी
शेवंती लजवंती होते
गाण्यात साधा आणि ललित संगीतात प्रसिद्ध असलेला केरवा ताल वापरलेला आहे. आता यानिमित्ताने संगीतकार दशरथ पुजारीचे मूल्यमापन करायचे झाल्यास, खंत अव्यक्तपणे व्यक्त करणे, अंतर्मुखता आणि हळवी असहायता तसेच मुग्ध व संयत अभिव्यक्तता सिद्ध करणे होय. संगीतकाराचा कां बहुदा पारंपरिक वा रूढ संगीताचे वळण पसंत करतात असे म्हणता येईल - पण त्यातूनच गुणगुणण्यासारख्या चाली निर्माण करतात, ही बाब खास प्रशंसनीय म्हणावीच लागेल. एक बाब स्पष्टपणे जाणवते ,आपल्या श्रोत्यांचे लक्ष वेधण्यासाठी या संगीतकाराने फारसे काही उलटे-पालटे केले नाही.
तसे पहाया तुला मला ग
अजून दवबिंदू थरथरतो
अर्ध्यामुर्ध्या कानगुजास्तव
अजून ताठर चंपक झुरतो
हाच अंतरा ऐकायला घेतल्यास, वरील विधान आपल्याला पटू शकेल. अस्ताईची चाल तशी कायम ठेवली आहे आणि संथपणे, चालीतील मूळ गोडवा कायम ठेऊन, तशीच चालू ठेवली आहे आणि मुळातल्या गोडव्यावर सगळी भिस्त ठेवली आहे. म्हटले तर यात काहीच नावीन्य नाही परंतु त्याचबरोबर चालीत गोडवा निर्माण करणे, हे सृजनाचे लक्षण मानावेच लागेल. त्याचजोडीने आपण कवितेकडे लक्ष वेधले असल्यास, शब्दकळा देखील अतिशय साधी, मुग्ध प्रणयालाच साजेशी आहे. कवी वसंत बापटांची कविता आहे. "दवबिंदू थरथरतो" किंवा "ताठर चंपक झुरतो" यातून आशयाची भावव्यक्तीच समोर येते. सुरवातीलाच मी एक विधान केले होते,निसर्गातील फुलांचा प्रतिमात्मक वापर करताना, उदाहरण म्हणून नेहमीच्याच वापरातील फुलांचा वापर केला आहे. त्यामुळे असेल पण संगीतकाराने चाल निर्मिती करताना, हाच दृष्टिकोन समोर ठेवला असावा.
अजून गुंगीमध्ये मोगरा
त्या तसल्या केसांच्या वासे
अजून त्या पात्यांत लव्हाळी
होतच असते अपुले हांसे
गायक म्हणून दशरथ पुजारी यांचे विश्लेषण करताना, काहीसा सपाट विनावक्र असा गळा म्हणता येईल. गाण्यावर शास्त्रोक्त संगीताचे संस्कार झाल्याचे जाणवत नाही (खरे तर हा मुद्दा विवादास्पद म्हणायला हवा!!) त्यामुळे गाताना एखादीच छोटीशी हरकत घेऊन, मूळ चालीतील काहीसे "वेगळे अंग" दाखवले जाते. कवितेची प्रकृती ध्यानात घेता आणि चालीचे शील लक्षात घेता, गायनात अवघड हरकती घेण्याची काहीच गरज भासत नाही. तांत्रिक बाजूने लिहायचे झाल्यास, आवाजाचा पल्ला फारसा विस्तृत नाही आणि त्याची परिणामकारकता मध्य सप्तकापुरतीच मर्यादित आहे. परंतु आवाजात काहीशी आश्वासकता किंवा सांत्वन करण्याचा धर्म आहे. "अजून गुंगीमध्ये मोगरा" ही ओळ गायल्यावर लगोलग छोटासा आलाप घेतला आहे आणि हा आलापच त्यांच्या गायकीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून मानता येईल.
अजुनी फिक्कट चंद्राखाली
माझी आशा तरळत आहे
गीतांमधले गरळ झोकुनी
अजून वारा बरळत आहे
संगीतकार म्हणून आणखी काही विधाने करायची झाल्यास, त्यांनी आपल्या कारकिर्दीत नेहमीच साध्या, सामान्य श्रोत्यांसाठी रचना करण्यात समाधान मानले. भारतीय व्यापक संगीत परंपरेत वाढलेला साधा श्रोता देखील संतुलित श्रोता असतो. ललित संगीत पारंपरिक की नवीन, याची फारशी चर्चा न करता त्यांची सांगीतिक गरज भागू शकते आणि असा वर्ग आपल्या समाजात फार मोठ्या प्रमाणावर असतो. तेंव्हा या गाण्याचे खरे यश अशा संगीत रचनेत दडलेले आहे, हे मान्यच करायला लागते.
No comments:
Post a Comment